तुरीचे सोले - जिजके जास्त तितके मस्त तरी सांगाले एक मोठी वाटी
तांदुळ - वाटीभर
कांदा - १ बार्रीक चिरलेला
झोंबणार्या हिरव्या मिरच्या - मी ४ घेतल्या
टमाटे - मी २ घेतले . पहिला त्याले उभे कापले अन मग लंबे. काय म्हणते ते..ज्युसिकल वानी..
लसुण अन अद्रकाचि पेस्ट - अर्धा चमचा
तिखट - अर्धा चमचा
हळद - भात पिवळा दिसला पाहिजे का लाल ? मधला हवा असेल तर पाव चमचा पुरते
गरम मसाला - पाव चमचा
मिठ - चवीनुसार घा न राजेहो
जिरं
मोहरी
तेल - ते नै बा मी सांगत . दोघाले लागणार्या मसालेभातात घालता तेवढच घाला
सांभार का कोथिंबीर हवं ते टाका.
तर झाल अस का माया जवळच्या रिलायंस च्या डोंगलाले अटॅक आला न जेवण गोळ्या न चुकता देत होती तरी त्यानं जीव सोल्ला. मंग आली आफत इथं या जा ची.. आता कोंबडीच्या पिल्लावानी त्या मोबाईलवर टिचुक टिचुक कराची सवय नाई म्हणून मंग इतक्या दिसानं तुरीचा सिजन संपत आल्यावर रेशिपी टाकाले आली.. म्हणलं मी त खाल्ल दाब्बुन पण निदान तुमाले नै कै तर दोन घासाचा निवद तरी दाखवाव नै त पोट दुखन न माय वालं.. तर म्हणून हा नव्या धाग्याचा परपंच..
आता सांगतो तस करा..
आधी आणा तुरीच्या शेंगा. एक त मंडीत बैल सोडा नै त एखाद्याच्या शेतात. पण शिकवलेलाच सोडा बाप्पा. नै म्हणजे शेंगा आणता येत असेल असा पाहुन नै तर तिथच चरत बसाचा राहिल्या शेंगा बाजुले..
आणलेल्या शेंगा सोलुन दाणे बाजुला काढून ठेवा.
सगळं चिरचार , कुटकाट केलेल बाजुला हाताशी ठेवा.. हाताशी म्हणजे किचनच्या ओट्यावर.
आता कुकरचा हंडा मांडा शेगडी वर. गॅस लावून तेल टाका.
तेल गरम झाल रे झाल का पयले मोहरि न मंग जिरं टाका..
मंग टाका कांदा, मिरची अन शेवटी अद्रक लसणाची पेस्ट.. याले जरा हालवहुलव करुन घ्या.
आता तिखट, मिठ, हळद, उल्लीसा गरम मसाला टाकुन थोड्या वेळानं टाका तांदुळ.
मग तुरीचे सोले अन चिरलेले टमाटे टाकुन पाणी टाका.
३ शिट्ट्या झाल्या, कुकर थंड झाला का ताटात घेउन त्याच्यावर जरासा सांभार टाकुन होउन जाउ द्या..
सोलेभात फक्त सोल्याचाच करता येते.. मटर गिटर टाकून सोलेभात खाल्ल्याचा आव आणता येत नाई..
तहान लागल्यावर खड्डा खणाले सुर्वात करु नए.. आटोक्यात असलेल्या भुकेच्यावेळीच करा. नाई म्हणजे गरम गरम खाच्या नादात चिपकले सोले जांभयाले त का सांगता.. कोणच्याच चवी लागाच्या नै न राजेहो हफ्त्याभर..
सांगितल तसा करा.. हिंग टाकू का ? गोडलिंब्/कढीपत्ता टाकू का ? असच चिरा लागते का ? तसच कुटा लागते का ? आमच्याकडं गु(ळ) टाकतात तुमच्याकडे टाकून पाता का असल्या चौकश्या सल्ले वगैरे देण्याच्या विचारण्याच्या भानगडीतच पडू नये.. बदल कराचे असल्यास कराचे .. आपला हात जगन्नाथ.. पण असच चांगल लागते हे शपथेवर सांगतो..
ताटात एवढा लिंबु काउन ? कांदा काउन ? कच्चे लसण काउन ? असं विचारु नए..
आवडते त खाते त्यात का सांगाच ? तरी तुमच्यावरच्या प्रेमापायी सांगतो.. लिंबु आंबट असते म्हणून खाते, कांदा थंड असतो पण आवडतो न त्याले बॅलन्स करासाठी गरम असलेला अन तिखट असलेला लसुण घेतला..
सगळ्यात महत्त्वाची टिप :
शेजारी कुणी झोपाले असलेल आवडत नसन त कच्चा लसुण खाल्ल्यावर दात न घासता तसच खेटून झोपल्यानं अर्ध्या रात्री प्रशस्त जागेत सुंदर स्वप्नाळू झोप लागते. त्यातही कृपया तोंडावर पांघरुन घेऊ नये. मी जबाबदार राहणार नाई रे बा...
मस्त दिसतोय सोलेभात.. मला आधी
मस्त दिसतोय सोलेभात.. मला आधी वाटलं सोलाण्याचा - ओल्या हरभर्याचा असेल

बाकी पाकृ लिवायची ष्टाईल झ्याक बघा
मस्तच! >>बाकी पाकृ लिवायची
मस्तच!
>>बाकी पाकृ लिवायची ष्टाईल झ्याक बघा >> +१
कोंबडीच्या पिल्लावानी त्या
कोंबडीच्या पिल्लावानी त्या मोबाईलवर टिचुक टिचुक कराची सवय नाई
मलापण.
सोले म्हणजे काय?
ओ अॅडमिन पाककृतीचे धागे
ओ अॅडमिन पाककृतीचे धागे सार्वजनिक करायला बंद करा हो.
ऑफिस मधे बसुन भुका लागतात. कामात लक्ष लागत नाय.
आधी आणा तुरीच्या शेंगा. एक त
आधी आणा तुरीच्या शेंगा. एक त मंडीत बैल सोडा नै त एखाद्याच्या शेतात. पण शिकवलेलाच सोडा बाप्पा. नै म्हणजे शेंगा आणता येत असेल असा पाहुन नै तर तिथच चरत बसाचा राहिल्या शेंगा बाजुले..>> हे भारी आहे
कोंबडीच्या पिल्लावानी त्या
कोंबडीच्या पिल्लावानी त्या मोबाईलवर टिचुक टिचुक कराची सवय नाई>>>>> हे भारी है.
तोंपासु!!! त्या भातावर
तोंपासु!!!
त्या भातावर ketchup टाकले आहे का?
मस्त!
मस्त!
त्या भातावर ketchup टाकले आहे
त्या भातावर ketchup टाकले आहे का?>>>>>>>
sonalisl , अहो ,ताटात एवढा लिंबु काउन ? कांदा काउन ? कच्चे लसण काउन ? असं विचारु नए.. ही धमकी विसरलात का?
पण मी लिंबू, कांदा आणि लसणा
पण मी लिंबू, कांदा आणि लसणा बद्दल विचारलेच नाहीये..
अह्हाहा, मस्त दिस्तय ताट
अह्हाहा, मस्त दिस्तय ताट
चांगलं दिसतेय ताट
चांगलं दिसतेय ताट
वॉव..टिने भार्री इइश्टाईल
वॉव..टिने भार्री इइश्टाईल वाला भात.. सुपर आवडला
टिने....मस्तच गं !
टिने....मस्तच गं !
आलेच का प्रश्न.. सोले म्हणजे
आलेच का प्रश्न..
सोले म्हणजे दाणे.. कृतीत लिहिलय ..
हो केचअप च आहे.. एक बुंद केचअप कि किमत तुम क्या जाणो sonalisl
सर्वायले थँकु _/\_
आज चिकन राईस बनवलाय..टाकू म्हणता का रेस्पी रपातपा केलेल्या चिकन भाताची
लै भारी. उद्याच करण्यात ईल
लै भारी. उद्याच करण्यात ईल
पण मी लिंबू, कांदा आणि लसणा
पण मी लिंबू, कांदा आणि लसणा बद्दल विचारलेच नाहीय>>>>>>> हा हा.
आलेच का प्रश्न..>>>>> आता घ्या.;)
अगदी वेळेत मिळाला
अगदी वेळेत मिळाला
टीना, मस्तच लिहिलेय.. ताज्या
टीना, मस्तच लिहिलेय.. ताज्या तुरीच्या दाण्याची सर कशालाच नाही यायची. परदेशात टीनमधे मिळतात पण त्यात लब्बाडी असते. टीनवर चित्र ओल्या दाण्याचे असते पण आत कडधान्य भिजवून शिजवलेले असते.
चिकन राइसची कृती टाक प्लीज.
चिकन राइसची कृती टाक प्लीज. वाट बघिंग. इथे सोलेभात करणं कदाचित शक्य नाही होणार.
तुरीचे दाणे फार पूर्वी
तुरीचे दाणे फार पूर्वी खाल्लेत, आता तर चव पण विसरलोय, पण रेसिपी छान.
सोले म्हणजे कोकणात आमसुले; त्यामुळे शीर्षक वाचून आधी कन्फ्युजन झाले.
फोटु मस्त
फोटु मस्त
झकास गो बायो. कोंबडीच्या
झकास गो बायो.
कोंबडीच्या पिल्लावानी त्या मोबाईलवर टिचुक टिचुक कराची सवय नाई. मलाबी नाई.
मलापण सोले म्हणजे आमसुले की काय असं वाटलं.
मस्त.. भात बी दिसायला आणि
मस्त.. भात बी दिसायला आणि रेसिपी बी..
पण आज चिकनभात.. भाद्रपद की मार्गशीष काहीसा महिना चालू आहे ना..
ऋन्मेष, मार्गशीर्ष. खाऊदेना
ऋन्मेष, मार्गशीर्ष. खाऊदेना तिला.
अरे पण इथे आमच्या आईने घोळ
अरे पण इथे आमच्या आईने घोळ घातलाय ना.. म्हणते या मार्गशीषमध्ये घरात चिकन मटण नाही करणार.. मासे अंडी देते फारतर.. बाहेर काहीही खाऊ शकतो.. पण बाहेर काय उगाचच एकट्याने जाऊन खाणे होत नाही.. ऑफिसातून सुटल्यावर चिकन रोल खाऊन दिवस काढतोय.. पण त्याला घरच्या कोंबडीची सर नाही.. हे एवढे सांगायचे कारण की उगाचच आज चिकन भात खाल्ला हे प्रतिसादात सांगायची गरज होती का.. जळते ना आमची उगाच
जबरी लिवता हो....
जबरी लिवता हो....
स्लर्पऽ.........
झक्क.. अस्स्साच करणार.
झक्क.. अस्स्साच करणार.
आवडीचा प्रकार.. भारीच लिव्हते
आवडीचा प्रकार.. भारीच लिव्हते ग बया...:)
धन्यवाद .. ऋन्मेष, अरे
धन्यवाद ..

ऋन्मेष,
अरे मार्गशिष घरी असतो घराबाहेर नै..त्यामूळे चलता है.. पण त्याची स्ट्रिक्ट वार्निंग आईकडून मिळाल्यावर इथ येण्यापूर्वी नेमक मामा मामी ने आम्ही पूण्यात राहणार्या लोकांसाठी मटणाचा पाहुणचार ठेवला होता
थोडक्यात काय तर मानसिक , आत्मिक समाधान महत्त्वाचे
Pages