कवठाचे आंबील - उपवासाला चालणारे आणि पित्तनाशक

Submitted by हर्ट on 27 November, 2015 - 06:49
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

# पिकलेले पण भरीव कवठ
# उपवासाला करणार नसाल तर कोंथींबीर
# लाल मिरचीची पावडर अर्थात लाल तिखट
# जिरे
# चिरलेला गुळ कवठाला पुरेल इतका
# भाजलेल्या शेंगदाणे टरफल काढून - कुट अथवा अख्खे सोललेले दाणे चालतील
# मीठ
# तेल

क्रमवार पाककृती: 

१) सर्वप्रथम कवठ दणकण आपटून दोन भागात विभागून घ्यावे म्हणजे कवठाचा गर चमच्यानी खरडून काढता येतो.

२) गुळ चिरुन घ्यावा.

३) स्वच्छ मिक्सरमधे तळात आधी कवठाचा गर घालावा.

४) आणि ह्यात आता थोडी कोथींबीर, मग चिरलेला गुळ, मीठ, दाण्याचा कुट, तिखट हे सर्व घटक घालावे. (मी खालिल चित्रात दाण्याचा कुट नंतर घातला ते चित्र घेतले नाही पण कुट घालायचाच.)

५) हे सर्व मिश्रण मिस्करमधुन वाटून घ्यावे. वाटलेले मिश्रण खाताना रवाळ वाटायला (जाणवायला) हवे.

६) आता, गॅसवर मातिचे एक भांडे ठेवावे किंवा जाड बुडाची एखादी कढई/पातेलेही चालेल.

७) मातिच्या भांड्यात आता तेल तापवून त्यात आधी जिरे घालावे.

८) जिरे नीट तळल्या गेले की लगेच त्यात मिस्करमधील वाटण घालावे आणि मिक्सरमधे एक ग्लासभर पाणी घालून विसळून तेच पाणी पातेल्यात ओतावे. पळीने सर्वकाही एकजीन करावे.

९) वाढताना थोडी कोंथींबीर चुरडून आंबील वाढावे. ह्या चित्रामधे कोथींबीर बुडालेली आहे म्हणून दिसत नाही. हे आंभील छान दाट होत. पातळ सहसा होतचं नाही. हाच प्रकार थंडीच्या दिवसामधे तिळ घालून करावा कारण तिळ उष्ण असतात.

वाढणी/प्रमाण: 
६/७ वाट्या होतील
अधिक टिपा: 

१) आंबील जर उरले तर ते दुसर्‍या तिसर्‍या दिवशीही खाता येते. उलट चव मुरल्यामुळे ते अजून छान लागते.
२) तुम्हाला जर पित्ताचा त्रास होत असेल. अंगावर जर पित्त उठले असेल. लाल लाल गुंथा आल्या असतील तर त्यावर कवठ अगदी रामबाण उपाय आहे.

माहितीचा स्रोत: 
पिंकू
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव, तोंपासु दिस्तंय रे, प्रेझेंटेशन सुरेख..
कवठाचं सरबत असतं इतकंच माहित होतं..
ते मातीचं भांडं कसलं गोड आहे.. कुठून घेतलंयस?? भारतातून आणलं असशील तर सांग प्लीज कुठे मिळेल असं..
भार्रीच आवडलंय मला ते

वर्षूनील, हे मी इथे एका केरळी दुकानातून घेतले आहे. हल्ली मातिचे भांडे मिळणे इतके दुरापास्त नाही. पुण्यात पण मी पाहिले आहे मंडईत मागे फळा आणायला गेलो होतो त्यावेळी.

वॉव सुंदर. कृती, फोटो सर्वच.

कवठ फार क्वचित खाल्लेय तेपण चटणी. जास्त बघायला पण मिळत नाही इथे.

आमच्याकडे चालते कोथिंबीर उपासाला. बरेच जण महाशिवरात्रीला कवठाची चटणी करतात.

कवठ फार आवडीचे रे, पण भारताच्या बाहेर फक्त पुर्वेकडच्या देशातच मिळेल ( वूड अ‍ॅपल ) आमच्याकडे नाहीच मिळणार. पण आमच्याकडे गोरखचिंचा भरपूर, त्याचेच करेन.

आणि शेवटच्या फोटोत, मद्रासी कांद्याचा काय प्रकार केला आहेस ?

# उपवासाला करणार नसाल तर कोंथींबीर
>>
आमच्याकडे चालते कोथिंबिर उपवासाला
काहींकडे जिरे नाही चालत उपवासाला.

हे अंबील कशासोबत खातात? Uhoh

हो दिनेशदा, कवठ या नावाचं फळ पण असतं हे आजच कळलं. नाहीतर अंड्याचं आंबिल उपवासाला कसं चालू शकतं हा मोठाचं प्रश्न पडलेला मला.

पाकृ सोपी दिसतेय. आणि प्रेझेंटेशन पण सुरेख. Happy

हो इथे कणीस विपुल प्रमाणात मिळतात. वाफवून घेतले कि अजून टम्म दिसतात.

अकोल्यात कवठाची झाडे खूप आहेत. लहानपणी दगड भिरकवायला कावाठनीच शिकवले. पण, कधी हिंसा केली नाही.

ओह! सूप सारखं होय! करून बघायला हवं.
आम्ही फक्त कवठात गुळ घालूनच खाल्लंय जेंव्हा केंव्हा खाल्लंय तेंव्हा

कवठाच्या आतलं मांस थोडं अ‍ॅनिमिक दिसतंय. कच्चं होतं का कवठ? चांगलं पिकलं की गर आपोआप सुटा होतो कवटीपासून.

गूळ, कवठाचा गर, वगैरे मसाला मिक्सरमधून काढला, की न शिजवता डायरेक्ट चटणी म्हणूनही खाता येतो की.

वाह, खूपच मस्तं प्रकार दिसतोय.
कवठाची चटणी माहिती आहे पण हे आंबील फारच छान वाटतंय.

छान आहे पाककृती. मला खूप आवडते कवठ पण आमच्या येथे मिळत नाही आणि कवठाच्या सीझनमध्ये भारतात येणे होतेच असेही नाही.

श्रीखंड पाणी घालून पियुष करतात.

तसे कवठाची चटणी पाणी घालून शिजवून आंबील केले आहे.

असो. हे आंबिलीपेक्षा सूप या वर्गात बसु शकेल का ?

कोकणात अंड्यालाच कवठ म्हणतात.>>> उंहू, कवट म्हणताना ऐकले आहे.>> तुम्ही फक्त ऐकलेय, आम्ही कवठच म्हणतो.

कवठाच्या गराची पावडर वगैरे करतात का ? तसे असेल तर टिकाऊ असणार ती. इथे ती चव फार मिस करतोय.
नरसोबाच्या वाडीची बर्फी मात्र अति भडक रंगाची आणि मिट्ट गोड असते, खाववत नाही अगदीच.

पुण्यात, कोल्हापूर भागातही झाडे आहेत पण सर्वात चवदार मिळाली ती नेवाश्याला !

कवठाचे झाड श्रीरामपूरला बघितलं. आमच्या मालकांच्या दारात होतं. ते पहिल्यांदा महाशिवरात्रीला कवठ चटणी करायचे.

कवठ म्हणजेच बेलफळ. याची झाडे कोकणात / घाटावर सर्वत्र आढळतात, पण वापर माहित नसल्याने फळे तशीच पडून वाया गेलेली बघितली आहेत.

कवठ आणि बेलफळ वेगळे. नृसिंहवाडीची कवठाची बर्फी प्रसिद्ध आहे. पुण्याला शनिपाराजवळ चितळे या नावाचं लहानसं दुकान आहे. या दुकानात उत्तम कवठाची बर्फी मिळते.
कवट / कवठ हा अंड्यासाठीचा कोडवर्ड होता. अंडं खाल्लं हे घरातल्या ज्येष्ठांना कळू नये म्हणून कवट / कवठ म्हणत. हा शब्द या फळावरूनच आला आहे.

ओह्ह।।। चिनूक्स मला नेमके उलटे वाटलेले. आमच्याकडे अंड्यांना कवटे म्हणतात, अंड्यासारखे गोल म्हणून हे कवठ असे वाटलेले. आंबीलहि करता येते हे आज कळले.

पिकलेले कवठ दांन्नदिशी न आपटता थोडे हळू आपटले कि त्याला नुसती भेग पडते, त्या भेगेतुन तिखट मीठ आत ढकलून गॅसवर थेट ठेवायचे. गरम झाले कि मग दणण दिशी आपटून फोडायचे आणि आतला गर खायचा. इति मुलीच्या शाळेतील शिक्षिका.

Pages