पुरुषांना घेऊ दे आधी....

Submitted by विद्या भुतकर on 1 August, 2016 - 07:17

वीकेंडला शाळेतल्या मैत्रिणी भेटलो, नवरे-मुलांसहित मग काय गोंधळ नुसता. मुलांचे जेवण देऊन झाले आणि अजून पोळ्या चालूच होत्या. मग कुणीतरी म्हणाले 'नवऱ्यांना आधी देऊन घ्यायचे का?'. म्हणले, 'नाही सर्व एकत्रच बसू'. त्यांनाही आता हे माझे नेहमीचे माहित झाले आहे. त्यामुळे त्या लक्ष देत नाहीत. पण या विषयावर बोलून वाद नक्कीच होऊ शकतात. तर विषय असा की कुठेही एखादा कार्यक्रम असो, अनेकदा मी ऐकले आहे की "पुरुषांना आधी बसून घेऊ दे." मग त्यात लग्न असो किंवा डोहाळे जेवण. घरात बाईने कितीही मरमर करू दे. तिला अजून चार बायका मदतीला असू दे, जेवण मात्र पुरुषांना आधी करून घेऊ दे. मी नेहमी विचार करते हे असं किती वर्षं चालू राहणार?

एकतर आपल्या कार्यक्रमात नेहमी उशीर झालेला असतोच. कुणीही वेळेत येत नाही. अशावेळी प्रत्येकाला असं वेगळं का बसवायचं. आणि समजा थोड्या थोड्या लोकांना जेवण उरकून घ्यायचे आहे, जागा नाहीये, असे असेल तर मग बायकांनी का नाही बसायचं? आणि हे मी भारतातच नाही, अमेरिकेत अनेक गेट-टूगेदर झालेत त्यातही पाहिले आहे. असं काय वेगळं ट्रेनिंग दिलंय आपल्याला लहानपणापासून की आपण ते तिकडे जाऊनही विसरत नाही? घ्यायचंच आहे आधी कुणी तर मग बायकांना घेऊ दे ना? त्यांनी वाट का बघायची? मुळात ही प्रवृत्ती जे आधी बसतात त्यांची नसून जे सुचवतात त्यांची असते. म्हणजे बायकाच म्हणतील, 'आधी त्यांना बसू दे'. कशाला? 'सर्वानी घ्या' म्हणायचे ना? सुनेला,मुलीला, जावेला, मैत्रिणीला का आग्रह करत नाही आपण? बायकांनी काय घोडं मारलंय?

मी गंमत म्हणून असेही प्रयोग करून पाहिलेत की कुणीही घ्यायच्या आधी आपण जेवण सुरु करायचे. तुम्हीही करून बघा, लोकांच्या प्रतिक्रिया काय असतात हे जाणवेल तुम्हालाही. म्हणजे कुठल्याही कार्यक्रमात सर्वात आधी हातात ताट घेऊन जेवण सुरु करा, बघा काय होते. कुणी तरी असतीलच बघणारे बोलणारे लोक. का? ते माहीत नाही. किती वर्षे अशा प्रथा चालू ठेवायच्या? मी एकदा असेच एका वाढदिवसाला संदीपला 'मुलांना जेवण दे' म्हणून आधी जेवायला बसले. थोड्या वेळाने एका अनोळखी बाईने संदीपचा व्हिडीओ काढला होता. का तर तो असे मुलांना जेवण भरवत आहे आणि मी जेवत आहे. म्हणजे स्वतःच्या मुलांना जेवण 'देणे ही इतकी आश्चर्याची बाब होऊ शकते? अशा कुठल्या जगात राहतो आपण?

आमच्या एका मित्राचे उदाहरण आवडते मला मग. त्यांच्या घरी गेलो की मी आणि त्याची बायको जेवण करून घेतो, तेही आग्रहाने तो आधी बसवतो आम्हाला. 'मुलगा लहान आहे तर तू आधी जेवण करून घे आणि मी आवरतो सर्व' असे हट्टाने तो तिला सांगतो. आम्ही जेवत असताना थांबून काय हवं ते वाढून देतो आणि मग तो आणि संदीप जेवण करतात. आता नवऱ्याचे मित्र घरी आलेत आणि बायकोने समोर बसून काय हवं नको ते बघून वाढलं, आवरलं यात काहीही वेगळेपण वाटत नाही. पण कधी कधी हे असे अपवाद पाहिले की वाटतं, किती छोट्या गोष्टी असतात पण त्या मिळणेही किती दुर्मिळ असते.

मुले, नवरा, सासू सासरे, नातेवाईक या सर्वांचं करून शेवटी बसणाऱ्या बाईला 'खूप चांगली आहे' असं बोलल्याचं अनेकदा ऐकलेय मी. म्हणजे जेवण कसे बनवले, सर्वांशी कसे वागले यापेक्षा ती कधी जेवायला बसली यावरून तिचे व्यक्तिमत्व ठरवता येते का? मला मान्य आहे की आपल्याच घरी कार्यक्रम आहे, तर आपण सर्वांचे नीट करून, बघून नंतर बसायचे म्हणतो. पण दुसऱ्यांच्या कार्यक्रमातही पुढे होऊन जेवण घ्यायला बायका लाजतात किंवा कुचरतात की लोक काय म्हणतील.

बरं कार्यक्रमाचे जाऊ दे, घरीही अनेकदा तीच परिस्थिती असते. खरंतर अनेक जणींना डाएटसाठी म्हणून डॉक्टर लवकर जेवायला सांगतात. पण घरी पाहुणे आले किंवा नवरा उशिरा येत असेल, सासू सासरे उशिरा बसत असतील तर तिलाही मग ताटकळत बसावे लागते. असे का अजूनही अवघडून राहावे लागते? का स्पष्टपणे सांगता येत नाही? एक मैत्रीण लवकर जेवते नेहमी. तर आता आम्हालाही माहित आहे, ती आधी जेवायला बसली तरी चालेल म्हणून. आपण मैत्रिणींना, आपल्या मुलांना, घराच्या सर्वांना समजून घेऊ शकतो तर आपले म्हणणे समजावून का सांगू शकत नाही?

नक्की करून बघा हे, प्रयोग म्हणून का होईना. भूक लागलीय ना, लोकलाजेस्तव थांबू नका. कुणी 'पुरुषांना बसू दे' म्हणत असेल तर त्याला विरोध करून बघा. घरी पाहुणे आहेत, वेळेत जेवले पाहिजे, ताट करून घ्या. कार्यक्रमात, मुलांना नवऱ्याकडे देऊन, आधी जेवण करून घ्या. बाकी बायकांनाही, तू बैस ग आधी म्हणून आग्रह करा. आणि हो, मुलांनो, नवऱ्यानो, पुरुषांनो, कुणी म्हणाले 'आधी बसून घ्या' तर बायकोला आधी जेवण करायला बसवून बघा. मला बघायचंय एकदा, की काय होतंय. जगबुडी तर नक्कीच होणार नाही, पण कुणाचं तरी पोट नक्की भरेल. Happy

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्याकडे आधी ही पद्धत होती. त्यातही पंगत मांडून वाढावं वगैरे लागायचं. पण एकतर त्याचा फापटपसारा फार होतो आणि आधी तू बस, आधी तू घे वगैरे चालायचं. मग, आईनी वगैरे ते मोडीत काढल्यागत केलं. सरळ टेबलवर सगळं मांडून बुफेटाईप लावायचं. पहिल्यांदा ताटं वाढून द्यायचे प्र्त्येकाला आणि मग ज्याला जसं लागेल तसं तो घेईल असं.
पण कुलाचाराला वगैरे हे नाही. त्यावेळेला दुसरा मार्ग. सगळ्यात पहिल्या पंगतीला ज्येना, पाहुणे, सवाष्ण. अन्नशुद्धी वाढून झाली की घरचे पुरूषही पहील्या पंगतीपासून वाढायला सोबत. नेक्स्ट पंगतीला घरातले बाकी आणि सुना वगैरे. सगळ्यात शेवटी आजी आई यांची पंगत आणि त्यांना वाढायला आधीच्या पंगतीतले लोक्स. सगळ्यांनाच कामं मिळतात यात आणि कधी काही कमी पडत असेल तर त्यात भरही घातली जाते. पाणी द्यायचं काम मात्र मुलांकडे.

राहाता राहीला प्रश्न भुकेचा तर त्याकरता जे लोक्स पुजेला बसणार आहेत आणि सोवळ्यात होणार आहेत त्यांच्याकरता उपवासाचं करून खाऊन घेतात आणि बाकी लोकांकरता बाकी काहीतरी नाश्त्याचं होतं. त्यामुळे जेवायला जरा उशीर जरी झाला तरी एवढा प्रश्न नसतो.

अर्थात, असं काही कुलाचार वगैरे असेल तर आम्ही लोक्स सकाळी भाजी बाजारातून आणणं, निवडणं, चिरणं, तांबुलाची तयारी, ताटं वाट्या पेले पुसून ठेवणं ही काम करतोच.

योकु, कुलाचाराच्या वेळचं (किंवा अशुभाच्या वेळचंही) हे आमच्याच घरचं चित्र आहे अगदी. फक्त ती सुरुवातीची पंगत आणि शेवटी आई-आजी वगळून.

विद्या, तुम्ही चांगल्या आठवणी वर काढून दिल्या एवढं मात्र खरं Happy

आतां जरी 'प्रथम पुरुष मंडळी व शेवटीं महिला मंडळ' हें जेवणाच्या बाबतींत खूपच कमी झालं असलं तरीही ती प्रथा बहुतेक घरांत रुढ होती व त्यांत पुरुषप्रधान संस्कृति डोकावत होती , हें नाकारणं कठीण आहे. सई यांनी म्हटल्यानुसार यामागे आत्मीयता, आपुलकी, शिस्त, सोय इत्यादी कारणं असली तरीही तीं व्यक्तिनिष्ठ असत व केवळ योगायोगानेच तीं प्रथेशीं जुळत असत, असंच म्हणावं लागेल.
[ कदाचित हें हास्यास्पद वाटेल पण या प्रथेमागचं एक कारण असंही असूं शकतं - हल्लीं मीं बर्‍याच वेळां स्वयंपाकघराचा ताबा घेतो. स्वतः स्वैंपाक केल्यावर ताबडतोब जेवायला बसावसं मात्र मला खरंच वाटत नाही. पूर्वीं तर जेवण करण्याचा राबता सक्काळीं उठल्यापासूनच सुरूं असायचा. स्वतः जेवणाला बसण्यापूर्वीं म्हणूनच मधें थोडा वेळ जाणं बायकाना आवश्यक वाटलं असावं व तो वेळ पुरुषांच्या जेवणाची कटकट उरकून घ्यायला त्याना सोयीचा वाटला असावा ! ]

सतत त्याग करत राहण्याचीपण एक नशा असते आणि त्यामुळे त्याचंही व्यसन लागू शकतं. परत हे व्यसन रूढार्थाने वाईट गोष्टीचं नसल्यामुळे त्याला विरोधही होत नाही. पण दुष्परिणाम मात्र होतात, शारीरिक आणि मानसिक, दोन्ही. ' मला नाही लागत जास्त भाजी, तू संपवून टाक! ', ' मला पुरे श्रीखंड, तू घे अजून', ही अशी वाक्यं आपण सर्वांनी ऐकलेली असतील आपापल्या आई- आजी- काकू- मावशी- मामीच्या तोंडी. आपणही हे कधी ना कधी बोललेलो असू. कधीतरी ठीकच आहे, पण अशीच सवय लागणं म्हणजेच त्याची नशा चढणं. स्वतः अर्धपोटी राहून मुलांबाळांना,नवरा आणि इतर पुरुषांना पोटभर जेवायला वाढणार्या स्त्रीचं कौतुकच होणार. मग पोटभर/लवकर जेवणं, आवडीचा पदार्थ भरपूर खाणं शक्य असेल तरी तसं केलं जात नाही.
मग जेवायला होणार्या उशीरामुळे चहा पिऊन भूक मारायची सवय लागते, मग अॅसिडिटीसारखे त्रास मागे लागतात. त्यापेक्षा वेळच्या वेळी चांगलं खावं. पण ते बरं दिसत नाही ना! गेल्या पिढीतल्या अनेक बायकांची ही परिस्थिती आहे/ होती.

घरी असणारे क्रम सर्वानी सान्गितले, पण बाहेर गेल्यावरही पाहुणे असूनही त्यात बायकाना ननतर बसावे लागते, त्याचे काय?

वावे, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. उगाच त्यागाची मूर्ती वगैरे होण्याचे व्यसन पाहीले आहे मीही.

विद्या.

Very true Vidya ani Sayo.
It's pretty frustrating when this happens in 95% of the programs in 90% homes..

Dusryachya ghari kashya tumachya vicharani jevayla basavtil? Pahilya pangatila basane tumavhyasathi mahatvache asel tar jaun yajamanana (host) sangayche tase ki majhi pahilya pangatila basaychi paddhat ashe. Mi pahilya pangatila basnar.

Baayakancha ha problem nahiye ka swatala kay have te tond ughadoon na sangane? Satat itarani olakhayche aapalya manat kay challay te.

Sadya paristhiteet badal tar hava pan to badal kelya mule / suchavlyamule yenara / Milanara vakadepana nako, sagale kasa hoil.

Exactly, उलट त्या प्रथा मोडण्यात पुढाकार घेतात असे दिसतंय,
वर बऱ्याच लोकांनी फॉर्मल जेवण असेल तर(आपल्याच घरी) आम्ही असे manage करतो असे सांगितले आहे,
पण लेखिकेने मांडलेला प्रसंग, त्या पाहुणे म्हणून गेलेल्या असताना, बहुता बुफे लावलेला असताना चा आहे,
अशा सेटिंग मध्ये बाईने अगोदर जेवायला घेतले हे काही जणांना खटकले असे त्या म्हणत आहेत. आणि त्याबद्दल आश्चर्य, खेद व्यक्त करत आहेत.

Thank you Simba for summerizing it. Happy मला तर लेख वाचून कमेन्ट देन्यापेक्षा आधि लिहिलेल्या कमेन्टवर उत्तरे देत आहेत असे वाटत आहे. त्यामुळे मूळ मुद्दा कुणी वाचलाय का असा प्रश्न पडलाय आता.

Sadya paristhiteet badal tar hava pan to badal kelya mule / suchavlyamule yenara / Milanara vakadepana nako, sagale kasa hoil.>> म्हणून तर स्पष्ट बोलत आहे. बाकीच्यानीही बोलावे असे सान्गत आहे. मी तर असे पाहीले आहे की पुरुशानी आधी बसावे असे बरेच्दा बायकाच सानग्तात आणि कुणी आधी बसलेच तर त्याना बोलतातही समोर किन्वा मागून. हे सर्व बन्द व्हायला हवे.

विद्या.

Writing about it here is not going to solve the problem. Everyone including me had been through such situations numerous times. To improve the situation, almost everyone who wrote above has tried to tweak the scene as per best of their ability. It's not a movement. The system will change but we'll have to give it some time, like next generation. If someone wants instant results then there's is no other option but to speak up when it is actually happening to you. Obviously, if you are smart enough to tell host about improvement in their process then there is bound to be a unfavourable opinion about you.

To quote - Sheldon Cooper - this is one of those boo-hoos or ouchies.

राजसी, ते मी स्वतः तर करतेच. मी बरेच्दा सानग्तेच होस्ट ला तसे.
आणि न लिहुन तर नक्कीच काही होणार नाही. असेच असेल तर कुठल्याच विशयावर लिहून काय उप्योग आहे? निदान लिहीण्यामुळे 'असे अजूनही होते' यावर एकाने जरी विचार केला तरी माझ्यासाट्।ई खूप आहे. या निमित्ताने जे लोक निदान विचार तरी करतील, अशी अपेक्षा आहे.

विद्या.

I had been to one of the kelvan. Our family has been invited to friends home. The entire meal had been served by the friend, his wife and mother was sitting/working in the kitchen because they don't allow ladies of the household in front of outsiders. We all ladies are well acquainted with the ladies of the household, they being our family friend. Later after lunch, we ladies went inside to say hello to wife and mom.

Whole time I was in dilemma if I should be happy or sad?

आणि न लिहुन तर नक्कीच काही होणार नाही. असेच असेल तर कुठल्याच विशयावर लिहून काय उप्योग आहे?>> +१

प्रतिक्रिया नाही वाचल्या अजून..... पण लेख वाचला , आणि बर वाटलं कि आपल्या सारख विचार करणार आहे कुणीतरी!!! Happy आनंद!!!

विद्या, सायो शी सहमत.
वावे ++ अनुमोदन. अशा आई, मावशी आजी केसेस पाहिल्यात.

माझ्या घरी असं कधी नव्हत./ नाही. माहेरी सासरी दोन्हीकडेही. भुक लागली जेवा. एकत्र बसा. एकटे जेवा. नवरा, सासरे, दीर बरेचदा उशीरा येणारे आहेत त्यामुळे त्यांच्या येण्याआधीच बरेचदा आम्हा बायकांची जेवणे होतात. कधी एकत्र. कधी एकटीनेच. नवर्‍याआधी जेवणं म्हणजे काही विषेश आहे असं नाही.
पण ह्या आधी पुरुषांना जेउदे, मग बायकांना अशा गोष्टी बरेचदा बघितल्यात.

राजसीचा काय मुद्दा आहे नेमका?

अस आहे की कोणतीही परिस्थिती कधीही कायम रहात नाही. बदल होत आहेत. होत रहातील. स्त्रियांनाही बदलाचे स्वागत करायला हवे. आमच्या आई, आजी करत होत्या तसे आपण केलेच पाहिजे असे नाही. अनेक घरांत बदल झालेत, काही घरात काही अंशी बदल झालेत. वेळ लागेल. वर राजसीने लिहील्याप्रमाणे आमच्या सासरी कुणी आले की बायकांनी उंब-यात उभारून चहा/खाणे घेऊन जायची हाक मारायची पध्दत होती. मला ते अपमानास्पद वाटले, मग विचार केला करू दे की पुरुषांना तेवडेतरी काम.. आता एक पिढीनंतर ही परिस्थिती बदलली आहे. तेवडेच नव्हे तर अनेक कामे घरातले करू लागलेच की.

थोडक्यात सवडीप्रमाणे/आवडीप्रमाणे जेवावे. थांबले पाहिजे / नको अशी सक्ती किंवा दडपण नसावे.

लेख आणि प्रतिक्रिया वाचल्या.' पुरुषांना घेउ दे आधी', हे बदलण आपल्याच हातात आहे . माझी आज्जी नेहमी अस म्हणायची कि 'अनुभवातुन आपण शहाण व्हाव'. तिच हेच वाक्य मी लक्षात ठेवल आणि ते मी आयुष्यात वापरल पण.
आमच्या पण घरी अशा कही रुढी परंपरा होत्या. पण नंतर त्या बदलत गेल्या.
सासरी मात्र अस काही न्हवत . सगळे एकत्रच जेवत असु. कधी थांबायच असल तर सासरे, दीर, नवरा स्वता आमच्या सोबत थांबत. कामातही मदत करत. त्यामुळे पुरुष - बायका अस काही वेगळ वाटायच नाही.
हं , कुठे पाहुणे म्हणुन गेल तर मात्र बायंकांच्या पंगती बसे पर्यत थांबव लागत असे. मग आज्जीच वाक्य वापरायला सुरवात केली, अनुभव घेतले आणि सरळ मला भुक लागली आणि खाल्ल नाही कि त्रास होतो अस सांगुन बायकांच्या पंगतीच्या आधीच बसायला लागले. (तेव्हा नवरा सोबत नसतो)
जेव्हा नवरा सोबत असतो तेव्हा जेवायला चला अशी हाक आली कि लगेच त्याच्या मागे जात त्याच्या शेजारी बसुन घ्यायच.;)
अजुन एक म्हणजे पुरुषांची पंगत बसली असेल आणि एखादिच जागा राहीली असेल तर मी बिन्धास्त तिथे बसायला तयारी दाखवायची.(तेव्हा नवरा सोबत नसतो)
आता ज्यांना हे माहीत झाल आहे ते स्वताहुन मला आधी बसायला सांगतात.:-P Proud

स्त्री-पुरुष दोघेही कमावते असल्यास आणि स्वयंपाकघर पगारी नोकर सांभाळत असल्यास पुरुषांनी आधी जेवायला बसावे हे अयोग्यच.

पण...

जर पुरुष कमावता असेल आणि स्त्री घरकाम करणारी / स्वयंपाकघर सांभाळणारी असेल तर पुरुषाने आधी जेवायला बसणे यात चूकीचे काहीच नाही.

आता याच बाबीची हॉटेल / रेस्टॉरंट्सशी तुलना करुयात म्हणजे समजायला सोपे होईल.

सहसा (निदान पुण्यात तरी) हॉटेलात जेवणाची वेळ दुपारी १२ ते ३ आणि रात्री ७ ते १० अशी असते. हॉटेलचे कर्मचारी दुपारचे व रात्रीचे जेवण या वेळा संपल्यावर करतात. अर्थात त्यांनी अधेमधे व सुरुवातील थोडेफार पदार्थ चव तपासणीच्या निमित्ताने चाखून / खाऊन पाहिलेले असतातच आणि त्यांना इतका वेळ सहज दम निघू शकतो.

घरातही स्वयंपाकघर सांभाळणार्‍या बायका आधी पुरुषांना पंगतीला बसवतात. तिखट / मीठ कमी / जास्त झाले असल्यास किंवा इतर काही बदल करावयाचा असल्यास त्वरीत तसे करुन पुरुषांना पुन्हा वाढतात. कधी एखादा पदार्थ कमी पडल्यास पुरवणी पदार्थ बनवितात आणि मग शेवटी जेवतात.

यात त्यांची तक्रार नसल्यास हा वादाचा मुद्दा करायची गरजच काय?

पण दोघे नोकरी करुन घरी येत असतील आणि स्वयंपाक्याने केलेला स्वयंपाक जेवत असतील तर सोबतच बसावे. ज्यांच्या घरी स्वयंपाकी नसेल त्यांनी एकत्र मिळून स्वयंपाक बनवावा + भांडी घासावी, इत्यादी. असे आता अमेरिकेत आमच्या मुलाकडे सवयीचेच झाले आहे.

जर पुरुष कमावता असेल आणि स्त्री घरकाम करणारी / स्वयंपाकघर सांभाळणारी असेल तर पुरुषाने आधी जेवायला बसणे यात चूकीचे काहीच नाही. >>> रियली??!!!
पुरूष घरकाम करणारा असेल आणि बायको कमावती असेल तर काय करायच तेही सांगून टाका म्हणजे एकदाच काय तो "रियली"? म्हणावा लागेल.

बिपीन चंद्र हर.... ह्यांनीं नोकरी न करणार्‍या होममेकर्स करता रेस्टॉरन्ट्स मधल्या वेटर्स ची अ‍ॅनालॉजी वापरली ???!!!

आता हर हर महादेव! Proud

Suddenly! after above post why the author wrote made sense to me Sad My appeal to all housewives please don't serve anyone unless and until you ate. After done eating, add more salt - chillies, masala dysentery medicine, ,sky's limit and ensure that bread earners of the house has his value for money.

....

मज्जा येत्येय वाचायला! अजून एक अगदी जिव्हाळ्याचा विषय ऐरणीवर कसा आला नाही? मागची आवराआवर.. झाकपाक,उरलेले काढून ठेवणे इत्यादी गोष्टी मी ९९% वेळा स्रियांनाच करताना पाहिले आहे. जेवण झाल्यावर सगळ्या बायका बाहेर बैठकीच्या खोलीत पान खाऊन गप्पा टाकत बसल्या आहेत आणि आत स्वयंपाक घरात सर्व पुरुष मागची आवराआवर करत आहेत असे दृश्य मी तरी अजून पाहीलेले नाही. अर्थात हे दृश्य मला आजिबात भारी वाटत नाही. सगळ्यात हवीशी परीस्थिती अशी असेल जिथे स्वयंपाकाची, वाढण्याची, आणि मागील आवराआवरीची जबाबदारी स्त्री पुरुष दोघे मिळून सांभाळत आहेत.

बिपीन चंद्र हर.... ह्यांनीं नोकरी न करणार्‍या होममेकर्स करता रेस्टॉरन्ट्स मधल्या वेटर्स ची अ‍ॅनालॉजी वापरली ???!!!>> Happy मला काहीच बोलायचे नाहीये यावर.

राजसी, माझा लेख केवळ घरासाठी नव्हता तर समाजात बाकी कार्यक्रमातही जी प्रथा दिसते त्यावर होता. आणि हो, आपल्याच घरच्या लोकान्च्या सवयी आपण बदलू शकतो प्रेमाने, हट्टाने. त्यासाठी मिरच्या घालाय्ची गरज नाही. पण बाहेर मात्र या प्रथा मोडण्यासाठी काय करावे लागेल हे पहावे लागेल. मित्र असतील तर हक्कने सान्गा की सर्व एक्त्र बसु म्हणून. असो. Happy

विद्या.

सगळ्यात हवीशी परीस्थिती अशी असेल जिथे स्वयंपाकाची, वाढण्याची, आणि मागील आवराआवरीची जबाबदारी स्त्री पुरुष दोघे मिळून सांभाळत आहेत.>> माझ्या घरी ती अशी आहे. पण त्यात कोउतुक म्हणून नाही तर ते योग्य आहे असे वाटते म्हणून सान्गत आहे.

विद्या.

Pages