पुरुषांना घेऊ दे आधी....

Submitted by विद्या भुतकर on 1 August, 2016 - 07:17

वीकेंडला शाळेतल्या मैत्रिणी भेटलो, नवरे-मुलांसहित मग काय गोंधळ नुसता. मुलांचे जेवण देऊन झाले आणि अजून पोळ्या चालूच होत्या. मग कुणीतरी म्हणाले 'नवऱ्यांना आधी देऊन घ्यायचे का?'. म्हणले, 'नाही सर्व एकत्रच बसू'. त्यांनाही आता हे माझे नेहमीचे माहित झाले आहे. त्यामुळे त्या लक्ष देत नाहीत. पण या विषयावर बोलून वाद नक्कीच होऊ शकतात. तर विषय असा की कुठेही एखादा कार्यक्रम असो, अनेकदा मी ऐकले आहे की "पुरुषांना आधी बसून घेऊ दे." मग त्यात लग्न असो किंवा डोहाळे जेवण. घरात बाईने कितीही मरमर करू दे. तिला अजून चार बायका मदतीला असू दे, जेवण मात्र पुरुषांना आधी करून घेऊ दे. मी नेहमी विचार करते हे असं किती वर्षं चालू राहणार?

एकतर आपल्या कार्यक्रमात नेहमी उशीर झालेला असतोच. कुणीही वेळेत येत नाही. अशावेळी प्रत्येकाला असं वेगळं का बसवायचं. आणि समजा थोड्या थोड्या लोकांना जेवण उरकून घ्यायचे आहे, जागा नाहीये, असे असेल तर मग बायकांनी का नाही बसायचं? आणि हे मी भारतातच नाही, अमेरिकेत अनेक गेट-टूगेदर झालेत त्यातही पाहिले आहे. असं काय वेगळं ट्रेनिंग दिलंय आपल्याला लहानपणापासून की आपण ते तिकडे जाऊनही विसरत नाही? घ्यायचंच आहे आधी कुणी तर मग बायकांना घेऊ दे ना? त्यांनी वाट का बघायची? मुळात ही प्रवृत्ती जे आधी बसतात त्यांची नसून जे सुचवतात त्यांची असते. म्हणजे बायकाच म्हणतील, 'आधी त्यांना बसू दे'. कशाला? 'सर्वानी घ्या' म्हणायचे ना? सुनेला,मुलीला, जावेला, मैत्रिणीला का आग्रह करत नाही आपण? बायकांनी काय घोडं मारलंय?

मी गंमत म्हणून असेही प्रयोग करून पाहिलेत की कुणीही घ्यायच्या आधी आपण जेवण सुरु करायचे. तुम्हीही करून बघा, लोकांच्या प्रतिक्रिया काय असतात हे जाणवेल तुम्हालाही. म्हणजे कुठल्याही कार्यक्रमात सर्वात आधी हातात ताट घेऊन जेवण सुरु करा, बघा काय होते. कुणी तरी असतीलच बघणारे बोलणारे लोक. का? ते माहीत नाही. किती वर्षे अशा प्रथा चालू ठेवायच्या? मी एकदा असेच एका वाढदिवसाला संदीपला 'मुलांना जेवण दे' म्हणून आधी जेवायला बसले. थोड्या वेळाने एका अनोळखी बाईने संदीपचा व्हिडीओ काढला होता. का तर तो असे मुलांना जेवण भरवत आहे आणि मी जेवत आहे. म्हणजे स्वतःच्या मुलांना जेवण 'देणे ही इतकी आश्चर्याची बाब होऊ शकते? अशा कुठल्या जगात राहतो आपण?

आमच्या एका मित्राचे उदाहरण आवडते मला मग. त्यांच्या घरी गेलो की मी आणि त्याची बायको जेवण करून घेतो, तेही आग्रहाने तो आधी बसवतो आम्हाला. 'मुलगा लहान आहे तर तू आधी जेवण करून घे आणि मी आवरतो सर्व' असे हट्टाने तो तिला सांगतो. आम्ही जेवत असताना थांबून काय हवं ते वाढून देतो आणि मग तो आणि संदीप जेवण करतात. आता नवऱ्याचे मित्र घरी आलेत आणि बायकोने समोर बसून काय हवं नको ते बघून वाढलं, आवरलं यात काहीही वेगळेपण वाटत नाही. पण कधी कधी हे असे अपवाद पाहिले की वाटतं, किती छोट्या गोष्टी असतात पण त्या मिळणेही किती दुर्मिळ असते.

मुले, नवरा, सासू सासरे, नातेवाईक या सर्वांचं करून शेवटी बसणाऱ्या बाईला 'खूप चांगली आहे' असं बोलल्याचं अनेकदा ऐकलेय मी. म्हणजे जेवण कसे बनवले, सर्वांशी कसे वागले यापेक्षा ती कधी जेवायला बसली यावरून तिचे व्यक्तिमत्व ठरवता येते का? मला मान्य आहे की आपल्याच घरी कार्यक्रम आहे, तर आपण सर्वांचे नीट करून, बघून नंतर बसायचे म्हणतो. पण दुसऱ्यांच्या कार्यक्रमातही पुढे होऊन जेवण घ्यायला बायका लाजतात किंवा कुचरतात की लोक काय म्हणतील.

बरं कार्यक्रमाचे जाऊ दे, घरीही अनेकदा तीच परिस्थिती असते. खरंतर अनेक जणींना डाएटसाठी म्हणून डॉक्टर लवकर जेवायला सांगतात. पण घरी पाहुणे आले किंवा नवरा उशिरा येत असेल, सासू सासरे उशिरा बसत असतील तर तिलाही मग ताटकळत बसावे लागते. असे का अजूनही अवघडून राहावे लागते? का स्पष्टपणे सांगता येत नाही? एक मैत्रीण लवकर जेवते नेहमी. तर आता आम्हालाही माहित आहे, ती आधी जेवायला बसली तरी चालेल म्हणून. आपण मैत्रिणींना, आपल्या मुलांना, घराच्या सर्वांना समजून घेऊ शकतो तर आपले म्हणणे समजावून का सांगू शकत नाही?

नक्की करून बघा हे, प्रयोग म्हणून का होईना. भूक लागलीय ना, लोकलाजेस्तव थांबू नका. कुणी 'पुरुषांना बसू दे' म्हणत असेल तर त्याला विरोध करून बघा. घरी पाहुणे आहेत, वेळेत जेवले पाहिजे, ताट करून घ्या. कार्यक्रमात, मुलांना नवऱ्याकडे देऊन, आधी जेवण करून घ्या. बाकी बायकांनाही, तू बैस ग आधी म्हणून आग्रह करा. आणि हो, मुलांनो, नवऱ्यानो, पुरुषांनो, कुणी म्हणाले 'आधी बसून घ्या' तर बायकोला आधी जेवण करायला बसवून बघा. मला बघायचंय एकदा, की काय होतंय. जगबुडी तर नक्कीच होणार नाही, पण कुणाचं तरी पोट नक्की भरेल. Happy

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त Happy

विद्या पूर्ण सहमत.विशेष म्हणजे छोट्या मित्र मैत्रीण गेट टुगेदर मध्ये पण 'आधी त्यांना वाढून घेऊ, जेऊदे मग आपण बसू' किंवा पुरुष बाहेरच्या खोलीत बायका आतल्या खोलीत नंतर जेवण वगैरे होतं तेव्हा इरिटेटेड वाटतं.
याचा दुसर्‍या बाजूने विचार केला तर 'एकदाचे या लोकांना हातावेगळे करु म्हणजे नंतर सारखे काही तरी मागून त्रास देणार नाहीत' हाही विचार असावा.

अनु, म्हणजे काय की त्यान्चा कार्यक्रमाशी काहीही सम्बन्ध नाहिये असेच अलिप्त राहतात मग. त्यामूळे
"एकदाचे या लोकांना हातावेगळे करु म्हणजे नंतर सारखे काही तरी मागून त्रास देणार नाहीत' हा विचार असावा".
भाग घेऊन त्यानीही वाढले पाहीजे ना.
Thanks.
Vidya. Happy

स्त्री ही अत्यंत मायाळू आणि दयाळू प्रकारात मोडत असल्याने आपल्या घरातल्या पुरूषांनी मनसोक्त, पोटभर जेवले आणि ते तृप्त झाले की तिला एक प्रकारचे विलक्षण समाधान मिळते, मग ती उरले सुरले खाते आणि खुश होते कारण ही परंपरा तिच्या सासूने तिच्याकडे ढकललेली असते, तिच्यासासुने तिच्याकडे.... असं करत वहात वहात आलेली प्रथा आहे ही. Proud
विद्या, लेख आवडला... आणि ही प्रथा मोडायला हवी हे ही मान्य.

सहमत. लहान पासून पाहत आलोय की आई/काकू/आज्जी या सगळ्यात शेवटी बसतात जेवायला. आधी कुठेतरी याच विषयावर वाचलं होतं, पुरुष बरेचदा निवांत गप्पा हाणत जेवतात आणि बायकांना थंड/उरलेलं जेवण जेवावं लागत, कौतुक सहन करत.

तसही बुफे आणि पंगतीत स्त्री-पुरुष एकावेळीच जेवत असतात, पण घरगुती कार्यक्रमात जर मी बायकोला मदत केली ताटं वाढायला, पाणी भरुन द्यायला, काही हवयं-नको बघायला तर काही काही लोकांना आश्चर्य वाटतं.

पूर्णपणे सहमत.
पण चित्र बदलतय आता. मित्र मैत्रिणी असा ग्रूप असेल तर एकत्रच जेवायला घेऊ या असाच आग्रह असतो. कौटुंबिक ग्रुपात हे चित्र बदलायला वेळ लागेल.
मी आधी जेवणार म्हटल तर बेजबाबदार चा शिक्का बसणं अपरिहार्य आहे Wink एकदाच मारुन घ्यावा पुन्हा पुन्हा प्रश्न पडणार नाही लोकांना

ले़ख आवडला आणि सहमत आहे.
तसेच जेवल्यावार ताट उचलण्याची कामं सुद्धा बहुतेक ठिकाणी स्त्रीयांवरच ढकलली जातात, अगदी रोजच्या जेवणात सुद्धा. जेवण आटोपलं की सांडलेलं उचलून, ताट घेउन जाऊन उरलेलं कचरापेटीत टाकुन ताटात पाणी सोडून ठेवणे हे पण आपले आपण करायला हवे.

यातील स्री / पुरुष भेदभाव वगळुन, नुसते सगळ्यात आधी व ठरावीक योग्य वेळेवर जेवायला बसणे यावरुन ऑफिसात पिडुन झाले.
आधी मिलिटरीत होतास का वगैरे.
बेदरकार ड्रायव्हींग, दारु पिणे व योग्य वेळेवर न झोपणे यानंतर भारतीय समाजाचे स्टेटस सिंबॉल जपण्याचे व इतरांना तुच्छ लेखण्याचे माध्यम म्हणजे वेळेवर न जेवणे.
दुपारी ३ -३ वाजेपर्यंत न जेवणे व फक्त कामच करणे व रात्री १०-११ किंवा त्यानंतरपर्यंतही न जेवणे यात काय ते भुषण वाटते लोकांना!

या एवढ्या एका बाबतीत मला विशिष्ट शहरातील १-४ बंद / झोपेचा पायंडा पाडण्या-यांचे व त्यांच्या पुढील पिढिनेही ते तसेच जपणे व इतरांनी ते विनातक्रर स्विकारणे याचा हेवा वाटतो!

माझ्या नवर्‍याच्या माहेरी,त्याच्या आईला थोडा धक्का बसला होता मी आधी जेऊन घ्यायची म्हणून.

माझं नविन लग्न होऊन मी जेव्हा सासरी गेले तेव्हा या प्रथेमुळे मला खुप त्रास व्हायचा. एरवी आम्ही एकत्रच जेवायला बसायचो पण ३ पुरुषांपैकी (सासरे, मोठे दिर व माझा नवरा) जर एकतरी जेवणाच्या वेळेस हजर नसेल तर सगळ्यांनाच थांबावे लागे Sad
दर रविवारी आमच्या घरातील पुरुष व त्यांचे चुलते असे ८-९ जणांचा 'कार्यक्रम' चाले. त्यावेळेस रात्री ११-१२ वाजेपर्यंत आम्ही बायका उपाशी. माझा नवरा आम्हाला आधी जेऊन घेण्यास जबरदस्ती करे पण साबा आणि जाऊबाईंचा स्वतःच्या नवर्यासोबतच जेवायचा प्रण असल्याप्रमाणे जेवायच्या थांबत त्यामुळे मलापण थांबावे लागे. माझ्या नवर्‍याने मला आधी जेवण्याचा आग्रह केला तर साबा त्याला ओरडत असत की आम्ही थांबतोच ना, एकदिवसाने काय होतयं?
माझ्या माहेरी रात्री जेवणाची वेळ ९-९:३० होती जी मी सासरी आल्यावर १०.३० झाली, वरुन रविवारी एव्हढा उशीर. त्यानंतर पुन्हा सगळं आवरुन, भांडी घासुन झोपायला उशीर. मला सकाळी ऑफिसला जावे लागे, त्या दोघी घरीच असायच्या त्यांना दुपारी झोपायला मिळायचे त्यामुळे रात्री उशीर झाला तरी चालत असेल.
कालांतराने बरीच सुत्रे मी हाती घेतली आणि या अशा बर्‍याच बिनकामाच्या परंपरा मोडुन काढल्या. नवर्‍याचा तर आधीपासुन सपोर्ट होताच त्यामुळे मी बिनधास्त आधी जेवु लागले (पहिल्यांदा माझे ताट नवर्‍यानेच वाढुन आणले होते Happy ) सुरवातीला त्रास झाला सगळ्यांच्या नजरेचा, टोमण्यांचा पण आता सगळे बरेच बदललेत की मला सवय झाली Wink

विशेष करुन जर कोणी उशिरा येणार असेल तर ताटकळू नये, जेवून घ्यावे(पाहुणे पण रात्री १२ ला येणार असले तर घरच्यांनी जेवणे उरकून पाहुण्यांना निवांत जेऊ घातले तरी चालेल.)
कधी सणावाराला उशिरा जेवण्याचा प्रसंग आला(वास्तुशांतीला सर्व विधी संपवून घरचे ५ ला जेवायला बसले होते, तरी फक्त घरचेच होते.बाहेर चे कोणी बोलावले नव्हते.) तर व्यवस्थित नाश्ता/मध्ये मध्ये स्नॅक्स चहा कॉफी चालू ठेवतो.

या विषयावर आधी कुठेतरी चर्चा होऊन गेलेली आहे. व त्यातला एक अत्यंत आवडलेला प्रतिसाद मी जपून ठेवला होता, तो इथे डकवतो :

nandini_shlok.jpg

नंदिनी Happy
मला तर वाततं असे सर्व कॉमन सेन्स चे विचार संस्कृतात लिहून ठेवले पाहिजेत. योग्य गोष्टी गीर्वाणवाणीत असल्या तर त्या एका ठराविक डेमोग्रफैकला पटतात पटकन Happy

विद्या, तू आम्च्या इथे पार्ट्यांना यायला हवस. खूष होशील .

"पुरुषांना आधी जेवू दे" ही प्रथा आमच्या ग्रुप मधे पण बर्‍याचदा पाळली जाते. पण त्यामगची कारणं फारच वेगळी आहेत.

मला स्वतःला जेवताना कोणीही मधे कटकट केलेली आवडत नाही. तसचं, पार्टी वगैरे असेल तर मी मुद्दाम खटून काहीतरी चांगला पदार्थ बनवलेला असतो. त्याचा आस्वाद शांतपणे घ्यायला आवडतो मला.
मी जेवायला बसले की मुलीला (वयः ५ वर्षे) हमखास शी/शू लागते. कोणतं तरी न सापडणारं खेळणं त्याच क्षणी हवं असतं. गोष्ट वाचून दाखवायला हवी असते. नवर्‍याचं जेवण आधी झालं असलं की तो पूर्णवेळ तिच्याकडे बघू शकतो आणि मी शांतपणे जेवू शकते.
आपण आधीचं जेवलं तर, घाई-गडबडीने जेवायला लागत कारण मग मी मुलीकडे बघते आणि नवरा जेवतो.
मुलगी अजून थोडी मोठी झाली की परत एकदा एकत्र जेवायचे दिवस आमच्या आयुष्यात येतील ह्या आशेवर आहे सध्या.

बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. आम्हीही अर्थात परग्रहवासी नसल्याने ही पद्धती आमच्या घरातही पूर्वापार चालत आली आहे. सर्वात आधी लहान मुलांना जेवायला बसवायचे, अगदीच बच्चा असताना अश्या पंगती चिल्यापिल्यांसह एंजॉय केल्या. पण जरा अक्कल येताच मी स्वताला लहान म्हणवणे अपमान समजून त्या पंगतीला बसायचे टाळू लागलो. मग काका मामांच्या मांडीला मांडी लावून बसणे भूषणावह वाटू लागले. पण कालांतराने त्या लोकांच्या चर्चा मला बोर वाटू लागल्या. तसेच माझी जीवाभावाची मैत्रीण आई जेवताना मिस होऊ लागल्याने मग ती पंगतही टाळून मी आईबरोबर शेवटच्या बायकांच्या पंगतीला बसू लागलो. तेव्हा मला समजले की बायकांच्या पंगतीला हसणेखिदळणे धमाल मस्ती जरा जास्त असते. पाठीमागे कोणाला जेवायचे आहे, नाही. किती वाजले वगैरे कसलेही टेंशन नसल्याने, तसेच एकंदरीत त्या समारंभात घडलेल्या लाईव्ह गंमतीजंमती बायकांनी जास्त अनुभवल्या असल्याने बोलायला विषय जास्त, बोलायची आवडही जास्त, आणि सोबत कडकडून भूक लागली असल्याने त्या वेळेला जेवायलाही मला आवडू लागले. त्यामुळे उद्या खरेच जर बायकांनी या पद्धतीवर बहिष्कार टाकला तर माझ्यासारखी आवड जपणारा मुलगा या सर्वाला मुकणार Sad

मला ह्या लेखाशी रिलेट करता आलं नाही. हे खरं आहे की पारंपारीक रित्या पुरूषांची पंगत आधी असायची . ज्याला जास्त फॉर्मल स्वरूप असायचं आणि बायकांचं जेवण अगदीच इनफॉर्मल. पण माझ्या बघण्यात, मी वावरते तिकडे आता रोज तसं काही होत नाही. जुनी पद्धत पाळली जात असेल तर त्यात सोयीचाही भाग असतो. जेवणं फॉर्मल असली (मला ह्याला मराठी विशेषण सुचत नाही म्हणून हा शब्द) तर "एव्हढासाच भात उरलाय संपवून टाक ", पोळी एकच आहे पण दोघांनां हवी आहे तर अर्धी वाटून घे, लोणच्या च्या बरणीतला, तूपातला इत्यादी चमचे चाटून टाक असं पंगतीत होत नाही जे शेवटी जे जेवण असतं त्यात सर्रास होऊ शकतं.

सध्या तरी जर पारंपारीक जेवण असेल घरी (बरेच पाहुणे आहेत, काही पूजा, विशेष कारण ह्यानिमीत्त जेवण तर उत्सव मुर्ती, किंवा पूजा सांगणारे गुरूजी, मेहूण वगैरे कॅटेगरी इत्यादींना पुरूष असो वा बाई) फॉर्मल जेवणात /पंगतीत बसवतात बाकीचे नंतर.

त्यामुळे मला काही हे फार दिसलेलं नाही किंवा दिसलं असेल तरी तिकडे बाई पुरूषापेक्षा सेकंडरी दर्जाची म्हणून तीने नंतर जेवायचं असा काही सूर आढळला नाही. हे मान्य आहे की मोस्टली बायकाच स्वयंपाकघरं सांभाळताना दिसल्या आहेत असल्या पारंपारीक जेवणात पण हे चित्र बदलायला अजून थोडा वेळ लागेल. पण त्यामुळे सोय बघणे हे मुख्य कारण दिसतं शेवटी किंवा नंतर जेवण्यात.

Vishay agdi sadha tarihi vichar karayla lavnara ahe ....apli purush pradhan sanskriti yala karnibhut asavi ....pan yat badal ha hava yashi agdi sahmat ahe ...bayka jevtana purushani ka vadhu naye ..nahi ka Happy

धाग्याचा विषय माहित होता, पटलाही.
तसेच वरील सशल यांचि पोस्टही पटली.
मात्र, सशल यांनी वर्णन केलेली परिस्थिती शहरातुनही केवळ मोजक्या घरातुनच दिसते (माझ्या मते/प्राप्त अनुभवाप्रमाणे बहुतेक वेळा अशी घरे कोब्रांचीच असतात).

माझ्या पहाण्यात, अगदी रोजच्या दिनक्रमातही स्त्रीने नंतर बसायचे हा खाक्या तथाकथित सुशिक्षित पण वृत्तीने मागास घरात हमखास आढळतो. इतका, की अगदी पाहुणी आलेली स्त्री देखिल मागिल दुसर्‍या पंक्तिला बसवली जाते. मानापमानाची "नाटके" महान भीषण असतात. दुर्दैवाने "ब्राह्मण" ज्ञातीही यातुन वेगळी सुटलेली नाही. (अपवाद कोब्रांचा असु शकतो).

माझ्याघरापुरते म्हणायचे, तर सुरवातीच्या काळात लिंबी माझ्याकरता जेवायला थांबायची, तेव्हा घरी परतायची वेळ निश्चित नसायची, कधी रात्रीचे नऊ, तर कधी साडेअकरा. तेव्हाच तिला आईनेही निक्षुन सांगितले होते की आमच्याकडे अशी नवर्‍याकरता "ताटकळत" उपाशीपोटी थांबायचि पद्धत नाही. लिंबीला अवघडल्यासारखे व्हायचे, मात्र नंतर लौकरच ती सरावली.

त्यानंतर माझेकडे बरीच मुले शिक्षणाकरता वगैरे असल्याने, तेव्हा तर सर्व स्वैंपाकाची भांडी मध्यात घेऊन गोलाकार कोंडाळे करुनच एकत्र बसायचो. स्त्रीपुरुष/पंक्ति असल्या बयादी नाहीतच, पण ज्याने त्याने आपापले ताट सांडलेल्या खरकट्यासहित उचलुन मोरीत नेऊन ठेवायची सक्तिही होती. ज्यांचे घरात पंक्तित आयत्या ताटावर बसुन, जेवण झाल्यावर "ताट न उचलणे" वगैरे पद्धती होत्या, त्यांना ते अवघड जायचे. पण मग, माझी बायको (वा मी वा अन्य कुणीही) नोकराप्रमाणे कुणाचीही (अगदी स्वतःच्या अपत्यांचीदेखिल) ताटे उचलित बसणार नाही, तसे हवे असल्यास खानावळीत जावे हा खाक्या दाखविल्यावर तो सगळ्यांना पटलाच, इतकेच नव्हे तर पुढे त्यांची लग्ने होउन घरे थाटल्यावर तिकडे देखिल हीच रीत सुरु राहिली.

मात्र सशल म्हणतात तसे , विशेष सणासमारंभानिमित्ते जेवण ते देखिल पंक्तिमधे असेल, तर आधी म्हातारे व मुले व आमंत्रित पुरुष, जमल्यास त्यांच्या बायका यांना पाहुणे म्हणून अर्थातच प्राधान्य दिले जाते. नंतर बाकीचि सापडतील तशी बसवुन घेतली जातात. मात्र यावेळेस यजमान म्हणून मी व लिंबी अन वाढण्याकरता असलेले स्त्री/पुरुष असे सर्वजण सर्वात शेवटी जेवतो. यामागे अन्न पुरवठ्यास पडावे, आपल्यामुळे कमतरता राहू नये हा देखिल उद्देश असतोच. तसेच वाकुन वाढायचे असल्यास, जेवण झाल्यावर वाकुन वाढणे शक्य होत नाही हा देखिल एक भाग असतो.

जेवायला थांबला/नाही थांबला यावरुनचे मानापमानाचे एकेके गहन किस्से मी "देशस्थात" मात्र भरपुर पाहिलेत्/अनुभवतोय. अगदी सख्ख्या बहिणीबहिणींमधेही एक आली नाही तर बाकी सगळ्या थांबुन रहाणे, एरवी स्वतःच्या घरात हरकत नाही, पण पाहुणे म्हणून गेले असताना तिथे असे करणे हा कहर असतो. अन याला दुपारी २ ते ४ थांबुन रहाणे म्हणजे अतिच. पण एकविसाव्या शतकातही असतात अशी मागास लोक.

(विशेष सुचना; मी ब्राह्मण ज्ञातीचा, माझा वावर माझे ज्ञातीत जास्त, इतर ज्ञातिंबद्दल बोलणे हा कायद्याने गुन्हा, म्हणून केवळ माझे ज्ञातिचे माझे अनुभवा प्रमाणे उल्लेख करुन लिहिले असे.)

वरील लेखाशी सहमत!

लिम्बु, म्हणतोय त्या नुसार ( मी कोब्रा नाही तरी Wink ) आमच्या कडे आम्ही सर्वजण सोबतच जेवण करतो! वडील हयात असताना देखिल त्यांना सर्वांनी बरोबर जेवायला बसावे ही आज्ञा असे.. आई टाळू लागली तर "तुझे जेवण चुलीत काय?" असे म्हणून चिडवत हे आज आठवले एकदम!

सर्वांनी एकत्र जेवणे ही एक चांगली अनुभुती असते! कधी घरातील पुरुष माणूस काही निमित्तने बाहेर असेल व विलंब होत असेल तर इतरांनी जेवून घ्यावे हा दंडकही आहे!

सशल +१०००

पारंपारिक असो की अपारंपारिक प्रत्येक यजमानाची जेवण व्यवस्थापनाची शैली असते. लोकाकडे गेल्यावर त्यांच्या पंगत व्यवस्थापनाच्या शैलीत गोंधळ घालणे नाही जमणार. आजीच्या भाषेत - त्यांनी सांगितल जोडीने बसा, उखाणे घ्या तर लग्गेच "कोपर्‍यात उभी हिंदमाता" म्हणायचे. नवर्‍याचे/ पुरूषांचे झाल्यावर बसू म्हणले तर चप बसून कुरडईच्या दुरडीतून ३ कुरडया कुरूम कुरूम करत वेळ काढायचा. आधी बस म्हणाले तर पाट गाठायचा, उग्गाच "तो बसणार ? का अजून पितोच आहे?" चौकशी करायची नाही.
स्वतःच्या घरात काय तो जेवण क्रॉनॉलॉजीचा गोंधळ घालावा.

खरंतर चावून चोथा झालेला विषय आहे. आमच्या मित्रमंडळीत हे चित्र दिसणं कधी बंद झालंय लक्षात येत नाहीये पण भारतात जनरली सणासुदीला माणसं जमली की हे चित्र दिसतं हमखास. शेवटची पंगत बायकांची. जे काही उरलं सुरलं असेल ते खाऊन आनंद मानायचा सगळे व्यवस्थित जेवले ह्याचा. बायकांची जेवणं इतकी उशिरा होतात की पुन्हा काही नव्याने रांधून घ्यायचा उत्साह आणि शक्ती नसतेच.

>>>> "तो बसणार ? का अजून पितोच आहे?" चौकशी करायची नाही. <<< Lol
इकडे देशात अजुनतरी "पितोच" आहे का असे विचारण्याची पाळी येत नसावी बहुतेक.... Wink

>>> शेवटची पंगत बायकांची. जे काही उरलं सुरलं असेल ते खाऊन आनंद मानायचा सगळे व्यवस्थित जेवले ह्याचा. <<<<
उरल सुरल का म्हणून? Wink जेवण बनवताना अंदाज नको? अन देशस्थात हा प्रश्न पडतच नाही, अन्न उरले नाही असे कधीच होत नाही, रहाता राहिले कोकणस्थ, ते तर काय? कुणाकुणाला कितिक भूका आहेत ते विचारुनच स्वैंपाक बनवतात. त्यांच्याकडे मात्र कदाचित जेवणातिल विशिष्ट पदार्थ न उरण्याचा संभव अस्तो, पण कोके लई हुषार, आधीच भांड्याचा खडखडाट करुन मोकळे होतात, वेळेस, हा अमुक इतका पदार्थ इतकाच आहे वाढायला. जास्त मागायचा नाही असे भर पंक्तित स्वतःच्या पोरांसहित पाहुण्यापोरांना (अन त्यांच्या पालकांनाही) ऐकवायला मागेपुढे बघत नाहीत.... Proud

देशस्थ, कोकणस्थ वगैरे डिटेलमध्ये पडण्यात इंटरेस्ट नाहीये पण >>उरल सुरल का म्हणून? डोळा मारा जेवण बनवताना अंदाज नको? >> बायका काय केटरर्स नसतात अगदी परफेक्ट अंदाजाने जेवण करायला. (पट्टीच्या केटरर्सचेही चुकत असतीलच म्हणा) काही कमी काही जास्त उराउर होतेच. असेल, नसेल ते गोड मानून घेणं हा मुद्दा आहे.

सायो, बरोबर आहे तुमचं.
माझा अनुभव मात्र असाही आहे की स्वैंपाक केला तर करताना जे वास घेतले जातात त्यामुळे अन्नावरची वासना उडते, व ती परत लाभण्यास मधे वेळ जावा लागतो, तेव्हा मी स्वैंपाक केला (भाजी/पाव, धिरडी/घावने वगैरे) तर आलेल्या सगळ्यांचे होईस्तोवर मी स्वत: देखिल खायला घेऊ शकत नाही, व तिथे स्त्री/पुरुष असा भेदभाव मला तरी जाणवला नाही.
तसेच, सगळ्यांना पुरेसे खायला घातल्यावरच कित्येकदा मी शेवटचे धिरडे कसेतरी डाव अर्धा डाव पिठाचे वीतभर आकाराचे टाकुन खाल्लेले आहे, पण इतरांना आनंदाने खाताना पाहुन व त्यांच्या चेहर्‍यावरची तृप्ति पाहुन जे समाधान मिळते, त्यापुढे " मला स्त्री (वा पुरुष) म्हणून नंतर खायलाच उरले नाही, माझा नंबर शेवटचा लागला गिळण्याकरता" वगैरे दु:खे उपस्थितच होत नाहीत असा माझातरी अनुभव आहे, हां मात्र याकरता दुसर्‍यांना "खिलवायचा" शौक मात्र हवा हं.
बर तर बर, मी कै पुरामधे वा सुख्ख्या दुष्काळात अडकलेलो नाहीये, की असे व्हावे अन्नाची पाकीटे फेकली जावीत अन जिवाच्या आकांताने ती पकडायला इतरांसोबत स्पर्धा/ढकलाढकली करीत मला जावे लागतय, अन्नाच्या एकेका घासाकरता, पाण्याच्या एकेका घोटाकरता मी मोताद होतोय, दुसर्‍यांना खाताना बघुन लाळ गाळावी लागत्ये अशी परिस्थिती "माझ्याच घरात माझी नसेलच" असे गृहित धरुन माझे विवेचन आहे बर्का... Happy Wink
तस नस्त, तर मात्र हावरटासारखे इतरांच्या आधीच अन्न "मलाच" कसे गिळायला मिळेल या स्पर्धेत मी देखिल उतरलो अस्तो.....
अहो फार लांब कशाला? परवाच ववि झाला ना? तर तिथे देखिल बघायला मिळाले, मला कौतुक वाटले, जितके म्हणून आजी/माजी संयोजक वा कर्तेधर्ते कार्यकर्ते /वडिलधारे स्त्रीपुरुष होते, ते सगळे इतर सगळ्या वविकरांचे जेवण यथास्थित झाल्यावर सगळ्यात शेवटी जेवायला बसले. यालाच "म्यानर्स" असेही म्हणत असावेत ना?
(मी मात्र लग्गेच उरकुन घेतलो हो, हो ना, उगाच अंदाज चुकला, पवनाहट्सवाल्यांचा स्वैंपाक कमी पडला तर आपण नेमके उपाशी रहायचो ही भिती..... Proud आता कुणी यास स्वार्थ म्हणा वा अजुन काही... Wink )

Happy
अगदी मनातला लेख. मला तरी वर लिंबू नी म्हटल्या प्रमाणे वासना गेली वगैरे होत नाही व चांगली भूक असते व उरले नाही तर राग येतो...रोजचेच झाल्यावर काय करणार ना?

लिंब्या, तुझा आदर्श बाकीच्यांनी ठेवावा असाच दिसतोय Happy स्त्री पुरूष असा भेदभाव ठेवायचा नाही असं जरी म्हटलं तरी १०० पैकी ९०,९२ घरांमधून बायका रांधतायत, पुरूष पहिल्या पंक्तीत जेवून उठतायत आणि बायका शेवट जेवतायत हेच चित्र का बरं दिसत असावं (अजूनही)? ह्याच्या उलट का नाही दिसत?

Pages