गोंडवनातील गोंड लोक

Submitted by टीना on 11 February, 2016 - 07:48
ghusadi

खुप दिवस झाले याविषयी लिहायच मनातं होतं. पसारा खुप मोठ्ठा आहे. माझ्या आवाक्यात बसेल कि नाही हि शंकाच आहे म्हणुन फक्त ओळख देतेय. याउपर याबद्दलची माहिती अगदी तुटपुंज्या लिखित साहित्यात उपलब्ध आहे आणि बाकी सर्व पिढ्यानपिढ्या गोष्टीरुपात इथवर पोहचलेली. वर्षानुवर्षे घडत गेलेले संस्कार कधी लिखित स्वरुपात जतन झालेच नाही आणि लिहिल्या गेलेलं सर्व इतरेजनांपर्यंत पोहचलही नाही. मूळात सर्व गोष्टी सोडून बेदरकार वृत्ती तेवढी जपल्या गेली. असो.

मला घरच्या मोठ्यांकडुन कळलेल्या, काही मी अभ्यासलेल्या अशा गोष्टी एकत्र करुन ही माहिती तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न करते. कृपया मी सांगतेय ते पुर्ण प्रमाण मानुन चालु नये. जिथे शेजारी शेजारी असलेल्या, एकाच संस्कृतीच आचरण करणार्‍या दोन घरांच्या आचार विचारात फरक आढळतो, तिथं एवढ्या मोठ्या भागात पसरलेल्या लोकांच्या तर्‍हा वेगवेगळ्या असणे स्वाभाविक आहे हे समजुन तुमच्या संपर्कात आलेल्यांचे विचार, वागणे माझ्या बोलण्याशी तंतोतंत जुळणे हे कठीणचं. प्रस्तुत लेख हा ओळख स्वरुपी आहे हे ल़क्षात घ्यावे.

सुरुवातीला पृथ्वीवर एक सलग भुपट्ट होता ज्याचे पुढे जाऊन लॉरेशिया आणि गोंडवन ( गोंडवाना ) असे दोन भाग पडले यावरुन सर्वांना गोंड या शब्दाची ओळख असेलच. हा गोंडवन शब्द ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ एड्युअर्ड स्युस याने मध्य भारतातील वनात राहणार्‍या गोंड जमातीवरुन दिला. मूळ संस्कृत असलेल्या याचा अर्थ गोंड लोंकाच वन असा होतो.

वास्तव्य :

भिल खालोखाल संख्या असलेले गोंड हे मोठ्या प्रमाणात मध्य भारतात दिसुन येतात. महाराष्ट्रातील विदर्भ, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, उत्तरप्रदेश, सद्ध्याचे तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि पश्चिम ओडिशामधे गोंड लोकांच वास्तव्य प्रामुख्यानं आढळतं. याशिवायाय काही प्रमाणात ते गुजरात तसेच दक्षिण भारतात सुद्धा दिसतात.

देव, सणवार इत्यादी :

पारंपारिक कथेमधे सांगितल्याप्रमाणे; गोंड देवांचा त्यांच्या आईने त्याग करुन त्यांना जंगलात सोडून दिले. त्या देवांना पार्वतीने स्वतःबरोबर तिच्या निवासस्थानी नेले. शिवशंभो ला ते पसंत न पडल्याने त्याने त्या गोंड देवांना गुहेत बंदिस्त करुन ठेवले. त्यानंतर पारी कुपार लिंगो या वीरपुरुषाने देवीच्या मदतीने त्या गोंड देवांची त्या गुहेतुन सुटका केली. तेव्हापासुन पारी कुपार लिंगो यांना गोंडी धर्म संस्थापक म्हणुन पुजल्या जाते.

गोंडी लोक त्यांच्या सर्वात मोठ्या देवाला बडादेव/ बुढादेव/ महादेव असे संबोधतात. बडादेव खालोखाल पेरसापेन (पेन म्हणजे देव) हे गोंडांचे आद्य दैवत. वरील कथेत सांगितल्याप्रमाणे गुहेतुन सोडवलेल्या पाच देवांचे वंशज असे पाच कुळ या जमातीत आहेत. प्रत्येक कुळ त्या त्या देवाला पुजतात.

हे लोक निसर्गाची पुजा करतात. त्यांच्या देवीदेवतांच्या संकल्पनेमागे निसर्गशक्तीला आराध्य मानलेलं आहे. जगात पुनरुत्पादन हि सर्वात चमत्कारिक आणि जीवनचक्राला समोर नेणारी शक्ती म्हणुन लिंग योनी चा मेळ असलेल्या शिवाच्या पिंडीला म्हणजेच शिवाला देवपुजेत सर्वोच्च स्थान आहे. याशिवाय हि जमात सुर्य , चंद्राला सुद्धा पुजते. गदोदर स्त्रियांना त्यांच्या गदोदरपणाच्या काळात तिचं सर्व वाईट गोष्टींपासुन संरक्षण व्हावं म्हणुन विशेष जपल्या जात. मुलाचे नाव हे आईचा भाऊ म्हणजे बाळाचा मामा तर मुलगी झाल्यास तिचं नाव वडीलांची बहिण म्हणजे त्या बाळाची आक्का (आत्या) ठेवते.

गोंड हि स्वतंत्र जमात आहे. पण यांच्या सणावारावर बर्‍याच अंशी हिंदू मुस्लीम संस्कृतीचा प्रभाव आहे. गोंडी लोक दिवाळी, पोळा, नागपंचमीबरोबरच रमजान, मोहरम सुद्धा साजरे करतात. घरी गणेशचतुर्थीला गणपतीप्रमाणेच मोहरमला सवारी सुद्धा बसते. मंदीराप्रमाणे दरग्यातसुद्धा माथा टेकवला जातो.

दिवाळीच्या दिवसात मनोरंजन म्हणुन गावात एखाद्याच्या अंगणात जमुन गाणे, नाचणे, नकला करणे असे कार्यक्रम होतात. दंडार नृत्य हि गोंडांची ओळख म्हटले तर वावगे ठरु नये. यात गावातील काही लोक कमरेला लुंगी, हाफ पँट सारख गुंडाळून, उघड्या अंगाला राख किंवा पांढरी माती फासतात. डोक्यावर मोरपिसांपासुन बनवलेली मोठ्ठी टोपी, त्याच पिसांच्या खालच्या पांढर्‍या पोकळ भागाला गोल करुन ती एकमेकात गुंफुन वेणीप्रमाणे पाठीवर लोंबती सोडतात. तुटक्या फुटक्या मण्यांचा दागिना, गळ्यात कवड्याच्या माळा, हरिण अथवा बकर्‍याचं चर्मासन आणि हातात कोरलेल्या लाकडाचा दांडा घेऊन गावातील लोकांना सोबत घेऊन नाचतात, गोष्टी सांगतात, हसवतात. त्यांना घुसाडी म्हणतात. सहसा ३ ते ५ लोक दरवर्षी घुसाडी बनतात. या सणाच्या दिवसात त्यांना स्वत:च घर , नातेवाईक त्याज्य असतात. ज्या घरच्या आवारात त्यांचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो त्यांच्याच अंगणात ते राहतात. त्यांनी दिलेल खातात.गाव उठण्यापुर्वी त्यांची आंघोळ आणि सोंग ते वठवतात.

गावात त्या दिवसात घुसाड्यांना देवदुतासारख मानल्या जातं. दिवाळीच्या पहिल्या दिवशी ते गावातल्या प्रत्येक घरी जाऊन लोकांची विचारपुस करतात. प्रत्येक घरी जाऊन तिथल्या थोरामोठ्यांपासुन लहानग्यांपर्यंत हरेकाला जळत्या उदबत्तीने चटका देण्याची प्रथा आहे. तो देवाचा आशिर्वाद समजल्या जातो.

डोक्यावरच्या मोरपंखाच्या टोपीला आणि हातातल्या लाकडाच्या दांड्याला खुप महत्व आहे. त्यांना कुठेही बसताना नेहमी चर्मासनावर ठेवल्या जातं. घुसाड्यांसाठी मात्र जमिन म्हणजे अंथरुण आणि आभाळ म्हणजे पांघरुण असतं.

बांबुंपासुन बनवलेल्या आणि तांबे अथवा पितळाने साज केलेल्या पुंग्या आणि कातड्याचा डफावर बारक्या बांबुच्या काड्याने उमटणार्‍या नादध्वनीवर हळूवार पायांचा ठेका घेत रात्रभर नाचत, गात यांचे सण साजरे होतात. या वाद्यवृंदाला गोंडीत फेफारे असे म्हणतात.

घुसाडी

लग्नपद्धती :

गोंडी लाकांमधे लग्नसोहळा हा जवळजवळ ५ ते ७ दिवस चालतो. काळानुरुप आता तो दिवसावर आलाय पण खेडेगावात अजुनही तो ३ ४ दिवस साजरा करतात. एकाच कुळात किंवा मुला मुलीच्या मामाच कुळ सारख असल्यास ते मुल मुली भावंड समजल्या जातात त्यामुळे त्यांचे एकमेकांसोबत लग्न होऊ शकत नाही.

येथे मुलगी स्वतःच्या मर्जीने आवडीच्या मुलाला वरु शकते. एखाद्या मुलाने लग्नासाठी मागणी घालुनही त्या पोराला नाकारण्याचा मुलीला पूर्ण अधिकार असतो. तसेच एखाद्या लग्नासाठी कुटुंबाचा होकार नसल्यामुळे पळून गेलेल्या मुला मुलीला गावकरी परत आणुन सर्वानुमते त्यांच्या विवाह करुन त्यांना आपलसं करते. लग्नात मुलाचा बाप मुलीला हुंडा देतो. यामागे ती तिच राहतं घर सोडून वर कुटुंबासमवेत तिचं पुढील आयुष्य व्यातित करेल या निर्णयाच्या आदराप्रित्यर्थ तो मान म्हणुन हुंडा दिल्या जातो. लग्न झाल्यावर नवविवाहित जोडप एकत्र राहिल कि वेगळ हा सर्वस्वी त्या दोघांचा निर्णय असतो.

आता मात्र बर्‍याच ठिकाणी ठरवून लग्न करतात हे खोटे नाही. माझे उच्च्पदस्थ भावंडांची लग्ने हि ठरवुन केलेली आहेत तर कमी शिकलेल्या खेडेगावी राहणार्‍यांचे प्रेमविवाह झालेले आहेत. काळानुरुप क्वचित वेळी नवर्‍या मुलाला हुंडा देणे असले प्रकार सुद्धा येथे दुर्दैवाने रूळले आहेत.

व्यवसाय :

शेती करणे, कंदमुळ , मध, लाख तसेच विविध वनौषधी गोळा करणे हे व्यवसाय प्रामुख्याने चालत. काळ बदलला आणि बरेच लोक मुख्य प्रवाहात आले तरी खेड्यावर अजुनही याला उदरनिर्वाहाची जोडीची साधन म्हणुन पाहतात.

आदिवासी जमातींना वनौषधीच बरच ज्ञान आहे. हे सहसा पिढीजात पुढ जाते. बर्‍याच आजारांवर अजुनही हे घरच्याघरीच इलाज करतात. लोक शिकत आहेत खरे पण त्यामानाने साक्षरतेच प्रमाण तितकसं समाधानकारक नाही.

भाषा :

गोंडी भाषा हि द्राविड कुटुंबातील म्हणुन दाक्षिणात्य बर्‍याच भाषेंशी तिचं साधर्म्य आढळतं. गोंडी व्यतिरिक्त हिंदी, मराठी, तेलुगु, कन्नड, पारसी अशा बर्‍याच भाषा हे लोक बोलतात. गोंडी भाषेची स्वतंत्र लिपी आहे. शिक्षण, स्थलांतर अशा बर्‍याच कारणांमूळे हि भाषा आणि लिपी मागे पडत चालली आहे हे हि खरं.

लिहावं म्हटल तर गोंडी परंपरा, इतिहास, कथा, श्रद्धा, अंधश्रद्धा, सण, जगण्याच्या पद्धती, भाषा व लिपी, हिंदू मूस्लीम संस्कृतीशी असलेली नाळ ह्या सर्वांवर एक वेगवेगळा लेख होईल. पुढे जशी जशी अभ्यासाद्वारे आणखी काही गोष्टींची उकल होत जाईल त्याप्रमाणे त्या तुमच्यासमोर ठेवायचा प्रयत्न करेल. ह्या लेखातील गोंड, गोंडी लोक याम्ची तोंडओळख तुम्हाला भावेल अशी आशा करते.

तळटीप :
गावचे, तिथल्या घरचे फोटो इथे देणे मला प्रशस्त वाटले नाही म्हणुन लेखामधे प्रचिचा समावेश केलेला नाही. घुसाडीचा फोटो मात्र देतेय. फोटो मी ४थी ५वीत असताना काढलेला आहे. प्रचितल्या व्यक्तीची ओळख देणे मुद्दामहुन टाळते आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहीलंयस टीना!
फोटोही छान!

यात अगदी छापील वैदर्भीय मराठी भाषा वापरल्या गेली आहे.
Happy

गोंडी भाषेचे नमुने (बहुतेक तू दुसर्‍या एका धाग्यावर दिलेयस) पण या लेखात/ लेखमालिकेत जरूर लिही.

गोंदिया नावाचा आणि तिथे जास्त गोंड राहण्याचा काही संबंध आहे का? >> नाही

यात अगदी छापील वैदर्भीय मराठी भाषा वापरल्या गेली आहे.>> नेमक काय ते नै कळलं साती..

धन्यवाद _/\_

अगं म्हणजे एरवी तू बोली भाषालिहितेस ना रेसिप्या लिहिताना, आता पुस्तकी भाषा पण छान लिहीलीयस.
लेख आवडला.

टिने मस्त लिहिलयेस Happy मला बर्‍याच गोष्टी माहीत नव्हत्या Happy

यात अगदी छापील वैदर्भीय मराठी भाषा वापरल्या गेली आहे.
>>
हे विदर्भिय झालं

दुसरीकडे हे वाक्य असं असलं असतं -

यात अगदी छापील वैदर्भीय मराठी भाषा वापरली गेली आहे.

टीना, लेख आवडला. खूप दिवसांनी घुसाडी बघितला.

नागपुरात नियमीत नाही पण कधीकधी, घराजवळ गणपतीच्या १० दिवसांत एखादी रात्र (रात्रभर) दंडार चालायचं. वेगळाच माहौल असायचा.

उत्तम!! मस्त लेख अन ओळख! आमचा एक गोंड मित्र होता अत्राम नावाचा, त्याच्याकडे एकदा गोंडीभाषेचे अंकलिपी टाइप पुस्तक वाचल्याचे स्मरते, अर्थात त्याला पाच सात वर्षे लोटली अन ती मुलाक्षरे विस्मरणात गेली, अशीच एका बंजारा समाजातल्या मित्राकडून "गोरमाटी" सुद्धा शिकलो होतो थोड़ी थोडी सगळेच विसरलो!

आमचा अत्राम भारी होता, त्याला वैखारी का कुठली म्हणतात ती वन्यबोली अवगत होती त्याला फ्लॅटच्या गॅलरी मधुन हात काढ़ी अन त्यावर भात पोळी वगैरे ठेऊन पाखरे बोलवी! एकदा माझ्या हातावर ठेवली होती भाकरी तेव्हा एक कावळा आला अन नीट भाकरी खाऊन उडाला! भाई ला विचारले ,कसे? तर म्हणाला "आमच्या पड़दादा ने शिकवले जी आमची भाषा असते न ते" आदर फ़क्त विलक्षण आदर आहे राव मनात त्याच्याबद्दल आजही ! निसर्गाचा सिलेबस इतक्या पीएचडी लेवल पर्यंत वाचलेला एकटा अत्राम भेटला आयुष्यात! उभे आयुष्य रानात काढून सुद्धा आम्ही काहीच शिकु शकलो नाही हे मला माझ्या ह्या गुरुने शिकवले आहे आयुष्यात!!

टीना, खुप छान लिहिल आहेस.

स्त्रीयांच्या मताचा आदर केला जातो तिचे निर्णय ती घेऊ शकते
निसर्गाचीची पुजा केली जाते ही किती छान संस्कृती आहे.

अजुन या विषयावर भरपुर लिही वाचायला आवडेल.

खुप छान लिहिलंय. हा शोध आणखी पुढे चालूच रहावा.

गोंडवनातील ( म्हणजे ते नाव दिलेल्या प्रदेशातील ) काही वनस्पती अजूनही बघता येतात. त्यापैकी प्रोटीआ हे खास. हे फूल दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रीय फूल आहे. केप टाऊन मधल्या उद्यानात खुप आहेत. न्यू झीलंडमधेही खुप आहेत.

माझाच एक लेख होता, लिंक सापडली तर देतो.

सेतुमाधवराव पगडी यांनी सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वी माडिया-गोंड ही आणि तिथली आणखी एक जमात यांच्या भाषेचा अभ्यास करून प्राथमिक शिक्षणासाठी पाठ्यपुस्तके लिहिली होती असे त्यांच्या आत्मचरित्रात वाचल्याचे आठवते.तपशील आठवत नाहीत. चूभूदेघे.

टीना, सुरेख परिचय.
सोन्याबापूंचा प्रतिसाद आवडला.पाखरांची भाषा 'निळावंती'बाद्दल चितमपल्लींच्या पुस्तकात वाचले होते.

टीना,खूप छान झाला आहे लेख!! किती तरी नवीन गोष्टी कळल्या.

तुझ्या ओळखी ची लोकं असतील तर त्यांची परवानगी घेऊन फोटो टाकू शकतेस ना??

त्यांचे नाही तर त्यांच्या घरांचे,पोशाखाचे , त्यांच्या पदार्थांचे किंवा एखाद्या सणा समारंभाचे??

धन्यवाद सर्वांचे..

अग वर्षू,
ते माझ्या स्वत:च्या घरचे गावचे फोटो आहेत..म्हणुन नाही टाकले..
कधी स्पेशल याकरिता फोटोसेशन केलच नाही.. तसा फारसा फरकही नाही म्हणा पण पुढं मागं प्रचि काढले तर नक्की दाखवते..

त्यांचे नाही तर त्यांच्या घरांचे,पोशाखाचे , त्यांच्या पदार्थांचे किंवा एखाद्या सणा समारंभाचे??>>
जवळ असलेल्या फोटोंमधे घरचीच मंडळी आहे भरपुर..या लेखामधे त्यांचे फोटो टाकण म्हणुनच टाळलयं अगं मी Happy त्यांना ते नको आहे..

टीना, लेख आवडला.
सोन्याबापूंचा प्रतिसाद विशेष आवडला.

छान लिहीलंयस टीना! किती तरी नवीन गोष्टी कळल्या. निसर्गाची पूजा ज्या संस्कृती मधे केली जाते, त्या संस्कृती चे खरोखर कौतुक वाटले. अजून वाचायला आवडेल. लिहित रहा.
सोन्याबापूंचा प्रतिसाद मस्त च.

खूपच छान लिहलयं!

आमचा भाग देखिल आदिवासी एका मित्राच्या लग्नाला गेलेलो ते आठवले!! खुपच छान होता तो अनुभव!! Happy

कृष्णा, तुमचा अनुभव लिहा नं..वाचायला आवडेल..
मला तर प्रत्येकवेळी वेगवेगळ्या नव्या इंटरेस्टींग प्रथा कळतात..अगदी आजुबाजुला असलेल्या दोन गावात सुद्धा थोडाफार फरक दिसतोच.. Happy

बापू,
उगा शंका काढली अस वाटतयं आता Sad

छान माहितीपूर्ण लेख. असे अजून लिहा.

बापू लिहा आहो आणि मन मोकळे करा. तुमच्या मित्राबद्दल वाचू आम्ही. वो आपके दिल में तो है ही ना.

वाह, टीना - खूपच सुरेख, माहितीपूर्ण लेख .... Happy

इतर चालीरीतींबद्दल अजून सविस्तर लिहिणे ....

निसर्गाची पूजा ज्या संस्कृती मधे केली जाते, त्या संस्कृती चे खरोखर कौतुक वाटले. >>>>>+१११११

Pages