पुण्याच्या जंक्शनवर फेरफटका

Submitted by पराग१२२६३ on 25 May, 2016 - 05:07

बरेच दिवसांनी पुणे जंक्शनवर सहजच गेलो. कोणत्याही रेल्वे स्टेशनवर जाणे आणि तिथे चाललेल्या सगळ्या रेल्वेविषयक घडामोडींमध्ये रममाण होणे हा तसा माझा छंदच. यातून मिळणारा आनंद काय हे कसे-कसे सांगायचे माहीत नाही. अलीकडे श्रमपरिहार म्हणून पुण्याच्या स्टेशनवर जाणे बरेच दिवस झाले नव्हते. परगावी जाण्याच्या निमित्ताने जाणे झाले, पण फेरफटक्यासाठी म्हणून झालेले नव्हते. म्हणूनच जरा मोकळा वेळ मिळाल्यावर पुण्याच्या जंक्शनवर जाण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय घेण्यामागे कारणही तसेच होते. निजामुद्दीन-पुणे दरम्यान नवी वातानुकुलित एक्सप्रेस त्या दिवशी सुरू होणार होती. म्हणून त्या गाडीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने जाऊ असे ठरवले.

शिवाजीनगरहून लोकलने पुणे स्टेशनला जायला तिकीट काढून आत गेलो, तर डाऊन दिशेचा स्टार्टर यलो दिसला. वळण असल्याने थोडे पुढे गेल्यावर लांबून निळ्या रंगाच्या इंजिनाचा आणि संपूर्ण गाडीची रेष येताना दिसला. म्हटले आली १७०३१ छत्रपती शिवाजी टर्मिनस-हैदराबाद एक्सप्रेस. मी त्या स्टार्टरकडे बघतच होतो की, डबल-यलो होतोय का, पण नाही झाला. तोपर्यंत हैदराबादने शिवाजीनगरचा होम सिग्नल क्रॉस केला होता. स्टार्टर सिग्नल यलो होता म्हणून होम सिग्नल डबल-यलो होता. त्यामुळेच लोको पायलटने हैदराबादचा वेग जरा कमी करायला सुरुवात केलेली होतीच. अशातच वेग कमी ठेऊन गाडीने शिवाजीनगरचा डाऊन स्टार्टर क्रॉस केला. दरम्यान दोन्ही लोको पायलट्स, गार्ड आणि स्टेशन उपप्रबंधक आणि तिकडच्या प्लॅटफॉर्मवर असलेला पॉईंट्समन यांनी प्रोसिड सिग्नल्सची देवाणघेवाणही केली. शिवाजीनगरचा डाऊन स्टार्टर एकाचवेळी स्टार्टर, शिवाजीनगरचा डाऊन ॲडव्हान्स्ड स्टार्टर आणि पुण्याचा डिस्टंट अशा भूमिका बजावत असतो. पुणे आणि शिवाजीनगरमधले अंतर बरेच कमी असल्यामुळेच पुण्याच्या होमचा ॲस्पेक्ट लाल असल्यामुळेच इकडे स्टार्टर यलो राहिला होता. माझी लोकल यायला अजून तासभर असल्यामुळे मी गाड्या बघत थांबलो होतो. हैदराबादपाठोपाठ पुण्याला जाणारी लोकल येऊन गेली. पण मी पुढच्या लोकलने जाणार होतो. दरम्यान, एक बीसीएन वाघिणींची मालगाडी थोडा वेळ डिटेन करून पुण्याकडे सोडली गेली आणि दुसरी येऊन डाऊन मेन लाईनवर थांबली. कारण मागून येणाऱ्या लोकलला मार्ग उपलब्ध करून द्यायचा होता आणि त्याचवेळी पुण्यात गाड्यांची गर्दी झाल्यामुळे या मालगाडीला थोडावेळ शिवाजीनगरमध्ये विसावा देणे आवश्यक झाले होते. त्यामुळे पुण्याहून सेक्शन कंट्रोलरने शिवाजीनगरच्या स्टेशन उपप्रबंधकाला या गाड्या थोडा वेळ थांबवून ठेवण्याचा आदेश दिला होता. बीसीएन वाघिण्यांना घेऊन आलेला लालागुडा शेडच्या टिपिकल हिरव्या रंगातला डब्ल्यूएजी-९ हा भारतीय रेल्वेवरील सर्वांत शक्तिशाली अश्व डाऊन स्टार्टरजवळ येऊन थांबला. पण मागे शेवटची गार्ड कॅब फाऊलिंग मार्कच्या बाहेर जात असल्यामुळे गार्डच्या सांगण्यावरून लोको पायलटने गाडी हळूच थोडीशी पुढे नेऊन थांबवली.

WP_20160524_17_32_51_Pro.jpg

आता माझ्या लोकलची वेळ झाली होती आणि चार मिनिटांत ती आलीही. इतका वेळ जामे स्वाभाविकच होते. कारण ॲबसोल्यूट ब्लॉक सिस्टीम असल्यामुळे मालगाडी शिवाजीनगरच्या डाऊन होम सिग्नलच्या पुढे ॲडिक्वेट डिस्टंटपर्यंत जाईपर्यंत मागे लोकलला खडकीहून निघण्यासाठी लाईन क्लिअर मिळणार नव्हती.

लोकल आली आणि निघालीही. पुढे पुण्याकडे जाताना होम सिग्नल क्रॉस केला आणि मुळा-मुठेचा संगम पूल ओलांडत इंटरमिडिएट होम सिग्नलला येऊन थांबलो. हे तर पुण्याचे वैशिष्ट्यच झाले आहे. लोणावळ्याच्या दिशेने आत येणारी कोणतीही गाडी लगेच आत फलाटावर गेली आहे असे गेल्या कित्यंक वर्षांमध्ये झालेले नाही. या सिग्नलला प्रत्येक गाडी रखडतेच. सिग्नलच्या शेजारी असलेल्या पिट लाईन्स, त्याच्या पुढची इलेक्ट्रीक लोको ट्रीप शेडमुळे इथून पुढे क्रॉस ओव्हर्स बरेच आहेत. त्यामुळे तिकडून गाडी येऊपर्यंत शंटींगसाठी रूट सेट केला की, तेवढ्यात तिकडून आलेल्या गाडीला इथे थांबावे लागतेच. तसेच आमच्या लोकलचे झाले. पण आ परिस्थिती वेगळी होती. ज्या नव्या गाडीच्या उद्घाटनासाठी आज मी जात होतो, निजामुद्दीनहून पुण्यात कधीच आलेली होती आणि आता आमच्या लोकलच्या शेजारच्या एका पिट लाईनवर ती डागडुजीसाठी (सेकंडरी मेंटेनन्ससाठी) उभी होती. उजवीकडे असलेल्या एका स्टॅब्लिंग लाईनवर जम्मुतावीहून आलेली झेलम एक्सप्रेस उभी होती. तिला उद्या संध्याकाळपर्यंत नव्या प्रवासाला जायचे असल्यामुळे वेळ बराच होता. प्रवासासाठी तयार होण्याची तिला आता काहीच ग़बड नव्हती. म्हणूनच मग आज रात्री निघणाऱ्या नव्या आणि विशेष वातानुकुलित एक्सप्रेसला झेलमच्या आधी पिटलाईनवर घेण्यात आले होते. त्यातही झेलमला जास्त (२३) डबे असल्यामुळे तिच्या प्रायमरी मेंटेनंसचे काम मुंबई एंडच्या पिटलाईनवरून आता घोरपडीकडच्या नव्या पिटलाईनवर शिफ्ट करण्यात आलेले आहे.

WP_20160205_12_55_17_Pro.jpg

लोकलच्या दरवाज्यातून पुढे पाहिले तर, आमच्याच लाईनवर आमच्या लोकलच्या आधी पुण्याकडे गेलेली मालगाडी उभी होती. त्या मालगाडीने पाच-सहा नंबरच्या प्लॅटफार्मवर जाण्यासाठीच्या मार्गाचा पॉईंट (सांधा) अडवून धरल्यामुळे आता ती जोपर्यंत पुढे सरकत नाही, तोपर्यंत आमच्या पुढे लाल होऊन बसलेला हा इंडरमिटीएट होम सिग्नल ऑफ (पिवळा) होणार नव्हता. आणि तो इतक्यात ऑफ होणारही नव्हता. कारण तिकडून १२१३५ पुणे-नागपूर एक्सप्रेसला लाईन क्लिअर देण्यात आलेली होती. ती सुपरफास्ट श्रेणीतील असल्यामुळे ती दौंडकडे निघून गेल्याशिवाय या मालगाडीबाई पुढे सरकू शकणार नव्हत्या. मालगाडीला इंटरमिडीएट स्टार्टरद्वारे डाऊन मेनलाईनवर रोखून ठेवण्यात आले होते. 'नागपूर' पुढे गेल्याशिवाय मालगाडीच्या मार्गाचे पॉईंटस् सेट होणार नव्हते आणि इंटरमिडीएट स्टार्टर ऑफ होणार नव्हता. कारण या दोन्ही गाड्यांचे मार्ग एकमेकींना छेदत होते. आधीच १५ मिनिटे लेट असलेली आमची लोकल आणखी १५ मिनिटे इंटरमिडीएट होमला डिटेन झाली होती. नागपूर पुढे गेल्यावर मालगाडीही पुढे सरकली आणि आम्हालाही प्लॅटफॉर्मवर जाण्याची परवानगी मिळाली. दरम्यान, इलेक्ट्रीक ट्रीप शेडमध्ये विसावा घेत असलेली सात-आठ इंजिनांवरही नजर टाकली, तर त्यात नव्या निजामुद्दीन-पुणे वातानुकुलित एक्सप्रेसबरोबर आलेला बडोद्याचा डब्ल्यूएपी-५ (क्र. ३००६४) हा भारतीय रेल्वेवरील सर्वांत वेगवान पांढरा कार्यअश्व सामील होता. या कार्यअश्वाला आज रात्री याच गाडीबरोबर निजामुद्दीनपर्यंत परतीचा प्रवास करायचा असल्याने त्याची तब्येत तपासण्याचे काम तिथे चालू होते. सेकंडरी मेन्टेनंसच इथे पाहिला जाणार असल्यामुळे त्याची तब्येत त्या मानाने लवकर तपासून होणार होती. शेडच्या दुसऱ्या बाजूला बडोद्याहूनच आलेला आणखी एक डब्ल्यूएपी-५ कार्यअश्व (क्र. ३००६३) शांत झोपी गेलेला होता. पुढची ड्युटी मिळेपर्यंत तो करूही काय शकणार होता? बाकी सगळे कार्यअश्व कल्याणचे डब्ल्यूसीएएम-२ आणि ३ या प्रकारातले होते. नागपूर गेल्यामुळे मोकळ्या झालेल्या सहा नंबरवर लोकल पोहचली तेव्हा बाहेरून आत येणाऱ्यांचा रेटा इतका होता की, ते आम्हाला बाहेर उतरूही देईनात. कसेबसे त्यातून बाहेर पडलो.

खाली उतरलो तेव्हा, सहावर आमची लोकल, पाचवर १२१५७ पुणे-सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस तिच्या पुण्याच्या डब्ल्यूडीजी-३ए या कार्यअश्वासह तयार होती. चारवर छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई- चेन्नई सेंट्रल एक्सप्रेस कल्याणच्या डब्ल्यूडीजी-३ए (शक्ती) कार्यअश्वासह येणार होती. तीनवर १६५०८ बेंगळुरू-जोधपूर एक्सप्रेस थोड्याच वेळात येणार होती. दोनवर १२१७० सोलापूर-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस येत होती आणि तिच पुढे २२१०६ पुणे-छत्रपती शिवाजी टर्मिनस इंद्रायणी एक्सप्रेस म्हणून जाणार होती. एकवर १२१२९ पुणे-हावडा आझाद हिंद एक्सप्रेस घोरपडीच्या पिटलाईनवरून आणली जात होती. त्याचवेळी सगळे डॉक्यूमेंटेशन आटपून हुतात्माचे दोन्ही लोको पायलट आणि गार्ड लाईन क्लिअर मिळण्याची वाट पाहत होते. गेल्या दोन-एक महिन्यांमध्ये त्या कार्यअश्वाचे पीओएच (पिरिऑडीकल ओव्हरहॉलिंग) झालेले असावे. त्यामुळे चांगल्या रंगातला तो कार्यअश्व तरतरीत वाटला. बऱ्याच दिवसांनी पुण्याचा इतका स्वच्छ, चकचकीत एखादा कार्यअश्व पाहून बरे वाटले. मी दुसऱ्या फलाटावरून त्या गाडीच्या पुढे पोहचलो आणि मिनिटाभरातच पुण्याच्या उप स्टेशन प्रबंधकाने सेक्शन कंट्रोलरच्या परवानगीने घोरपडीहून लाईन क्लिअर घेत हुतात्माला प्रवास सुरू करण्याची परवानगी दिली, स्टार्टर ऑफ (पिवळा) केला. हा सिग्नल रिटीपरच्या रुपात हुतात्माच्या गार्डला मागे दिसत होताच. काही क्षणातच गार्डनेही गाडी निघण्यासाठी तयार असल्याचा इशारा प्रवाशांना शिट्टीच्या रुपात दिला आणि हिरवा बावटा दाखवत लोको पायलटला निघण्यास सांगितले, तसे लोको पायलटला वॉकीटॉकीवरूनही सांगितलेच. तेव्हा या तरतरीत कार्यअश्वाने अगदी मधूर गर्जना केली आणि प्रवास सुरू केला. असिस्टंड लोको पायलट खिडकीतून बाहेर हिरवा बावटा धरून होताच. यादरम्यान प्रत्येक फलाटावर प्रवाशांची, त्यांना उत्साहाने सोडायला आलेल्यांची गर्दी होतीच.

(बऱ्याच दिवसांनी पुणे जंक्शनवर मारलेल्या फेरफटक्याची अजून अनेक निरीक्षणे आहेत, पण ते पुढच्या भागात.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जादुई दुनियेत फिरवून आणता तुम्ही!

तुमचे झुकझुकगाड्यांवरचे लेख स्ट्रेसबस्टर्स असतात. रिलॅक्स व्हायला होतं एकदम. त्यात आणि नीट लक्ष देऊन समजून घेत वाचावं लागतं त्यामुळे वाचताना माझी दर स्टेशनवर थांबणारी पॅसेंजर होते. रेल्वे यंत्रणेचं हे किचकट काम बघून थक्क व्हायला होतं. तुम्ही नेमका तो किचकटपणाच रंजक करून लिहिता.
बादवे, इतके तांत्रिक तपशील लिहिताना तुम्हालाही एकाग्रतेने लिहावे लागत असेल ना?

शिवाजीनगरहून लोकलनं, तेही एक तास थांबून पुणे स्टेशनला गेलात तुम्ही? Happy भारीच!
मी असते तर रुळावरून तशीच चालत सुटले असते.

भारी आहे लेख !
एखाद्या लेखात सगळ्या टेक्निकल टर्म्स, सिग्नलचे प्रकार, इंजिनांचे प्रकार, वेगवेगळ्या लोकांच्या जबाबदार्‍आ वगैरे समजावून सांगा.

मस्त लिहिता तुम्ही.. वेगळ्याच विषयावरच लेखन असत.

एखाद्या लेखात सगळ्या टेक्निकल टर्म्स, सिग्नलचे प्रकार, इंजिनांचे प्रकार, वेगवेगळ्या लोकांच्या जबाबदार्‍आ वगैरे समजावून सांगा.>>>>> +१

एखाद्या क्षेत्रावर प्रेम असावे तर असे ! मस्त लेख.

मागे अवचटांचा एक लेख वाचला होता. अर्थात त्यांचा भर माणसांवर होता. त्यांच्या लेखातला एक उल्लेख जरा वेगळा होता. कुठलीही गाडी पुण्यात येताना, दोन्ही बाजूला कर्मचारी उभे असतात. गाडीच्या चाकांची प्रत्येक जोडी नीट फिरतेय का हे ते बारकाईने बघतात ( कधी कधी एखादी जोडी न फिरता तशीच ओढली जाते. ) अजूनही असेच आहे का ?

एखाद्या लेखात सगळ्या टेक्निकल टर्म्स, सिग्नलचे प्रकार, इंजिनांचे प्रकार, वेगवेगळ्या लोकांच्या जबाबदार्‍आ वगैरे समजावून सांगता हरकत नाही. पण एक लेख त्यासाठी पुरेसा ठरणार नाही. म्हणून एकेका भागात त्यांची माहिती द्यावी लागेल. भविष्यात त्या दिशेने विचार करता येईल.

पराग भाऊ एक नंबर निरीक्षणे काढलीत तुम्ही! आवडली

@दिनेश दादा
मागे अवचटांचा एक लेख वाचला होता. अर्थात त्यांचा भर माणसांवर होता. त्यांच्या लेखातला एक उल्लेख जरा वेगळा होता. कुठलीही गाडी पुण्यात येताना, दोन्ही बाजूला कर्मचारी उभे असतात. गाडीच्या चाकांची प्रत्येक जोडी नीट फिरतेय का हे ते बारकाईने बघतात ( कधी कधी एखादी जोडी न फिरता तशीच ओढली जाते. ) अजूनही असेच आहे का ?

बहुतेक प्रत्येक मोठ्या स्टेशनवर ही टीम असते ती जिथे बसुन काम करते त्याला "रोलिंग आउट हट" असे म्हणतात, गाड़ी रोल आउट होताना म्हणजे स्टेशन बाहेर पड़ताना त्याची चाके किती फ्री आहेत ह्याचे एक शेवटचे चेकिंग करणे हे बहुदा त्यांचे काम असते.

चुभुदेघे

बरोबर न पराग भाऊ ? अर्थात जर दुर्दैवाने असा डिफेक्ट चाकांत दिसला तर पुढे काय करतात हे मात्र परागभाऊच सांगू शकतील

तुमचे भारतीय रेल्वेवरचे लेख नेहेमीच आवडतात. रेल्वेचा विषय निघाला की तुम्ही हमखास आठवता.

मध्यंतरी सैराट बघताना, म्हणजे अगदी बघताना नाही, पण नंतर तुमची आठवण आली. म्हणजे नंतर त्याबद्दल बोलत असताना (आफ्टरथॉट) वाटलं की तुम्ही असता तर त्या चित्रपटातल्या पण गाड्या कोणत्या इंजीन कुठलं या बद्दल तुम्ही तपशीलवार सांगू शकला असता. किंबहुना आता ही सांगू शकाल Happy

एरवी आम्ही जे हजारदा रेल्वेनी प्रवास केला होता तर ह्या अनुषंगानी काही विचारही मनात यायचे नाहीत बघणे तर दूरच पण आता एक वेगळीच नजर दिलीत तुम्ही रेल्वेकडे बघायची.

अनेकानेक धन्यवाद

सोन्याबापू जी, प्रतिक्रियेबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.
तुम्ही म्हटल्याप्रमाणे ज्या स्टेशनवर कोच मेन्टेनंस आणि रिपेअरिंगची सोय आहे, तिथे "रोलिंग इन अँड आउट हट" ची सोय असते. जेव्हा डब्याच्या चाकात डिफेक्ट दिसेल, तेव्हा "रोलिंग हट" मधले कर्मचारी वॅाकी-टाॅकीवरून स्टेशन मास्टरशी संपर्क साधतात. मग स्टेशन मास्टर गाडीचा रुट कँसल करून पुढचा सिग्नल लाल करतो, ज्यामुळे गाडी स्टेशनच्या बाहेर जाणार नाही. मग कॅरेज अँड वॅगन विभागाचे कर्मचारी प्रत्यक्ष डबा चेक करतात. दोष मोठा असेल, गाडी पुन्हा मागे फलाटावर आणून संबंधित डबा बाजूला काढून तिथे उपलब्ध असलेला पर्यायी डबा जोडून गाडी पुढच्या प्रवासाला जाते. यात वेळ जातो. चाकातला दोष "रोलिंग इन"च्यावेळी दिसल्यास वेळ थोडा कमी जातो.

.

>> मग मालिकाच लिहा. आमची अजिबात हरकत नाही. स्मित>>++१. एवढ्या टेक्निकल डीटेल्स वाचताना खुपच विचार करावा लागतोय. तुम्ही लेखमालिकेद्वारे ओळख करून दिलीत तर फार छान होईल.

पुणे स्टेशनवर तर माझे रोजचेच जाणे-येणे असते आता तुमचा लेख वाचल्या नंतर जास्त मजा येईल अनेक तांत्रीक बाबींचे निरिक्षण करता येईल.

लेखाबद्दल _/\_

तुमच्या लेखांनी रेल्वेकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन मिळतो. मात्र आम्हाला माहीत नसणार्या शब्दांचे अर्थ कळले तर वाचायला जास्त मजा येइल. उदा- स्टार्टर, डाउन स्टा र्टर, होम डबल यलो वगैरे.

मालिकाच लिहिलीत तर आम्हाला वाचायला नक्कीच आवडेल.

स्वीट टॉकर जी धनय्वाद. पुढच्या लेखात या शब्दांचा अर्थही सांगण्याचा प्रयत्न करेन

परागभौंचा लेख जबरदस्त आहेच. त्यांचा कुठलाही प्रवास किंवा फेरफटका माहितीत नवीन-नवीन भर घालणारा असतो. एवढंच की, तो बारकाईनं आणि निवांत वाचावा लागतो. त्यात काय बिघडलं मग?

छान लेख।

रेलवे बद्दल आणखीन लिहा। मी पुण्याला दोनदा गेलो। पहिल्यांदा अंबरनाथहून वरातीसोबत बसनी आलो व परतलो होतो।

तर दुसरया वेळेस पंढरपुरहून बसनी येऊन ट्रेन नी नगर पर्यंत गेलो होतो...स्टेशन नीट बघायला मिळाला नाही...कारण सर्कुलर टूर तिकिट होतं आमचं....