शांत-अशांत

Submitted by पुरंदरे शशांक on 24 November, 2015 - 04:59

शांत-अशांत

घुसमटता अवघे रान
अवघडली पाने सारी
गोठला श्वास वार्‍याचा
त्या कलत्या सांजकिनारी

निश्चळता निथळत होती
झाडीत गर्द विणलेली
पक्ष्यांच्या पंखांमधूनी
थरथरता हिरावलेली

पायवाट एकुटवाणी
डोहाशी स्थिरावलेली
जललहरी विरामलेल्या
काठावर रेती ओली

किरकिरते रानही स्तब्ध
निस्तरंग सारी पाती
कोल्हाळ निमाला वरचा
अंतरात खळबळ होती .....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुन्दर!

ममो, प्रज्ञा, दिनेशदा, पद्मावति, भुईकमळ - सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार .... Happy

छान.