रायगड वारी… ( अंतिम भाग ) !!!

Submitted by MallinathK on 8 August, 2016 - 01:50

रायगड वारी… ( अंतिम भाग ) !!!

रायगड ! पहिल्या पायरीलाच तुला नमन… नव्हे, वाकून नमस्कार !!! इथे आल्यावर मला नेहमी वाटतं ती रायगड माझ्याकडे पाठ करून उभा आहे, गर्विष्ठपणे. पण त्याचंही बरोबर आहे. का करू नये गर्व ? माझ्या राजांचा एकटाच तर साक्षीदार आहे. कित्त्येक क्षण अनुभवले याने राजांसोबत, काय काय नाही पाहिलं याने, काय काय नाही सोसलं याने. याला बोलता आलं असतं तर विचारलं असतं सांग माझा राजा कसा होता…  

"होय, साक्षीदार आहे मी त्या एकमेवाद्वितीय राजांचा, त्यांच्या एका एका शौर्याचा. साक्षीदार आहे मी त्यांनी घालवलेल्या इथल्या एका एका क्षणांचा, त्यांनी घेतलेल्या इथल्या एका एका श्वासांचा. दगडातून कोरलेल्या माझ्या कमानींचा, कृतज्ञता दाखवणा-या 'पायरी'चा. साक्षीदार आहे मी त्या "सोहळ्यांचा", जेव्हा ते 'सजले' होते अन जेव्हा त्यांना 'सजवले' होते. साक्षीदार आहे मी त्या "ज्वाळांचा", जे त्यांच्या मनी जळत होते अन जे त्यांना जाळत होते. साक्षीदार आहे मी त्या अश्रुंचा, जे त्यांनी ढाळलेले आणि जे त्यांच्यासाठी ढाळलेले. गर्व आहे मला या गोष्टिंचा. परंतु… जेवढ्या गर्वाने मी उभा आहे, तेवढाच आतून पोकळ आहे. मी पाहिलेल्या, अनुभवलेल्या माझ्या आयुष्यातल्या साऱ्या सुखद गोष्टींना एकाच दुःखद क्षणाचं विरजण लागलं. मी तर तेव्हाच ढासळलो, जेव्हा माझ्या राजांनी माझ्याच कुशीत डोळे मिटले. नंतर बाकिच्यांनी नुसते शरीर ओरबाडले माझे. नाहीतर काय बिशाद होती गनिमाची माझ्याकडे नजर वर करून पाहण्याची."

आजही मला रायगड माझ्याकडे पाठ करून उभा आहे असं वाटतंय. पण तो तर त्याच्या स्वामींच्या "समाधी" कडे नजर लाऊन उभा आहे.  स्तब्द नि:शब्द !!!

 महाराजांची समाधी

( महाराजांची समाधी )

---------------------------------------------------------------------------------------------------------------

इथून (भाग पहिला) पुढे…...

बांधावरून उतरून येणारी माणसं पाहून शेजारच्या काकांनी सांगितलं कि बस आलीय.…

बस मध्ये मोजकीच माणसं दिसतायेत, हा शेवटचा स्टॉप असल्यानं कमी असतील. पण एवढ्या सगळ्यात मनोज नाहीय. आणि मनोज एवढा बारीक नाहीय की या चार कणसांत दिसणार नाही. चला परत शिरस्त्राण घाला अन निघा. श्या, हा पाचाडलाच उतरलेला दिसतोय. चला पुन्हा ४ किमी. मागे. पण हे सांदोशी ते सांदोशी फाटा ४ किमी. नसावं असं पंकजलाही वाटायला लागलंय. पंकज म्हणतोय मोजुया तरी. पुन्हा तिच चढण, तेच वळण. श्या, काय बेक्कार रोड आहे. मनोजला फोन लागणार नाही, त्याला मेसेज तरी करून ठेवावा. पोचेल तेव्हा पोचेल. माझ्या फोन वरून जातच नाहीय. नो नेटवर्क. पंकज च्या फोन वरून ट्राय करावं. जाउदे, मेसेजेस जातील तेव्हा जातील. पुन्हा गप्पा.

हे काय? "रायगड रोप वे बेस" ० किमी. ? हे तर पाचाड आहे. रोप वे इथून अजून ४-५ किमी. तरी असेल. पंकजलाही या बद्दल जास्ती माहीत नाही. नविनंच दिसतंय काहीतरी. अरे पंकजचा फोन वाजतोय…. नवीन नंबर आहे. तो ड्राईव्ह करतोय, मीच उचलतो. हा तर मनोज बोलतोय, कोणाच्या नंबर वरून फोन केलाय ? मरु दे, आधी कुठे आहे ते तरी विचारु. असंही पायथ्याला पोचलोय. त्याला इथेच बोलावू डायरेक्ट. अरे हा काय, हा इथेच तर सामोर उभा आहे. ठेव फोन.

पंकज गाडी लाऊन येई पर्यंत मनोजशी गळा भेट झाली. आम्ही येई पर्यंत मनोज दोन मोठी लोकं आणि एक लहान मुलगा अश्या काँबीनेशनच्या ग्रुप बद्दल तिथे चौकशी करत होता. पुन्हा राहून राहून वाटलं की रुद्राक्षला आणायला हवं होतं. मनोज सुद्धा तेच म्हणतोय, आणायला हवं होतं. पण त्याला म्हंटंलं त्याच्या नादात माझाही विजा कँसल झाला असता. ;) जरा बॅग वगैरे ठेवून फ्रेश व्हावं. पंकज आणि मनोजही फ्रेश झालेत. नको नको म्हणत मनोज सोबत एक वडापाव खाल्ला. मनोजला म्हंटलं निघावं आता. हेल्मेट इथेच दुकानात ठेवून जायची मनोजची आयडीया छान वाटली, मोकळेपणानं फिरता येईल.

रायगड ! पहिल्या पायरीलाच तुला नमन… नव्हे, वाकून नमस्कार !!! इथे आल्यावर मला नेहमी वाटतं ती रायगड माझ्याकडे पाठ करून उभा आहे, गर्विष्ठपणे. पण त्याचंही बरोबर आहे. का करू नये गर्व ? माझ्या राजांचा एकटाच तर साक्षीदार आहे. कित्त्येक क्षण अनुभवले याने राजांसोबत, काय काय नाही पाहिलं याने, काय काय नाही सोसलं याने. याला बोलता आलं असतं तर विचारलं असतं सांग माझा राजा कसा होता…

आजुबाजूचे हे पिकनिक छाप लोक हे आम्ही काय करतोय वेड्या सारखं म्हणुन पाहतायत. पण यांना रायगडा बद्दल सांगावं एवढा मी महान नाहीय आणि त्यांनी ती ऐकावी ही त्यांची लायकीही नाहीय. असती तर ते असे वागले नसते. असो, रायगडा बद्दल कोणी बोलावं तर फक्त रायगडानेच.

श्या यार, या पायऱ्या. आज मनोज सोबत आहे तर वाटलेलं की एखादा नवा रुट होईल. मनोजची ही २९वी रायगड वारी. त्याच्या समोर पंकज आणि मी म्हणजे…. पंकज एक वेळ ठिके. पण माझं तर न बोललेलंच बरं. मनोजने केलेल्या घाटवाटांची यादी काढली तर गावाकडच्या लग्न पत्रिकेतल्या निमंत्रकांच्या यादीपेक्षाही मोठी यादी बनेल. असा हा अवलिया इसम आम्हाला रायगड दाखवतोय, किती चंगळ असेल आमची. बोलता बोलता मगाशी पंकजने विचारलं की पाय-या शिवाय दुसरा कुठला मार्ग सध्या करण्यासारखा आहे ? त्या वरून विषय नाना दरवाजाकडे वळाला. मनोज ने सांगितलं की या मार्गानेच हत्ती वर नेलेले. लहान/ लहाना / नाण्हा चा अपभ्रंश होत होत तो नाना दरवाजा झालाय. नाना (लहान दरवाजा) आणि म्हाद्वार / महाद्वार (मोठा दरवाजा) असे दोन मुख्य वहिवाटीचे दरवाजे. एवढी माहीती देत देत मनोजने नाना दरवाज्याचा रुट दाखवला, जी पुढे एके ठिकाणी या पाय-यांना मिळते. आमचं तिथुन नाना दरवाज्याचा रुट करायचं ठरलं.

तिथंवर पोहचेपर्यंत मनोज ने आम्हाला दोन समाध्या दाखवल्या. एक गोदावरींची (ज्यांनी लिंगाण्यावरुन उडी मारून आत्महत्त्या केली असं म्हणतात) आणि दुसरी सूर्याजी पिसाळ यांची. समाधी बद्दल बोलत बोलत नाना वाटेच्या फाट्या जवळ पोचलोयत. इथून पुढे, पाय-या सोडुन नाना वाटेने वर जायचेय. मनोज सांगतोय की या वाटेने गुहा लागतात. हे समोर दिसतंय ते मशीद मोर्चा. इथे मशीद होती वाटतं. राहुदे, पुढे चालु. इथल्या बाकीच्या खुणांवरून, चौथ-यावरून इथे मोर्चे बांधणी होती हेही जाणवतंय.

वॉव, मनोज ने सांगितलेल्या गुहा ह्याच वाटतं. अजून तरी बाकीच्या गडावरच्या गुहांसारखं विद्रुपीकरण झालेलं नाही. पडझड झालीय, पण अगदी कोऱ्या करकरीत. एकाही प्रेमविराचं नाव, हृदय, बाण वगैरे काही काही नाही. पहायला किती प्रसन्न वाटतंय. पाय-या सोडुन या आडवाटेला कोणी यायला जात नाही, म्हणुन अजून सारं जपून आहे. पण पंकज म्हणतोय तेही बरोबर आहे, की कोणी येत नाही तेच बरं आहे. पण याचं वाईट वाटतं की लोकांना अश्या ठिकाणांबद्दल, जागांबद्दल, वास्तू बद्दल काहीच ओढ किंवा उत्सुकता नाहीय. त्यांना कधी अश्या गोष्टी जाणुन घ्यावंच वाटत नाहीय. आता हीच गुहा पहा, किती साचेबद्ध पद्धतीने कोरलीय. तीन खोल्या आहेत, पाण्याच्या वहीवाटीला सुध्दा ओघळ कोरलेल्या आहेत. आणि समोरच्या भिंतीला गेलेली तडा हि नैसर्गीक नसून जाणुन बुजून पाडलेलं चीर आहे, हे मनोजने सांगे पर्यंत मला पटलं नव्हतं. अश्या चिरा देऊन छताची बांधणी करतात हेही नवीन कळालं यांच्याकडुन. रायगड वारी मध्ये दर वेळेस रायगड वेगळा भासतो, दर वेळेस नवं काही तरी कळतं. आज पंकज आणी मनोज सोबत एक नवा रायगड कळतोय.

महाद्वार
( महाद्वार - फोटोग्राफर मनोज. )

नाना दरवाजाची वाट महादरवाज्याच्या डावीकडे येऊन मिळाली. इथे खुपच पब्लिक आहे राव. जंगलातुन एकदम शहरात आल्या सारखं वाटलं. पण, महादरवाजा नावाप्रमाणे भव्य आहे. याची बुरुज बांधणी आणि कमानी बघुनच त्या काळात आजच्या सारखे साधन सामग्री नसताना कसे बांधले असतील याचा विचार डोकावल्या शिवाय राहत नाही. धन्य ते इंदुलकर !!! बुरुजांचे दगड एवढे मोठे, त्यात त्यांचा पाया किती खोल खाणला असेल. बुरुजाला एका विशिष्ट उंची पर्यंत गिलाव केल्या सारखा एकसंध मुलामा आहे. पंकज आणि मी या बद्दल बोलत होतो तेवढ्यातच कोणी तरी हाक मारली. एका गरीब ग्रुपकडे सेल्फी स्टीक नव्हती म्हणुन ते लोक फोटो काढण्याची गळ घालत होते. मनोज ने लगे हातो त्यांना फोटो काडून दिलं आणि एक महान पुण्य पदरात पाडून घेतलं. मला हेच कळत नाही, लोकं फिरायला किंवा एखादं स्थळ पहायला म्हणुन जातात आणि तिथल्या आठवणी म्हणुन स्वत:चेच फोटो काढून आणतात. किती विसंगती !!!

ओह…  झालं वाटतं एकदाचं यांचं दरवाज्या सोबत फोटोसेशन. आता आत जायला हरकत नाही. इथे कमानीत किती थंड वाटतंय. बाहेरून पाहिलं तर एवढ्या बुलंद बुरुजांमध्ये एवढं नाजूक काम केलेला दरवाजा असेल असं वाटणार देखील नाही. तेवढच नाजूक आणि तेवढंच बुलंद. एवढी सुंदर कलाकुसर, एवढं कोरीव नक्षीकाम, एवढी कोरीव कमान, एवडी ओबड धोबड बाई. … बाई ? ईईईईई… हिने अक्खा व्यूव व्यापला माझा… ही का मध्येच अशी हात वर करून उभीय ? अरेच्च्च… दरवाज्या सोबत फोटो काडून घेतेय तर.  चालुदे चालुदे…

तिच्या फोटो नंतर थोडावेळ दरवाज्याच्या कमानीत बसलो. शेजारच्याच पडलेल्या वाड्याची अवशेष पाहुन पुढे आलोयत. पंकजने तिथल्या दाखवलेल्या पाण्याच्या वहिवाटासाठी सोडलेली कमान, मनोजने दाखवलेला दरवाज्याचा कोपरा जो लागु नये म्हणुन कापलेला आणि त्याचा ओळंबा (जो आजही ९० अंशात आहे), हे सारं पाहून पुन्हा एकदा आधीच्या लोकांचा स्थापत्य शास्त्राचा अभ्यास किती गाढा होता हे कळतं. इथे आलेली अशी किती लोकं एवढ्या बारकाईने गड पाहतात ?

महाद्वार फिरून पाहताना मनोज ने टकमक टोकाकडचा गुप्त दरवाजा दाखवला. तो मला निटसा दिसला नाही. कदाचीत माझं खडकी-दापोडी झालं असावं. पण काहीतरी दिसलं. तेवढं पाहून पाय-या चढत गंगासागर शेजारून पुढे एका पत्रा शेड असलेल्या धर्म शाळेत आलोय. तिथे थोडी विश्रांती घेऊन फ्रेश झालो, पण गप्पांना विश्रांती नव्हती. मनोज तर रायगडा बद्दल अखंड बोलतोय. त्याने केलेल्या घाटवाटा ऐकल्या तर वाटतं हा पुस्तक का लिहीत नाही ? 'मी केलेल्या घाटवाटा' ! क्षणभराच्या विश्रांतीने खुप फ्रेश वाटायला लागलंय. मनोज म्हणतोय आता इकडे तिकडे न फिरता थेट जगदिश्वर.…

जगदीश्वर !!! बाहेरून कसंही असो, मंदीर, मस्जिद. पण आतून ? फक्त आणि फक्त जगदीश्वर !!! मी उंबरठा ओलांडुन आत आलोय, पण असं वाटतय की सर्व काही मागेच ठेऊन आलोय. जगाच्या कोलाहला पासून कुठेतरी दुर, एकांतवासात. हे मानसीक वैगेरे असेल का ? असु दे. पण एकदम हलकं हलकं वाटायला लागलंय. इतकं हलकं की इथली थंड शांतता शरीरातून आरपार जातेय. आहाहाहा…. थंड शांतता. एका उंबरठ्यामुळे वातावरणात एवढा फरक असू शकतो हे इथे आल्यावर नेहमी जाणवतं. वातावरणात की विचारांत ? अरेच्चा, पाऊल गाभाऱ्याकडे कधी वळली आणि मी गाभाऱ्यात पोहचलो सुद्धा. आहाहाहा…. थंड शांतता.

मनोजने आणलेली फळं, त्यांच्या घरचा नारळ वगैरे पिंडी समोर ठेवून उदबत्त्या पेटवल्यात. पिंडीला ओवाळून काही उदबत्त्या तिथेच लावलेत. मनोज आणि पंकज ध्यानाला बसलेत. त्यांच्या सारखं थोडं ध्यान करावं म्हणुन डोळे मिटले तर मलाच राहवलं नाही, पुन्हा डोळे उघडले. इतकावेळ आम्ही थोडं तरी बोलत होतो. पण आता, एवढी शांतता की स्वत:च्या श्वासांचा आवाज सुद्धा गोंधळ केल्यासारखा वाटायला लागलाय. आम्ही एवढे शांत बसलेलं पाहून एक जोडपं आत आलंच नाही, बाहेरच्या बाहेर दर्शन घेऊन गेले बिचारे. दर्शन घेऊन बाहरे निघताना पंकज पिंडीसमोरच्या जमिनीवर हात फिरवत म्हणाला "इथे कितीतरी वेळा महाराजांच्या पायांचा स्पर्श झाला असेल." मला तर विचार करुनच शहारल्या सारखे झालंय. पण, असा विचार किती जणांच्या डोक्यात येतो ? फोटोसाठी "लोकेशन" शोधण्या पलीकडे दुसरा कोणता विचार डोक्यात येत असेल का ?

महाराजांची समाधी
(महाराजांची समाधी - फोटोग्राफर पंकज. )


(महाराजांची समाधी - फोटोग्राफर पंकज. )

जगदीश्वर दर्शन घेऊन आम्ही समाधी कडे आलोय. तिथल्या गार्डची परवानगी घेऊन महाराजांच्या समाधी भोवती उदबत्त्या लावल्या. दर्शन घेऊन खाली उतरताना उगीच वाटुन गेलं की चढायला नको होतं, पाय लावल्या सारखं वाटलं. पुन्हा एकदा नमस्कार करु. 
( सेवेचेठायेतत्परहिरोजीइंदुळ्कर - सेवेसी ठाई तत्पर, हिरोजी इंदुळ्कर. फोटो अंतरजालावरुन साभार.)


मनोज ने आणलेल्या फळांतलं सफरचंद कापून दिलंय आणि बकिच्यांनाही वाटतोय. त्याच्या कडून घेऊन उरलेलं सफरचंद मी कापतोय आणि मनोज वाटतोय. कोणीतरी विचारतंय की "ते आर्किटेक्ट्च्या नावाची पायरी वगैरे आहे म्हणे कुठे आहे?". कोण विचारतंय म्हणुन पाहतोय तर हा ६ फुटाचा माणुस, गळ्यात केमेरा अडकवून त्याच 'पायरी'वर उभारून दरवाज्याच्या वरच्या कमानी कडे पाहतोय. धन्य आहेत हे लोक. पंकज हसतोय. मनोजने दाखवली त्याला ती 'पायरी'. 

सफरचंद संपवून आम्ही समाधी शेजारून समोरच्या डोंगररांगा अभ्यासतोय. मनोज भक्तिभावे प्रत्येक डोंगराची माहीती देतोय. ही सांदोशी… ही वारंगी… हा लिंगाणा… ही काळ नदी… ही नदीची सुरवात होणारी घळ… तो बोचेबोळे घाट,  समोर दुरवर अंधुकसा तोरणा. मनोज एक एक माहीती सांगतॊय. माझ्या केवढं लक्षात राहील कुणास ठाउक. मनोज ने एवढं सगळं पादाक्रांत केलंय. सहीच ना ? पण मला तो जुल्फिखार उतरून आलेला घाट नक्की कोणता आहे कळालं नाहीय. मनोज परत एकदा सांगतोय खरा, पण माझं पुन्हा खडकी-दापोडी झालंय. तो हात लांब करून एवढ्या लांबचा घाट दाखवतोय. बिचारा जीव तोडुन सांगतोय की तो नाही रे त्याच्या पुढचा. पण बोट नक्की कोणत्या डोंगराला दर्शवतोय हे कळतंच नाहीय. हे म्हणजे असं चाल्लंय की मनोज लांबुनच मुलांच्या घोळक्यातला एका मुलाकडे बोट करून म्हणतोय "तो बघ तो, तो माझा मुलगा." आणि मी "अरे डिट्टो सेम टू सेम तुझ्या सारखाच दिसतोय की. पण एवढ्या लहान वयात चश्मा लागला ?" "च्यायला, तो चश्मीस माझ्या शेजारच्याचा मुलगा आहे, त्याच्या सोबत असणारा माझा मुलगा आहे."  हे त्याला बोलून दाखवलं तर मारेलच तो. पण काहीही असो, शेवटी व्यवस्थीत पणे त्याने त्याचा मुलगा कोणता…. म्हणजे ते जुल्फिखाराने उतरलेला घाट कोणता हे व्यवस्थीत पणे दाखवलंच.  

लिंगाणा
( लिंगाणा फोटोग्राफर पंकज. )


जगदीश्वर पाहून परततोय. हे वयस्कर काका फक्त रायगड पहायला आलेत. वेळ थोडाच आहे म्हणे. मनोज कडुन बरीच माहिती घेतलीय त्यांनीही. आजकाल असे हौशी लोक भेटनेच अवघड झालंय. जगदीश्वर पाहून त्या काकांशी बोलत, त्या 'पायरी'ची चौकशी करणा-या बद्दल गप्पा मारत कोळींब तलावा जवळ पोहचलो सुद्धा. गडावरच्या पाण्याच्या टाक्यांपैकी एक. त्या गप्पांच्या नादात जगदीश्वराच्या भिंतीवरची मुर्ती पहायची राहीली. आता पर्यंत मनोजला अघोषित गाईडच बनवलंय आम्ही. आता गाईड म्हणुनच हाका मारतोय. मोबदला म्हणुन त्याला गाडीवरून महाडला सोडायचं ठरलंय. 

कोळींब तलाव
(कोळींब तलाव - फोटोग्राफर पंकज.)कोळींब तलावाच्या गप्पा, त्याच्या बद्दलची माहीती ऐकत ऐकत बाजार पेठेत आलोय. अर्थात माहीती मनोजच सांगतोय, आणि पंकज त्याचे अनुभव ऐकवतोय. दोन दिग्गजांसमोर मी न बोललेलंच बरंय. १८१८ ला पोटल्याच्या डोंगरावरुन तोफ डागून रायगड काबीज केला गेला. तो गोळा बाराटाकीच्या जवळच्या दारूच्या कोठारावर पडल्याने आग कशी आटोक्या बाहेर गेली वगैरे मनोज सांगतोय, पण मी विचार करतोय कि त्या समोरच्या डोंगरावरुन डागलेला गोळा तिथे दारूच्या कोठारावर एवढ्या लांब पडला म्हणजे तोफेची ताकत केवढी असेल. बाराटाकीच्या जवळच्या दारुच्या कोठारावरुन आमच्या गप्पा टकमक टोकाजवळच्या दारुच्या कोठारावर घसरलीय. दोन्ही कोठारांचं बांधकाम सारखंच आहे म्हणुन आम्ही पुन्हा मागे जाउन टकमक टोकाजवळचं दारुचं कोठार पाहणार आहोत. 

दारुचं कोठार पाहून आमची पाऊले सभाग्रहाकडे वळालीयत. या पायांसोबत तोंड सुद्धा अखंड चालुच आहे. आताश्या थोडं ऊन जाणवायला लागलंय. होळीच्या माळावरुन चालत चालत पुढे नगारखान्याच्या दरवाज्यातून सभामंडपात आलोय. इथे तो ध्वनी प्रतिध्वनी चा प्रयत्न करून पहावं म्हंटलं तर मनोज ने जाहीर करून टालकं कि त्याला खूप शांतता लगते. खूप शांतता म्हणजे अजून किती न कळाल्याने मीही जाउदे म्हंटलं. आम्ही सभाग्रहाच्या डाव्या बाजूने मागे राजवाड्यात प्रवेश करतोय. या दरवाज्याला कमान होती म्हणे, जी मनोजने आधी पाहिलीय. पण आत्ताच्या स्थितीत तर इथे फक्त दगड पडलेत, कमानीचे. पुरातत्व खाते प्रत्येक प्रेक्षकाकडुन पैसे घेऊन काय करते कुणास ठाऊक ! हा राजवाडा जिथे राजांचा राज्याभिषेक झालेला आणि छत्रारोहण सभागृहात झालेला. इथले काही दगड पाहून पंकज म्हणतोय की या अशा दगदांचा इथे काय उपयोग झाला असेल ? ही कोरलेली दगडं पाहीली तर उखळी सारखे, चौकोनी आकाराचे आणि एका बाजूला पाणी जाण्यासाठी वाट सोडल्या सारखी आहेत. जसं काही त्यावर काही धुतलं की ओहोळ निघुन जावं. मनोजचा अंदाज आहे की कदाचित महाराजांच्या राज्याभिषेकाच्यावेळी वापरले असतील.

पुढे राणीवसा पाहत आम्ही मेणा दरवाज्याकडे आलोयत. इथे एक गाईड एका जमावा समोर त्याने पाठांतरलेला इतिहास अक्षरश: ओकतोय. पंकजला चेष्टा सुचतेय, तोही भक्ती भावाने ऐकतोय. जसं काही याला काही माहीतच नाहीय गडाबद्दल. पंकजची एक्टींगवर हसत हसत कधी मेणा दरवाजा उतरलो कळालंच नाही. इथे आता एम टी डी सी मध्ये जाउन मनोजच्या एका मित्राला भेटायचंय. त्याचा लेण्यांवरचा अभ्यास खूप गाढा आहे म्हणे. च्यायला एवढा वेळ कसा मिळत असेल ? इच्छा तिथे मार्ग म्हणतात तेच खरं. माझ्या ओळखीत अजून एक अभ्यासक जमा झाला, पण त्याचा मी साधा उपयोग सुद्धा करून घेऊ शकत नाही. असोच.

एकदा मी कुठे तरी वाचंलेलं, रेल्वे मधली आपली सिट आपण ज्या दरवाज्यातून डब्ब्यात जातो नेहमी त्याच्या दुस-याच टोकाला असते. आपले हात घाण असताना किंवा हाता काहीतरी वजनदार वस्तू असताना आपला हात पोचणार नाही अश्याच ठिकाणी खाजवायला होतं. आणि लाईट गेल्यावर हातातली वस्तू खाली पडते आणि अश्या ठिकाणी/कोप-यात जाउन बसते कि जिथे फक्त बेटरीचा उजेड पोहचेल. याचा मला आज पुन्हा पुनःप्रत्यय आला. आत्ता पर्यंत एम टी डी सी च्या सगळ्या खोल्या पाहुन झाल्यात आणि शेवटी मनोजचा मित्र शेवटच्या खोलीत सापडला. आणि हे सगळं रूम नंबर माहीत असुन झालं, हे विषेश. झाली एकदाची भरत भेट.

भेट संपवुन निघालो पण लगेच शिरकाई मंदीराजवळ थांबलो. शिरकाई मंदिरातली मुर्ती ही पुनःबंधणीत नवीन बनवलीय आणि जुनी भिन्न झालेली मुर्ती मंदिराच्या मागेच ठेवली आहे. इथेच शेजारच्या झाडाखाली थंड हवेला बसलोयत. इथून दिसणारा होळीचा माळ आणि बाजारपेठ शांत वाटतंय. कदाचीत ऊन वाढल्याने सगळे लोक कुठे ना कुठे सावलीला बसले असतील. उन्हावरून आठवलं, मनोजला महाडला गाडी पकडायला उशीर होईल म्हणुन गडबडब करायला हवं. आणि त्याहुन म्हणजे आंधारायाच्या आधी ताम्हिणी गाठायचंय. आता डायरेक्ट उतरायला चालु करायला पाहीजे. गंगासागर समोरील मनोरे तेवढे राहीले राव. मनो-या वरून मनोजला मनो-यातील पाण्याच्या पाईप्स बद्दल आठवलं. ते पाणी दिव्याभोवती पडुन त्यातून दिव्याचा मंद प्रकाश त्या खोलीभर पसरायचा. त्यांब्याचे पाईप्स त्याने पाहिलेत म्हणे. मी म्हंटलं पाहुया. म्हणुन आता लगबगीने आम्ही मनो-या कडे जातोय.  
       
मनो-याचे आत्ता पाहिले तर फक्त दोनच मजले शिल्लक आहेत. मनो-याच्या प्रत्येक मजल्यावर पाणी खेळ्वलं जायचं. अष्टकोनी मनो-याच्या प्रत्येक कोणाच्या कोप-यात तांब्याच्या पाईप्स आहेत. ज्यातून पाणी वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर यायचं. तेच पाईप पुढे मनो-याचा खांबांना धरून खांबाच्या मध्यात असलेल्या पणत्यांच्या/दिव्याच्या देवड्यांवर येतात. जिथून पाणी देवड्यासमोरून पडद्यासारखं पडून खालच्या कुपीत गोळा होतं आणि पाईप ने खालच्या मजल्यावर नेलं जातं. मनोजने त्या पाईप्स या आधी पाहिल्या आहेत, पण आज फक्त त्याच्या खाणा-खुणाच शिल्लक आहेत. दोन्ही मजल्यावरच्या खाणाखुणा पाहुन आता परतीच्या वाटेला लागलोयत. मनातली एक सल कमी झाली कि मनोरे पहायचे राहीलेत. अजून एक समाधान. 


(गंगासागर फोटोग्राफर मनोज )

गंगासागराला वळसा घालून, देशमुखांच्या होटेलचे अवशेष पाहून आता पाय-या उतरायला लागलोयत. मनोजला महाडाच्या गाडीचे ओढ लागलेत. त्यामुळे त्याची पाऊले झपाझप पडतायत. आम्हालाही त्याला महाडला सोडुन आंधार व्ह्यायच्या आधी ताम्हिणी गाठायचंय. त्याहून महत्वाचं म्हणजे गाडीत पेट्रोल संपायला आलंय, पंप शोधुन पेट्रोल भरायचंय. महाडला पोहचे पर्यंत पेट्रोल संपु नये म्हणजे मिळवलं. जाताना जेवढ्या उत्साहात चढलो, उतरताना पाय-या तेवढ्याच कंटाळ्वाण्या वाटतायेत. 

पायथ्याला होटेलला पोचल्यावर थोडं फ्रेश झालोयत. बोलता बोलता मनोजने वाघबिळचा विषय काढला. त्याला म्हंटलं चाल तेही पाहुनच जाउ. तो म्हणालाय की ५ मी. मध्ये पाहून होईल आणि त्याच्या म्हणण्या प्रमाणे दुसऱ्या मिनिटाला आम्ही नेढ्यात होतो. या दोन नेढ्यांना लांबून पाहीलं की दोन डोळ्यांसारखे दिसतात. मस्त हवा खेळतेय, आणि विशेष म्हणजे अजून माणसाळलेली नाहीय ही जागा. ट्रेकर्सना मुक्कामासाठी म्हणुन वापरता येईल. 

वाघबिळ
( वाघबिळ - फोटोग्राफार मनोज )वाघबिळ पाहुन आमची वारी महाडला निघालीय, ट्रिपल सिट. पंकजच्या गाडीवर पंकज, मनोजचं पोट, मनोज आणि त्याच्या हातात माझं हेल्मेट. आणि विशेष म्हणजे पंकज आणि मनोजच्या पोटाच्या मध्ये मी व्यवस्थीत मावलोय. पुन्हा आमच्या अखंड गप्पा चालुयत. मनोज पुन्हा आजूबाजूच्या घाटवाटांबद्दल, किल्यांबद्दल सांगतोय. कधी होतील माझे हे किल्ले ?  

मनोजला महाडला मोडुन, आय मीन सोडुन, पेट्रोल वगैरे भरून आमची गाडी परतीच्या वाट्याला लागलीय. गाणे ऐकावे म्हणुन पंकजकडुन हेडफोन घेतले खरे, पण कुछ जम्या नही. आपल्या गप्पाच ब-या. मला वाटलं होतं तसंच झालं. ताम्हिणीच्या आधीच अंधार पडलाय. आता अंधारात ताम्हीणी…. पंकजच्या गाडीचा हेडलाईट चांगलाय, बरं झालं माझी गाडी आणली नाही. 

घाटातला हा नाईट ड्राईव्ह मस्त लक्षात राहील. फुल्ल्ल्ल अंधार… भयाण शांतता. शांतता एवढी कि गाडीचा आवाजही जाणवत नाहीय. अन हा नागमोडी धावणारा रस्ता. सकाळच्यापेक्षा खुपच वेगळा भासतोय. सकाळचा रस्ता अंधाराकडून उजेडाकडे जाणारा होता आणि आत्ताचा ? उजेडा कडून अंधाराकडे. उगाच काहीतरी वाटुन गेलं. शांतता भेटली की माझं मन असंच गोंधळ घालायला सुरु करतं. आत्ताही तेच चालुय. सहन होत नाही त्याला एवढी शांतता. रस्ता तोच पण अनुभव सकाळ्पेक्षा खुपच वेगळा आहे. सारे मनाचे खेळ. एवढ्या अंधारात गाडीवर बसुन मागे पाहीलं तर गप्पकन डोळे बांधल्यासारखं वाटतंय. अन त्यात पंकज म्हणतोय थांबायचा का थोडावेळ ? अरे इथे समोरचा रस्ता सोडला तर स्वत:चं हात पाय काय काय काहीच दिसत नाहीय आणि हा थांबायचं का म्हणे. त्याला म्हंटलं घाट माथ्यावर किंवा उतरल्यावर थांबु. पण खरंच खुप सह्ही वाटतंय असं अंधारात घाटात फिरताना. 

पंकजच्या आंदाजाप्रमाणे ११-०० ला घरी पोहचु. तेजुने आधीच म्हंटलेलं, आजवर कधी ८-३० पर्यंत आलायस का ? १२ वाजवणार तु. जाई पर्यंत तिला झोप लागलेली असावी म्हंजे मिळवलं. अंधारातून रात्रीच्या उजेडात प्रवेश केला. पोचलो पुण्यात एकदाचे. अंदाजा प्रमाणे ११-०० ला पंकज मला माझ्या घरी सोडुन रुमवर गेलाय. अश्या प्रकारे रायगडची अजून एक वारी सफळ संपुर्ण झाली. आजची धमाल रुद्राक्ष ने मिस केलं. तो तर मी सोडुन गेलोय म्हणुन भांडण्यासाठी जागाच असेल अजुन. आता त्याचा रुसवा काढणे म्हणजे….  

- मल्लिनाथ करकंटी

इथे पुर्वप्रकाशीत.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रायगड कितीतरी वेळा स्वत: जाऊन पाहिलाय. ह्या किल्ल्याबद्दल अनेक मान्यवर लेखकानी लिहिलेले लेख, साहित्य वाचलेय. आतंरजालावर आज पर्यंत अनेक भटक्यांनी सचित्र लिहिलेले ब्लॉग वाचलेत. कितीतरी वेळा रायगडाचे तेच-तेच फोटो विविध माध्यमात पुन्हा-पुन्हा पाहिलेत. पण का कोणजाणे रायगडाबाबत कोणताही नविन आलेला लेख, फोटो पाहण्याचा कधीही कंटाळा येत नाही.

हा सचित्र लेख ही आवडला.