पोस्ट

Submitted by मोहना on 5 January, 2016 - 20:05

"बॅग भर." बहीणीने हुकुम सोडला.
"पोस्टात जायचं आहे ना? मग बॅग कशाला?" माझ्याकडे सहानुभूतिपूर्वक नजर टाकून दोघी बहिणी हसल्या,
"पोस्टाचा कारभार विसरलेली दिसतेयस. भर बॅग तू. कळेलच तुला"
"३ दिवसांचे कपडे टाक. फक्त बाहेरचे. आतले नको. बाकीचं मी बघते." बहिणाबाईंचा झपाटा पाहून मी बॅग भरली.
"चलाऽऽऽऽ" तिने आरोळी ठोकली. मी चाकाची बॅग, ती पत्र्याची बॅग आणि तिसरी एकावर एक भलेमोठे डबे रचलेला जेवणाचा डबा घेऊन बाहेर पडलो.

घराच्या बाहेर पाऊल टाकलं. बाहेर पडल्या पडल्या चार - दोन रिक्षा सामानाकडे वळून बघत बघत रिकाम्याच नाहीशा झाल्या. अखेर एक थांबला.
"ताई, येवढालं सामान आणि तुम्ही तिघी, कोनी बी थांबनार नाय."
"तुम्ही थांबलात ना." रिक्शा भुर्कन निघायच्या आधी आम्ही सामानाला आत कोंबलं. एका बहिणीला त्या सामानावर बसलं. आणि मग आम्ही दोघी मांड्या घालून स्थानापन्न झालो. रिक्षावाला खदाखदा हसला.
"दात काढायला काय झालं?" बहिण करवादली.
"सेल्फी काढा आनि टाका फेसबुकवर. लई भारी पिक्चर येईल."
ट्रंकेवर बसलेल्या बहिणीला सेल्फीची कल्पना एकदम आवडलीच. पण चालत्या देहाचा कोणताही भाग हलवता येणार नाही इतके घट्ट आम्ही बॅगांच्या आसपास अडकलो होतो.
"द्या मी काढतो."
"तुम्ही रिक्षा चालवा हो." तिघींमधली कुणीतरी एवढ्या जोरात खेकसली की त्याची रिक्शा हवेत उडाल्यासारखी एकदम पोस्टासमोरच थांबली.
आखडलेले हातपाय आधी बाहेर टाकत, आमची अंगंही बॅगासकट बाहेर पडली.

चाकवाली बॅग विमानतळावर चालवल्यासारखी मी खडे असलेल्या रस्त्यावर चालवली. त्यामुळे निर्माण झालेल्या एकदम भारी पार्श्वसंगीताच्या साथीने पत्र्याची बॅग सावरत आम्ही पोस्टात झोकदार ’’एंट्री’ घेतली. आणि रामा रामा.... पोस्टातली तोबा गर्दी पाहून एकदम विमानतळावर आल्यासारखं वाटलं.
"इथेही इतकी गर्दी?" माझ्या प्रश्नाला उत्तर न देता बहिण तरातरा पत्र्यांची बॅग घेऊन आत जायला निघाली.
"अगं, अगं..." करत आम्ही दोघी तिच्या मागे. गिर्‍हाईक आणि कर्मचार्‍यांच्या मधला अभेद्य दरवाजा तिने मोडला आणि पोस्टाच्या कर्मचार्‍यासमोर बॅग आपटली. त्या आवाजाचा शून्य परिणाम म्हणून कर्मचार्‍याची नजर संगणकावर खिळलेलीच राहिली. त्यामुळे संगणकात आहे तरी काय ही माझी उत्सुकता चाळवली. मी घाईघाईत चष्मा शोधून, डोळ्यावर चढवून त्याला काय दिसतंय ते मलाही दिसेल का म्हणून पाहायला लागले. एवढ्यात लक्षात आलं, काचेच्या पलिकडे उभी असलेली हजारो माणसं आमच्याकडे पाहत होती, आम्ही कर्मचार्‍याकडे आणि कर्मचारी संगणकाकडे. म्हणजे थेट कुणीच कुणाकडे पाहायचं नाही असा नियम आहे की काय पोस्टात?
"बॅग उघड." बहिण म्हणाली. नक्की कुणी बॅग उघडायची हे न कळल्याने मी म्हटलं,
"बॅग उघड." तेवढ्यात दुसरी बहिण पण तेच म्हणाली. कुणीच बॅग उघडेना तसा तो कर्मचारी ओरडला,
"बॅग उघडा." बहिण एकदम घाबरुन खाली बसली. तिने बॅग उघडली.
"विजेचं बील, पत्ता, पासपोर्ट, आधारकार्ड, पॅन कार्ड....." मोठी यादी सांगत होती, छोटी एकेक कागद पुढे करत होती. आता त्या बॅगेचं रहस्य उलगडलं. अर्ध्या तासाने संगणकातून डोकं बाजूला काढून आम्ही पत्र्याच्या ट्रंकेतून काढलेल्या कागदपत्रावर त्याने नजर टाकायला सुरुवात केली.
"साक्षीदार आणा."
"ही आहे ना." माझ्याकडे दोघींनी सराईतासारखं बोट दाखवलं.
"या नाही चालणार."
"का नाही चालणार?" मी बुचकळ्यात. तेवढ्यात बहिण म्हणाली,
"अहो, मागच्यावेळी नात्यातला साक्षीदार चालला की."
"आता नाही चालणार. तुम्ही बाहेर इतके उभे आहेत त्यातल्या आणा कुणाला तरी."
"आमच्या कुणी ओळखीचं नाही त्यात."
"चालतंय."
"चालतंय काय? आम्हाला नाही चालणार." तिघींपैकी कुणाचा तरी आवाज चढला.
"हे बघा, हे पण चालणार नाही." सप्पाट स्वर.
"काय चालणार नाही?" हळूहळू आमचे आवाज वेगवेगळ्या टिपेला पोचले.
"हेऽऽऽ" कागदाच्या चळतीतला कुठलातरी कागद फलकावत कर्मचारी उत्तरला. दोन्ही बाजूने वणवा पेटल्यासारखंच झालं. पोस्ट कर्मचारी आणि ३ गिर्‍हाइकं यांची तिथे जी काय जुगलबंदी सुरु झाली ती झाली. मला धड काहीच माहीत नाही त्यामुळे आपण फक्त २ बहिणींची बाजू घ्यायची या निकराने मीही पोस्ट लढवायला घेतलं.
"ओ, मी लिहिते हा प्येपरात. थांबा आता तुमच्याबद्दल लिहितेच." कर्मचार्‍याच्या चेहर्‍यावरची माशीही हलली नाही.
"पुरे तुझ्या त्या लिखाणाचं कौतुक. काहीतरी लिहशील आणि आपलं काम होणार असेल तर तेही व्हायचं नाही." बहिणीने हाताला धरुन मला मागे ओढत म्हटलं. पण कर्मचार्‍याच्या हातात कोलीत मिळालं होतं. त्याने असहकार पुकारायचं नेहमीचं धोरण तेवढ्याच उत्साहाने पुन्हा राबवलं.
"मी काही करु शकत नाही. तुम्ही पोस्टमास्तर कापश्यांना भेटा. ते म्हणतील तसं करु."
"भेटतोच. २ महिन्यापूर्वी हेच काम होतं तेव्हा ही कागदपत्र चालली. साक्षीदार म्हणून बहिणही चालली. तुम्ही ना गिर्‍हाईकाला अडवायचं कसं हेच बघता. हे आणा, ते आणा, ते नाही, हे चालायचं नाही. आधीच नीट सांगा ना सगळं. आणि दर २ दिवसांनी नियम बदलतात कसे? अं कसे हो बदलतात तुमचे नियम? सांगा कशाला गुंतवायचे आम्ही पैसे तुमच्या पोस्टात? ..." कर्मचार्‍याने पुन्हा नजर संगणकावर खिळवली त्यामुळे पुढची वाक्य टाकायला आम्ही कापश्यांकडे पोचलो.

तीन बायका एकदम आत आल्याने हल्ला झाल्यासारखे आधी कापशे बावचळले. मग निर्विकार चेहर्‍याने त्यांनी आमच्याकडे पाहिलं. तो निर्विकारपणा शेवटपर्यंत तसाच राखलाही. एव्हांना बाहेरची हजारो गिर्‍हाईकं आणि पोस्टातले कधीही न हसणारे कर्मचारी कामं टाकून शिनेमा बघायला मिळाल्याचा आनंद लुटायला लागले. आम्ही हातातले अनेक कागदपत्र नाचवित, कधीकधी त्यांच्यासमोरच्या टेबलावर ठेवत आम्हाला मॅच्युअर्ड झालेल्या विकासपत्राचे पैसे मिळायलाच हवेत ते पटवून दिलं. कापश्यांनी तितक्याच निर्विकारपणे ’त्या’ कर्मचार्‍याला बोलावलं,
"साहेब, मागच्यावेळेला आपण ॲडजेस्ट केलं ते करायलाच नको होतं..." ॲडजेस्ट हा शब्द ऐकला आणि आम्ही तिघी वेगवेगळ्या तर्‍हेने उखडलो. मला नक्की काय चालू आहे ते कळत नसलं तरी आम्ही भारत देशाचे प्रामाणिक सक्षम नागरिक (बहिणी) असल्याने कुणालाही काही ’ॲडजेस्ट’ करायला लावत नाही हे पक्कं ठाऊक होतं. मी बिनदिक्कत प्रामाणिक सक्षम नागरिकाची बाजू मांडली.
"आम्ही नव्हतं तुम्हाला ॲडजेस्ट करायला सांगितलं. हेच कागद आहेत असं तुम्हीच म्हणाला होतात." याच अर्थी उरलेल्या दोघींनी तोंडसुख घेतलं तसं कर्मचारी त्याच्या साहेबांकडे मदतीच्या अपेक्षेने पाहत राहिला. कापशेंना एकदम पोस्टाचं कामकाज आमच्यामुळे कमीतकमी २ तास थांबल्याचं जाणवलं असावं. ते म्हणाले.
"लगेच करतो तुमचं काम" क्षणभर सन्नाटाच. भांडांयचे बरेच मुद्दे तसेच राहिले होते आमचे. आणि मुख्य म्हणजे आम्हाला तिघींना एकमेकींशी न भांडता तिसर्‍याशी एकत्रित भांडता येतं याचाही साक्षात्कार झाला होता त्यामुळे इतक्यात भांडण संपून कसं चालेल?
"अहो असं काय? एकदम असं कसं काम होईल?" आम्ही तिघी काकुळतीलाच आलो.
"झालं ना. लगेच देतो तुमचा चेक. बाहेरुन घ्या." त्यांनी प्रकरण संपवलंच. चाकातली हवा गेल्यासारख्या आम्ही बाहेर आलो. भानावर आल्यावर, बघे आपापल्या कामाला लागण्याआधी आतल्या आणि बाहेरच्या बघ्यांकडून ५-५ रुपये करमणूक आकार मी वसूल करुन टाकला. बहिणीकडे पैसे दिले,
"हे काय?"
"जाताना रिक्षाच्या भाड्याला होतील. कसली करमणूक झाली आज लोकांची. त्यांनी पण हसत हसत दिले पैसे." रिक्शाचे पैसे वाचल्याच्या आनंदात बहिण म्हणाली,
"तू राहा रांगेत उभी."
"बरं. पण तुम्ही दोघी काय करणार?" असं विचारेपर्यंत चाकाची बॅग उघडून त्यातली सतरंजी तिने अंथरलीही कोपर्‍यात. दुसर्‍या बहिणीने डब्याची झाकणं उघडली. माझ्याकडे बघून दोघी म्हणाल्या.
"गेल्या दोन्ही वेळेला तू नव्हतीस. चार चार दिवस यावं लागत होतं. दिवसभर इथेच. त्यामुळे अशी व्यवस्था करावी लागते." हे त्या दोघी सांगतायत तेवढ्यात एका माणसाने घाईघाईने त्यांच्यासमोर थर्मास उघडला,
"घ्या आमचं आत्ताच झालंय. ताक आहे." पोस्टातल्या सुखदु:खाच्या गोष्टी करत मग तो तिथेच बसला. आपापला नंबर ठेवून त्या दोघींभोवतीचं पोस्टातल्या गिर्‍हाइकांचं कोंडाळं बदलत होतं.

पुढच्याला लागणारा किमान अर्धा तास पाहिल्यावर माझा नंबर ठेवून मध्येच मीही जेवून आले. शेवटी अखेर पोस्ट ’सर’ झालं. काम झालंच च्या समाधानात मी विजेत्यासारखी काचेच्या अलिकडे. पलिकडे कर्मचारी कसलेतरी आकडे लिहिण्यात मग्न. त्यात उजवीकडची विकास पत्र आणि डावीकडची जेष्ठ नागरिक पाटी सतत डोळ्यासमोर.
"किती वेळ लागेल हो अजून?" कर्मचार्‍याने आठ्या घालून का होईना चक्क माझ्याकडे पाहिलं.
"हे बघा. इथे लिहिलं आहे विकास पत्र आणि इथे जेष्ठ नागरिक. विकास पत्राची वाट पाहत पाहत जेष्ठ नागरिक व्हायची वेळ होईल. इतके तास उभी आहे मी इथे." हा असा विनोद पहिल्यांदाच ऐकल्यासारखा तो कर्मचारी जोरात हसला आणि धनादेश हातात येण्याआधीच मी पोस्टातला कर्मचारी हसला या धक्क्याने खाली कोसळले.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

हे म्हणजे खूपच झाले.. आपण हे असे माझ्या आयुष्यात कधी बघितले नाही.. असे समजू नका कि मी पोस्टात काम करतो.. पण पूर्वी वेळ लागायचा पण आत्ता संगणकाच्या दुनयेत पोस्ट modern होत आहे. आज काळ ते ग्रीटिंग, गोल्ड कॉईन सुद्धा विकत आहेत.
पण वाचून मस्त वाटले एख्याद्या nationalised बँकचा फील आला.

सर्वांना मनापासून धन्यवाद!
वर्षू, Hemantj82 - भारतात गेले होते आत्ता तेव्हाचा अनुभव आहे. कागदपत्र, कर्मचार्‍यांनी आपल्याकडे पाहण्याचीही तसदी न घेणं, चेहर्‍यावरची निर्विकारता इ. इ. सारं खरं Sad . तिथेच दुसर्‍या बॅकेत गेले होते तर अतिशय सुखद अनुभव. वाटलं इथल्या कर्मचार्‍यांना तिथे नेऊन ’डेमो’ बघायला लावावा.
श्री, बॅगा पोस्टातच ठेवून आलेय. पुढच्यावेळेला उपयोगी पडतील. उगाच ने ने आण नको Happy
अमितव - अपेक्षा वाढल्यामुळे झालं तुमचं असं किंवा नवरा, मुलांच्या जागी बहिणी आल्याने Happy

अपेक्षा वाढल्या म्हणजे?? आहेतच वाढलेल्या, रास्तच आहे ते Happy
आणि बहिणींचे पंचेस चांगले होते Happy पुलेशु