' रानबखर '

Submitted by आरती on 12 March, 2016 - 05:03

' रानबखर '
[ही बखर आहे, इतिहास नाही. पक्षधराने लिहिलेल्या घडल्या गोष्टीचेच हे कवन आहे. स्वत: रानात असताना आणि रानसख्यांवर लिहिली, म्हणून ही रानबखर.]
--------------------------------------------------------
जानेवारी २०१४ मधे हे पुस्तक प्रकाशित झाले. लगेच वाचायचे ठरवूनही विकत घ्यायलाच मे २०१५ उगवला आणि वाचायला मार्च २०१६. तर ही बखर मुख्यतः लक्षात राहते ती आदिवासींवर झालेल्या अन्यायाची कहाणी म्हणून, पण ती त्यापुरतीच मर्यादित नक्कीच नाहीये. समस्या मांडल्या आहेत पण त्यांची उत्तरं पण सुचवली आहेत. मिलिंद थत्ते स्वतः गेली अनेक वर्षे या लोकांबरोबर वास्तव्य करून आहेत त्यामुळे विचारप्रक्रिये मधुन डोकावणारे आणि जाणिवपूर्वक सुचवलेले सगळेच पर्याय पटण्याजोगे आहेत.
.
पुस्तकाच्या सुरुवातीला आदिवासींच्या आयुष्याची अगदी जवळून ओळख करून दिली आहे. त्यांचे जंगलाशी असलेले नाते, त्यांचे परस्परावलंबित्व, पर्यावरण प्रणालीत असलेले त्यांचे मुख्य स्थान, जंगलाभोवती वसलेलं त्याचं जग आणि त्यांची जीवनपद्धती. हे सांगत असतानाच त्यांची अल्पसंतुष्ट वृत्ती, कधी परिस्थितीशी सहज जमवून घेणारे तर कधी परिस्थितीवर लीलया मात करणारे असे त्यांच्या आयुष्यातले बारकावे दाखवणारे अनेक प्रसंग आले आहेत. संदर्भाने एके ठिकाणी त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रसंगी करण्यात येणाऱ्या नाचांच्या प्रकारांच सवीस्तर वर्णन आलं आहे. अहाहा, अगदी लगेच उठून एखाद्या आदिवासी पाड्यावर चक्कर मारून यावी असं वाटायला लावणारं ते सगळ वर्णन आहे. अशी ही सगळी जीवनपद्धति विस्ताराने सांगीतल्याने पुढे मांडलेल्या समस्यांचं गांभीर्य थेट पोहोचलं आहे.
.
नक्षलवादाचा उगम आणि वाटचाल, आदिवासी लोकांची झालेली परवड आणि उध्वस्त झालेली आयुष्य, सरकार आणि संस्थांनी त्यांच्या तोंडाला पुसलेली पानं आणि केलेली फसवणूक, याची अनेक उदाहरणं पुस्तकात दिलेली आहेत. हे पुस्तक वाचण्याआधी "Reserve Forest" आणि "Buffer Zone" या शब्दांच कोण कौतुक होतं मला. पण हे सगळं वाचताना त्याचा नेमका अर्थ, हेतू आणि परिणाम समजले आणि डोळेच उघडले. ज्यांना वनबंदी करण्यात आली किंवा ज्यांची जमीन गेली, त्यांनी नक्की काय भोगलं ते असं लांबून पुस्तक वाचून समजेलच अस नाही पण या पुस्तकात अशी अनेक उदाहरणं आहेत जी अस्वस्थ, खूप अस्वस्थ करून गेली. त्यातलच हे एक, नन्हेरामच .... पूर्ण अबोल झालेल्या नन्हेरामने एकदाच तोंड उघडलं आणि म्हणाला "साहेब, त्या धरणाच्या पाण्यात मी जेंव्हा होडीतून जात असतो तेंव्हा तिथे पाण्याच्या मध्यावर मी थांबतो. मला दिसतं तिथे - तिथेच शेकडो फूट खाली माझ गाव आहे, घर आहे आणि शेतही आहे. आणि ते सगळ कायमचं हरपलं आहे, या जाणीवेने माझा ऊर फाटतो. ती वेदना मला सहन होत नाही."
.
मुंबईपासून सुरुवात करून सह्याद्री,सातपुड्याची सफर घडवत, बऱ्हाणपूरमार्गे मेळघाटातून छत्तीसगढ गाठून थेट झारखंड पर्यंत फिरवून आणताना वाटेत भेटणारी जंगलं-नद्या आणि त्यांच्या आश्रयाने विसावलेल्या विविध आदिवासी जमातींची माहिती इतकी सहज सोप्प्या भाषेत दिली आहे की डोळ्यापुढे नकाशाच उभा राहतो.
.
पुस्तकातली भाषा ही 'पुस्तकी' अजिबातच नाही. रोखठोक बोली भाषा आहे. आणि त्यामुळेच अगदी समोर बसून एखाद्या हाडाच्या कार्यकर्त्याने त्याची तळमळ / तळतळ आपल्या समोर मांडवी आणि आपण अस्वस्थपणे ऐकावी, असा काहीसा हा अनुभव आहे.
.
बाकी सरकारी यंत्रणा आणि संबंधित संस्था यांच्या 'कारभाराची' नुसती वर्णन वाचूनच माझे पाय गळाले. तर त्या सगळ्याचा इतक्या जवळून आणि वारंवार अनुभव घेऊनही खंबीरपणे उभं असलेल्या आणि इतरांना उभं रहाण्यास प्रोत्साहन देणाऱ्या 'वयम्' ( Vayam ) टीमला सलाम.
.
आवर्जून वाचा.
.
रानबखर - मिलिंद थत्ते.
समकालीन प्रकाशन.
पृष्ठे - ९५.
किंमत - १०० रुपये.

--------------------------
'वयम्' ही मिलिंद थत्ते यांनी स्थापन केलेली सामाजीक संस्था आहे. त्यांचे सगळे काम या संस्थेमार्फतच चालते. वयम् चे वैशीष्ठ्य म्हणजे त्यंच्याबरोबर काम करणारे बहुसंख्य कर्यकर्ते हे 'स्थानिक' कार्यकर्ते आहेत. चळवळीतुन तयार केलेले / झालेले.

वयमच्या फेसबुक पानाची लिंक :
https://www.facebook.com/VayamIndia/

---------------------------
पुस्तक बुकगंगावर उपलब्ध आहे.
http://www.bookganga.com/eBooks/Books/Index?BookSearchTags=%E0%A4%B0%E0%...

ranbakhar.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप मस्त काम केलंसा हे लिहून, माझ्याकडे आहे हे पुस्तक आणि मला केव्हापासून यावर लिहायचं होतं

अनेकानेक धन्यवाद आरती

छान ओळख. त्यांच्या वसाहती हटवल्या, त्यांच्या जमिनी धरणाखाली गेल्या.. असे उल्लेख आपण नेहमीच वाचतो. पण ते म्हणजे नेमके कोण असतात... याची मात्र काळजी करत नाही.

छान ओळख..
काही पुस्तक बघुन ठेवली आणि मागवायला लावली प्रदर्शन ठेवणार्‍यांना.. त्यात हे सुद्धा आहे घ्यायचं..
उद्या परवा मिळतील मला..

अकुपार आणि हे सुद्धा..

पुस्तकाचे नाव अगदी नेमके असेच निवडले आहे लेखकांनी. त्यावरून विषयाची व्याप्ती नजरेसमोर येते. अतिशय प्रभावीपणे पुस्तकाची ओळख करून दिली आहे आरती यानी. संबंधित फ़ेसबुक पान पाहात आहे.