श्री. विं.चं 'यक्षघर' - श्री. उमेश विनायक कुलकर्णी

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

कर्‍हाडला सकाळी श्रीनिवास विनायक कुलकर्ण्यांकडे पोहोचलो तेव्हा दहा वाजून गेले होते. ब्रेकफास्टसाठी मंडळी आमच्यासाठी थांबली होती. स्वागत अत्यंत साध्या पद्धतीनं, पण खूप मनापासून केलेलं. ब्रेकफास्टला त्यांच्या पत्नीनं, ललिताकाकूंनी केलेला कणसाचा उपमा खूपच चवदार होता. त्या पाककृतीला त्यांनी एक आत्मीयतेचं बोट लावलं होतं, ज्यामुळे तो अजूनच आत कुठेतरी सुख निर्माण करत होता. आमचं छान जमणार आहे, याची खूण मला ब्रेकफास्टच्या टेबलावरच पटली. मला चटण्या-लोणच्यांमध्ये खूप रस आहे कळल्यावर श्री. विं.चा उत्साह वाढला आणि त्यांनी त्यांच्याकडच्या अगदी ठेवणीतल्या लोणच्यांचे दोन-तीन प्रकार फडताळातून काढून माझ्यासमोर ठेवले. जेवताना एखादी हिरवीगार मिरची किंवा तत्सम झणझणीत काहीतरी खाताना त्यांना माझ्याइतकीच मजा येते, हे कळल्यावर एकाच गावची दोन माणसं भेटल्यावर होतं, तसं काहीसं झालं. जर दोन माणसांच्या खाण्यापिण्याच्या आवडी नेमक्या जुळत असतील, तर त्याचं छान जमतं, असं 'कुणीसं' म्हटलंय. ती थिअरी आमच्या बाबतीत आपसूक खरी ठरली. गेली पाच-सात वर्षं त्यांना निवांत भेटण्याचा मी अधूनमधून प्रयत्न करत होतो, तो योग यावेळीच येणार होता.

अत्यंत साधं घर. बाहेर झाडं, खूप छाटलेली नाहीत. त्यांना वाढू दिलेलं होतं थोडं मोकळेपणानं. त्यांची आई म्हणायची की, जी झाडं आपली आपण आवारात येतात, त्यांना वाढू द्यावं, त्यांची इच्छा आहे आपल्याकडे वाढायची! त्यांत दोन पांढरी आणि एक गुलाबी अशी तीन पेरवांची आपोआप आलेली झाडं होती. त्यांच्या मूळगावी, औंदुबरला, त्यांच्या शेतात याच क्रमानं पूर्व - पश्‍चिम ही तीन पेरवांची झाडं होती. ती त्यांच्या वाटेकर्‍यानं तोडून टाकली होती. तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता म्हणून त्यांनीच पुनर्जन्म घेतला आहे इथे, अशी त्यांच्या आईची धारणा होती. त्या पेरूशेजारीच चिक्कूचं झाड होतं. लिंबाचं होतं. कढीलिंबाची अनेक रोपं होती आणि दारासमोर एका डाळिंबाच्या झाडाला काही छोटी डाळिंबं लटकली होती. त्यांवर पावसाळी ऊन पडलं होतं. डाळिंबी रंग म्हणजे काय, हे शिकवणारा त्यांचा रंग होता. तो रंग पाहून वाटलं की, असे सगळे रंग कळायला हवेत. रंग हा एक अनुभव असतो, तो घ्यायला शिकलं पाहिजे. प्रत्येक रंगाचं स्वतःचं असं जे गुपित आहे, ते आपल्याला कळलं पाहिजे, तरच आपण त्या रंगाच्या जवळ जाऊ शकू. प्रत्येक वेळी, प्रत्येक कोनातून पाहिलं की तो रंग वेगळा भासतो. प्रकाशामुळे रंगाला अस्तित्व मिळतं आणि अंधारामुळे रंगभेद नाहीसे होतात.

मग गप्पा मारायला सुरुवात झाली. खाण्याकडून साहित्याकडे...मग शब्दांच्या नजाकतीकडे...निसर्गाकडे...तऱ्हतऱ्हेच्या रंगीबेरंगी माणसांच्या आठवणींकडे...त्यांच्या श्रद्धांकडे...हातचं काहीही राखून न ठेवता, गोलाकार वळणं घेत आमच्या गप्पांचा देशस्थी फड रंगला. एखाद्या रंगलेल्या गप्पांच्या बैठकीमध्ये एका विषयाकडून दुसऱ्या...तिसऱ्या असं करत जाणाऱ्या विषयांच्या प्रवासाचं चित्र काढायचं झालं तर ते कसं असेल? त्याला आकार असेल? रंग असेल? आज किरमिजी गप्पा झाल्या, असं म्हणता येईल? तासन्‌तास चाललेल्या आमच्या गप्पांना समांतर माझ्या मनात अनेक कल्पनांच्या भिंगऱ्या उडत होत्या.

त्यांचं हस्ताक्षर फार सुंदर आहे. बोरूचं वळण त्यांच्या वडिलांनी त्यांना शिकवलं. वरवर पाहिलं तर, त्यांच्या अक्षरातली नजाकत लक्षात येत नाही, पण थोडं लक्षपूर्वक पाहिलं की त्यातली गंमत कळते. चांगलं लिहिता येणं आणि अक्षर सुंदर असणं या दोन भिन्न गोष्टी आहेत. अक्षर सुंदर असणं ही एक गुणकारी, मन शुद्ध करण्याच्या प्रवासातली पायरी आहे. अक्षरावरून माणसाच्या मनामध्ये काय चाललंय हे कळतं, असं म्हणतात. त्या माणसाचा स्वभाव, त्या माणसाची एकाग्रतेची क्षमता अशा गोष्टी अक्षरामधून कळण्याचं कारण काय असावं?

श्री. विं.चा प्रवास अतिशय साधा, सरळ वाटणारा, परंतु त्यात अनेक चढउताराचे क्षण. वडील उत्कृष्ट चित्रकार. या सगळ्या सांगली, कर्‍हाड, कोल्हापूर भागात चित्रकलेचं एक अदृष्य वातावरण आहे. इथल्या वांग्यांना जशी एक विशिष्ट चव आहे, तसं या मातीतून, इथल्या पाण्यातून चित्रकलेचे संस्कारही नकळतपणे होत आहेत. याचं दर्शन खूप सुखावह आणि हुरहूर लावणारं आहे. काय नक्की कारण आहे यामागे? कुठून हे पाणी जिरतंय? कुठून हातांना वळण लागतंय? डोळ्यांना दिसणार्‍या सामान्य गोष्टी श्री. वि. ज्या नजरेनं, ज्या दृष्टीनं पाहत आहेत, ती कुठून आली आहे? त्यांच्या असण्यातून सतत जो मायाळू, सहज, सुंदर अनुभव येतो, तो नक्की कुठे जन्म घेतो, याचा शोध घ्यायला हवा आहे.

त्यांच्या बाबांना खूप वाचायचा, शास्त्रीय संगीताचा, अनेक चांगल्या गोष्टींचा नाद होता. त्यांची रेषा ही कसदार होती. पण संधी असूनही त्यांनी चित्रकार म्हणून कारकीर्द करण्याचा विचार केला नाही. ते म्हणायचे, ’देवानं एक गोष्ट आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण दिली आहे, तिचा एवढा बाऊ करण्याची गरज नाही, झाडांना कळ्या येतात, त्यांची सुंदर फुलं उमलतात आणि ती कोमेजतात, एखादी गोष्ट आपल्याला थोडी जास्त चांगली जमतीये म्हणून फुशारून जायला पाहिजे, असं नाही, आणि मग त्याच्या मागे लागून, शिकूनबिकून त्याचा व्यवसाय करायला पाहिजे, असंही नाही’. यामध्ये आयुष्य जास्त सहजपणानं घेणं आहे, तो सहजपणा आपल्यामध्ये यायला पाहिजे, असं श्री. विं.ना भेटल्यावर नेहमी वाटत राहिलं आहे. तो सहजपणा प्रत्येकामध्ये असतोच, पण त्यावर एक आवरण आहे कुठलंतरी, ते बाजूला सारून पाहायला हवं की, आतलं आपलं स्वतःचं मूळ रूप काय आहे!

लेखकांच्या घरी जाण्याचा मला फारसा अनुभव नाही. पण अनेक कलाकारांच्या घरांमध्ये एक मोठी शोकेस असते आणि तीमध्ये आत, बाहेर, भिंतींवर जागा मिळेल तिथे, प्लॅस्टिकची, काचांची स्मृतिचिन्हं, बक्षिसं, सर्टिफिकिटं, बक्षिसं घेतानाचे फोटो असतात. एकदंर खोलीत त्यांचं स्थान इतकं ठाशीव आणि चेंगरुन टाकणारं असतं की, ती बक्षिसं त्या कलाकारांपर्यंत आपल्याला पोहोचूच देत नाहीत. श्री. विं.चं घर याला अर्थातच अपवाद होतं. घरामध्ये पुस्तकांच्या अनेक थप्प्या होत्या. काचेच्या कपाटांच्या आत जितकी पुस्तकं होती तितकीच किंवा त्याहून जास्त बाहेर होती. ती सगळी पुस्तकं हा त्या खोलीचाच एक भाग होऊन गेली होती. म्हणजे जर ती पुस्तकं तिथे नसती, तर त्या खोलीचं व्यक्तिमत्त्व हरवल्यासारखं झालं असतं. इतक्या पुस्तकांमधल्या एखाद्या पुस्तकाबद्दल बोलणं झालं, तर श्री. विं.ना ते पुस्तक त्या असंख्य पुस्तकांच्या गठ्ठयांमध्ये नेमकं कुठे आहे, हे अचूक ठाऊक होतं. पुस्तकांवर प्रेम असणं, शब्दांविषयी माया असणं या गोष्टी काही बळजबरीनं स्वतःवर लादता येत नाहीत. त्या उपजतच असाव्या लागतात. त्यांच्या घरामध्ये त्या अतिशय स्वाभाविकपणे समोर येत होत्या. त्यात क्लिनिकल व्यवस्थितपणा नव्हता किंवा आपण पुस्तकं कशी व्यवस्थित ठेवतो आणि आपल्याला सगळं कसं जिथल्या तिथं लागतं, याचा मुद्दाम स्वतःला बजावणारा दरारा नव्हता. त्यामुळे फिकट पिवळ्या रंगाच्या त्या खोलीमध्ये एक मोकळेपणा जाणवत होता.

एखादी कथा पहिल्यांदा कधी प्रकाशित झाली, ती कुठे प्रकाशित झाली, त्या लेखकाच्या आधीच्या - नंतरच्या लिखाणाचा प्रवास कसा होता, या आणि अशा अनेक गोष्टींचा कोष श्री. विं.च्या मनामध्ये गूगल क्लिकपेक्षाही वेगानं तयार होता. एखाद्या घटनेच्या किंवा प्रकाशनाच्या सालाविषयी जर कधी बोलताबोलता त्यांच्या मनात संदेह तयार झाला, म्हणजे एखादी कथा १९५० साली प्रकाशित झाली की १९५१ साली, तर ते दुसर्‍या क्षणाला त्या पोतडीतून नेमकं पुस्तक काढत आणि मग ती कथा १९५०मध्येच, म्हणजे त्यांना जे वाटत होतं, त्याच वर्षात प्रकाशित झाली ना, अशी स्वतःसाठी खात्री करून घेत. माझ्यासारख्या अव्यवस्थित माणसाला असं वाटू शकेल की, १९५० साली काय किंवा ५१ साली प्रकाशित झाली काय, त्यानं काय फरक पडतो? पण कुठल्याही पद्धतीनं एखादा संदर्भ आपल्या बोलण्यातून अनवधानानंसुद्धा चुकीचा सांगितला जाऊ नये, याकडे त्यांचा नेहमीच कटाक्ष होता .

इतक्या ताकदीच्या लेखकाशी बोलण्याचा मला सराव नसल्यानं मी नेहमीसारखं त्यांना ’व्हेग’ प्रश्‍न विचारत होतो, आणि त्यांनी उत्तर दिल्यानंतर मला जाणवत होतं की, मी मला जे विचारायचं आहे ते नेमकेपणानं विचारत नाहीये. त्यामुळे नकळतपणे मी योग्य शब्द शोधण्याचा प्रयत्न करू लागलो. प्रत्येकाच्या भाषेच्या वापराची एक गंमत असते. प्रत्येकाला आपली स्वतःची भाषा चांगल्या पद्धतीनं वापरण्यासाठी जशी शब्दसंग्रहाची गरज असते, तशीच त्या भाषेची लय सापडण्याचीही गरज असते. ज्यांना ही लय सापडते त्यांचं बोलणं हा एक सांगीतिक अनुभव होऊन जातो. श्री. विं.शी तासन्‌तास गप्पा मारल्यावरही कान दुखायला लागत नाहीत. एक गंभीर राग सोपा हो‍त, शांतपणानं, मिष्किल वळणं घेत, मनमोकळं हसत कानातून आपल्या आत हळूहळू पसरत आहे, असं वाटायला लागतं. त्यामध्ये कुठलीही घाईगडबड नसते. कुठे पोहोचण्याची ईर्षा नसते. थांबल्याचा सल नसतो. पावसाचं पाणी जितक्या सहजपणानं वाट काढत जातं, तसा त्यांच्या शब्दांचा प्रवास कुठेही पाल्हाळिक न होता, निवांत सुखी वळणं घेत खेळकर, गंभीर, मऊ, लयदार होत जातो.

मी त्यांना विचारलं की, तुमच्या मनात एखाद्या लेखाचा आराखडा नेमका कसा तयार होतो आणि तुमच्या लेखामध्ये आढळणारे तुमच्या लहानपणीचे इतके सूक्ष्म बारकावे त्या सगळ्या वातावरणासकट तुम्हांला आठवतात कसे? ते म्हणाले की, एखादी गोष्ट पाहिली किंवा जाणवली तर त्या संदर्भातल्या अनेक गोष्टी, घटक एखाद्या पुंजासारखे येऊन त्या गोष्टीला मिळतात. हे कसं होतं, लहानपणाचे प्रसंग, जागा कशा आठवतात, ते सांगता येणार नाही. आठवतं इतकंच. इंदिराबाई संतांनी याचं उत्तर त्यांच्या कवितेतून दिलं आहे - ’आले मी कुठून कशी... आले मी हेच फक्त’.

श्री. विंच्या घराच्या वरच्या मजल्यावर जाण्यासाठी एक छान जिना आहे. जिन्याशेजारी इंदिराबाईंचा एक मोठा, सुरेख फोटो आहे. त्या फोटोसमोर उभं राहिलं की, या घराच्या अवकाशात त्यांच्या कवितेतलं अवकाश विरघळलं असल्याचा भास होतो. अर्ध्या जिन्यापाशी एक खिडकी आहे. विशिष्ट वेळी त्या खिडकीतून एक प्रकाश येतो आणि तो पायर्‍यांवर पसरतो. त्या दिवशी तो प्रकाश आणि त्या पायऱ्या यांमधे काहीतरी जादुई असल्याचं वाटत होत. त्या प्रकाशात खिडकीशी टांगलेलं एक सुगरणीचं घरटं होत. त्यांनी सांगितलं की, असं सुगरणीचं घरटं घरात बाधलं तर सापविंचू घरात येत नाहीत, असा एक संकेत आहे. मला अनेक वर्षं या अशा संकेतांबद्दल एक विशेष कुतूहल आहे. म्हणजे लहानपणी आजी किर्तनाला गेली आणि तिला उशीर व्हायला लागला, तर आई फुलपात्र उंबर्‍यात पालथं घालत असे. म्हणजे तसं केल्यानं आपलं माणूस लवकर घरी परत येतं, असा आमच्याकडे एक संकेत होता. त्याच्या खरेखोटेपणापेक्षा या संकेतांच्या निमित्तानं माणसाच्या मनानं किती विविधरंगी विभ्रम स्वतःच्या करमणुकीसाठी तयार केले आहेत, याचं मला आश्‍चर्य वाटत आलं आहे. त्यांनी सांगितलेला अजून एक संकेत. त्यांची आई म्हणत असे की, निजलेल्या माणसाला, विशेषतः स्त्रीला, ओलांडून गेलं, तर जी व्यक्ती ओलांडून गेली आहे, तिच्यासारखं अपत्य त्या स्त्रीला होतं किंवा एखाद्या स्त्रीनं जर पोलकं उलट बाजू वर करून घातलं, तर तिचा पती बाहेरगावी गेला आहे, असा एक संकेत.

श्री. विं.शी गप्पा मारताना आपण काळाच्या एका मोठ्ठ्या झोपाळ्यावर बसून झोके घेत असल्याचं जाणवत होतं. आपल्या आजूबाजूच्या कितीतरी गोष्टी सतत बदलत राहतात. वाडे पडून इमारती उभ्या राहतात. नात्यांचे पोत बदलतात. कुठेतरी आयटी पार्क उभा राहतो. त्याचवेळी कुंभमेळा सुरू असतो, खाप पंचायत भरलेली असते. बोरू आणि उत्तम हस्ताक्षर थोड्याच वर्षांत पुराणकालीन वाटू लागतील, अशी लहान मुलांच्या हातातले वाढते मोबाईल पाहून खात्री पटते. पुस्तकाची पानं आता आम्ही आमच्या आयपॅडवर सटाकसटाक करत उलटवू शकतो. एकाच वेळी अनेक काळांत राहत असल्याचा अनुभव घ्यायला पुण्यापासून दूर जावं लागत नाही. घरामध्येच सकाळी वेगळा काळ आणि रात्री वेगळा काळ असा पडताळा सर्रास येतो. मग या सगळ्या उलथापालथीमध्येही मला ’तळ्याकाठी संध्याकाळी' वाचताना किंवा ’सुसरींचे दिवस’ वाचताना नक्की काय मिळत असतं? आपण जगत असतो एका काळात, पण तो काळही अनेक काळांचा मिळून एकत्रितपणे बनलेला असतो. आपल्या मनातही अनेक काळ एकाच वेळी चालू असतात. मग या इथे असणं, या भवतालाशी याक्षणी एकरूप होणं, म्हणजे काय, याचा अदमास ’डोहापलीकडे’सारखा लेख वाचताना मला लागत असतो का?

आपल्या नकळत आपण काही कलाकृतींकडे ओढले जात असतो. आपल्याला जगताना ज्या जाणिवा होतात, त्या अनेकदा स्पष्टपणे आपल्यासमोर येत नाहीत. त्यांचे पॅटर्न अंधूक स्वप्नांसारखे आपल्या मनाभोवती तरळत असतात. त्यांना ठोस रूप दिलं, त्यांविषयी सांगायला गेलं की, ते विरून जातात. मग या कलाकृती जेव्हा आपल्या आयुष्यात येतात, तेव्हा अचानक असा साक्षात्कार होतो की, आपल्या जाणिवांचं रूप हे कुणालातरी सापडलं आहे आणि त्यांनी ते लीलया मूर्त केलं आहे. इतकंच नव्हे, तर आपल्याला जाणवलेल्या अनुभवाच्या खोल गाभ्यापासून आपल्याला न जाणवलेले, त्याच्या आजूबाजूला असलेले अनेक अवकाश या कलाकृतीनं दृष्यमान केले आहेत. श्री. विं.च्या लेखांनी अशा अनेक खोल जाणिवांना आकार दिला आहे. अगदी रोजच्या जगण्यातल्या गोष्टींकडे इतक्या ताजेपणानं आणि गंभीर खेळकरपणानं पाहतापाहता, त्यांच्या अंतरंगातील आध्यात्मिक गुढतेचा कॅनव्हास हळूहळू दिसू लागतो आणि एक हुरहूर लावणारा अस्वस्थ ओला शांतपणा मनामध्ये झिरपू लागतो.

आपण श्री. विं.ना भेटायला त्यांच्या घरी जातो आणि मग गप्पा मारायला लागलो की, ते आपल्याला त्यांच्या एका रंगीत माजघरात घेऊन जातात. त्यात त्यांच्याबरोबर इंदिराबाई, श्री. पु. बसलेले असतात. दुर्गाबाई, शांताबाई असतात. विंदा, तेंडुलकर, आरती प्रभू, जी.ए. असतात. आपला ज्यांच्याज्यांच्याशी संवाद व्हावा, अशी आपली इच्छा असते, ती सगळी मांदीयाळी त्यांच्या या रंगीत माजघरात नेहमी गप्पागोष्टींमध्ये मग्न असते. मग ते आपली त्यांच्याशी प्रेमानं ओळख करुन देतात. कधीकधी ही ओळख करून देताना त्यांच्या ओठांवर एक निष्कपट, मिश्किल हसू उमटतं, पण त्यामध्ये कधीही कणभरही विष नसतं. ते आपली ओळख नुकत्याच चोच उघडलेल्या नातवांसारखी करून देत नाहीत, तर ते त्यांच्या नातवंडांची ओळखही आपण आपल्या मित्राची ओळख करून द्यावी, तशी देतात. वयानं अथवा मानानं छोट्या किंवा मोठ्या अशा प्रत्येक माणसाची ते एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून ओळख करून देतात. तो एक निव्वळ उपचार नसतो कारण प्रत्येकाच्या असण्यातलं काहीतरी ’युनिकपण’ त्यांनी टिपलेलं असतं. यांतली अनेक लेखक - कवीमंडळी त्यांच्याकडे एकदोन नव्हे, तर आठआठ, दहादहा दिवस अनेकदा येऊन राहिली आहेत. या सगळ्या मंडळींविषयी, त्यांच्या साहित्याविषयी बोलताना श्री. वि., त्यांच्या मनामध्ये जे आपुलकीचे धागे आहेत, त्यांच्या उभ्याआडव्या टाक्यांनी विणलेल्या या काळाच्या पोताचं वस्त्र आपल्यावर एखाद्या शालीसारखं पांघरत असतात. त्याची ऊब त्यांच्याबरोबर असताना आणि नसतानाही आपल्याला जाणवत राहते.

वाङ्मयक्षेत्रातील कवीमंडळींशी त्यांचा विशेष स्नेह होता. शांताबाई, बोरकर, पाडगावकर यांचा अनेकदा श्री. विं.कडे मुक्काम असे. अशा एखाद्या मुक्कामाची एखादी ध्वनिचित्रफीत कुणी केली असती आणि ती आपल्याला पाहायला मिळाली असती तर किती मजा आली असती! पण कदाचित बरंच झालं, अशा ध्वनिचित्रफितींमध्ये ते क्षण बंदिस्त झाले नाहीत ते. ते अनेक क्षण श्री. विं.च्या मनामध्ये तितकेच ताजे आहेत आणि त्यांनी ज्यांनाज्यांना ते सांगितले असतील, त्यांच्या मनाच्या कोपर्‍यात ते नक्की रुजले असतील. असं होत होत ते काळाच्या कुठल्यातरी कलेक्टिव्ह सबकॉन्शसचा भाग होतील आणि मग विरून जातील. नंतर त्यांचे तपशील गळून पडतील आणि फक्त संवेदनांचे पोत जिवंत राहतील.

’शब्दांवर जीव लावणारा माणूस’ असं म्हटलं तर आपल्यासमोर कोणती व्यक्ती येते? कवितांवर प्रेम असणं वेगळं आणि आपणच एक कविता होणं वेगळं. सुनीताबाईंनी त्यांचं एक पुस्तक कवितांना अर्पण केलं आहे. त्यांना ‘तुम्ही हे पुस्तक कवितांना अर्पण केलंत, पण त्या कवितांपर्यंत ते पोहोचणार कसं?’, असं खट्याळपणे विचारणार्‍या श्री. विं.च्या आत शेकडो कविता फुलपाखरांसारख्या बागडत असतात. यावेळी प्रवासात इतक्या कवींच्या इतक्या वेगवेगळ्या बाजाच्या कविता त्यांनी ऐकवल्या की मी थक्क होऊन गेलो. इतक्या कविता मुखोद्गत असणार्‍या पहिल्याच माणसाला मी भेटलो होतो. एखाद्या कवीचं नाव बोलण्यात निघालं की, सहजपणानं त्या कवीची त्यांची आवडती कविता ते म्हणू लागत. एक झाली की दुसरी, मग तिसरी...आपल्या स्वतःच्या कविता पाठ म्हणणारे खूप असतात, पण इतर अनेक कवींच्या कविता इतक्या प्रेमानं, इतक्या उत्स्फूर्त सहजपणे म्हणणार्‍या श्री. विं.च्या मनाच्या दर्शनानं मला भूल पडल्यासारखं झालं.

तशी श्री. विं.च्या लिखाणाची सुरुवात कवितेतूनच झाली. त्यांनी जवळजवळ दोनशेच्या आसपास कविता केल्या आहेत.
'किती हरवल्या जिवलग गोष्टी
अशिच जुनी गोष्ट
मृगजळातल्या यक्षघराला होती इथुनिच वाट' यासारखी भारावून टाकणारी कविता त्यांचे मित्र शांताराम रामचंद्र शिंदे यांनी वाचली. ते श्री. विं.ना म्हणाले की, या कवितेत तुम्हांला जो अर्थ अभिप्रेत आहे, तो तुम्ही गद्यात लिहून काढा, ’किती हरवल्या जिवलग गोष्टी’ या कोणत्या गोष्टी आहेत, हे कवितेतून कळत नाही, तुम्ही तुमचं व्यक्त होण्याचं माध्यम बदला, तुम्ही ललित लिहा. श्री. विं.ना जाणवलं की, त्यांचा अनुभव कवितेतून पूर्णांशानं पोहोचत नाहीये आणि मग त्यांनी ललितस्वरूपात लिखाण करायला सुरुवात केली. ही गोष्ट त्यांच्याकडून ऐकल्यावर मला थोडंसं भंजाळल्यासारखं झालं. मला उद्या कुणी कितीही मोठ्या माणसानं असं सांगितलं असतं की, तुझ्या प्रकटनाचं माध्यम बदल, तर मी ते किती सकारात्मक पद्धतीनं घेऊ शकलो असतो? या प्रकारचा विश्‍वास टाकण्याची क्षमता माझ्यामधून कधी नाहीशी झाली? कशामुळे?

सोपं असलं की सोपं होता येतं. असण्यात सहजता, हलकेपणा असला तरच इतकं सहजस्वाभाविक लिहिता येतं. अवकाश मोकळं असलं तरच त्यात काही भरता येतं, हे कळतं पण वळत नाही. आपल्या कलाकृतीबद्दल आपुलकी असणं ही स्वाभाविक गोष्ट आहे, पण तिच्याकडे एका पर्स्पेक्टिव्हनं पाहता येणं ही अत्ंयत महत्त्वाची आणि आवश्यक गोष्ट आहे, याची जाणीव मला झाली. तशीच गोष्ट कर्‍हाडमध्ये राहण्याबद्दलची. नोकरीच्या निमित्तानं कर्‍हाड सोडून जावं लागत असताना यशवंतराव चव्हाणांनी त्यांना सांगितलं की, तुम्ही कर्‍हाड सोडून कुठेही जायचं नाही. श्री. विं.नी त्यांच्या सूचनेचा मान राखला आणि कर्‍हाड सोडून ते गेले नाहीत. माझ्या पिढीच्या माणसाला या गोष्टीचं काय करायचं, तिला कसं समजून घ्यायचं, हेच कदाचित कळणार नाही. माणसांवर, दगडधोंड्यांवर, झाडांवर, पक्ष्यांवर असा विश्‍वास ठेवण्याची, त्यांना सहजपणानं आपल्यात सामावून घेण्याची ही जादू मला जमली तर काय मज्जा येईल.

प्रत्येकच काळात सर्व प्रकारचे कलाकार असतात. आपण कुठल्या प्रकारचे आहोत, याची स्वतःशी खरी ओळख पटण्यासाठी बराच काळ जावा लागतो. आपल्या क्षमता पडताळून पाहण्यासाठी वेळ आणि संधी उपलब्ध व्हाव्या लागतात. त्यासाठी बरंच पाणी भरावं लागतं, आणि एवढं करूनही आजच्या काळात ते कळतंच असं नाही. अनेक कलाबाह्य पॅरामीटर्स आपल्या निर्मितिऊर्जेवर नियत्रंण आणण्याचा प्रयत्न करत असतात. पण या सगळ्या गोंधळातून ही ओळख पटली की, मग उगीच निरर्थक झगडा उरत नाही. वेगळ्या भलत्याच अपेक्षांनी आपण स्वतःवर वजन ठेवत नाही, आणि आपल्याला मिळालेल्या एका तेजस्वी टॉर्चनं आपल्या गुहेतल्या अंधारातल्या सूक्ष्म जागा आपण संयमानं पाहायला लागतो.

‘डोह’ या श्री. विं.च्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाला पुढच्या वर्षी पन्नास वर्ष पूर्ण होणार आहेत आणि पुढच्या वर्षीच त्यांच्या लेखाचं नवं पुस्तक निघणार आहे. हा त्यांचा पाचवा लेखसंग्रह आहे. ते म्हणाले की, साधारण दहा वर्षांत त्यांचं एक पुस्तक निघतं. हा त्यांच्या कलाप्रवृत्तीला मानवणारा, त्यांनी स्वीकारलेला किंवा ठरवलेला वेग आहे. आपण स्वतः ठरवलेल्या निकषांवर आपली कलावस्तू जोखून पाहिल्यानंतरच ती खुली करण्याचा निर्णय आणि स्वातंत्र्य त्यांनी त्यांच्याकडे राखून ठेवलं आहे. ही जशी एका काळाची व्हॅल्यू आहे, तशीच ती एका विशिष्ट दृष्टीच्या एका विशिष्ट कार्यपद्धतीची व्हॅल्यू आहे. ती पाहताना मला स्तिमित व्हायला होतं. आज मी ज्या क्षेत्रात काम करतो, त्या क्षेत्रात ही व्हॅल्यू कुठल्यातरी परग्रहावरची वाटावी इतकी दुर्मिळ आहे.

हे सगळं माझ्यापर्यंत पोहोचत होतं याचं कारण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक सौम्य ’मॅटर ऑफ फॅक्टनेस’ आहे. त्यात जुन्या सुवर्णकाळाचे भावूक उमाळे नाहीत, आणि त्याचवेळी सैनिकी रोखठोकपणाही नाही. त्यावेळी किती चांगलं होतं आणि आता किती वाईट आहे, असं सिनिकल सरधोपट जजमेंट नाही. ‘अमूक एक गोष्ट व्हायला पाहिजे होती, ती झाली नाही, असं म्हणण्याला काही अर्थ नाही’, हे निश्‍चितपणानं, विनातक्रार, कुठलीही कटुता न बाळगता आज ते म्हणू शकतात. त्यांच्याकडे पाहताना, त्यांच्याशी बोलताना, घोमळ्यात राहूनही बाहेरून तो पाहता येण्याचं हे इंगित त्यांना सापडलंय, असं वाटत राहतं. अनेकदा कलाकार आणि कलाकृती यांचा मेळ बसत नाही. तो बसवण्याच्या फंदातही शहाण्या माणसानं पडू नये, असं म्हटलं जातं. कुठलीही कलाकृती ही अर्थातच त्या कलाकाराच्या त्या वेळच्या जगण्याच्या भानातून तयार झालेल्या अनेक गोष्टींमधली एक गोष्ट असते. त्यामुळे त्याचं ’हा सूर्य आणि हा जयद्रथ’ असं नातं पडताळून पाहण्याचा प्रयत्न बहुतेक वेळा व्यर्थ असतो. पण तरीही श्री.विं.ना भेटल्यावर त्यांच्या लेखांचं आणि त्यांच्या असण्याचं अद्वैत अतिशय नेमकेपणानं प्रकट झालं, आणि त्यामुळे एकप्रकारचं आश्वासक सुख वाटत राहिलं.

त्यांच्याबरोबर त्यांच्या गावाला, औदुंबरला गेलो, आणि त्याचं प्रत्येक घराशी असलेलं नातं पाहून मी थक्क झालो. प्रत्येक घरामध्ये किती माणसं आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये काय घडलं, काय अडचणी होत्या, इथपासून त्यांची मुलं आता काय करतात या सगळ्यांची एक साखळी त्यांच्या मनामध्ये सतत चालू असते. अशा पद्धतीनं माणसांशी, भवतालाशी, घराच्या भिंतींशी, खिडकीबाहेरच्या झाडाशी, स्वयंपाकघरातल्या खाण्याच्या पदार्थांशी, कपाटातल्या आरशाशी नातं जोडण्याची जादू त्यांना आणि त्यांच्या शब्दांना साधली आहे.

आता जी माणसं ऐंशी वर्षांच्या आसपास आहेत, त्यांच्यातल्या ऊर्जास्रोताचं रहस्य मला अजूनतरी उलगडलेलं नाही. त्यांच्या लहानपणी भारतात वेगळं पाणी पीत असले पाहिजेत, असं मला नेहमी वाटत आलं आहे. श्री. वि.ही त्याला अपवाद नव्हतेच. आम्ही अथक बोलत होतो. म्हणजे मी प्रश्‍न विचारत होतो आणि ते वेगळीवेगळी रंगीत खेळणी आम्हांला खेळायला देत होते आणि खेळण्यांची किल्ली नक्की कुठे आहे हेही सांगत होते. ते आमच्याबरोबर डोहापलीकडे होडीतून आले. नंतर चालत आम्ही पलीकडे देवळापर्यंत गेलो, मग तिथल्या त्यांच्या आप्तांना भेटलो. दिवसभर हे इकडून तिकडे जाणं चालूच होतं. तरी आम्ही जेव्हा आम्हांलाच मधली सुट्टी हवी असायची, तेव्हा त्यांना विचारायचो की, तुम्हांला विश्रांती घ्यायची असेल, तर आपण थोडा विराम घेऊ. तर ते तत्परतेनं म्हणायचे की, मी तयार आहे, तुम्हांलाच विश्रांती घ्यायची असेल तर जरूर घ्या. या त्यांच्या उत्साहानं आम्हांला पुरतं लाजवलं, पण त्याचबरोबर एक नवं चैतन्यही दिलं.

सकाळी डोहापलीकडे जाताना होडीच्या टोकाशी पांढरा लाकडी घोडा होता आणि त्या घोड्याच्या कानांना पकडून एक छोटा चिमुरडा वारा खात उभा होता. श्री. वि. होडीच्या दुसर्‍या बाजूला बसले होते आणि त्या मुलाकडे पाहत होते. मी एकाच वेळी त्यांच्या लेखाचा भाग होतो आणि त्याचा प्रेक्षकही होतो. सिनेमा पाहतापाहता आपणच त्या सिनेमात एक पात्र म्हणून प्रवेश केल्यासारखं मला वाटत होतं. आमच्या औंदुबरच्या निवासात तिथे आता नसलेल्या पाचशे वर्षं जुन्या वडाच्या झाडाच्या पानांच न ऐकू येणारं पार्श्‍वसंगीत होतं. काहीच वर्षांपूर्वी हा पाचशे वर्ष जुना वृक्ष कोसळला. पण श्री. विं.च्या कर्‍हाडमधल्या घरामध्ये अजूनही त्याचा नाद त्यांनाच नाही, तर त्यांच्यामार्फत आम्हांलाही ऐकू येत होता. एखाद्या झाडाचं आपल्या आयुष्यात इतकं महत्त्व असू शकतं, याची जाणीव मला होत होती. त्यांच्या लेखांमध्ये तर या वृक्षाचे उल्लेख आहेतच, पण त्याहीपेक्षा गहिरं त्यांचं आणि औदुंबर या गावाचं या वृक्षाशी नातं होतं. याच वृक्षाखाली तिथली अनेक साहित्य समेलनं भरली. या वृक्षाच्या दर्शनानं गावाचा प्रत्येक दिवस सुरू झाला आणि संपला. तो वृक्ष त्या गावातला कॉन्स्ट्न्ट होता. आपल्या जगण्यामध्ये असा कुठला कॉन्स्ट्न्ट आहे, हा एक नवाच अस्वस्थ प्रश्‍न यामुळे मनात आला, पण ते अलाहिदा. तो वृक्ष कोसळण्याआधी काही दिवस विशिष्ट असा करकर आवाज करत होता. जणू आपल्या निर्वाणाची सूचना तो पक्ष्यांना, वार्‍याला, घरांना, माणसांना, अख्ख्या गावाला देत होता. आणि एके दिवशी तो कोसळला. त्या घटनेच्या जाणिवेनं आणि त्यातील क्षतीच्या परिमाणानं मला एकदम ओकंबोकं वाटू लागलं. आपल्या शरीरातीलच एखादा अवयव निखळून पडावा तसं काहीतरी वाटायला लागलं. एका कधीही न पाहिलेल्या वृक्षाच्या नसण्याची जाणीव इतका खोल, न पुसता येणारा परिणाम करू शकली, कारण श्री. विं.नी मला ते आता प्रत्यक्षात नसलेलं झाडं 'दाखवलं'.

हे झाडच नाही, तर त्यांनी त्यांच्या लेखातून सजीव गोष्टींबरोबरच अनेक जड गोष्टींनाही जिवंत केलं. त्यांनी सहजसाध्या गोष्टीतून गूढ अशा खोल जाणिवेचा मार्ग खुला केला. ही जाणीव पाण्यासारखी पारदर्शक आहे. तिच्यात काळ ओलांडणारं एक अमूर्त, जलरंगाचं चित्र रंगवलेलं आहे. तिच्यात एक खोल वेदना आहे, पण आक्रंदन नाही. तिच्या डोळ्यांत लयबद्ध, पाणीदार संगीत आहे. ही जाणीव वर्षानुवर्षं मनात आत झिरपत राहिली आहे. हे झिरपत जाणं फार महत्त्वाचं आहे. ओझू या जपानी दिग्दर्शकाचे सिनेमे पाहण्यासारखाच हा एक अस्सल अनुभव आहे. ओझूच्या सिनेमात कॅमेरा हलत नाही. तो स्थिर असतो. कॅमेर्‍यासमोरची पात्रं हलतात. खूप गंभीर, हृदयद्रावक प्रसंगसुद्धा साधेपणानं, फारसा आरडाओरडा न करता सादर केले जातात. प्रत्येक चित्रपटाची कथासुद्धा त्याच्या इतर चित्रपटांपेक्षा फार वेगळी नसते. एक घर, त्यातील वडील, लग्नाचं वय उलटून जात असलेली मुलगी, माणसामाणसांचे नातेसंबंध, त्यातली मुलायम खेच आणि काळाचं अपरिहार्यपणे पुढे जात राहणं... चित्रपटाचा अनुभव कथेच्या पलीकडे जातो तो त्या प्रसंगांची लय ज्या पद्धतीनं साधली जाते त्यातून. त्या साधेपणातून, त्यातील भाषेच्या उच्चारातून तयार होणार्‍या ध्वनीतून, प्रत्येक शॉटच्या कॉम्पोझिशनमधून, प्रतिमेमध्ये केलेल्या वस्तूंच्या विशिष्ट मांडणीतून आणि या सर्वांना एकत्र घेऊन केलेल्या, आपसूक वाटेल अशा लयीतून एक आध्यात्मिक म्हणता येईल असा निष्कलंक, निष्कपट, कुठल्याही भडक रंगाचे गालबोट न लागलेला सच्छील, अनुभूतीकडे पोहोचू पाहणारा निर्लेप, नितळ, पारदर्शक प्रत्यय माझ्या मनामध्ये उमलतो.

श्री. विं.च्या अनेक लेखांतून मला स्वतःला अशा स्वरूपाचा प्रत्यय पुनःपुन्हा येत असतो. ’डोहापलीकडे’ मी अनेक वर्षं वाचत आलो आहे आणि तरीही त्याचं गारूड संपलेलं नाही. संपणारही नाही. त्याचा अनुभव पहाटेच्या वेळी एखाद्या शांत नदीमध्ये नावेतून सावकाशपणे किनार्‍यावरच्या झाडांचे आकार, पोत, हिरव्या रंगाच्या विविध छटा, पक्ष्याच्या झेप घेण्याच्या क्षणीच्या भावमुद्रा, मधूनच येणार्‍या बोचर्‍या वार्‍याची झुळूक, अचानक क्षणभर दिसला न दिसलेला काजवा आणि आकाशातील ढगांचे पाण्यावर ओघळत जाणारे डोळे पाहत आपण बाहेरुन आत चाललो आहोत, असा आहे.


***

पूर्वप्रसिद्धी - 'माहेर' (दिवाळी - २०१४)


***

हा लेख मायबोली.कॉमवर पुनर्मुद्रित करण्यास अनुमती दिल्याबद्दल श्री. उमेश विनायक कुलकर्णी व श्रीमती सुजाता देशमुख (संपादक, 'माहेर') यांचे मनःपूर्वक आभार.


***
प्रकार: 

व्वा! छान लेख.

श्रीनिवास विनायक कुलकर्णी ह्यांचे काही ललित लेख मी वाचले आहेत आणि खूप आवडले होते.

तुला जर कणसाचा उपमा माहिती असेल तर पाककृती देशील का? किंवा एक फक्त कसा करायचा ते सांगशील का?

आणि ते उलटे झाम्पर घातले की नवरा घरात नाही हा संकेत सहीच आहे.

वा, मंत्रमुग्ध करणारा लेख आहे! ह्या उबदार, दर्दी लेखकाबद्दल इतक्या जणांनी मनापासून लिहिलंय आणि ते सगळं वेगवेगळं वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या लोकांकडून लिहिलं जाऊनही तंतोतंत जुळतं, म्हणजे तो माणूस किती निखळ उमदा असावा ते कळतं. उमेश कुलर्णींनीही खुपच अप्रतिम चितारलंय श्रीनिवास कुलकर्णींना.

शेअर केल्याबद्दल थँक्स चिन्मय Happy
सगळ्या आजुबाजूच्या गदारोळात ओअ‍ॅसिस सापडल्यासारखं वाटत गेलं वाचताना.

बी, भारीच आहेस! तुला प्रश्न पडावेत असे कैक छान छान मुद्दे आहेत लेखात. पण तू अगदी टोकाचा वेचक निघालास.

सगळ्या आजुबाजूच्या गदारोळात ओअ‍ॅसिस सापडल्यासारखं वाटत गेलं वाचताना.>>अगदी १००० टक्के खरे!!!

वेचक ह्यासाठी कि त्यांनी हे लेखन अलवार तरल केले आहे.

श्री वि कुलकर्णी माझ्या सार्वकालिक आवडत्या लेखकांपैकी एक, त्यामुळे लेख माहेर मधे वाचला होता त्याच उत्साहाने परत इथे वाचला. सुरेख जमलाय.
इथे दिल्याबद्दल आभार Happy

काय सुरेख लेख लिहिला आहे! परत परत वाचावा असा!

उमेश इतकं कधी ’बोलेल’ असं वाटत नाही. त्याची व्यक्त होण्याची माध्यमं वेगळी आहेत. लेखन हे त्यातलं एक सशक्त माध्यम. त्याला त्याच्या आवडत्या लेखकाबद्दल लिहितं केल्याबद्दल धन्यवाद. He truly adores him असं वाटतं.

गेल्या वर्षी ’रिंगण’मध्ये उमेशनेच श्री. विं.च्या कथांचं अभिवाचन आयोजित केलं होतं. कथा ऐकताना आम्ही श्रोते भारावून गेलो होतो. अभिवाचनाला खुद्द श्री. वि.ही आले होते. नंतर काही लोकांनी त्यांना प्रश्न विचारले, त्याबद्दल त्यांनी इतक्या ’कूलली’ उत्तरं दिली होती. वर उमेशने लिहिलं आहे तोच तो ’सौम्य मॅटर ऑफ फॅक्टनेस’. कमाल माणूस. कमाल लेखन.

चिनुक्स ,अतिशय सुंदर लिहिलं आहे ! श्रीनिवासजींना सादर प्रणाम,पुन्हापुन्हा.
इतका मोठा, तरी इतका निर्व्याज प्रतिभावंत.

काय सुरेख लिहिलं आहे. थँक्यु फॉर शेअरिंग.
आपल्यात खरोखर इतका 'रुटेडनेस' नाही असं मला बर्‍याचदा वाटत राहतं अलिकडे.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जगण्यात आणि मनात इतका अवकाशच उरलेला नाही. स्पेस, स्पेस असं म्हणत असताना काहीतरी निसटून जातय जगण्यातून.
_____
माणसांवर, दगडधोंड्यांवर, झाडांवर, पक्ष्यांवर असा विश्‍वास ठेवण्याची, त्यांना सहजपणानं आपल्यात सामावून घेण्याची ही जादू मला जमली तर काय मज्जा येईल. >>
तो वृक्ष त्या गावातला कॉन्स्ट्न्ट होता. आपल्या जगण्यामध्ये असा कुठला कॉन्स्ट्न्ट आहे, हा एक नवाच अस्वस्थ प्रश्‍न यामुळे मनात आला>>
आता जी माणसं ऐंशी वर्षांच्या आसपास आहेत, त्यांच्यातल्या ऊर्जास्रोताचं रहस्य मला अजूनतरी उलगडलेलं नाही>>

आवडला लेख
धन्यवाद चिनूक्स!

काही वेळा अती भाबडेपणाकडे झुकणारे लिहित असले तरी आवडते लेखक आहेत हे ही

त्यांच्याबद्दलचे
"आपण स्वतः ठरवलेल्या निकषांवर आपली कलावस्तू जोखून पाहिल्यानंतरच ती खुली करण्याचा निर्णय आणि स्वातंत्र्य त्यांनी त्यांच्याकडे राखून ठेवलं आहे. ही जशी एका काळाची व्हॅल्यू आहे, तशीच ती एका विशिष्ट दृष्टीच्या एका विशिष्ट कार्यपद्धतीची व्हॅल्यू आहे." हे खूप भावले.
चिंतन मनन न करता अभिव्यक्त होण्याच्या ह्या काळात फार फार दुर्मीळ आहे हा पवित्रा

खूप सुंदर लेख. आधी वाचला होता. मला अंधुकसं आठवतंय की या लेखाबरोबर श्री.वि.ंच्या घराच्या व्हरान्डा इ. बाहेरील भागाचा एक फार सुंदर फोटोही होता.

रैना, +१
शहाणी असून snob नसलेली माणसं फारच दुर्लभ असतात!
सुरेख व्यक्तिचित्रण!

हा नितांतसुंदर लेख मला तरी एका दमात वाचता आला नाही... निवांत वाचताना हळूहळू अनेक गोष्टी आत झिरपू द्याव्यात अशा अनुभूतिचा हा लेख गद्य का काव्य अशा तरल सीमारेषेवरचा आहे ...

यातील मला आवडलेल्या वाक्यांना एकत्रित करुन परत वाचण्याचा माझा एक वेडा प्रयत्न ...

त्यांची आई म्हणायची की, जी झाडं आपली आपण आवारात येतात, त्यांना वाढू द्यावं, त्यांची इच्छा आहे आपल्याकडे वाढायची!

प्रकाशामुळे रंगाला अस्तित्व मिळतं आणि अंधारामुळे रंगभेद नाहीसे होतात.

पुस्तकांवर प्रेम असणं, शब्दांविषयी माया असणं या गोष्टी काही बळजबरीनं स्वतःवर लादता येत नाहीत. त्या उपजतच असाव्या लागतात.

प्रत्येकाला आपली स्वतःची भाषा चांगल्या पद्धतीनं वापरण्यासाठी जशी शब्दसंग्रहाची गरज असते, तशीच त्या भाषेची लय सापडण्याचीही गरज असते. ज्यांना ही लय सापडते त्यांचं बोलणं हा एक सांगीतिक अनुभव होऊन जातो.

श्री. विं.शी गप्पा मारताना आपण काळाच्या एका मोठ्ठ्या झोपाळ्यावर बसून झोके घेत असल्याचं जाणवत होतं.

अगदी रोजच्या जगण्यातल्या गोष्टींकडे इतक्या ताजेपणानं आणि गंभीर खेळकरपणानं पाहतापाहता, त्यांच्या अंतरंगातील आध्यात्मिक गुढतेचा कॅनव्हास हळूहळू दिसू लागतो आणि एक हुरहूर लावणारा अस्वस्थ ओला शांतपणा मनामध्ये झिरपू लागतो.

या सगळ्या मंडळींविषयी, त्यांच्या साहित्याविषयी बोलताना श्री. वि., त्यांच्या मनामध्ये जे आपुलकीचे धागे आहेत, त्यांच्या उभ्याआडव्या टाक्यांनी विणलेल्या या काळाच्या पोताचं वस्त्र आपल्यावर एखाद्या शालीसारखं पांघरत असतात. त्याची ऊब त्यांच्याबरोबर असताना आणि नसतानाही आपल्याला जाणवत राहते.

’शब्दांवर जीव लावणारा माणूस’ असं म्हटलं तर आपल्यासमोर कोणती व्यक्ती येते? कवितांवर प्रेम असणं वेगळं आणि आपणच एक कविता होणं वेगळं.

सोपं असलं की सोपं होता येतं. असण्यात सहजता, हलकेपणा असला तरच इतकं सहजस्वाभाविक लिहिता येतं. अवकाश मोकळं असलं तरच त्यात काही भरता येतं, हे कळतं पण वळत नाही. आपल्या कलाकृतीबद्दल आपुलकी असणं ही स्वाभाविक गोष्ट आहे, पण तिच्याकडे एका पर्स्पेक्टिव्हनं पाहता येणं ही अत्ंयत महत्त्वाची आणि आवश्यक गोष्ट आहे, याची जाणीव मला झाली.

वेगळ्या भलत्याच अपेक्षांनी आपण स्वतःवर वजन ठेवत नाही, आणि आपल्याला मिळालेल्या एका तेजस्वी टॉर्चनं आपल्या गुहेतल्या अंधारातल्या सूक्ष्म जागा आपण संयमानं पाहायला लागतो.

पण तरीही श्री.विं.ना भेटल्यावर त्यांच्या लेखांचं आणि त्यांच्या असण्याचं अद्वैत अतिशय नेमकेपणानं प्रकट झालं, आणि त्यामुळे एकप्रकारचं आश्वासक सुख वाटत राहिलं.

एका कधीही न पाहिलेल्या वृक्षाच्या नसण्याची जाणीव इतका खोल, न पुसता येणारा परिणाम करू शकली, कारण श्री. विं.नी मला ते आता प्रत्यक्षात नसलेलं झाडं 'दाखवलं'.

हे झाडच नाही, तर त्यांनी त्यांच्या लेखातून सजीव गोष्टींबरोबरच अनेक जड गोष्टींनाही जिवंत केलं. त्यांनी सहजसाध्या गोष्टीतून गूढ अशा खोल जाणिवेचा मार्ग खुला केला. ही जाणीव पाण्यासारखी पारदर्शक आहे. तिच्यात काळ ओलांडणारं एक अमूर्त, जलरंगाचं चित्र रंगवलेलं आहे. तिच्यात एक खोल वेदना आहे, पण आक्रंदन नाही.

कुणाकुणाला धन्यवाद द्यावेत !! Happy

निवांत वाचताना हळूहळू अनेक गोष्टी आत झिरपू द्याव्यात अशा अनुभूतिचा हा लेख गद्य का काव्य अशा तरल सीमारेषेवरचा आहे ... अगदी अगदी

मी देखिल परत परत वाचतोय

बराच काळ झाला असेल इतक सुंदर काही वाचल्याला . चिनुक्स खूप धन्यवाद हा अप्रतिम लेख आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल

>>आपण श्री. विं.ना भेटायला त्यांच्या घरी जातो आणि मग गप्पा मारायला लागलो की, ते आपल्याला त्यांच्या एका रंगीत माजघरात घेऊन जातात. त्यात त्यांच्याबरोबर इंदिराबाई, श्री. पु. बसलेले असतात. दुर्गाबाई, शांताबाई असतात. विंदा, तेंडुलकर, आरती प्रभू, जी.ए. असतात. आपला ज्यांच्याज्यांच्याशी संवाद व्हावा, अशी आपली इच्छा असते, ती सगळी मांदीयाळी त्यांच्या या रंगीत माजघरात नेहमी गप्पागोष्टींमध्ये मग्न असते.>>>

निव्वळ अप्रतिम....शब्दा पलिकडचे शब्द !!!!