डब्यात काय द्यायचे?

Submitted by विद्या भुतकर on 22 May, 2016 - 19:25

'जेवायला काय बनवू ही राष्ट्रीय समस्या घोषित केली पाहिजे' अशी पोस्ट कुठेतरी वाचली नुकतीच. तसेच 'रोज मुलांना डब्यात जेवायला काय द्यायचे?' ही जागतिक समस्या असली पाहीजे. Happy मी एकटी राहायचे किंवा लग्न झाल्यावरही नेहमी म्हणायचे की 'सकाळी सकाळी उठून जेवण बनवणे मला जमणार नाही." त्यामुळे अजूनही मी रात्रीच जास्त जेवण बनवून ठेवते आणि आम्हा दोघांचे डबेही भरून ठेवते. मुलं लहान होती तोवर दे-केअर लाच जेवण व्हायचे. पण आता मात्र मुलं शाळेत जायला लागल्यापासून 'डब्याला काय?' हा प्रश्न रोज उद्भवतो. आणि माझा इतक्या दिवसांचा नियम त्यांच्यासाठी मोडला आहे. रोज सकाळी आम्ही त्यांचे डब्यासाठी काहीतरी बनवून देतो.

सान्वी डे-केअर ला असताना तिथे तिला जेवणाला, भाजी, फळ, कार्ब आणि प्रोटीन असे सर्व असलेला आहार मिळायचा. त्यामुळे आम्हालाही ती पद्धत आवडली. आणि बरेच प्रयोग केल्यानंतर सध्या एक साचा तयार झाला आहे. त्यामुळे सकाळी घाईत बरेच प्रश्न सुटतात.मुलानाही त्या साच्याची सवय झाली आहे.

१. रोज मुलांना शक्यतो एक तरी भाजी किंवा सलाड देतोच. त्यात मग काकडी, टोमाटो (छोटे चेरी टोमाटो मिळतात इथे ) किंवा उकडलेले बीन्स, उकडलेली ब्रोकोली, गाजर, उकडलेले स्वीट कॉर्न यापैकी एक भाजी छोट्या डब्यात देतो.

२. रोज डब्यात एक तरी फळ देतो. त्यात द्राक्षे, सफरचंद, संत्री, कापलेल्या आंब्याच्या फोडी, स्ट्रोबेरी, पेअर, आख्खे केळ यातील जे त्या सिझनला मिळेल किंवा घरी असेल ते फळ देतो.

फळे आणि भाजी हे दोन्हीही सकाळी करतो पण रात्रीही भरून ठेवता येतात.

३. आता उरतो प्रश्न काहीतरी पोट भरण्यासाठी देण्याचा. त्यातही ते दोघे लहान असल्याने अजून भाजी-पोळी लावून खाता येत नाही. किंवा आमटी-भात किंवा पातळ कुठलीही भाजी डब्यात देता येत नाही. दोघांनाही उपमा, पोहे, शिरा आवडत नाही. त्यात दोघांच्या आवडी थोड्या थोड्या वेगळ्या आहेत. त्यांच्या शाळेत कुठलेही नट्स(शेंगदाणेही) चालत नाहीत. हे सर्व निर्बंध पाळून जेवण बनवणे म्हणजे कसरतच असते. शिवाय आपण सकाळी दिलेले जेवण दुपारी थंड झाल्यावर कसे लागेल याचाही विचार करावा लागतो. त्यामुळे बरेच पदार्थ शक्यतो सुके आहेत.

काही पदार्थ इथे देत आहे:

* मेथी, पालक किंवा आलू पराठा( आलू शकयतो कमी होतो कारण डब्यात तो मऊ पडतो. ) याला एकाला लोणचे आणि दुसऱ्याला छुंदा आवडतो. तसे ते लावून रोल करून देते. खायला सोपे पडते आणि हात जास्त खराब होत नाहीत.
* डोसा, पंधरा दिवसातून एक- दोन वेळा होतो. डोशाला तूप, चटणी आणि थोडे चीज घालून रोल करून देते.
* पास्ता, कमी चीज आणि पेस्तो सॉस घालून मोकळा करते. जास्त सॉस असलेला गोळा होतो.
* भात लावून त्याला भाज्या घालून फ्राईड राईस सारखा मोकळा बनवून देते. त्यामुळे चमच्याने खात येतो आणि थंड असला भाताला अजून चांगला रिस्पॉन्स मिळाला नाहीये. पण प्रयत्न चालू आहेत.*
* चीज सॅन्डविच, हे म्हणजे कधी उशीर झाला असेल किंवा बदल म्हणून बनवते. ब्रेड ला बटर, थोडे लोणचे आणि चीज घालून बंद करते. चीज वितळले की थोडे थंड करून डब्यात भरते. भाज्या घातल्या की ब्रेड मऊ पडतो त्यामुळे दुपारपर्यंत खाण्यासारखा राहत नाही.
* कधी कधी इडलीही दिली आहे पण प्रमाण कमी.
* कधी कधी पोळीला लोणचे किंवा जाम लावून देते.

४. नास्ता: मुलीला अजून एका डब्यात थोडे स्नाक्स द्यावे लागतात. तिला खरंतर त्यातही फळेच दिली तरी चालतात. पण आम्हीच बदल म्हणून चिवडा, चकली, खाकरा, मसाल्याची डाळ, बिस्किटे असे काही देतो. हेही कोरडेच आहे सर्व. चिप्स आणि गोळ्या-बिस्किटे अगदी कमी प्रमाणात दिली जातात.

दोघेही सलाड आणि फळे संपवतात. कधीतरी एखादा किंवा अर्धा पराठा शिल्लक राहतो. पण शक्यतो बरेचसे संपवून येतात. मुले मोठी झाल्यावर हे सर्व कदाचित बदलेलही. ते भाजी-पोळीला लावून खाऊ शकतील. पण सध्यातरी हे सर्व चालू आहेत. त्यात फळे, भाज्या आणि कार्ब असे तिन्हीही दिले जाते. आणि होते काय की एकापेक्षा जास्त डबे असल्याने सर्वातले मिळून थोडे थोडे खाल्ले तरी मुलांचे पोट भरते. निदान अगदीच उपाशी रहात नाहीत. प्रोटीन साठी अंडी उकडून डब्यात देत होतो पण सध्या दोघेही नेत नाहीत त्यामुळे ते किंवा वरण, उसळी, डाळी हे घरी असतानाच द्यावे लागते.

आपण मुलांना रोजच्या आहारात काय देतो यावर सर्वांचे लक्ष असतेच. पण शक्यतो कचरा(जंक), कोल्ड्रींक देणे टाळते. अशा गोष्टी शक्यतो घरी आणतच नाही म्हणजे खाल्ल्या जात नाहीत. सकाळी घरातून निघताना दोघांनाही ५-५ बदाम देते. कधी जेवायच्या आधी भूक लागली असेल तर काजू, बदाम किंवा अजून काही ड्रायफ्रुट खायला देते. कधी ते स्वत:हून ड्रायफ्रुट खायला मागतात. मध्ये धाकटा चिप्स हवेत म्हणून मागे लागला तेव्हा आणले होते, पण तेही संपेपर्यंत डब्यात १५ दिवसातून एकदाच असे दिले होते. असे पाकिटे किंवा बिस्किटाचे पुडे मुलांच्या हातात देत नाही, वाटीत थोडे काढून देते. असो. अशा अनेक गोष्टी आहेत. अगदी रात्रीच्या किंवा घरी असताना जेवणात काय असते यावर मोठा लेख लिहू शकते. पण आजचा मुद्दा केवळ डब्याचा होता त्यामुळे इथेच थांबते. Happy बाकी पुन्हा कधीतरी.

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/ 12565426_1032165400190768_334100372181986704_n.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाप रे बराच जुना धागा आहे स्नेहा. Happy पण छानच आहे. मला इतके सर्व करायला जमत नाही. तुझीही मुले मोठी झाली असतील आता. सध्या काय काय करतेस मग? २०११ मधे मला डब्यान्ची चिन्ता नव्हती. सुखाचे ते दिवस. Happy ड्रिमिन्ग.....

Happy

विद्या.

मी एक ऑफिसला जाणारा मुलगा आहे पण डब्यात काय हा प्रश्न माझ्याही आईला भेडसावतोच.
मात्र मी तिच्यासाठी तो फार सोपा केला आहे.

सोमवार - आदल्या रविवार रात्रीचे शिल्लक नॉनवेज सोबत भातचपाती ताजी
मंगळवार - बटाट्याची भाजी / चना वाटाणा उसळ
बुधवार - अंड्याचे प्रकार
गुरुवार - आदल्या बुधवार रात्रीचे शिल्लक नॉनवेज सोबत भातचपाती ताजी
शुक्रवार - मित्र मैत्रीणीं सोबत बाहेर हॉटेलात Happy

आता गर्लफ्रेंड शाकाहारी मिळाली असल्याने लग्नानंतर आईपासून वेगळे राहायची वेळ आली की बोंब Sad