अॅमेझॉनच्या जंगलात

Submitted by सुमुक्ता on 23 April, 2016 - 08:24

दक्षिण अमेरिकेची ट्रीप करायचा आमचा केव्हाचा विचार होता. पण योग जुळून येत नव्हता. काहीना काही कारणाने ट्रीप पुढे ढकलली जात होती होतो. पण अखेर ह्यावर्षी दक्षिण अमेरिकेच्या ट्रीपचा जुळून योग आला. पेरू तसा बराच मोठा देश आहे. मर्यादित सुट्टीमध्ये सगळीच्या सगळी पर्यटनस्थळे बघणे शक्यच नव्हते. त्यामुळे केवळ प्रमुख आकर्षणांना भेट द्यायची ठरली. अर्थात एक मुख्य आकर्षण होते अॅमेझॉन जंगल!!!

स्कॉटलंडहून जवळजवळ २४ तास प्रवास करून आम्ही पेरूच्या राजधानीत लिमामध्ये पोहोचलो. विमानातून उतरताच गरम हवेचा झोत जाणवला. स्कॉटलंडच्या थंडीतून आल्यावर खरेतर तो सुखद वाटायला हवा होता. पण मी आता दहा दिवस कोणत्या हवामानाचा सामना करायचा आहे त्याचाच विचार करत होते. पेरूमध्ये कोकेनचा व्यापार मुबलक माणामध्ये चालत असल्याने विमानतळावर बऱ्यापैकी कडक सुरक्षाव्यवस्था होती. विमानतळावरचे सगळे सोपस्कार आटपून आम्ही बाहेर आलो तेव्हा सकाळचे ८. १५ वाजले होते. आमची टूर दुसऱ्या दिवशी सुरु होणार होती त्यामुळे तो पूर्ण दिवस आम्ही लिमा हिंडणे आणि स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणे ह्यातच घालविला.

दुसऱ्या दिवशी सकाळी ५.३० वाजता पुन्हा लिमा विमानतळावर जायला आम्ही निघालो. दुपार पर्यंत आम्ही पोर्ट माल्डोनाडो येथे पोहोचलो. आता तीन दिवस आम्हाला अॅ्मेझॉन जंगलातील एका लॉज मध्ये राहायचे होते. पोर्ट माल्डोनाडो येथून आम्ही अॅमेझॉनची छोटी उपनदी Madre de Dios च्या काठी गेलो. तिथून एका छोट्या मोटर बसविलेल्या होडीमधून (canoe अथवा कनू) आम्हाला ३५ मिनिटे प्रवास करून Eco Amazonia नावाच्या लॉजमध्ये जायचे होते. लाइफ़ जॅकेट घालून आम्ही साधारण २०-२५ जण कनूमध्ये बसलो. नदीचे पात्र इतके भव्य होते कि कनूमध्ये बसल्या बसल्या मनात विचार आला "छोटी उपनदी एवढी आहे तर प्रत्यक्षात अॅमेझॉन केवढी दिसत असेल". मी मनातल्या मनात पुढच्या ट्रीपची योजनासुद्धा बनवून टाकली: "अॅमेझॉन क्रुझ"!!!

येथे सततच्या पावसाने नदीत कायम गाळ मिसळत असतो त्यामुळे नदीचे पाणी अतिशय गढूळ होते. पाण्याचा रंग अगदी चहाची नदी असावी असा होता. आम्ही हळूहळू कनूमधून Eco Amazonia च्या दिशेने निघालो. नदीचे अफाट पात्र, नदीच्या दोन्ही काठावर पसरलेले दाट अॅमेझॉन जंगल, वातावरणातील आर्द्रतेमुळे जाणवणारा प्रचंड उकाडा ह्या सगळ्याचा अनुभव घेत आम्ही पुढे जात होतो. पाण्यात हात बुडवायची फार इच्छा होत होती पण भीतीसुद्धा वाटत होती: एकतर गढूळ पाणी आणि त्यात न जाणो एकदम एखाद्या मगरीने येउन हात धरला तर!! पण प्रवासाच्या शेवटी शेवटी हिय्या करून पाण्यात हात बुडवून पहिलाच.

Amazon Chya Junglat_001.JPG

Eco Amazonia लॉज अगदी नदीच्या काठावर होता आणि लॉजच्या मागे अॅमेझॉन जंगल!!!! लॉजवर पोहोचेपर्यंत दुपारचे दोन वाजून गेले होते आणि भयानक भूक लागली होती. दुपारच्या जेवणाला तसा उशीरच झाला होता. लॉजमध्ये जेवण तयारच होते. चिकन आणि अंडी घालून कसलासा भात केला होता आणि केळीच्या पानासारख्या एका पानात वाढला केला होता. शाकाहारी लोकांच्या भातामध्ये चिकन आणि अंडी घातले नव्हते. सोबतीला हॅबनेरो नावाचा तिखट सॉस होता. भूक लागल्यामुळे असेल किंवा खरोखरच असेल, जेवण फारच चविष्ट लागले . जेवताना जंगलात आलो आहे असे वाटायला लावण्यासाठी जवळच एक हाउलिंग मंकी आपल्या लीला दाखवत होता. लॉजवाल्यांनी त्याचे नाव जॉर्ज ठेवले होते.

लॉजमध्ये जमिनीपासून जवळजवळ १० फूट उंचावर लाकडी कॉटेजेस बांधली होती. पूर आला तर पुराचे पाणी कॉटेजमध्ये जाऊ नये म्हणून ही व्यवस्था केली होती. आपापल्या कॉटेजेसमध्ये सामान टाकून थोडेसे फ्रेश झाल्यावर आम्ही संध्याकाळी आम्ही लॉजच्या मागच्या जंगलात जायला निघालो होतो. आमचा साधारण १५-२० लोकांचा ग्रूप होता. सततच्या पावसानी जंगलात कायम चिखल असतो म्हणून स्वत:चे बूट न घालता लॉज मध्ये मिळालेले गमबूट घालणे अनिवार्य होते. जंगलात प्रमाणाबाहेर डास असल्यामुळे बग स्प्रे मारणे सुद्धा अत्यावश्यक होते. कधीही पाउस पडण्याची शक्यता होती (त्यातच आम्ही भर पावसाळ्यात गेलो होतो) त्यामुळे रेनकोट घेऊन जाणेसुद्धा आलेच. तर असे सगळे सोपस्कार करून जंगलात जायला आम्ही तयार झालो. संध्याकाळ झाल्यामुळे १-२ तासामध्ये आम्ही परत येणार होतो. पण दुसऱ्या दिवशी आम्ही ७-८ किलोमीटर चालून जंगल तुडवणार होतो.

आमच्या अॅमेझॉन जंगलच्या सफारीला इथून सुरुवात झाली. आमच्या गाईडने आम्हाला आवश्यक त्या सूचना केल्या. त्यातील महत्वाच्या सूचना म्हणजे
१. कोणत्याही झाडाला, वेलीला, पानाला हात लाऊ नका कारण अॅमेझॉन जंगलात बहुतांश वनस्पती विषारी आहेत.
२. जंगलात पर्यटकांसाठी पायवाट केली असली तरीही प्रचंड चिखल आहे तेव्हा जपून चाला.
३. जवळ बग स्प्रे आणि पाणी ठेवा. भूक लागणार असेल तर थोडेफार खाद्यपदार्थ ठेवा
४. शांतता राखा म्हणजे जंगलाचा पुरेपूर अनुभव घेता येईल.

लॉजच्या मागच्या बाजूने आम्ही जंगलात प्रवेश करायला लागलो तोवर आमच्या स्वागताला ट्रम्पेट पक्षी आला. शातून ट्रम्पेटसारखा आवाज काढतो म्हणून त्याला "ट्रम्पेट बर्ड" असे म्हणतात. आम्ही अगदी जवळून त्याचे फोटो काढले. तेव्हा आमचा गाईड म्हणाला की अशा पक्षांचा एक परिवार लॉजच्या जवळच कायम असतो.

Amazon Chya Junglat_002.JPG

आम्ही पुढे निघालो आणि खरे जंगल चालू झाले. प्रकाश हळूहळू धूसर व्हायला लागला आणि दाट झाडी चालू झाली. पुष्कळ झाडांना वेगवेगळ्या वेलींनी वेढा दिला होता. झाडे एवढी उंच आणि त्यांची खोडे तर एवढी मोठी होती की ते पाहून आपण किती क्षुल्लक आहोत ह्याची पदोपदी जाणीव होत होती. पायवाट केली नसती तर अशा जंगलात पाउल टाकणे केवळ दुरापास्तच! पायवाटेवर माती, झाडांची वाळकी पाने आणि पावसाचे पाणी पडून प्रचंड चिखल झाला होता. घसरून पडण्याची फारच भीती होती. आम्ही खाली बघून, हळूहळू, तोल सांभाळत पुढेपुढे जात होतो. वाटेत आम्हाला विविध प्राणी, झाडे आणि वेली ह्यांची माहिती गाईडकडून मिळत होती. वेगवेगळ्या प्राण्यांचे आणि पक्षांचे आवाज तो आम्हाला ऐकवत होता. अचानक गाईडने आम्हाला थांबवून शांत राहायला सांगितले. झाडावरबसलेला वाइल्ड टर्की तो आम्हाला दाखवायला लागला. मला तर काहीच दिसले नाही. नुसत्याच झाडाच्या फांद्या. एकतर एवढी घनदाट झाडी आणि निश्चल बसलेला तो वाइल्ड टर्की. किती वेळ प्रयत्न करणार? शेवटी पुढे जायची वेळ झाली.

असेच अर्धा तास ओल्या, चिखल असलेल्या वाटा तुडवत आम्ही एका छोट्या तळ्यापाशी आलो. हा केमन नावाच्या मगरीसारख्या प्राण्याचा नर्सरी पूल होता. नर्सरी पूल म्हणजे इतर केमन्स आणि धोक्यांपासून सुरक्षित असे तळे. तेथे मादी केमन आपल्या पिल्लांना वाढविते. आमच्या गाईडने एका पिशवीमधून थोडे मांस आणले होते. तळ्याच्या काठावर ते पसरून त्याने ठेवून थोडा आवाज केला. त्या आवाजाने लगेच मादी केमन आणि तिची पिल्ले ते मांस खायला आले. पुष्कळ वेळ तिथे उभे राहून आम्हाला फोटो काढता आले.

Amazon Chya Junglat_003.JPG

अंधार पडायच्या आत आम्ही तिथून निघालो आणि लॉजवर परतलो. उद्या सकाळी ७-८ किलोमीटर ची तंगडतोड होती म्हणून लवकर जेवून झोपून गेलो. लवकर झोपायचे अजून एक कारण म्हणजे लॉजमध्ये वीज फक्त संध्याकाळी ५ ते रात्री १० एवढीच असायची. म्हणजे पंखा असेपर्यंत झोपलो तर झोप लागणार!!! भल्या पहाटे लॉजमधील हाउलिंग मंकी आणि मकाऊ च्या आवाजाने जाग आली. मकाऊ महाशय आमच्या कॉटेजच्या समोरील झाडावरच बसले होते.

Amazon Chya Junglat_004.JPG

लवकर आवरून आम्ही सफारीसाठी तयार झालो. डायनिंग हॉल मध्ये जावून भरपूर नाश्ता केला. थोडीशी फळे, चिप्स, पाणी वैगेरे बरोबरसुद्धा घेतले होते. ठरल्या वेळेवर आमचा गाईड आला आणि आम्ही लॉजमधून बाहेर पडून कनूमध्ये जाउन बसलो. सकाळची वेळ होती तेव्हा हवेत उकाडा वाटत नव्हता. १०-१५ मिनिटे कनूमधून प्रवास केल्यावर आम्ही एका ठिकाणी थांबलो. नदीचा उंचच उंच, चिखलाने भरलेला, ओला कचकचीत काठ चढून आम्ही जंगलात कसे शिरलो ते आमचे आम्हालाच माहित. जंगलात गेल्यावर खूप दिवसाचे स्वप्न पूर्ण व्हावे तशी माझी भावना झाली. नजर ठरणार नाही एवढी उंच झाडे, त्या झाडांचे जाडच्या जाड बुंधे, झाडावरून सरपटत वर चढणाऱ्या वेली, ह्या सगळ्याकडे मान उंच करून मी पहातच राहिले. निसर्गाच्या अफाट आविष्काराची ती केवळ एक झलक होती.

मजल दरमजल करीत आम्ही जंगलामधून चालायला लागलो. गाईडने आम्हाला शांतता राखायची सूचना केलीच होती. जसेजसे आम्ही जंगलात खोलवर जात होतो तसेतसे जंगल घनदाट होत होते. सूर्याचे किरण जमिनीपर्यंत पोहोचत नव्हते. थोड्या वेळाने आजूबाजूचा प्रकाश देखील आम्हाला हिरव्या रंगाचा भासायला लागला. आम्ही त्या किर्र झाडीमधून चिखलातून वाट काढत चाललो होतो आणि अचानक आमच्या गाईडने आम्हाला थांबवले ते जॅग्वारच्या पायाचे ठसे दाखविण्यासाठी.

Amazon Chya Junglat_005.JPG

साधारण बिबट्यासारखा दिसणारा पण बिबट्यापेक्षा जरा लहान प्राणी: जॅग्वार नुकताच आमच्या समोरील वाटेवरून गेलेला होता. अर्थात एवढ्या घनदाट जंगलात डोळे फाडून पहिले तरी जॅग्वार दिसणे निव्वळ अशक्यच होते. ठसे दिसले ह्याच आनंदात आम्ही पुढची वाट चालायला लागलो. थोडे पुढे गेल्यावर चिखलातून कोणी प्राणी सरपटत गेल्याचे ठसे दिसले. आमच्या गाईडने सांगितले की ते केमनचे ठसे आहेत. एखादा केमन एवढ्यातच तेथून गेला असावा. अजून थोडे पुढे गेल्यावर वाटेत अगदी हालचाल न करता चिखलात हे महाशय बसले होते. हा जवळजवळ हाताच्या वीतीएवढा मोठा बेडूकसुद्धा गाईडने दाखवला नसता तर आमच्या अकुशल डोळ्याला दिसणे अशक्यच होते.

Amazon Chya Junglat_006.JPG

आम्ही गाईडच्या मागून जात होतो आणि गाईड आम्हाला विविध प्राण्यांचे आणि पक्षांचे आवाज ऐकवत होता. जंगल इतके घनदाट होते की दिसत काहीच नव्हते; फोटो येणे तर शक्यच नव्हते. फक्त वेगवेगळ्या प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे अस्तित्व जाणवत होते. बराच वेळ काही दिसत नाही म्हणून मी जरा नाराजच होते. थोडे पुढे गेल्यावर जंगल थोडे विरळ झाले आणि आम्हाला सूर्यप्रकाश दिसायला लागला. आमच्या गाईडला कसला तरी अंदाज आला होता. त्याने अतिशय सावकाशीने, शांतता ठेवत आम्हाला पुढे यायला सांगितले. मी जशी पुढे गेले तसे आजूबाजूच्या झाडांवर काही होअॅटझीन पक्षी बसलेले दिसले. साधारण एका मोठ्या कोंबड्याच्या आकाराच्या, तपकिरी रंगाच्या, डौलदार तुरा असणाऱ्या ह्या पक्ष्याचे वैशिष्ट्य म्हणजे पिल्लू असताना ह्याच्या पंखांवर नख्या असतात. ह्या नख्यांचा वापर करूनत्यांना झाडावर चढता येते. पूर्ण वाढ झालेले होअॅटझीन पक्षी अतिशय सुरेख आणि डौलदार दिसतात

Amazon Chya Junglat_007.JPG

होअॅटझीनचे फोटो आणि व्हिडीओ काढून झाल्यावर आम्ही पुढे चालायला लागलो. थोड्या वेळाने पुन्हा आमच्या गाईडने आम्हाला थांबवले आणि आमच्या डावीकडच्या बाजूने थोडे जंगलात यायला सांगितले. आम्ही थोडे आतमधील बाजूस गेलो अन बघतो तर काय जवळ जवळ ६००-७०० वर्ष वयाचे एक झाड मोठे दिमाखाने तिथे उभे होते. आमच्या गटातील सर्व लोक (जवळजवळ २०-२५ जण) ओळ करून ह्या झाडाच्या खोडासमोर थांबले तरी झाडाचे खोड मोठेच होते. निसर्गाचा हा चमत्कार मी आजपर्यंत केवळ ऐकला होता पण आज डोळ्याने पहिला. निसर्गापुढे माणूस खरोखर किती क्षुल्लक आहे ह्याची पुन्हा नव्याने जाणीव झाली. अशी किंवा ह्याहीपेक्षा मोठी, वयाने जास्त असलेली झाडे अॅमेझॉनच्या या अफाट जंगलात आहेत.

Amazon Chya Junglat_008.jpg

त्या झाडाजवळून हलावेसे वाटत नव्हते पण वेळ कमी होता आणि पुढे जात राहणे गरजेचे होते. जवळजवळ अर्धे अंतर कापून गेल्यावर आम्ही विसाव्यासाठी थोडा वेळ थांबलो. तिथे जवळच एक उंचच उंच लाकडाचा प्लॅटफॉर्म बांधला होता. आमचा विसावा घेऊन झाल्यावर आम्ही सर्वजण त्या प्लॅटफॉर्मवर चढून गेलो. वरूनजंगलाच्या थोड्या भागाचे विहंगम दृश्य दिसत होते. समोर हिरवेगार जंगल पसरलेले होती आणि थोड्या वेळापूर्वी नजर न ठरणारी उंचच उंच झाले लहानखुरी दिसायला लागली. निसर्गावर मात करण्याचा माणसाचा हा प्रयत्न असेल का अशा विचारात मी पडले. पण कितीही झाले तरी निसर्गाचे आत्ताच अनुभवलेले अफाट रूप त्याच्या सर्वश्रेष्ठतेचा विसर पडू देत नव्हते. निसर्गावर मात करण्याचे मानवाचे प्रयत्न काहीही केले तरी तोकडेच पडतील हे निश्चित!!

Amazon Chya Junglat_009.JPG

प्लॅटफॉर्मवरून उतरून आम्ही जंगलात पुढे चालायला लागलो आता पाणथळ जागेतून आम्हाला पुढे जायचे होते. पाण्यावर थोडे उंच फळ्या टाकून एक अरुंद पूल तयार केला होता त्यावरून चालत जायचे होते. एकतर फळ्या अतिशय अरुंद होत्या , त्यात बऱ्याच ठीकाणी फळ्यांना चिरा पडलेल्या होते , एका फळीवर एकापेक्षा अधिक माणसे उभे राहू शकत नव्हती, अनेक फळ्यांवर शेवाळे साचून निसरडे झालेले होते , आजूबाजूच्या कोणत्याही झाडाला हात लावून आधार घ्यायची सोय नव्हती, खाली पाणी आणि पाण्यात न जाणो कोणकोणते प्राणी, अशा अवस्थेत त्या पुलावरून चालायला आम्ही सुरुवात केली. मध्येच थांबत, फोटो काढत एकमेकांना सावध करत पुढेपुढे जात होतो. मला वाटले की थोडाच वेळ असे चालायचे आहे पण जवळजवळ आम्ही अर्धा ते पाऊण तास त्या पुलावरून चाललो होतो. आमच्या नशिबाने कोणतीही पडझड न होता सगळे सुखरूप त्या पुलाच्या दुसऱ्या बाजूस पोहोचले.

Amazon Chya Junglat_010.JPG

एकदाचा पूल संपला आणि आम्ही एका तळ्याच्या काठावर आलो. तिथे एका छोट्या होडीमध्ये बसून आम्ही जंगलाचा आनंद घेणार होतो. चालून चालून पाय दुखत होते त्यामुळे होडीमध्ये बसायला मिळाल्यावर आम्ही सगळेच खूप आनंदात होतो. पाण्याच्या जवळ असूनसुद्धा वारा पडला असल्यामुळे भयानक उकडत होते. दमट हवा अजूनच दमट झाल्यासारखी वाटत होती. होडी मधून आम्ही पाण्यातील अनेक प्रकारची कासवे, आजूबाजूच्या झाडांवरील वेगवेगळे पक्षी, फुलपाखरे बघत जात होतो.

Amazon Chya Junglat_011.JPG

अचानक आभाळ भरून आले आणि पावसाचे टपोरे थेंब पडायला लागले. आमच्या जवळचा रेनकोट बाहेर काढेपर्यंत पावसाची भलीमोठी सर आली आम्ही चिंब भिजलो. मघाचा उकाडा पार पळून गेला होता. होडीत बसल्या बसल्या आम्ही मुसळधार पावसात भिजायचा आनंद घेत होतो. थोड्या वेळाने जितका अचानक आला तितकाच अचानक पाऊस थांबला. प्रसन्न मनाने होडीतून उतरून आम्ही परतीच्या वाटेला लागलो. पुन्हा फळ्यांचा पूल पार करण्याचे दिव्य केले आणि मग मात्र आम्ही जवळचा रस्ता पकडून आमच्या कनूजवळ परत आलो.

लॉजवर पोहोचल्या पोहोचल्या आम्हाला कडकडून भूक लागली आणि कॉटेज मध्ये जायच्या आधीच आम्ही जेवण करण्यासाठी पळालो. रात्री झोपताना दिवसभराच्या जंगल सफरीच्या आठवणी काढत असताना काय पहिले पेक्षा काय अनुभवले हेसुद्धा खूप महत्वाचे असू शकते ह्याची प्रकर्षाने जाणीव झाली आणि मग कळले की अॅमेझॉनचे जंगल बघायचे नसतेच!!!! ते ऐकायचे आणि अनुभवायचे असते !!

===========================================

पूर्वप्रकशित - युरोपियन मराठी संमेलन २०१६ स्मरणिका - आनंदयात्री

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हं! लेखन वाचताना अगदी श्वास भरभरुन घेतला, कारण अ‍ॅमेझॉन म्हणजे काय हे जेव्हा एन जी ओ आणी अ‍ॅनिमल प्लॅनेट् वर पाहीले तेव्हा समजले. नुसताच भूगोल वाचुन काय होणार?

सुमुक्ता, सुरेख सफर घडलीय तुम्हाला. अजून काही वर्णन व फोटो असतील तर येऊ द्याच. तुमचे लेखन वैविध्यपूर्ण आणी नाविन्याने भरलेले असते. छान लिहीता तुम्ही. फोटो तर अतीशय छान आलेत.

खूप सुंदर लिहिलेय....

अमेझॉनच्या जंगलात असे फिरता येते हेच मला आश्चर्य वाटते. त्या जंगलात नाना तर्हेचे प्राणी, सरपटणारे धरून असणार, पायी चालताना धोका नाही का माणसांना?

मस्त लिहिलयं वर्णन, फोटो अजुन आणि जरा मोठे हवे होते.
त्यात न जाणो एकदम एखाद्या मगरीने येउन हात धरला तर!! >>> चावटच आहेत की मगरी Proud

"अ‍ॅमेझॉन रेनफॉरेस्ट" संदर्भात नॅशनल जिऑग्राफिक मॅगेझिनच्या माध्यमातून वाचत होत असे, त्यावरून तेथील जादूमय तसेच विविध प्राण्यांच्या कथांचे वर्णन नजरेसमोर उभे राहायचे. जगातील बहुतांशी पर्यटकांचे लोंढे ब्राझिल, पेरूकडे गेले म्हणजे त्यांच्या प्रवास यादीत अ‍ॅमेझॉन आपसूकच येते. सुमुक्ता यानी अतिशय आत्मियतेने प्रवास वर्णन केले आहे; इतक्या त्या आणि त्यांच्या सोबतीला असलेला परिवार तेथील वातावरणामुळे मुग्ध होऊन गेला आहे हे दिसते आहेच. तिथे मिळालेल्या जेवणाचेही त्यानी मनापासून कौतुक करून त्याचा लाभ घेतला हे वाचून जास्त आनंद झाला....प्रवासाला गेल्यावर अशीच वृत्ती ठेवावी...जे मिळते तेच तेथील लोकही ग्रहण करत असतात हे समजून घेतले म्हणजे तेथील आमटीला आपल्या घरची चव येतेच.

सारेच फोटो अतिशय छान आले आहेत....विशेषतः त्या अवाढव्य झाडाचा.

सुमुक्ता, वर्णन नेहमीप्रमाणे छान लिहिले आहे पण फोटो मात्र एकदम साधे आणि म्लान दिसताहेत बहुतेक असेच येत असावेत तिथले फोटो.

झाडावर उंचच उंच प्लॅटफॉर्म म्हणजे बहुतेक मचान असावे.

ओला कचकचीत काठ>> कचकचीत शब्द खूप छान. नक्की माझ्या कवितेत हा शब्द येईलच आता.

मस्त लिहिले आहे. आवडले. पण मला बहुदा तिकडे जायची भीती वाटेल एकुणच प्राणी आणि किडेमकोडे यांची मला भीती वाटते Sad

अवांतर - सध्या मटामधे संदीपा-चेतन यांची पण हीच सफर चालू अहे. त्याची आठवण झाली.

खरंच काय अनुभव असेन हा.मोठे झाड तर किती तरी वेळ टक लावुन पाहात होते.खुपच अवाढव्य..
मस्त सफर झालीये तुमची. Happy

सुरेख लिहिलं आहेत. वाचायला मजा आली. आणखी सविस्तर लिहिलंत तर आम्ही वाचायला उत्सुक आहोत.

झाडाचा आकार बघून छातीच दडपते! आणि अशा निसर्गसंपत्तीचा आपण नाश करंत आहोत या जाणिवेनी खिन्न व्हायला होतं.

कोणीतरी म्हटलं आहे - We are winning our battles with nature, and losing the war.

मस्त लिहीले आहे तुम्ही.
बोर्नियोच्या जंगलात फिरायचा अनुभव आहे. अगदी बराचसा अस्साच. प्राणी/ पक्षी जरा वेगळे पण अनुभवांची जातकुळी अशीच. इको लॉज पण अस्सेच, आणि भलेथोरले मोठ्ठाले पर्जन्य वृक्षही. Happy
अमेझॉन नंतरचे मोठे जंगल बोर्नियोचे.

जायला हवे एकदा अमेझॉन च्या जंगलातही.

सुरेख लिहिलं आहेत. वाचायला मजा आली. आणखी सविस्तर लिहिलंत तर आम्ही वाचायला उत्सुक आहोत. >>>>>>>>> +११११११११

अ‍ॅमेझॉन जंगल या शब्दातच एक विलक्षण जादू आहे असे वाटते ....

Pages