माझ्या वाईट सवयी ४ - निष्पाप जीवांची हत्या

Submitted by ऋन्मेऽऽष on 7 January, 2016 - 12:50

लहानपणी मामाच्या गावाला फावल्या वेळेत मी खिडकीपाशी बसायचो. समोर ट्रेनचा ट्रॅक होता. तासाभराने एखादी ट्रेन जायची. पण माझी दोन तास बसायचीही तयारी असायची. खिडकी ओलांडून कधी पलीकडे गेलो नाही. कारण तेव्हा माझे वय वर्षे फक्त सहा होते.

एके दिवशी संध्याकाळच्या तांबड्या किरणांनी ऊजळून निघालेल्या त्या खिडकीच्या चौकटीवर, एक मुंग्यांची रांग मला ऊत्तरेकडून पश्चिमेकडे जाताना दिसली. कुतुहल चाळवले. हा काय प्राणी असतो म्हणून मामीकडे विचारणा केली. त्या लाल मुंग्या आहेत. धोकादायक असतात. चावल्या तर फोड येऊ शकतो. असे सांगत मला त्यांच्यापासून दूर राहायचा सल्ला मिळाला. पण न मागता मिळालेला सल्ला मी आजवर कधी घेतला नाही. प्राणी धोकादायक आहे तर त्याचा काटा काढायला हवा ही मानवी बुद्धी मला उपजत होती. पण आता तो काटा काढायचा कसा यावर माझे शैतानी दिमाग चालू लागले. आणि सुचले. त्या वयात सहज साध्य होणारे हत्यार. म्हणजेच पाणी!

‘मुंगीला मुताचा पूर’ ही म्हण माहीत व्हायच्या आधी मला हे सुचले हे विशेष. पाण्याची एक चूळ अलगद रांगोळी सोडावी तशी त्या मुंग्यांच्या रांगेवरून सोडली आणि दुसर्‍याच क्षणाला त्या मुंग्या सैरावैरा पळू लागल्या. पळता पळता शेजारच्या खाटेवर झोपलेल्या माझ्या मामाला चावल्या आणि मुंग्यांसोबत माझीही बिनपाण्याची धुलाई झाली.

असो, मात्र मुंग्यांना मारताना त्यांना बिथरवू नये हा मूलमंत्र मी शिकलो. मग मी दुसरा आणि यशस्वी उपाय वापरायला सुरुवात केली. तो चिचोक्यांचा की कसल्याश्या बियांचा खेळ असतो पहा. जमीनीवर बिया टाकायच्या आणि ईतर बियांना धक्का न लावता एकेक बी बाजूला काढायची. बस्स याचप्रकारे रांगेतली एकेक मुंगी बोटाने टिपून, तिला चिरडून गायब करू लागलो. तिच्या डेडबॉडीचा एक बारीकसा कणही त्या रांगेत ठेवायचो नाही. एखादी मुंगी एकटी बाजूला दिसली, की घेतला तिला कोपच्यात. तिच्या साथीदारांना जराही खबर न लागल्याने त्या चालत राहायच्या. असे करता करता हळूहळू एकेक मुंगी कमी होत जायची. त्या मुंग्यांची एकूण संख्या पाहता खूप वेळखाऊ आणि धीराचे काम होते हे. पण यातून मिळणार्‍या आसूरी आनंदाचे मोल अफाट होते.

हाच आसूरी आनंद मग मी पुढच्या आयुष्यात ईतर कैक जिवांना मारून मिळवू लागलो.

झुरळाला मी घाबरायचो, पण त्याला चपलेच्या एकाच फटक्यात मारायचो. झुरळ उडणारे असेल तर चप्पल फेकून मारायचो. पण मारायचो!
पालीला त्यापेक्षा जास्त घाबरायचो. पण शुक शुक करून हाकलून लावण्याऐवजी तिला काठीचा फटका मारणे पसंद करायचो. तिच्या तुटून पडलेल्या वळवळणार्‍या शेपटीकडे बघणे एखाद्या स्वयंचलित खेळण्यासारखा आनंद देऊन जायचे.

चतुर म्हणून एक किडा असतो पहा. त्याच्या नाजूकश्या पंखांच्या बारीकश्या फडफडीतून निघणारा नाद फार मजेशीर असतो. त्याची निमुळती शेपटी एका दोर्‍याला बांधून पतंग किंवा फुग्यासारखे खेळणे हा माझा छंद होता. त्या दोर्‍याच्या दुसर्‍या टोकाला आणखी एक चतुर बांधला की ते एकमेकांना खेचत उडतात. या खेळाला आणखी मजेशीर करायला म्हणून मी चार पाच चतुर वेगवेगळ्या दोर्‍यांना बांधून त्या दोर्‍यांची एकत्र गाठ मारायचो. प्रत्येक जण वेगवेगळ्या दिशेला उडायचा बघायचा आणि कुठेही लांबवर उडून न जाता एका ठराविक परीघातच आपला जीव काढत फिरायचे.

पावसाळ्यात आम्ही दादरावर सार्वजनिक पॅसेजमध्ये कॅरम खेळायचो. तिथे मोठमोठ्या माश्या घोंघावत यायच्या. बरेचश्या सुस्तावलेल्या असायच्या. त्यांना मारण्याऐवजी मी चिमटीत पकडायचो आणि कॅरमवर टांगलेल्या बल्बचा त्यांना चटका द्यायचो. हेतू हा की त्यांच्यावर माझी दहशत बसावी, त्यांनी जाऊन त्यांच्या ईतर सवंगड्यांना सांगावे की त्या कॅरमवरच्या दादाला त्रास देऊ नका, तो पकडून नको तिथे चटका देतो.

माश्यांवरून आठवले, पावसाळ्यात लोकांच्या दारात कपडे वाळत घातलेले असायचे. त्यातील नाड्यांवर माश्यांचा झुबकाच बसलेला असायचा. त्यावर मूठ मारताच एकाच वेळी किमान सात-आठ माश्या मुठीत कैद व्हायच्या. मग ती बंद मूठ कोणाच्या तरी तोंडासमोर नेऊन उघडायची. अचानक नाकातोंडावर झालेल्या भुणभुणीने ती व्यक्ती भणभणूनच निघायला हवी. पण मग कधी असा एखादा गिर्हाईक नाही मिळाला तर त्या माश्या मुठीतच जीव सोडायच्या. त्यांना मूठमातीही न देता हात झटकून मोकळा व्हायचो. एकाच वेळी सात-आठ जीवांच्या रक्ताने रंगलेले हात असा हा प्रसंग विरळाच.

एक प्राणी होता ऊंदीर. त्याला पिंजर्‍यात पकडले की त्याची विल्हेवाट लावायचे काम माझ्याकडे लागायचे. तो पिंजरा घेत गच्चीवर जायचो आणि बिल्डींगच्या मागच्या बाजूला एका मोकळ्या जागेत त्या ऊंदराला भिरकावून द्यायचो. पडल्यापडल्या काही मरायचा नाही, पण जबर मार लागल्यागत निपचित पडून राहायचा. थोड्यावेळाने चालण्याईतपत ताकद यायची, पण तोपर्यंत फार उशीर झालेला असायचा. कारण त्याला टाकायच्या आधी त्याचे प्रदर्शन मांडून मी आजूबाजूच्या घार-कावळ्यांना जेवायचे आमंत्रण दिलेले असायचे. तो खाली पडताच कुठून कुठून येत त्यावर तुटून पडायचे. अर्धा जीव मी घ्यायचो, अर्धा जीव ते काढायचे.

हा मूषक संहाराचा कार्यक्रम चालायचा तेव्हा मी एकटाच नसायचो तर भलामोठा ग्रूप असायचा, आम्ही बराच दंगा घालायचो. शेवटी लाईव्ह मृत्युचा खेळ बघणे कोणाला आवडत नाही.

मोठमोठे शास्त्रज्ञ आधी प्रयोग करतात मग शोध लावतात. लहान मुलांना आधी शोध लागतात मग ते प्रयोग करून त्याची पडताळणी करतात. असेच एके दिवशी आम्हाला शोध लागला की मांजराला वरून खाली टाकले तरी ती मरत नाही, तर चार पायांवर उभी राहते. मांजरीच्या सुदैवाने आम्ही या प्रयोगासाठी नेहमीसारखे गच्चीवर न जाता दुसर्‍या माळ्यावरून तिला टाकायचे ठरवले. बाजीगर चित्रपटात शिल्पा शेट्टीला शाहरूख ढकलून देताना ती जेवढी बेसावध होती, तेवढेच ती मांजरही बेसावध होती. जेव्हा आम्ही तिला गोंजारत गोंजारत अचानक वरतून खाली फेकून दिले. त्याचा परीणाम म्हणून म्हणा, ती चार पायांऐवजी साडेतीन पायांवर पडली. पुढे आम्हालाही मजबूत पडली कारण ती मांजर पाळीव होती. महिनाभर तरी लंगडत लंगडत चालत होती आणि आम्ही तिच्या मालकाच्या शिव्या खात होतो.

कुत्रा या प्राण्यावर लहानपणापासूनच खुन्नस. माझीच नाही तर आम्हा बरेच जणांची. काही ना काही कारणाने, कुठल्या ना कुठल्या कुत्र्यावर खुन्नस असायचीच. त्यामुळे या प्राण्याचे काही करता आले तर मजा येईल असे सारखे वाटायचे. पण आमचे शारीरीक वय आणि ताकद पाहता तेवढी आमची ऐपत नव्हती. पण एक दिवस समजले. यांच्या शेपटीला फटाक्यांची माळ लावल्यास यांची फार तंतरते. बस्स मग एकदोन दिवाळ्या अश्याही गाजवल्या.

यापेक्षा मोठ्या आकाराच्या प्राण्यांच्या नादी फारसे लागलो नाही. कारण ते सोपे नसायचे. तसेच प्राणी जेवढा मोठा तेवढी त्याबद्दलची भूतदया वाढत जाते, अन्यथा छोट्यामोठ्या किटकांना आपण कसलीही तमा न बाळगता सहज चिरडून टाकतो.

एकंदरीत मनुष्य कितीही नागरी झाला तरी या सृष्टीत नियम जंगलचेच चालतात. या जंगलचा राजा सिंह नाही तर माणूस आहे आणि हे जग फक्त माणसांचेच आहे. हे मला लहान वयातच समजले होते.

आता जरा मांसाहाराकडे वळूया Happy

जर मांसाहार करणे हे आपल्या उदरभरणासाठी केलेल्या निष्पाप जीवांच्या हत्याच असतील, तर वरची सारी उदाहरणे चिल्लर वाटावीत एवढा मांसाहार आजवर केलाय. कारण मी शाकाहार अपवादानेच करतो, जे काही करतो मांसाहारच करतो. खाईन तर मटणबोटी नाही तर अर्धपोटी हे माझे तत्व आहे, आणि ते पाळतोही.

अक्कल येईस्तोवर आईच्या सांगण्यानुसार शाकाहाराचे ठराविक वार पाळायचो. मग स्कूलमध्ये सायन्स वायन्स केले आणि समजले की वनस्पती सुद्धा सजीवच असतात. एक सजीव दुसर्‍या सजीवाला खाऊनच जगू शकतो. जर हेच वैश्विक सत्य असेल तर यात सण वार का आणा, असे म्हणत सारेच ताळतंत्र सोडले. आज वर्षाचे ३६५ (लीप ईयर असल्यास ३६६) दिवस मांसमच्छी खाऊ शकतो. त्यापैकी किमान ३०० दिवस तरी खाणे होतेच.

पण जर हे पाप कसायाच्या डोक्याला लागत असेल तर मात्र मी सुटलो. नाही म्हणायला एका सश्याच्या शिकारीत सामील होतो. त्याला मारून खाल्ले तेवढे पाप माझ्या शीरावर घ्यायला मी तयार आहे.

तसा मी संवेदनशील सुद्धा आहे. मानवी रक्त बघवत नाही. स्वत:चे तर मुळीच बघवत नाही. ते पाहता माझा एक शाकाहारी मित्र मला म्हणालेला, रुनम्या तू थेट तयार मांसमटण खातोस म्हणून तुला अपराधीपणाची भावना मनात येत नाही. कधी कोंबड्याबकरे मारताना त्यांची तडफड अनुभवशील तर कदाचित तुला खायला जमणार नाही.

यावर मी फक्त हसलो. कारण त्याचे ते वाक्य मला थेट भूतकाळात घेऊन गेले. माझे आजोबा अगदी दारात कोंबडी कापायचे. आमच्या शेजारपारच्यांची त्याबाबत काही तक्रार नसायची हे एक चांगले होते. आणि तसेही ते भल्या पहाटे उठून कापायचे. कापण्यात हुशार असल्याने कोंबड्याची जास्त तडफड व्हायची नाही. जास्त आवाज व्हायचा नाही. त्यानंतर त्याची पिसे काढून सोलायचा कार्यक्रमही तिथेच चालायचा. तर हे सारे बघायला म्हणून मी मुद्दाम लवकर उठायचो. कधी जाग नाही आली किंवा घरच्यांनी उठवले नाही तर रडून धिंगाणा घालायचो, एवढा तो नजारा बघायला मला आवडायचे. त्यामुळे लहानपणीच माझ्या मनावर हे ठाम ठसले होते की मांसाहाराचा आस्वाद घ्यायचा असेल तर मेलेल्या जीवासाठी अश्रू ढाळण्यात काही अर्थ नाही.

लेख ईथेच थांबवतो आता. पण जाता जाता कर्मसिद्धांतानुसार मला मिळालेली शिक्षा नक्कीच सांगावीशी वाटतेय.
फार काही नाही, बस्स माझी गर्लफ्रेंड, जिच्याशी मी लग्न देखील करणार आहे, ती तेवढी शुद्ध शाकाहारी मिळाली आहे Happy

चालायचंच,
बस्स आपलाच
ऋन्मेऽऽष

माझ्या आधीच्या वाईटसाईट सवयी वाचण्यासाठी खालील लिंकांवर टिचक्या मारू शकता.

माझ्या वाईट सवयी १ - चोरी http://www.maayboli.com/node/56756
माझ्या वाईट सवयी २ - जुगार http://www.maayboli.com/node/56890
माझ्या वाईट सवयी ३ - शिवीगाळ http://www.maayboli.com/node/56984

अवांतर - यावेळची वाचनखूण मस्त जमलीय. तसेही माझे धागे हे लेखनाची हत्याच असतात Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाडू हायला चुकलोच मग, मारलेली मुंग्या झुरळे खाल्ली असती तर त्या पापातून सुटलो असतो ना. >>

क्या बात!
क्या बात!
इसीलिए मै फिदा हूं !

संशोधक, अहो ज्यांच्यासाठी ते म्हणीचे पिल्लू सोडले होते त्यांनाच ऐकण्यात रस नसेल तर ईतरांसाठी झाकली मूठ सव्वा लाखाची राहिलेलीच चांगली Happy

साती धन्यवाद Proud

Pages