श्रावण महिना - म्हणजे सणासुदींची रेलचेल आणि त्या ओघाने त्या त्या सणाची खासियत असणार्या पक्वान्नांचीही. मांसाहार बंद असला तरी हे सारे वार्षिक पदार्थ आणि त्यांची अवीट गोडी रसनेला उद्दीपीत करणारीच. प्रत्येक प्रदेशानुरुप तिथे पिकणार्या अन्नधान्यानुरुप पक्वान्नांत वैविध्य आढळून येते, तसंच पिढीजात घराण्यांचीही खासियत असतेच.
आमच्याकडेही श्रावण महिना म्हणजे उत्सवी वातावरण. श्रावण सुरु होऊन २-३ दिवस होतायत न होतायत तर येते विनायकी चतुर्थी - त्यासठी बनणारे लाडू, त्यानंतरच्या दिवशी नागपंचमी. या दिवशी 'शेंगा' नामक पदार्थ - उकडीच्या मोदकांसारखरखे कानवले पण मुरड घालून केलेल्या - त्या शेंगा. प्रत्येक शुक्रवारी जिवतीची पुजा करुन मुलांना वाण द्यायचे. जिवतीचा नैवेद्य म्हणजे खजुर्या ( आरत्या), उंबरे, खीर-घावन आणि शेवटच्या शुक्रवारी खीर- कानवला , असा प्रत्येक शुक्रवारचा वेगळा पदार्थ. नारळी पौर्णिमेचा नारळीभात, पिठोरीची बासुंदी हे ठरलेले.
पण या सर्वांचा सरताज म्हणजे आजचा 'शितळासप्तमीचा' दिवस. ज्यांना दर शुक्रवारी जिवती पुजन शक्य नाही त्यांनी हा एक दिवस तरी करावाच. या दिवशीचे नैवेद्याचे ताट म्हणजे वरण भात, वालाचे बिरढे, अळू वडी आणि खास सीकेपी स्पेशल सांदणी. या दिवशीचं जिवतीचं वाण सर्वांत महत्वाचं. माझी आजी या दिवसाबद्दल फार आग्रही असायची.तिला तिच्या सर्व मुला - नातवंडांना, लेकी- सुना- जावई आणि नंतर पतवंडेसुद्धा अशा सार्यांना वाण द्यायचं असायचं. श्रावण चालू व्हायच्या कित्येक दिवस आधी कालनिर्णयमधला शितळासप्तमीचा दिवस कधी आहे हे बघून ती प्रत्येकाला आग्रहाने आमंत्रण द्यायची वाण घ्यायला यायचं. सारे शुक्रवार काही सर्वांना जमायचं नाही. पण हा एक दिवस मात्र सारे कसंही करुन तिच्यासाठी जमवायचेच. साधारण २५-३० जण होत असत सारे मिळून. आणि आमची मामी दरवर्षी न चुकता एव्हढ्या लोकांसाठी अळू वड्या आणि सांदणीचा घाट घालायची.
वाण देण्याचा कार्यक्रम म्हणजे एक सोहळा असायचा. चार पिढ्यांचे स्नेहसंमेलन. औक्षण हे साध्या निरांजनाने नाही तर सात काडवाती पेटवून करायचे असायचे. काडवातीही माई स्वतः बनवत असे. त्या विझेपर्यंत सर्वांचे औक्षण तिला करायचे असे. ती देव्हार्यासमोर, जिवती मांडली असे तिथे बसे व आम्ही सारे तिच्या अवती भवती. खोली भरुन जाई इतके लोक तिच्या अवतीभवती असत. मग तिचा त्रास वाचवायला एकेकजण तिच्यासमोर येउन औक्षण करुन घेई आणि मग सर्वांत मागे जाऊन थांबे, असे करत करत सर्वांचे औक्षण झाले की मामी एका मोठ्या ताटात खास नैवेद्य अळूवडी व सांदणी घेऊन तिच्या हातात देई आणि ती प्रत्येकाला ते वाण देत असे. देव्हार्यात समईच्या प्रकाशात उजळलेल्या जिवतीचा, हाती अमृत कुंभ घेतलेला चेहरा बघून, तिला नमस्कार करायचा आणि मग काडवातींच्या प्रकाशात माईच्या गोर्या लालबुंद चेहर्यावर फाकलेले समाधान पाहून ही जितीजागती जिवतीच जणू हातात नैवेद्याच्या ताटाच्या रुपात अमृतकुंभ वाटतेय आणि लेकरांच्या क्षेमकुशलाचे दान मागतेय असा भास होई. "असं शास्त्र आहे, रिवाज आहे" म्हणणारी ती, आपली सारी पिल्लावळ अशी एकत्र एका छताखाली आनंदाने तिच्या हातचं गोडधोड खातेय हे बघूनच भरुन पावत असे………रोज शितलासप्तमीच्या दिवशी ही आठवण येतेच येते.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
रेसिपीच्या आधीची प्रस्तावनाच मोठी झाली. सॉरी हं, तर आता सांदणीकद्डे वळूयात. सांदणी हा पदार्थ फक्त वेळकाढू आहे, कठीण अजिबातच नाही.
सांदणी हा एकच प्रकार दोन वेगळ्या पद्धतींनी बनवला जातो.एकात सांदणी साधी - इडलीच्या चवीच्या आसपास वाटणारी- फक्त आंबटपणा नसलेली अशी आणि तिच्यासह खळा नामक नारळाच्या दुधात गुळ घालून शिजवलेला दाट द्रव . हा प्रकार आमची माई करत असे. पण मी आता माझ्या सासरी करत असलेल्या दुसर्या प्रकाराची पा. कॄ. देत आहे.यात मूळ सांदणीच गोड असते, वेगळा द्रव असत नाही आणि गुळाऐवजी साखर असते.
आता वळूयात साहित्य आणि कॄतीकडे
साहित्य
१. नारळ - १ मध्यम आकाराचा
२. तांदळाचा रवा - (इडलीचा नव्हे) पाव किलो
३. साखर - पाव किलो
४. केशर, वेलची पूड, जायफळ पूड, काजू,बदाम, पिस्ते काप - आवडीनुसार
कॄती -
१.नारळ खवून त्या किसात अगदी थोडे पाणी घालून वाटून घ्यावे. गाळणीने गाळून दाट दूध काढावे. राहिलेल्या चोथ्यात १ वाटी पाणी घालून पुन्हा वाटावे. आता जे दूध निघेल ते आधी काढलेल्या दुधाच्या तुलनेत पातळ असेल. हे पातळ दूध वेगळे ठेवावे.
२. आता तांदळाच्या रव्यापैकी पाव भाग रवा एका पातेल्यात घेऊन त्यात हे पातळ ना. दूध घालून गॅसवर ठेवून शिजवावे. २-३ मिनिटांत ते शिजून गोळा होईल.
३. याला खळा म्हणतात. तो पूर्ण थंड (रूम टेंपरेचर) होऊ द्यावा. घाई असल्यास मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात हे खळा केलेले पातेले ठेवावे.
४. आता दाट ना. दुधात उरलेला पाऊण भाग रवा आणि साखर एकत्र करुन ढवळावे. त्यात वेलची, जायफळ, केशर, काजू-बदाम काप घालावे. खळा पूर्ण गार झाल्यावर या मिश्रणात मिसळावा. गुठळ्या मोडून घ्याव्यात.
५. हे मिश्रण तांदळाचा रवा कच्चा असल्यामुळे मिळून येत नाही. रवा खाली बसतो. ते तसेच थोडा वेळ राहू द्यावे. साखर मात्र विरघळू द्यावी. हे मिश्रण जितका वेळ असेच ठेऊ तितकी जास्त ना. दुधाची ग्लेझ सांदणीवर दिसते.
६. ढोकळा पात्र असल्यास त्या ताटल्यांत या मिश्रणाचा काही भाग ओतावा. जास्त जाड वड्या अपेक्षित नाहीत. त्यामुळे पूर्ण ताटली भरु नये. तसेच मिश्रण ओतताना नीट ढवळून घ्यावे, रवा, ना. दू. दोन्ही ताटलीत यायला हवे. ढोकळा पात्र नसल्यास, कुकरचे भांडे, साध्या ताटल्या यातही करु शकता.
७. आता हे मिश्रण साधा कुकर, राईस कुकर यात १०-१५ मिनीटे वाफवून घ्यावे. थंड झाले की वड्या पाडाव्यात.
सांदणी तयार आहे.
वा लिखाण आणि रेसिपी दोन्ही
वा लिखाण आणि रेसिपी दोन्ही फारच छान !!!
सुरेख आशिका. सर्व माहोल
सुरेख आशिका. सर्व माहोल डोळ्यासमोर उभा राहिला, आजी ग्रेट.
रेसिपी आणि फोटोही छान.
छान
छान
प्रस्तावना मस्तच आहे. ही
प्रस्तावना मस्तच आहे.
ही खांडवीची (मराठी) चुलत बहीण वाटतेय.
अतिशय सुरेख प्रस्तावना.
अतिशय सुरेख प्रस्तावना.
पदार्थ पण छान, खटाटोप भारी आहे पण. हौशी लोकांचे काम, आम्ही आयते मिळाले तर(च) खाऊ लोकांमध्ये मोडतो :)☺☺
किती सुंदर वर्णन करुन
किती सुंदर वर्णन करुन सांगितले. इतके सगळे दिवस सणासारखे आम्ही साजरे नाही करत. काडवाती म्हणजे कशापासून .. आणि कशी बनवतात ही वात?
मी गोव्याला हा पदार्थ खाल्ला आहे. तिथे कुठल्या तरी बसस्थानकावर मिळाला पण त्यात इतके सर्व जिन्नस नव्हते.
प्रस्तावना मस्तच आहे.>>>>+१
प्रस्तावना मस्तच आहे.>>>>+१
किती सुंदर वर्णन केला आहे वाण
किती सुंदर वर्णन केला आहे वाण देण्याच.
रेसिपि ही सोपी वाटतीये.
मनीमोहोर - पहिल्या वहिल्या
मनीमोहोर - पहिल्या वहिल्या प्रतिसादासाठी धन्यवाद (तुमचीच स्टाईल ढापली मी).
इतर सर्वांनासुद्धा धन्यवाद !
हर्ट - काडवात ही साधारण ३-४ इंचाची काडी उदबत्तीला असते तशी घेऊन त्यावर कापूस गुंडाळला जातो आणि मग ही वात तूप गरम करुन त्यात थोडा वेळ भिजत ठेवायची, फुलवात ठेवतात तशी. आत काडी असल्यामुळे ही वात सांदणीत किंवा इतर नैवेद्याच्या पदार्थात खोवून उभी राहते. अशा सात काडवाती एका वेळी उजळल्या जातात.
खंडोबाचा तळीभरण विधी देखील काडवातीने आरती करुनच संपन्न होतो.
काडवातीची माहिती मस्तचं आहे.
काडवातीची माहिती मस्तचं आहे. मी कधी पाहिली नाही काडवात. धन्यवाद आशिका.
आमच्यात काडवात मंगळागौरीच्या
आमच्यात काडवात मंगळागौरीच्या आरतीला लागते, तुळ्शीच्या काड्यांपासून करतात
आशिका, सांदणी मस्तच !
मस्त! लहानपणीच्या सगळ्या
मस्त! लहानपणीच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. सांदणी हा आवडीचा पदार्थ. खास श्रावण महिन्यातला पदार्थ!
खुप सुंदर लिहिलंय.
खुप सुंदर लिहिलंय.
वाह! पदार्थ एकदम तोंपासु
वाह! पदार्थ एकदम तोंपासु दिसतोय
आशिका मस्त लिहिले
आशिका मस्त लिहिले आहेस.
काडवाती म्हणजे तुळस काशीला गेली (म्हणजे तुळस वाळून मेली की. पण तुळस मेली असं न म्हणता काशीला गेली असं आमची आजी म्हणायची) की तिच्या काड्यांभोवती कापूस गुंडाळून त्यावर फुलवातींसारखं तूप लावून त्या कापसासकट ती काडी जाळणे.
मामे - धन्यवाद गं, तुळशीची
मामे - धन्यवाद गं, तुळशीची काडी हे अॅड केलेस त्याबद्दल.
आणि हो, तुळस काशीला नाही द्वारकेला जाते असं आजी म्हणत असावी. श्रीकॄष्ण पत्नी म्हणून द्वारका हेच तिचं अंतिमधाम.
काडवातीचा उल्लेख ज्ञानेश्वरी
काडवातीचा उल्लेख ज्ञानेश्वरी मधे पण आहे. श्रोत्यांची लक्षणे सांगताना माऊलींनी स्वतःला काडवात आणि श्रोत्यांना सूर्य असे कल्पिलेले आहे.
आशिका, नक्की करून पाहणार
आशिका, नक्की करून पाहणार हे.
छान लिहिलंस.
अतिशय सुरेख
अतिशय सुरेख प्रस्तावना.
पदार्थ पण छान, खटाटोप भारी आहे पण. हौशी लोकांचे काम, >>>>+१११११
आजी ग्रेट. >>>>>+११११११
सॉरी काय आशिका ....प्रस्तावना
सॉरी काय आशिका ....प्रस्तावना फार छान...इन्टरेस्टिन्ग!) पदार्थही छान.