पणजी-आजीच्या रेसिपिज दही-पोहे

Submitted by मेधावि on 18 February, 2016 - 00:08

खिचडीच्या धाग्यावरून गाडी आज्जीकडे वळली आणी सर्वांनाच आपापली आज्जी आठवून, अनेकांची मने भरून आली. सर्वांच्या विनंतीला मान देऊन तिच्या आठवणींसकट तिची अजून एक सोप्पी आणि पटकन होणारी व वरचेवर केली जाणारी पा. कृ. (लवकरच फोटो टाकीन)
दही-पोहे
साहित्य -
जाडे पोहे वाटीभर
सायीसुद्धा ( सायीसकट) दूध वाटीभर
घट्ट विरजलेलं गोड दही - १-२ वाट्या
२ मोठे चमचे सायीचे गोड दही.
१ मिरची (पोपटी रंगाची तिखट "नसते" ती) , कोथिंबीर
किसलेलं आलं चमचाभर
मिठ, साखर
तूप, जिरं, हिंग

जिथे जिथे दूध लिहिलेय तिथे तिथे म्हशीचे फुल फॅट दूध. तूप लिहिलेय तिथे घरी कढवलेले तूप. आमच्या घरचे सर्व जे.ना पथ्यविरहीत जेवायचे व बाकीच्यांनीही फालतूची डायेटं वगैरे करू नये अशी त्यांची कळकळीची विनंती असे.
एरवी दुभत्याच्या कपाटाभोवती वेटोळे घालून बसलेल्या आज्ज्या पणज्या नातवंडांसाठी हा पदार्थ करताना मोकळ्या हातानं व मोठ्या डावानं सायीचे दही घालताना बघणं हा एक आनंदानुभव असतो.

हिंग - बाजारातून खडा-हिंग विकत आणायचा, खलबत्यात घालून कुटायचा. हिंग कुटून झाला की त्याच खलबत्यात जवसाची किंवा कारळ्याची चटणी कुटायची. (म्हणजे हिंगाचा मस्त वास चटणीलाही येतो.)
खलबत्यात कुटलेल्या हिंगाची चव बाजारी हिंग पावडरीला येत नाही, आणि आपल्या स्वैपाकात कांदा लसूण कमी असल्याने हिंगाचा वास जरा चांगला "लागला" तरच चव येते. इति आसाबा.

कृती -
थोडं जिरं, मिठ व मिरची पोळपाटावर खरंगटून घेणे. आलं किसून घेणे.

निवडलेले व चाळलेले पोहे पसरट पातेल्यात घेऊन मग त्यावर वाटीभर दूध घालून हातानेच एकत्र करायचं. हे पोहे भिजलेल्या पोह्यांसारखे दिसतात. ५ मिनिटांनी हळूवार हातानं त्याला साखर, मिठ,आलं, जिरं, मिरचीचे वाटण व सायीचं दही २ चमचे चोळून ठेवायचं. ( हे काम फार निगुतीनेच करावं. धबड-धबड केलं की पोहे मोडतात) अगदीच कोरडं वाटलं तर त्यात अजून थोडंसंसंच दूध शिंपायचं. नंतर "लोखंडी" कढईत/ किंवा पळीत फोडणी करायची (तशी खमंग चव तुम्च्या त्या निर्लेप का फिर्लेपला नाही मिळत.). तुपात जिरं, मिरचीचं पोट फोडून केलेले मोठे तुकडे व हिंग घालून ती फोडणी पोह्यांवर ओतायची. खमंगफोडणी "अश्शी" बसली ना पदार्थाला, की मग कोणत्याही पदार्थाची चव "खुलते". मग हातानेच पोहे परत एकत्र करून घ्यायचे आणि मग अगदी वाढायच्या वेळेस उरलेले दही घालून सारखे करून वाढायचे. दही गोडच हवं. वरून लागलं तर परत थोडं दूध घालून जरास्सं सरबरीत केलं तरी चालतं. फार पात्तळ नको पण. सगळ्या पोह्यात एकदम दही नाही घालायचं, लागतील तसं थोडं थोडं करून खायला द्यायचे. पोह्यांची ताटली भरली की एकच कोथिंबीरीचं पान वर ठेवायचं म्हणजे खाताना कोथिंबीर तोंडात येत नाही. ह्या पोह्यांची चव गोडसरच असते. तिखट खाणार्यांना ह्याच्यावर लसणीचं तिखट घालून द्यायचं आणि तिखट न खाणार्यांना मिरचीचे तुकडे बाहेर काढून मग द्यायचं.

काही अवांतर सूचना - आ.साबांच्या नातवंडांच्या सूचना-ग्रंथातून.

१. ह्यात हळद नसते.
२. कोथिंबीरीचा एक किलवर फक्त डेकोरेशनसाठी.
३. ह्यात कढिपत्ता पण नाही, कुटाची मिरची नाही. कोणतीही पानं, फुलं ह्यात ढकलायची नाहीत. बरोब्बर जमले तर कोणत्याही अधीकच्या चवीची आवश्यकता नाही.
४. डाळींबाचे दाणे/ द्राक्षे अजिबात घालायची नाहीत. घातली तर चालतील का असे विचारायचेही नाही.
५. पोहे व जिरं नीट निवडून घेतलं नसेल तर कचकच येणारच.
६. काकडी, गाजर, कच्चा कांदा, ढो. मिरची घालायची नाही. आरोग्यासाठी खायचे असतील तर नुसते पोहे खा , दूध प्या व कोशिंबीर खा. ह्या पोह्यात फॅट कटींग चालणार नाही. दुधावरच्या सायीसाठी केला जाणारा हा पदार्थ आहे त्यामुळे सायीचे दही घ्यावेच लागेल.
७. हा गोडसर चवीचा पदार्थ आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त रेसिपी. आमच्याकडे दही पोह्यांमध्ये फक्त दहीच असतं, दूध नाही आणि तिखटपणाकरता उसळी मिरची. फोडणी नाही. मस्त गोडुस चव असते.

दही पोहे हा आमच्या घरी दिवाळीच्या पहिले दिवशी फराळाला हमखास होणारा पदार्थ. त्यात फोडणीत कुटाची मिरची मात्र हवी.

मस्तयं पाककृती. एकदा असे पोहे निगुतीनं करून बघेन (मायनस साय आणि सायीचं दही)
माझ्या माहेरी दही पोहे म्हटलं की पोह्यात कच्चं तेल, दाण्याची चटणी, मेतकूट, किंचीतसं मीठ, साखर आणि थोडा घरचा काळा मसाला घालून हातानं कालवायचं. वरून म्हशीच्या दुधाचं घट्ट दही, थोडं ताक घालून कालवायचं फार पातळ वा सरबरीत करायचं नाही. खायला देताना कोथिंबीर बारीक चिरून वरून घालायची. फार लाडात आलात तर वरून हिंग जीर्‍याची फोडणी. बरोबर पांढरा कांदा हातानं फोडलेला. (नंतर ब्रश करायला विसरायचं नाही ;))

मस्त लिहिलंय. दही-पोहे हा प्रकार मी अमेरिकेत एका देवळात गणपती विसर्जनासाठी आणलेल्या खिरापतीत प्रथम चाखला होता आणि तो करून आणणारी मैत्रीण काय ही खुळ्यासारखी रेसिपी मागते असं तोंड करून माझ्याकडे पाहात होती Happy अर्थात पोह्याचे, दडपे-पोहे आणि दही-पोहे हे प्रकार घरी कधीच नव्हते. मैत्रीणी कशाला असतात मग? खाद्यसंस्कृतीची देवाणघेवाण नको व्हायला? Wink

निगुती ही (खाद्य)संस्कृतीची मावसबहिण वाटते Proud

आम्ही गोकुळाअष्तमीला बनवतो.
मस्त वाटतो खायला. अगदी सेम पद्धतीने. पण आजी बनवायची. पणजी नाही. Happy

कोणतीही पानं, फुलं यात घालायची नाहीत>>
हे भारी आहे.
सुमेधा, तुमच्या पणजी आज्जीच्या रेसिपीजचं मस्तं डॉक्युमेंटेशन करताय तुम्ही.
मजा येत्येय वाचायला.

Pages