नस्त्या उचापती- 2

Submitted by अन्नू on 24 May, 2016 - 02:08

शनिवारचा दिवस.
संध्याकाळी मी नुकताच बाहेरुन आलो होतो. इतक्यात आईने- ताईचा फोन आल्याची बातमी दिली आणि त्याचबरोबर भाईंदरला जाऊन दोघा मुलांचा रिझल्ट आणण्याची आठवण पुन्हा करुन दिली. ऐकून जरा आनंद वाटला पण त्याचबरोबर थोडासा मुडही ऑफ झाला. आनंद यासाठी कि दोघांचा रिझल्ट एकाच दिवशी नव्हता. दोन वेगवेगळ्या दिवशी होता. म्हणजे अठ्ठावीस आणि एकोणतीसला. कारण भाचा सिनिअरला होता, तर भाची ज्युनिअरला! साहजिकच मला दोन दिवस भाईंदरमध्ये राहावं लागणार होतं. थोडक्यात- पुर्ण दोन दिवस भाईंदरमध्ये फक्त आपलंच राज्य, बिनधास्त!
आणि आता वाईट याच्यासाठी कि, एकटंच असल्यामुळं या राजाला स्वत:चं जेवण स्वत:च करायला लागणार असून, सगळी धुणीभांडी स्वत:च करावी लागणार होती! पण त्याला इलाज नव्हता. भाईंदरमधले सगळे गावाला गेले होते, त्यामुळे रिझल्टसाठी जावंच लागणार होतं. शेवटी हा ना करता-करता जायचं नक्की ठरलं. जायचा दिवस.. ओह सॉरी सॉरी.. जायची रात्र उजाडली. कारण सकाळचं पाणी भरण्यासाठी तिथं रात्रीच जाणं गरजेचं होतं. मग तशीच रात्रीची सव्वा नऊची विरार स्लो ट्रेन पकडली. आणि एका-एका स्टेशनाला गर्दीत स्वत:चं हालहाल करुन घेत शेवटी एकदाचा मी भाईंदरला स्टेशनला उतरवलो गेलो! रात्रीचं भरगच्च जेवणं घेऊन आल्याने रात्रीच्या जेवणाचं टेंशन नव्हतं. त्यामुळे मग घरी आल्या-आल्या बेडवर सरळ ताणून दिली ती थेट सकाळी सातलाच जाग आली. भांडी धुणं, पाणी भरणं, आंघोळ आणि तयारी करेपर्यंत साडेआठ वाजले. मग कधीकाळी बॅगेत ठेवलेले, पिचपिचीत चणे खावून सकाळची न्याहारी आटोपली. त्यावर दोन ग्लास पाणी पोटात ढकलून सरळ शाळेचा रस्ता धरला. रिझल्ट घेतला. ठरल्याप्रमाणे फोन करुन आई, भावोजी, काका असं, मेन माणसांना ताबडतोब ही बातमी दिली. हो.. नाहीतर फोन करुन नंतर मला बेजार केलं असतं!!

बस्स! आजच्या दिवसाचं तरी काम संपलं, आता काय? दुसरा रिझल्ट उद्या. तोपर्यंत आराम. आता फक्त घरी जाऊन आरामात जेवण घ्यायचं आणि.. विचार मनात येताच पाय जाग्यावरच थबकले! कसलं डोंबलाचं जेवण? घरात खायला काहीच नव्हतं. त्यात रात्री घरी जातानाही काही नेलं नव्हतं. म्हणजे अगदी खरेदीपासून सगळं सुरु करायचं होतं. पण घ्यायचं काय? अंडी आणि ब्रेडचं पाकीट? छे!
दोन दिवसाची ब्रेडची पाकीटं; म्हणजे तीन ब्रेडची पाकीटं आणि अर्धा डझन अंडी थोडक्यात नव्वद अधिक सत्तावीस- एकशे सतरा रुपये!!??? त्यात रोज उठून खाडखुड करत अंड्याची पोळी वजा चिखल करा!
नो नो काहीतरी वेगळं करायला हवं. तेही कमी पैशात, तीन वेळ पुरेल असं. पण काय?..
विचार करत असतानाच समोर माशा हाकणारा चिकनवाला दिसला! चिकन??
चिकन शब्द उच्चारताच दोन वर्षांपुर्वी अंडाकरी नामक केलेला प्रताप आठवला आणि तोंडचं पाणी पळालं. तो भयानक प्रकार चिकनबाबतीत काय रुप घेऊ शकतो याचा नुसता विचार करुनच पोटानं मला भुकच नाय म्हणून माघार घेतली! पण त्यावर उपायसुद्धा काय? दुसरं काही घ्यावं तर तेही खर्चात पाडणारं होतं. त्यात आमचं डाएट चालू होतं, म्हणजे नो ऑईल नो चटरपटर.
विचार करत काही वेळ मी तिथेच रस्त्यावर उभा राहीलो. आपण काय घेऊ शकतो, त्याचं बजेट कितीपर्यंत जाईल आणि कुठलं बजेट आपल्याला सध्या तरी परवडेल याचा हिशेब मी भर रस्त्यावर असं बोटांवर मोजून करु लागलो इतक्यात.. मागून धक्का देत एक मुलगी स्स्.. करत माझ्याकडेच वैतागून बघत माझ्या पुढून निघून गेली!
म्हणजे काय? हे बरं आहे आपलं! धक्का द्यायचा स्वत: आणि वर आंम्हीच धक्का दिला असल्यागत आमच्यावर वैतागत चुककून जायचं! म्हणजे काय आमचेच डोळे फुटलेत! राग आला पण नंतर राग गिळत आंम्ही आमच्या हिशोबावर कॉन्सर्नट्रेट् करु लागलो.
आता माझ्यासमोर दोनच पर्याय उरले.
पहिला-
रोजचे श्रम, पैसा, वेळ वाचवायाचा असेल तर चिकन हा एकमेव उपाय आहे. नाहीतर-
दुसरा-
चिकन येत नसेल तर आपल्याला हे येणारच नाही म्हणून बाऊ करत, सरळ आपला वेळ, पैसा आणि श्रम रोज वाया घालवायचं
दुसरा मार्ग अर्थात परवडण्यासारखा नव्हता. शेवटी मनाचा हिय्या करत मी चिकनवाल्याकडे गेलो. जरासा कचरत पाव किलो चिकन मागून घेतलं. (इथे चिकन किती घ्यावं हे सुद्धा मला नीट ठरवता येत नव्हतं कसबसं इथंही आमचा अंदाज लावायचा चालला होता)
चिकन तर घेतलं, पण त्याबरोबर चिकन मसाला घ्यावा का? विचार करत असताना, चिकनवाल्यानेच मसाला पाहिजे का? म्हणून विचारलं. त्याच्या बोलण्याला मान देत, त्यातल्या त्यात स्वस्तातला- पाच रुपयाचा चिकन मसाला घेतला आणि खिशातून करकरीत पिवळी नोट चिकनवाल्याकडे सरकवली.
“छुट्टा?”
“उतनाईच हे” म्हणत मी सरळ त्याच्या छताकडे डोळे लावले.
सकाळ-सकाळी, पन्नास रुपड्यांच्या खरेदीसाठी पाचशे रुपये दिल्याने, चिकनवाल्याने माझ्याकडे खाऊ कि गिळू अशा अर्थाने बघितले. पण मी त्याच्याकडे लक्षच नाही असं भासवत कधी त्याच्या दुकानाला, तर कधी कॉक् कॉक् करणार्‍या पिंजर्‍यातल्या कोंबड्यांना न्याहाळत राहिलो. शेवटी नाईलाजाने पाचशेची नोट आपल्या ड्रॉवरमध्ये आपटत त्याने सुट्टे पैसे दिले. ते घेत मी थेट घर गाठलं.
घरी आल्याआल्या पहिल्यांदा चिकन धुवायला घेतलं. हो हे एक मी बघितलं आहे म्हणून तेवढं तरी मला सुचलं. नाहीतर चांगभलंच होतं!
एका बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात चिकन टाकलं आणि पाण्यात हात घातला अन्.. अरारारा...
आयुष्यात कधीही कच्च्या चिकनला हातही लावलेला नसल्याने पुर्ण अंगावर सरसरुन काटा आला, तसा झटकन् हात काढून घेतला. ते गिळगिळीत मांसाच्या तुकड्यांनी पोटात मळमळायला लागलं. सकाळी जे काय चार चण्याचे दाणे खाल्ले होते तेही रात्री खाल्लेल्या जेवणासकट पोटात ढवळून वर यायला लागले. पुन्हा त्या चिकनला हात लावण्याचीही इच्छा होईना. पण न करुन सांगणार कोणाला? शेवटी चिकन करायचा हट्ट तर आपलाच होता ना, मग? तसाच पुन्हा भिती जुगारुन देत ताडताड पावलं टाकत किचनमध्ये शिरलो. आणि मागचा पुढचा विचार न करता सरळ पहिल्यांदा- गटागटा तीन ग्लास भरुन पाणी प्यायलो. जिवात जीव आला. छातीचे ठोके नॉर्मलवर आले. तसा मग ‘आल इज वेल’ बोलत चिकनच्या बाऊलपाशी आलो. चिकनचे पिस अजुनही पाण्यात शांतपणे तरंगत होते. त्याकडे बघत एक दिर्घ श्वास घेतला आणि डोळं गच्च मिटून घेत पटकन त्यात हात घातला.
पुन्हा तोच स्पर्श....
पण यावेळी माघार घेतली नाही. दोन बोटांवर हळूहळू टुचूक-टुचूक करत चिकन धुवण्याचं दिव्य काम सुरु केलं. एकदा मन घट्ट झालं कि भितीही माणसाला घाबरायला लागते असं म्हणतात, माझंही तसंच झालं असावं. कारण आता चिकनला हात लावायची भिती गायब झाली होती. पण त्याचबरोबर एक भलतीच समस्या निर्माण झाली होती. कदाचित आत्तापर्यंत भितीमुळे ती माझ्या लक्षात आली नव्हती, पण दोन पाण्याने धुवूनसुद्धा चिकनचा वास अजुनही गेला नव्हता. हे जर असाच वास मारत राहीलं तर आत्तापर्यंत ढवळून येणारं जेवण नक्कीच उसळून बाहेर येणार होतं! काय करावं? थोडासा जोर लावत मी चिकन पाण्यात कुस्करल्यासारखं करत धुवायला लागलो. पाच मिनिटांनी त्यातलं पाणी ओतून काढलं. चिकन जरासा स्वच्छ पांढरं पडल्यासारखं दिसायला लागलं. मग एक तुकडा सहज नाकाजवळ नेला आणि...
व्यॉक्!!
रवंथ करणारी गुरं अन्न कशी बाहेर काढतात ते पहिल्यांदाच प्रात्यक्षिक अनुभवायला मिळालं. नशीब ते गळ्याच्या वर आलं नाही. इतका घाण वास? आत्तापर्यंत खाल्लेल्या मटन चिकनचा कधी इतका वास आला नव्हता मग याचाच वास इतका घाणेरडा? असाच वास बिर्याणीला लागला तर? सगळी मेहनत पाण्यात!
छे छे अगोदर हा वास गेला पाहिजे. नाहीतर काही खरं नाही.
लगेच पुन्हा बाऊलमध्ये पाणी घेतलं. यावेळी आंघोळीचे कपडे धुतात त्या स्टाईलने जोरात खसखसून चिकन धुवायला लागलो. पण जास्त जोर लावल्याने त्याच्या पातळ चिंध्या व्हायला लागल्या तसा जोर कमी करत, पण त्याच पद्धतीने चिकन धुवून काढलं. आता वास नक्कीच गेला असेल. आता?
हा! हळद मिठ लावायचं! एक मिनिट....
हळद मिठ चिकनलाच लावतात ना? कि माशाला लावतात? छे! पुन्हा काहीतरी घोळ व्हायचा. मरो, फक्त हळद लावतो. तसाही हळदीचा काही साईड इफेक्ट नाही. कुमारीकापासून ते नववधूपर्यंत सगळ्याजणी हळद लावतात. त्याने त्वचेवरचे डाग कमी होतात आणि ती कोमल पडते. हीसुद्धा एक (स्त्री) चिकन आहे तिला काही साईड इफेक्ट होणार नाही. विचार करुन मी दोन टीस्पून हळद चिकनमध्ये मिसळली आणि ते तुकडे चांगले त्यात मिक्स केले. हळद लावल्यावर चिकन आता मस्तपैकी पिवळं दिसायला लागलं होतं आणि त्याचा वासही..
वास? मघाशी तर वास घेतलाच नाही आपण. नक्की वास गेला होता ना?
सगळं चांगलं होत असताना मध्येच मनात शंकेची पाल चुकचुकली. आणि जरासं अंतर ठेवूनच तो बाऊल मी नाकाजवळ नेला..
स्स्.. आगागा...
मघाशी प्यायलेल्या पाण्यासकट! सगळं वर आलं. कसबसं ते दाबून धरत बाऊल खाली आदळला. चिकनच्या चिंध्या झाल्या पण वास मात्र तसूभरही कमी झाला नव्हता!
आता काय? डोक्याला हात लावायची पाळी आली. इतकं धुतलं तरी वास तसाच? मनात जरा चिडचिडच झाली. काय करायचं काय याला? समोरच बाथरुममधलं सर्फ एक्सेलचं सुगंधीत पाकीट दिसत होतं. काही वेळापुरता एक भयानक विचार मनात तरळून गेला. तसं मी त्यावरुन लक्ष काढून घेतलं. पण वासाचा विचार काही मनातून जाईना. या बायका कशा हा वास घालवत असतील? पुन्हा एकदा मनात चविनुसार बिर्याणीची रितसर उजळणी सुरु केली. तिखट.. मिठ.. मसाला.. दही...
एस्स दही!
एकदा मी दह्याचा वापर करताना बघितलंही होतं. कदाचित दह्यामुळे वास जात असावा. मार्ग सापडल्यामुळे मनात एक हुरहुरी आली. लग्गेच कपडे बदलून बाहेर पडलो. दह्यासोबत अजुन काय काय घ्यायचं हे ठरवत मी डेअरीजवळ पोहोचलो आणि... चुळबुळत पुन्हा तसाच स्तब्ध उभा राहीलो!
‘अर्धवट ज्ञान इज डेंजर टु आवर हेल्थ!’ मनानं एक धोक्याची सुचना दिली. आपण वास जाण्यासाठी दही लावायचं ठरवलं खरं, पण त्याने भलतंच काय झालं तर? तसाच पुढे केलेला हात रिटन मागे घेतला. नेमके त्याच वेळी डेअरीवाल्याने पैसे घेण्यासाठी हात पुढे केला! माझा हात मागे जाताच त्याला जरा आश्चर्य वाटलं.
“आगे से आता हूँ!!!???” त्याला म्हणत मी झटकन् तिथून सटकलो.
‘च्यायला! दुधवाला आहे कि भाजीवाला?’ म्हणून डेअरीवाला नुसताच बावळटासारखा माझ्या तोंडाकडे बघत राहिला. मी मात्र मागे वळून बघण्याचं कष्टही न घेता तसाच पुढे चालत राहीलो.
च्-च्.. दह्याची कन्सेप्ट क्लिअर करायला हवी. काय करु? ताईला विचारु का? करु का फोन तिला?.... लावू कि नको अशा दुविधेत शेवटी फोन लावलाच. जरा वेळ असाच इकडतिकडचं बोलणं झाल्यावर मी सरळ मुद्द्याला हात घातला..
“चिकनमध्ये दही कशासाठी घालतात ग?”
“का? तुला कशाला पाहिजे ते?” आवाजावरुन तिला जरासा संशय आला असावा
“नाही म्हणजे- समजा, कधी बिर्याणी करायची वेळ आलीच तर माहीती असावी म्हणून विचारलं”
“हॉ-हॉ तू बिर्याणी करणार..!!”
“सांग ना”
“वासासाठी घालत नाहीत ते, चिकन जास्त गरम असतं म्हणून दही मिक्स करतात! कारण ते थंड असतं आणि चिकनची हिट कमी करतं!!”
‘बोंबला!’
“काय??”
“अह्ं.. मला वाटलं वासासाठी लावतात कि काय. बरं मग वास जायसाठी काय लावतात? कारण धुतल्यावर पण चिकन खुप वास मारतं ना?”
“वासासाठी काही लावत नाहीत काय फक्त... ए- तू आहेस कुठे आत्ता?”
“मी? भाईंदरला. का?”
“कधी आलास?”
“काल रात्री”
“डबा घेऊन आला होतास?”
“ह्यॅ! एवढ्या गर्दीत? त्यापेक्षा घरुनच जेवून आलो होतो”
“म्हणजे तू काहीच आणलं नाहीस!”
“नाही”
“मग आत्ता जेवणाचं काय करतोय? चिकन आणलंय...?”
“अ..ब..ब.. अगं.. हो!!! ते... ते- हे.. सोन्याचं रिपोर्ट कार्ड भेटणार आहे ना आज? किती वाजता भेटणार आहे? कॅलेंडरपण कुठंच सापडलं नाही”
“तू गेला नाहीस अजुन??? अरे काय सव्वा दहा झाले! साडेदहापर्यंतचा वेळ होता, काय करतोयस काय तू?? जा लवकर!! आणि ते कॅलेंडर कपाटावरच आहे आणि ऐक...”
“हो-हो ठेव-ठेव, मी जातो” म्हणत घाईघाईत, कसाबसा मी फोन कट करत दम घेतला.
हुश्श!!!.....
वाचलो! आता काय.. व्हायचं ते होवो, बिर्याणी बनवायचीच.
भाजीवाल्याकडे गेलो,
“कोथंबीर देदो”
“कितना?”
आली का पंचायत, किती लागणारै ते माहीत नाही आणि किती रुपयांपासून देतात तेही माहीत नाही!
“प..पाच रुपय कि मिलेगी?”
मान डोलवत त्याने कोंथंबीर काढून दिली, ते बघून वाटलं ‘छे! दोन रुपयांची मागितली असती तर बरं झालं असतं, उगीच जास्त पैशाची मागितली!’ पण आता घेतलीय तर जाऊ दे.
“थोडा कडीपत्ता भी डालो”
त्यानं कडीपत्त्याच्या दोन काड्या मोडत त्या कोंथंबीरीच्या जुडग्यात खोचल्या. पाच रुपये देत मी पुन्हा डेअरीवाल्याजवळ आलो. यावेळी मात्र न कचरता बोललो-
“पाँच का दही देदो”
त्यानं दिलेलं दही बघून पुन्हा एकदा मन कळवळलं-
यार- इथं पण दोन रुपयांचं दही घेतलं असतं तर बरं झालं असतं!
यासाठी म्हणतात अशी खरेदी करताना ‘कोणीतरी’ असावी बरोबर म्हणून! Wink
असो!
आता मोर्चा दुकानात.
किराणामालाच्या दुकानात गेल्यावर जरा शहाणपणा करत मी दोनच रुपयांचं खोबरं घेतलं. मग इथं तिथं टाईमपास न करता सरळ घर गाठलं. हो- कारण जवळपास अर्ध्या तासापासून हळदीत मुरत ठेवलेलं चिकन माझी वाट बघत होतं!

घरी आल्या-आल्या पहिल्यांदा चिकन बघितलं. अपेक्षेप्रमाणे चिकनने आपल्या वासाने सारं घर भरुन ठेवलं होतं! काय करावं? डोकं चालेना, तस मग तसाच बाऊल उचलून किचनमध्ये आणला आणि पुन्हा चांगलं दोन पाण्याने चिकन धुवून काढलं. त्यानंतर पुन्हा त्या चिकनचा हळदीकार्यक्रम संपन्न केला. वर दह्याचा लेप देवून त्याला झाकून ठेवलं व उखळ घेऊन मी आपल्या मसाला कुटण्याच्या तयारीला लागलो!
HTML5 Icon

पहिल्यांदा सुक्या खोबर्‍याचे चाकुने तुकडे करुन घेतले. कन्फ्युजन नको म्हणून मसाल्याचा डबाच बाजुला घेतला. खोबर्‍याबरोबर थोडी जिर्‍याची चिमट उखळीत टाकली. आणि कुटायला सुरवात केली तोच टण्णकन एका खोबर्‍याने उखळीतून बाहेर उडी घेतली! मुकाट्यानं तो तुकडा उखळीत टाकत मी दुसरा ठोका टाकला. पुन्हा तीन खोबर्‍यांनी टणाटण उड्या मारल्या सोबत जिर्‍याचा सडा!
च्यायला चाललंय काय हे?
वैतागत मी उखळीवर झाकणासारखा हात ठेवत कुटायला सुरवात केली. पुन्हा चार आणि दोन खोबरे आळीपाळीने त्यातूनही वाट काढत उखळीच्या बाहेर! जिर्‍याचा तर ‘रोक सको तो रोक लो’ असाच पवित्रा! थोडी सणकलीच. रोकवतोच तुला थांब, उखळ वर उचलून खाली मोठं ताट ठेवलं हात पुन्हा काळजीपुर्वक उखळीवर झाकला, आणि ‘रॉकी हॅन्डसम’ मधल्या जॉनसारखं एका-एका तुकड्याला धरुन जी कुटायला सुरवात केली ती त्यातून तेल निघेपर्यंत!
प्रयत्न थोडाफार यशस्वी झाला. खोबरं इतकं नसलं तरी थोडंफार बारीक झालं.
अजुन काय-काय टाकता येईल यात?
बाजुच्या मसाल्याच्या डब्यावरुन नजर एकदा फिरवली. काही टाकण्याजोग़ं वाटेना. मग सरळ कोंथंबीरकडे मोर्चा वळवळा. थोडीशी धुवून ती उखळीत टाकली. यावेळी मात्र एकानेही बाहेर उडी मारली नाही! कोथंबीरीच्या ओलेपणामुळे सगळा मसाला उखळीतच अडकून राहीला. आणि व्यवस्थित कुटालाही गेला! हायला!! हीच आईडीया मघाशीच केली असती तर? सगळ्या गोष्टी उशिराच आपल्याला का सुचत असतात म्हणून स्वत:वर चुचकारत मी मसाल्याची उजळणी करु लागलो. अचानक लसणाची आठवण आली. मसाल्यात लसून हा घटक मिसिंग होता. लगेच मग टोपलीतल्या लसणाच्या पाच पाकळ्या काढल्या. उखळीत चांगल्या कुटून घेतल्या. यावेळी मसाल्याचा एक खमंग वास नाकात शिरला आणि आपण अगदी योग्य ट्रॅकवर आहोत याची जणीव झाली.
HTML5 Icon

याच्या पुढचा कार्यक्रम मात्र अलका कुबल टाईप होता. त्यामुळे जरा जपुन आणि झटपट करावा लागणार होता. त्यासाठी दोन कांदे किचनमधून लागलीच सोलून आणि धूवून आणले. आडवं-तिडवं कापून वेळ वाढवण्यापेक्षा सरळ डोळ्यावर काळा गॉगल लावून व सोललेली कांद्याची साल डोक्यावर ठेऊन- धडाधड उभा कांदा कापायला लागलो. तरीही दुसर्‍या कांद्यापर्यंत नाक डोळ्यांची चोळून-चोळून अगदी पुरेवाट लागली होती.
HTML5 Icon

सरता शेवटी सासरला जाताना तोंड धरुन येणारं हमसाहमशी रडं आवरत आईच्या कुशीत धावत जाणार्‍या. मुलीसारखं, तोंड दाबून धरत मी तशीच बाथरुमध्ये धाव घेतली आणि नळ चालू करत जोरजोरात पाण्याचे फवारे तोंडावर मारत सुटलो. चार-पाच वेळा पाणी तोंडावर मारल्यावर जीवात जीव आला. तोंड पुसण्याचे कष्ट न घेता हॉलच्या पंख्याखाली उभा राहीलो. तेव्हा कुठे जरा डोळ्यांना थंडपणा वाटायला लागला.
सहज घड्याळाकडे लक्ष गेलं, बरोबर एक वाजला होता!
अरे देवा.. अशा चालीने गेलो तर डिनरलाच बिर्याणी होईल. घाई करु तरी किती?.. च्य्! ‘चला चला वेळेचं भान ठेवायला पाहिजे’ म्हणत मी किचनकडे गेलो आणि समोरच्या खिडकीतली बाई आपल्यासमोरुन हा काय वेड्यासारखा पुटपुटत पळत गेला म्हणून बघायला लागली. डोळ्यांच्या कोपर्‍यातून मला ते जाणवलं पण अशा शुल्लक गोष्टींकडे लक्ष द्यायला माझ्याकडे वेळ नव्हता. मी लागलीच बास्केटमधली दोन चार भांडी आदळून आपटून त्यातून एक मिडीअम साईजचं पातेलं काढलं. खरं तर या पातेल्यात बिर्याणी झाली असती. पण इथेही मनानं कच खाल्ली! आत्तापर्यंतचा स्वयंपाकाचा अनुभव लक्षात घेता मोठं पातेलं निवडावं असं वाटायला लागलं. कारण, कितीही केलं तरी उलतान, पळी, चमचा हे प्रकार काय आमच्या हाताला कधीच पटवून घेत नव्हते. संभाळून हलवावं तर तिथल्या तिथंच “ए सरक रं- सरक रं” म्हणत सरकासरकी करत होता. आणि पुर्ण हाताचा वापर करुन भांड्यातला पदार्थ हलवावा तर समुद्राला येणार्‍या भरतीसारखं उलतान सगळा पदार्थ खाली पाडूनच दम घेत होतं! आपल्या बिर्याणीची तरी अशी हालत होऊ नये म्हणून सरळ मोठ्ठं पातेलं घेतलं. खासून धूवून वगैरे साफ केला. मग थोडंसं तेल टाकून कडीपत्त्याची एक कांडी सर्रर्रकन सोलत त्यात टाकली. गरम तेलात पडताच सवईनुसार कडीपत्त्याने तडतडायला सुरवात केली, कि लगेच उखळीतला मसाला त्यात टाकला. इथं जरा कांदा अगोदर टाकायला हवा होता असं उगीच वाटून गेलं. पण जाऊ दे! सारखा कांदाच काय नंबर घेणार? एक डाव मसाल्याला दिला म्हणून काय बिघडलं? म्हणून मनातल्या मनातच भांडत मसाला हलवायला सुरवात केली.

मसाला भाजत आल्यावर त्यात कांदा टाकला. त्यानंतर कांदा लाल होईपर्यंत आणि- अगोदर टाकलेला मसाला काळा होईपर्यंत चांगला खरपुस भाजला. आता पाळी चिकनची. एवढा वेळ दह्यात भिजत ठेवलेलं चिकन पातेल्यात टाकलं. चांगलं तीन मिनिटं, मसाल्यात परतून घेतलं. चिकन मसाल्यात मिक्स झालेलं आहे असं लक्षात येताच एक अर्धा वाटी पाणी चिकनमध्ये टाकलं आणि ते शिजेपर्यंत पातेलं झाकून ठेवलं.

एक गड सर केला. आता याच्या पुढची तयारी. त्यासाठी तांदळाचा डबा घेतला. पण किती तांदूळ घ्यावं? एक वाटी घेतली तर त्याच्या दुप्पट भात होणार, मग?
अंदाजाने सव्वा वाटी तांदूळ घेतलं. पण चिकनच्या तुलनेत तांदूळ खुपच कमी वाटायला लागलं, तसं मग और थोडा- और थोडा करत साडेतीन वाट्यापर्यंत प्रमाण वाढत गेलं.
हे तांदूळ दोन पाण्यात खसाखसा धुवून घेतलं. आत्तापर्यंत पंधरा मिनिटं होऊन गेली होती. जरा पातेल्यावरचं झाकण काढून चिकन किती शिजलं आहे हे बघितलं.
HTML5 Icon

आहाहा... काय वास आला म्हणून सांगू? मनावर नियंत्रण आणत, धुतलेले तांदूळ त्यात टाकले. उलतानने सगळं मिक्स करत अंदाजाने त्यात पाणी ओतलं आणि अंदाजानेच एक चमचा.. दोन.. मग अर्धा.. असं करत अडीच चमचा मिठ टाकलं. पातील्यातून येणार्‍या वाफांचा सुगंध घेत मिठ बरोबर मापात पडलेलं आहे याची खात्री करुन घेतली.
हो- ही एक कला मला अलिकडेच अवगत झाली आहे, नुसत्या वासावरुन जेवणात तिखट, मिठ, चटणी, काय कमी आहे हे मी बरोबर सांगू शकतो!
तर- सगळं सोपस्कर पार पाडल्यावर बिर्याणीच्या पातेल्यावर झाकण झाकलं दुसर्‍या एका टोपात एक अंड शिजत ठेवलं व मोबाईमध्ये वेळ बघितला. बरोबर पंधरा मिनिटांचा टाईमर सेट केला अन् निश्चिंत मनानं बाहेर आलो. तरीही भीती होतीच. उतू गेलं तर? पाणी कमी पडून करपलं गेलं तर? धाकधुक काही कमी होईना. मग, प्रत्येक पाच-सात मिनिटांनी किचमधे चकरा मारायला लागलो. मध्येच झाकण काढून बिर्याणीचा हालहवाल बघायला लागलो. असं निदान दहा-वीस वेळा केल्यावर अखेर शेवटी भात शिजला. इकडे अंडंही शिजुन तयार झालं होतं. मग आणलेलं चिकन मसाल्याचं पाकीट फोडून त्यातला अर्धा मसाला बिर्याणीत टाकला. बिर्याणी हलवून, मसाला पुर्णपणे त्यात मिक्स करुन घेतला. आणि मग झाकण टाकून पुन्हा एकदा हॉलमध्ये जाऊन बसलो. मध्ये एकदा पाच मिनिटांनी बिर्याणी नजरेखालून घातली. मग तीन.. दोन.. आणि मग...
अखेर शेवटी प्रतिक्षा संपली!! आणि काहीतरी शोध लावल्यावर शास्त्रज्ञाने आनंदाने उडी मारावी तशी ज्जोरात किचनमध्ये दोन तीन उड्या मारत मी माझा अत्यानंद व्यक्त केला.
येस्स्..येस्स्.. येस्स्स!!!!!
चिकन-भात अगदी व्यवस्थित शिजला होता. तिखट मिठ अगदी मापात पडलं होतं, आणि बिर्याणी तर एकदम फक्कड तयार झाली होती! प्रॉब्लेम एकच होता. पाणी जास्त झाल्याने बिर्याणी सुटसुटीत न होता जराशी ओल्या भात टाईप झाली होती. पण यावर मी थोडंसं डोकं चालवत लगेच गरमागरम पातेलं शिगडीवरुन उतरवून हॉलमध्ये आणलं. पंख्याखाली ठेवलं. दोन मिनिटांत भात सुट्टा!!
ब्रेवो!!
बिर्याणी खायला तयार झाली होती. वेळ न दवडता थाटलीत गरमागरम बिर्याणी वाढून घेतली. कोथंबीर धुवून बारीक चिरुन बिर्याणीवर टाकली. शिजलेली अंडी त्यावर ठेवली.
मघापासून वास मारणार्‍या चिकनमधून आता खमंग वास येत होता. आणि दिसायलाही एकदम लाजवाब!!
आहा! आयुष्यात पहिल्यांदाच केलेल्या बिर्याणीचं ते देखणं रुप पाहून मन भरुन आलं. कितीही केलं तरी फोटोचा मोह आवरला नाही. लगेच फोटू काढून घेतला. आणि आपल्या फोन मेमरीमध्ये सेव्ह करुन घेतला. माझ्या पहिल्यावहिल्या आणि सक्सेसफुल रेशीपीची एक अभुतपुर्व आठवण म्हणून... Happy
HTML5 IconHTML5 Icon

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वांना धन्यवाद.
<<<पहिल्या उचापतीपेक्षा प्रगती आहे की !>>> Biggrin
हो, आणि ही बिर्याणी चविलाही चांगली झाली होती

कुमारीकापासून ते नववधूपर्यंत सगळ्याजणी हळद लावतात. त्याने त्वचेवरचे डाग कमी होतात आणि ती कोमल पडते. हीसुद्धा एक (स्त्री) चिकन आहे तिला काही साईड इफेक्ट होणार नाही. >>>>
Happy Happy

मस्त लिहिलंय ( आधी मला काल्पनिक वाटलं होतं पण फोटो बघून..आणि ती उखळ नाही .. असोच.).. पण ते वासाबिसाचं वाचून नव्या माणसाला धीर होणार नाही हो !

जमलीयं की मस्त बिर्याणी. फोटोत तर ताट आपल्यापुढे सरकावून बसावे जेवायला असे वाटतेय..

आता पुढच्यावेळी कोलंबी बिर्याणीचा वास ट्राय करून बघा Happy