साधारणत: सत्तरीच्या आणि ऐंशीच्या दशकात जन्मलेल्या माझ्या सारख्या लोकाना आज मागे वळून पहाताना खरेच जाणवते की वाह ! वो दिन भी क्या दिन थे. एकुणातच समाजजीवन संथ अन खुप छान घडी दार होते. फारसे तरंग न उठणारे. शांत. कदाचित माझ्या सारख्या मध्यमवर्गीय आणि निमशहरी भागातील लोकाना तसे जाणवत होते की सगळ्यानाच हा प्रश्न मला राहुन राहून पडतो. नव्वदीच्या जागतिकीकरणामुळे झालेले हे बदल अतिशय झपाट्याने एखादा झंझावात यावा तसे समाजभर पसरले. पण आजचे पुन्हा गो टु रुटस ही जीवनशैली नव्याने उभारताना पाहून मनात असे वाटते हो ते त्या शांत चौकटीतले चौकट भर मनापासून जगणे होईल शक्य? की आमच्या वेळी असे होते हाच सूर मुलांसमोर आळवत बसावे लागेल. पण मनात कुठेतरी मुलांना पण ते जग उलगडून दाखवावे असे वाटते. ते शांत , संथ जगणे, आणि समाधानाने रहाणे म्हणजे काय हे कळावे असे वाटते. अर्थात हे अनुभव फक्त माझे एकटीचे होते की त्या काळातील सगळ्यांचेच हे आपण इथे गप्पा मारुन उजळून काढूया . जमल तर पुन्हा नव्याने तो भवताल तसा करुया. अगदी तसा नाही पण त्यातील चांगले चांगले मोती निवडुन छानसा हार तर गुंफता येईल...कदाचित त्या काळातले जीवन जगता येईल हा आशावाद मनात पालवेल.
सत्तर व ऐंशीच्या दशकातील जीवनशैली
Submitted by स्मिता द on 24 February, 2016 - 04:33
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कापोचे, मुद्दा २ आणि ७ विशेष
कापोचे, मुद्दा २ आणि ७ विशेष पटले.
माझा काळ मला आवडत असला तरी तो काळ खरोखर छान असेल असं मोठ्या माणसांच्या वर्णनावरून वाटतं.
मुद्दा ७ बद्दल.आमच्या लहानपणा पासून एकत्र खेळणारी सणवार साजरी करणारी परधर्मीय मंडळी व्हॉ ऍ ग्रुप वर लोकांकडून अचानक टाळ्या काढू फेसबुकी पोस्ट्स टाकून मुद्दाम दुखावली जाऊ लागली.जाती, आरक्षणावर पोस्ट येऊ लागल्या, त्याबद्दल लोकांना समजावतो तोपर्यंत विशिष्ट जाती शिवाजी महाराजांच्या खूनी असल्याच्या पोस्ट फिरायला लागल्या, आणि तुम्ही मुद्दा ७ मध्ये सांगितलेला काळ परत यावा असं वाटायला लागलं.
'आपल्यातला' 'बिरादरी का आदमी' हा फार घातक शब्द आहे.
विषय भरकटवायचा नाही त्यामुळे थांबते.
त्या काळच्या पगाराचे आकडे
त्या काळच्या पगाराचे आकडे पाहिले तर ती माणसे कसे भागवत असतील याचे आश्चर्य वाटते. आजकाल दोन पगार, रहायला घर, इन्वेस्टमेंट म्हणून दुसरे घर असूनही पगार पुरत नाही म्हणून कुरकुरणारी माणसे पाहिली की जास्तच. दिवाळीला हट्टाने फटाके आणवत असू ते आठवून आता वाईट वाटते. ( प्रतिसाद फार मुक्तपीठीय झाला का? )
प्रतिसाद वाचून गतकाल्विव्हल झालो अणी एकिकडे यू ट्यूब वर सुमन कल्याणपूर मराठी गाणी प्ले लिस्ट लावली. अर्थात त्या काळी अशी हवी ती गाणी हवी तेव्हा ऐकायची सोय नव्हती हेही खरे. त्या काळच्य साध्या अनकॉम्प्लिकेटेड सरळ जीवनाचे सुमन कल्याणपूरची गाणी म्हणजे प्रतिकच जणू. "आपली आवड" ची सिग्नेचर ट्यून काय होती ?
विजय, पगार कमी होते तसे भावही
विजय, पगार कमी होते तसे भावही कमीच होते.
मी १९७७ साली कुर्ल्याहून ( त्यावेळी आम्ही चेंबूरमधे होतो, मग पिनकोड बदलला ) माटुंग्याला कॉलेजला येत होतो. जायचे यायचे तिकिट ४० + ४० = ८० पैसे. संध्याकाळी कॉलेज सुटल्यावर किंग्ज सर्कलपर्यंत चालत आलो कि तिकिट २५ पैसे. मग वाचलेल्या ३५ पैश्यात मणीज मधे इडली सांबार खायचो ( त्यावेळीही सांबार आणि चटणी परत परत वाढत असत )
१९८१ साली आर्टीकलशिप सुरु केली तर स्टायपेंड होता ८५ रुपये. त्यात २५ रुपये प्रवासखर्चाचे. त्यातही मजेत चैन व्हायची ( म्हणजे महिन्याला एक दोन पिक्चर वगैरे )
आता भारतात होतो, तर सहज म्हणून घरापासून ५ नंबरच्या बसने मंत्रालयापर्यंत गेलो, तिकिट सव्वीस रुपये. ज्यावेळी ही बस सुरु झाली तेव्हा ते १.६५ रुपये होते.
पण तरीही सांगतो, अजूनही भारतात प्रवासखर्च आणि खाणेपिणे, कुठल्याही देशाच्या तूलनेत स्वस्त आणि दर्जेदारच आहे.
>>>पण तरीही सांगतो, अजूनही
>>>पण तरीही सांगतो, अजूनही भारतात प्रवासखर्च आणि खाणेपिणे, कुठल्याही देशाच्या तूलनेत स्वस्त आणि दर्जेदारच आहे.<<<
दिनेश, स्वस्त आहे हे पटले, दर्जेदार हे नाही पटले.
मागच्या पानावर कापोचे यांनी
मागच्या पानावर कापोचे यांनी धार्मिकतेचा मुद्दा मांडला आहे तो मला फारच जाणवतोय.
पुर्वी वर्गात म्हणा किंवा कॉलनीतही मुसलमान लोक असायचेच पण त्यांचे काही वाटायचे नाही. भिती तर नक्कीच नाही. फाळणीनंतर झालेल्या दंगली माझ्या वडीलांनी प्रत्यक्ष बघितलेल्या होत्या, ते आम्हाला सांगतही असत त्या आठवणी. त्यावेळच्या तिरस्काराचा मागमूसही उरला नव्हता नंतर.
१९७७ साली इंदिराबाईंनी आणीबाणी जाहीर केली, त्याकाळात थोडासा सरकराविरुद्ध सूर लागला होता, पण परत त्याच सत्तेवर आल्यानंतर थोडासा निर्धास्तपणाही आला होता. पुर्वीचा सिस्टीम विरुद्ध कम्यूनिस्टांनी उठवलेला आवाज, अगदी चित्रपटातूनही दिसत होता ( पैगाम, नया दौर, दो बीघा जमीन ) तो क्षीण झाला होता. नंतरच्या आर्ट्स फिल्ममधून तो परत जाणवू लागला.
राजकारण्यांचे घोटाळे तितकेसे उघड होत नव्हते ( ते नव्हतेच असे नाही म्हणवत ) त्यामूळे एकप्रकारचा विश्वास होता.
किरकोळ गुन्ह्यात मात्र नंतर खुप मोठ्या प्रमाणात वाढ झाली. गळ्यातील चेन ओढणे, घरफोडी याशिवाय स्त्रियांवरील हल्ले फार मोठ्या प्रमाणावर व्हायला लागलेत.
रामनराघव हत्याकांड, मंदा पाटणकर खून ( यानंतरच रेल्वेच्या डब्यात पोलिस बंदोबस्त सुरु झाला ) ही प्रकरणे खुप आधीची, जोशी अभ्यंकर हत्याकांड, मानवत खून सत्र ही साधारण त्याच काळातली. हे खटले चालले आणि रामनराघव सोडल्यास गुन्हेगारांना शिक्षाही झाल्या. आता एक प्रकरण ताजे असतानाच दुसरे प्रकरण उघडकीस होते आणि मग पब्लिकच्या लक्षातही रहात नाही आधीचे प्रकरण.
बोफोर्स, हर्षद मेहता वगैरे प्रकरणे पुर्णपणे सुटली असे म्हणवत नाही.
जनरेशन गॅप तयार होण्याचा वेग
जनरेशन गॅप तयार होण्याचा वेग वाढलाय.
एकेकाळी म्हटले जायचे की अमुकतमुक आपल्या घराण्यात कधी झाले नाही किंवा हे तर माझ्या वडीलांनीही कधी केले नाही. याचा अर्थ आपल्या व आधीच्या जनरेशनमध्ये फारसा फरक गृहीत धरला जायचा नाही.
मग एक काळ आला जेव्हा बाबा तुमचा काळ वेगळा होता असे मुले बोलू लागली... किंवा आपल्यावेळी असे नव्हते, असे वडीलधारे म्हणू लागले... इथे जनरेशन गॅप एका पिढीची झाली म्हणू शकतो.
त्या काळी कॉलेजात असणारी मुले आणि कॉलेज पास आऊट होउन काहीच वर्षे झालेले पुरुष यांची स्टाईल म्हणा वा मानसिकता यात फारसा फरक वाटायचा नाही.
पण आज जेव्हा मी कॉलेजच्या मुलांना बघतो तेव्हा जाणवते की की फार फार तर सात-आठ किंवा आठ दहा वर्षे माझ्यापेक्षा माझ्यापेक्षा लहान असतील तरी ती जनरेशन मला माझ्या पुढची वाटते. आमच्या विचारांत, वागणूकीत, सवयींत, फरक जाणवतो.
जर बदलाचा तो वेग मी नाही पकडू शकलो तर एखादा ज्युनिअर कॉलेजचा मुलगा किंबहुना मुलगी मला अंकल तर नाही ना बोलणार याची भिती वाटते.
तर,
'आऊटडेटेड होण्याची भिती' हा एक मोठा बदल मला या दशकातल्या पिढीत जाणवतोय. जी सत्तर ऐंशी नव्वद वा दोन हजारच्या दशकातही तितकीशी नव्हती.
आऊटडेटेड म्हणावे लागणार नाही.
आऊटडेटेड म्हणावे लागणार नाही. सत्तर, ऐशी मध्ये ज्यांनी इमानदारीत शिक्षण घेतले त्यातील बहुतांशी लोक आता वेल ऑफ आहेत. त्यांच्याकडे अत्याधुनिक साधने आहेत. भावनिक व काही प्रमाणात आर्थिक कारणांसाठी पुढच्या पिढ्या अजूनही अवलंबून आहेत.
तरीही, 'जनरेशन गॅप' आता दर पाच वर्षांनी (किंवा काहीच काळाने) जाणवते हे सत्य आहे.
आता त्याला जनरेशन गॅप म्हणावे की कसे हा प्रश्न आहे.
१. आज नवदांपत्यांना बायकोच्या प्रेग्नन्सीच्या काळात दोघांच्या आई वडिलांच्या 'तेथे' असण्याची गरज भासत आहे का? (आणि भासत असली, तर का?)
२. त्या कारणाशिवायसुद्धा अशी गरज भासते का? भासायला हवी का? की आवश्यकता नाही? आवश्यकता नसली तर मग ती त्या बाबतीततरी का भासावी?
३. जुनाट विचार मनात ठेवून अपेक्षांचा संच बाळगणार्या आधीच्या पिढीला
'आता आपली तितकी गरज नाही' हे समजते का? आणि समजत असेल तर तसे होणे बरोबर की चूक?
४. पुढच्या पिढीच्या वैचारीक प्रवासावर आपला प्रभाव असावा ह्या मानसिकतेतून मागची पिढी बाहेर पडायला हवी आहे का?
७० आणि ८० च्या दशकात माझे
७० आणि ८० च्या दशकात माझे कोकणातले छोटेसे गाव भरलेले होते, शेती पावसाळ्यात का होईना हिरवीगार असायची. मुलांच्या खेळण्याच्या, रडण्याच्या, हसण्याच्या, ओरडण्याच्या आवाजाने गाव नांदते होते. गावातला घरटी एक माणूस मुंबईला नोकरीला असायचा, तो नांगरणीच्या काळात, गौरी-गणपतीला गावाला यायचा. गावातली प्राथमिक शाळा भरलेली होती ( ६०-७० मुले असायची १-४ वर्ग मिळून).
आता गाव ओस पडले आहे. एका वाडीतले ९०% लोक घरांना कुलुपे लावून मुंबईला निघून गेलेत, शेती काहीजण दुसर्या वाडीतल्यांकडून करून घेतात, तर काहीजण तशीच ओसाड ठेवतात. शाळेतल्या मुलांची संख्या १०-१२ वर आली आहे. मे- महिन्यात ७-८ दिवस ( जास्तीत जास्त) , गौरी-गणपती, होळी अशा सणांना २-३ दिवस गाव परत भरते. नंतर परत ओसाड.
पण 'तेव्हा' गावात TV नव्हते, गाड्या नव्हत्या, आता मुंबईत प्रत्येकाकडे TV आहेत, अनेकांकडे बाईक्स, काहींकडे कारही आहेत. मुले English medium मधे शिकत आहेत ( हे चांगले असे नाही, पण त्यांना त्यांचा choice वापरता येतोय) , मुलांचे अनुभवविश्व नक्कीच विस्तारले असणार आहे, smartness जास्त असेल शहरात वाढत असल्यामुळे.
माझ्याच नाही, तर आजूबाजूच्या अनेक गावांची हीच परिस्थिती आहे.
वर अनेकांनी म्हटल्याप्रमाणे शहरांमधील गर्दी वाढली आहे, त्याचे एक मोठे कारण हे स्थलांतर आहे. अनेक लहानलहान झाडांवरील पक्षी उडून काही मोठ्या झाडांवर जाऊन बसलेत
बेफिकीर, सत्तर ऐंशीच्या
बेफिकीर, सत्तर ऐंशीच्या दशकातील लोकांना आऊटडेटेड होण्याची भिती असण्याचा प्रश्नच येत नाही.
उलट ती भिती आताच्या जनरेशनला सतत वाटत राहते.
७०-८० चा काळ मुम्बईत तरी
७०-८० चा काळ मुम्बईत तरी रांगेत उभे राहाण्याचा होता.
१> दुघ सकाळी ६ ला व दुपारी २ वाजता मिळायचे. त्यासाठी मेटल चे एक कार्ड घेउन जावे लागायचे त्यावर तुम्हाला किती दुध मिळेल ते लिहलेले असते. लोक १० -१५ मिनिटे आधी येउन रांगेत उभे राहायचे. सगळ्याना दुध मिळेल याची खात्री नसायची.
२> साखर रेशनवर रांगेत उभे राहुन घ्यावी लागायची.
३> फोन साठी सरासरी अर्ज केल्यावर १० वर्ष लागायची. उपनगरात काही ठिकाणी ३० वर्षाचा बॅकलॉग होता.
४> बजाज च्या स्कुटर साठी १० वर्षाचा बॅकलॉग होता.
५> घरी काही काम करण्यासाठी सिमेंट पाहिजे असल्यास रेशन दुकानात अर्ज करायचे मग रेशन ऑफीसर घरी येउन बघुन अॅप्रुव करणार मग परत दुकानात जाउन सिमेंट घेउन यायचे. जास्तीत जास्त ५ गोण्या सिमेंट मिळत असे.
६> गॅस शेगडी साठी ३ वर्ष तर सिलेंडर रिफिल ला ३ आठवडे. त्यादरम्यान जर केरोसिन पाहिजे असेल तर त्यासाठी रेशन दुकानात रांगेत उभे राहायचे.
७> गावी जायचे असल्यास ट्रेन चे रिजर्वेशन करण्यासाठी व्ही टी स्टेशन वर जाउन रोन तास रांगेत उभे राहिल्यावर तिकिट मिळायचे.
८> सिनेमा बघायला जाण्यासाठी रांगेत.
९> विजेचे बिल भरायला रांग. (त्याकाळात चेक घेत न्हवते)
ह्या सगळ्या गोष्टी लगेच मिळायच्या पण काळ्या बाजारात आणि त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागायचे. ८५ नंतर ह्या गोष्टीसाठी रांग कमी होत गेली. आतातर ह्या गोष्टी सहज मिळतात.
७०-८० काळ हाय टॅक्स चा होता. १९७७ मध्ये ७७% max income tax आणि १५०% excise & custom tax होता. त्यामुळे स्मगलर ची संख्या भरपुर होती. तसेच एखाद्या माणसाकडे जर चार पैसे आले तर ते black money असायचे कारण एवढा टेक्स भरुन पैसे राहिलेच नसते. सिंगापुर/ दुबई हे स्मगलर लोकाचे देश आहे अशी आमची समजुत होती. १९८० नंतर टॅक्स कमी होत गेला. १९९१ नंतर तर खुपच कमी झाला ( relative to 1970-80)
त्या काळात शेअर बाजारात पैसे गुंतवले की ते डुबलेच. कधी कंपनी nationalize होईल याचा नेम नाही. आणि कंपनी nationalize झाली की share certificate रद्दीत . १९६९ -७७ मध्ये ५० पेक्षा जास्त मोठ्या कंपन्या nationalize झाल्या. १९७७ नंतर एकही कंपनी nationalize नाही झाली.
ह्या झाल्या ७०-८० मधिल वाईट गोष्टी. पण याच काळात बर्याच चांगल्या गोष्टी पण होत्या. त्या लिहिन नंतर.
रांगेसाठी अगदी अनुमोदन. आता
रांगेसाठी अगदी अनुमोदन. आता बरंच काम online होतं हे छान वाटतं.
टीव्ही कोणाकडेतरी असायचा तिथे सर्वजण बघायला जायचे, लिमिटेड प्रोग्रॅम्स पण छान एन्जॉय केलं जे इतक्या वाहिन्या असून आता नाही करता येत. (प्रत्यक्ष काही प्रोग्रॅम बघण्यापेक्षा मायबोलीवर त्याबद्दलची चर्चा जास्त एन्जॉय करता येते
) .
आम्हीतर चाळीत राहायचो त्यामुळे दिवाळी, उन्हाळी सुट्ट्या मस्त मजेत जायच्या. बहुतेकदा गावाला जायचो पण नाही गेलो तर पत्याचे डाव रंगायचे दुपारी विशेषतः मेंढीकोट. सकाळी रेडीओवर वेळ ठरवायची, ७.२० ची शाळा असेल तर सुधा नरवणे बातम्या द्यायला आल्या की घरातून बाहेर पडायचं.
पापड वगैरे करायचा दिवस ठरवलेला असायचा, तेपण एन्जॉय केलं खूप. लाट्या खाणे. गप्पा, किस्से खूप रंगायचे. मुलं क्रिकेट टीममध्ये कोरम कमी असेल तर आम्हा मुलींना चान्स द्यायचे. दिवाळीत किल्ले बांधायला मदत करणं, फटाके उन्हात वळवणं. कोण लवकर उठून फटके लावतो ही स्पर्धा. फोन म्हणजे दुर्मिळ गोष्ट, फार श्रीमंत लोकांकडेच असतो अशी समजूत. सर्व नातेवाईकांना पत्र लिहिणं, उत्तर सवडीने येणार पण त्याची वाट बघणं. बरंच बदललं. आता झटपट मेसेज.
गणेशोत्सवात पडद्यावर पिक्चर बघायला जाणे ही अपूर्वाई वाटायची. हॉटेलमध्ये डोसा खाणे, फिल्टर कॉफी पिणं चैन वाटायची. कनिष्ठ मध्यमवर्गात जगतानापण आनंदात दिवस जायचे कारण आजुबाजुचं वातावरण तसंच होतं. ते पण एन्जॉय केलं. जवळचे नातेवाईक होते काही छान ब्लॉकमध्ये राहणारे, ते सुट्टीत घेऊन जायचे त्यांच्या घरी राहायला, लाड पण करायचे. पण दोन तीन दिवस झाले की आपल्या घरी कधी जातोय असं व्हायचं. आता मात्र परत तशी चाळीत राहू शकेन याबद्दल शंका वाटते.
आताच्या पण खूप गोष्टी आवडतात, विशेषतः नेटशी छान मैत्री झाल्याने अप्रत्यक्ष का होईना सर्वाशी संबध ठेवता येतात. काही गोष्टींची औपचारीकता आपोआप आली, कोणाकडे जायचं असेल तर कळवणे किंवा त्यांनीपण कळवलं तर बरं, हे आवश्यक आहे असं वाटायला लागलं. ती सध्याच्या काळाची गरज आहे. स्वप्नवत वाटणाऱ्या गोष्टी उपलब्ध झाल्या.
Manually बऱ्याचशा गोष्टी व्हायच्या त्या हळुहळु मशीनद्वारे आणि आतातर बरेच व्यवहार कॉम्पुटरवर हा पूर्ण बदल त्या दशकातील लोकांनी बघितला.
जुन्या आठवणीत पण रमायला आवडतं, हा काळही आवडतोय. शाळेतले फ्रेंड्स, दूरचे नातेवाईक ह्यांच्याशी w a मुळे संपर्क राहतो ते छान वाटतं. पण प्रत्यक्ष संबध भेटीचा फार कमी जणांशी येतो याचं थोडं वाईटही वाटतं. तसं आम्ही भावंडे जवळजवळ आहोत म्हणून बऱ्याचदा प्रत्यक्ष भेटी, गप्पाटप्पा, बालपण आठवतोच अधूनमधून, रमतोही त्यात. काही जुन्या गोष्टीही खूप मिस करतो नाही असं नाही.
मला एक गोष्ट माझ्यातली ह्या बदलामुळे न आवडणारी म्हणजे काही बाबतीत पेशंस कमी झालाय, अवलंबून राहणं जास्त झालंय. पूर्वी वाट बघणं होतं ते अगदी नाहीसं होत चाललंय. नवऱ्याने मेसेज का नाही केला जास्त उशीर होणार तर etc किंवा आपण कोणाला काही विचारलं मेसेज थ्रू आणि त्याचं उत्तर लवकर मिळालं नाही तर त्रास होतो.
रांगेचा मुद्दा बरोबर आहे.
रांगेचा मुद्दा बरोबर आहे. स्वतःचे कष्टाचे पैसे भरण्याची तयारी असताना स्कूटर मिळवायला ५-१० वर्षे वाट पहायला लावणे आज हास्यास्पद वाटते. ही सगळी समाजवादी सरकारपद्धतीची फळे!
पण एकंदरीत शहरे इतकी अवाच्या सवा पसरलेली नव्हती. सायकली पुरेशा असत. बस सेवाही बरीच चांगली असे. पुण्याच्या बसेसवर चक्क नंबर व मार्गाचे नाव (स्वारगेट वा पुणे स्टेशन वगैरे) स्पष्ट लिहिलेले असे!
मुंबईची बस तर उत्कृष्ट समजली जात असे. लोकल गाड्या वा अन्य गाड्यात बसायला मिळणे अशक्य नव्हते.
एस ट्याही बर्या होत्या. रिक्षावाले इतके उन्मत्त नव्हते.
दूध केंद्रे गर्दीची असली तरी बाकी गवळी वगैरे पर्याय उपलब्ध असत. तिथूनही दूध मिळू शके.
सिमेंट वगैरे टंचाई होती पण लोक आयुष्यभर भाड्याच्या घरात रहाणे कमीपणाचे समजत नसत. तसेच आयुष्यभर एकच नोकरी इमानेइतबारे करणे हेच ध्येय असे. नोकर्या बदलणे सोपे नव्हते आणि फार होतही नव्हते.
रांगा असल्यातरी बहुतेक ठिकाणी शिस्तीत रांगा धरल्या जात. त्या मोडून, घुसखोरी करणे कमीपणाचे समजले जात असे.
शिस्त अजूनही रांगेच्या बाबतीत
शिस्त अजूनही रांगेच्या बाबतीत (विशेषतः बस) मुंबई आणि इथे आमच्या डोंबिवलीतही बऱ्याच प्रमाणात पाळली जाते.
आत्ताचे जवळपास सगळेच
आत्ताचे जवळपास सगळेच जुने-जाणते माबोकर तेव्हा मध्यम वर्गीय किंवा गरीब असावेत (आत्तापेक्षा) आणि हो, स्वभावाने सुद्धा
मी अंनु आणि दिनेशदा , धन्यवाद
मी अंनु आणि दिनेशदा , धन्यवाद आपले.
स्कूटरसाठी रांग होती हे पण ऐकून आहे. बहुतेक प्रिया स्कूटर. बजाजच्या स्कूटर्सना रांग असायची. पण यात समाजव्यवस्थेचा काही दोष नाही. विदेशी भांडवलदारांना देशात खुली सूट द्यायला नको हा समाजवाद ठीक. पण ठराविक उद्योगपतींना स्पर्धा नको म्हणून कुणालाच त्यांच्या क्षेत्रात परवाने मिळणार नाहीत हा समाजवाद कसा ?
दिनेशदा, बिफिकिर, कापोचे.
दिनेशदा, बिफिकिर, कापोचे. ऋन्मेष, अन्जू, मेधावि. शेंडेनक्षत्र, साहिल, वावे धन्यवाद सगळ्यांचेच
किती तरी अजुन कंगोरे वाचायला मिळयायेत.छान...मला लिहिताना हेच अपेक्षित होते. काय आहे काळ बदलतोय, बदल अपरिहार्य आहेत. पण त्या काळात काही गोष्टी खरोखर खूप छान होत्या. त्या गोष्टी आपण पुन्हा आल्या जगण्यात आणू शकतो का. आजचे फायदे आहेत मग आजच्या काळात जगताना काही गोष्टी आपण निश्चित पुन्हा आणु शकतो. काही गोष्टी अगदी छोट्या छोट्या आहेत पण त्या खूप आनंददायी आहेत.
आता हेच बघा एक छोटी गोष्ट मी , माझ्या लहानपणी जसे आई वडिलांबरोबर आम्ही रोज संध्याकाळी बाहेर पडायचो, मग ते बागेत असेल देवळात असेल काही ना काही योगे घडवायचे. त्यातही आमचे जसे टाईमटेबल ठरलेले होते. जसे सोमवारी कुठे जायचे शनिवारी कुठे जायचे असे ठरलेले मग पावले आपसुक तिकडेच वळायची. टिव्हीचे आक्रमण झालेले नसल्याने, घरात आम्हाला तसे चांगला वेळ मिळायचा. आज मात्र मी जेव्हा तो विचार करते तेव्हा वाटते अरे आपण नेतो का आपल्या मुलांना..मग बरीच कारणे समोर येतात, मुलांचे क्लासेस, माझी कामे, नवर्याचे बर्याचदा घरी यायला उशीर होणे वैगरे वैगरे. मग आपण अगदी प्लॅन करुन हे इम्प्लिमेण्ट कसे करू शकू यावर मी विचार करतेय अन बर्याच अंशी त्यात यशस्वी ठरलेय, अशा अनेक गोष्टी आहेत. आपण जाणीवपूर्वक त्याची वाढ करायला हवी का. आज असेच जगायचे , आजच्या काळात हेच बरे म्हणुन लोंढ्या बरोबर वहात जाण्यापेक्षा जरा वेगळ अनुभवलेले आपण ते काही प्रमाणात का होईना, वेगळ्या रूपात का होईना करता येईल का..हा माझा भाव होता.
रांगा गेल्या, मुबलकता आली पण त्या बरोबर घाई, वेळ नसणे ,सगळीच जीवशैली बिघडणे या गोष्टी आल्याच तेव्हा या येणारच असेच जगूया असा विचार करून आपण काही बदल करू शकतो का आपल्या जीवनशैलीत असा एक विचार. काही गोष्टी टाळल्या, काही कमी केल्या जसे गरजा इतर अनेक बदल आपण जीवनशैलीत करू शकतो जेणे करून मानसिक शांतता शारिरीक संपन्नेताचा अनुभव आपण अनुभवू शकू अन मुलांच्या हाती पण ते देऊ शकू.
तो लायसेन्सराजचा काळ होता.
तो लायसेन्सराजचा काळ होता. १९८५ पासून त्याला हळूहळू काट लागली.
त्या काळात टीव्ही आणि रेडियोसाठी (म्हणजे हे बनवायला नव्हे, तर घरात ठेवायलासुद्धा) लायसेन्स होतं आणि त्याची फी वर्षातून एकदा पोस्टात जाऊन भरायला लागायची.
वरची बरेच प्रतिसाद छान
वरची बरेच प्रतिसाद छान आहेत.
त्यावेळी सुट्ट्यांमधे गावाला जाणे म्हणजे काका, मामा, मावशी, आत्या अश्या कोणाकडे जाणे असे. कधीतरी इतर ठिकाणी फिरायली जाणे होत असे. आता सुटीत गावाला जाणार म्हणल्यावर कुठेतरी फिरायला जाणेच ग्रुहीत धरलेले असते.
अर्थात ह्यात चांगले किंवा वाईट असे काही नाही. कारण घरची सगळी मंडळी जर कामासाठी दिवसभर बाहेर असतील तर कोणा नातेवाईकांना असे रहायले बोलावणे शक्य ही नाही.
त्या काळात टीव्ही आणि
त्या काळात टीव्ही आणि रेडियोसाठी (म्हणजे हे बनवायला नव्हे, तर घरात ठेवायलासुद्धा) लायसेन्स होतं आणि त्याची फी वर्षातून एकदा पोस्टात जाऊन भरायला लागायची.>>>> आमच्याकडे ट्रॅन्झिस्टर आला होता पण लायसेन्सचं आठवत नाही. एक जुना रेडिओ पार्ट्स मिळत नाही म्हणून माळ्यावर होता. तो एकदा चालू केला होता कुणीतरी पण पैसे भरल्याची आठवण नाही. असेल तसं. पण खूप आधी असेल. माझी हार्ड डिस्क फॉर्मॅट झाले असेल लोकांना बॅड क्लस्टर मधे गेली असे मेमरी.
आमच्याकडे खुप जुना फिलीप्सचा
आमच्याकडे खुप जुना फिलीप्सचा रेडिओ होता... वर्षाला एकवेळा परवाना शुल्क भरुन स्टॅम्प, सिल घ्यावे लागायचे. जसे बॅन्केचे पासबुक, रेशनकार्ड असायचे त्या प्रमाणे एका छोट्या पुस्तकात ह्या सर्व नोन्दी व्हायच्या.
नक्की कधी बन्द झाले (८१ आधीच असावे) हे आठवत नाही... पण परवाना शुल्क रद्द झाल्याचे ऐकल्यावर खुप हुश्श झाले होते.
उदय, नताशा, भरत धन्यवाद.. येस
उदय, नताशा, भरत धन्यवाद..:)
येस रेडिओच्या लायसन्सचा काळ होता पुर्वी असे मी लहानपणी ऐकलेले..पण आमच्या कडे रेडिओ ला लायसन्स वैगरे नव्हते ते.
असो लोक हो खूप सुरेख पोस्ट ..आता आपण वळुया माझ्या मुळ प्रश्नाकडे यातील काही निवडक भाग आता पुन्हा आपल्याला आजच्या जगण्यात आणता येईल का? आज जे आपण मिस करतोय आणि मला वाटते ते आपली जीवनशैली अगदी परिपुर्ण अबनवत होते ते पुन्हा आपण प्रयत्न पूर्वक आनु शकतो का?
पर्यावरण स्नेही तर होतीच ती लाईफ स्टाईल पण त्यात मला आज आपण पर्यावरण स्नेही तसेच समाज स्नेही बनायला हवे. सभोताल आपल्याला हवा तसा आपण ठरवुया..जे आपल्या पुढील पिढीलाही आपण एक सुंदर जीवन जगणे काय ते देऊ शकू. आजचा कोलाहल, आजची सगळ्यात झालेली घाई, पायदळी पडलेले मुल्ये, तत्त्वे म्हणजे काय रे भाऊ? असा पडलेला प्रश्न बघुन मन अस्वस्थ होतेच. अन मग मनाच्या तळाशी गेलेले लहानपणीचे काही रम्य प्रदेश पुन्हा खूणावायला लागतात. आजच्या पिढीला ते सांगताना त्याचे अस्तित्वही दाखवू शकत नाही आपण.
आता एक गंमत सांगते माझ्या डॉक्टरांना मी काय खावे अन कशी जीवनशैली असावी असे विचारले होते. ते म्हणाले तुमची आजी जे खात होती ते खाणे परिपूर्ण तर होतेच पण त्याचे वेळापत्रकही परफेक्ट होते. जर्मनीत आजही घड्याळे दोनदा लावली जातात, सूर्योदयाप्रमाणे कामे केली जातात मग आपल्या पुर्वजांनी लवलेली सवय आपण का नाही मेंटेन करू शकलो. न्याहारी, जेवन मधल्या वेळेचे खाणे आणि रात्री साधेसे हलकेसे जेवणे हा साधा सरळ भाग आज आपण विसरलो. असो अजून खूप काही मनात साचलय..लिहिलच
किंचीत का होईना, ग्लोबल
किंचीत का होईना, ग्लोबल वॉर्मिंग, शिफ्टींग ऑफ सिझन्स याचे परिणाम नंतरच्या काळात जास्त तीव्र झाले.
१९७१ चे बांगला देश मुक्तीचे युद्ध आणि १९७२ सालचा दुष्काळ आठवतोय मला. १९७१ नंतर बेस्टच्या तिकिटात ५ पैसे अधिभार आला ( तो अजून आहे बहुतेक ) आणि १९७२ नंतर टंचाई आणि महागाई हे शब्द जास्त वापरात आले.
१९७२ साली धान्याचे भाव अचानक वाढले हे खरेय पण रेशनवर ते उपलब्ध असे ( मिलो नावाची लाल ज्वारी त्याच काळातली, आन मिलो सजना हा पी.जे. पण त्याच काळातला ) सरकारी गुदामे खुली झाली आणि तशी त्या दुष्काळाची तीव्रता कमी झाली. नंतर बरीच वर्षे पावसाने दगा दिला नाही. त्यामूळे शहरात पाण्याची टंचाई तितकी तीव्र नव्हती. टँकर्स लॉबी वगैरे नंतरचे. ट्यूब वेल पण त्यानंतरच्याच. त्यामूळे त्या काळात सद्यकाळचे ताण नव्हते. मुंबईत कधीही थंडीसाठी म्हणून स्वेटर्स वापरावे लागले नाहीत. नालेसफाई होत होती का ते नीट आठवत नाही पण पाणी मोजक्या ठिकाणीच तुंबायचे.
आता हे सर्वच फार तीव्र झालेय. फेब्रुवारीपासूनच उन्हाळा जाण्वतोय. पाऊस वेळेवर पडेल ना, अशी शंका आतापासूनच वाटायला लागलीय.
जागतिकीकरणामूळे गरजा अचानक
जागतिकीकरणामूळे गरजा अचानक वाढायला लागल्यात. अनेक वस्तू पुर्वी बाजारात सहज उपलब्ध नव्हत्या ( चीज, पनीर, पिझ्झा बेस, क्रिस्प्स, खाकरा, ठंडाई, अनारश्याचे तयार पिठ, भाकरवड्या, तयार चकली भाजणी, चौकोनी किसण्या, चायनीज ग्रेव्ही मिक्स, सोया सॉस... खुप मजेदार यादी होईल ही ) आणि त्यावाचून काही अडलेही नव्हते.
सिनेमा बघणे हा आधी प्लान करायचा इव्हेंट होता ( अर्थात इव्हेंट हा शब्द तेव्हा वापरात नव्हता ) आयत्यावेळी गेलो तर ब्लॅकने तिकिटे घ्यावी लागत.
१९७७ ते १९८२ असा साधारण शोले चालला ( माझी सर्व कॉलेजची वर्षे ) त्यावेळी शोलेची नॉर्मल प्रिंट आणि ७० एम एम प्रिंट दोन्ही चालू होत्या. त्याच्या डायलॉगच्या कॅसेट्स लोकप्रिय होत्या.
फ्लेक्स प्रिंटींग नव्हते. सिनेमाची पोस्टर्स हाताने रंगवलेली असत. दादरचा टिळक ब्रिज, ऑपेरा हाऊस वगैरे ठिकाणची पोस्टर्स बघण्यासारखी असत.
आता जेवढ्या प्रमाणात प्लॅस्टीक वापरले जाते, तेवढ्या प्रमाणात वापरले जात नव्हते. कचराही कमी होता.
७० -८० च्या दशकातील माझा काळ
७० -८० च्या दशकातील माझा काळ बंगलोर आणि नाशिक मध्ये अनुक्रमे गेला. त्यातील मनात खूप साठलेल्या आठवणी म्हणजे
-बंगलोर मधील लोकांचा भाषेचा, वाचण्याचा आणि उत्तम संगीत ऐकण्याचा व्यासंग. इंडियन इन्स्टिट्युट ऑफ अर्ल्ड कल्चर नावाची भली मोठी लायब्ररी अन तिथे तासंतास वाचण्यात घालव्लेले क्षण.
-दुसरी आठवण म्हण्जे तिथल्या संगीत सभा आणि तिथून माझी संगीताचे -संगीत ऐकण्याची सुरुवात, सहिष्णुता
-रविंद्र नाट्य मंदिराते येणारी नाटके
पण त्याच बरोबर सदोदित पैशाची चणचण असूनही आम्ही खूप समाधानी मंडळी होतो. हे समाधान वैश्विक होते.
त्या नंतर नाशिक ला आलो. कुसुमाग्रज, वसंत कानेटकर, सुमन माटे, वि मा दी पटवर्धन यांचा विद्वत्ता प्रचुर काळ. ते नेहेमी दिसायचे,भेटायचे .... एक वलय होते....... हा फरक मात्र खूप जाणवतो...... तशी साधी अन विद्वान माण्से आता दिसत नाहीत, अनुभवता येत नाहीत.
रॅट रेस नव्हती असे नाही पण वेग कमी होता. आर्थिक आणि मटेरियलिस्टिक अपेक्षा फ्रिज्,स्कूटर पर्यंत मर्यादित होता, मोठे घर्/फ्लॅट म्हण्जे ८०० स्क्वे फूटापलिकडे नसायचा.
सभोवताली निओ रिच फारसे नव्हतेअन असले तरी त्यांच्या लाऊड वर्तनाने ते इतरांवर स्वतःस लादायचे नाहीत वा जाचक ठरत नसत.
तंत्र ज्ञानावर फारसे अवलंबून नहतो त्या मुळे कम्युनिकेशन मध्ये झालेल्या दिरंगाईने तणाव येत नसे. सुवाच्य अक्षर इ. कौतुकाच्या गोष्टी होत्या.
थोर गायक ,लेखक वगैरे आपल्या सारखेच होते.
वेग ... जीवघेणा वेग अन आकांक्षांनी घायाळ केले नव्हते
रेडीओलाच काय टीव्हीलाही
रेडीओलाच काय टीव्हीलाही लायसन्स लागे. बजेटमधे त्याची चर्चाही होत असे. पोस्टात जाऊन त्याचे पैसे भरावे लागत.
पोस्टाचा वापर खुप होता. पोस्टकार्डे, आंतर्देशीय पत्रे, जबाबी पोस्टकार्डे असत. शुभेच्छा पत्रे असत आणि संक्रांतीसाठी पाठवायच्या कार्डात एक छोटेसे पाकिट तिळगूळासाठी पण असे. कुरीयर फारसे नव्हते पण त्या सारखीच अत्यंत विश्वसनीय अशी अंगाडीया सिस्टीम होती. हे लोक अगदी हिर्यांचीही वाहतूक करत. त्यांची एक वेगळी मनी ऑर्डर सिस्टीम होती.
शिक्षण मात्र त्यावेळेला अगदी
शिक्षण मात्र त्यावेळेला अगदी लहानपणी प्रेशर कमी असायचं, शिशुवर्ग-बालवर्ग म्हणजे खेळ अगदी प्ले ग्रुप आणि आणि अगदी किंचित अभ्यास. अभ्यास १ ली नंतर सुरु व्हायचा. आता माझी छोटी भाची जुनियर केजीला आहे, किती प्रेशर अभ्यासाचं निदान ती जाते त्या शाळेत तरी आहे, तेव्हा मात्र आपल्या काळी बरं होतं असं वाटतं. मुलांचं बालविश्व तेव्हा छान होतं.
तिला अभ्यासाचा कंटाळा आहे मग शाळेतून तक्रारी. मी बहिणीला म्हणाले तू टेन्शन घेऊ नको. आत्ता एवढं लक्ष द्यायची गरज नाहीये. काही तिच्या वयाची मुलं करतात नीट अभ्यास. काही शाळांमध्ये वेगळी परिस्थिती असेल पण मला नाही माहिती.
निसर्ग जास्त बहरलेला होता आजूबाजूला पण मी पहिली दुसरीत असतानाच टुमदार डोंबिवलीचं कॉंक्रीटीकरण होत गेलं. सहावी-सातवीत जाईपर्यंत प्रचंड फरक पडला. ते त्रासदायक होतं.
आता आपण वळुया माझ्या मुळ
आता आपण वळुया माझ्या मुळ प्रश्नाकडे यातील काही निवडक भाग आता पुन्हा आपल्याला आजच्या जगण्यात आणता येईल का? आज जे आपण मिस करतोय आणि मला वाटते ते आपली जीवनशैली अगदी परिपुर्ण अबनवत होते ते पुन्हा आपण प्रयत्न पूर्वक आनु शकतो का?
>> हे प्रिमाइसच चुकीचे आहे. तुम्हाला सामाजिक बदल घडवून जे तुमच्या नजरेतून सुखाचे ते परत आणायचे आहे का? तर आता असे आहे कि टु इच हिज्/हर ओन. व्हॉटेवर रॉक्स युअर बोट. जे तुम्हाला सुखाचे वाट्ते ते तुम्ही करा पण ते दुसर्यावर लादणे आता अवघड आहे. तुम्ही वैयक्तिक पॅकेज डिझाइन करून तसे जगू शकता व सुखी राहू शकता.
मी दोन्हीचा सुवर्ण मध्य गाठऊन जगते. हाय टेक जॉब. लो टेक लिविन ईन टर्म्स ऑफ फूड अँड नीड्स. पण मला एसी, नेट स्मार्ट फोन ह्या माझ्या गरजाच वाट्तात. झोपायला सोलापुरी चादर,
वास घ्यायला माटुंग्यातून आणलेले गजरे. जेवायला घरगुती किंवा मग काही ही ऑनलाइन मागवलेले.
जसा मूड असेल तसे. आईच्या हातच्या चवीची साखि. बघायला स्मार्ट फोन वर क्रिकेट मॅच. ऐकायला सावन मधली गाणी. इथे बसल्या बसल्या जगातल्या घडामोडी हाताशी असतात वाचून समजून घ्यायला. सर्व संगीत व व चित्रपट उपलब्ध आहेत. गो विथ द फ्लो असे बोधिसत्वाने सांगितले आहे( स्पीकिन्ग ट्री. ) तर तोच आमचा फंडा आहे. जुने परत आणता येत नाही.वेळ वाया घालवू नये.
double post
double post
>>>> तर, 'आऊटडेटेड होण्याची
>>>> तर,
'आऊटडेटेड होण्याची भिती' हा एक मोठा बदल मला या दशकातल्या पिढीत जाणवतोय. जी सत्तर ऐंशी नव्वद वा दोन हजारच्या दशकातही तितकीशी नव्हती. <<<<<<
ऋदादा, तसे असेल, तर ७०/८० मधिल माझ्यासारखे लोक, हल्लीच्या काळात ऑलरेडी आउट डेटेड धरायचे की नाहि?
अन मग त्यांना किती वैचारिक/तंत्रज्ञानाच्या बदलांना सामोर जावे लागले असेल? पण तरि ते भित नाहीत, अन हल्लीचि पिढी भिते, असे कसे काय?
अरे बाबा मी स्वतः बेरजेचे यांत्रिक फॅसिट वापरले आहे, टाईपराईटारने बदाबदा टायपिन्ग केले आहे, अन आमच्या काळी कॉम्प्युटार हा शब्दही नव्हता हो.......
तो पुढे नोकरीत माहित झाला, १९९५ नंतर प्रत्यक्ष हातत मिळाला......
आम्ही महामूर बदल बघितले, त्यांना सजगपणे सामोरे गेलो न घाबरता... ते तसे सामोरे जाणे हल्लीच्या पिढीला मानसिकदृष्ट्या अति अॅन्क्शियस असल्यामुळे झेपत नाही का?
लिंबू जी >>अरे बाबा मी स्वतः
लिंबू जी
>>अरे बाबा मी स्वतः बेरजेचे यांत्रिक फॅसिट वापरले आहे, टाईपराईटारने बदाबदा टायपिन्ग केले आहे, अन आमच्या काळी कॉम्प्युटार हा शब्दही नव्हता हो.......
तो पुढे नोकरीत माहित झाला, १९९५ नंतर प्रत्यक्ष हातत मिळाला......>>
अगदे अगदी ..... मी तुमच्याच बँड वॅगन मधला.
माझ्या ठेबलावर तर पी सी आणून आदळला अन सांगितले , एका आठवड्त्या नंतर नो पेपर .... आनंदात अडॉप्ट जालो
Pages