सायकल राईड - तापोळा - भाग १

Submitted by मनोज. on 5 January, 2016 - 04:49

नववर्षाची सुरूवात शुक्रवारी होत असल्याने मोठ्ठा वीकांत रिकामा होता त्यामुळे वीकांताला कुठे जायचे याचे वेगवेगळे बेत ठरू लागले. कांही महिन्यांपूर्वी अमितने तापोळा सहल केली होती आणि तो रूट एकदा सायकलने करण्याचे सर्वांच्याच मनात होते त्यामुळे तापोळा हे ठिकाण पक्के ठरवले व फोनाफोनी करून बुकींग केले.

मी, किरण कुमार आणि अमित M या राईडला जाणार हेही नक्की झाले. महाबळेश्वर आणि महाडच्या घाटवाटांच्या राईडनंतर सायकल खूप कमी चालवली होती. सराव नव्हताच आणि एकंदर मोठ्ठा गॅप पडला होता त्यामुळे या राईडच्या एक आठवडा आधी रोज ५० किमी सायकलींग केले.

दरवेळी राईडला राजगिरा वडी, राजगिरा लाडू खाऊन कंटाळा आल्याने निघण्याआधी एक दिवस आम्ही अग्रज फूड्स मधून सीताफळ वडी, तीळवडी, गुलकंद वडी, वेगवेगळे लाडू वगैरे वस्तू जमा केल्या.

३१ ला झोपण्यापूर्वी ठरल्याप्रमाणे सर्वांनी बॅगा व दिवे अडकवून सायकल तयार केली - यामुळे दुसर्‍या दिवशी भरपूर वेळ वाचणार होता.

आमच्या ग्रूपमधील नवीन अ‍ॅडीशन - किरण कुमार ने घेतलेली "ऑथर" कंपनीची अप्रतीम सायकल..

.

एक तारखेला सकाळी ६ ला भेटायचे ठरले होते. त्याप्रमाणे सकाळी उठून फोनाफोनी सुरू झाली. तसा थोडा उशीरच झाला होता. वडगांव पुलावर पोहोचलो तर कोणीच आले नव्हते. मात्र ग्रूपवर बर्‍याच वेळापूर्वी किरणचा, "मी घरातून निघालो रे.. असा अपडेट होता" मी सायकल बाजुला घेतली व शेजारीच टेम्पो / ट्रक ड्रायव्हर शेकोटी करून शेकत बसले होते तेथे जावून शेकत बसलो. थोड्या वेळाने अमितचा फोन आला की "तो अजून ५ मिनीटांनी निघेल आणि किरण सध्या कात्रज घाट चढवत आहे" किरणला फोनवून बोगद्यापाशी थांबायला सांगीतले व मीही निघालो.

सकाळच्या थंड हवेत सायकल चालवताना नेहमी मजा येते. आजचा रूट पुणे-महाबळेश्वर-तापोळा असा होता. यातला पुणे-महाबळेश्वर रस्ता अनेकदा पार केल्याने फारसे नवीन असे काहीच नव्हते.
कात्रज घाटापाशी बर्‍यापैकी चढ, नंतर सलग ४० किमी संथपणे उतरणारा रस्ता, थोडासा अवघड खंबाटकी घाट, त्यानंतर आमच्या सर्वांच्याच आवडीचा सुरूर फाटा ते वाई हा रस्ता, दरवेळी परिक्षा बघणारा पसरणी घाट आणि त्यानंतर हिरव्या डोंगरदर्‍यांजवळून जाणारा पाचगणी ते महाबळेश्वर रस्ता. हे सगळे असेच असेल अशी अपेक्षा करत मी कात्रज घाट चढवत होतो.

आमचे कांही मित्र पुणे-पांचगणी-पुणे करणार होते त्यांचाही पत्ता नव्हता.

यथावकाश कात्रज बोगद्यापाशी पोहोचलो.

“.”

अमितची वाट बघत थोडावेळ विश्रांती घेतली, त्याला फोन करून सतवण्यात थोडा वेळ घालवला. दहा पंधरा मिनीटांनी तोही येवून पोहोचला.

आंम्ही लगेचच बोगद्याकडे कूच केले व खेड शिवापूर, टोलनाका, कापूरहोळ वगैरे ठिकाणे वेगात पार केली. अमितला भूक लागल्याने कापूरहोळ नंतर एके ठिकाणी सायकली बाजुला घेतल्या, तेथे थोडा क्लिक्क्लिकाट केला.

.

सवयीच्या रस्त्यावर नेहमीच्या अडचणी येतच होत्या. गाड्या खूप जवळून जाणे, एखाद्या कारने विनाकारण जवळून हॉर्न वाजवत वेगाने जाणे वगैरे वगैरे..

.

खंबाटकी घाटाच्या आधी व्यवस्थीत नाष्टा करण्याचे ठरले होते. तेथे सर्वजण पोहोचलो. नाष्टा केला.

..

सकाळपासून ५० किमी अंतर पार केले होते परंतु थोडाही थकवा आला नव्हता, नाष्टा झाल्यानंतर खंबाटकी घाट चढायला सुरूवात केली तोच मागून अमितच्या हाका ऐकू यायला लागल्या. बुलेट गँगमधला मित्र रोहित रानडे कारने महाबळेश्वरला चालला होता तो आम्हाला बघून थांबला. त्याच्याशी गप्पा मारताना त्याने एक सुवार्ता दिली. "अरे खंबाटकी तर जाम आहे, तुम्ही कसे जाणार?" अक्षरशः खंबाटकीच्या पायथ्याला पोहोचून आणि थोडा घाट चढवूनही आम्ही वर पाहिले नव्हते. वरती घाटामध्ये वाहने एका जागी स्थिर दिसत होती आणि घाटमाथ्यापासून आम्ही थांबलो होतो तेथून केवळ दोन किमी अंतरावर वाहनांची रांग लागली होती. "बघू.. काहीतरी करू.." असे म्हणून आम्ही खंबाटकी घाट चढायला सुरूवात केली. खंबाटकी घाटाचे चौपदरीकरण + घाटमाथ्यावर बंद पडलेला ट्रक यांमुळे सगळे ट्रॅफिक जाम झाले होते.

.

मुंगीच्या गतीने पुढे जाणार्‍या अजस्त्र ट्रकच्या जवळून सायकल चालवत, डोंगर फोडलेल्या दगडांच्या रस्त्यांवरून तर कधी गुळगुळीत डांबरी रस्त्यावरून जात खंबाटकी घाट चढवला.

घाटमाथ्यावर पोहोचलो तर पुन्हा रोहित आणि त्याचा एक मित्र अमित सोबत गप्पा मारत बसले होते. थोड्या वेळात किरण आला. खंबाटकी घाटावरून सावधपणे उतरून आंम्ही सुरूर फाट्याकडे कूच केले.

सुरूर फाटा ते वाई हा आवडता रस्ता चालू झाला. येथे एका ठिकाणी थांबून ऊसाचा रस प्यायला व पुन्हा वाईकडे कूच केले.

..

वाईला पोहोचलो. नातू फार्म्स मध्ये आमटी-भात-ताक वगैरे खाणे आवरले व पसरणी घाट चढायला सुरूवात केली. दरवेळी कितीही प्रयत्न केला तरी पसरणी घाटाची सुरूवाट टळटळीत उन्हातच होते. पसरणी घाटाचे ठरलेले पॉईंट्स, पाणी संपत येणे, पायात क्रॅंप्स येणे वगैरे गोष्टी यथासांग पार पडल्या व हॅरीसन्स फॉलीला पोहोचलो. येथून पांचगणी मार्केट व महाबळेश्वर असा रूट होता. हा रूटही थोडाफार सावलीतून जातो आणि खंबाटकी व पसरणी घाटांमुळे चढ-उतारांचे काही वाटेनासे होते. त्यामुळे थोडाफार टीपी करत, स्ट्रॉबेरी खात खात महाबळेश्वरी पोहोचलो.

.

महाबळेश्वर शून्य किमी.

.

येथे एके ठिकाणी चहा प्यायला व पुन्हा लगेचच तापोळ्याकडे कूच केले. तापोळ्याला जाताना उताराचा रस्ता आहे इतके माहिती होते परंतु रस्ता कितपत खराब आहे ते माहिती नव्हते.

आता रस्ता आणि निसर्ग तुम्हीच बघून घ्या.. Happy

.......

तापोळा १० किमी शिल्लक असताना कोयनेच्या बॅकवॉटरने आमचे स्वागत केले..

.

Lol

.

तापोळ्याच्या थोडे अलिकडे आंम्ही मुख्य रस्ता सोडला व रिसॉर्टकडे सायकली वळवल्या. अंधार पडत आल्याने सर्वांनी लाईट जोडणी केली.

.

यानंतरचे १० किमी म्हणजे अत्यंत कठीण रस्ता होता. म्हणजे रस्ता लाईटमध्ये दिसेल तितकाच आणि प्रचंड खराब रस्ता होता. त्यात आंम्हाला नक्की किती जायचे आहे हे माहिती नव्हते. कसेबसे चाचपडत किर्र अंधारात आणि थंडीत रिसॉर्टवर पोहोचलो. हे अ‍ॅग्रो टूरिझमचे रिसॉर्ट म्हणजे एक मोठे घर होते आणि त्याच्या अंगणात पुणे-मुंबईहून आलेले टूरिस्ट खुर्च्या टाकून बसले होते. आम्ही सायकलसह तेथे एंट्री घेताच दोन मिनीटे शांतता पसरली. आंम्हीही विचित्र नजरांचा सामना करत बॅगा उतरवल्या. Happy (नंतर थोड्यावेळाने सर्वांनी सायकल व एकंदर राईडबद्दल चौकशी सुरू केली)

आंम्ही टेंटमध्ये सामान टाकले, आवरले व तेथे एका बार्बेक्यूजवळ जावून बसलो.

.

नंतर एका शेकोटीजवळ शेकत शेकत जेवण आवरले व रात्री तिथल्या सगळ्या टूरिस्ट सोबत १२ वाजेपर्यंत अंताक्षरी खेळत दिवस संपला

राईडचे स्टॅट्स. (माझ्या सेलफोन बॅटरीने रिसॉर्टच्या ५ / ६ किमी आधी मान टाकली.. हे तोपर्यंतचे आकडे आहेत.)

.

(क्रमशः)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बी - कोणत्या सायकल विषयी विचारत आहात? या राईडला ३ कंपन्यांच्या सायकली होत्या.

किरणची ऑथर,
अमित ची बर्गमाऊंट आणि
माझी मेरिडा.

अमरावतीला जर अशी सायकल घेणार असाल तर सर्व्हिसींगची माहिती पहिला काढा.

धन्यवाद मनोज. सुचना आवडली. तुम्ही सायकलप्रेमी जेंव्हा असे लेख लिहिता तेंव्हा जर सायकलीबद्दल थोडक्यात माहिती लिहिलीए तर ती उपयोगाची ठरेल कारण अशा लेखातून वाचकाला आपणही असे करु शकतो ही भावना उत्पन्न व्हायला एक प्रेरणा मिळत असते. खूप तांत्रिक माहिती न देता समजेल अशी माहिती देता आली तरी बघा अशी माझी मैत्रीपुर्वक सुचना आहे.

असे धाडस करणार्‍याना कायम मानाचा मुजरा. छान आलेत फोटो आणी प्रवास वर्णन पण छाने. थोडीशी थन्डी सोडली तर अशा राईडस हिवाळ्यातच बर्‍या, कारण उन्हामुळे जो थकवा येतो, गळायला होते, तसे होत नसेल ना.

निसर्ग छान आहेच, पण असे खाण्यापिण्याचे फोटो दिसले की आमच्या पण जीवाला थन्डावा मिळतो.:फिदी: