मेथी मेतकुट हिवाळी धपाटा - (धपाटा प्रकार-०१)

Submitted by हर्ट on 3 December, 2015 - 23:54
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

# मेथीची एक ताजी जुडी
# पाव वाटी घमघमणारे मेतकुट
# ज्वारीचे पिठ - सव्वा वाटी
# लहानसा कांदा
# लसून
# जिरे
# हिरवी मिरची किंवा तिखट
# मीठ
# हिवाळा असेल तरच तिळ तेही भाजलेले. इथे हिवाळा नाही म्हणून तिळ घेतले नाही.

क्रमवार पाककृती: 

१) सर्वप्रथम मेथीची पाने धुवून निवडून घ्यावी. शक्यतोवर पानेच घ्यावी. देठ कोवळे असतील तर घ्यावे.

२) अगदी साधीशी हलकी फुलकी फोडणी देऊन मेथीची भाजी तव्यावर करावी. आच मंद ठेवली तर जास्त पाणी सुटेल. आच जास्त ठेवली तर भाजी कोरडी होईल. म्हणून आचेकडे लक्ष द्या. भाजी फोडणी घालून झाली की त्यावर बसेल असे एक ताट ठेवावे आणि एक वाफ येऊ द्यावी. वाफ आली की परत ही भाजी शिजवू नये.

३) मेथीची भाजी होईपर्यंत तुम्ही परातीमधे दोन धपाटे होतील इतके ज्वारी पिठ घ्यावे आणि पाव वाटी मेतकुट घ्यावे.

४) भाजी झाली की पिठामधे भाजी घालावी. भाजी घालण्यापुर्वी पिठ आणि मेतकुट हाताच्या बोटानी एकत्रित करावे. असे एकत्रित व्हायला हवे की पिठाचा रंग मेतकुटाच्या रंगात मिसळून जावा. मधे एक खळ करावे आणि त्यावर भाजी घालावी.

५) आता पिठ आणि भाजी हाताला कोमट पाणी लावून मळून घ्यावे. भाजीला जर भरपुर पाणी सुटले असेल तर फार उत्तम पण जर थोडे कमी पडत असेल तर पाण्याचा हात लावत लावत पिठ मळून घ्यावे. पाणी घालून/ओतून पिठ मळू नये. असे केले की उंडा बिघडू शकतो. हवे तर ताका सुद्धा वापरु शकता. पण मी खूप चवी एकत्रित करत नाही.

६) उंडा तयार झाला की लगेच पोळपाटावर ज्वारीचे पिठ समांतर पसरवून घ्यावे. आधी हातानी तळहातावर उंडा गरगरीत गोल करुन थोडासा चापट करुन घ्यावे. मग तो पोळपाटावर ठेवावा. पिठ थोडे जास्त असले की भाकरी थापताना ती पोळपाटावर फिरत फिरत तिचा परिघ वाढत जातो. भाकरी थापताना ती फिरायलाच हवी. असे नाही झाले तर तिथेच थांबा कारण ही भाकरी तुम्हाला तव्यावर टाकताच येणार नाही. शेवटी धपाटा हा भाजरीचाच एक खमंग प्रकार आहे म्हणून मी इथे भाकरी असा उल्लेख केला आहे.

७) जो तवा तुम्ही मेथीच्या भाजीला वापरला तो तवा तसाच मंद आचेवर गॅसवर ठेवावा. माझा एक स्वानुभव आहे मंद आचेवरचा स्वयंपाक रुचकर होतो. हा तवा जाड बुडाचा आहे आणि मधे खळ आहे. असा तवा पोळी, भाकरी, भाज्या सर्वांसाठी चांगला. हा तवा मी अकोल्याहून घेतला आहे. १० वर्ष झालेत मुठ अजून घट्ट मजबूत आहे. तर .. ह्या तव्यावर धपाटा खरपुस भाजावा. पहिली बाजू अशी दिसते:

८) दुसरी बाजू मी मुद्दाम करपवली कारण मग धपाटा अजून कुरकुरीत आणि चवीला छान लागतो. पण करवण्याच्या ह्या क्रियेत आपण धपाटा जाळतो तर नाही ना ह्याकडे लक्ष पुरवावे.

९) मी मेतकुटाचा हा पॅक दिक्षित फुडस मधून घेतला आहे. बावधनाला त्यांचे दुकान आहे.

अधिक टिपा: 

१) ताजी भाजी घ्या. जून भाजी घेऊच नका.
२) ताजेच मेतकुट घ्या.
३) जी मुल भाज्या खायला नन्नाचा पाढा म्हणतात त्यांना अशा पाककृतीतून पोषक घटक मिळू शकतात. आमच्या आया अशाच करत. तुम्ही पण काय झाल बाळ रडत होत ह्याच्या पावलावर पाऊन ठेवून धपाट्याची ही लुप्त होत चाललेली परंपरा पुढे न्या.

ताक - माझ्याकडे धपाट्याच्या अनेक पाककृती आहेत. म्हणून मी हा पहिला प्रकार लिहिला. ह्याला मी पुढे नेणार आहे.

धन्यवाद

बी

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाककृती मस्तच.. मी थालिपीठा सारखे करुन बघेन.तसही ज्वा.पी आहेच घरात..

लागणारे जिन्नस:
# मेथीची एक ताजी जुडी
# पाव वाटी घमघमणारे मेतकुट
# लहानसा कांदा
# लसून
# जिरे
# हिरवी मिरची किंवा तिखट
# मीठ
# हिवाळा असेल तरच तिळ तेही भाजलेले. इथे हिवाळा नाही म्हणून तिळ घेतले नाही.

>> यात ज्वा.पी पण अ‍ॅड कराल काय?

धन्यवाद!!!!

हे थालीपिठ नाहीये. थालीपिठाला आपण छिद्र पाडतो. झाकण ठेवतो. पातळ भिजवतो. तव्यावरच लावतो. भाजलेले धान्य दळतो. दोन्ही बाजूने तेल सोडतो. इतके मुलभुत भरक आहे.

माझ्या सासू बाई( पहिल्या) असे धपाटे करत असत तेव्हा( पक्षी रवीच्या लहान पणी) पितळ्याचे लंगडी नावाचे भांडे असायचे. तर तव्यावर थालिपीठ लावायचे. आणि वर झाकण म्हणून लंगडीत असा धपाटा लावायचा. धपाटा लुसलुशीत मउसर होतो तर थालीपीठ जरा कडक. कुरकुरीत होते.
असा फरक. ही सांगली कडची पद्धत आहे.

धपाटा लुसलुशीत मउसर होतो तर थालीपीठ जरा कडक. कुरकुरीत होते.>> माझ नेमक उलट होत Happy थालिपीठावर झाकण असत म्हणून वाफेमुळे थालिपीठ मऊ होत अस मला त्याच शास्त्रिय कारण वाटत. पण धन्यवाद. वेगळी पद्धत आणि माहिती आवडली.

वाह! बी, मस्त पाककृती.
हिवाळ्यात असा गरमा गरम धपाटा वर लोण्याचा गोळा घालून मटकवायचा आणि छान चादर घेऊन झोपी जायचं. सुख सुख ते हेच.

भाजणीचे थालीपिठ मी करते मेथी घालून पण कच्चीच घालते. ज्वारीच्या पिठाचे कसे लागतात? कधीच खाल्ले नाहीये. भाजणी कशी खमंग असतेना.

मेतकुट आयडीया मस्त.

मस्तच जमलाय आणि मेथीची भाजी पण छानच निवडली आहेस. मंद आचेबाबत माझेही तेच मत. मी तर सोनेरी रंग येईल इतपतच आच ठेवतो.

भाजणीचे थालीपिठ मी करते मेथी घालून पण कच्चीच घालते.>>>+१.
ही पा.कृ.मस्त वाटतेय.फ्रीजमधले पडीक मेतकूट, सत्कारणी लागेल.

बी मेतकुटाची आयडिया मस्तच आहे मी मेथीच्या भाजीत वेगवेगळी पिठे मिसळल्यावर मळण्या आधी त्यावर लोणच्याच्या खाराची थोडी धार सोडते ते पण चांगले लागते . आता हा प्रयोग करुन बघेन.
फोटो बघताच आपल्याला ही करता येईल असा विश्वास वाटतोय .

छान वाटतिय रेसिपी करुन बघणार.
मेतकुटचा वापर ब्रोकलिच्या सुप मधे केला आहे तेही छान लागते.
आता धपाटा करुन बघणार.

धपाटा मस्तच दिसतोय रे Happy बाकी सगळं जमेल, पण तुझ्या धपाट्याइतका खमंग भाजताही यायला हवा.

मी कधीच केला नाहीये. आता करून बघीन.

Ha dhapata bhakri sarakha pithavar thaplay tar tyala pani lavaycha ka? Ki telavar bhajaycha?

Pages