तबल्याविषयी/तालाविषयी काही प्रश्न!!!!

Submitted by हर्ट on 23 May, 2016 - 11:26

तालाविषयी माझे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरे लवकरात लवकर कुणी देऊ शकेल का? तुम्हा सर्व मित्रमैत्रिणींचे खूप खूप आभार.

१) समजा गाण्याचा ताल तीनताल आहे आणि जी व्यक्ती तबला वाजवत आहे ती व्यक्ती एक आवर्तन अतिशय हळूवार पण वाजवू शकते, मध्यम गतीमधेची वाजवू शकते आणि जलद गतीमधेही वाजवू शकते. म्हणजे, एक आवर्तन हे १ मिनिटात पुर्ण होऊ शकते तसे ते ३० सेकंदामधेही पुर्ण होईल. तर तबल्याची ही गती नक्की गायकाच्या आवाजावर अवलंबून असते? की ह्या गतीमधे गाणे गायचे हे आधीच संगीतकारानी ठरवलेले असते की हे तबला वाजवण्यावर ठरलेले असते?
आता आपण एक उदाहरण घेऊ, गाणे आहे - आज राणी पूर्वीची तू प्रीत तू मागू नको नको. हे गाणे कुठल्या स्केलमधे येते - संथ, जलद, मध्यम? हे गाणे मी जेंव्हा गायला सुरुवात केली तेंव्हा आधी मी मध्यम गतीने म्हंटले पण गाणे दुसर्‍या कडव्यात आले की माझी गती वाढते? असे का होते आहे?

२) पट्टी नक्की काय असते? मी सहजा समुहाने गाणे म्हणतो वर्गात कारण सहा मिळून आमचा एक वर्ग आहे. त्यामुळे कधी पट्टीचा प्रश्न आला नाही. पण जर मला सोलो गायचे असेल. आता वरचेच गाणे - आज राणी पूर्वीची तू प्रीत मागू नको - हेच गाणे मला गायचे असेल तर त्यासाठी माझी पट्टी कुठली आहे हे मला कसे कळेल? पट्टी ही गायकाच्या आवाजावर अवलंबून असते की गाण्याच्या गतीवर अवलंबून असते?

३) काळी पट्टी आणि पांढरी पट्टी ह्याबद्दल सोप्या शब्दात कुणी समजवून सांगेल का?

४) जेंव्हा आपण मैफीलीत गातो तेंव्हा समजा आपण भावगीत गात आहोत. परत वरचेच गाणे घेऊ - आज राणी -- तर हे भावगीत गाताना अमुक एक मात्रापासून सुरुवात करायला हवी की पहिल्या बीट पासून सुरवात करायची?

५) काही गाण्यांमधे तबला नसतो मग तालात कसे गायचे असते? जसे की - भय इथले संपत नाही ह्या गाण्यामधे तबल्याच्या काही बीट्स ऐकायला येतात पण अविरत तबला वाजतो आहे असे ऐकायला येत नाही. तर मग अशी गाणी गाताना ताल कसा ठरवायचा? गाण कसं गायच?

परत एकदा सर्वांचे आभार.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर चर्चा .. खरं तर अशी चर्चा होणे गरजेचे आहे, गायक नाहीत तर श्रोते तयार होण्यासाठी.

हर्ट.. लता वरच्या पट्टीत काही गाण्यात गायलीय, असे मला वाटतेय... ( आजा भंवर सुनी डगर ( रानी रुपमती ), आ अब लौट चले ( जिस देश में गंगा बहती है ), याल्ला याल्ला दिल ले गया, आजा रिमझीम के ये प्यारे प्यारे गीत ( उसने कहा था ) कुणी दुजोरा दिला तर फार बरे होईल.

दिनेशदा, तुम्ही दिलेली गाणी काल लगेच ऐकलीत घरी परततात. ह्यातले पहिले गाणे तारसप्तकात असल्याचे लगेच जाणवते. 'दिल जो न कहे सका..' हे गाणे सुद्धा वरच्या पट्टीतले आहे.

<याल्ला याल्ला दिल ले गया,>
यात २ ही पट्ट्या मस्त वापरल्या आहेत. एकायला मजा येते.

खूप सुंदर चर्चा झालीये. सगळ्या तांत्रिक बाबी खूप सुरेख उलगडून सांगितल्यात हिम्सकूलने.

हर्ट सुरात गाण्यासाठी जसा सुराचा रियाज लागतो तसाच तालात गाण्यासाठी तालाचा. सूर तुम्ही एकतर बाहेरून ऐकता किंवा आतून ठरवता अन त्यानुसार स्वरयंत्रावर नियंत्रण ठेवत सूर गळ्यातून काढता.
तालासाठी काय केलं तर सूरांचा समूह "तालात" येऊ शकेल? हा प्रश्नं आहे.

एकाचवेळी सूर आणि ताल अशी कसरत करायला गेल्यास लक्षं विभागल्या गेल्याने काहीतरी एकच बरोबर येण्याची शक्यता आहे. पण सूर पूर्णं आल्यावर मग ताल असं तर नाही करता येत.. कुठेतरी सुरांचा समुहं घेऊन गायला गेलं की ताल येतोच इक्वेशनमधे.

सगळ्यात आधी तबला मशीन जर जुन्या पद्धतीचं असेल (म्हणजे ज्यातून मेकॅनिकल आवाज येतात) ते बंद करा. तुमच्या कानाला आणि मेंदूला खराखुरा तबल्याचा आवाज प्रोसेस करायची"च" सवय लावा. अन्यथा "माझं तबला मशीनवर बर्रोब्बर येतं.. तुम्ही प्लीज तबला मशीनसारखं वाजवाल का?" असं तबला वाजवणा र्‍याला सांगायची पाळी येईल (च).
खूप चांगली सॉफ्ट्वेअर्स उपलब्धं आहेत. फोन अ‍ॅप्स सुद्धा असणार. थोडी चौकशी करूया ह्या विषयावर. पण खर्‍या तबल्याच्या आवाजाबरोबर रियाज ह्याला पर्याय नाही.

आता.. आवाज तर आला. पण गाणं किंवा बंदिश नक्की कशी आहे ते जाणून घ्या. उदा. नऊवारी साडी मुळात नक्की कशी नेसतात ते कळलच पाहिजे. आणि नीट कळलं पाहिजे. कोणता शब्द कशा पद्धतीनं कोणत्या मात्रेवर येतो ते लिहून काढा. हो. लिहून काढा.
उदा. यमन मधली तीन तालातली बंदिश - येरी आली पियाबिन. बंदिश ९व्या मात्रेवर सुरू होते आणि पि वर सम आहे. मधलं काय काय त्यासकाय्लिहून काढायचं तर असं होईल - (एक्सेल वापरायचं म्हणजे मात्रा आणि अक्षरं अलाईन होतात)
९१०१११२ १३१४१५१६
ये-री- आ-ली-
१२३४ ५६ ७८
पियाबिन--सखी

ह्यात ये-री- म्हणजे ये दोन मात्रा घेतोय आणि री सुद्धा दोन मात्रा घेतोय. तर पियाबिन हे सलग ४ मात्रा. त्या नंतर ५वी आणि ६वी मात्रा काहीही नाही म्हणायचं. सखी हा शब्दं ७ आणि ८ मात्रा घेतो. की पुन्हा नवव्या मात्रेपासून बंदिश पुन्हा सुरू होते. तुम्ही तुमचं नोटेशन ठरवू शकता.
अशी अख्खी बंदिश लिहून काढायची. आणि खूप (म्हणजे खूपच) वेळा तबल्याच्या साथीवर म्हणायची. तबल्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. मात्रं सरळ नुस्ती बंदिश म्हणतानाच सम काल बर्रोब्बर येत नसेल तर तुम्हाला बंदिशीची घडणच माहीत नाहीये हे नक्की.

अशा पद्धतीनं बण्दिशीची बांधणूक कळली म्हणजे नऊवारीचे सगळे डिटेल्स कळले. आता थोडका पदर घसरला तर अख्खी साडी सोडून परत नेसावी लागत नाही .. तिथल्या तिथे ठीक करता येते.

सुरूवातीच्या अन वेगवेगळ्या तालातल्या बंदिशी खूप वेळा रियाज कराव्या लागतिल. पण तालाला कान अन मेंदू तयार होत राहील. हळू हळू नुस्ती ऐकून बंदिशीचि बांधणी कळू लागेल.
पुढे कधीतरी ताल हा तुमच्या असण्याचा भाग होऊन जाईल... वेगळा सीपीयू टाईम तालाचा ट्रॅक ठेवण्यात खर्चं होणार नाही. तालात चूक करण्यासाठी प्रयत्नं करावे लागतिल ..

आता हे किती दिवसांत जमेल असा प्रश्नं विचारायचा नाही. मला पुरणपोळी करता यायला किती दिवस लागतिल अशासारखा प्रश्नं असेल तो. त्याला उत्तर नाही.

दाद कसलं भारी लिहिलंयस

अशा पद्धतीनं बण्दिशीची बांधणूक कळली म्हणजे नऊवारीचे सगळे डिटेल्स कळले. आता थोडका पदर घसरला तर अख्खी साडी सोडून परत नेसावी लागत नाही .. तिथल्या तिथे ठीक करता येते. >> हे खल्लास होतं Proud

आता हे किती दिवसांत जमेल असा प्रश्नं विचारायचा नाही. मला पुरणपोळी करता यायला किती दिवस लागतिल अशासारखा प्रश्नं असेल तो. त्याला उत्तर नाही. >>> आणि हे ही !

मी दादच्याच पोस्टची वाट बघत होतो... एकदम परफेक्ट पोस्ट..

अशा पद्धतीनं बण्दिशीची बांधणूक कळली म्हणजे नऊवारीचे सगळे डिटेल्स कळले. आता थोडका पदर घसरला तर अख्खी साडी सोडून परत नेसावी लागत नाही .. तिथल्या तिथे ठीक करता येते.

आता हे किती दिवसांत जमेल असा प्रश्नं विचारायचा नाही. मला पुरणपोळी करता यायला किती दिवस लागतिल अशासारखा प्रश्नं असेल तो. त्याला उत्तर नाही. ही दोन्ही वाक्य पोस्टची हायलाईट्स आहेत...

ताल यंत्रावर फारच एक सुरी ताल मिळतो, तरी आता बरीच सुधारणा आहे.. पण प्रत्यक्ष तबलजी बरोबर रियाज करणं आणि ताल यंत्रावर करणं ह्यात बराच फरक पडतो.. कारण तबलजी वाजवताना त्यात एक भारदस्तपणा येतो आणि वेगळा ढंगही येतो जो ताल यंत्रावर नक्कीच येत नाही...

दाद, धन्यवाद.

हो, आमचे शिक्षक बंदीशीचे नोटेशन्स लिहून देतात आणि ज्या मात्रेपासून गाणे सुरु होते तेथूनच आम्ही सुरु करतो. पण जेंव्हा एकेकट्यानी म्हणून दाखवा असे ते म्हणतात तेंव्हा मला तालाच्या सोबत सोबत गाता येत नाही. माझ्याकडे तबला यंत्र नाही आहे पण तबला यंत्र लावले की त्यावर मात्रांचे क्रमांक दिसतात त्यानुसार गायला मला जमते. माझी गाणे म्हणण्याची गती ही मधेच वाढते. तसाही मी खूप गतीने बोलणारी व्यक्ती आहे. त्याचा परिणाम गाण्यावर आणि माझ्या लिहिण्यावरही दिसतो.

पण, छान माहिती दिली. त्याबद्दल परत एकदा आभार.

कसचं कसचं.. बालबुद्धीत जेव्हढं काही साठवलंय ते लिहितोय.. तरी अजून आजोबांना विचारलं नाहीये.. त्यांना विचारलं की मग अजून वेगळंच काहीतरी सापडेल...

सगळी उत्तरे वाचली नाहीत, त्यामुळे पुनरुक्ती होत असेल तर आधीच क्षमा मागतो.

१. ताल - हा गाण्याच्या साथीला असतो. गाणारा ज्या वेगाने गाईल त्या वेगात तबला वाजवावा लागतो. त्यामुळे लय ही गाणार्‍यावार असते. आता तुम्ही म्हणाल की गाणार्‍याच्या एका ओळीत तालाची १/२/४ आवर्तने बसू शकतात. ती किती ते कोण ठरवतो? तर गाण्याचे शब्द सहजपणे ज्या तुकड्यांंमध्ये विभागले जातात तसे तुकडे असलेला ताल आणि त्याची आवर्तने ठरतात. शिवाय स्केल - म्हणजे पट्टी - ही सुराशी निगडीत आहे, तालाशी नाही.

२. पट्टी - प्रत्येक सुराला एक विशिष्ट कंपनसंख्या/ फ्रिक्वेन्सी असते. माणसाला कमीत कमी २० हर्ट्झ आणि जास्तीत जास्त २०००० हर्ट्झ फ्रिक्वेन्सीचे आवाज ऐकू येऊ शकतात. त्याचप्रमाणे आपण गळ्यातून काढू शकणार्‍या आवाजाची रेंज ठरलेली असते. प्रत्येकाची ती वेगळी असू शकते. ती रेंज जर कमी फ्रिक्वेन्सीची असेल (समजा १०० ते ८०० हर्ट्झ) तर त्याला खालची पट्टी म्हणतात. वरच्या रेंजला (उदा. १५० ते १२०० हर्ट्झ) वरची पट्टी म्हणतात. तुमच्या स्वत:च्या एकूण रेंज्च्या साधारण मध्यभागी तुम्ही फारसा त्रास न होता गाऊ शकता - ते तुमचे वैयक्तिक मध्य सप्तक झाले. साधारणपणे पुरुषांचे मध्य सप्तक खाली असते (ज्याला काहींनी काळी १/पांढरी १ वगैरे म्हणले आहे).

३. आता संगीतात प्रत्येक २ सुरांमधला फ्रिक्वेन्सी रेश्यो हा ठरलेला असतो. (उदा. सा आणि रे, सा आणि ग, सा आणि म - ह्यातले रेश्यो ठरलेले असतात). कुठल्याही सुराची फ्रिक्वेसी ठराविक नसते. तुम्ही ज्या फ्रिक्वेन्सीला 'सा' म्हणाल त्या सा च्या नुसार बाकीच्या सुरांच्या फ्रिक्वेन्सी ठरतात. आपण ज्या फ्रिक्वेन्सीला 'सा' म्हणतो - ती फ्रिक्वेन्सी (किंवा तो आवाज) पेटीवर ज्या पट्टीच्या फ्रिक्वेन्सीशी जुळेल, ती आपल्या गाण्याची पट्टी. पेटीवर काळ्या आणि पांढर्‍या अश्या पट्ट्या असतात. काळ्या ५ आणि पांढर्‍या ७ पट्ट्यांनंतर तोच पॅटर्न पुन्हा रिपीट होतो. त्यामुळे ६ व्या काळ्या पट्टीला 'काळी ६' न म्हणता 'काळी १' म्हणतात. तसेच पांढरीचे आहे (पांढरी ८ = पांढरी १). आपल्या आवाजाची मधली रेंज साधारण काय आहे हे पेटीवर शोधून काढता येऊ शकेल. त्या रेंजची सुरुवात सा ने करावी - तो ज्या पट्टीशी जुळेल तीच तुमची पट्टी. ह्यासाठी स्वतःला कळणे अवघड असल्यास गुरुची मदत घ्यावी.

४. गीताचे शब्द, छंद, वृत्त आणि त्याची गेयता किंवा चाल ज्या प्रमाणे असेल, त्याप्रमाणे त्याच्या वाक्याचे भाग पडतात. शक्यतो न्यास (छोटा पॉज) किंवा ठराविक अक्षरांवरचा स्ट्रेस यावरून 'सम' (तालाची सुरुवात करण्याचे ठिकाण) ठरते.

५. काही गाणी तबला वाजत नसला तरी लयबद्ध असतात. भय इथले - ह्या गाण्याला देखील लय आहे. तुम्ही टाळ्या देऊन ठेका धरून बघा. पहिल्या ओळीत 'इ', 'सं - च्या थोडे आधी', 'ना', 'पुढ्च्या ओळीच्या थोडे आधी' - अश्या ४ टाळ्या येतात. त्या वेळ लावून पाहिल्यास इक्वीस्पेस्ड आहेत. असा ठेका डोक्यात ठेऊन गाणे म्हणावे.

- हे सर्व पडताळून पाहण्यासाठी 'आज राणी' किंवा 'भय इथले' ही दोन्हि फार अवघड गाणी आहेत. सोप्या गाण्यांपासून समजून घ्यावे. उदा. 'असावा सुंदर चॉकलेटचा बंगला' वगैरे.

हिम्या आणि दाद, लय भारी पोस्टी !!! Happy

गाणारा ज्या वेगाने गाईल त्या वेगात तबला वाजवावा लागतो. त्यामुळे लय ही गाणार्‍यावार असते. >>>>> हे नक्की असं असतं का? फिरोदीयाच्या काळात "आज ड्रमर फुल सुटला होता! त्यामुळे आम्हांलाही पळावं लागलं फार.. " अश्या कमेंट्स गायक आणि डान्सर्स कडून ऐकल्या आहेत. त्यामुळे मला वाटायचं की तालवाद्य नेहमी लिड घेते... !

(हिम्या ड्रमर कोण ते तुला कळेलच.. Wink )

गाणारा ज्या वेगाने गाईल त्या वेगात तबला वाजवावा लागतो. त्यामुळे लय ही गाणार्‍यावार असते. >> ही बाब क्लासिकल संगीतामधे प्रकर्षाने जाणवते.. आणि त्या दृष्टीनेच योग्य आहे..
सुगम मधे असे गाणारा लय वाढवून गायला लागला तर बर्‍याच वेळा तबलजी तरी त्याला खेचतो, किंवा तबलजी पळायला लागला की गायक त्याला खेचतो.. सो तिथे दोघेही बरोबरीनेच जातात.. एकाचा टेम्पो कमी जास्त झाला की दुसरा त्याला अ‍ॅडजेस्ट करुन घेतो.. प्रत्येक गाणे आधी रेकॉर्ड झालेले असेल तर त्याची लय ठरलेली असते आणि त्या लयीतच ते गाणे अपेक्षित असते. नाहीतर पन ५ मिनिटांत संपणारे गाणे ४च मिनिटांत किंवा ६ मिनिटांनी संपू शकते, आणि मग फारच फास्ट गातोय की हा, किंवा फारच हळू होतय गाणं असे प्रकार घडतात.

(पग्या, उस ड्रमर को तो हम बचपन से पेहचानते है.. Happy )

मी सगळे प्रतिसाद वाचले नाहीयेत. काही मुद्दे रिपिट होतील -
१. हर्ट - सर्वप्रथम फ्रस्त्रेट होवू नका.
२. गाणे हे शब्द, सूर आणि लयीने बनते. गाण्याला लय ताल देतो. ताल वाजविण्या साठी तबला हे साधन आहे.
३. ताल गाण्याला एक फ्रेम आणि आवर्तन देतो. जसे घड्याळाची टिक टिक सतत योग्य अंतराने आपल्याला ऐकू येते आणि त्या फ्रेम मध्ये गाणे मांडले की छान वाटते.
४. ताल आणि ठेका यात फरक आहे. तीन ताल आणि ठेका वेगळे. झप ताल आणि ठेका वेगळे, रुपक आणि ठेका वेगळे. - प्रत्येक गाण्याला एक विशिष्ट ठेका शोभून दिसतो. - तो संगीतकार निवडतात
५. संगीत ही कला 'कळण्याची' तर आहेच पण 'करण्याची' जास्त आहे. तेव्हा जितकी वाद्यावर मेहेनत कराल तितके तुमचे प्रश्न आपोआप सुटत जातील.

हर्ट एक फुकाचा सल्ला, ग्रामर शिकणे गरजेचे असते पण ग्रामर उत्तम शिकले तरी भाषा उत्तम येतच असे नाही... म्हणुन 'गो विथ द फ्लो' गाण्याचा फ्लो फील करत तो आत्मसात करायचा प्रय्त्न करावा... इमर्शन हेच उत्तर... जर संगित शास्त्र जाणुन घ्यायचे असेल स्वरज्ञान वगैरे तर य पुस्तके आणि विकि एन्ट्री आहेत... पण गायला शिकायचे असेल तर सतत गात रहाणे आणि उत्तम गाणे ऐकायला शिकणे हाच्ज उपाय आहे... इमिटेशन इज द बेस्ट लर्निंग टुल Happy

गायला सुरुवार्तला ठीक आहे. पण वाद्य वाजवायला स्वरज्ञानाशिवाय गत्यंतर नाही. अर्थात कुठेही इमिटेशन हे सुरुवात म्हणून ठीकच.

>> 'सुगम मधे असे गाणारा लय वाढवून गायला लागला तर बर्‍याच वेळा तबलजी तरी त्याला खेचतो, किंवा तबलजी पळायला लागला की गायक त्याला खेचतो'
- मला हे पटत नाही. म्हणजे ही गोष्ट घडते ही वस्तुस्थिती आहे, परंतु ती चुकिची आहे. गाणारा लय वाढवून गात असेल तर ती गाणार्‍याची चूक आहे. पण त्याला कोणत्या लयीत गायचे ह्याचे स्वातंत्र्य त्याचे आहे. तबलजीने गायकाला लय दाखवणे हा गायकाचा अपमान आहे. कारण गाण्याच्या कार्यक्रमात गायक हा केंद्रस्थानी आहे. साथीदारांनी केवळ साथ देणे अभिप्रेत आहे. जसे सोलो तबला वादनामध्ये तबला केंद्रस्थानी असतो. तेव्हा लेहरा वाजवणार्‍याने तबल्याच्या बदलत्या लयीला सांभाळून घेणे गरजेचे आहे. तिथे लेहरावाला जर तबल्याला लय दाखवायला लागला तर चालेल का?

क्वचित प्रसंगी जेव्हा गायकाला स्वतःच्या कमतरतांची जाणीव असते तेव्हा तो/ती स्वतःहून साथीदारांना लय सांभाळून घेण्याची विनंती करतात. अश्या ठिकाणी पेटीवाल्याने सूर सुचवणे किंवा तबलजीने लय खेचणे योग्य आहे. परंतू तशी काही विनंती/सूचना नसताना त्यांनी स्वतःच्या डोक्याने खेचा-खेची करणे पटत नाही.

शंतनू... अगदी अगदी.
गाण्याची लय गाणार्‍यानेच ठरवावी. तबलजीने ती कायम ठेवायची असते. गाणार्‍याने वाढवल्यास वाढवावी .. खेचल्यास खेचावी. पण जी लय गाणारा देईल ती'च' "लय"!
आणि हे शास्त्रीय, उपशास्त्रीय, भावसंगीत वगैरे सगळ्याला लागू आहे.
गाणार्‍याशी तबलजीची बरोबरी किंवा इरेसरी शक्यच नाही. असूच नये. तबला हे सपोर्ट फंक्शन आहे. "साध्या तालात गवयाला कसा खाल्ला" असल्या बढाया मारणारे साथीदार ... ह्यांना गुणीजनांच्या मैफिलीत स्थान असू नये. त्यांनी फारतर युद्धाच्या प्रसंगी ढोल बडवावेत... आणि काय ते खावेत विरुद्ध बाजूचे वीर.

किंबहुना एखाद्या अननुभवी किंवा तालात कच्च्या गायकाला बेमालूम संभाळून घेऊन मैफिलीची शान वाढवावी. गुणीजनांचे आशिर्वाद घ्यावेत. कुणालाही कुणीही "जागा" दाखवण्याच्या फंदात पडू नये. प्रत्येकाला आपापली जागा नीट माहिती असते.
(मला आत्यंतिक चीड आहे ह्या वृत्तीची)
असो...

तबला हे सपोर्ट फंक्शन आहे.

हं ..

एका तब्बलजीला एक गायक बोल्ला ... , तू सपोर्टिव्ह आहे. मी महत्वाचा आहे ! तू खाली बसुन वाजव . मी स्टेजवर राहीन. लोक मला ऐकायला येतात.

तब्बलजी बोलला ..... जर असे आहे तर मी या क्षणापासून हा तबला फेकून देत आहे .

त्याने तबला फेकून दिला व तो महान मोठ्ठा गायक बनला !

http://m.indiatoday.in/story/switched-to-singing-after-humiliation-with-...

मुग्धा पं. जसराजजींची ही कथा मीही ऐकलीये.
तरीही म्हणेन की तबला हे सपोर्ट फंक्शन'च' आहे. तबल्याने मूळ गाण्यावर कुरघोडी करू नये... किंबहुना कोणत्याच साथीच्या वाद्याने ती जुर्रत करू नये. तो गाणार्‍याचाच नव्हे तर ऐकणार्‍यांचा, मैफिलीचा ... एकुणात कलेचा अपमान आहे.

<<
एका तब्बलजीला एक गायक बोल्ला ... , तू सपोर्टिव्ह आहे. मी महत्वाचा आहे ! तू खाली बसुन वाजव . मी स्टेजवर राहीन. लोक मला ऐकायला येतात.

तब्बलजी बोलला ..... जर असे आहे तर मी या क्षणापासून हा तबला फेकून देत आहे .

त्याने तबला फेकून दिला व तो महान मोठ्ठा गायक बनला !
>>

हे असे करून त्यानी गायकाचे म्हणणे बरोबर सिद्ध केले असा अर्थ होत नाही का? मला नाही हे कारण आवडले गायक व्हायचे!

असो.. मूळ मुद्दा - एक करेक्शन - लय संगीतकार ठरवतो. गायकही नाही, वादकही नाही. गायक आणि वादक यांचे काम जसे शिकवले आहे तसे (च) गाणे, वाजविणे हे असते. या नियमाला अपवाद नक्कीच आहेत. पण तेवढी त्यांची योग्यताही आहे.

दिग्गज लोक्स लिहीत आहेत. माझी काही लिहिण्याची प्राज्ञा नाही पण एक उदाहरण देत आहे.

मेरे सांसो को जो महका रही है. हे बदलते रिश्ते मधले गाणे घ्या. यू ट्यूब वर आहे. गाणे एका वेगळ्याच तालात बांधले आहे. नेहमीचे फिल्मी ताक धिना धिन नाही. पण लता जी ज्या खूबसूरतीने व नजाकतीने तालातल्या मधल्या जागा घेउन समेवर येतात ते फार एंजॉयेबल आहे. गाण्याचे कंपोझिशन पण तसे अवघड आहे.

चित्रिकरन सामान्य आहे व महेंद्र कपूर काही मेल गायक ह्याला सूट होत नाही. सुरेश वाडकर हवे होते.
गायकाने साँग कॅरी करावे लागते ते असे.

अमा, मेरी सांसोंको... खूप सुंदर गाणं. लताबाईंनी खरच छान म्हटलय.
ताल म्हणायचा तर आठ मात्रांचा.. केहरवा.
पण धा गे ना की ना क धि न.. हा "ताल" न वाजवता ठेका वाजवलाय. म्हणजे त्या तालाचा नोक झोक ठेवून गाण्याला अनुरूप असे बोल वाजवलेत.
धीं धीं धीं ता
- धीं धीं ता

मस्तच उदाहरण दिलयस

दादरा हा ताल (६ मात्रा) म्हटला की त्याचे बोल आहेत -
धा धीं ना
धा तूं ना

पण प्रचलित झालाय तो त्याचा ठेका.
धा तींं तीं
ता धीं धीं

Pages