समुद्र किनार्‍यावर/बीचवर जाताना घ्यायची काळजी

Submitted by चैत्रगंधा on 2 February, 2016 - 22:38

कोकणात मुरूड-जंजिरा ट्रिपला जायचा प्लॅन केलाय. बरोबर लहान मुलं असल्याने जंजिर्‍यावर जायचा विचार नाहीये.
पण मुरूडला नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी घटनेने काळजीत पाडले आहे. तो समुद्रकिनारा सुरक्षित आहे का?

साधारणपणे बीचवर जातांना काय काळजी घ्यायला हवी? भरती/ओहोटी चे टाईमटेबल आधी कळते का? ऑनलाईन शोधले पण मुंबईचे मिळाले फक्त.
प्लिज टिप्स द्या. पहिल्यांदाच लहान मुलांना घेऊन जात आहे.

********************************************************************************************
खूप सुंदर माहिती मिळाली. धन्यवाद लोक्स Happy
प्रतिसादातली शक्य तितकी माहिती खाली अ‍ॅड केली आहे. काही राहिले असेल तर सांगा.

भरती - ओहोटीची गणिते:
--------------------------
१. तिथीला ३ ने गुणायचं आणि ४ ने भागायचं. . उदा. पौर्णिमा म्हणजे
१५ * ३ = ४५
४५ / ४ = ११.२५
म्हणजे सव्वा अकरा वाजता दुपारी आणि रात्री पूर्ण भरती. त्यानंतर ६ तासांनी पूर्ण ओहोटी

२. भरती-ओहोटेच्या गणितात (तिथी) * ३ करुन मिनीटे अ‍ॅड करतात.
नवमी असेल तर ९ * ३/४ = ६. ७५
यात ६ हा पुर्णांक तास धरायचा, आणि ०.७५ म्हणजे ४५ मिनीटे ( एका तासाच्या ०.७५ पट म्हणजे ४५ मिनीटे)
तसेच ९ * ३ = २७ मिनीटे
एकुण मिनीटे : ४५+२७ = ७२ मिनीटे = १ तास १२ मिनीटे
यात आधीचे ६ मिळवा म्हणजे ६ + (१ तास १२ मिनीटे) = ७ वाजुन १२ मिनीटे ही भरतीची वेळ मिळाली.

३. तिथीत +१ करून त्याची पाऊणपट केली की पूर्ण भरतीची वेळ कळते, उदा. पौर्णिमा- १५, १५+१= १६. १६ ची पाऊणपट म्हणजे १२. म्हणजेच दुपारी १२ ला पूर्ण भरती, नंतर ६ तासांनी पूर्ण ओहोटी.

काही गोल्डन रूल्स:
-----------------------
१. स्थानिक लोकांचा सल्ला ऐकणे.

२. ओहोटी असेल तर शक्यतो पाण्यात जाऊ नका. कारण ओहोटी आत खेचून घेते. भरती बाहेर फेकते.

३. काही बीचेस एकदम खोल होत जातात, काही बीचेस वर ओहोटीचे पाणी ओसरण्याचा आणि भरतीचे पाणी भरण्याचा वेग जास्त असतो. काही ठिकाणी मध्येच खडक असतात, जे पण खुप धोकादायक ठरु शकतात.

४. पाण्यात उतरताना मद्यपान करू नका.

५. किनार्‍यावरुन बघितल्यावर पाण्यात आडव्या लांबलचक लाटा तयार होत असतील, व त्या जिथे फुटत असतील, तिथवर उथळ (तरी पुरुषदोन पुरुष उंचीचा) किनारा असतो, तर त्यापेक्षा निम्म्या अंतरापर्यंतच समुद्रात जावे. त्यापुढे जाऊ नये.

६. जर लांबलच़क आडव्या लाटा तयार होत नसतील, त्या रुंदीला फारच छोट्या अस्तील, वा जिथे लाटा तयार होऊन फुटण्याचे प्रमाण इतर जागांपेक्षा तुलनेत नगण्य असते अशा ठिकाणी पाऊलही ठेवू नये.

७. कोणत्याही समुद्र किनार्‍यावर, विशिष्ट अंतरापर्यंत पुळण असते, तिथवरच कमरेभर पाण्यात धोका कमी असतो. या विशिष्ट अंतराचे पुढे समुद्रकिनारा समुद्रात एकदम उतार पकडुन खोल खोल जातो. ही उतार सुरु होणारी जागा समजायची कशी? तर आमच्या अनुमानाने, जिथे "लाटा फुटताना दिसताहेत" तिथे उथळ किनारा असतो.

८. बीचवर अशा काही अ‍ॅक्टीवीटी करणार असाल पॅरासेलिंग वगैरे वगैरे तर प्लीज त्यांचे सेफ्टी मेजर्स बघून निर्णय घ्या.

धोकादायक समुद्रकिनारे:
---------------------------
१. काल सकाळ मध्ये आल होते की नागाव, किहीम हे बीच सुरक्षीत नाहीत, तिथे गार्ड्स नाहीत. त्यामुळे पाण्यात उतरताना लाम्बवर, अती खोल जाऊ नका.

२. गणपतीपुळे अति डेंजरस. तिथल्या पाण्यात चुकूनही खेळायला जाऊ नका. त्यापेक्षा भंडारपुळ्याला जा (दीड दोन किमी अंतरावर आहे) तिथला किनारा सुरक्षित आहे तरीही स्थानिकांना विचारून घ्या.
मांडवी बीच (काळा समुद्र) रत्नागिरी: पाण्यात उतरू नका. अनेक खडक आहेत.
पांढरासमुद्र फार सुरक्षित बीच आहे पण खूप घाण आहे, जाववत नाही असली अवस्था.
भाट्ये बीच (रत्नागिरी) : खेळण्यासाठी खूप चांगला बीच पण चेंजिंग रूम वगैरे सोयी नाहीत. बीचवर काही रीझॉर्ट आहेत तिथे सोयी आहेत. पाण्यात उतरण्यासाठी झरीविनायकापेक्षाही पुलाजवळच्या किनार्‍यावरून उतरा.
वेळणेश्वरः खेळण्यासाठी चांगला बीच. बर्‍याच सोईदेखील आहेत.
गणेशगूळे बीचः आमचा आवडता पण गर्दी फार नसते.

३. कोणत्याही बीच च्या लगेच शेजारी लागुनच डोंगर/टेकडी असेल, किनारा खडकाळ असेल, तर तो जास्त उताराचा अरुंद किनारा हमखास धोकादायक असतो. (उदा. गणपतीपुळे/हरिहरेश्वर, हेदवी) इत्यादी.
आंजर्ल्याचा किनारा खरे तर अतिशय सुरक्षित मानला जातो. पण तेथिल दोनही टोकांचे भाग असुरक्षित आहेत, एकीकडे वर म्हणले तसा डोंगर आहे, तर दुसरीकडे नदीचे पात्र येऊन मिळते.

४. अलिबागच्या किल्ल्यातही जाऊ नका असे सांगतात तरी लोक जातात.

मुलांसाठी बीचवर जातांना जवळ ठेवायच्या वस्तू:
---------------------------------------------------
१. रबरी ट्यूब्ज
२. प्यायचे पाणी
३. सनबर्न/ जळजळ टाळण्यासाठी क्रिम्स, कॅप्स
४. बीच टॉईज
५. कोरडा खाऊ
६.ओले कपडे, मातीने माखलेले टॉवेल ठेवता येतील अशा प्लॅस्टिक पिशव्या

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१)तुम्हाला बीचवर जायचे आहे ना तर खुशाल जा पण समुद्रात/पाण्यात जाऊच नका.थोडा हास्यास्पद सल्ला आहे पण उपयोगाचा आहे.
२)एकमेकांचे हात धरून साखळी करावी,समुद्राकडच्या एकेकाला भिजू द्यावे आणि जमिनीकडच्या टोकाच्या व्यक्तीने फोटो घेऊन पाचेक मिनीटाने त्याची जागा घ्यावी. सहाजण असतील तर अर्ध्या तासात सर्वांना सुरक्षित मजा मिळवता येईल.

रत्नागिरी आणी विशेषतः गणपतीपुळ्याच्या समुद्राबद्दल नंदिनीने लिहिलं आहेच. एका परिचितांनी दिलेली माहिती:

गणपतीपुळ्याच्या समुद्रात भोवरे रॅंडमली तयार होत असतात. म्हणजे काय? तर लाटांमुळे वाळूत तयार होणारा मोठा खड्डा, अ‍ॅक्चुअली भोवर्‍यासारखा खाली निमुळता होत जाणारा, ज्याची कोणतीही लांबीरुंदीउंची आणि अन्य पॅटर्न्स आजतागायत निश्चित करता आलेले नाहीत, येणारही नाहीत.

ओहोटीच्या वेळी लाटेबरोबर जर व्यक्ती आत खेचली जाऊन नेमकी भोवर्‍यात अडकली, आणि पुढच्या लाटेला येणारी प्रचंड वाळू त्या भोवर्‍यावर जोरकसपणे अंथरली जाऊन तो भोवरा बुजला तर बुडालेल्या व्यक्तीचा मागमूसही सापडू शकत नाही! भोवरा बुजल्यामुळे 'हीच भोवर्याची जागा' म्हणून तिथे जायचं टळत नाही कारण तो तिथे नसतोच! तो एव्हाना भलतीकडे तयार झालेला असतो! आणि हे इतके भयंकर भोवरे गणपतीपुळ्याच्या समुद्रात किनार्‍यापासून बर्‍यापैकी जवळच्या अंतरावर अगणितवेळा तयार होऊन बुजत असतात. त्यामुळे तो समुद्र सर्वांत धोकादायक मानतात.

बाकी इतरही किनार्‍यांबद्दल अतिशय चांगली माहिती मिळाली आहे.
धाग्यासाठी धन्यवाद.

घुडेवठार समुद्र किनारी 1 शालेय विद्यार्थी बुडाला
मांडवी घुडेवठार समुद्र येथे बर्थडे सेलिब्रेशन करण्यास गेलेल्या 5 शालेय विद्यार्थ्यांपैकी1 जण बुडाला
1 जण बुडाल्या बरोबरच बाकी विद्यार्थी सावध झाले व काठावर राहिल्याने बचावले
2 वाजता शाळेत परीक्षा संपल्यावर हि मुले समुद्रावर आली होती
दुपारी साडेतीनच्या सुमारास सदर घटना घडली
बेपत्ता असलेला मुलगा आपल्या मारुती मंदिर येथे राहणाऱ्या आजोबांकडे शिक्षणासाठी राहात होता
हि मुले पटवर्धन शाळेत इयत्ता नववीच्या वर्गात शिकणारी होती
पाण्यात बुडालेल्या एका मुलाचा शोध अद्याप सुरु असून रात्री दहा नंतर येणाऱ्या भरातीनंतरच सदर मुलाचा शोध लागू शकतो असे जाणकारांचे मत आहे\

>>> वरील बात्॑अमी आत्ताच वाचली. अजून सत्य नक्की काय आहे ते माहित नाही.

नन्दिनी, सन्देश खानविलकर असे त्याचे नाव होते असे टिव्ही ९ मराठी की अशाच मराठी चॅनेलवर मी ब्रेकिन्ग न्युज मध्ये मी बघीतले. जास्त माहिती नव्हती. रत्नागिरीजवळ मान्डवी समुद्रात ही ५ मुले पोहायला गेली होती म्हणे. ४ वाचले, एक गेला.

Pages