उकडलेल्या बटाट्याचा शिरा

Submitted by योकु on 7 March, 2016 - 10:17
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

- ४ ते ५ नग मध्यम मोठे बटाटे
- साखर (प्रमाण कृतीमध्ये आहे)
- साजुक तूप (प्रमाण कृतीमध्ये आहे)
- तापवलेलं दूध (सायीसकट), लागेल तसं
- लाडात असाल तर बदाम, काजू, बेदाणे, पिस्ते केशर काय वाट्टेल ते!
या पदार्थात वापरलेले नाहीत.

क्रमवार पाककृती: 

- बटाटे स्वच्छ धूवून उकडून घ्यावेत. सोलून मॅश करावेत.
- साजुक तुपाचं भांडं हाताशी ठेवावं. ताजं तूप असेल तर अत्युत्तम.
- आता एक चमचा तूप तापत ठेवावं. जरा गरम झालं की बटाट्याचा लगदा त्यात घालावा आणि परतायला सुरुवात करावी. न कंटाळता, बटाटा खरपूस होईपर्यंत परतायचं आहे. आच मंदच असायला हवी. लागेल तसं चमचा चमचा तूप घालत जायचं.
- दोन आमटीच्या वाटीनी बटाट्याचा लगदा असेल तर वाटीभर तूप साधारण लागतं. पण सगळं तूप एकदम ओतायचं नाहीये.
- लगदा चांगला खरपूस भाजल्या गेला (थोडं तूप बाजूनी सुटायला लागतं) की दुधाचा शिपका द्यायचा वाफ काढायची, असं पुन्हा करायचं. एकूण तीन ते चार वेळा दुधाचा शिपका मारून नीट सगळा लगदा एकसम शिजतो. साधारण अर्धी ते पाऊण वाटी दूध लागेल.
- आता साखर घालायची. अर्धी वाटी आधी घालून परतायचं. ते सगळं प्रकरण पातळ होतं मग पुन्हा अर्धी वाटी साखर घालायची. पुन्हा न कंटाळता लगदा परतत राहायचा. शिराछाप झाला की आच बंद करून झाकून ठेवायचा. -

- गरमच खायला घ्यायचा. हा शिरा ब्राऊन दिसायला हवा. सो, त्यानुसार बटाटा परतायचाय.
- सोबत मस्त गरमागरम साबुदाण्याची खिचडी, ताजं दही + भाजलेली हिरवी मिरची घ्यावी.

हा फोटो-

Batata Shira.JPG

वाढणी/प्रमाण: 
शिर्‍याचं काय प्रमाण?
अधिक टिपा: 

खरंच फार पेशन्स चं काम आहे. कणकेच्या शिर्‍यापेक्षा जास्त वेळ लागतो.

माहितीचा स्रोत: 
बायडी :)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उकडलेल्या बटाट्याचा शिर्‍याचा फोटो साबुदाणा खिचडीसारखा का दिसतो असा विचार करताना बाजूचा शिरा दिसला.मस्त लागत असणार. खूऊऊऊऊऊऊप वर्षांपूर्वी बटाट्याच्या वड्या करायला घेतल्या होत्या,त्यावेळी हात दुखायला लागल्याने तो लगदा शिरा म्हणून खाल्ला होता.मस्त लागला होता.पण दुसर्‍या दिवशी हाताला फोड आले होते त्यामुळे परत करणे नाही.

प्रकरण मस्त दिसतयं..
गोडाच वावड आहे आणि बटाटा सुद्धा नै आवडत म्हणुन थोडासा करुन पाहिलं.. पण करेल हे नक्की,,,
धन्यवाद पाकृ बद्दल योकु..

वरच्या पोस्ट्स वाचून आयता मिळाला तरच खाईन असं ठरवलंय.

सारखे शिरे आणि हलवे दिसतायंत आज. मिठासमधून मुगाचा शिरा आणून खावं झालं Happy

अगो+१. आज पाककृतींच्या धाग्यांवर अगोला अनुमोदन देण्याचा दिवस आहे Proud

भारी दिसतोय शिरा. स्क्रोल करताना आधी साखि दिसल्यामुळं चांडाळानं फशिवलं की काय असं वाटलं Proud

पाककृती धाग्यांवर हमखास विचारला जाणारा प्रश्न विचारते. यात बटाट्याऐवजी **टा घातला तर चालेल का? Proud

छान आहे प्रकार..

पुर्वी आई घरी बटाट्याच्या कीस ( वाळवलेला ) करायची, त्यातलाच थोडा घेऊन तो कुटून असा शिरा करत असे ती. तो प्रकार झटपट व्हायचा पण भाजताना फार कौशल्य लागत असे. जराही करपवून चालत नसे. सध्याच्या काळात पोटॅटो फ्लेक्स वापरता येतील.