वेटोळे

Submitted by जव्हेरगंज on 25 January, 2016 - 03:25

तर मी एकदा असाच चालत होतो, भटकत होतो, दगडधोंडे तुडवत, पायवाट मळवत, तहानभुक भागवत, ऊन्हा-पावसाला भिजवत, अंधाराला कवटाळत, जगत होतो.

माझ्या कपाळी अपयशाचा टिळा लावला होता.
प्रश्न जगण्याचा होता. जगुन जगुन थकण्याचा होता. गुडघे घासून मरण्याचा होता.

तो प्रश्न घेऊन मी आत जंगलात खोलवर गेलो. उंच टेकाडं चढून पाहीली. दलदलीत चिखल माखून घेतला. काटेरी गवतात झोपुन गेलो. झऱ्याच्या पाण्यात गारठून गेलो. हे असह्य झालं.

तुडुंब भरलेली माझी धोपटी रिकामी होत गेली, दुनिया भणंग झाली, मन ऊदास झाले, झाडाझाडांच्या सावलीत, डोंगर दऱ्यांच्या कपारीत, नदीकिनारच्या मातीत, स्वप्ने मरुन गेली.

एके दिवशी सपाट मैदानावर , हिरव्या कुरणावर एक छप्पर माझ्याकडे बघत होतं, खुदकन हसत होतं, वाऱ्याच्या झोतांवर आपला पाचोळा ऊडवत होतं.

मी पाहीलं, जवळ जाऊन बघितलं, एका तपानंतर मी माणूस पाहीला. ती एक बाई होती. घर सारवत होती. मला पाहून दचकली. जराशी घाबरली. तिच्या माथ्यावर मला काळजी दिसत होती. एक आशा दिसत होती. माझ्यासारख्या कफल्लक माणसाकडून तिला कोणताच धोका नव्हता. मला पाणी दिले. जेवू दिले. ऊबदार घोंगड्यात झोपुही दिले. तिने माझ्यावर ऊपकारच केले.

या छपरात ही बाई राहते. एकटीच?

मला युगांताची झोप लागली. मी शून्य होऊन गेलो. माझं अचेतन शरीर जराही हालचाल करत नाही.
जेव्हा मी ऊठून बसलो, भान हरपून नुसताच बघत राहिलो. एक धिप्पाड माणूस माझ्या समोरच बसलाय. त्याच्या चेहेऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहतोय. याच्याकडे बहुदा कोणी पाहुणे येतंच नसावेत. त्याच्या हास्यातलं निरागस कुतुहल मला भेडसावत चाललं.
मी किती दिवस झोपुन होतो, काहीच अंदाज़ लागत नाही.

त्याने एक हरीण पकडून आणलं होतं. बोटाने इशारा करत मला त्याने दाखवले. सोनेरी केसांच मखमली हरीण. रात्री जेवणात तेच होतं. खरपुस भाजलेलं. मीठ मसाला टाकलेलं. कांदा लिंबू असलेलं, एवढं सुग्रास भोजन मी कित्येक महिन्यांनी, वर्षांनी केलं. मला हायसं वाटलं, त्याचे आभार मानले.

यातला प्रत्येक घास चराचराचा आहे, वनदेवीचा आहे, सावलीत बसलेल्या गिधाडांचा आहे. माझ्या कपाळाच्या भेगाभेगांतुन वाहणाऱ्या रक्ताचा आहे. अखंड झिरपणाऱ्या तृप्तीचा आहे.

मग रोज तो धिप्पाड मनुष्य काही ना काही आणतच गेला. ससे , तितर , घोरपड, आणि एकदा तर वाघही. वाघ, हरीण चार सहा दिवस आरामात पुरायचे. बारीकसारीक प्राणी एका दिवसात फस्त व्हायचे. खंगलेलं माझं शरीर आता धष्टपुष्ट होत चाललं. त्या स्त्रीच्या हाताला सुंदर चव होती. तिच्या डोळ्यांतील मादक भाव मला वाचता येत होते. ती एक रापलेली स्त्री होती. अवाढव्य जंगलात जगणं शिकली होती.

पण हे लोक माझी एवढी का सेवा करतायत? काहिही न मागता भरभरुन देतायत. यांचा काही छुपा अजेंडा तर नाही? नरबळी देण्याअगोदर त्याला धष्टपुष्ट करतात म्हणे. ईथे मनुष्यवस्तीही कुठे जवळपास नाही. त्यांचा देवसुद्धा मला कोठे दिसला नाही. दु:ख यांच्याकडे नव्हतचं.

प्रश्न सुरक्षेचा होता. भविष्याचा होता. भविष्यात येणाऱ्या संकटांचा होता.

या धिप्पाड मनुष्याने मला शिकार शिकवली, डावपेच शिकवले. आत्मसंरक्षणाचा धडा दिला. त्याने माझ्यावर ऊपकारच केले. मी उगाच याच्यावर संशय घेतला. त्याने माणुसकी जपली होती. माझ्यावर विश्वासाचा डोंगर ठेवला होता. त्याला तडा जाईल असे मला काहिही करायचे नव्हते. पण...

माझा जगण्याचा प्रश्न सुटलेला होता.

एका दुपारी काळवीट टिपताना माझा बाण त्या धिप्पाड पुरुषाकडे वळतो. आणि सरळ त्याच्या मस्तकाचा वेध घेतो.

डरजुली ऊन्हात रडत बसली, मी खोऱ्यानं माती सारत गेलो, भर दुपारी कावळा ऊडून गेला, खेंगाट रस्त्यात मरुन पडलं, जळकट धूर तुराट्यात घुसला. नराची मादी किवंडी, हा मृत्यूसुद्धा बुळबुळीत.

त्या रापलेल्या स्रीच्या कपाळी वैधव्य आलं. तिच्या डोळ्यांतील मादक भावांना मी शोधत गेलो.

प्रश्न भविष्याचा होता, सुरक्षित राहण्याचा होता, वंशाच्या वृद्धीचा होता.

माझ्या राज्यात आगंतुक पाहुण्याला प्रवेश नाही हे मी आता ठरवून टाकलयं.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान !

आवडली. पुर्ण कळली असं म्हणणार नाही कारण अख्खी रुपकात्मक आहे.

वेटोळे - ज्याने दूध पाजले त्यालाच डसून त्याच्या खजिन्याच्या हंड्यावर बसणार्‍या नागाचे...... असा अर्थ घेतला मी.

अश्विनी अगदी योग्य अर्थ घेतला आहे!

काही सदस्यांना शेवट व्यवस्थित समजला नाही असे वाटते. केवळ शेवट पुन्हा एकदा त्याच लयीत लिहुन काढण्याचा प्रयत्न करतो.
('डरजुली ऊन्हात ......' हा परिच्छेद मीटरमध्ये बसला नाही हे मान्य )

धन्यवाद Happy

updated:

(तो परिच्छेद बदलला आहे , गोड मानून घ्या , आता समजेल बहुदा) Happy

का..ती..ल..!!
("म्हसरावर ध्यान ठिवा" चा
पुध्ढ्चा भाग होऊ शकतो हा..तसे झाले तर, त्यातला बापू बराच करामती निघाला असे वाटेल...आम्ही बसलो आपले बपुडे म्हसरावर ध्यान ठिवात.. Uhoh )

मस्त लिहिलय !!

छान

माझ्या पण काही शब्द डोक्यावरुन गेले होते पण ती जी एं च्या कथांमध्ये पण जातात आणि बाकी कंटेक्स्ट कळला Happy

उगाचच बदल केला . आधी छान होती . अर्थ इथेच लिहिला असता तरी चालल असत . जमलेल्या रस्शात पाणी ओतल्यासारख झालय .

Pages