काबूलनामा : श्री.फिरोज रानडे

Submitted by अनया on 8 July, 2016 - 16:13

मला आवडलेले पुस्तक : काबूलनामा, लेखक श्री.फिरोज रानडे

मराठी माणसाची साधारण प्रवृत्ती ही आपल्या पंचक्रोशीत रमण्याची. पण दोन पिढ्यांमागे भाकरीच्या शोधात मूळ गाव सोडून शहराकडे धाव घेणे, हे अपरिहार्य झाले. तरीही बहुधा परीघ मुंबई-पुण्यापर्यंतच राहिला. त्या काळात श्री. फिरोज म्हणजेच पंढरीनाथ रानडे दिल्ली, कलकत्ता, शिलॉंग अश्या सुदूर ठिकाणी कामानिमित्त्य राहिले. तिथल्या अनुभवांनी त्यांचे विश्व विस्तारले गेले. त्यांच्या पत्नी प्रतिभा रानडे ह्यांनी व स्वतः रानडे ह्यांनी त्या अनुभवांवर लेखन केले. श्री. रानडे ह्यांच्या ‘काबूलनामा’ ह्या पुस्तकाविषयी माझे चार शब्द....

काही वर्षांपूर्वी अफगाणिस्तानची खरं म्हणजे कुठलीच प्रतिमा डोळ्यासमोर नव्हती. नंतर अफगाणिस्तान म्हटलं की डोळ्यासमोर ‘तालिबान, बॉम्बस्फोट, रायफली, निळ्या बुरख्यात लपेटलेल्या स्त्रीया, बामियानच्या उद्ध्वस्त बौद्ध मूर्ती आणि निर्वासितांचे लोंढे’ अस उदास, राखी रंगातलं चित्र उभं राहू लागलं. तेव्हाच कधीतरी हे पुस्तक हातात पडल. तेव्हाच्या सुंदर, मोकळ वातावरण असलेल्या अफगाणिस्तानच वर्णन वाचून आश्चर्यच वाटलं.

श्री.रानडे पेश्याने आर्किटेक्ट होते आणि भारत सरकारचे वरिष्ठ अधिकारी होते. १९७७ ते १९८१ ह्या काळात ‘आयटेक’ ह्या भारत सरकारच्या योजनेअंतर्गत अफगाणिस्तानात काबूल येथे आपल्या कुटुंबासमवेत राहिले. त्यांच्याबरोबर बँक कर्मचारी, आर्कीऑलॉजीस्ट, संगीत शिक्षक, हॉकी कोच ह्या आणि अश्या विविध पेशातली बरीच भारतीय लोकं काबूलमध्ये होती. नुसते ‘होती’ अस नाही, तर बहुतेक सर्व मंडळी तिथल्या आरामशीर आयुष्याच्या प्रेमात पडून जास्तीत जास्त राहण्याच्या प्रयत्नातही होती.

रानडे काबूमध्ये होते, त्या काळातल्या जनजीवनाच, अफगाणी लोकांच्या चालीरीती, त्यांच्या राहणीच फार छान वर्णन ह्या पुस्तकात आलं आहे. तिथले रस्ते, बाजार, इमारती, रानडेंच्या ऑफिसमधील भारतीय तसेच अफगाणी सहकारी आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात.

आज सामान्य माणसाला अफगाणिस्तानात जाण्याची कल्पनाही भीतीदायक वाटेल. पण तेव्हा तिथे बुरख्यातल्या स्त्रीया क्वचितच दिसायच्या. स्त्रीयांमध्ये शिक्षणाच प्रमाण चांगल होत. सर्व ऑफिसांमध्ये नोकऱ्या करणाऱ्या स्त्रीया दिसत असत. पण माणसाच किंवा वास्तुच आपलं एक नशीब असत, अस म्हणतात. ग्रह फिरावे, तसं त्याचं नशीबही फिरत असाव अस काहीकाही उदाहरणांवरून वाटतही. तसच देशाचंसुद्धा बहुधा असाव. नाहीतर ज्या देशात बायका अद्ययावत पोशाख करू शकत होत्या, सार्वजनिक कार्यक्रमात गाऊ शकत होत्या, शिकू शकत होत्या, तिथेच स्त्रियांना मध्ययुगाच्या काळोखात ढकलण्यात आलं. काळाच्या आधुनिकतेच चक्र अस उलट फिरलच कसं, असा अचंबा वाटतो.

रानडे कुटुंबियांच्या चार वर्षांच्या वास्तव्याच्या काळात अफगाणिस्तानात बरीच राजकीय उलथापालथ झाली. राजकीय उठाव, कम्युनिस्ट क्रांती, रशियन सैन्य येणे अश्या तिथल्या जनजीवनावर आणि जगाच्या इतिहासावर दूरगामी परिणाम करणाऱ्या घटना घडल्या. रानडे दांपत्याने ह्या घटना जवळून आणि त्यात रस घेऊन बघितल्या. ‘आपण इथे थोडे दिवस राहणार आहोत, आपला काय संबंध?’ असा अलिप्त विचार न करता, सामान्य अफगाण माणसांच्या सुखदुःखाशी ते एकरूप झाले. फारसी भाषा, अफगाण संस्कृती आणि तिथले रितीरिवाज ह्यात समरस झाले. तिथलं भारतापेक्षा खूपच वेगळ असलेलं समाजजीवन, तिथले वेगवेगळे वंश, अफगाण माणसाच्या आयुष्याचा तानाबाना त्यांनी समजून घेतला.

रस्त्याकडेचा चांभार, सामान्य टॅक्सीवाला, रानड्यांचे घरमालक ह्यांच्यापासून ते त्यांच्या ऑफिसमधील सहकारी असलेल्या एका अमीरपुत्रापर्यंत सर्वांशी त्यांनी मैत्री जोडली होती. रशियन सैन्याच्या आगमनानंतर तोपर्यंत कोणाचीही गुलामी न केलेले, स्वतंत्र बाण्याचे अफगाण लोकं खूपच दुखावले गेले. सगळीकडे संशयाचं, भीतीचं, असुरक्षिततेच भयाण वातावरण तयार झालं होत. रानडे त्याविरुद्ध काही करू शकत नव्हते. पण त्यांच्या परिचयातल्या माणसांना त्यांच्याशी मोकळेपणाने, विश्वासाने बोलत येत असे , मनातली खळबळ व्यक्त करता येत असे. तेवढी जागा त्यांनी अफगाण मित्रांच्या मनात निर्माण केली होती.

त्यांच्या लिखाणात त्यांच्या उत्साही, रसिल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रत्यय जागोजागी येतो. त्यांनी जी वेळ, जसा प्रसंग समोर येईल त्याचा मनापासून आनंद घेतला. मग राजकीय उठाव झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी बायको-मुलांबरोबर पूर्वीचा राजवाडा बघायला जाणे असो किंवा रशियन घुसखोरीविरुद्ध निघालेल्या मिरवणुकांत भाग घेणे असो.

रानडेंची निरीक्षणशक्ती जबरदस्त! त्यामुळे अनेक गमतीदार प्रसंग त्यांच्या पुस्तकात वाचायला मिळतात. त्याबद्दल लिहायचं, तर सगळ पुस्तकच लिहून काढावं लागेल. उदाहरण म्हणून एकच लिहिते. काबूलमध्ये हिंदी सिनेमा अत्यंत लोकप्रीय होता. प्रत्येक दुकानात हेमामालिनीचा फोटो आणि शेजारी देशप्रमुखाचा फोटो दिसायचा. तिथे देशप्रमुख बदलला, की नव्या प्रमुखाचा फोटो त्वरीत लावावाच लागतो. त्यात चालढकल केल्यास देहदंडही होऊ शकतो. रानडे तिथे होते, तेव्हा चार देशप्रमुख बदलले. ते फोटो बदलत गेले, तरी हेमामालिनीचा फोटो मात्र कायम होता!

काबूलमध्ये त्यांचा वकिलात, राजदूत आणि तेथील यंत्रणा ह्यांच्याशी अर्थातच निकटचा सबंध आला. त्या सगळ्या लोकांचे आणि तिथे राहणाऱ्या हिंदी लोकांचे अत्यंत मनोरंजक वर्णन त्यांच्या पुस्तकात आहे. ते काबूलमध्ये होते तेव्हा त्यांच्या घरी श्री.माधव गडकरी, ज्येष्ठ गांधीवादी श्री.हरीभाऊ जोशी, तसेच सरहद्द गांधी खान अब्दुल गफारखान पाहुणे म्हणून येऊन गेले होते.

पेशाने आर्किटेक्ट असल्याने काबूलच्या नगरपालिकेत काम करताना त्यांनी हाताळलेले विविध प्रकल्प, त्या संबंधाने येणारे प्रश्न, रशियन लोकांबरोबर झालेले वाद ह्याच चांगल खमंग वर्णन ह्यात वाचायला मिळत. एक जुनी मशीद समोरचा रस्ता रुंद केल्यामुळे पाडली जाणार होती, ती वाचवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, हे सगळ वाचल की त्यांच त्यांच्या कामावर किती प्रेम होत ते कळत. आपल्या कामावर मनापासून प्रेम करणाऱ्या माणसाचा धर्म ‘त्याच काम’ हा होतो. त्या माणसाला देशाच्या, धर्माच्या रूढ भिंती दिसेनाश्या होतात.

अफगाणिस्तान हा आपल्या जवळचा देश. वर्षानुवर्षे युद्ध, बंडाळ्या, परदेशी आक्रमणे ह्यांनी पोखरला गेलेला. टोळ्या, वंश ह्यात विखुरलेली जनता. 'एक देश, एक झेंडा' ह्या कल्पनांपासून काहीसा लांब. काहीसे क्रूर पण पराकोटीचे अभिमानी असे लोक. तालिबानच्या राजवटीत मोकळेपणाने श्वास घेणसुद्धा कठीण होत. एकेकाळी स्वातंत्र्य उपभोगलेल्या अफगाण लोकांनी हे सगळ कसं सोसलं असेल, कोण जाणे.

भारताची अफगाणी लोकांच्या मनातली प्रतिमा 'मोठा भाऊ' अशी होती. भारताच्या राजकारणात त्यांना खूप रस होता. तत्कालीन पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी ह्या स्त्री असून इतक्या मोठ्या देशाच्या 'सुलतान' आहेत, ह्या गोष्टीचं सामान्य अफगाणी लोकांना आश्चर्यही वाटायचं आणि कौतुकही. कौतुक म्हणजे किती?, रानडेंच्या ड्रायव्हरने त्याच्या मुलीच नाव 'इंद्रा गांधी' ठेवलं होत इतकं!!

अलेक्झांडर, मुगल आक्रमक ह्यांच्यापासून ते इंग्रज, रशियन फौजांपर्यंत कितीजण ह्या देशाला लुटायला आले आणि जाताना आपल्या संस्कृतीचा एक भाग इथेच सोडून गेले. ह्या सगळ्याच मिश्रण होऊन त्यात झाली ती अफगाणी संस्कृती. त्या संस्कृतीची अत्यंत जिव्हाळ्याने लिहिलेली झलक आपल्याला ह्या पुस्तकातून बघायला मिळते.

तिथली परिस्थिती दिवसेंदिवस पारच बिघडत गेली, त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव भारत सरकारने सगळ्यांना परत बोलवायला सुरवात केली. रानड्यांचाही परतीचा कार्यक्रम ठरला. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाचा जीव तिथे खरच गुंतला होता. पुन्हा कधी भेटायची शक्यता दुर्मिळ आहे, ही जाणीव मनाला पोखरत असताना त्यांनी तिथल्या परिचितांचा, सहकाऱ्यांचा निरोप घेतला. पण आपल्याला मात्र पुस्तक संपवताना त्या सगळ्या रानडेंच्या लेखणीतून ओळखीच्या झालेल्या लोकांबद्दल हुरहूर वाटत राहते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान ओळख. वाचायलाच हवे. नवीन आहे का हे पुस्तक ? प्रतिभा रानडे यांचे अफगाणिस्तान वरचे लेखन माहित होते.या पुस्तकाबद्दल माहित नव्हते. फिरोझ रानडे यांचे इमारत हे पुस्तकही छान आहे.

त्यांच्या पत्नी प्रति भा रानडे यांनीही अफगाण डायरी हे पुस्तक लिहिले आहे. इतकेच काय नंतरच्या आवृत्तीत सद्यःस्थिती अपडेटही केली आहे. तसेच निळू दामले यांनी ही अवघड अफगाणिस्तान नावाचे पुस्तक अगदी अलिकडए ल्हिले आहे . त्यात रशियन गेल्यावर अमेरिका घुसली त्या नन्तरच्या काळाचे अगदी अलीकडचे वर्णन आहे. अर्थात ते केवळ रिपोर्ताज या स्वरूपाचे असल्याने रानड्यांइतके वाचनीय नाही पण अद्ययावत तपशीलाच्या दृष्टीने चांगले आहे...

आपम्च्या परिचयाचे सुरेश जोशी नावाचे एक अतिवरिष्ठ अधिकारी काबूलात अफगाणिस्तानच्या पुनर्बांधणी साठी भारत सरकारतर्फे डेप्युटेशनवर होते. ते तिथे ऑफिसमध्ये काम करीत असताना इमारतीत बॉम्बस्फोट झाला ते त्यांच्या कानाचे पडदे फुटल्याने त्यांना बहिरेपण आले होते. कसे बसे मशीन लावून ते काम करीत . ज्याना ही स्टोरी माहीत नव्हती ते त्यांच्या अपरोक्ष त्याना 'बहिरोबा, कानपूर लाईन बंद अशी हेटाळणी करीत ते खरोखरच अमानुष वाटे.

फिरोज रानडे अतिशय छान लिहीत. त्यांचे हे पुस्तक वाचनीय आहेच. सूक्ष्म निरीक्षणशक्ती, माणसांची पारख, हलकी-फुलकी शैली ही त्यांची सारी वैशिष्ट्यं यात आढळतात. ‘फिरविले अनंते...’ शीर्षकाचं त्यांचं आत्मकथनही वाचण्यासारखंच आहे. ‘माणूस’ साप्ताहिकातून त्यांचं सदर दीर्घ काळ प्रसिद्ध होई. त्याचा नायक श्याम आणि नायिका राधा यांचा संवाद अप्रतिम. त्याचंही पुस्तक माझ्या संग्रहात आहे.

सर्वांचे प्रतिक्रियेबद्दल आभार. वाचनाची आवड लहानपणापासून आहे, पण पुस्तकाबद्दल लिहायचा हा पहिलाच प्रयत्न होता. तुमच्या प्रतिक्रियांमुळे थोडा आत्मविश्वास वाढला!

दिनेशदा, पुस्तक नवीन नाहीये. पण माझ्याकडे आत्ता त्याचं प्रकाशन वर्ष किंवा असे अन्य तपशील नाहीयेत. कोणाला माहिती असल्यास कृपया सांगा.

देवकी, माझ्या माहितीप्रमाणे रानडेंच अधिकृत नाव 'पंढरीनाथ' होत, पण त्यांना घरी 'मुकुंद' म्हणायचे.

अहमदनगरकर, मी अफगाणिस्तानशी संबंधीत वाचलेलं पाहिलं पुस्तक हे होत. नंतर प्रतिभा रानडे आणि निळू दामलेंची पुस्तकही वाचली. इंग्रजीतलीही जी शक्य होती, ती मिळवून वाचली. मला स्वतःला मराठीतली जास्त आवडली! पण हे व्यक्तीप्रमाणे बदलू शकत.

बे-डर, रानडे खरच छान लिहायचे. मी आर्किटेक्चर कॉलेज मध्ये शिकत असताना आमच्या लायब्ररीत एकदा भेटलेही होते. तेव्हा मी त्यांचे थोडे लेख वाचले होते आणि त्यावर आमच बोलणही झाल होत.

सुरेख परीचय करून दिला आहात पुस्तकाचा.

'ऐसपैस गप्पां' मुळे प्रतिभाताईंबद्दल खूप प्रभावित झालो होतो. दुर्गाबाईंसारख्या अनेक विषयांत रस आणि ज्ञान असलेल्या व्यक्तीच्या अनेक पैलूंना अत्यंत साधेपणानी त्यांनी वाचकांसमोर मांडले होते. त्या पुस्तकामुळे फिरोजजींचे नाव माहित झाले होते पण त्यांच्या लिखाणाबद्दल अजीबातच माहिती नव्हती.

आता तुमच्या या लेखामुळे फिरोजजींचे हे पुस्तक वाचायच्या यादीत घातले आहे.

आवडलं लिखाण. पुस्तक फार पुर्वीच वाचलेले आहे त्याला उजाळा मिळाला.
अजूनही आवडलेली काही पुस्तके असतीलच तर त्यावरही लिहावे हे विनंती.

>>माझ्या माहितीप्रमाणे रानडेंच अधिकृत नाव 'पंढरीनाथ' होत, पण त्यांना घरी 'मुकुंद' म्हणायचे.
मग फिरोझ हे नाव कसे रूढ झाले ? असच उत्सुकता म्हणुन विचारतोय.

फिरोझ हे नाव त्यांनी स्वतःच घेतले टोपणनाव म्हणून.
एक तर सरकारी नोकरी करत असताना लिहायचे म्हणून टोपणनाव आणि
प्रतिभा रानडे या लेखिका म्हणून त्यांच्याही आधी प्रसिद्ध पावल्या होत्या त्यामुळे फेमस स्त्रीचा नवरा म्हणून इंदिरा गांधींच्या नवर्‍याचे नाव त्यांनी घेतले असे काहीसे त्यांच्याच लेखात / पुस्तकात वाचल्याचे आठवते आहे.

चु भू दे घे.

हर्पेन - तुम्ही दिली तीच फिरोज रानडे यांच्या टोपणनावाची जन्मकथा आहे. बहुतेक ती त्यांच्या `फिरविले अनंते...`मध्ये आहे.

प्रतिभा रानडे ह्यांचा उल्लेख वाचून खूप आनंद झाला. मराठी साहित्यामधे प्रतिभा रानडे ह्यांच्या पुस्तकांबद्दल फारसे बोलले जात नाही पण लेखिकेने केलेले लेखन इतर मराठी लेखिकेंपेक्षा खूप निराळे (सामाजिक) आहे. वर ऐसपैसचा आणि अफगाण डायरीचा उल्लेख आला आहे. ह्या व्यतिरिक्त त्यांचे नल पाकदर्पण हे एक अप्रतिम पुस्तक आहे. पाककलेवर आधीरित ह्या पुस्तकात केवढी तरी वेगळी माहिती मिळते. ती नक्कीच आपल्या ज्ञानात, आहारात आणि प्रकृतीमधे चांगली भर घालते. महाभारतातील नल-दमयंतीची कथा खूप लोकप्रिय आहे. मात्र हा नळ राजा उत्तम स्वयंपाक करीत असे, हे खूप कमी लोकांना माहित असेल.नल राजाने सांगितलेल्या पाककृती या पुस्तकात एकत्रित दिल्या आहेत. शाकाहारी आणि मांसाहारी खवैय्यांना आवडतील अशा या आगळ्या वेगळ्या नावांच्या कृती.

बाई पाकिस्तानला सुद्धा राहिल्या आहेत. त्यांची इतर पुस्तके देतो आहे:

१) पाकिस्तान डायरी
२) स्मरणवेळा
३) वर तीन आलेच आहेत.
म्हणून ६) शुक्रवारची कहाणी
७) स्त्रीप्रश्नांची चर्चा : एकोणिसावे शतक
८) झांशीची राणी लक्ष्मीबाई
९) पाकिस्तान अस्मितेच्या शोधात

प्रतिभा रानडे ह्या किती थोर लेखिका आहेत ह्याची एक प्रचिती तुम्हाला ही फित ऐकून नक्की येईलः https://www.youtube.com/watch?v=vivTE7ZhyOE

साडे चौदा मिनिटांची ही क्लिप आहे. ऐकाच!

प्रतिभाबाईंचे झाशीच्या राणीवरचे पुस्तकही वाचनीय आहे. तसच शेवटचा मुगल बादशहा बहादुरशहा जफर ह्या विषयावरचे आखरी मुघल हे सुद्धा.

बेडर , देवकी, फिरोझ टोपणनावाची जन्मकथा बरोबर आहे तर !

अनया, 'आखरी मुघल' वाचलं नाहीये, त्यामुळे पुढचा लेख 'आखरी मुघल' वरच लिही. कृपया धन्यवाद Happy

'स्मरणवेळा'तला त्यांचा, त्यांच्या (गांधीवधाच्यावेळी सोडायला /बाहेर पडायला लागलेल्य/) लहानपणीच्या घराला अनेक वर्षांनंतर भेट देण्याचा प्रसंग वर्णन करणारा लेख एकदम लक्षात आहे.