आले ऑलिंपिक...

Submitted by पराग१२२६३ on 4 August, 2016 - 06:49

ऑलिंपिक म्हणजे सळसळता उत्साह. जगातील सर्वांत मोठा सोहळा. ऑलिंपिक म्हणजे जगातील सर्वोच्च दर्जाची स्पर्धा. वेगवान, उच्च आणि बळकट असे ब्रीड मिरवणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभागी होऊन देशासाठी पदक जिंकण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते, तसेच ऑलिपिंकचे आयोजक होऊन आपल्या देशाची प्रतिमा जगभरात उंचावण्याचे प्रत्येक देशाचे स्वप्न असते. १८९६ मध्ये सुरू झालेली ऑलिंपिक चळवळ आता चांगली बहरली आहे.

पैशासाठी नाही, तर देशासाठी खेळण्याची, देशाचा सन्मान वाढविण्याची आणि स्वतःलाही सिद्ध करण्याची धडपड या क्रीडास्पर्धांमध्ये क्षणोक्षणी दिसते. विविध पातळ्यांवरच्या कामगिरीचा आढावा घेऊन ऑलिंपिकसाठी पात्र ठरणाऱ्या खेळाडूचा पुढचा पदकासाठीचा संघर्ष असतो, तो त्याच्यासारखा विविध पातळ्यांवर विविध चाचण्यांमधून तावून-सलाखून स्पर्धेत उतरलेल्या जगातील अन्य सर्वश्रेष्ठ खेळाडूंशी. त्यामुळे स्पर्धेत सर्वोच्च कामगिरी केल्यावर पोडियमवर चढलेल्या खेळाडूला, त्याच्या प्रशिक्षकाला आणि समोर बसलेल्या समर्थक प्रेक्षकांना (हे सगळे कितीही मनाने घट्ट असले तरी) आपला राष्ट्रध्वज उंचावत असताना भावना अनावर होतात. आपला राष्ट्रध्वज केवळ आपल्यामुळेच आता जगासमोर मानाने उंचावला जात आहे, हे पाहून त्या खेळाडूला जास्तच भावूक व्हायला होत असतो. आणि त्यातही सुवर्णपदक जिंकलेले असेल, तर सोबत राष्ट्रगीतही वाजत असते. अशा वेळी भलेभले ढसाढसा रडू लागलेले बऱ्याचवेळा पाहायला मिळतात. कारण त्याने ऑलिंपिकपदकासाठी आपले आयुष्य खर्ची घातलेले असते.

ऑलिंपिकमध्ये सहभागी होण्यासाठी आणि पदक जिंकण्यासाठी प्रत्येक खेळाडूची कायम इच्छा असते. त्यासाठी तो सतत परिस्थितीशी संघर्ष करत असतो. हा संघर्ष विविध पातळ्यांवर सुरू असतो. आयुष्यभर राखलेले स्वप्न अगदी नॅनो फरकानेही सत्यात उतरते किंवा भंगही पावते. हाही एक संघर्षच. पुन्हा चार वर्षांनी ऑलिंपिकमध्ये तयारीने उतरावे, तर परिस्थिती अनेक दृष्टीने बदललेली असते. त्यामुळे पदकाचे स्वप्न पूर्ण होईल की नाही याबद्दल खात्री देता येत नाही. खेळाडूचा ऑलिपिंकसाठीचा आणि ऑलिंपिकमधील संघर्ष भारतात अन्य छोट्या-मोठ्या देशांपेक्षा जास्तच जाणवतो. आमच्यासारख्या क्रिकेटवेड्यांच्या देशात ऑलिंपिकला फारसे गांभीर्याने घेतले जात नाही. चार वर्षे ऑलिंपिक आणि त्यातील खेळांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचीनावे आमच्या समाजापासून, सरकारपासून आणि लोकांना आवडत नाही या कारणाखाली मीडियापासून दूर राहतात. चार वर्षे टी. व्ही. समोर बसून क्रिकेट सामन्यांमध्ये डोळे घालून बसण्यात आम्ही वेळ घालवतो. आणि ऑलिंपिक सुरू व्हायच्यावेळी आम्हाला त्यातील क्रीडाप्रकारांची, क्रीडापटूंची आठवण होते आणि एकदम सुवर्णपदकाचीच मागणी मीडिया आणि समाजाकडून होऊ लागते. पण इतर देशांमध्ये याच्या बरोबर उलट परिस्थिती असल्याचे अंधानुकरणाची सवय जडलेल्या आम्हा क्रिकेटवेड्यांना समजतच नाही. म्हणूनच मग ते देश भारतापेक्षा सरस कामगिरी करून जातात. कारण तिथे ऑलिंपिककडे, खेळाडूंच्या तयारीकडे महिना किंवा वर्षभर आधी लक्ष्य दिले जात नाही, तर कायमच लक्ष्य दिले जाते. तिथे समाजही ऑलिंपिक खेळांना, खेळाडूंना कधीच विसरत नाही. असे असूनही गेल्या पाच ऑलिंपिकमध्ये स्वतःच्या वैयक्तिक तयारी आणि हिंमतीवर पदके जिंकणाऱ्या भारताच्या ऑलिंपिकपटूंचा क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्यांपेक्षा जास्त अभिमान वाटू लागतो. म्हणूनच ऑलिंपिकमध्ये क्रिकेट नाही याचे दुःख कधीच वाटत नाही. त्याचा आनंदच जास्त होतो आहे. त्यामुळेच ऑलिंपिकमधील माझा रस आणखी वाढला आहे. त्यातच चार वर्षे कधीही फारसे पाहायला न मिळणारे क्रीडाप्रकारही ऑलिंपिक आवर्जून दृष्टीस आणून देते. क्रिकेट तर काय रोजच पाहायला मिळतेय ना आपल्याला. त्यामुळं उन्हाळी असो वा हिवाळी, ऑलिपिंक म्हटले की उत्साह वाढतो. ऑलिंपिक जवळ येऊ लागले की, वर्ष-दोन वर्षे आधीपासूनच उत्साह वाटायला लागतो, तो त्यामुळंच.

ऑलिंपिकमध्ये खेळाडूला पैसे मिळत नाहीत, पण त्याच्या तेथील कामगिरीनंतर त्याला मिळणारी प्रसिद्धी आणि त्यातून मिळणारा पैसा अमाप असू शकतो. पण त्याही परिस्थितीत खेळाडूने आपले प्राधान्यक्रम निश्चित ठेवावे लागतात. कारण नंतरच्या काळात पैशाच्या मागे लागल्यास त्याच्या पुढच्या ऑलिंपिकमधील कामगिरीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लंडन ऑलिंपिकनंतरच्या मधल्या काळात आपल्या तयारीवर पूर्ण लक्ष्य केंद्रीत करत आणि आपल्या क्षमतेवर रिओ ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेल्या सगळ्या भारतीय खेळाडूंना मनापासून शुभेच्छा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users