गाव

Submitted by अनिश्का. on 22 April, 2016 - 04:18

आज दुपारी खिडकीतुन बाहेरच्या रखरखाटाकडे पाहताना उगीचच गावची आठवण झाली. लहानपणी म्हणजे अगदी बारावीची परिक्षा देईपर्यंत उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे अलिबाग हे ठ र ले लं .
परिक्षा चालु असतानाच गावी गेलो की हे करु ते करु याचे प्लॅनिंग्स मनात चालु असायचे.
परिक्षा संपली रे संपली की येणारा संडे पकडुन बाबा माझी आणि भावाची रवानगी गावी करायचे....
आहाहा उद्या गावी जायचं या विचाराने मी पहाटेचा ३.३० चा अलार्म कधी होतोय याची वाट पाहत टक्क जागी असायचे.
उठुन अंघो-बिंघोळ करुन १५ मिनीटात तयार . मम्मी ला टाटा करुन 5 पर्यंत बाहेर पडलं की स्टेशन पर्यंत चालत जाताना रस्त्यावरचा शुकशुकाट मला आवडायचा. ( कोणाला कितीही वियर्ड वाटलं तरी पहाटेच्या वेळेस सामसुम रस्त्यावरून चालणं मला मनापासुन आवडतं )
ट्रेन पकडुन सँडहर्स्ट रोड आणि तिथुन भाऊ चा धक्का. बस मधुन नाकाला खारा खारा वास जाणवला की कळायचं धक्का आला ते.
ईथली धावपळ , मासेविक्रेत्यांची लगबग , मच्छी चा पसरलेला वास , समुद्रातुन डाव्या बाजुला दिसणारा ऊरण चा डोंगर हे सर्व का कुणास ठाऊक मला विलक्षण आवडायचं.
तसा समुद्र मला फारसा आवडत नाही पण बोटीतुन जाण्याशिवाय दुसरा आॅप्शन नव्हता. तसं एस्टी हा एक आॅप्शन होता पण त्यापेक्षा बोट बरी. नशिबाने बोट लागणे वगैरे प्रकार माझ्यासोबत झाले नाहीत. आणि हो तेव्हा म्हणजे २००३ पर्यंत गेट वे आॅ़फ ईंडिया वरुन अजिंठा , मालदार वगैरे बोट सर्व्हीस चालु नव्हती झाली .
गावी आजी कडे तर काय मजाच मजा. माझं गाव कोप्रोली हे रेवस पासुन 10 मिनिटे आणि अलिबाग सिटी पासुन ४५ मिनीटे अंतरावर वसलेलं आहे. फार्फार तर १५०-२०० उंबर्यांचं.
आमचं ४ खणी घर , पुढे अंगण , मागे पाण्याची विहीर...... गार आणि गोड पाण्याची. आणि शेजारीच अंबादेवीचं मंदिर.

माझी मावस बहिण पुर्वा आणि मी अशी आमची जोडी. अख्खी सुट्टी आम्ही दोघी धमाल करायचो. रोज सकाळी उठुन नित्यक्रम आटोपलं की बाहेर पडवीतल्या पायर्यांमधे बसणं मला आवडायचं.
सकाळी सकाळी पडलेलं दवं, त्यामुळे थोडं ओलसर झालेलं वातावरण ..... आणि हो, समोरच असलेला प्राजक्त...... त्याची एकुण एक फुलं खाली जमिनीवर पडलेली असायची. ती किंचीत ओलसर , सुगंधी फुलं सर्वच्या सर्व गोळा करायची आमची धांदल उडायची. थोडी फुलं घरातल्या देवांना देऊन बाकीची देवळात न्यायला. अंबादेवीचं देऊळ १०० वर्षे किंवा त्याहुन अधिक जुनं. साधीशी कौलारु बांधणी , अंधारा पण थंड गाभारा , देविची मुर्ती , बाजुला शिवपिंडी आणि वर खुप खुप लहान मोठ्या घंटा.. आणि त्या सर्वच्या सर्व वाजवायच्याच हा आमचा शिरस्ता. या देवळात आम्ही खेळतही असु आणि काही टाॅप सिक्रेट्स शेअर करायची असतील तर तीही इथेच. देवीच्या मुर्ती मागे एक खोली होती ती नेहमी बंद असायची. त्यात एक पेटी असणार आणि त्या पेटीत कोणाला तरी बंद करुन ठेवलेलं असणार अाणि तिथे गेलं की त्यातुन हात बाहेर येणार अशी माझी पक्की धारणा होती. म्हणुन मी तिथे कधी जायचेच नाही. नंतर ती खोली देवीच्या वार्षिक पुजेला प्रसाद वगैरे बनवण्यासाठी उपयोगात आणतात हे समजलं . तरी पण त्या खोलीबद्दलची धास्ती कमी झाली नव्हती कितीतरी वर्ष.
दुपारची जेवणं झाली की आजोबा कधी झोपतायत याची आम्ही वाट पहायचो. एकतर दुपारी आम्ही बाहेर पडलेलं त्यांना चालायचं नाही आणि घरात बसुन खुसरफुसर करुन त्यांची झोपमोड केलेलीही त्यांना खपायची नाही. असं झालंच कधी तर मात्र वाट लागायची. मिळणारा ओरडा तर जबराट असायचा. शिवाय तेव्हा चुकुन कोणी पाहुणे वगैरे आलेले असतील तर विशेष बहार. अश्या वेळी पाहुणे पण तो कार्यक्रम मनापासुन एंजाॅय करत असावेत असं वाटायचं.
म्हणुन मग आम्ही माळ्यावर बसुन हॅहॅहुहु करायचो आणि त्याचाही कंटाळा आला की मग घरामागच्या डोंगरावर करवंद काढायला जायचो. १५ वर्षापुर्वी पर्यंत खुप करवंद मिळायची. तो डोंगर एका दमात आणि धावतच चढायचा हा नियम होता. खुप करवंद काढायची, कितीही काटे लागले, रक्त आलं तरी घाबरायचं नाही. मन भरुन करवंद खायची , त्यातही , " ए सांग ना, कोंबडा की कोंबडी " असं करत, समोरच्याला पिडत ती संपवायची. आणि घरी परतताना गाडीवाल्या भैया कडुन आठआण्याचा बर्फाचा गोळा , किंवा कुल्फीवाल्या काकांकडुन कुल्फी खायची. हे लोक हायजीन ठेवतात का, किंवा गावोगाव फिरताना निसर्ग नियम पुर्ण केले की ते हात वगैरे कशाने धुतात वगैरे फालतु विचार मनात आणायचे नाहीत. ९९% काही होत नाही.
उरलेल्या वेळात आजीला पाणी भरण्यात , भांडी घासण्यात मदत करायचो.
गावात किंवा दुसरीकडे कोणाकडे लग्न असेल तर आजोबांसोबत आम्हीही जायचो. पुर्वी गावातली लग्न हल्ली च्या लग्नांसारखी पाॅश नसत. लग्न लागलं की पाहुण्यांना रंगीबेरंगी प्लास्टिक च्या ग्लासातुन कोकम नाहीतर अजुन कुठलं तरी सरबत वाटलं जाई किंवा मग काचेच्या बाटल्यांमधुन आॅरेंज आणि लेमन साॅफ्ट ड्रिंक. या सरबतांना ब्रँड्स, नाव, गाव, फळ, फुल काही नसायचं. पण लोकं आणि आम्हीही ते आवडीने पीत असु. क्वचित कधी कोणाच्या लग्नात आईस्क्रीम ही असायचं.
कैर्या, आंबे, चिंचा खाण्यात एक महिना कसा जायचा हे कळायचं नाही.
गावावरुन निघताना मन थोडं उदास असायचं पण गणपतीला परत यायचंच आहे हा दिलासा ही असायचा.
आज आम्ही सगळे मोठे झालो, लग्नं झाली, पर्यायाने गावी येणं कमी कमी होत गेलं. या सर्वात गावही खुप बदललं. आज माझ्या लहानपणाच्या खुणा शोधुनही सापडत नाही. आणि अजुन एक खंत वाटते ती म्हणजे मी अनुभवलेल्या छानछान गोष्टी माझ्या मुलीला अनुभवायला मिळणार नाहीत.
पण मी ठरवलंय की तीला वेळात वेळ काढुन गावी न्यायचं दर वर्षी. कोणी सांगावं तीच्या सोबत ते सर्व क्षण परत माझ्याही वाट्याला येतील.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलं आहेत. आम्हाला सगळ्यांना नॉस्टॅल्जिया देणार की तुम्ही!

"आणि अजुन एक खंत वाटते ती म्हणजे मी अनुभवलेल्या छानछान गोष्टी माझ्या मुलीला अनुभवायला मिळणार नाहीत.">> खरं आहे. आपण जसजसे मोठे होतो तसं हे आपल्याला पुन्हा अनुभवायला मिळणार नाही याबद्दल वाईट वाटण्याचं कारण नाही. पण ते कोणालाच मिळणार नाही ही खरी शोकांतिका आहे.

मस्त. ते कोंबडा का कोंबडी आम्हीही लहानपणी विचारल्याचे आठवते. पण नक्की काय होते ते लक्षात नाही.

सर्वात पहिले थँक्यु सर्वांना. मला छान छान कमेंट्स दिल्याबद्दल.
फारएण्ड - करवंद भडक लाल असेल तर कोंबडा आणि फीकं लाल / गुलाबी असेल तर कोंबडी .

मस्त आठवणी ,
ते कोंबडा कोंबडी विसर्लोच होतो, बरं झालं आठवण करुन दिलीत , जेव्हा कधी करवंद खायला मिळतील त्यावेळेस नक्की पाहीन.

मस्त लिहिले आहे.
कोकणमेवा करवंदांसोबत कोंबडा कोंबडी केलेय आम्हीही.
रस्त्यावरचा गोळा किंवा चम्मच खाताना हायजिनचा प्रश्न तेव्हा कधी डोक्यात आला नाही. हल्ली रस्त्यावर गोळा म्हटले की कसले ते पाणी असणार, चान्सच नाही खायचा. आणि मग मॉलमधील मिनरल वॉटरच्या गोळ्यात ती गोळा खायची मजा येत नाही.. गोळ्याची मजा क्रिकेट खेळून दमल्यावरच .. आणि शाळा सुटल्यावर चिंचकैर्या हॉटडॉग वडापाव .. लग्नातल्या कोल्ड्रींक आईसक्रीमची गंमत आणि त्याचे किस्से एकेक आमची आई सांगायची.

आणि हो, ते समुद्राचा कम सुकटाचा खारा वास, धक्क्याला लागलेल्या बोटी माझ्याही आवडीच्या..
तसेच ते पहाटेच्या कोवळ्या अंधारात सामसूम रस्त्यावरून खास करून कानाला झोंबणार्‍या गुलाबी थंडीच्या वातावरणात ताडताड पावले टाकत प्रवासाला निघणे याबद्दलही सेम पिंच .. रिकाम्या बिनगर्दीच्या ट्रेन आणि स्टेशनच्या स्टॉलवर कटींग चहा मारणे यासारखे रिफ्रेशिंग वातावरण दुसरे नसावे ..