बकुळा .....

Submitted by अजातशत्रू on 1 June, 2016 - 23:44

चांगदेव पाटलाचे शेत गावाच्या शेवटच्या टोकाला असणारया पाझर तलावाला लागून होते. अर्धगोलाकार अशा भरावाच्या निमुळत्या अंगाला त्याचे शेत होते. बरड मातीचे ते रान होते पण सहा परस खोल असणारया तिथल्या विहिरीत पाणी मात्र भरपूर असायचे.वर खडकाळ जमिनीमुळे त्याचा उपसाही नव्हता तसा उपयोगही नव्हता. पाझर तलावाच्या पाण्याचे काही झरे त्या विहिरीत पाझरायचे. त्यांच्या शेताच्यापलीकडे गावची शिवेची हद्द होती.अशा या जमीनीत फार काही पिकत नव्हते. चांगदेव पाटलाचा थोरला पोरगा अंगद हा नावालाच शेतीकडे बघायचा. मशागतीची कामे चांगालाच करावी लागायची. थोरल्या अंगदला एक लहान भाऊ होता,काशीनाथ. काशी सातआठ महिन्याचा असतानाच चांगदेव पाटलाची बायको सगुणा बाळंतपणाच्या दुखण्यात जी आजारीपडली ती शेवटी जग सोडून गेली. सगुणेला मुळात मुले उशिरा झाली अन त्यात अंतर फार होते. सारी भावकी काहीबाही बोलायला लागली तेंव्हा चांगदेवाने इच्छेविरुद्ध दुसरे लग्न केले.

त्याची दुसरी बायको महणजे शकुंतला. साहजिकच शकु आणि चांगदेव पाटलाच्या वयात बरेच अंतर होते पण तेंव्हा यात कोणी मध्ये पडत नसल्याने ते तसेच चालून गेले. शकु मुळातच अर्धवट वयाची, अन तिरसट स्वभावाची होती. शकुने काशीला कधी जीव लावला नाही पण तिने नवरयाच्या धाकाने अंगदला मात्र कधी छळले नाही पण त्याच्याकडे नीट लक्षही दिले नाही. आईविना वाढलेले पोर म्हणून चांगदेवानेही त्याचे फाजील लाड केले अन परिणाम व्हायचा तोच झाला.अंगद हा पुढे एक वाह्यात तरुण झाला, अंग मोडून कष्ट करायचे नाही उनाडक्या कारायच्या. उर्मटपणा अंगात ठासून भरलेला. रग्गील स्वभावाचा अंगद अंगानेही राकट होता. काळाकुट्ट रंग अनआडदांड अंग. सदा डोळे लालबुंद, फुगलेल्या नाकपुड्या डोईवर वेडी वाकडी रट केसांचीझुलपे,त्याच्या अशा अवतारामुळे गावातले कोण त्याच्या वाट्याला जात नसे.
अंगदला फार काही सोसावे लागले नाही पण काशिनाथची खूप हेळसांड झाली. शकुंतलेने अक्षरशः त्याला जीव नकोसा केला. त्याचा जमेल तितका छळ केला पण त्या पोराने कधी कुठे तक्रार केली नाही की गाऱ्हाणे गायले नाही.सावळ्या रंगाच्या काशीला बघितले तरी बघणारयाचे मन भरून यायचे. इतका निरागसपणा अन करुणा त्याच्या चेहऱ्यावर असायची. पण शकूला कधी त्याची माया आली नाही. तिने त्याच्याशी सावत्रपणा जमेल तितका निभावला. तिच्या या वागण्याने अन अंगदच्या तिरसटपणाने चांगदेव पाटलाचे मन हाय खाल्ले. तो देव धर्माच्या नादात स्वतःचा वेळ घालवू लागला.

एका सुगीच्या मौसमात अंगदच्या लग्नाचा बार उडाला. अशा बिनकामाच्या वळूला कोणी पोरगी दिली म्हणून गावाने अप्रूप केले. चांगदेवाच्या लांबच्या नात्यातली दूरमुलुखाताली वैजयंता म्हणून नात्याने चुलत मामे बहिण होती. तिची पोर होती बकुळा.नावाप्रमाणेच सुंदर. सोशिक, गुणी अन कामाची होती. तिला बघून कसायाच्या हाती गाय लागली असे गाव म्हणू लागले. अंगदच्या लग्नात काशी दहाएक वर्षाचा असेन. त्याच बरोबर इकडे शकुला चांगदेवापासून दोन मुली झाल्या होत्या, त्यांची वये देखील पाच-सहा अशीच होती. शकुने तिच्यापोटच्या पोरींकडेही नीट लक्ष दिले नाही. त्या देखील अशाच धोतरयाच्या फुलासारख्या वाढायच्या म्हणून वाढल्या. त्याना न आकार न रूप न गुण. आई सारख्याच कशाच्याही चाड नसणारया त्या मुली होत्या. भरीस भर म्हणून शकुने तिच्या विधवा झालेल्या लहान बहिणीला तिच्याकडे आणून ठेवले. गाव चांगदेव पाटलाला हसू लागला. हे सर्व कमी होते की काय म्हणून शकु आणि अंगदने मिळून बकुळेचा अनन्वित छळ सुरु केला. त्या छळाला कोणतीहीसीमा नव्हती.
घरी हा प्रकार स्रुरू झाला तेंव्हा सुरुवातीला चांगाने त्याना अडवण्याचा प्रयत्न करून बघितला. पण त्याला कोणी बधले नाही. आडमुठ्या बायको पोरापुढे त्याचेकाही चालले नाही. चांगदेवाचे वयही आता वार्धक्याकडे झुकले होते. त्याला शेतातली कामे होत नव्हती. तर अंगदला काम जमत नव्हते. घरात खाणारी तोंडे ढीगभर अन काम करणारे हात थकलेले. परिणामी बकुळावर राग निघू लागला. बकुळा ही अगदी गुणवान पोर होती पण काय नशीब घेऊन आली होती देव जाणे. तिच्या माहेरी देखील तिने अफाट काबाडकष्ट केलेले. शिक्षण जेमतेम झालेले पण वकूब फार होता तिच्या अंगात. फार इमानी अन खानदानी पोर होती ती. डोई वरचा पदर तिने कधी ढळू दिला नाही की कधी तिने नवरयाच्या,सासूच्या चहाड्या चुगल्याकोणाला सांगितल्या नाहीत. बकुळेचा काशीवर मात्र भारी जीव होता. काशी म्हटला तर तिचा पोरगा होता, म्हटला तर भाऊ होता अन लहानगा मित्रही होता. दोघांनाही छळ सोसायचे वाट्याला आल्याने दोघांची एकमेकावर अपार माया होती. काशीला उपाशी राहावे लागले तर हिला घास जायचा नाही अन बकुळेला मारहाण झाली तर वळ याच्या काळजावर उठायचे.

रामप्रहरी उठून शेणाचे सारवण करून चुल पेटवण्यापासून बकुळेचा दिवस उजाडत असे.तिच्या लहानग्या नणंदा,शकु,शकूची बहिण कांता,अंगद, काशी अन चांगदेवआबा या सर्वांचा स्वयंपाक करून ती पोटासाठी किसन पवारांच्या मळ्यात कामाला जायची. दिस डोईवर आला तरी तिच्या पोटात अन्नाचा कण पडलेला नसे.दुपारी कोरभर भाकरीच काय ती तिच्या वाट्याला असायची.सकाळीच घरातून बाहेर पडणारे चांगदेव पाटील कधी कधी ती ज्या मळ्यात कामाला जायची तेथे भर दुपारी रणरणत्या उन्हात चालत जायचे, कधी तिला लांबून न्याहाळायचे, सदरयाने डोळे पुसत तिथूनच बघायचे. कधी कधी राहवले नाही तर ते तिच्या जवळ जायचे.तिचे हातहातात घेऊन पोरी मालां माफ कर म्हणून धाय मोकलून रडायचे. आपला हतबल झालेला म्हातारा सासरा आपल्यासाठी अश्रू ढाळतो याचे तिला अजून दुःख व्हायचे. आजूबाजूचे लोक बघू लागलेकी ती ओशाळून जायची. अन त्यांच्या सुरकुतलेल्या गालांवरून हात फिरवूनत्याना शांत करायची. आपले पाण्याने डबडबलेले डोळे असून ती त्यांचे डोळे पुसायची.पांडूरंगाची आण घालायची, स्वतःसाठी आणलेली भाकरी त्याना खाऊ घालायची.
दिवसामागून दिवस गेले. बकुळेच्या संसारवेलीवर फुले उमलली. तिला एक वर्षाच्या पाळण्याच्या अंतराने चार वर्षात दोन मुली अन एक मुलगा झाला. कूस उजव्ल्यावर तरी नवरा बदलेल अशी एक भाबडी आशा तिला होती. पण ती देखील फोल ठरली. अंगद अन त्याची सावत्र आई शकु यांच्या वागण्यात काहीच फरक पडला नाही. घरात आता खाण्या पिण्याची आबाळ फारच वाढली.चांगदेवाने शेत खंडकरयाला देऊन टाकले तो जे काही धान्य देईल तेव्हढेच पोटाला होऊ लागले. पैशाची चणचण तर आहे पण शाळा सोडायची नाही अशा कोड्यात काशिनाथ अडकला होता त्याने शाळा सोडावी अन काम धरावे म्हणून घरात त्याचा छळ वाढला. यावर उपाय म्हणून बकुळेने नामी शक्कल लढवली अन त्याला तालुक्याच्या गावी सरकारी आश्रमशाळेत पाठवले.

काशिनाथ घरातून आश्रमशाळेत गेला तसे बकुळेचे दिवस अजून फिरले. आता तर तिला धीर द्यायला तिचा लाडका काशी देखील घरात नव्हता. बकुळेने काशीला घराबाहेर पाठवले याचा प्रचंड संताप आलेल्या शकुने तिला मारहाण करायला सुरुवात केली. उपाशी ठेवून तिला खोलीत कोंडले जाउ लागले. तिच्या लेकरांसमोर तिला गुरासारखे मारले जाऊ लागले. कधी कधी तर तिच्या चिमुरड्या मुलाना देखील उपाशी ठेवले जाऊ लागले तेंव्हा मात्र तिचा धीर सुटला. ती धाय मोकलून रडायची, तिच्या घराच्या भिंतीनादेखील तिच्या ओक्रोशाने तडे गेले असावेत असे कधी कधी वाटायचे. तिच्या माहेरहून कधी कधी तिचा भाऊ यायचा त्याच्या डोळ्याला जे चालले होते काय ते उमगले. पण त्याची आर्थिक बाजू आधीच कमजोर असल्याने बकुळा त्याच्याबरोबर घरचा उंबरठा ओलांडून माघारी गेली नाही, आई वडील अन भाऊ बहिणी यांच्यावरजीवापाड प्रेम करणारी बकुळा आता फक्त तिच्या चिमुरड्यासाठी जगत होती.कधीकधी कोणी शेजारी बकुळेच्या बाजूने मध्ये पडलाच तर अंगद त्याला असा बडवून काढायचा की पुन्हा कोणी मध्ये पडण्याची बिशाद करत नसे. एकदोनदा सरपंच अन कोतवालाने देखील अंगदलाचार गोष्टी सांगायचा प्रयत्न केला पण मुळातच त्याचे मडके कच्चे असल्याने त्याच्याटाळक्यात काही उजेड पडलाच नाही.
बकुळेच्या दुर्दैवाचे मात्र अगदी दशावतार झाले होते. तिच्या अंगाचे पार पोतेरे झाले होते. अंगाचा हाडाचा सापळा झाला होता. दोन तीन ठिकाणी शिवलेले धडूते तिच्या अंगाला असायचे ते देखील कोठे तरी फाटलेलेच. चेहरयाची पार रया गेलेली. डोळे खोल गेलेले,त्याखाली काळी वर्तुळे. मूर्तिमंत कारुण्याची झाक तिच्या डोळ्यात असायची. लंकेची पार्वती होती ती, गळ्यातल्या काळ्या मण्याची माळ सोडली तर तिच्या अंगावर काहीच नव्हते. केसाला कधी तेल नाही की कुठला साज शृंगार नाही. सदैव भीतीच्या छायेत वावरून कपाळावर अकाली आठ्यांची नक्षी तयार झालेली. बकूळेच्या मुलामुलींची कथादेखील काही वेगळी नव्हती. चांगदेवाने खंडाने दिलेले रान ते किती अन त्याचा खंड तरी किती ? बकुळा कमवणार तरी किती ? काहीच मेळ बसत नव्हता, तरी पण दिवस कसे तरी चालले होते. ती जगायचे म्हणून जगत होती. सुट्टीत काही दिवसासाठी गावाकडे आलेला काशी हाच त्या द्रौपदीचा कृष्ण होता. काशी हाच तिचा आधार होता, तिला आता एकच आशा होती की आपले आयुष्य तर असेच जाणार यात काही शंका नाही पण काशी चार पुस्तके शिकून मोठा होईल.तोच आपल्या लेकरांवर मायेची पाखर घालेल मग आपला जीव मोकळा होईल. काशी होताही तसाच,मायाळू तो बकुळेच्या पोरांवर खूप माया करायचा.सुट्टी संपल्यावर आश्रमशाळेकडे परत निघताना तो साऱ्यांना उराशी धरून कवटाळून आपले मन मोकळे करायचा.जड पावलांनी घराला निरोप द्यायचा.

असेच काही दिवस गेले. पावसाळी दिवस होते. रात्रंदिवस काम करून थकलेल्या बकुळेला रात्रीचेच पाच सहा तासच काय ते पाठ टेकण्यासाठी वाट्याला यायचे. ती रात्रच वेगळी होती. सुंसुं करून वाहणारा सोसाट्याचा वारा अन जोडीला भुरभुरू पाउस यांनी बाहेर काळ्याकुट्ट अंधारात फेर धरला होता. त्या दमलेल्या रात्री बकुळेला खोलीत सुरु असलेल्या वेगवेगळ्या हालचाली अन दबक्या आवाजातली कुजबुज यांनी जाग आली.तिने कान टवकारले तसे शकु अन अंगदचे बोलणे तिच्या कानी पडले अन तिच्या काळजाचे पाणी पाणी झाले. ते तिला जीवे मारायची तयारी करत होते.तिचे सर्वांग घामाने डबडबले. तिची चिमणी पाखरे तिने उराशी घट्ट कवटाळली. फाटक्या कपड्यातली तिची पोरे तिला अधिकच बिलगली तशी तिच्याडोळ्यातून झरा वाहू लागला. मनोमन तिने देवाचा धावा सुरु केला. पण पांडूरंगाला काही तिची दया आली नाही. देव देखील कधी कधी जगभराचा कडूपणा अंगात आल्यावानी करतो म्हणतात ते बकुळेच्या बाबतीत लागू पडत होते. नेमक्या त्याच वेळेस घराबाहेर पडवीत असलेले जुने चिंचेचे झाड त्या रात्री एकाएकी मोठा आवाज करत उन्मळून पडले. त्या आवाजासरशी सारी आळी जागी झाली अन अंगद अन शकुच्या योजनेवर पाणी फिरले. ते सर्वच जन उठून घराबाहेर आले.

दुसरा दिवस उजाडला. त्या दिवशी बकुळेचे चित्त स्थिर नव्हते, ती अगदी सैर भैर झाली होती.तिने लगबगीने घरातली कामे आटोपली अन ती तिच्या दोन मुली अन मुलाला बरोबर घेऊनच कामावर निघाली. तिच्या मनात विचाराचे काहूर माजले होते. आपल्या जीवाला काही बरे वाईट झाले तरआपल्या मागे आपल्या चिमणी पाखरांचे काय होणार या विचाराने तिच्या पायातले बळ निघून गेले होते. तिने कामावर जायचा रस्ता सोडला अन त्यांच्या तळ्याकडच्या शेताकडे ती निघाली.नवरयाने कधी कष्ट न करून घाम न गाळलेली ती बरड जमीन जवळ आली तसे मात्र तिचे पाय जडझाले. गावापासून दोन चार कोस अंतरावरचे ते शेतापर्यंत पायी चालताना ती घामेघूम झाली होती. कडेवर लहानगा मुरली होता. तर छकुली अन सोनु या मुली तिच्या बरोबर अक्षरशः फरफटत याव्यात तशा आल्या होत्या. वाटेत कोणी विचारले तर पंचाईत नको म्हणून कोणाच्या वस्तीवर घोटभर पाण्यासाठी देखील ती माउली थांबली नाही. रात्रीच्या भुरूभुरू पावसाने वाटेत कुठे थोडा चिखल होता तर कुठे रान हडकले होते. झपाटल्यागत चालून चालून ते सारे जण अखेर शेतात पोहोचले. आईने इकडे कुठे आणले म्हणून लेकरे कावरी बावरी झाली होती. तिने तिच्या सातेक वर्षाच्या सोनुला जवळ घेतले. मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला अन तीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. ‘आपण कधी मुलाबाळाचे लाड करू शकलो नाही त्याना सुखाचे दोन घास भरवू शकलो नाही कधी अंगाला छान कापड दिले नाही’ याचा सल आयुष्यात पहिल्यांदा तिने त्या लेकरांसमोर बोलून दाखवला. ‘मी तुम्हाला आनंदात जगवू शकले नाही पण माझ्या मागे तुमची परवड होऊ नये म्हणून मी तुम्हाला कायमचे माझ्या बरोबर घेऊन जाणार आहे माझ्या तान्हुल्यांनो..मी मरून तुमच्या पोटी येईन तेंव्हा तुम्ही माझ्यावर माया करा, माझ्या सारखे कठोर होऊ नका. मला माफ करा रे माझ्या वासरांनो’ असे म्हणून तिने हंबरडा फोडला तेंव्हा वारा देखील थांबला. झाडे शोकमग्न झाली, पाखरे शांत झाली.सारे कसे थिजून गेले. त्या खडकाळ शेतात, निर्मनुष्य भागात आलेली ती मुले आईच्या रडण्याने अजूनच घाबरली अन ती देखील रडू लागली. तिने मनाचा हिय्या करून सोनूच्या कानात कुजबुज केली तसा त्या किशोरवयीन मुलीचा चेहरा पांढरा फटक पडला. एक क्षण ती दचकली पण आईच्या आभाळमायेने ती देखील झाकोळून गेली होती. तिने तिची दोन्ही भावंडे एकदाघट्ट उराशी घेतली अन आईला म्हणाली, “मी तयार आहे”. आता बकुळेला वेळ दवडून चालणार नव्हते, तिने काळजाचा पहाड केला अन तिने लुग्ड्याचे पटकूर फाडून लहानग्या मुरलीच्या डोळ्याला बांधले. आंधळीकोशिंबीर खेळायची असे सांगत त्याला घट्ट कवटाळून ती त्याला कडेवर घेऊन पुढे निघाली अन विहिरीजवळ येऊन थांबली. त्यांच्या पायातल्या पार चिंधड्या उडालेल्या चपला तिने वर काठावर काढून ठेवल्या.

एका क्षणासाठी आई,वडील,भाऊ,बहिण अन काशी सगळे तिच्या डोळ्यापुढे तरळून गेले अन तिने विहिरीत उतरायला सुरुवात केली.विहीर चांगली सहा परस खोल होती. वरती दोनेक परस उंचीपर्यंत दगडी घडीव बांधणी होती. त्यानंतर तळापर्यंत ताशीव गोलाकार कडे होते. उतरत्या पायऱ्यांची एक गोल चक्कर झाल्यावर खाली पांढुरके पायटे होते. पावसाळी दिवस असल्याने पाणी बरयापैकी होते. तिसरया पायटयाशी ती आली. तिने आधी लहनग्या मुरलीला जमेल तितके मागे सरकवून खाली ओलसर पायटयावर बसवले. तिने दोन्ही मुलींना परत एकदा डोळे भरून पाहिले अन अंगावरच्या फाटक्या लुगड्याचे परत तुकडे केले अन त्या कापडाने मुलींना आपल्या दोन्ही बाजूला करकचून आवळून कंबरेला बांधले. इतक्या वेळ भांबावून गेलेली अन घाबरलेली मधली मुलगी छकुली आता मात्र बिथरली. ती किंचाळू लागली, तसा एव्हढा वेळ शांत असलेला मुरलीही रडू लागला. त्यांची रडणे बघून बकुळाच्या काळजाचा ठाव लागेनासा झाला. ‘उगी उगी रहा बाळांनो’ असे म्हणत तिने कसेबसे वाकून मुरलीला उचलून घेतले. त्याला घट्ट कवटाळले, एकदा आकाशाकडे डोळे भरून पाहिले अन पुढच्याच क्षणी तिने स्वतःला पाण्यात झोकून दिले.
काही क्षण त्या विहिरीत त्या माय लेकरांच्या आवाजाचा काळकल्लोळ माजला. बकुळेला पोहायला येत होते. पण घाबरलेल्या मुलींनी तिच्या गळ्याला घट्ट आवळले. त्यांचे अश्रू पाण्यात विरघळत गेले आणि किंकाळ्यानी विहीर देखील रडू लागली, तिच्या झरयाचे पाझर वेगाने वाढले. दमलेले, भुकेजलेले, तहानलेले, कोमेजलेले ते अभागी जीव एकमेकाला मिठ्या मारलेल्या अवस्थेत विहिरीच्या तळाशी गाळापर्यंत आले अन एकदाचे शांत होऊन विहिरीच्या कुशीत निजले.

संध्याकाळ झाली तरी बकुळा घरी आली नाही याचे अंगद वा शकुला काही वाटले नाही. पण म्हातारया चांगदेवाच्या काळजाचा ठोका चुकला. का कोणास ठाऊक पण त्याला एकदम भीतीची एक अनामिक लहर चाटून गेली. सून कामावर जाताना पोरे घेऊन गेली अन दिस मावळून अंधार पडायला लागला तरी परतली नाही म्हणून चिंतेत पडलेल्या चांगदेवाने किसनभाऊच्या मळ्याकडे धाव घेतली.चांगदेव तेथे जाईपर्यत सार अंधारून आले होते. बकुळा आज कामावरच आली नाही ही माहिती ऐकूनच त्याच्या काळजात धस्स झाले. पडल्या चेहऱ्याने तो घरी आला. ‘ती कुठे जातीय, येईल सकाळ उजाडली की आपल्या घरी परत’ असे घरी आल्यावर ऐकायला मिळाले. त्या रात्री नातवांच्या आठवणीने त्याचा जीव व्याकुळ झाला अन उपाशी पोटी त्याने रात्र कशीबशी काढली.सकाळ झाली. त्यासरशी म्हातारा चांगदेव ह्या सगळ्यांचा शोध घ्यायला बाहेर पडला.पण अंगद अन शकुला घाम सुद्धा फुटला नाही. एव्हाना गावभर बातमी पसरली होती.

इकडे विहीर शांत झाली होती, आसमंतात एक भयाण नीरव शान्तता पसरली होती. नेहेमीप्रमाणे गावातली काही गुरे पाझर तळ्याकडे चरायला घेऊन आणणारा म्हादू गुराखी देखील इतर गावकरयाप्रमाणे बकुळेच्या बद्दल पेचात पडला होता. गुरे चरत चरत विहिरीच्या दिशेने गेली. आजूबाजूला गवताचे पाला पाचोरा खात खात ती सगळे जनावरे तिथे येऊन स्तब्ध होऊन उभारली. पाखरांचा आवाज नाही की पानाची सळसळ नाही सारे कसे शांत होते, बरयाच वेळापासून विहिरीजवळ काहीही न खाता नुसतीच उभी असलेली गुरे बघून म्हादुlaला कसेसेच वाटले. तो पुढे गेला. विहिरीच्या काठाशी पडलेल्या त्या फाटक्या चपला बघून त्याचे काळीज पिळवटून गेले. गुरे तेथेच टाकून तो चांगाच्या शेताच्या एकदम आदल्या अंगाला असलेल्या रावताच्या वस्तीवर पळत पळत गेला. त्याने तेथे विहिरीचे दृश्य सांगितले.

सारया गावात वारयावर उडणाऱ्या शेवरीसारखी बातमी पसरत गेली. अख्खा गाव विहिरीजवळ गोळा झाला. बाभळीच्या मोठाल्या फांद्या तोडून आणून मोठ्या दोरखंडाला बांधल्या. त्या बाभळी विहिरीत सोडून ओढल्या जाऊ लागल्या. काही तरणी पोरे विहिरीत उतरली, एक दोन डुबक्या त्यांनी मारल्या. त्यातला एकजण पार तळाला जाऊन परत वर आला. त्याने ओरडून तळाशी चौघेजण असल्याचे सांगितले अन काठावर असलेल्या बायकांनी एकच हंबरडा फोडला.त्याने सांगितलेल्या दिशेने बाभळीचे फाटे विहिरीत सोडले आणि काही वेळ पाण्यात तशाच बाभळी राहू दिल्या. बाभळी वर ओढायला सुरुवात केली तशा त्या जड लागल्या, त्या बरोबर सर्व ताकद लावून बाभळी वर ओढायला सुरवात केली अन काही वेळातच त्या अभागी जीवांची कलेवरे वर आली.ते दृश्य हेलावून टाकणारे होते. ते बघून बायकाच काय गडी माणसे देखील ओक्साबोक्शी रडू लागली. एव्हाना बकुळेच्या माहेरावरून तिचे नातलग आले होते. आईच्या छातीशी मिठी मारून तिच्या कवेत विसावलेले ते लहानगे जीव पाहून बायका छाती बडवून घेऊ लागल्या. बकुळेची आई भोवळ येऊन पडली. तिच्या वडिलांची दातखीळ बसली अन भाऊ जागीच थिजून गेला. ते सगळे जीव वर काढले.त्यांचा पंचनामा करण्यात आला.त्याना तिथेच रानात अग्नी द्यायचे ठरले. दिवस मावळेपर्यंत काशिनाथ तिथे आला. त्याचे तर सारे विश्व होत्याचे नव्हते झाले होते. काशिनाथच्या हाताने त्या सर्वांना एकाच चितेवर अग्नी देण्यात आला.चांगदेवाने शकू अन अंगदला मात्र शेतात पाऊल सुद्धा टाकू दिले नाही.

असेच दिवस जात राहिले. एका भल्या सकाळी काकड आरतीला गेलेल्या चांगदेवाला देवळाच्या पायरीवरून पडल्याचे निमित्त झाले अन आधीच हाय खाल्लेल्या चांगदेवाने काही दिवसातच अखेरचा श्वास घेतला. इकडे बकुळेच्या भावाने कोर्टात केस केली अन त्याच्या चकरात तो पुरता गुतला. त्यापायी त्याने त्याचे पाच सहा गुंठे रान विकले. पण एके दिवशी कोर्टाहून येताना झालेल्या एसटीच्या अपघातात एकटा अंगदच डोक्याला, हातापायाला मार लागून गंभीर जखमी झाला. तिथून त्याचे दिवस फिरले. तो भ्रमिष्टासारखा वागू लागला. काही महिन्यातच तो झिझून झिझून खरडून खरडून मेला. आपले कोर्ट खटल्याचे आणखी पैसे वाचले अन परमेश्वराने त्याला शिक्षा दिली म्हणून बकुळेच्या भावाने सुटकेचा निश्वास सोडला.

तोवर चांगदेव पाटलाचे शेत कुप्रसिद्ध झाले होते. तिकडे कोणीही फिरकत नव्हते. खंडकरयाने खंड अर्ध्यातच सोडून रान टाकून दिले. त्या विहिरीतून रडण्याचे आवाज येतात, मुलीच्या रडण्याचा अन तान्ह्या बाळाच्या विव्हळण्याचा आवाज येतो अशी वदंता सर्वत्र झाली. कोणी म्हणायचे की बकुळा रात्रभर विहिरीबाहेर येऊन बसते. ती अजूनही तेथेच आहे अस लोक बोलायचे. तळ्याचे पाणी सुद्द्धा नन्तर कालमानाने कमी झाले. विहीरही कोरडी पडली.तिचे सारे झरे कोरडे पडले. तिचा कोरडा दगडी तळ उघडा झाला. विहिरीतले पारवे निघून गेले. आजूबाजूला होती नव्ह्ती ती सारी झाडे झुडपे सुकून गेली, जणू काही त्यांनी देखील बकुळेच्या दुःखात सामील होऊन आपला प्राणत्याग केला होता. एकंदर त्या सारया परिसराची रया गेली होती.काशिनाथ कधी कधी तिथे येऊन तासनतास बसायचा, रडायचा. त्याला भीती वाटत नसे.

शिक्षण पूर्ण झाल्यावर काशीला नोकरी लागली.गावात आता त्याचे येणे क्वचित होऊ लागले.एके दिवशी वर्तमानपत्रातली जाहिरात वाचून त्याने त्याच्या शेतजमिनीतला दोनेक एकराचा भाग मुलींच्या वसतीगृहासाठी एक पैसाही न घेता तशीच देऊन टाकली.
काशिनाथ जो एके काळी आश्रमशाळेत राहिला होता त्याने स्वतःच्या शेतात आता ग्रामीण भागातल्या मुलींच्यासाठी स्वतःच्या शेतातली जमीन फुकट दिली होती. त्यासाठी बोअर मारून दिली. त्या आश्रमशाळेच्या निमित्ताने तो पुन्हा शेतात आला. त्याच्या हाताने त्याने दोन पाट्या माती त्या विहिरीत टाकली अन विहीर बुजवायला सुरुवात झाली. त्या दिवशी तो लहान मुलासारखा ढसाढसा रडला.

आता तेथे मुलींसाठी एक टुमदार निवासी सरकारी आश्रमशाळा उभी राहिली. तेथे कोणालाही कसलेही आवाज येत नाहीत वा भासही होत नाहीत. मुली अगदी आनंदात तिथे राहतात.
त्या सर्व परिसरात काशिनाथने लावलेली बकुळेची झाडे आता जोमात आली आहेत.ती सर्व झाडे बारमाही फुले देतात अन काशिनाथ इकडे जर्जर झालेल्या शकुंतलेला घेऊन शहरात राहतोय. तिच्या मुलींची त्याने लग्ने देखील लावून दिलीत. शकुंतला नावालाच जगत्येय पण ती प्रत्येक क्षण मृत्यूसाठी तडफडत्येय. आपल्याला जन्मभर छळलेल्या सावत्र आईला काशी आनंदाने सांभाळतो आहे.त्याने एक स्वतंत्र घर देखील बांधले आहे.

आणि हो, त्याच्या घराच्या अंगणात देखील बारमाही फुलणारे बकुळेचे सदाबहार झाड आहे.

- समीर गायकवाड .

http://sameerbapu.blogspot.in/2015/04/blog-post_59.html

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाप रे Sad

आई ग ... ! Sad

असले काही वचायला अजिबात आवडत नाही..
रोजच्या बातम्या मधे पण अश्याच २-४ बातम्या असतात..कोणाला काही फरक पडत नाही. वाचायचे आणि विसरायचे अश्या कित्येक बकुळा आल्या आणि गेल्या पुढे ही किती एक होणार गिनती नाही..
उगाच वाचायचे आणि मन खराब करायचे त्या पेक्षा अच्छे दिन किंवा बेटी बचाओ जाहिराती वाचलेल काय वाईट