वाय डी - इंजिनीयरींग विद्यार्थी आणि पालक

Submitted by नितीनचंद्र on 25 April, 2016 - 04:53

( ही घटना एक सत्य घटना आहे. गुरुवार दिनांक २१ एप्रीलला याची सुरवात झालेली असुन हा मुलगा लेख लिही पर्यंत परत आलेला नाही. मुद्दामच मुलाचे नाव आणि बदलले आहे )

गुरुवारी रात्री मी झोपलो असेन नसेन तोच रात्री अकरा वाजता मोबाईल खणाणला. माझा मित्र लातुरकर फोनवर होता. मला म्हणाला कपडे घालुन घराखाली ये. एक महात्वाच काम आहे. मी कपडे करुन घराच्या खाली उभा राहिलो तोच लातुरकर पोहोचला. त्याचा चेहेरा चिंताग्रस्त होता. तोंडातुन शब्द फुटत नव्हता. कसा बसा मोजकी वाक्ये बोलला की कॉलेजला जातो सांगुन चिरंजीव सकाळी गेलाय तो अद्याप घरी आलेला नाही. त्याचा मोबाईल दुपारी बारावाजेपर्यंत सुरु होता पण दुपारी चार वाजता संपर्क केला तेव्हा पासुन स्विच्ड ऑफ आहे.

लातुरकरांचा मुलगा स्वप्नील तिसर्‍या वर्षाला मॅकेनिकल इंजिनीयरींग ला शिकतो आहे. घरातुन निघुन जाण्याची ही दुसरी वेळ. पहिल्या वेळेला लातुरकरने मला तो परत आल्यावर सांगीतले. ही घटना सुध्दा मोठी चमत्कारिकच आहे. स्वप्नील पहिल्यावर्षाला असताना घरातुन निघुन गेला. लातुरकरांनी त्याच्या दिनचर्येचा अभ्यासक्रम करुन एका सैबर कॅफे वाल्याला शोधला. त्याने एकच दिवस आधी स्वप्नीलने पुणे- गोवा रेल्वेचे बुकिंग केल्याचे सांगीतले. सुदैवाने आय आर सी टी सी चे अकाउंट सैबर वाल्याचे असल्याने रेल्वे सुटण्याची वेळ , बोगी नंबर तसेच सीट नंबर माहित पडले. एका स्थानिक नगरसेवकाचा मित्र कर्मधर्म संयोगाने रेल्वे ड्रायव्हर आहे. नेमका तोच त्या दिवशी तीच गाडी चालवित होता. त्याने टी सी ला बोगी चेक करायला सांगीतले. टीसी ला स्वप्निल दिसला पण तो त्याला ताब्यात घेऊ शकत नव्हता म्हणुन मिरजेचे स्थानिक पोलीस तिथे गेले आणि त्यांनी स्वप्निलला रेल्वेतुन खाली उतरवुन ताब्यात घेतला.

पहिल्या वर्षाला स्वप्निल दोन विषयात नापास होता. घरचे रागावतील म्हणुन तो घराबाहेर पडला होता. लातुरकरांनी न रागावता त्याला दोन पर्याय खुले ठेऊन पुढे जा म्हणुन वडीलकीचा सल्ला देत धीर दिला. पहिला पर्यायात इंजिनीयरींग सोडणे व आवडीची शाखा निवडणे तर दुसर्‍या पर्यायात ए. टी के टी स्विकारुन इंजिनीयरींग शिक्षण चालु ठेवावे असे ठरले. स्वपिलने इंजिनीयरींग चालु ठेवले.

लातुरकरांनी त्याच बरोबर योगाभ्यास करण्याचे वचन मुलाकडुन घेतले आणि चक्क दुसर्‍या वर्षाला स्वप्नील पहिल्या वर्गात पास झाल्याचे मधल्या काळात मला सांगुन आनंद व्यक्त केला होता.

आज जेव्हा मी नेमके काय घडले आहे याची चौकशी केली तेव्हा तिसर्‍या वर्षाला स्वप्नील पास असुन त्यांनी पी डी एफ फाईलमधला निकाल पालकांना दाखवला. जेव्हा स्वप्नील ची आई ओरीजीनल मार्कलिस्ट हवीच म्हणुन खनपटीला बसली तेव्हा सुरवातीला त्याने ती एका मित्राकडे राहिली आहे. तो गावाला गेला आहे असे सांगुन आईला वाटेला लावले. गुरुवारी जेव्हा आई कॉलेजला येते म्हणाली तेव्हा हा कॉलेजच्या वेळेच्या आधीच घराच्या बाहेर पडला. दुपारी बारा वाजेपर्यंत माझी तोंडी परिक्षा सुरु आहे असे सांगुन त्याने आईला येण्यापासुन परावृत्त केले आणि त्यानंतर मात्र फोन बंद झाला.

लातुरकर पोलीसात जाण्यास नाखुष होते कारण मागील वेळी स्थानिक पोलीसांनी कोणतेच सहकार्य केलेले नव्हते. मी लातुरकरांना पोलीस स्टेशनला घेऊन गेलो. नेहमीप्रमाणे पोलीसांनी तो कॉलेजमधुन मिसिंग असेल तर तिथल्याच पोलीस स्टेशनला कंप्लेंट नोंदविण्याचा सल्ला दिला. मी खनपटीला बसुन एफ आय आर दाखल करुन त्यांना ब्रॉडकास्टींगवर मुलाचे वर्णन सर्वत्र कळविण्यास सांगीतले. यावर उद्याच संबंधीत अधिकारी कारवाई करतील असे सांगुन आम्हाला पाठवण्यात आले.

गुरुवारी सायंकाळी ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत किमान ५० मित्रांना फोन करुन झाला होता. कुठेही पत्ता न लागल्याने लातुरकर कुटुंबिय उपाशी पोटी आणि रडत रडत गुरुवारची रात्र कशी बशी घालवु शकले,

शुक्रवारी मी आणि लातुरकरांचा आणखी एक मित्र आधी पोलीस स्टेशनला सकाळीच पोहोचलो आणि समजले की संबंधीत सबइन्सपेक्टर यांना तात्पुरते चिंचवड हुन पुणे येते भरती मेळाव्याच्या बंदोबस्तासाठी गेल्याचे समजले. लगेचच आम्ही कॉलेज गाठले आणि तिथे जी माहिती समजली त्याने आम्ही आश्चर्य चकित झालो. लातुरकर तर मान खाली घालुन ही माहिती ऐकत होते.

मॅकेनिकल इंजिनीयरींग एच ओ डी म्हणाले की स्वप्निलचा पहिल्या वर्षाचा एक विषय अद्याप सुटलेला नाही म्हणुन दुसर्‍या वर्षाला तो जरी सर्व विषयात पास असला तरी तिसर्‍या वर्गाला त्याला प्रवेशच देण्यात आलेला नाही. तसेच तो कधिही आम्हाला गेल्या वर्षभरात दिसलेला नाही.

आमच्या कॉलेजमधे अशी अनेक मुले आहेत की जी घरी निकाल नेमकेपणाने सांगत नाहीत. पोस्टाने आम्ही निकाल पाठवत नाही. बाहेरगावची मुले पालकांकडुन फीचे पैसे मागवतात. प्रत्यक्षात अ‍ॅडमिशन झालेली नसते आणि मुले ते पैसे उडवुन शक्य तितके दिवस चैन करत रहातात.

अशासकीय इंजिनीयरींग कॉलेजमधे आजकाल प्रवेश मिळाला नाही असे होत नाही कारण उपलब्ध जागांपैकी अनेक जागा कॉलेजांची संख्या खुप असल्याने महाराष्ट्रात रिकाम्या रहातात. परिणामी इंजिनीयरींग कॉलेजला पहिल्या वर्षाला प्रवेशासाठी बारावी परिक्षा ५० % मार्कांनी पास आणि सी ई टी पास ह्या शैक्षणीक निकषाबरोबर पालकांची फी भरण्याची क्षमता असले की झाले. इंजिनीयरींगला प्रवेश मिळवणे आता फारसे अवघड नाही फक्त हव्या त्या कॉलेजमधे किंवा हव्या त्या शाखेला प्रवेश मिळणे ह्या साठी चुरस आहे.

लातुरकरांनी मग प्रो. बार्शीकरांची चौकशी केली ज्यांना स्वप्निलची आई मधुन मधुन फोन करुन स्वप्निलच्या शैक्षणीक प्रगतीची चौकशी करायची. प्रो बार्शीकर आमच्या समोरच होते. त्यांनी असा कुठला फोन घेतल्याचा इन्कार केला. आम्ही फोन नं. चेक केला असता तो बार्शीकरांचा नव्हताच असे लक्षात आले. मग हा फोन नंबर कुणाचा होता हे तपासल्यावर तो चक्क एका पास झालेल्या विद्यार्थ्याचाच होता हे समजले. सुरवातीला हा विद्यार्थी फोनवर मी बार्शीकर असल्याची बतावणी करत होता पण लगेचच त्याने स्वप्निलला मदत करायची म्हणुन स्वप्निलच्या आईला सर्वकाही ठीक असल्याचे खोटे सांगीतले हे कबुल केले.

दुसरा विद्यार्थी स्वतःहुन पुढे आला व त्यानेही मी माझ्याकडे ओरीजीनल मार्कलीस्ट असल्याचे स्वप्निलच्या आईला खोटे सांगीतल्याचे कबुल केले. शुक्रवार शनिवार आणि रविवार म्हणजे काल पर्यंत हा तिढा सुटलेला नाही.

स्वप्निल ने आपला फोन बंद केला आहे आणि अद्याप सुरु केलेला नाही. रविवारी दुपारी चिंचवड ठाण्याचे मुख्य पोलीस इन्सपेक्टर जेव्हा भेटले त्यांनी धक्का दायक माहिती पुढे केली आणि आमचे दुखः कसे शितल आहे याचा पाढा वाचला. त्यांच्या मते दिवसभरात दोन किंवा चार मिसींग केस येतात पैकी हल्ली दहावी झालेल्या किंवा न झालेल्या अल्पवयीन मुली घर सोडुन जातात असे सांगीतले. इंजिनीयरींगच्या मुलांना वाय डी झाल्यास अपमानास्पद वाटते म्हणुन ते घर सोडतात ही एक सर्वसामान्य घटना असल्याचे त्यांनी सांगीतले.

काही तांत्रीक बाबींमुळे आपली तक्रार नोंदवल्यावर वेळेवर तपास सुरु झाला नाही हे मान्य करुन सोमावरी आपण मुलाचा फोन ट्रॅकींगला पाठवु असे सांगीतले पण फोन बंद असल्यास काही उपयोग होणार नाही असेही सांगीतले. फोनचे दोन आय एम ई आय नंबर असतात पैकी एक सीम कार्ड ट्रेस करताना उपयोगी पडतो तर दुसरा मोबाईल फोन मधे जर दुसरे सीम कार्ड टाकुन तो जर पॉवर ऑन असेल तरच ट्रेस करता येतो असेही सांगीतले, जर तुम्हाला काही सुगावा लागला तर माझा स्टाफ मी मदतीला देतो तसेच त्याच्या मित्रांना पोलीस स्टेशनवर बोलाऊन काही माहीती मिळते का अशी आश्वासने घेऊन रविवारी लातुरकरांबरोबर आम्ही पोलीस स्टेशनच्या बाहेर पडलो.

स्वप्निलकडे दुसरे सीम कार्ड आहे किंवा नाही याची माहिती नाही. स्वप्निलचे फेस बुकवर ५०० च्या वर मित्र आहेत पैकी त्याचा बॅचलर असलेले आणि स्वप्निलला तात्पुरता आसरा देणारे किती असतील याची चाचपणी चालु आहे.

इंजिनीयरींग काय कोणत्याही आव्हानात्मक शाखेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्या जागरुकीकरता हे लेखन आहे.

१. आपल्या पाल्याला हे शिक्षणाचे आव्हान झेपणार आहे का ?
२. अपयश आल्यास पर्याय काय ?
३. अपयशाचा सामना आपला पाल्य कसा करणार आहे ?
४. आपण आपल्या पाल्याचे शैक्षणिक वर्षात सर्व सुरळीत चालले आहे ना हे कसे तपासणार आहात ?
५. आपले ज्ञान या शाखेचे बझ वर्ड समजण्याइतपत आहे का ?

याच बरोबर आपला पाल्य कोणत्याही शाखेत शिकत असेल आणि जरी तो सज्ञान झाला तरी काही गोष्टी आवश्यक आहेत. कारण पाश्चात्य संस्कृती मध्ये १८ वर्षे वयाचा पाल्य हा एकतर कुटुंबात रहात नाही आणि तो आर्थीक दृष्ट्या स्वतंत्र होतो.

१. आपल्या पाल्याचा मोबाईल आणि सीम कार्डचा IMEI नंबर माहित असणे.
( वरील केस मधे IMEI नंबर माहित असुनही मोबाईल फोन स्वीच्ड ऑफ असल्यामुळे त्याचे लोकेशन सापडत नाही व त्यामुळे ही केस अद्याप दि. २७/४/२०१६ रोजी दिशाहीन आहे )

२. पाल्याचे फेस बुक वरील मित्र आणि त्यांचे नेमके मैत्रीचे स्वरुप काय आहे आहे हे जाणण्याचा प्रयत्न
३. आपल्या पाल्याशी नियमीत संवाद आणि त्याची मानसीक स्थिती चे आकलन.
४. आपल्या समस्या पालकांशी बोलुन त्यावर पर्याय निघेल असा पाल्याचा विश्वास निर्माण होणे.
५. जर काही मानसीक समस्या असतील तर समुपदेशनाने त्यावर पर्याय निघु शकतो यावर पालकांचा विश्वास तसेच ही आपली जबाबदारी आहे हे स्विकारणे.

ह्या चर्चेतुन आणखी काही उपाय समजले तर मला ही काही नविन ज्ञान मिळेल या आशा सह

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पालक (मोठा भाऊ वैगरे) म्हणून कॉलेजमध्ये मित्रांना प्रेझेंट करणे, मित्राचा मोबाईल नंबर देणे, बनावट मार्कशीट बनवून घरच्यांना दाखवणे, कॉलेजसाठी म्हणून मिळणारे पैसे उडवणे-त्यातून 'मजा' करणे यासारख्या गोष्टी आजकाल सामान्य असल्यासारख्या झाल्या आहेत.हे करून आपण स्वत:लाच फसवत आहोत हे त्यावेळी लक्षात येत नाही. नंतर मात्र पश्चातापाची वेळ येते.खोटं बोलून-सांगून अडचणी वाढत जातात याउलट खरं सांगितल्यानं योग्य दिशा मिळते.
राहीली गोष्ट पालकांची तर आपल्या मुलांना आवड असणारं क्षेत्र त्यांना निवडू द्यावं मग निश्चितच मुलं त्यात मनापासून रमतात, जिद्दीनं यशाकडे वाटचाल करतात याउलट जर पालकांच्या अवाजवी अपेक्षा मुलांवर लादल्या तर मुलं कोमेजतात परिणामी अपयशी होतात आणि शेवटी अपयशाचं खापर पालकांवरच फोडतात.

Pages