तबल्याविषयी/तालाविषयी काही प्रश्न!!!!

Submitted by हर्ट on 23 May, 2016 - 11:26

तालाविषयी माझे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरे लवकरात लवकर कुणी देऊ शकेल का? तुम्हा सर्व मित्रमैत्रिणींचे खूप खूप आभार.

१) समजा गाण्याचा ताल तीनताल आहे आणि जी व्यक्ती तबला वाजवत आहे ती व्यक्ती एक आवर्तन अतिशय हळूवार पण वाजवू शकते, मध्यम गतीमधेची वाजवू शकते आणि जलद गतीमधेही वाजवू शकते. म्हणजे, एक आवर्तन हे १ मिनिटात पुर्ण होऊ शकते तसे ते ३० सेकंदामधेही पुर्ण होईल. तर तबल्याची ही गती नक्की गायकाच्या आवाजावर अवलंबून असते? की ह्या गतीमधे गाणे गायचे हे आधीच संगीतकारानी ठरवलेले असते की हे तबला वाजवण्यावर ठरलेले असते?
आता आपण एक उदाहरण घेऊ, गाणे आहे - आज राणी पूर्वीची तू प्रीत तू मागू नको नको. हे गाणे कुठल्या स्केलमधे येते - संथ, जलद, मध्यम? हे गाणे मी जेंव्हा गायला सुरुवात केली तेंव्हा आधी मी मध्यम गतीने म्हंटले पण गाणे दुसर्‍या कडव्यात आले की माझी गती वाढते? असे का होते आहे?

२) पट्टी नक्की काय असते? मी सहजा समुहाने गाणे म्हणतो वर्गात कारण सहा मिळून आमचा एक वर्ग आहे. त्यामुळे कधी पट्टीचा प्रश्न आला नाही. पण जर मला सोलो गायचे असेल. आता वरचेच गाणे - आज राणी पूर्वीची तू प्रीत मागू नको - हेच गाणे मला गायचे असेल तर त्यासाठी माझी पट्टी कुठली आहे हे मला कसे कळेल? पट्टी ही गायकाच्या आवाजावर अवलंबून असते की गाण्याच्या गतीवर अवलंबून असते?

३) काळी पट्टी आणि पांढरी पट्टी ह्याबद्दल सोप्या शब्दात कुणी समजवून सांगेल का?

४) जेंव्हा आपण मैफीलीत गातो तेंव्हा समजा आपण भावगीत गात आहोत. परत वरचेच गाणे घेऊ - आज राणी -- तर हे भावगीत गाताना अमुक एक मात्रापासून सुरुवात करायला हवी की पहिल्या बीट पासून सुरवात करायची?

५) काही गाण्यांमधे तबला नसतो मग तालात कसे गायचे असते? जसे की - भय इथले संपत नाही ह्या गाण्यामधे तबल्याच्या काही बीट्स ऐकायला येतात पण अविरत तबला वाजतो आहे असे ऐकायला येत नाही. तर मग अशी गाणी गाताना ताल कसा ठरवायचा? गाण कसं गायच?

परत एकदा सर्वांचे आभार.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. स्केल म्हणजे पट्टी .... हार्मोनियमच्या काळी एकला सा पकडुन तुम्ही पुढचे सप्तक पुर्ण करुन त्या पट्टीत गाउ शकता... आता काळी एक ऐवजी काळी चार ला सा पकडुन हाच उद्योग केला की ती वरची पट्टी उर्फ हायर स्केल होइल.

२. पट्टीचे वर्णन करताना वरची खालची वगैरे शब्द येतील. संथ मध्यम जलद हे लयीशी संबंधित शब्द आहेत.

३. हार्मोनियमच्या पांढर्‍या पट्टीला पांढरी पट्टी म्हणतात व काळीला काळी म्हणतात ! Proud

१) समजा गाण्याचा ताल तीनताल आहे आणि जी व्यक्ती तबला वाजवत आहे ती व्यक्ती एक आवर्तन अतिशय हळूवार पण वाजवू शकते, मध्यम गतीमधेची वाजवू शकते आणि जलद गतीमधेही वाजवू शकते. म्हणजे, एक आवर्तन हे १ मिनिटात पुर्ण होऊ शकते तसे ते ३० सेकंदामधेही पुर्ण होईल. तर तबल्याची ही गती नक्की गायकाच्या आवाजावर अवलंबून असते? की ह्या गतीमधे गाणे गायचे हे आधीच संगीतकारानी ठरवलेले असते की हे तबला वाजवण्यावर ठरलेले असते? भावगीताची लय साधारणतः काव्य वाचल्यावर संगीतकार ठरवतात. वाचतानाच बर्‍याचदा ठेका आणि लय काय असावी हे सुचते. कधीतरीच मीटर मधे नसलेले काव्य असेल तर ठेका ठरवावा लागतो.. तबला कश्या पद्धतीत वाजवायचा हे प्रत्यक्ष गाणे वाजवताना संगीत संयोजक किंवा स्वतः तबलजी सुद्धा ठरवू शकतो.
आता आपण एक उदाहरण घेऊ, गाणे आहे - आज राणी पूर्वीची तू प्रीत तू मागू नको नको. हे गाणे कुठल्या स्केलमधे येते - संथ, जलद, मध्यम? हे गाणे मी जेंव्हा गायला सुरुवात केली तेंव्हा आधी मी मध्यम गतीने म्हंटले पण गाणे दुसर्‍या कडव्यात आले की माझी गती वाढते? असे का होते आहे?स्केल गाण्याची असते.. म्हणजे सूर.. लय नाही. लय म्हणायची असेल तर हे गाणे मध्य लयीत आहे. आणि लय पुढे मागे होती म्हणजे ताल गडबडतोय.. तो पक्का करायला पाहिजे

२) पट्टी नक्की काय असते? मी सहजा समुहाने गाणे म्हणतो वर्गात कारण सहा मिळून आमचा एक वर्ग आहे. त्यामुळे कधी पट्टीचा प्रश्न आला नाही. पण जर मला सोलो गायचे असेल. आता वरचेच गाणे - आज राणी पूर्वीची तू प्रीत मागू नको - हेच गाणे मला गायचे असेल तर त्यासाठी माझी पट्टी कुठली आहे हे मला कसे कळेल? पट्टी ही गायकाच्या आवाजावर अवलंबून असते की गाण्याच्या गतीवर अवलंबून असते? पट्टी म्हणजे कोणत्या सूरात गाणे म्हणले जाते ती. प्रत्येक गायकाची एक ठरलेली पट्टी असते. पुरुष गायकाची काळी १, पांढरी २, काळी २, पांढरी २ ह्या पैकी एक असू शकते तर स्त्री गायिकेची पांढरी ४, काळी ४, पांढरी ५, काळी ५ ह्या पैकी एक असू शकते. प्रत्येक जण कोणत्या पट्टीत सहज गाऊ शकतो ते त्याचा गुरूच योग्य पद्धतीत सांगू शकतो. स्वरयंत्रास कमीतकमी कष्टात खालचा धैवत ते वरचा गंधार हे सूर ह्या पट्टीत सुरेल गाता येतात ती जनरल ठोकताळ्यानुसार गायकाची पट्टी असू शकते. गाण्याच्या गतीचा आणि पट्टीचा काही संबंध येत नाही. भावगीत गाताना शक्यतो मूळ गाणे ज्या स्वरात रेकॉर्ड केलेले आहे त्याच स्वरात गायले जाते. क्वचितच गायकाला सूट होईल अश्या पट्टीत परत गाताना ते गाणे गायले जाते कारण बहुतेक वेळा आपल्या आवाजाला सूट होतील अशीच गाणी निवडली जातात.

३) काळी पट्टी आणि पांढरी पट्टी ह्याबद्दल सोप्या शब्दात कुणी समजवून सांगेल का? सध्यासाठी पास.. थोडा अभ्यास करुन सांगतो

४) जेंव्हा आपण मैफीलीत गातो तेंव्हा समजा आपण भावगीत गात आहोत. परत वरचेच गाणे घेऊ - आज राणी -- तर हे भावगीत गाताना अमुक एक मात्रापासून सुरुवात करायला हवी की पहिल्या बीट पासून सुरवात करायची?आधीच रेकॉर्ड झालेले गाणे असेल तर नक्की गाणे कुठल्या मात्रे पासून सुरु करायचे ते ठरलेलेच असते, त्यात काहीच बदल करता येत नाही कारण तसे केले तर गाणे बिघडेल

५) काही गाण्यांमधे तबला नसतो मग तालात कसे गायचे असते? जसे की - भय इथले संपत नाही ह्या गाण्यामधे तबल्याच्या काही बीट्स ऐकायला येतात पण अविरत तबला वाजतो आहे असे ऐकायला येत नाही. तर मग अशी गाणी गाताना ताल कसा ठरवायचा? गाण कसं गायच?तबला नसला तरी गाण्याला लय असते. त्यामुळे प्रत्यक्षात ताल वाजत नसला तरी एक अध्याहृत ताल त्या गाण्यात असतोच. आपण राष्ट्रगीत किंवा वंदे मातरम म्हणताना कुठलेच तालवाद्य नसते पण ते एका ठराविक लयीत असते त्यामुळे वेगळा ताल ठरवावा लागत नाही. आपण संस्कृत श्लोक किंवा मनाचे श्लोक म्हणताना सुद्धा तालवाद्य नसते पण ते वृत्तात असल्यामुळे जर तबला वापरुन म्हणायचे झाले तर आपोआप ताल येतोच..

हिम्सकुल, धन्यवाद. छानच माहिती दिलीस. अजून येऊ दे.

अजून काही प्रश्न : १) पट्टी ही कायम सारखीच राहते का गायकाची? ती बदलत नसते का गाण्यानुसार?
२) जर ताल कुठे संपतो/सुरु होतो हे जर नीट कळत नसेल तर अशा वेळी जर पेटीवर वाजवलेल्या ओळी कळत असतील तर पेटीच्या आधाराने गायले तर चालते का? म्हणजे माझे एक कडवे गावून झाले की मी तबल्याचे एक आवर्तन जाऊ देणार आणि मग गाणार. पण जर तबल्याचे आवर्तुन कुठे संपले हे जर कळत नसेल तर पेटीचे आवर्तन जिथे संपते तिथे लगेच सुरु करता येईल. बरोबर?

विठ्ठल, मला सम माहिती आहे. कुठलाही ताल घ्या तबल्यावर त्याची शून्य (पहिली थाप म्हणजे सम).

उदा त्रितालातः

धा धीन धीन धा
धा धीन धीन धा
धा तीन तीन ता
ता धीन धीन धा

ह्या मधे सर्वात पहिला धा.. सर्वात पहिली तबल्यावरची थाप म्हणजे 'सम'.

पण बंदीश गाताना, तुमची ओळ ही कुठुनही सुरु होऊ शकते. उदा: ती ९वा मात्रेपासून सुरु होते अर्थात तबल्यावरची नववी थाप वाजली की त्याबरोबर तुम्ही तुमचे गाणे सुरु करायचे आणि तुमचे दुसरे आवर्तन हे ९व्या मात्रेपासूनच सुरु होणार.

गाताना हा प्रकार अति अति अति किचकट आहे. वाट लागते समजवून घेताना. काही गायक पटकन कॅच करतात. माझ्या सारखे लगेच दम सोडतात Happy

मला तबला ऐकायला आवडतो पण गाताना तबला बघून / ऐकून गाणे म्हणजे एक कसरत आहे माझ्यासाठी. कधी जमेल की नाही कळत नाही. आय अ‍ॅम सो फ्रस्टेटेड Sad

१) पट्टी ही कायम सारखीच राहते का गायकाची? ती बदलत नसते का गाण्यानुसार? >>> शक्यतो सारखीच असते.. पण तिला रेंज असू शकते.. पांढरी एक ते पांढरी ३, म्हणजेच साधारण पाच पट्ट्या झाल्या.. गाण्यानुसार ह्यापैकी कुठली तरी एक चालते.. बहुतेक पुरुष गायकांची गाणी काळी १, पांढरी २, काळी २ मधेच आहे.. आणि तेव्हढी पट्टी नक्कीच बदलू शकते.. क्लासिकल गाणारे शक्यतो एकाच पट्टीत गातात.. जर आवाज खराब असेल तर कधीअरी नेहमीच्या पेक्षा खालच्या पट्टीत गातात, कारण मग तार सप्तकातले सूर नीट लागत नाहीत.. सुगम गाताना गाण्याच्या पट्टीतच परत गाणे म्हणले जाते...

२) जर ताल कुठे संपतो/सुरु होतो हे जर नीट कळत नसेल तर अशा वेळी जर पेटीवर वाजवलेल्या ओळी कळत असतील तर पेटीच्या आधाराने गायले तर चालते का? म्हणजे माझे एक कडवे गावून झाले की मी तबल्याचे एक आवर्तन जाऊ देणार आणि मग गाणार. पण जर तबल्याचे आवर्तुन कुठे संपले हे जर कळत नसेल तर पेटीचे आवर्तन जिथे संपते तिथे लगेच सुरु करता येईल. बरोबर?>.>> पेटीच्या आधाराने तालात गाणे अवघड आहे.. पेटीचा सूराचा उपयोग पुढच्या कडव्याचा पहिला सूर बरोबर पकडण्यासाठी होईल, पण ताल पकडण्यासाठी नाही. फक्त तबला पेटी घेऊन गाणे म्हणणार आहात की बाकीची पण वाद्ये आहेत? एकच आवर्तन म्हणताय म्हणून विचारतोय.. कारण मधले म्युझिक पीसेस शक्यतो एका आवर्तनात संपत नाहीत, चार तरी आवर्तन होतातच कमीत कमी.. पण फक्त पेटी तबला असेल तर एक आवर्तन झाल्यावर तबलजीला सम दाखवायला सांगायची प्रॅक्टीस करतानाच.. रुपक सोडल्यास प्रत्येक तालात तबलजीला सम दाखवणे सहज शक्य असते, आणि बहुतेक वेळा ते दाखवतातच.. तुमचे लक्ष पाहिजे नीट.. अजून एक पर्याय म्हणजे समोर ताल वाद्य लावायचे आणि त्याची आणि तबलजीची लय एकच ठेवायची.. समोर समेचा दिवा लागला की ताल बरोबर समजेल.

बंदीश कशी बांधलेली आहे त्यावर ती कुठल्या मात्रेवरुन सुरु होईल ते ठरते.. बहुसंख्य बंदिशी समेवर सुरु होणार्‍या असतात.. काहीच बंदिशी भलत्याच मात्रेवर सुरु होतात.

ताना म्हणताना समेपेक्ष वेगळ्या मात्रेवर सुरु होऊन तान संपल्यावर बरोबर समेवर बंदिशीतला अंतर्‍याची किंवा अस्थाईची ओळ पुढे म्हणयाची हा प्रकार करतात जेणेकरुन तुम्ही नुस्ते सुरातच नाही तर तालातही तितकेच तयार आहात हे दिसून येते..

केवढ आकलन कराव लागत खरच Happy ह्याला एक सेन्सच लागतो..

खूप छान समजवून सांगितल्स हिम्सकुल.

पट्टी काळी की पांढरी असो... पण क्रम वाढले म्हणजे आवाज उंच आहे असे समजायचे का? म्हणजे एखाद्या पुरुष गायकाचा वा स्त्रि गायिकेचा आवाज जर फार बारीक असेल तर त्यानुसार क्रम खाली येतात पट्ट्यांचे ??? जर अगदी छान भारदस्त असेल आपल्या पंडीत भिमसेन जोशींसारखा तर पट्टीचा क्रमांक वाढेल का?

आय अ‍ॅम सो फ्रस्टेटेड <<< बी, तुमचे प्रश्न वाचून मला असे वाटले की तुमच्या डोक्यात एकापेक्षा जास्त गोष्टी एकमेकांत मिसळून तुमचा पुरता गोंधळ उडाला आहे. असे होत असेल तर एकाच वेळी इतक्या गोष्टींमध्ये शिरू नका. आधी फक्त सोपे ताल अभ्यासण्यापासून सुरुवात करता येईल.

थोडक्या जाड आवाज खालची पट्टी
किनरा आवाज वरची पट्टी..

सहगल मुकेश वैगेरे गायक खालच्या पट्टीत गायचे... बरोबर हिम्स???

गजानन मी गाण शिकतो आहे तबला नाही आणि आमचे सर फक्त गाण शिकवतात. त्यांना अशी अपेक्षा असते की आम्हाला ताल फॉलो करता यायला हवा. मला नाही जमत. माझे असे आहे की मला काहीही शिकताना गुरु लागतोच. विनागुरु मी माझा शिकणे मला जमतच नाही. मग तो कुठलाही विषय असो मला शिक्षक लागतात. म्हणजे मार्गदर्शन करणारे, शंकाचं निरसन करणारे हवेच असतात. इथे आता तुम्ही जी माहिती देत आहात ती सुद्धा किती मोलाची वाटते.

मुग्धा, धन्यवाद. बघ मला हेही माहिती नव्हत Happy

आम्हाला ताल फॉलो करता यायला हवा. मला नाही जमत.>>>>

बी, ज्या मात्रेने सुरुवात होते तिथे ओळीचा शेवट पुन्हा जमवायचा येऊन.. म्हणजे सम गाठायची.. जर ते जमले नाही तर गाणे बेताल होते... आणि संवादिनीच्या सुरात नाही बसले तर बेसूर होते
ह्या दोन्हीचा समन्वय साधणे मह्त्वाचे!

ह्यासाठी गुरुजी साधरणत: हाताचा ठेका धरायला सांगतात टाळीच्या स्वरुपात... किंवा मांडीवर थाप मारत...
तो धरला की आपल्याला आपोआप समजते कुठे सम आहे ते...

कृष्णा, तेच तर माझ्यासोबत होते आहे. जर समोर रागिणी असेल (ई-ताल मशिन) तर मला ताल नीट जमतो. त्यानुसार मला माझी गती कमीअधिक करता येते पण तबलजी ताल देतो आहे तर मग मला शून्यच गुण मिळतात.

हाताचा ठेका, बोटानी मात्रा मोजणे, टाळी वाजवणे हे सर्व झाले आहे करुन.. ते येत मला.

गाणे शिकताना फक्त ताल लक्षात ठेवा. ते आपसुकच होईल म्हणा. संवादिनी तुम्हाला फॉलो करेल. तुमच्या आवाजाची पट्टी गुरु सांगतील आणि त्या पट्टीत गायचा रीयाझ करुन घेतील.

हाताचा ठेका, बोटानी मात्रा मोजणे, टाळी वाजवणे हे सर्व झाले आहे करुन.. ते येत मला.>>>

ह्यासाठी भरपूर साराव मह्त्वाचा... सरावाला पर्याय नाही... दिवसाला २-३ तास सातत्याने एकेक पद एकेक ताल राग घोटायचा अगदी... अर्थात मार्गदर्शना खाली नाही तर चुकीचे घोटले जायचे...

पण मी जरः

धा धीन धीन धा
धा धीन धीन धा
धा तीन तीन ता
ता धीन धीन धा

हा ताल घोट घोट घोटला तर काय फरक पडेल. मला हा ताल माहिती आहे पण मी कधी घोटला नाही. म्हणजे खूपदा म्हणून बघितला हा ताल तर काही फरक पडेल का? मी करुन पाहीन.

पांढरी एक सगळ्यात खालची पट्टी तर पांढरी ७ सगळ्यात वरची. काळ्या पट्ट्या पांढर्‍यांच्या मधे येतात..

पट्ट्यांचा क्रम - पां १, का १, पां २, का २, पां ३, पां ४, का ३, पां ५, का ४, पां ६, का ५, पां ७, प्रत्येक पट्टी आधीच्या पट्टीच्या अर्ध्या सुराने वरती असते..

पां १ - सा धरला तर पुढील प्रमाणे सूर येतात.

पां १ - सा,
का १ - कोमल रे,
पां २ - रे,
का २ - कोमल ग,
पां ३ - ग,
पां ४ - म,
का ३ - तीव्र म,
पां ५ - प,
का ४ - कोमल ध,
पां ६ - ध,
का ५ - कोमल नी ,
पां ७ - नी
पां १ - वरचा सा

मी वरती लिहिलं आहे की. पुरुषांचा आवाज पांढरी १ ते पांढरी ३ तर स्त्रियांचा आवाज पांढरी ४ ते पांढरी ७ मध्ये असतो..

सेहगल, मुकेश नक्की पट्टी माहिती नाही पण खालचीच पट्टी..

लता मंगेशकरां बद्दल ऐकलय की त्यांचा आवाज पांढरी ७ पांढरी १ ह्या पट्टीतही लागायचा.. ह्या काळी ५ च्या वरच्या पट्ट्या आहेत..

असा नाही हो...
तुम्ही तबला शिकताय? की व्होकल, की पेटी?

गाणे गायला शिकत असाल तर एखाद्या रागातील जे पद तुम्ही गाताय त्या पदाच्या संबंधीत तालावर त्याचा सराव करा..भरपूर सरावला पर्याय नाही

वा किती छान लिहिलस!! लताबाई तर महानचं आहेत.

'भय इथले संपत नाही' ह्या गाण्याचा ताल कुठला आहे? असे गाणे तर अजूनच अवघड वाटते गायला. ..

पुण्यात येऊन लोक संगीत शिकतात. परिक्षा द्यायची काय गरज आहे.. त्यात काय करीअर करायचे आहे? फक्त नीट गाता यायला हव म्हणून शिका. करा परत सुरुवात. तुमच बेसिक फार दांडग दिसत आहे.

बी, तुमची पट्टी तुमचे गुरु च तुम्हाला सांगतील.
ताल तुम्हाला शिकावा लागेल.
मला सांगा, ताल यंत्रावर गाणे म्हणताना, तुम्ही हाताने त्याचा ताल अ‍ॅडजस्ट करता का?

नसेल तर, ति पण एक चांगली प्रॅक्टीस आहे. सम आली की लाल लाईट लागतो.

तुम्ही शुद्ध स्वरांचे अलंकार , तालात म्हणुन पाहि ले आहेत का? नसेल तर मांडीवर टाळी देत , ताल यंत्रा वर ते बसवा, गाणे बसविल्या सारखे. उदा. सारे, रेग, गम इ.
सारेग, रेगम, गमप इ.

बाकी "गाते रहो"

पांढरी एक साठी स्टँडर्ड प्रिक्वेन्सी २६१.६२६ आहे.. जी जगभर एकच आहे. आणि हा सूर ८८ पट्ट्यांच्या किबोर्डवर ४ था पांढरी एकचा स्वर आहे.. आपल्याकडे पण तोच स्वर साडेतीन सप्तकाच्या पेटीतला दुसर्‍या पांढरी एकचा स्वर असतो.
खालचा पांढरी एक आणि वरचा पांढरी एक हे फ्रिक्वेन्सी वर बघितले तर वरचा सूर खालच्या सूराच्या बरोबर दुपट्ट फ्रिक्वेन्सीचा असतो.

सगळे मस्त समजावून सांगताय.
हिमांशू, तू तर भारीच. उजळणी होतेय.

बी, गाण्यासाठी शुभेच्छा. तुला कार्यक्रमात गायचे आहे का? थेट तबलजींबरोबर गाताना कसरत होत असेल तर घरात 'आज राणी'च्या कराओके ट्रॅकवर गाऊन सराव करून बघ. कुठून उचलायचं, कुठे थांबायचं ते लक्षात येईल, कान तयार होतील आणि मग कदाचित सोपं जाईल तुला.

आणि तालासोबतच गायलं पाहिजे का? नुसता तानपुरा घेऊन गायलास तर चालणार नाही का?
तालाच्या मागे मागे फिरत गाणं गाण्याचा आनंद घालवू नको.

Pages