पणजी-आजीच्या रेसिपिज दही-पोहे

Submitted by मेधावि on 18 February, 2016 - 00:08

खिचडीच्या धाग्यावरून गाडी आज्जीकडे वळली आणी सर्वांनाच आपापली आज्जी आठवून, अनेकांची मने भरून आली. सर्वांच्या विनंतीला मान देऊन तिच्या आठवणींसकट तिची अजून एक सोप्पी आणि पटकन होणारी व वरचेवर केली जाणारी पा. कृ. (लवकरच फोटो टाकीन)
दही-पोहे
साहित्य -
जाडे पोहे वाटीभर
सायीसुद्धा ( सायीसकट) दूध वाटीभर
घट्ट विरजलेलं गोड दही - १-२ वाट्या
२ मोठे चमचे सायीचे गोड दही.
१ मिरची (पोपटी रंगाची तिखट "नसते" ती) , कोथिंबीर
किसलेलं आलं चमचाभर
मिठ, साखर
तूप, जिरं, हिंग

जिथे जिथे दूध लिहिलेय तिथे तिथे म्हशीचे फुल फॅट दूध. तूप लिहिलेय तिथे घरी कढवलेले तूप. आमच्या घरचे सर्व जे.ना पथ्यविरहीत जेवायचे व बाकीच्यांनीही फालतूची डायेटं वगैरे करू नये अशी त्यांची कळकळीची विनंती असे.
एरवी दुभत्याच्या कपाटाभोवती वेटोळे घालून बसलेल्या आज्ज्या पणज्या नातवंडांसाठी हा पदार्थ करताना मोकळ्या हातानं व मोठ्या डावानं सायीचे दही घालताना बघणं हा एक आनंदानुभव असतो.

हिंग - बाजारातून खडा-हिंग विकत आणायचा, खलबत्यात घालून कुटायचा. हिंग कुटून झाला की त्याच खलबत्यात जवसाची किंवा कारळ्याची चटणी कुटायची. (म्हणजे हिंगाचा मस्त वास चटणीलाही येतो.)
खलबत्यात कुटलेल्या हिंगाची चव बाजारी हिंग पावडरीला येत नाही, आणि आपल्या स्वैपाकात कांदा लसूण कमी असल्याने हिंगाचा वास जरा चांगला "लागला" तरच चव येते. इति आसाबा.

कृती -
थोडं जिरं, मिठ व मिरची पोळपाटावर खरंगटून घेणे. आलं किसून घेणे.

निवडलेले व चाळलेले पोहे पसरट पातेल्यात घेऊन मग त्यावर वाटीभर दूध घालून हातानेच एकत्र करायचं. हे पोहे भिजलेल्या पोह्यांसारखे दिसतात. ५ मिनिटांनी हळूवार हातानं त्याला साखर, मिठ,आलं, जिरं, मिरचीचे वाटण व सायीचं दही २ चमचे चोळून ठेवायचं. ( हे काम फार निगुतीनेच करावं. धबड-धबड केलं की पोहे मोडतात) अगदीच कोरडं वाटलं तर त्यात अजून थोडंसंसंच दूध शिंपायचं. नंतर "लोखंडी" कढईत/ किंवा पळीत फोडणी करायची (तशी खमंग चव तुम्च्या त्या निर्लेप का फिर्लेपला नाही मिळत.). तुपात जिरं, मिरचीचं पोट फोडून केलेले मोठे तुकडे व हिंग घालून ती फोडणी पोह्यांवर ओतायची. खमंगफोडणी "अश्शी" बसली ना पदार्थाला, की मग कोणत्याही पदार्थाची चव "खुलते". मग हातानेच पोहे परत एकत्र करून घ्यायचे आणि मग अगदी वाढायच्या वेळेस उरलेले दही घालून सारखे करून वाढायचे. दही गोडच हवं. वरून लागलं तर परत थोडं दूध घालून जरास्सं सरबरीत केलं तरी चालतं. फार पात्तळ नको पण. सगळ्या पोह्यात एकदम दही नाही घालायचं, लागतील तसं थोडं थोडं करून खायला द्यायचे. पोह्यांची ताटली भरली की एकच कोथिंबीरीचं पान वर ठेवायचं म्हणजे खाताना कोथिंबीर तोंडात येत नाही. ह्या पोह्यांची चव गोडसरच असते. तिखट खाणार्यांना ह्याच्यावर लसणीचं तिखट घालून द्यायचं आणि तिखट न खाणार्यांना मिरचीचे तुकडे बाहेर काढून मग द्यायचं.

काही अवांतर सूचना - आ.साबांच्या नातवंडांच्या सूचना-ग्रंथातून.

१. ह्यात हळद नसते.
२. कोथिंबीरीचा एक किलवर फक्त डेकोरेशनसाठी.
३. ह्यात कढिपत्ता पण नाही, कुटाची मिरची नाही. कोणतीही पानं, फुलं ह्यात ढकलायची नाहीत. बरोब्बर जमले तर कोणत्याही अधीकच्या चवीची आवश्यकता नाही.
४. डाळींबाचे दाणे/ द्राक्षे अजिबात घालायची नाहीत. घातली तर चालतील का असे विचारायचेही नाही.
५. पोहे व जिरं नीट निवडून घेतलं नसेल तर कचकच येणारच.
६. काकडी, गाजर, कच्चा कांदा, ढो. मिरची घालायची नाही. आरोग्यासाठी खायचे असतील तर नुसते पोहे खा , दूध प्या व कोशिंबीर खा. ह्या पोह्यात फॅट कटींग चालणार नाही. दुधावरच्या सायीसाठी केला जाणारा हा पदार्थ आहे त्यामुळे सायीचे दही घ्यावेच लागेल.
७. हा गोडसर चवीचा पदार्थ आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे काम फार निगुतीनेच करावे. धबड-धबड केले की पोहे मोडतात >> Happy निगुती शब्दाला जो वचक आहे तो 'केयरफुली', 'डेलिकेटली', 'हळुवारप्णे', 'कौशल्याने' अशा कुठल्या कुठल्या शब्दाला नाही...

मस्त्,दहिपोहे प्रचंड आवडीचे. माझी आजी पण मस्त बनवते, अशीच पद्धत. Happy
सासरी पण कायम बनवतात पण सोलापुरचे असल्याने त्यात १-२ चमचे दाण्याचे कुट असते. ते पण भारी लागतात.

मस्त लिहिली आहे पाककृती मेधावी. मी ह्यात थोड मेतकुट भुरभुरल असत. साखिवरच्या सूचना लगेच अमलात आणल्याबद्दल धन्यवाद आणि कौतुक. पुढील वेळी फोटो पण द्यायला प्रयास कर.

वा! वा! सुंदर पाकृ.

दहीपोहे हे माझं कम्फर्ट फूड आहे.
दहीपोह्यांमध्ये सायीचं दही, दूध, साधं दही, मोडलेली हिरवी मिरची हे सगळं घालतेच. फोडणी नाही घालून पाहिली अजून. आता फोडणी घालून करेन एकदा दपो.

कधी घरच्यांचा नाश्ता नसेल तर मी डब्यात पोहे घालून त्यात मीठ, सायीचं दही आणि दूध घालून आणते.
ऑफिसात पोचेपर्यंत ते छान भिजलेले असतात. मग त्यात अमूलचा मोठा डबा दही घालून खायचं. अख्खा दिवस मग शांततेत जातो. कोणाचा राग येत नाही. सगळ्यांविषयी प्रेम, माया, आपुलकी, जिव्हाळा वाटतो.

आरोग्यासाठी खायचे असतील तर पोहे खा व दूध प्या व बरोबर कोशिंबीर खा.>>> हे जबरदस्त आहे. Lol

मस्त रेसिपी. गणपतीविसर्जनाच्या दिवशी केले जातात हे आम्च्याकडे. फार आवडतात.

अख्खा दिवस मग शांततेत जातो. कोणाचा राग येत नाही. सगळ्यांविषयी प्रेम, माया, आपुलकी, जिव्हाळा वाटतो.>>>>> Lol आवडलंच हे. मला रोज घेवुन जायला हवं डब्यामधे.

शब्दा शब्दाने नॉस्टॅल्जिक करुन टाकलं Happy
मस्त रेसिपी आणि सांगण्याची पद्धत.
आमच्याकडेही गोकुळाष्टमीच्या फराळात हाच प्रसाद असतो..

मेधा,
लिहिण्याची स्टाइल ( तिथे आणि इथे) भारी !
खरंगटून घेणे, सरबरीत, कोथिंबिरीचा किल्वर, निगुतीने काय काय ठेवणीतले शब्द आहेत :).

मस्त. पण आम्ही नुसत्या किलवराऐवजी भरपूर कोथिंबीर घालतो. बाकी कृती सेम.
फोडणी बसणे>> अगदी अगदी.
नातवंडांच्या सूचना भारीयेत! Lol

भारीच रेसीपी आणि टिपा Happy

कधी घरच्यांचा नाश्ता नसेल तर मी डब्यात पोहे घालून त्यात मीठ, सायीचं दही आणि दूध घालून आणते.
ऑफिसात पोचेपर्यंत ते छान भिजलेले असतात. मग त्यात अमूलचा मोठा डबा दही घालून खायचं. अख्खा दिवस मग शांततेत जातो. कोणाचा राग येत नाही. सगळ्यांविषयी प्रेम, माया, आपुलकी, जिव्हाळा वाटतो. >>> Wink

आरोग्यासाठी खायचे असतील तर पोहे खा व दूध प्या व बरोबर कोशिंबीर खा >>> मस्तय हे Biggrin

अख्खा दिवस मग शांततेत जातो. कोणाचा राग येत नाही. सगळ्यांविषयी प्रेम, माया, आपुलकी, जिव्हाळा वाटतो.>>> कहर :).

मंजूडी, मग तुझा चेहारासुद्धा तेजस्वी दिसत असेल ना... श्री (३) प्रमाणे. Happy

अख्खा दिवस मग शांततेत जातो. कोणाचा राग येत नाही. सगळ्यांविषयी प्रेम, माया, आपुलकी, जिव्हाळा वाटतो.>>> ११११११११११
बुत्ती, मऊ सूत पुरण पोळी वर साजूक तूप आणि गरम सायीचे दूध, हापूसचा/पायरीचा आमरस, मऊ इडली, लाही पीठ आणि ताक, यांनी सुध्दा
अख्खा दिवस मग शांततेत जातो. कोणाचा राग येत नाही. सगळ्यांविषयी प्रेम, माया, आपुलकी, जिव्हाळा वाटतो >>>> Happy Happy

मेधावि, वाह वाह क्या बात है!!!!!!!!!!!!! वाचतानाच शांत्,शांत वाटत राहिलं.. सुपर डुपर कंफर्ट फूड!!!
कोथिंबीरीचा एक किलवर .. सो क्यूट!!

क्या बात है! निगुतीने लिहिलंय! दहीदुधपोहे हे अॉटाफे कम्फर्ट फूड आहे. अजून एक प्रकार म्हणजे दूधगूळपोहे.
अजून लिहा!
सी, निगुतीने साठी +१
मंजुडी, +१

वा भारी कृती. छान,गोड लिहिलंय मेधावी तुम्ही. आसाबा डोळ्यासमोर उभ्या केल्यात, पोहे करताना.

असे करायला हवेत, मी तसे साधेच करते दही पोहे झटपट (विदाऊट फोडणी). हे कित्ती छान निगुतीने केलेत. फार गोड.

कोथिंबीर-किलवर मस्तच.

आधीच्या प्रतिक्रिया वाहिल्यात का?

मी आत्ता बनवले असेच दही पोहे. जनरली मी फोडणी घालत नाही आणि कुटाची मिरची अ‍ॅड करते. पण आज अगदी रेसिपीबरहुकूम बनवलेत. अज्जीच्या निगुतीनं करणं जमलं नाही तरी चव मात्र अफलातून आली आहे. मध्येमधेय येणारं ते आलं तर अगदी अहाहा वाटतं. साय, सायीचं दही आणि दूध असं सर्व पोटात गेल्यामुळे पोट एकदम सुम्मडीत तुडुंब भरलंय.

अजून अशाच जुन्या पण भारी रेसिपी येऊ देत. धन्यवाद!

नंदिनी, सर्व पोस्टी सुरक्षीत आहेत. दपो करून कळवल्याबद्दल धन्यवाद. तेवढा एक फोटो लावायसाठी एक्दा दपो करायचेत, पण आता दह्यावरच्या धाग्यावरच्या पोस्टी वाचून बेरी करावीशी वाटतीये त्यामुळे दपो साठी सायीचे दही दवडायचे नाहीये.

मस्त लिहीलंय एकूणच! खरंच, कंफर्ट फूड. यात फक्त जरा तळलेले मिरगुंड कुस्करायचे आणि वरच्यावर भुरभुरायचे. (जास्त लाडक्या नातवंडांसाठी. ) Happy

Pages