ऐका!

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

काल असाच मल्हारी मार्तंड शिनुमा आठवला.

'फड सांभाळ तुर्‍याला गं आला' आणि 'पदरावरती जरतारीचा' यासोबत त्यातला सवाल-जवाब आठवला. आपल्याला फडाने जे काही दिलं त्यातला एक अस्सल हिरा म्हणजे सवाल-जवाब. सवाल-जवाबात काय नसते? उत्स्फुर्तता, चुरस, हार, जीत, कथन, गायन, वादन, नर्तन, कसदार अभिनय आणि अर्थातच रसभरीत काव्याच्या लडींमध्ये गुंफलेले सवाल. आणि त्यांचे त्याच तोलामोलाच्या फटकार्‍यांनी नटलेले हजरजबाबी जवाब. समोर बसलेल्या मायबाप रसिकांच्या निखळ मनोरंजनास गालबोट लागू न देता, आपल्या बुद्धीचातुर्याने प्रतिस्पर्ध्याला खिजवून खिजवून कसे जेरीला आणावे, याचा उत्तम नमुना. देहबोली आणि संवादफेकीचा यात अनन्यसाधारण हिस्सा. हाडाच्या कलाकाराशिवाय काम नाही! मुख्य सादरकर्यांसह फोडणीला साथीदारांचे खमंग संवांद आणि लज्जतदार अभिनय असल्यावर अशा रंगलेल्या फडात रसिक न्हाऊन न गेला तर नवलच!

हे एक उदाहरण -

सवाल-जबाब
बकुळा (सवाल):
एक दाताचा दो मातांचा तिना आगळ्या गोताचा
चार भुजांचा देव कोण गं... पाच थुलथुलीत हाताचा?
(जी... जी जी रं जी... जी रं जी रं जी जी जी)

चमेली (जवाब):
कोण लाभला गुरू येवढा, प्यालीस अक्कलकाढा गं
शाहीरकीच्या उजळणीतला हा तर पहिला पाढा गं

एकदंत श्री गजाननाला कोण ओळखीत नाही गं?
सती पार्वती पहिली माता दुसरी गंगामाई गं

सत्वरजातून देव वेगळा ही शास्त्राची वाणी गं
चारभुजासह सोंडही त्याची असते हातावाणी गं
जी रं दाजी जी रं जी जी

बकुळा:
अगं नकोस हरखून जाऊ, मी हा सवाल नव्हता केला गं
अगं रीत पाळली, स्मरण गणा ते केले आरंभाला गं
जी रं दाजी जी रं जी जी

चमेली : [हं... ठीक ठीक. आता मी सवाल टाकते. दे उत्तर!]

(सवाल)
सवाल करीते ऐक वैरीणी, उघडून पडदा कानाचा
सभेदेखता गर्व उतरीते तुझ्या अर्धवट ज्ञानाचा

(सावळ्या - बकुळीचा नाच्या : अहाहाहाहा! अवं चमेलीबाई, आता सवाल बोला की.. का उगंच नमनात त्याल जाळतायसा..)

चमेली:
शंकरदर्शन करण्यासाठी नारद गेले कैलासा
ढगबिजलीचा जोडा दिसला मंदिरात त्या सांग कसा?

बकुळा (जवाब):
हलाहला ते प्याल्यापासून कंठ शिवाचा होय नीळा
अंगावरती वसे अंबिका, तिने घातला हात गळा

नीलकण्ठाच्या गळ्यात नाचे चपल हात गं गौरीचा
ढगात बिजलीपरी नारदा असेल दिसला बहरीचा

बकुळा (सवाल):
सवाल पुसते एक तुला मी
उत्तर त्याचे सांग भले
ना तर काढून फेक चाळ ते
तुझ्या कलेचे चांगभले !
(जी जी जीजी जी)

तुझ्या जोगता सवाल बाई
अगदी सरळा साधा गं
वडीलमंडळी समक्ष हरीने
कशी चुंबिली राधा गं ?
(जी रं जी रं हा.. जी रं जी रं हा... जी रं जी रं.. जी जी जी )

चमेली (जवाब):
सांगते ऐक!
धूळ उडाली अशा मिषाने
राधा डोळे चोळी गं
फुंकरीचे मग निमित्त काढून
जवळी ये वनमाळी गं
(जी जी जीजी जी)

ओठ पापण्या यांची मिळणी
सहज साधिली मौजेची
म्हातार्‍यांना काय दिसावे
वेळ आंधळी सांजेची
(जी रं जी रं हा.. जी रं जी रं हा... जी रं जी रं.. जी जी जी )

चमेली: हं... आता माझा सवाल सोडव

बकुळा: सांग की!

चमेली (सवाल):
भिडेल त्याचा पडेल तुकडा
असा धर्म गं बाणाचा
नेम साधता जीव जोडतो
असा बाण गं कोणाचा?
(जी जी जीजी जी)

बकुळा (जवाब):
भिडेल त्याला समूळ छेदील
असा बाण गं रामाचा SSSS
अन् नेम साधता जीव जोडतो
असा बाण गं कामाचा !

( एक रसिकः वा वा सामना अटीतटीचा हाय बर्का!
पाटीलः हायंच हां.. आता सवाल बकुळीला टाकू द्या!
पंचः बकुळाबाई करा सुरुवात आता.)

बकुळा (सवाल):
ऐका!
पाच शेपट्या चार अंचळे
बावीस होते पाय गं
रणांगणावर उभी राहिली
सात शिरांची गाय (जी जी रं जी जी रं जीजी)

त्या गायीचे दूध न सरले
युगे संपली दोन गं
सांग कविच्या कन्ये मजसी
ही गायत्री कोण गं? (जी जी रं दाजी जी रं जीजी)

(चमेली गोंधळते... रडकुंडीला येते.. तिला उत्तर सुचत नाही. बकुळीचा नाच्या हात नाचवत खवचटपणे 'आवं चमेलीबाई... आता.... बोला की!' म्हणून खिजवून तिच्या हरण्यावर मीठ चोळतो.)

चमेली: (बकुळीला उद्देशून चडफडत)

तुझे तुला तरी या प्रश्नाचे
उत्तर सुचते काय?

बकुळी:
हरले म्हणूनी नाक घासशील,
धरशील का हे पाय?

( चीत झालेली चमेली उत्तराच्या आशेने साथीदारांकडं नजर टाकते. पण एकेकजण नजर वळवतो. चमेली हार मान्य करते. बाळासाहेब. तिला शिव्या घालत चडफडत फडातून उठून जातो. गुलाबराव आणि सारे रसिल बकुळीला शाबासकी देतात आणि उत्तर ऐकवण्यास सांगतात.)

बकुळी: ऐका!

अर्जुनाच्या रथाला चार घोडी. त्यात तीन महापुरुष -
श्रीकृष्ण सारथी, अर्जुन रथी
आणि रथाच्या ध्वजाशी मारुती

चार घोड्यांची सोळा, तीन पुरुषांची सहा पाय झाले बावीस.
चार घोड्यांच्या चार शेपट्या एक मारुतीरायाची
घोड्याला स्तन नाही. अर्जुनाला स्तन नाही.
श्रीकृष्ण आणि मारुती.. मिळून स्तनसंख्या झाली चार.
या अर्जुनाच्या रथानेच कुरुक्षेत्रात गीतातत्त्वाचे दूध जन्माला घातले ते अजून पुरते आहे.

ऐका!
कृष्ण सारथी रथी धनंजय
ध्वजावरी हनुमान
कुरुक्षेत्रीच्या रथा दिले मी
गायीचे उपमान
त्या गायीचे दूध न सरले
गीता त्याचे नाव
जाणकार ते समजून घेतील
माझ्या मनीचा भाव (दाजी जी रं जी रं दाजी जीजी)

* * *

हा दुसरा 'गणगौळणी'तला सवालजवाब -
(दोन कलावंतीणी आपापल्या साथीदारांच्या ताफ्यांसह मंचावर सज्ज आहेत. सवाल जयश्री गडकरने टाकलाय.)

(तिची प्रतिस्पर्धी)
>>ऐका!
अहो, कलगीवाले! काय तो सवाल पुन्हा एकदा सांगा.

('काय तो' असे संबोधण्यातच समोरचीच्या सवालाकडे एक छुपा तु.क. हाणलाय बरे का!
ज.ग. च्या बाजूचा नाच्या खवचटपणे पुढे होऊन)
>> आँ! का गं इतक्यात इसारलीस?

आगं एकाच दिशी, पाच येळेला पुनर्जन्म कुणाचा हुत्ता?! (तार स्वरात) समजलं क्का?!

.
(सवाल पुन्हा ऐकल्यावर)
>>ऐका!

अगं कुणी दुधाला अमृत म्हणती ऽऽ
कुणी म्हणती गं पुर्णान्न
गं ऽऽऽऽऽऽ
म्हणून देवानं दिलं दुधाला
पाचजन्माचं वरदान
गं गं गं... माझ्या बाई!

पहिल्या जन्मी दूध होऊनी भूक आमुची भरते गं
दुसर्‍या जन्मी दही होऊनी आंबटशौकी ठरते गं
तिसर्‍या जन्मी ताक होऊनी आत्मा आमुचा गार करी
चौथ्या जन्मी लोणी होऊनी सत्व दावते घरोघरी

अहो, पाचव्या जन्मी तूप होऊनीऽऽऽ
साजूक करीते अन्नाला

आन् पाच जन्माचं कोडं सुटलं
खडा लाव त्या कानाला गं गं गं

.
.

आता आमचा सवाल ऐका!
(हीचा ढोलकीवाला सरसावून ताल देतो.)

अगं फणा उभारून विळखा घालते
अंदाज घेते बुद्धीचा
आन् काळीनिळी तू होशील आता
सवाल ऐकून जिद्दीचा गं गं गं माजे बाई चंद्रावाणी गं

अन् जगी विषारी नागीण फिरते
विष घेऊनी ओठांत
विष अन् अमृत जिच्याजवळी ती
नागीण आहे सांग कुठं गं गं गं
माजे बाई चंद्रावाणी गं

(पहिल्या कडव्यातलं आव्हान बघा. आणि त्यातच पुढच्या कोड्यातल्या नागीणीची हटके प्रस्तावना.)

जवाब द्यायची पाळी आता जयश्री गडकरची. तिचा ढोलकीवाला सरसावतो. तोवर जवाबाचा विचार करत करत बाई कोसळतात. बाजू सावरण्यासाठी समोर बसलेला शाहीर (अरुण सरनाईक) उत्तर द्यायचं आव्हान स्वीकारतो. तिला वैद्याकडे न्यायला सांगून तो जवाब देतो-)

>>
ऐका!
अहो जिच्या विषारी फुत्कारानं
गेली साम्राज्य संस्थानं होऽ
आन् जिच्या करारी फटकार्‍यानं
होते माणसाची धूळदाण गं गं गं
जी रं रं राजी जी रं रं राजी

अहो जिच्या मुखातून अमृत झरतं
थेंब होतसे शब्दांचा
अन् जिच्या कृपेच्या वर्षावानं
वृक्ष वाढतो ज्ञानाचा
एऽऽ एऽऽ एऽऽ

असली नागीण दोन जिभांची
तिला लेखणी म्हणती गं
अन् शाहीर रूपी तिचा गारुडी
उभा ठाकला पुढती गं!

बाई गं गं गं ग! गं ल ललं ल ल ललं

('असली'वर कोटी)

पडद्यावर याची खुमारी आणखी मजा आणते.

प्रकार: 

व्वा! अशी मराठी नुसती वाचायलासुद्धा छान वाटते. अगदी चणेफुटाणेवाल्याकडे कढईत चणे टणाटण उड्या मारत असतात तसा संवाद आहे. धन्यवाद इथे दिल्याबद्दल. Happy

छानच.. हे सर्व सवाल जबाब लक्षात आहेत. पण पुढे तमाशापट येत राहिले तरी हा प्रकार बंदच झाला !

छानः) मला आवडायचे असे सवाल जवाब ऐकायला. पण हल्ली नाही दिस्त कुठे सिनेमात. बादवे, प्रत्यक्षात तमाशात असे असते का? की सिनेकारांचे इनोव्हेशन आहे?

आवडले सवाल -जवाब Happy
जयश्री गडकर चा एक चित्रपट आहे ना ह्या सवाल -जवाबावर.लहानपणी पाहिला होता. सांगत्ये एका..असच नाव आहे बहुधा.

गजानन, मस्त! हे सगळं तुला तोंडपाठ आहे? Happy

मजा आली वाचायला आणि ते जुने पिक्चर आठवले. मला आठवतंय की त्या लहान वयात अशा सवाल जवाब असलेल्या पिक्चर मध्ये हिरॉईन (जशी वर जयश्री गडकर आहे = जिला उत्तर येत नाही म्हणून अरूण सरनाईक पुढे येतो) अशी हेल्पलेस झाली की मला वाईट वाटायचं. आणि अरूण सरनाईक ने असं काम एका पेक्षा जास्त वेळेला केलंय किंवा काय ते आठवत नाही पण त्या लहान वयात "ही विल ऑल्वेज् हॅव द आन्सर" असं वाटायचं.

एक पिक्चर आठवतोय ज्यात सवाल होतो पण मग जवाब येत नसतो हिरॉईनला. म्हणून मग एका दिवसाची मुदत मिळते. त्यात ती जाम फ्रस्ट्रेट झालेली असते जवाब सुचत नाही म्हणून. जोडीने तिचं कनातलं हरवलेलं असतं आणि ते नाच्याला (गणपत पाटील ?) मिळतं की तो ते शोधत असतो तेव्हा बाई अजूनच वैतागते. शेवटी ते हरवलेलं कानातलं मिळतं आणि त्यातूनच जवाब ही सुचतो असं काहितरी अंधुकसं आठवतंय. जयश्री गडकरच होती त्या रोल मध्ये. आणि फरकॅप घातलेला एक तो टिपीकल व्हिलन (राजशेखर का?) तो ही "चाचपणी " करायला आणि ट्रॅश टॉक टाईप ऐकवून हिणवायला म्हणून येऊन जातो असं काहितरी आठवतंय. उत्तर येत नसतं त्यामुळे नेहेमीचा सालंकृत अवतार सोडून जयश्री गडकर ने पांढरी वस्त्रं परिधान केलेली असतात कारण जवाब नाही सुचला दुसर्‍या दिवसापर्यंत तर नामुष्की पदरात पडणार आणि कमावलेली सगळी इभ्रत जाणार.

मस्त गजाभाउ! शनिवारी डीडी वर सवाल-जबाब वाले पिक्चर बघितलेले आठवतात... असाच अजुन एक हा
सवाल-जबाब पण भारी आहे
https://www.youtube.com/watch?v=yzO9-3n9VtY
(एवढ्या ग्रेसफुल जयश्री गडकरला सोडुन त्या अवजड सन्ध्याला पिजरा मधे का घेतल कुणास ठाउक?)

वा भारी! खूप लहानपणी हे सवालजवाब पट पाहिलेले. तेव्हा बाऊन्सर जायचे तरीही शैली आणि अदा भावलेली.

खूप मस्त !

काल परवाच मुलांनाही दाखवत होतो काही सवाल जवाब युट्युब वर कोडी म्हणून Happy

अरूण सरनाईक - "ही विल ऑल्वेज् हॅव द आन्सर" अगदी अगदी हा पठ्ठ्या असतोच सगळीकडे

Happy

भाऊ, पहिला सवाल-जवाब 'मल्हारी मार्तंड' मधला आहे आणि दुसरा 'गणगौळण' मधला.
अमि, हे तमाशातून सिनेमात आले.
सशल, मला तोंडपाठ नाही, मी सिनेमात ऐकून लिहून काढले. मलाही तुझ्या दुसर्‍या पोस्टमधला (जवाबासाठी एक दिवसाची मुदत मिळालेला) सिनेमा आठवला पण नाव आठवत नाही.
प्राजक्ता, लिंककरता धन्यवाद. घरून बघतो.

गावाकडे जत्रांमध्ये तमाशे ठेवायची पद्धत होती. तिथे जत्रेला जायचे म्हणजे ती एक औटघटकी जीवाची मुंबैच असते. (प्रत्येकासाठी वेगवेगळ्या हेतूने). त्यात कुस्त्या, बैलगाडीच्या शर्यथी, इ. बरोबर तमाशा हा एक मोठ्यांसाठी आकर्षणबिंदू असे. अगदी दिवसाही भर उन्हात हे फड रंगलेले असत. लोक* कुठे जागा मिळेल तिथे - समोरच्या प्रांगणात, पायर्‍यांवर, झाडांवर, अगदी घरांच्या कौलांवरही चढून बसूनही तमाशाच्या आनंद लुटायची. आमच्या गावच्या यात्रेत तमाशाचे सादरीकरण वर्ज्य होते. पण गावात एक फड होता (म्हणजे तमाशा करणार्‍या लोकांचा ग्रूप). माझ्या आधीच्या पिढीकडून त्यांचे किस्से कधी कधी घरात अजूनही चर्चिले जातात. Happy

* लोक म्हणजे पुरुषच. स्त्रियांनी तमाशा बघणे म्हणजे - तोबा तोबा.

प्रतिसादांबद्दल धन्यवाद.

ह्याआधी जनरलच तमाशात (म्हणजे पिक्चरमध्ये जी तमाशा ची गाणी ऐकली त्यात) आणि ह्या सवाल जवाबात (कारण हे बरेच मोठे असतात. वरच्या प्राजक्ता च्याच लिंक मधले बहुतेक १७ मिनीटांचे आहे) मस्त ढोलकी ऐकायला मिळते. अगदी धमाल ती ढोलकी ऐकणं म्हणजे.

आणि एका दिवसाची मुदत प्राजक्ताच्या लिंक मधल्या सवाल-जवाबातही असावी. जयश्री गडकर ची साडी बदलली आहे अर्ध्यात Happy मधल्या एका अरूण सरनाईकच्या सवालाचा जवाब येत नसतो तेव्हा गडकर पार्टी गांगरलेली दाखवली आहे. मग साडीचा रंग बदलतो (पांढर्‍याचा काळा. ।ए प्रतिकात्मक आहे किंवा कसं माहित नाही). मग शेवटी मात्र गडकर च्या सवाला चा जवाब न आल्याने अरूण सरनाईक (!!!) हारतो Happy

हे सगळे सवाल जवाब पौराणिक फिलॉसॉफी वरचेच असायचे ना?

यश्री गडकर ची साडी बदलली आहे अर्ध्यात >> हा सिनेमा मी पुर्ण बघितलाय, यातली बाकी गाणिही सुन्दर आहेत, जयश्री गडकरने अ.सरनाईकच्या पार्टीला हरवायचा" पण "केलेला असतो ...कारण आधी तिचे शाहिर वडील त्यान्च्याकडुन हारुन (अटिप्रमाणे लुगड नेसुन) त्या दु:खात मरतात... पण ही हार-जित थाबवायला अरुणचेच वडील जयश्रिला गुप्त रित्या मदत करतात....शेवटि याचा उलगडा होतो ... यातही मुदतिचा मामला आहेच त्यामुळेच साडि बदलेलीय दिसतेय.

प्राजक्ता, स्टोरी उलगडल्याबद्दल थँक्यू. इंटरेस्टींग आहे.

ह्या सवाल जवाबात शेवटचा एस सवाल टाकायच्या आधी जयश्री गडकर बाबांच्या संदर्भात एक पद(?) ऐकवते. आणि प्रेक्षकांत बसलेल्या एका महत्वाच्या म्हातार्‍या वर सारखा कॅमेरा का नेतात आणि नंतर त्याच्या चेहेर्‍यावर चित्रविचित्र भाव का दिसतात ते आता कळलं. Happy

हे चित्रपटातले जरी असले, तरी प्रत्यक्ष तमाशात ते स्वरचित असत. हे कलाकार रुढ अर्थाने शिक्षित नसले तरी बहुश्रुत असत आणि त्यांच्या त्यांच्यात अशा रचनांची देवाण घेवाण होत असे.

माझ्या आठवणीप्रमाणे पहिला सवाल जबाब शांताराम बापुंच्याच रामजोशी चित्रपटात होता ( बहुतेक जयराम शिलेदार आणि हंसा वाडकर ) तमाशापटांची सुरवातही तिथूनच झाली.

माझ्या आठवणीतला एक..

तीरकमठ्यासह दोन पारधी गोरा पर्वत चढले गं
तीळास बघुनी, नखाएवढ्या तळ्यात दोघे बुडले गं
बुडले ते ना वरी निघाले, रमले त्या ठायी
अशी कशी ही सांग बाई गं झाली नवलाई

----

दोन चोरटे पुरुषी डोळे न्याहाळिते नवलाई
पायापासूनी तिला न्याहाळीत वरी पोचले बाई
हनुवटीवरती तीळ तियेच्या, गालावरती खळी
तिळाच भुलुनी खळीत बुडले, भान न त्यांना मुळी

वर म्हटलाय तो सिनेमा म्हणजे 'केला इशारा जाता जाता' आहे का? (उगीच एक गेस... खूप लहानपणी बघितला होता मी, आणि विशेष काहीच आठवत नाहिये)

गजानन, भारीच आहे हे.

तो मल्हारी मार्तंड मधला सवाल-जवाब भारीच होता. अर्जुनाला नर (नर-नारायण जोडीतला नर) का म्हणतात याचे सगळ्यात जास्त पटणारे उत्तर फक्त तोच देऊ शकतो.