मी, एक माणूस

Submitted by pkarandikar50 on 26 February, 2016 - 01:27

मी, एक माणूस

बहुतेकदा, जन्मदत्त नात्यांनी बंदिस्त गोतावळ्यात,
मी एक कर्तव्यदक्ष सगा-सोयरा, भाईबंद असतो,
किंवा सर्वसंमत व्यवहाराच्या रेट्याने जुळवलेला,
विश्वासू सहकारी, मित्र आणि शेजारी अचूक असतो.

मी कुठे नि केंव्हा माणूस असतो?

मी एकतर भाबडे गरजू गिर्‍हाईक,
किंवा आशाळभूत मतदार असतो.
आगा-पीछा हरवलेल्या गर्दीतला एक थेंब,
फलाटावर, मोर्चात किंवा वारीत धक्के खातो.

मी कुठे नि केंव्हा माणूस असतो?

दिवसा-उजेडी, जगात रीतसर वावरताना,
किंवा रात्री, बिछान्यात शिरल्यावर,
माझे आपले अगतिक स्खलन होतच असते.
कशाचेच मुळी सूतक मला कधी लागतच नाही.

मी कुठे नि केंव्हा माणूस असतो?

कुणी हाकलले, डिवचले म्हणून किंवा सवयीने,
मी पुन:पुन्हा उभा रहातच असतो.
एकेका दशकानंतर शाबूत असलो,
तर न चुकता मोजला, मापला जतो.

मी कुठे नि केंव्हा माणूस असतो?
ऊंबर्‍याशी येऊन यमदूत दार ठोठावतो,
तेंव्हा एकदा, शेवटचा.
आणि त्या आधी, कविता लिहितो,
तेंव्हा दुसर्‍र्‍यांदा, अधून-मधून.

बापू.
http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/103786.html?1140686899

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users