व्हिव्हियाना हाईट्स (गूढ/भयकथा )

Submitted by विश्वास भागवत on 7 March, 2016 - 01:09

"व्हिव्हियाना हाईट्स", पुण्याच्या एका उपनगरात जेमतेम 5 वर्षांआधी सुरु झालेली ५फ्लॅट सिस्टम, एकूण 7 मजले , क्लब हाऊस, डेव्हलपर ने प्रि फर्निचर करून दिलेले फ्लॅट व एकंदरीत शहराच्या कलबलाटापासून दूर व तेवढेच नव्हे तर मुख्य रस्त्याच्याही थोडे आतच.

एकूणच जवळील आय टी पार्क मधील नवश्रीमंत व जुन्या पेठांना कंटाळलेले काही पेंशनर लोकांनी भरलेलं व्हिव्हियाना नेहमी शांत असे.

आज मात्र इथे चांगलीच धांदल उडालेली होती. कारणही तसेच होते. सर्व रहिवास्यांनी आज शांतीकरता पूजा ठेवलेली होती. मागच्या आठवड्यात झालेल्या घटनेने सर्वच घाबरून गेलेले होते आणि यामुळे एरवी भकासरीत्या शांत असलेल्या व्हिव्हियाना पासून एरव्ही अंतर ठेवून असलेल्या कोलाहलाने प्रवेश केला होता.
---------------------------------------
मनोज धांडे , व्हाईस प्रेसिडेंट, टेरकोसॉफ्ट .
सातव्या मजल्यावरच्या एकट्या पेंटहाऊसचे मालक , मोठ्या कंपनीत राहून एकूणच नफा तोट्याची जाण आली असल्यामुळे जेव्हा व्हिव्हियाना चे बांधकाम नजरेत आले तेव्हाच त्यांनी पूर्ण पैसे देऊन हे पेंटहाऊस विकत घेतले होते.

एवढं असूनदेखील धांडे बद्दल सोसायटीतील कोणीच चांगले बोलत नव्हते. त्याला कारणही तसेच होते, निपुत्रिक धांडे त्या फ्लॅट मध्ये फक्त पहिले एक वर्ष राहिले होते, त्यानंतर त्यांच्या पत्नीचा आकस्मित मृत्यू झाल्यामुळे त्यांनी तो फ्लॅट सोडून त्यांच्या दुसऱ्या फ्लॅट मध्ये राहायला गेलेले होते , अधिकांश इतर सभासद एक वर्षानंतरच तिथे राहायला आल्यामुळे कोणालाच या घटनेबद्दल जास्त माहित नव्हते मात्र कुजबुजत्या आवाजात हि चर्चा चालायचीच की सौ. धांडेंच्या मृत्युमध्ये मनोजचाच हात होता.

त्याला खोटे म्हणावे तर मनोजची वागणूक देखील खूप काही चांगली नव्हती. तो स्वभावाने अत्यंत विचित्र होता, इतर सभासदाच्या विरोधाला ना जुमानता तो देखील अविवाहित लोकांना, मुलांना आपला फ्लॅट भाड्याने द्यायचा, इतकंच नाही तर एकदा त्याच्या रिकाम्या पार्किंग मध्ये सोसायटीच्या सेक्रेटरी कुलकर्णींनी गाडी लावली म्हणून त्याने आपल्या भाडेकरूसमोर त्यांच्या गाडीवर चाबीने चरे ओढले होते. मेंटेनन्स चे पैसे त्याने दोन वर्षापासून अडवले होते व पूर्ण सोसायटीचा रोष आपल्यावर ओढवून घेतला होता. त्याच्या पदामुळे व पैस्यामुळे त्याच्या भरपूर ओळखी होत्या व त्यामुळेच कोणी त्याच्यावर कारवाई पण करू शकत नव्हते .

मात्र गेल्या दोन महिन्यातच धांडेंच्या पेंटहाऊस ला राहायला आलेल्या क्षितिज ने मात्र सर्व सोसायटीला लळा लावला होता, स्वभावाने मनमिळाऊ, सर्वात मिसळण्याचा स्वभाव , सोसायटीतील सर्व आजी आजोबांना स्वतःहून मदत करणे, लहान मुलांना रोज सकाळी क्रिकेट शिकवणे यामुळे तो सोसायटीचा लाडका झालेला होता. साऱ्यांचा एकच मत होत, "धांडे ना कोणतं चांगलं काम केलं असेल तर ते क्षितिज ला फ्लॅट देऊन ..."

क्षितिज एका कंपनीत मॅनेजर पदावर होता, IIT मध्ये इंजिनीअरिंग, IIM मध्ये MBA असलेल्या 27 वर्षाच्या क्षितिज मागे स्थळ हात धुवून मागे पडली होती , सोसायटीतल्या काही मुली देखील त्याला पाहून उसासे भरत, तरी तो सध्या करिअर वर लक्ष देऊन होता व सोबतच त्याला आणखी काही काळ बॅचलरपणाची मजाही घ्यायची होती. त्यामुळेच सातव्या माजल्यावरच धांडेच पेंटहाऊस त्याने बघताक्षणी पक्क केलं होत. वर पाहता क्षितिज जरी स्वभावाने चांगला असला तरी तो अत्यंत धूर्त होता, दहावीपासूनच घराबाहेर राहिला असल्यामुळे त्याला दुनियादारी ची चांगली ओळख होती, एके काळी कॉलेज चे सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमांमध्ये त्याने धुमाकूळ उडवलेला होता. चांगल्यासोबत अधिक चांगले व वाईटांसोबत दुप्पट वाईट हा त्याचा वागायचा असा त्याचा साधा फंडा होता.

मात्र मागच्या आठवड्यात जेव्हा सकाळी अगदी 6 वाजता क्षितिज कुलकर्णींच्या फ्लॅट वर आलेला तेव्हा मात्र त्याचा रंग उडालेला दिसत होता. नेहमीची ऐट त्याचा दिसण्या बोलण्यात जाणवत नव्हती, डोळे रात्रभर जागरणाने तांबारल्या सारखे दिसत होते. श्वास घ्यायला देखील त्याला दम लागत होता. प्रत्येक श्वासागणित त्याचे कमावलेली छाती धापा घेत खाली वर होत होती.
त्याचा तो अवतार पाहून कुलकर्णी दचकलेच, त्यांनी लगेच दार उघऊन त्याला आत बोलावलं, "ये बेटा आत, काय झालं? सुमा पाणी आण गं, लगेच". त्यांच्या आवाजातली चिंता समजून सुमाआजी पण लगेच थंड पाणी घेऊन आल्या. क्षितिज ने ते अधाश्या सारखं पिलं.

"काय झाल आता सांगशील का बेटा?", कुलकर्णी आजोबांनी काळजीने विचारलं. खूप वेळ शून्यात नज़र लावून बसलेला क्षितिज दचकलाच.

"आजोबा मी सोसायटी सोडतोय.", तो भान सावरून कसाबसा म्हणाला. "अरे पण का? तुला कोणी काही बोलले का, की काही त्रास झालाय, असेल तर सांग मला, मी पाहतो. पण असं अगदी सोडण्यासारखं काय झालंय" आजोबा म्हणाले.

एक मोठा आवंढा गिळून क्षितिज ने सुरवात केली, "आजोबा या इमारतीत अमानवी शक्ती आहे, आणि तीच केंद्र आहे सातवा मजला. . ."

------------------------------------

"काय?", कुलकर्णी आजोबा जवळ जवळ खुर्चीतून पडता पडता वाचले. त्यांचा आवाज ऐकून सुमा आजी पण चहा बनवता बनवता थबकल्या.
" होय आजोबा, मी आत्ता पर्यंत या सगळ्या गोष्टींवर कधीच विश्वास नाही ठेवला, प्रत्येक गोष्ट माझ्या विज्ञानाच्या कसोटीवर घासून पहायची सवय असल्याने मला हे सगळं खोट, कथित वाटायचं मात्र काल रात्रीच्या अनुभवानंतर मला स्वतःवर देखील विश्वास राहिलेला नाहीय. मी आजच संध्याकाळी इथून निघतोय, सध्याची मित्राच्या फ्लॅट वर राहायची सोय झालीय ... आता माझी एकही रात्र इथं राहायची इच्छा त्यातही हिंमत नाही राहिलेली", क्षितिज कधीही कोसळून पडेल अस वाटत होतं

एव्हाना सुमा आजी चहा आणून बसलेल्या होत्या. "बाळा तुला काही इजा नाही ना झाली?", त्यांनी ममतेने विचारलं. क्षितिज ला त्या आपल्या सख्या नातवासारखा जीव लावत, तो त्यांच्या करता प्रत्येक वेळेस मदतीला धावून आला होता, आजोबांना एकदा बाथरूम मध्ये पडून फ्रॅक्टर झालेल तेव्हा त्याने जीवाचं रान करून त्यांना लगेच उपचार मिळवून दिले होते.

" नाही आजी, मला सुदैवानं काही झालं नाही. मात्र जे झालं ते पूर्ण जीवनभर मी कधी विसरू शकणार नाही."

तेव्हढ्यात एक काळं मांजर फटकन उडी मारून आत शिरलं, त्याच्या अंगावर एक ओली जखम होती. तिघंही दचकलेच. त्यामुळे आजीच्या हातातला कप पडून खळकन फुटला. "हे मांजर अचानक कुठून आलं सहाव्या मजल्यावर, आतापर्यंत ह्याला कधीच नाही पाहिलंय मी", क्षितिज ने लगेच उठून त्या मांजराला हाकलून लावलं पण आजोबा अगदी चिंताक्रांत झालेले होते.
"आजोबा मी आता निघतो, सामान पॅक करायचंय, सायंकाळी 5 वाजता निघतोय. मी तर इथून निघून जातोय मात्र बाकी 24 नेहमी राहण्याऱ्या कुटुंबांची मला काळजी वाटते म्हणून सावध करायला आलो. मी भेटायला येत जाईन अधून मधून, ओळख राहू द्या." आजोबा काही म्हणायच्या आधीच क्षितिज झटक्यात उठून बाहेर पडला होता, त्याच्या बोलण्यावर आजोबा विचार करत राहिलेत.
मूळ गाव जरी कोकणातलं असलं तरी आजोबांचं पूर्ण बालपण व जीवन पुण्यातच गेलं होतं आणि ऐकीव गोष्टींशिवाय त्यांना कधीच असा अनुभव आलेला नव्हता. क्षितिज ला भास झाला म्हणावं तर क्षितिज सारखा निर्व्यसनी गुणी मुलाला भास होईल हे हि त्यांना पटेनास झालं. त्यांनी लगेच आंघोळ केली, देवाला दिवा लावला आणि प्रार्थना म्हणली. हि येणाऱ्या वादळाची सुरवात आहे आणि आपल्याला या साठी तयार राहावे लागेल हे त्यांच्या मनाने त्यांना सांगितलं होत.

ते काळं मांजर मात्र सातव्या मजल्याच्या बंद दारासमोर भेसूर आवाजात ओरडत होत . . .

-----------------------------------
मांजर ओरडतच होतं,
क्षितिज ने दार उघडलं, सकाळचा गलितगात्र क्षितिज जाऊन तिथे वेगळाच क्षितिज दिसत होता, त्यानं मांजराकडे पाहिलं, त्याला आत घेतलं व दूध दिलं. तो त्याच्याकडं पाहून गूढ हसला .
तेवढ्यात बेल वाजली, क्षितिजने चमकून दरवाजाकडे पाहिलं. तो वेगाने दरवाज्याकडे आला, त्याने दरवाजाच्या पीप होल मधून बाहेर पाहिलं, कुलकर्णी आजोबांसोबत बाकीची सोसायटीची मंडळी दिसत होती.
क्षितिज पुन्हा हसला, आत येऊन त्याने मांजराला खिडकीतून बाहेर सोडलं आणि खिडकीचा दरवाजा लावून घेतला. अचानक सकाळचा त्रस्त आणी भयभित क्षितिज परत आला होता. जसे क्षितिज ने दार उघडले तसे सारेच चमकले, क्षितिज ला एवढ्या वाईट परिस्थितीत कोणीच पाहिलं नव्हतं.

"या ना आत..", क्षितिज क्षिणपणे उद्गारला. सगळे थोडं चरकतच आत आले.
" तुम्ही सगळे आजोबा? कसे-काय आलात? तुम्ही जर मला थांबवायला आला असाल तर सॉरी पण मी नाही राहू शकत आणखी थोडाही वेळ."
" क्षितिज आम्हांला थोड महत्वाचं बोलायचं आहे. सकाळी तू जे बोलला त्यामुळे मला चिंता लागली आणि मी सगळ्यांना बोलावून घेतलं.", आजोबांसोबत सोसायटीतले बरेच जण होते. पाचव्या मजल्यावरचे साठे आजोबा, कदम काका, IT मधलाच तिसऱ्यावरचा सिद्धार्थ, पहिल्या मजल्यावर राहणारे कडू व आणखी दोन लोकं अशी सगळी मंडळी फ्लॅट मध्ये शिरली.

"बसा, काय बोलायचंय तुम्हाला आजोबा?", क्षितिजने विचारले.
"काल रात्री असं तू काय पाहिलेस क्षितिज ज्याने तुझ्यासारखा मुलाने धसका घ्यावा? आम्ही यासाठी विचारतोय की कमीत कमीत आमच्या पुढे काय संकट वाढून ठेवलय ते तरी कळायला हवं रे", साठेंनी तळतळुन विचारलं.
क्षितिज एका वेगळ्याच धुंदीत गेला, ती घटना त्याच्या जिभेवर तर होती मात्र बाहेर यायला तयार नव्हती. शेवटी सिद्धार्थ ने त्याच्या जवळ जाऊन त्याच्या पाठीवर ठेवला आणि त्याला धीर दिला आणि क्षितिज सावरला. त्याने सांगायला सुरवात केली.
--------------------------------------

"काल रात्री शनिवार असल्यामुळे मी नेहमीप्रमाणे माझ्या मित्रांसोबत पूल खेळायला गेलो होतो, मला जेवून यायला नेहमी पेक्षा थोडा उशीरच झाला. रात्री 10:30 पोहोचल्या नंतर मला झोप ना येत असल्यामुळे मी tv लावून बसलो, तेव्हढ्यात मला किचन च्या बाजूला खर-खर आवाज आला, मी नेहमीप्रमाणे एखादा पक्षी किंवा काही दुसरं असेल म्हणून दुर्लक्ष केलं मात्र तो आवाज वाढतंच गेला त्यामुळे मी जाऊन स्वतः पहायच ठरवलं. आवाज किचन च्या मागच्या बाजूच्या खिडकीतून येत होता म्हणून मी बाहेर डोकावून पाहिलं, मला काहीही दिसलं नाही म्हणून मी आत आलो व फ्रिज मधून पाणी प्यायला वळलो तर तो आवाज पुन्हा सुरु झाला आणि आता तो वाढला होता. मी पाणी ठेवून पुन्हा त्या उघड्या खिडकीजवळ आलो तर तेच, काहीही नाही. त्या खिडकीतून टेरेस ला जमलेलं पाणी खाली वाहून जायला एक पाईप आहे, तो आवाज खालून येतो आहे हे मला जेव्हा लक्षात आला तेव्हा मी तिथून खाली डोकावलं तर मला ते दिसल. ", क्षितिज थांबला पुढचं सांगावं कि नाही असा विचार करत असावा. सिद्धार्थ ने त्याला भानावर आणायचा प्रयत्न करताच तो एकदम दचकला. पुन्हा मन पक्क करून तो पुढे बोलू लागला, "त्या पाईप वरून खालून एक गोष्ट झपाट्याने वर सरकत होती, पहिले अंधार असल्यामुळे मला ते नीट दिसलं नाही मात्र पुढच्याच काही सेकंदात ती आकृती 5व्या मजल्यापर्यंत चढून आल्यावर मला जाणवलं कि ती एक बाई होती, तिच्या चढण्याच्या प्रयत्नात लांब नख भिंतीला घासून खर खर आवाज होत होता आणि ती अगदी अमानवी शक्तीने आणि वेगानं वर चढत होती. मी घाबरून लगेच आत आलो आणि खिडकी लावू लागलो तर खिडकीचं दार कशाला तरी आपटलं, तो तिचा हात होता व त्यालाच ते अटकल होतं, तिच्या घशातून घर घर आवाज येत होता. तेव्हढ्यात इथले सारे दिवे विझले आणि पुन्हा सुरु झाले, तो हात आणि आवाज तिथून गायब झाला होता. मी हिम्मत करून खिडकीजवळ गेलो, जवळ जवळ 5 मिनटं विचार केल्यावर मी हिम्मत केली आणि खाली डोकावून पाहिलं तर या सगळ्या प्रकाराचा काहीही मागमूस नव्हता. मी पाहत असलेले हॉरर पिक्चर आणि दिवसभराचा ताण व विश्रांती ना झाली असल्यामुळं मला भास झाला असेल अशी मी स्वतःची समजून काढली आणि झोपायला जायचं ठरवलं."
क्षितिज थांबला, त्याने समोरच्या बाटलीतून थोडं पाणी काढून गटागटा पिलं . एका दमात एवढ बोलून त्याला धाप लागली होती. सगळेच शांत झाले होते, हे सगळ्यांकर्ताच अतर्क्य होत.
"पुढे काय झालं क्षितिज?", कदम काकांनी ना राहवून विचारलं. आपली गोष्ट पूर्ण सांगायची राहिली हे आठवून क्षितिज भानावर आला.
त्यानं पुढं सांगायला सुरवात केली. "मला झोपचं येईनाशी झाली, जे पाहिलं त्याची माझ्या मनाने धास्तीच घेतली होती. शेवटी कंटाळून मी पुन्हा 1च्या सुमारास पुन्हा टीव्ही पाहायला बसलो. टीव्ही पाहता पाहता मला सोफ्यावरच केव्हा झोप लागली ते माझं मलाही नाही कळालं. तेवढ्यात मला जाणवलं , एक बाई माझ्या छातीवर बसून माझ्या कपाळावर तिच्या नखाने काहीतरी कोरत होती, माझा श्वास छातिवरच्या ओझ्याने कोंडला, मला खूप ओरडाव वाटत असून पण माझ्या घशातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. तीच ध्यान अगदी ओंगळवाण होतं, लाळ तोंडातून माझ्या चेहऱ्यावर टपकत होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक असुरी हसू होत. तिने एक फाटका गाऊन घातला होता व तिच्या हातावर चाकूने चिरल्याच्या जखमा होत्या. मी पूर्ण जोर लावला आणी उठलो तर त्यातलं काहीही नव्हतं. ते स्वप्न होतं. " माझ्या घशाला कोरड पडली होती, श्वास आणखी अटकेला होता. मी पाणी प्यायला स्वयंपाक घरात गेलो तर ती खिडकी उघडी होती."
________________________________

क्षितिज क्षणभर थांबला व पुढे बोलू लागला, " उघडी खिडकी बघून मी शहारलो, मी खिडकी नक्कीच लावली होती मात्र आता ती उघडी होती, तेवढ्यात मला किचन च्या स्टोरेज कॅबिनेट वरून एक विचित्र घर घर ऐकू आली, मी वळून पाहिलं तर तीच बाई, ती पाईप वरून चढून आलेली , ती स्वप्नात दिसलेली तिथे बसून विचित्र आवाजात घर घर करत होती, तिच्या हातावर चाकूने केलेल्या रक्ताने भळाळत्या जखमा होत्या, एक घाणेरडा कुजका वास सर्व फ्लॅट मध्ये पसरला होता आणि ती रडत होती. तिने माझ्याकडे पाहिलं, तिच्या डोळ्यात वेडसरपणाची झाक होती. मी उभ्या जागी स्तब्ध झालो होतो. मला पळायचं होत पण पायातली शक्ती पूर्ण गेलेली होती माझ्या शरीरात काहीही जोर राहिला नव्हता. क्षणार्धात तीन एकदम वरून खाली उडी घेतली आणि पुढे उभी येऊन ठाकली. मी कसाबस स्वतःला सावरलं आणि ओट्यावरचा चाकू हातात घेतला, तिच्यासमोर एका चाकूने काय झालं असत? पण त्याने मला हिंमत आली, माझ्या हातात चाकू पाहून ती मागे सरकू लागली आणि भिंती ला पाठमोरी टेकली, तिने भेसूर आवाजात रडायला सुरवात केली आणि तशीच उलटी भिंतीला पाठ टेकवून नख त्यात रुतवले आणि वर चढू लागली, ती चढता चढता छतापर्यंत गेली आणि छतावर उलटी चालू लागली आणि भयाण हसू लागली, माझा उरलेलं अवसान गळलेल होत. मी चाकू फेकला आणि पळत पुढच्या हॉल मध्ये आलो आणि बाहेर निघायचा प्रयत्न करू लागलो. तीपण छतावरूनच चालत आली आणि मुख्य दाराच्या वरच्या झुंबराला लटकू लागली. दार कसल्याशा शक्तीने बांधून ठेवलं होत आणि उघडायचे नाव घेत नव्हतं. मला माझा अंत दिसू लागला होता. मी फोन बाहेर काढला तर त्यात नेटवर्क नव्हतं. पूर्ण फ्लॅट मध्ये तीचं भेसूर घर घर आणि रडण्याचा आवाज पसरला होता, मला भोवळ आली आणि मी कोसळलो. जाग आली तेव्हा उजाडायला आलं होत. सकाळचे पावणे सहा वाजत होते. 'ती' कुठेच नव्हती, वास पण गेलेला होता. मला वाटलं पुन्हा स्वप्न पडलय, किचन मध्ये गेलो तर खिडकी मात्र उघडी होती . चाकू पण मी जिथे फेकला तिथेच पडलेला होता. पुढचं दार पण लगेच उघडल्या गेलं, मी पळत आजोबांच्या फ्लॅट पर्यंत कसाबसा आलो, त्यांना पाहिलं तेव्हा जीवात जीव आला."
----------------------------------------------------

एवढं बोलून क्षितिज थांबला. त्याने सांगितलेल्या गोष्टी ने सर्वच नखशिखांत हादरले होते. कोणाच्याही तोंडून एकही शब्द निघत नव्हता.

ना राहवून पुन्हा क्षितिजनेच पुन्हा बोलायला सुरवात केली.

"आजोबा खर तर तुमच्या इथे आलो तेव्हा फक्त मला भीती वाटत होती म्हणून आलो. फ्लॅट सोडायचा हे पक्का तुमच्या इथे बसल्या बसल्या झाल. हे सांगायची इच्छा पण नव्हती होत पण बाकी सगळ्यांची काळजी वाटत होती. मी आज धांडेला फोन लावून ही घटना सांगितली तर तो भडकला, अश्या भाकडकथा पसरवू नको म्हणाला. मला लगेच खाली करण्याचा इशारा दिला आणि ना केल्यास पोलीस कंप्लेंट करण्याची धमकी पण दिली. अर्थात मी स्वतःच आधीच सोडणार होतो पण मी अपेक्षा केली होती कि त्याचा फ्लॅट आहे तर कमीत कमी तो तरी हे सगळं थांबवायचा प्रयत्न करेन पण तो हे सगळं दडपण्याच्या मागे लागलाय. माझ्या गेल्यानंतर तो नवीन भाडेकरू आणेन, मागच्या भाडेकरुंना काही त्रास नाही झाला पण ते जे काही होतं ते आता प्रकट झालय. माझी इच्छा नाही तो त्रास दुसऱ्या कोणाला व्हावा.

त्यामुळे तुम्हाला या धोक्याचा इशारा देणं गरजेचं वाटलं. इथं 24 कुटुंब राहतात, मी भाडेकरू, निघून जातोय मात्र तुमची जीवनाची कमाई इथे गुंतवली आहे. तुम्ही सोडू शकणार नाही, पण तुम्हाला या गोष्टीची कल्पना ना देता , अंधारात ठेवून जाणं मला नसत जमलं. इथे लहान मुलं पण आहेत. कदम काका तुमचे नातू अथर्व अँड रेणू, सिद्धार्थ दादा तुमचं बाळ या सगळ्यांवर त्या अमंगळाची छाया पडू नये एवढीच इच्छा आहे."

आपल्या बाळाचं आणि नातवांचा उल्लेख ऐकताच कदम आणि सिद्धार्थ दोघेही हादरले, बाकींनाही एकदम धोक्याची जाणीव झाली.
सगळ्यांचाच मेंदू बधिर झाला होता, काय बोलावं समजेनासं झालं होत.

"हे नक्कीच त्या धांड्याच पाप असणार, मी ऐकलंय कि त्याची बायको मीना ला मुलबाळ होत नसल्या मुळे दोघांची भांडण चालायची आणि एका दिवशी तिने अचानक नस कापून आत्महत्या केली. हि आत्महत्या नसणारच,
धांडेनीच तिला संपवून आत्महत्येचा दृश्य निर्माण केलं असेल, त्याच्या ओळखीमुळे केस पण दाबल्या गेली असणार, आता तिचा आत्मा भटकतोय नक्कीच म्हणून पुन्हा हे दडपण्याचा प्रयत्न सुरु आहे त्याचा. ", कदम काका शेवटी कोंडी फोडत म्हणाले.

"असा असेल तर सगळ्यांनांच धोका आहे, आपल्या लहान मुलाबाळांना अधिकच,कारण तिची शेवटची इच्छा अपूर्ण होती ती बाळाची.", साठे बोलले.

सिद्धार्थ उठून उभा राहिला, "माझ्या बाळाकडे नजर वळवायच्या आधी मी स्वतः तिला गाडून टाकेल आणि सोबत त्या धांडेलापण.", तो जवळ जवळ ओरडलाच.

अचानक किचन मध्ये जोरदार आवाज झाला, कांच फुटल्याचा. सगळे दचकले.
__________________________________
(क्रमश:)

दुसरा भाग इथे :

http://www.maayboli.com/node/57954

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते क्रमशः लवकर पूर्ण करा प्लीज... बाकी मधल्या एका पॅरामध्ये गौप्यस्फोट आधीच झाल्यासारखा वाटतोय... तरीपण कथा पूर्ण वाचणार..

पुस्तकांची नावे टाका न परबांच्या.. >>>> अग मायबोलीवरचा अमोल परब. ज्याने आत्ताच प्रतिशोध नावाची कथा लिहिली आहे. पुस्तक कुठे शोधत्येस?

श्या..किती मी भुलक्कड..
वाचलीए..नावावरुन अंदाज नाही आलेला..
छान होती..पण खुप भिती वगैरे नव्हती वाटली..मस्त होती तरी.. Happy

मस्त सुरवात

बाकी मधल्या एका पॅरामध्ये गौप्यस्फोट आधीच झाल्यासारखा वाटतोय + १

तरीही हावरटासारखी वाचणार Proud लवकर लवकर टाका पुढील भाग.

बाकी मधल्या एका पॅरामध्ये गौप्यस्फोट आधीच झाल्यासारखा वाटतोय. तरीही हावरटासारखी वाचणार, लवकर लवकर टाका पुढील भाग. >>> + १