पद्मा आजींच्या गोष्टी ५ : तेल गेले पण वर्ष मिळाले

Submitted by पद्मा आजी on 18 February, 2016 - 12:59

मी पद्मा भडंग. पूर्वाश्रमीची पद्मा पाळेकर.
तुमच्या अभिप्रायांनी मला फार प्रोत्साहन मिळाले. सर्वांचे मनपुर्वक आभार.

मागच्या 'वकिलाचे औषध' गोष्टी च्या प्रतिसादात काहींनी बरोबर म्हटले कि पूर्वी सेवा वृत्ती जास्त होती. लोकही वेगळेच होते तेव्हा. मदतीचा काही मोबदला मिळावा अशी अपेक्षाच नसायची. त्या प्रतिसादावरून मला माझ्या मिस्टरांच्या गोष्टी आठविल्या.

माझे मिस्टर प्रोफेसर होते. लोकांना मदत करण्यास नेहेमी पुढे. त्यांनी फार लोकांना मदत केली. पण त्यातील दोन गोष्टी अशा की ज्या त्यांचा स्वभाव चांगला चित्रित करतात.

त्यांचा एक प्रोफेसर मित्र/कलीग होता. त्यांना एक सात आठ वर्षांचा मुलगा होता. दुर्दैवाने त्या मुलाला लुकेमिया (Leukemia) झाला. उपायासाठी दर आठवड्याला त्याला नवीन रक्त द्यावे लागे. शिवाय महिन्यातून दोनदा टेस्ट कराव्या लागत.

त्यासाठी बराच खर्च व्हायचा. तेव्हा माझे मिस्टर मित्राला दर आठवड्याला पाचशे रुपये मदत करायचे. तेव्हा त्यांना काही फार पगार नव्हता. महिन्याला दोन हजार म्हणजे तेव्हा आमच्या दृष्टीने मोठी रक्कम होती. पण तरीही त्यांनी जवळ जवळ सात महिने त्याला मदत केली.

ही गोष्ट माझ्या लक्षात राहिली कारण महिनो न महिने एव्हडी अशी मदत करणे कठीणच होते. पण त्यांचा त्या मित्राला मदत करण्याचा निर्धार कमी झाला नाही.

त्याच पार्श्वभूमीवर अजून एक गोष्ट. आम्ही तेव्हा मालेगावला होतो. तिथे एक ऑईल मिल होती. चांगले फ्रेश आणि भेसळ नसलेले तेल मिळायचे तिथे. भुईमुग आणि तिळाचे. बरीच गर्दीही असायची आणि काही वेळा तर थांबावे लागे तेल बनण्याची वाट बघत. तिथे जायचे म्हणजे काहीही करा, कितीही काळजी घ्या, तेलाचे एक दोन डाग उडणारच कपड्यांवर. आम्ही बहुदा दोन तीन महिन्याचे तेल एकदमच आणायचो.

एक दिवशी घरातले तेल संपले होते म्हणून आम्ही निघालो तेल आणायला. बाहेर पडता पडता, एक विध्यार्थी आला. चेहरा पडला होता त्याचा.

म्हणाला, "सर, college admission साठी पैसे नाहीत आणि उद्या शेवटचा दिवस आहे." रडवेला झाला होता तो.

माझ्या मिस्टरांनी पटकन खिशात हात घातला व जे पैसे होते ते त्याला देवून टाकले. म्हणाले, "जा. हे घे. काळजी करू नको."

तो मुलगा गेल्यावर मला म्हणाले "आता तेलाचे नंतर बघू."

मी म्हटले "अहो अजिबात नाहीए तेल."

तेव्हा म्हणाले "त्याचे वर्ष वाया गेले असते. काही दिवस तेला शिवाय भाज्या कर."

असे होते पूर्वीचे लोक. गरज अचानक असो की महिनो महिने, वृत्ती मदतीला धावून जाण्याची. त्यात विचार किंवा गणित नसायचे. कारण मदत करणे हा त्यांचा स्थायी स्वभाव होता. मी अनेक लोक बघितले तशे.

गोष्ट अशी घडली आणि म्हणून मी तुम्हाला सांगितली.

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच आहे ही गोष्ट... !
लोकांना मदत करण्यास नेहेमी पुढे...>>> अगदीच पटले.

हे वाचुन मला एक प्रश्न पडला आहे तो असा. जर तुम्ही तुमच्या महिना दोन हजार रुपये पगारामधुन दर आठवड्याला ५०० रुपये तुमच्या मित्राला देत असाल तर स्वतःच्या दरमहाच्या खर्चासाठी पैसे कोठुन आणत होता?

आजी, गोष्ट छान...
दिगोची जी, महिन्याला दोन हजार रुपये देत असत त्यांचे मिस्टर, पगार दोनपेक्षा जास्त असावा, पण इतकाही नाही की दोन हजार सहज देणे जमावे (मी पण तुमच्या प्रश्नावर विचार केला आणि पुन्हा वाचले Happy )

छान आहे ही पण...
बाकी एक अनोखाच कथाप्रकार सुरु केलात आंजावर...
असो, आजीकडच्या जरा भुताखेताच्या, हडळिणी, चेटकिणी कथा पण येऊ द्यात...

छान गोष्ट.. पगार दोन हजार असं कुठे म्हणलय.. महिना दोन हजार खर्च खूप होता असं त्या म्हणत आहेत.

माझे आजोबा असेच संत होते. घरात प्रचंड गरिबी पण कोणी मागितले की खिषात हात घालून असतील नसतील तितके पैसे काढून द्यायचे. आजीची फार ओढाताण व्हायची त्यामुळे. एकदा पगार घेऊ़न नुकतेच घरी आले होते. कोणीतरी आलं अडचण घेऊन तर त्यांनी सगळा पगार देऊन टाकला. आजी बिचारी शेजारी उसने मागायला गेली कारण ४ मुले पदरात. घर कसं चालणार. शेजारीण बाई अवाक. ती म्हणली कालच तर पगार झाला असेल ना तुमच्या ह्यांचा.

अशी त्यांनी अनेकांना मदत केली. तो काळच तसा अडीअडचणीला मदतीला धावून जाण्याचा होता. दुर्दैवाने परतफेड तर राहू दे पण केलेल्या मदतीची जाणीवसुद्धा फार मोजक्या लोकांनी ठेवली. अर्थात आजोबा संत कॅटॅगिरी असल्याने त्यांना काही वाटायचे नाही.

मस्त लिहिलय . माझे आजोबा ही याच कॅटॅगरीतले त्यामुळे रिलेट झाल .

आपण त्याना अव्यवहारी म्हणू , पण त्याना जे समाधान मिळायच ते त्यानाच माहित .

एकदा देण्यातला आनंद कळला मी मग त्यासारख दुसर काही नाही Happy

माझे आजोबा ही याच कॅटॅगरीतले त्यामुळे रिलेट झाल
आपण त्याना अव्यवहारी म्हणू , पण त्याना जे समाधान मिळायच ते त्यानाच माहित .>>>>

बरेचसे आजोबा असेच होते का?

आमची आजी तर बर्‍याचदा अस्वस्थ व्हायची आजोबांच्या दातृत्व वृत्तीमुळे कारण तिला घर चालवायची जबादारी असायची.. कधी तिने आजोबांना त्या विषयी बोलायचा प्रयत्न केला की आजोबा म्हणायचे ''ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या नशिबाने मिळते मी देणारा कोण?''

बरेचसे आजोबा असेच होते का?>>> त्या काळातले लोक, अजुनही असे लोक असतात, किंवा आपण स्वतः सुद्धा असू शकतो. पण काळाबरोबर शहाणे होत जातो... (परवडत नाही किंवा पटत नाही...)

नाही हो..
माझा नवरा अजूनही असाच आहे>>>>>

आणि अश्या नवर्‍यांच्या बायकांचा त्यांच्यावरील आदरयुक्त राग देखिल तसाच आहे! Happy

मस्त Happy

सगळ्याच गोष्टी खूप मस्त. आज सगळ्या गोष्टी वाचल्या.
उन्हाळ्याच्या सुट्टीत माजघरात दुपारच्या निवांत वेळी गोष्टी ऐकल्याचा फील येतोय