मिस बुम्बुम - ब्राझील मधील अनोखी सौंदर्य स्पर्धा

Submitted by Darshana१५ on 23 March, 2016 - 19:59

शरीराकडे संकोचूनच पाहण्याची सवय/संस्कार असलेल्या भारतीय मनाला न पेलवणारा ‘ब्राझीलियन’ आविष्कार.
रिओमध्ये ‘सिनोरिता’ हा शब्द इतक्या वेळेस माङया कानावर पडला की मीसुद्धा अनोळखी स्त्रीला संबोधताना ‘सिनोरिता पोर फावर (प्लीज)’ म्हणायला लागले.
सिनोरिता म्हटले की उगीच झग्यासारखे सुळसुळीत पायघोळ फ्रॉक घालून कतरिनासारखे दिसण्याची गरज नसते हेसुद्धा इथेच समजले.
म्हणजे बाईला हाक मारताना आपण जसे बाई, ताई किंवा मॅडम म्हणतो तसेच इथे ‘सिनोरिता’ म्हणतात. दुसरा एक लोकप्रिय शब्द म्हणजे ‘दोन्ना’. म्हणजे दोन्ना करोलिना, दोन्ना इझाबेला, दोन्ना सुलक्षणा. अर्थात माझ्या अवघड नावाचे इथे दोन्ना सुला हे सोपे रूपांतर होते. मीही मनातल्या मनात हे नाव नाशिकच्या जगप्रसिद्ध वाइनच्या गावाशी नाते जोडते म्हणून खूश असते.
लग्न झालेल्या मध्यमवयीन स्त्रियांना त्यांच्या नावापुढे दोन्ना हे प्रिफिक्स लावले जाते. ते अतिशय प्रचलित आहे. एकदा एका ब्राझीलियन मैत्रिणीच्या घरी गेले असता तिच्या किचनमध्ये हातरु मालांवर सात वारांची नावे भरतकाम केलेली दिसली. अगदी पायपुसणोसुद्धा हाताने बनवलेले.
शाळेत स्पोर्ट्स टीचर असलेली ही मैत्रीण तशी टॉम बॉय. तिच्याकडे तिच्या चार मुलांना सांभाळण्यासाठी पूर्णवेळ सेविका. ही मैत्रीण एकतर शाळेत किंवा जिममध्ये जास्त. घरी असली की मुलांना, नव:याला आणि कुत्र्याला बरोबर घेऊन समुद्रकिना:यावर. तिला हे सर्व करायला वेळ कधी मिळतो, माहीत नाही.
मी आश्चर्य व्यक्त करीत तिला तसे म्हटले. त्यावर ती म्हणाली, तिची आई ‘मुल्हेर प्रिन्दादा’ होती. म्हणजे आपण मराठीत जिला गृहकृत्यदक्ष म्हणतो अशी. घराची, नव:याची, मुलांची काळजी करणारी, घर सजविणारी, गिफ्टेड वूमन.
अशा स्त्रिया बायको म्हणून चांगल्या असतात. आजच्या काळात मात्र त्या थोडय़ा दुर्मीळ आहेत. या देशात अशा बाईचा शोध घेणो वनवासाला निघण्यासारखे आहे. वाटेत तिच्या वाटय़ाला काय काय भोग येतील त्यावरून तिची परीक्षा ठरते आणि विशेषणसुद्धा. ब्राझीलच्या नावामध्ये ब्रा हा शब्द आहे. इथे स्त्रिया अत्यंत सेक्सी कपडे घालतात. पण म्हणून त्यावरून या स्त्रियांना लेबल्स लावण्याची गरज नाही. त्यांचेही काही सामाजिक प्रश्न आहेतच. इथल्या स्त्रियांचे जगासमोर आलेले रूप खूप दर्शनी आहे, हे मात्र खरे!
फक्त आणि फक्त बिकिनीमध्ये समुद्रकिना:यावर फिरणा:या सुडौल बांध्याच्या भरगच्च देहाच्या स्त्रिया थेट खजुराहोच्या शिल्पातून उतरून आपल्यासमोर उभ्या राहिल्यासारख्या दिसतात. म्हणजे हे चित्र शुक्र वारी संध्याकाळपासून ते रविवारी संध्याकाळर्पयत समुद्रकिनारी दिसतेच. कधीकधी तीच बिकिनी घालून यच्चयावत वयोगटातील स्त्रिया रस्त्याने फिरताना दिसतात. पाहणा:याला त्याचे काही वाटत नाही. एखादा चुकला माकला भारतीय जो त्याच्या बायकोला ‘थ्री फोर्थ’ घालण्यास मोठय़ा मनाने परवानगी देतो, त्याची टिप्पणी सोडली तर बाकी सगळे ठीक असते. कुणी नैतिकतेचा बाऊ करीत नाही, की बलात्काराच्या घटना होताना दिसत नाहीत. समुद्रकिनारी खा:या शेंगदाण्याच्या जोडीला बिकिनी विकणारा, फुगेवाल्यासारख्या काठीवर तां ना पि हि रंगाच्या तलम बिकिन्या घेऊन मुक्त विहार करीत असतो. घेणारेसुद्धा रंग, पोत, फिटिंग, फील तिथल्या तिथे तपासून घेतात. खरंतर एक वरचा भाग किमान 5क् सेमी कपडय़ामध्ये बसतो परंतु खालचा भाग तर चिंधीपासूनच बनवला जात असावा यात शंका नाही.
तर अशा या मुक्त देशात बाईचा पाश्र्वभाग म्हणजे सौंदर्याचा निकष मानला जातो. इथे रिओत काही समुद्रकिनारे फक्त दिगंबर अवस्थेत फिरण्यासाठीच आहेत. देहाचे सगुण साकार रूप सजवून मिरवण्यापेक्षा जसे आहे तसे दाखवणो इथे महत्त्वाचे मानले जाते. यात कोणतीही दांभिकता नाही. ताकाला जाऊन भांडे लपविणो नाही.
‘साडीतच बाई सुंदर दिसते’ असे मानणारे आणि त्यातून समाधान शोधणारे माङो भारतीय मराठी मन ब्राझील देशी येऊन बरेचसे हलून गेलेय. सतत काही ना काही इथे घडत असते, इतके धक्के बसतात. चिंधीपासून बनविलेल्या बिकीनीज कमी की काय म्हणून आता ही मिस बुम्बुम स्पर्धा. म्हणजे आज नाही सुरू झाली ही. अर्थात माङया ब्राझीलियन मैत्रिणी मला त्याबद्दल माहिती देत असतात. 27 परगण्यातील 27 सुंदर बुम्बुम असणा:या ललनांचा नामघोष केला जातो. यात एक पोर्नस्टारसुद्धा होती जी तिच्या भरभक्कम उरोजांसाठी प्रसिद्ध आहे. आणि इतरजणी त्यांच्या जन्मजात हत्त्यारांबद्दल खात्री बाळगून आहेत. प्रमोशनचा भाग म्हणून साओ पावलोमधील रस्त्यावर भर ट्रॅफिकमध्ये या बुम्बुम्स सिग्नल नियंत्रणाचे काम करीत होत्या, म्हणजे पाहा!
सौंदर्य स्पर्धा म्हटले की आपल्याला चेहरा दिसतो, फिगर दिसते. फार फार तर रंग. इथे स्पर्धेचे निकष अजून ठाशीव आहेत. म्हणजे या सर्वाबरोबर पाश्र्वभाग गोलाकार, मोठ्ठा, भरीव आणि शिल्पाप्रमाणो असला पाहिजे. असाध्य ते साध्य असा. याच्या जोडीला उरोजही तसेच असतील तर जिंकण्याची संधी मिळणारच.
साधारण सहा वर्षापूर्वी ही स्पर्धा सुरू झाली. खूप गाजावाजा झाला. अनेक कारणांसाठी स्पर्धा गाजली. कधी परीक्षकांना लाच दिल्याचा आरोप झाला. कधी कुणी कौमार्य टिकविण्यासाठी सर्जरी केल्याचा दावा केला.
39 वर्षीय स्पर्धक ही इथे विजेती ठरली आहे.
अन्द्रेसा नावाच्या एका स्पर्धक तरुणीची शोकांतिका इथे फार प्रसिद्ध आहे. अन्द्रेसाचे बुम्बुम दुस:या क्रमांकावर आले होते. 27 वर्षाची ही तरु णी एक महिनाभर आयसीयूमध्ये होती. कारण तिने तिच्या मांडय़ांमध्ये कॉस्मेटिक जेल फिलर्स इंजेक्ट केले होते. त्यामुळे तिच्या स्नायूवर त्याचा परिणाम झाला. हे हायड्रोजेल फिलर्स बाहेर काढल्यावर तिला सेप्टिक झाले. विशिष्ट अवयवांना उठाव देण्यासाठी टोक्जलेल्या कृत्रीम रसायनांचा तिच्या शरीराने स्वीकार केला नाही आणि तिचा पाय कापून काढावा लागेल अशी वेळ आली.
सुदैवाने थोडक्यात निभावले.
ब्राझीलला जगाची कॉस्मेटिक राजधानी म्हणतात. इथे सर्वात जास्त ब्रेस्ट इम्प्लांट आणि बटक ऑगमेन्टेशन्स केली जातात. कलिंगडाला इथे ‘मेलन्सिया’ म्हणतात आणि अशा स्त्रियांनासुद्धा. यावर एक गाणेसुद्धा प्रसिद्ध आहे.
सांगण्याचा उद्देश, एकीकडे माङया मायदेशात पोर्नवर बंदी येत आहे आणि मी ज्या देशात राहतेय तिथे कित्ती काही घडतेय.
जगाच्या शाळेत शिकणे काय असते हे असे समजते आहे मला.
सौंदर्याचे आकार ऊकार जपणाऱ्या ह्या देशात माझी समज थोडी उपरीच ठरतेय.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दर्शना, खूप अनोखी माहिती सांगितलीस.
दुसर्‍या देशांतील कल्चर बद्दल तुझी उत्सुकता , त्यांच्या संस्कृती ला नांव न ठेवता तटस्थतेने त्यांच्या कडे पाहण्याची वृत्ती खूप आवडली..
मिस बुंबुम.. किती आगळी वेगळी स्पर्धा... ब्लेम इट ऑन रियो.. और क्या Happy

ब्राझीलबद्दल थोडंफार ऐकून होते. तुमच्या लेखाने बरीच माहिती कळली.

एकीकडे तुम्ही म्हणता देहाचे सगुण साकार रूप सजवून मिरवण्यापेक्षा जसे आहे तसे दाखवणे इथे महत्त्वाचे मानले जाते. तर दुसरीकडे अन्द्रेसाचे उदाहरण देता आणि म्हणता इथे सर्वात जास्त ब्रेस्ट इम्प्लांट आणि बटक ऑगमेन्टेशन्स केली जातात. किती हा विरोधाभास. सुंदर दिसण्याचे पिअर प्रेशर तिथेही आहेच ना.

छान लिहीलंय.
मुख्य म्हणजे या नव्या देशातली ही वेगळी संस्कृती नावे न ठेवता समजून घेण्याचा तुमचा प्रयत्न दिसतोय.
त्याबद्दल अभिनंदन.
ब्राझिलबद्दल अजूनही काही गंमतीच्या गोष्टी, निरीक्षणे वाचायला नक्की आवडतील.
पु ले शु!

ब्राझिलबद्दल अजूनही काही गंमतीच्या गोष्टी, निरीक्षणे वाचायला नक्की आवडतील.
पु ले शु!>>> +१
बुम बुम म्हटलं की सध्या तरी आफ्रिदीच आठवतो.. टी-२० फिवर दुसरं काय ! Happy

छान लिहिलय, अशा लेखांमुळे बरीच वेगळी माहिती मिळते, इथे दिल्याबद्दल धन्यवाद. Happy

दोनतिनदा उल्लेख झाला आपल्या देशाचा म्हणून फक्त सांगतो,की
१) मूळ भारतीय हिंदू संस्कारात "नग्नता" नविन नाही. नव्हती ते जुन्या शिल्पांवरुन कळून येते.
२) ती हळू हलू जाऊन, स्त्रीला नखशिखांत "झाकुन टाकण्याची" पद्धत काय कारणाने रुढ होत गेली यावर सर्व बुप्रा बुद्धिवंत मुग गिळून बसलेले असतात. पण ते सुर्यप्रकाशा इतकेच सत्य आहे की या भूभागावरील विशिष्ट रक्तरंजित आक्रमकांचे अत्यंत अनिष्ट प्रभावामुळेच ये देशी "स्त्रीला" झाकुन ठेवणे वा कोंडुन ठेवण्याच्या रिती सुरु झाल्या.
३) या व्यतिरिक्तही काही कारणे असु शकतात, पण ज्यावर अत्यंत स्पष्टपणे सुसंगत लिहीणे या क्षणी तरि मला शक्य नाही पण अंगुली निर्देश करायचा तर, एखादी गोष्ट नेहेमीचीच नजरेच्या सरावाची झाली की त्यातिल "रस/ आकर्षण" संपुन जाऊ शकते किंवा त्याबद्दलच पराकोटीचे आकर्षण/हव्यास निर्माण होऊ शकतो, तर स्त्रीपुरुष संबंधांमधे व खास करुन कुटुंबांसहित समाजरचनेत ही दोन्हीही टोके घातकच. यातिल मधले टोक स्विकारावे म्हणून अर्धअनावृत्त वा पूर्ण आवृत्त पोषाखाचि रचना कालौघात होत गेली असेल.

काहीतरी वेगळं वाचलं. छान वाटलं !

ब्राझीलला जगाची कॉस्मेटिक राजधानी म्हणतात. इथे सर्वात जास्त ब्रेस्ट इम्प्लांट आणि बटक ऑगमेन्टेशन्स केली जातात.>>>>> हे वाचून हळहळ वाटली. नैसर्गिक सौंदर्य कधीही चांगलं. !!

दुसर्‍या देशांतील कल्चर बद्दल तुझी उत्सुकता , त्यांच्या संस्कृती ला नांव न ठेवता तटस्थतेने त्यांच्या कडे पाहण्याची वृत्ती खूप आवडली. + १११

मुख्य म्हणजे या नव्या देशातली ही वेगळी संस्कृती नावे न ठेवता समजून घेण्याचा तुमचा प्रयत्न दिसतोय.
त्याबद्दल अभिनंदन. ब्राझिलबद्दल अजूनही काही गंमतीच्या गोष्टी, निरीक्षणे वाचायला नक्की आवडतील. + १११

दर्शना, ब्राझिलमधिल वेगळ्याच प्रेक्षणिय स्थळांबद्दलची माहिती आणि ती देखिल हलक्या-फुलक्या शब्दात दिलित. खुप आवडली. पु ले शु

झकास मांडले आहे!!! उत्तम एटिट्यूड ने लिहिलेला लेख , एखाद लेख जगप्रसिद्ध सांबा वर वाचायला आवडेल ब्राज़ीलच्या

चांगली माहिती.

सज-या करून स्पर्धा जिंकणे आणि रिअ‍ॅलिटी शो मधे लहानग्याला प्रवेश मिळाला नाही म्हणून पालकांनी सगळंच संपल्याच्या थाटात रडणे हे सेमच वाटते.

सगळ्यांचे खूप आभार . हा लेख लोकमत मध्ये मंथन पुरवणीत छापून आला होता . त्यामुळेच मी साशंक होते कि इथे तो पुन्हा देता येईल का ? मला नियम माहित नाहीत . मी तसे admin ला कळविले होते .

माझ्या सदराचे नाव आहे . "एक बंजारा गाए " ह्यात मी माझ्या जपान , चीन , ब्राझील मधील दशकभराहून अधिकच्या वास्तव्यातील आठवणी , अनुभव , निरीक्षणे लिहित असते . माझा कोणताही दावा नाही कि मला ह्या संस्कृती पूर्ण कळतात . हत्ती आणि सात आंधळ्या च्या कथेतील मी सुद्धा एक .. मला दिसलेली बाजू मी लिहिण्याचा प्रयत्न करते ..
लिहिताना शक्यतो तराजू घेत नाही ..
तुम्हा सगळ्यांना हा लेख आवडला . छान वाटले ..

तुमचे लेख मी कायम वाचते..आवडतात..सुलक्षणा वर्‍हाडकर ना! खुपच छान वाटले हे वाचून आय मीन इथे तुम्हाला भेटुन..तुम्ही ही फ्रीलान्स पत्रकार आहात तर..मी ही पूर्वी पुर्णवेळ पत्रकार होते आता मुक्त पत्रकारिता..:) पु ले शु

दर्शना खोडकर ह्या नावाने मी लोकमत मध्येच एक सदर लिहित होते.दूरदर्शन मालिकांबद्दल . परिक्षण. मी दूरदर्शन मालिकांची परीक्षणे केलीत अनेक वर्तमानपत्रातून .
लग्न झाल्यापासून फ्री लान्स पत्रकार . जपान आणि चीन मध्ये स्थानिक मासिकांसाठी काम केले होते . सध्या रिओ ऑलिम्पिक मध्ये स्वयंसेवक आहे ..

Thank you स्मिता .
सुलक्षणा व-हाडकर . .. बरोबर .

सुलक्षणा, मी तुमचा ब्लाग वाचत असते विशेषता जपान बद्दल चे लेख खुप आवडले होते भरपुर लिहित जा..
मृगतृष्णा असेच नाव होते का त्या ब्लागचे?

मी जपान बद्दल खूप लिहिलेय .. चीन सुद्धा माझ्या आवडीचा देश .. सध्या ह्याच्या जोडीला एक कप्पा ब्राझील ला दिलाय ...टूकडोंमे बट गई जिंदगी ..

दर्शना/ सुलक्षणा...फार छान मी मग बरेचसे वाचले आहे तुमचे..:) छानच लिहिता..आणि आता रिओ ऑलिंपिक मध्ये स्वयंसेवक आहात हे ऐकुन तर भारीच वाटले..:) मी सकाळ आणि मटा ला होते त्यामुळे लोकमत मध्ये येणारे लेख आवर्जुन वाचले जायचेच ;)..आणी तुमच्या उत्तम लिखाणामुळे तुम्ही लक्षात आहात

सुंदर ओळख.
इथे अंगोलातही पुर्तुगीज संस्कृतीचा प्रभाव आहे. त्यामूळे बीच वर तसाच मोकळेपणा असतो. स्त्रिया आणि पुरुषही आपले शरीर अत्यंत सुडौल असे राखून असतात.

दिनेश .. .. खरे तर ब्राझील म्हणजे मेल्टिंग पॉट आहे .. इथे इतक्या संस्कृतींची सरमिसळ आहे .. जपानी , इटालियन , ज्यू , पोलिश , आफ्रिकन , मुसलमान , स्पानिष , जर्मन ,पूर्व युरोप .... चीनी कोरिअन सुद्धा ..
ऊसाच्या कापसांच्या मळ्यांमध्ये शेतमजूर म्हणून आलेले आफ्रिकन , महायुद्धानंतर आलेले जपानी [ इथे सव पावलो मध्ये लिबरदाजे म्हणून जपानी वस्ती आहे . ] पोलिश नागरिक २ देशांचे पासपोर्ट वापरतात . त्वचेचे रंग किमान १८ त-हेचे , केसांचा प्रकार हि तसाच .. म्हणजे आपल्या भारतात ज्या प्रमाणे काश्मीर पासून कन्या कुमारी पर्यंत केसांचा पोत , घनता , दर्जा बदलताना दिसतो . तसेच इथे सुद्धा आढळते.. केसांचे सर्व रंग इथे दिसतात. संकरित वंश इथे दिसतात. इथे अनेकांचे पूर्वज किव्हा मागली एक पिढी दुसऱ्या कुठल्या देशाची नाळ जोडून असते . ब्राझील दक्षिण अमेरिके पेक्षा पूर्णतः वेगळे आहे . त्यांच्या वर युरोप चा प्रभाव आहे त्यानंतर आफ्रिकन प्रभाव . त्यांची खाद्य संस्कृती हि तशीच . इथे जपानी पदार्थ लोकप्रिय आहेत. ब्राझील च्या संस्कृती कडे एकूणच खूप दुर्लक्ष झाले असे माझे मत आहे .. सांबा , सॉकर , बिकिनी च्या पलीकडे हा देश आहे .. देह देवाचे मंदिर हे इथे प्रामुख्याने दिसते . भारतीय योग विद्या ज्या पद्धतीने ब्राझील मध्ये आत्मसात झालीय . ते पाहता हि विद्या त्यांचीच असावी असे वाटते .. अवघड , अनवट आणि साहसी , मादक पद्धतीच्या योगासानांसाठी इथले नागरिक तत्पर असतात ... अलिबाबाची गुहा आहे हि ...

मस्त लेख !

मुख्य म्हणजे या नव्या देशातली ही वेगळी संस्कृती नावे न ठेवता समजून घेण्याचा तुमचा प्रयत्न दिसतोय.
त्याबद्दल अभिनंदन. >> +१ असेच म्हणतो.

Pages