अमेरिकेचे मिशन जपान

Submitted by पराग१२२६३ on 3 January, 2016 - 01:28

हॅलो, ३ जानेवारीच्या दै. सामनामध्ये प्रकाशित झालेला माझा लेख आणि त्याची लिंक खाली दिलेली आहे. वेळ मिळेल तेव्हा हा लेख वाचावा ही। विनंती.
---
http://www.saamana.com/utsav/amerikeche-mission-japan

अमेरिकेचे मिशन जपान
अमेरिकेने आपल्या नौदलातील सर्वात आधुनिक अणुशक्तीवर चालणारे विमानवाहू जहाज ‘यूएसएस रोनाल्ड रीगन’ नुकतेच जपानमध्ये पोहोचले आहेत. त्यापाठोपाठ आणखी एक अणुविमानवाहू जहाज आणि ‘एजिस’ ही क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा बसविलेल्या युद्धनौका जपानकडे धाडण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. चीनच्या प्रशांत आणि हिंदी महासागरातील नाविक हालचालींवर नियंत्रण ठेवतानाच आपल्या राष्ट्रहितांच्या संरक्षणाच्या हेतूने अमेरिकेकडून ही तैनाती केली जात असून आंतरराष्ट्रीय पातळीवरील माध्यमांचेही या हालचालींकडे लक्ष वेधले गेले आहे.

जपानमधील योकोसुका येथील नाविक तळावर २००८ मध्ये अमेरिकेचे यूएसएस जॉर्ज वॉशिंग्टन हे विमानवाहू जहाज तैनात करण्यात आले होते. त्या जहाजाची जागा आता यूएसएस रोनाल्ड रीगनने घेतली आहे. त्याआधी ‘रोनाल्ड रीगन’ अमेरिकेच्या पश्‍चिम किनार्‍यावरील सॅन दिएगो येथील नाविक तळावर तैनात होते. आशिया-प्रशांत क्षेत्रातील शांतता आणि सुरक्षेला अमेरिकेच्या राष्ट्रहितांच्या दृष्टीने अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे त्यांच्या संरक्षणाच्या हेतूने राष्ट्रपती बराक ओबामा यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळाच्या शेवटी ‘आशिया-प्रशांत धोरण’ (पायव्हट टू एशिया) जाहीर केले होते. त्यानुसार २०२०पर्यंत अमेरिकेच्या नौदलातील साठ टक्के युद्धनौका या क्षेत्रात तैनात करण्यात येणार आहेत.

यूएसएस जॉर्ज वॉशिंग्टन आणि यूएसएस रोनाल्ड रीगन ही दोन्ही निमिट्झ श्रेणीतील अणुशक्तीवर चालणारी महाकाय विमानवाहू जहाजे आहेत. मात्र आधुनिक दळणवळण यंत्रणा, स्वसंरक्षणासाठी बसविलेल्या यंत्रणा अशा अत्याधुनिक यंत्रणांमुळे ‘जॉर्ज वॉशिंग्टन’पेक्षा ‘रोनाल्ड रीगन’ सरस आहे. निमिट्झ श्रेणीतील सर्व विमानवाहू जहाजे अणुशक्तीवर चालतात. या जहाजांमध्ये दर २५ वर्षांतून एकदा अणुइंधन भरावे लागते. अणुशक्तीमुळे या जहाजांचा पल्लाही अचाट असतो. ‘जॉर्ज वॉशिंग्टन’मध्ये याआधी १९९२मध्ये इंधन भरण्यात आले होते. त्यामुळे आता पुन्हा इंधन भरण्यासाठी तसेच डागडुजीसाठी या जहाजाला अमेरिकेतील नॉरफोल्क येथील गोदीत नेले जाणार आहे. त्या काळात आशिया-प्रशांत क्षेत्रातील सुरक्षा समीकरणे बिघडू नयेत यासाठी योकोसुका येथे लगेच दुसरे विमानवाहू जहाज तैनात करण्यात आले आहे. दुसर्‍या महायुद्धानंतर झालेल्या सुरक्षा करारानुसार अमेरिकेने जपानच्या संरक्षणाची पूर्ण हमी घेतलेली आहे. त्यामुळे कोणत्याही बाह्य आक्रमणापासून जपानचे संरक्षण करण्यासाठी अमेरिकेने आपले सैन्य मोठ्या प्रमाणात जपानमध्ये कायमस्वरूपी तैनात केले आहे. त्याद्वारे प्रशांत महासागरातील आपल्या राष्ट्रहितांच्या संरक्षणाची हमी अमेरिकेला मिळाली आहे. अमेरिकेने जपानमध्ये आपले अनेक नाविक, हवाई तळही उभारले आहेत. मात्र जपानमधील नाविक तळांवर अमेरिकेने २००८ पर्यंत अणुशक्तीवर चालणारे विमानवाहू जहाज तैनात केले नव्हते. अमेरिकेच्या नव्या निर्णयामुळे एकीकडे चीनच्या वाढत्या नाविक महत्त्वाकांक्षांवर नियंत्रण मिळवतानाच जपान आणि दक्षिण कोरियाला उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून सुरक्षा कवच पुरविणेही शक्य होणार आहे. उत्तर कोरियाने गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या क्षेपणास्त्र क्षमतेचा मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे. त्यामध्ये आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचाही समावेश असून त्यांचा पल्ला अमेरिकेपर्यंत असल्याचे मानले जाते. उत्तर कोरियाने आण्विक चाचण्याही घेतल्या असल्यामुळे जपान, दक्षिण कोरियाबरोबरच अमेरिकेच्या सुरक्षेसमोरही गंभीर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे अमेरिकेला जपानमध्ये क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा उभी करण्याची गरज वाटत आहे. ती गरज ‘एजिस’ यंत्रणा बसविलेल्या युद्धनौका पूर्ण करतील.

आशिया-प्रशांत क्षेत्रामधील सुरक्षाविषयक समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण आशिया-प्रशांत क्षेत्राला सुरक्षा पुरविण्यात एक विमानवाहू जहाज कमी पडण्याची शक्यता अमेरिकन नौदलाला वाटत आहे. त्यामुळेच आशिया-प्रशांत क्षेत्रात कुठेही कमीतकमी वेळेत सुरक्षा पोहोचविता यावी यासाठी अमेरिकेने दुसरे अणुविमानवाहू जहाज तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या या निर्णयामागे आर्थिक कारणेही आहेत. अफगाणिस्तान आणि इराकवरील अल कायदा आणि सद्दाम हुसेनविरोधी लष्करी मोहिमा आणि २००८ पासून आलेली जागतिक आर्थिक मंदी यांचा अमेरिकन अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे लष्कराच्या आधुनिकीकरणाच्या महत्त्वाकांक्षी योजनांना कात्री लावण्याचा निर्णय अमेरिकेला घ्यावा लागला आहे. त्यात अमेरिकेचा जगभरात दबदबा निर्माण करणार्‍या ‘कॅरियर बॅटल ग्रुप्स’ची संख्याही भविष्यात कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र त्याचा अमेरिकेच्या राष्ट्रहितांवर गंभीर परिणाम होण्याचा धोका अमेरिकेत व्यक्त केला जात आहे. जपानमधील एकच विमानवाहू जहाज संपूर्ण प्रशांत महासागरीय क्षेत्रावर नियंत्रण ठेवण्यास पुरेसे नाही हे आता अमेरिकेच्या लक्षात आले आहे. तसेच आणीबाणीच्या वेळी या क्षेत्रात दुसरे विमानवाहू जहाज कमीतकमी वेळेत उपलब्ध होणे तिला आवश्यक वाटत आहे. असे केल्यामुळे अमेरिकेहून ऐनवेळी दुसरे विमानवाहू जहाज धाडण्यापेक्षा २० टक्के कमी वेळ आणि खर्च लागणार आहे.

ऑक्टोबरमध्ये यूएसएस रोनाल्ड रीगन अणुविमानवाहू जहाज जपानमधील योकोसुका तळावर पोहोचले असून ते तेथे सात वर्षे तैनात असणार आहे. जपानने या अणुविमानवाहू जहाजाचे जोरदार स्वागत केले आहे. आशिया-प्रशांत क्षेत्रामध्ये साम्यवादाचा प्रसार वाढू नये यासाठी शीतयुद्धाच्या काळातील आवश्यकता म्हणून अमेरिकेने १९७३ पासून जपानमध्ये आपले विमानवाहू जहाज तैनात करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर २००८ मध्ये पहिल्यांदाच अणुशक्तीवर चालणारे विमानवाहू जहाज (यूएसएस जॉर्ज वॉशिंग्टन) अमेरिकेने जपानमध्ये कायमस्वरूपी तैनात केले होते. त्यावेळी मात्र त्याला स्थानिक नागरिकांकडून तीव्र विरोध झाला होता. जपानमध्ये दोन महाकाय अणुविमानवाहू जहाजे तैनात करण्याच्या निर्णयामुळे अमेरिकन नौदलाकडे आशिया-प्रशांत क्षेत्रामध्ये दरमहा किमान एक विमानवाहू जहाज उपलब्ध असेल आणि वर्षातील चार महिने दोन विमानवाहू जहाजे उपलब्ध असतील. त्यामुळे या क्षेत्रातील जपान, दक्षिण कोरियासह अमेरिकेच्या राष्ट्रहितांच्या संरक्षणासाठी अधिक भक्कम व्यवस्था निर्माण होईल. अमेरिकेचे मरीन्स, युद्धनौका, लढाऊ व टेहळणी विमाने जपानमध्ये आधीपासूनच मोठ्या प्रमाणात तैनात आहेत.
पराग पुरोहित - See more at: http://www.saamana.com/utsav/amerikeche-mission-japan#sthash.5vOFldap.dpuf

Group content visibility: 
Public - accessible to all site users