मी हिंदू आहे म्हणजे नक्की काय आणि कोण आहे? आपल्या हिंदू धर्माचे मुख्य प्रतिनिधी नक्की कोण?
इतर धर्मातील (उदा. बौद्ध, जैन, ख्रिस्ती, मुस्लीम, शीख, बहाई, पारशी) लोकांना त्यांच्या धर्माशी संबंधीत वरील प्रश्नाचे उत्तर देण्यात फार अडचण यायला नको. किंबहुना काही धर्मात थोडीफार तशी परिस्थिती असली तरी त्याचा येथे संबंध लावायला नको.
हिंदूंना मात्र लहानपणापासून याबाबतीत स्पष्ट मार्गदर्शन केले जात नाही. मी आतापर्यंत अनेकांना याबाबत विचारलेले आहे. त्यात १) काय फरक पडतो, २) मी द्वैतवाद वा अद्वैतवाद मानतो, ३) मी भगवद्गीता या ग्रंथाचा पूजक, ४) फार तर भगवद्गीतेबरोबर रामायण हाही माझा धर्मग्रंथ, ५) या भूमीत रुजलेला आणि वाढलेला सनातन धर्म, ६) हिंदू धर्माची व्याख्या करता येत नाही यातच त्याचे महानपण-वेगळेपण वगैरे आहे, ७) मी सर्वांना समान मानतो, ८) हिंदुत्व हा धर्म नसून ती एक जीवनशैली आहे अशी विविध उत्तरे मिळतात. अशा मोघम उत्तरांमुळे कोणाही जिज्ञासू व्यक्तीचे समाधान होणे शक्य नाही. उलट असे प्रश्न विचारून धार्मिक बाबतीतील तज्ज्ञ म्हणवणा-या सदर व्यक्ती त्यांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारले म्हणून नंतर फटकून वागतात किंवा भेटायचे टाळतात.
अशा परिस्थितीत येणा-या पिढ्यांना हिंदुत्वाबद्दल अनास्था वाटेल अशी परिस्थिती निर्माण होईल असे वाटत नाही का?
वरील मांडणीत जातीव्यवस्थेला (ज्याचे चातुर्वर्ण्य हे गोंडस नाव आजही वापरले जाते आणि क्वचित त्याचे समर्थनही केले जाते) कोठे स्थान आहे याचा सहसा कोणालाच पत्ता लागत नाही. सर्व शंकराचार्यांनी मिळून चातुर्वर्ण्य पद्धत मोडीत काढलेली आहे हे मात्र मधूनमधून ऐकू येते.
पुढचा प्रश्न: हिंदू धर्माचे प्रतिनिधी नक्की कोण?
शंकराचार्य म्हणावेत तर अतिशय कर्मठ अशी त्यांची प्रतिमा, सामान्य जनतेशी संपर्क शून्य, त्यातही अनेक पीठे आणि श्रेष्ठत्वावरून त्यांच्यामध्येच मधूनमधून होणारे वाद. हे प्रतिनिधी हिंदू समाजातील कोणत्या घटकांचे प्रतिनिधित्व करतात? त्यांच्यात दलित समाजाचे प्रतिनिधित्व करणारा एक जण तरी आहे का? की आरक्षण लागू नसल्यामुळे तेथेही फक्त उच्चवर्णीयांचे वर्चस्व आहे? आणि त्यामुळे समाजातील हे अनेक मोठे घटक या धर्मात सामावलेलेच नाही?
कोणाला प्रश्न पडेल निश्चितपणे कोण प्रतिनिधी आहे हे सामान्य हिंदू व्यक्तीला माहीत नसले तर काय फरक पडतो? तर फरक पडतो. हे आजवर कोणाच्या लक्षात आले नाही का? की विविध कारणांनी ‘जैसे थे’ परिस्थिती लादली गेली? जातीपातीमुळे संपूर्ण हिंदू समाज मुळात यांचे प्रतिनिधित्व नाकारतो हे कारण आहे का? धर्माचा इतक्या सहस्त्रकांचा डोलारा केवळ त्याच्या जडत्वामुळे (inertia) चालू आहे का अशी शंका यामुळे वाटते.
फरक का पडतो?
१) प्रतिनिधित्वाची भूमिका स्पष्ट नसल्यामुळे विविध बाबा-बुवा-महाराज यांचे फावते. प्रसंगी ते विविध अवतार अहेत म्हणून कमकुवत मनाच्या लोकांना आपल्या कच्छपी लावतात. हा प्रकार कल्पनेच्याही बाहेर बोकाळलेला आहे.
२) हिंदू धर्मात अनेक पंथ असल्यामुळे विस्कळीतपणा आणखी वाढतो. लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे. तर आम्हाला हिंदू धर्मातून वगळा ही या समाजातील काहींची मागणी मधूनमधून वृत्तपत्रात दिसते.
३) शीख, बौद्ध धर्मीय हेदेखील हिंदूधर्मीयच आहेत असे हिंदू त्या धर्मांच्या पोटच्या जिव्हाळ्यामुळे म्हणतात. परंतु या धर्मांची याबाबतची प्रत्यक्ष भूमिका वेगळी असते.
४) तेहेतीस कोटी देव ही संकल्पनाच मुळात चुकीची आहे असे अनेकदा ऐकतो. कित्येकदा कृष्णाच्या राधा वा गोपींबरोबरच्या शृंगाराचे वर्णन तिखटमीठ लावून सांगितले जाते तर तसे काही नव्हतेच असेही म्हटले जाते. कोणतीच सुसुत्रता नसल्यामुळे धर्म बदनाम होतो, चुकीच्या संकल्पना बोकाळतात.
५) हिंदूह्रदयसम्राट अथवा हिंदू या शब्दाचा समावेश असलेली तत्सम बिरूदे लावून घेऊन काही स्वयंघोषित नेते लोकांचा मानसिक गोंधळ वाढवतात. त्यांचे वा त्याच्या संघटनेचे अनेकदा होत असलेले धर्मविरोधी, झुंडशाहीचे आणि गुन्हेगारी स्वरूपाचे वर्तन पाहून हाच तो हिंदू धर्म का असा काहींचा समज होतो आणि हिंदू धर्माची त्यामुळे बदनामी होते. त्यात काही राजकीय लोकदेखील सामील असल्यामुळे अर्थातच राजकीय कारणांसाठी त्याचा वापर केला जातो.
६) राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या प्रमुख संघटना हिंदूंच्या हिताचे रक्षण करण्याचा दावा करतात. परंतु ती काही धार्मिक संघटना नाही. त्यामुळे त्यांना मोठाच राजकीय विरोध होत असल्यामुळे धर्माच्या पातळीवर हिंदू समाज विभागला जातो. विभिन्न राजकीय विचारसारणी असण्यात काहीच गैर नाही, परंतु त्यामुळे एकाच धर्मातील लोकांचे धृवीकरण होणे योग्य नाही, किंबहुना धर्मासाठी ते धोक्याचे आहे.
७) भगव्या रंगाचा ध्वज वापरून काही राजकीय संघटना/पक्ष लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. भगव्या रंगाचे कपडे घातलेले काही जण वारंवार वादग्रस्त विधाने करतात, त्यामुळे देशातील धार्मिक तेढ वाढते आणि देशाची प्रगती खुंटते.हे लोक खरोखरच हिंदूंचे प्रतिनिधित्व करतात का हे त्यामुळे शोधणे आवश्यक आहे.
८) अगदी अलीकडेच चालू झालेल्या गुढी उभारण्याच्या पद्धतीला धार्मिक स्वरूप देऊन त्याचेही शास्त्र निर्माण करण्यात येते आणि त्यामुळे भोंदूपणा वाढतो. अशा कितीतरी गोष्टी दाखवता येतील.
९) हिंदू धर्मियांमध्येच एकमेकांचा जातीय आणि जातीच्या आधारावरील तुच्छतेने सतत केला जाणारा उल्लेख एके दिवशी कोणते रूद्र रूप धारण करेल याचा नेम नाही. याबाबतील कितीही कायदे केले तरी धार्मिक आणि सामाजिक पातळीवर लोकांची मानसिकता बदलेपर्यंत हा बदल होणे शक्यच नाही. हा धोका असताना दुसरीकडे मात्र धार्मिक पातळीवर याची जबाबदारी कोण घेणार हेच निश्चित करता येत नाही.
१०) कोणतीच सुसुत्रता नसलयामुळे आपापल्या जातीपुरत्या संघटना निर्माण केल्या जाऊन धर्म सोयिस्करपणे वा-यावर सोडला जातो. यात जातीय कट्टरपणा वाढीला लागतो हे वेगळे सांगायची गरज नाही.
११) मी वर उल्लेख केल्याप्रमाणे समाजातील विविध घटकांना या प्रतिनिधींमध्ये समाविष्ट केलेच गेलेले नसेल तर आगामी काळात धर्मालाच त्यापासून मोठा धोका निर्माण होऊ शकेल.
१२) कोणी हिंदू धर्मातील प्रथांना विरोध करायला गेले तर ते काय सांगतात – का सांगतात, याकडे लक्ष देण्याऐवजी त्यांना इतर धर्मातील विसंगती दाखवण्याची त्यांची हिंमत आहे का असे म्हणून त्यांच्या भुमिकेवर धर्मविरोधी असा ठप्पा मारण्यात येतो. धार्मिक पातळीवर या गोष्टींचा योग्य त्या प्रतिनिधीकडून या बाबतीत काही निर्णय घेता आले तर कितीतरी गोष्टी संघर्षाच्या थराला जाणारच नाहीत. यामुळे समाजातील सौहार्द्रता वाढेल हे सांगायची गरज नाही.
१३) धर्माच्या प्रतिनिधित्वाबाबत काहीत निश्चित नसल्यामुळे विविध जातींमधील विविध पातळीवरील राजकीय नेतेच या जातींचे प्रतिनिधित्व करत असल्याचे दाखवून त्यावर आपली राजकीय पोळी भाजून घेतात. अलीकडे जातींच्या आधारावर मागितली जाणारी आरछणे त्यांपैकीच एक. धर्माच्या प्रतिनिधित्वाची संकल्पना निश्चित झाली तर अशा संधीसाधूंना आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे सतत गढूळ होणा-या सामाजिक वातावणाला पायबंद बसेल.
१४) आज देशातील मोठी लोकसंख्या धार्मिक जाणीवेच्या बाबतीत खरे तर निद्रिस्त आहे. मग ते सुशिक्षित वा अशिक्षित असोत वा गरीब असो. कारण रोजच्या जीवनसंघर्षातून त्यांना या गोष्टींचा विचार करायला वेळ नाही. पण यातील काही टक्के लोक तरी या गोष्टींचा डोळसपणे विचार करू लागले तर मोठी कठीण परिस्थिती उद्भवेल.
आणखी शोधल्यास अशी अनेक कारणे आढळतील.
असे झाले तर धर्माचे प्रतिनिधी एक प्रकारचा माफिया निर्माण करतील अथवा आचार-विचार स्वातंत्र्यावर गदा येईल असा समज करून घेण्याचे कारण नाही, कारण देशाची घटना, कायदे यांना यापासून धोका पोहोचणारच नाही.
कोणाला या बाबी गांभिर्याने घेणे गरजेचे आहे असे वाटत असेल तर त्यांनी यात जरूर भाग घ्यावा. फक्त त्यात जातीय/धार्मिक आवेश नको. कारण त्यामुळे चांगली चर्चा होऊ शकणार नाही आणि त्याला भलतेच वळण लागेल. शिवाय ज्यांना यातली तळमळ दिसते त्यांनी त्यांच्या परीने विविध पातळींवर या विषय न्यायलादेखील माझी काहीच हरकत नाही.
मला याची निकड वाटते. कारण या घडीला मी हिंदू आहे म्हणजे नक्की कोण व काय आहे हे मला सांगता येत नाही. कारण या बाबतीतली स्पष्टताच नाही. मग मी मला हिंदू का म्हणवून घ्यावे? एकविसाव्या शतकात याबाबतीत मोघमपणा परवडणार नाही. कारण वर उल्लेख केलेले धर्माच्या व देशाच्या एकतेला, सामाजिक सौहार्द्रतेला याबाबतच्या अनिश्चिततेमुळे त्यामुळे निर्माण होऊ शकणारे धोके. होऊ शकणारे काय, ते तर आपण रोजच पाहत आहोत.
ही पोस्ट चकाट्या पिटणा-यांसाठी नाही. तशी सवय असणा-यांच्या कमेंट्ना उत्तर देण्याची तसदी घेतली जाणार नाही. गांभिर्याने चर्चा करण्याची इच्छा असलेल्यांचे स्वागत व आगाऊ धन्यवाद.
चांगला धागा. चांगली चर्चा
चांगला धागा.
चांगली चर्चा वाचण्यास उत्सुक!
'जातीभेद आणि अस्पृश्यता' हा एक प्रकार हिंदु समाजात नसता तर मला स्वतःला हिंदू व्हायला आवडलं असतं.

एक धर्मग्रंथ नसणे, एक मुख्य धर्मगुरू नसणे, देव मानण्या- न मानण्याचे स्वातंत्र्य असणे, पूजा करण्या -न करण्याचे स्वातंत्र्य असणे, पूजा करायची असल्यास ती कशी करावी हे ही स्वतः ठरवता येणे या सगळ्या गोष्टी इतर धर्मांपेक्षा वेगळ्या असल्या तरी तेच हिंदुधर्माचे वैशिष्ट्यही म्हणता येईल.
एक धर्मग्रंथ आणि धर्मगुरू असणार्या धर्मांत सुद्धा पंथापंथांमध्ये शत्रूत्व, बुवाबाजी, अंधश्रद्धा हे सगळे तेवढ्याच प्रमाणात आहे जेवढ्या प्रमाणात हिंदूंत.
भोंदूपणा , आख्यायिका कोणत्या धर्मात नसतात?
बाकी एकविसाव्या शतकात धर्म आणि धार्मिकता यांबाबत जितका मोघमपणा येईल तितका चांगलाच आहे.
एखाद्या जुन्या आणि श्रीमंत नसलेल्या संस्थानिकांचे वंशज आता 'एक जमानेमे हम राजा हुआ करते थे' असे म्हणतात तसे आत्ताच्या लोकांनी 'पूर्वी आम्ही हिंदु/मुस्लिम्/ख्रिश्चन्/बौद्ध म्हणवले जायचो , आता मानवता हाच आमचा धर्म' असे म्हटलेले मला आवडेल.
मी हिंदू आहे म्हणजे माणूस
मी हिंदू आहे म्हणजे माणूस आहे
आणि मी हिंदू नसते उदा.बौद्ध,जैन,ख्रिस्ती, मुस्लीम, शीख, बहाई,पारशी कोणीही असते तरी माणूसच असणार होते
इतकचं पुरेस आहे
हिंदू धर्म = वैदिक सनातन
हिंदू धर्म = वैदिक सनातन धर्म
भगवा ध्वज हा मूळ भागवतधर्माची ओळख सांगतो. त्याचा आता संबंध राजकारणाशी लावला जातो त्यामुळे कधीकधी भागवतधर्माची विनाकारण बदनामी होते.
बाकी सातीला +१ (विशेषतः <<< आता मानवता हाच आमचा धर्म' असे म्हटलेले मला आवडेल.>>>> ह्यासाठी.)
मी हिंदू आहे म्हणजे नक्की काय
मी हिंदू आहे म्हणजे नक्की काय आणि कोण आहे?
मी हिंदु आहे कारण माझा जन्म ज्यांच्या पोटी झाला ते हिंदु आहेत आणि मी माणुस आहे.
आपल्या हिंदू धर्माचे मुख्य प्रतिनिधी नक्की कोण?
असे कोणी प्रतिनिधी असल्याचे कोणीही मला कधीही सांगितलेले नाही आणि असे कोणी असल्याने वा नसल्याने माझे आजवर कुठेही कधीही काहीही अडलेले नाही. आता कोणी येऊन सांगत असेल तर त्याच्याकडे मी दुर्लक्ष करेन. अमुकच एक कर असे मला आजवर धर्माचे नाव घेऊन कोणी सांगितलेले नाही. आता सांगत असेल तर सॉरीच.....
साती, हिंदू धर्मात सुसुत्रता
साती,
हिंदू धर्मात सुसुत्रता आली तर एकूण समाजाला त्याचा फायदाच व्हावा. तसेच त्यामुळे इतर धर्मांना त्यापासून धोका असेल असे मानायचे कारण नाही.
अंधश्रद्धा इतर धर्मांमध्येही नक्कीच आहे. मात्र ज्या अंधश्रद्धांमुळे समाजात व कुटुंबात बजबजपुरी माजली आहे त्यांची यादी करायची म्हटले तर हिंदू धर्मीय त्यात इतरांना फार मागे सोडतील. चिनी त्यातल्या त्यात बरोबर येतील.
मनाली,
मी-तुम्ही धर्मावर आधारित भेद करत नसलो तसा भेद होतो ही वस्तुस्थिती आहेच. शिवाय या पोस्टचा हेतु विविध धर्मांशी नाही तर केवळ हिंदू धर्माशी संबंधित समस्यांबद्दल उहापोह करण्याबद्दल आहे. मी ज्या मुद्द्यांची यादी केली आहे त्यापेक्षा इतरही आणखी काही मुद्दे असतील.
सातीशी सहमत एक धर्मग्रंथ
सातीशी सहमत
एक धर्मग्रंथ नसणे, एक मुख्य धर्मगुरू नसणे, देव मानण्या- न मानण्याचे स्वातंत्र्य असणे, पूजा करण्या -न करण्याचे स्वातंत्र्य असणे, पूजा करायची असल्यास ती कशी करावी हे ही स्वतः ठरवता येणे या सगळ्या गोष्टी इतर धर्मांपेक्षा वेगळ्या असल्या तरी तेच हिंदुधर्माचे वैशिष्ट्यही म्हणता येईल. >>> हेच तर हिंदु धर्माचे सौंदर्य आहे असे मी म्हणेन. जे चांगले आहे ते घ्या आणि जे वाईट आहे ते टाळा!! चांगले वाईट ठरविण्याचे स्वातंत्र्य सुद्धा आपल्याला आहेच. जितके नियमांत बांधले जाल तितका आपली सद्सदविवेकबुद्धी वापरण्याच्या स्वातंत्र्याला अडथळाच निर्माण होणार आहे.
सुमुक्ता, साधना, हिंदू
सुमुक्ता, साधना,
हिंदू धर्माची वैशिष्ठ्ये आपणा सा-यांनाच माहित आहेत. आपण थोडे टीकाकाराच्या भूमिकेतून पाहुयात म्हणजे 'फरक का पडतो' याखाली लिहिलेल्या मुद्द्यांवर उत्तर मिळू शकेल - शोधता येईल. अन्यथा काय होईल, सारे काही आलबेल आहे असा आपला समज तसाच राहिल आणि तसे खचितच नाही असे मला वाटते. आपल्यालाही वाटत असेल.
अन्यथा काय होईल, सारे काही
अन्यथा काय होईल, सारे काही आलबेल आहे असा आपला समज तसाच राहिल >>> असा कुणाचाही समज नसावा. हिंदू धर्मात कालपरत्वे घुसडल्या गेलेल्या अनिष्ट प्रथा कालपरत्वेच झुगारल्याही गेल्या आहेत, अजूनही जातील. ह्या विषयावर मायबोलीवर वेगवेगळ्या शिर्षकाखाली धागे निघाले आहेत आणि चर्चा/भांडणंही झाली आहेत. शोधा म्हणजे सापडतील.
अन्यथा काय होईल, सारे काही
अन्यथा काय होईल, सारे काही आलबेल आहे असा आपला समज तसाच राहिल >>> असा समज नाहीच आहे. पण चुकीच्या किंवा कालबाह्य झालेल्या रुढी आणि परंपरा झुगारण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकालाच आहे. एखादी नियमावली असती तर ते स्वातंत्र्य कधीच मिळाले नसते. उपयोग करून घेतलात तर धर्म evolve होण्याची पुष्कळ संधी आहे.
सातीशी सहमतच. मूळात मला धर्म
सातीशी सहमतच.
मूळात मला धर्म असलाच पाहिजे का ? आणि असला / नसला तर इतरांना त्याच्याशी काय देणे घेणे ?
मी अंघोळीसाठी कुठला साबण वापरावा हि जशी माझी खाजगी बाब आहे, तसाच धर्मही आहे. मी सार्वजनिक ठिकाणी वावरताना " स्वच्छ " असल्याशी कारण !
पॉप्कॉर्न आणा रे लवकर!!
पॉप्कॉर्न आणा रे लवकर!!
सुसूत्रतेचा फायदाव्ह
सुसूत्रतेचा फायदाव्ह व्हावा>>
सुसूत्रता म्हणजे काय? म्हणजे एक सर्वोच्च पीठ निर्माण व्हावे का?
एका धर्मगुरूचे सर्वांनी ऐकावे का? एकाच पुस्तकाला प्रमाण मानावे का?
असे सगळे झालेल्या उदाहरणार्थ कोणत्या धर्माने / पंथाने जगाचे भले झाले आहे.
उलट अस्व झाल्याने धार्मिक उन्माद वाढल्याची असंख्य उदाहरणे आहेत.
अशी सो कॉल्ड सुसूत्रता हिंदु धर्मात नाही हे ही या धर्माचे एक चांगले वैशिष्ट्यच आहे
इतकी विविध दर्शने, इतके वेगवेगळे विचार, इतके अध्यात्मिक स्वातंत्र्य ज्या धर्मात आहे (आत हे हिंदु धर्मात नाही, हिंदु शब्द नंतर झाला वगैरे बगैरे आहेच. आपण सध्या हिंदू समजल्या जाणार्या धर्मात म्हणू) त्यात सुसूत्रतेच्या नावाखाली निरसता आणि एकाधिकारशाही आणायचीय का?
हे असं होऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे.
सुमुक्ता, दिनेश, या त्रुटींचा
सुमुक्ता, दिनेश,
या त्रुटींचा गैरफायदा घेणारे आपल्यासारखे असतात का? 'फरक का पडतो' मध्ये याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे या प्रकारांचा वैयक्तिक पातळीवर विचार करून चालणार नाही. यातले काही मुद्दे तर असे अाहेत की त्यंकडे दुर्लक्ष केले तर ते येत्या काळात आपल्या दारासमोर आव्हान उभे करतील.
खाजगी अनूभव लिहीले तर चालतील
खाजगी अनूभव लिहीले तर चालतील काय?
एक दिवस मला देशाचा सेवक बनवा.
एक दिवस मला देशाचा सेवक बनवा. सगळे धर्म बंद करून टाकतो. जे काही असेल ते घरात आणि मनात.
त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे रवंथ करत केल्या जाणा-या चर्चांना ब्रेक बसेल. दंगली बंद होतील. निवडणुकीतील प्रचार मर्यादीत होईल. विद्वेष कमी होईल.
वात आलाय नुसता.
उदा कुठ्ले मुद्दे?
उदा कुठ्ले मुद्दे?
भ्रमर हे मला उद्देशुन आहे का?
भ्रमर हे मला उद्देशुन आहे का? म्हणजे मुद्दे वगैरे. कारण काही वेळेस मला एखादी गोष्ट जर क्लिअर कट सान्गता येत नसेल तर मला उदाहरणे देणे आवडते म्हणून विचारले.
हिंदु धर्मात मुख्य ह्या जाति
हिंदु धर्मात मुख्य ह्या जाति आहेत.एक हिंदु दुसर्या हिंदुशी विनासायास लग्न करु शकत नाही.प्रत्येक जात ही आपल्याच कोषात वावरते.हिंदु धर्म हा नावापुरता असुन प्रत्येक जात हाच धर्म आहे.मुस्लिमांचा द्वेष करताना व्यक्ति हिंदु असते तर इतर जातींचा द्वेष करताना उच्चवर्णिय.कोणाचा कोणात पायपोस नाही.ठिगळाठिगळांची घोंगडी होउन बसलीय.
'एक जमानेमे हम राजा हुआ करते
'एक जमानेमे हम राजा हुआ करते थे' असे म्हणतात तसे आत्ताच्या लोकांनी 'पूर्वी आम्ही हिंदु/मुस्लिम्/ख्रिश्चन्/बौद्ध म्हणवले जायचो , आता मानवता हाच आमचा धर्म' असे म्हटलेले मला आवडेल.
>>
ज्यांच्या मनात आपल्या धर्माबद्दल अभिमान वा थोडासा सुप्त अहंकार आहे, आणि जे अगदीच कट्टर नाहीत त्यांनाही हे आवडेलच.
पण प्रत्यक्षात हे घडायला एखादे हिमयुग येऊन मानवजात नष्ट होऊन पुन्हा नव्याने जन्मावे लागेल
मूळात मला धर्म असलाच पाहिजे का ? आणि असला / नसला तर इतरांना त्याच्याशी काय देणे घेणे ?
>>
प्रॉब्लेम असा आहे की आपण आपला धर्म नाही सांगितला तरी आपल्या आईवडील वा पुर्वजांचा जो असतो तो आपोआप जोडला जातो.
पण चुकीच्या किंवा कालबाह्य झालेल्या रुढी आणि परंपरा झुगारण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकालाच आहे>> हिंदू धर्मात हे तुलनेत सोपे आहे म्हणता येईल. पण तुलनेतच. असे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे असाही नियम नाही
समजा एखाद्या उच्चवर्णीयाला जातपातच झुगारून द्यायची असेल, तर मी जात पात मानत नाही असे म्हणत खालच्या जातीतील समजले जाणार्यांच्या गळ्यात हात टाकू शकतो.
पण कोणी खालच्या जातीतला असेल तर तो हा जातपात झुगारून द्यायचा मनाचा मोठेपणा दाखवू शकतो का
अर्थात पहिल्याच प्रतिसादात साती यांनी म्हटल्याप्रमाणे जातपात वगळता (ती ईतर धर्मात किती कमीजास्त प्रमाणात असते कल्पना नाही) हिंदू धर्म बरेच बाबतीत चांगला आहे. तो आणखी चांगला होणे याचाच अर्थ जगातील कित्येक करोडो लोकांचे जीवनमान आणखी चांगले होणे.
रश्मी, अनुभव जरूर शेअर करा.
रश्मी,
अनुभव जरूर शेअर करा.
इंटरेस्टिंग धागा! एक
इंटरेस्टिंग धागा!
एक धर्मग्रंथ नसणे, एक मुख्य धर्मगुरू नसणे, देव मानण्या- न मानण्याचे स्वातंत्र्य असणे, पूजा करण्या -न करण्याचे स्वातंत्र्य असणे, पूजा करायची असल्यास ती कशी करावी हे ही स्वतः ठरवता येणे या सगळ्या गोष्टी इतर धर्मांपेक्षा वेगळ्या असल्या तरी तेच हिंदुधर्माचे वैशिष्ट्यही म्हणता येईल. >>> साती - हे आणि नंतरच्या दुसर्या पोस्टशीही सहमत.
हिंदू आणि हिंदू धर्म दोन्ही
हिंदू आणि हिंदू धर्म दोन्ही वेगवेगळे धरुया.
हिंदू असणे म्हणजे माझे पूर्वज हे सिंधू नदी काठचे म्हणून मी हिंदू.
त्यांच्या 'रेस लाईन' मध्ये माझा जन्म झाला म्हणून मी हिंदू आहे.
हिंदूंनी बनवला तो आचार्,विचार्,नियम वगैरे वगैरे( सोयीस्करपणे) त्याची काही दिक्षा-दंड-नियमावली बनली...पुढे पुस्तक-ग्रंथ-पंथ बनले,अधिकारी आले.तो हिंदू धर्म.
सिंधू नदीच्या काठावरचा प्रत्येक जण हिंदूच.ज्यांनी त्या धर्माचं आचरण (कळत-नकळत )केले तो हिंदू धर्मीय.
साती म्हणतात त्याप्रमाणे स्वातंत्र्य-निवडीचं स्वातंत्र्य असणं हेच महत्वाचं.
हा धागा आवडला.त्यात सातींचा
हा धागा आवडला.त्यात सातींचा पहिला प्रतिसाद अतिशय आवडला.
हिंदू धर्मात सुसुत्रता आली तर एकूण समाजाला त्याचा फायदाच व्हावा>>>>> हे कठीणच आहे.पण त्याहीपेक्षा बंदिस्त केल्यास संकुचितपणा वाढेल.
बाकी मी हिंदू आहे, कारण माझे आईवडिल हिंदू होते.देव, मानणे - न मानणे ,त्याची/ तिची पूजाअर्चा करणे -न करणे किंवा अशा इतर बर्याच गोष्टी करण्याची मुभा मला आहे.
मी हिंदू आहे म्हणजे नक्की काय
मी हिंदू आहे म्हणजे नक्की काय आणि कोण आहे?
>>
सिंधूच्या दुसऱ्या किनाऱ्यावर राहणारे हिंदू .....
आपल्या हिंदू धर्माचे मुख्य प्रतिनिधी नक्की कोण?
>>
कोणीही नाही.
गुढी उभारणे ज्ञानेश्वरकाळापासून आहे. आता अर्थात ज्ञानेश्वर अलीकडील संत मानत असाल तर गुढी उभारणे अलीकडील प्रथा मानण्यास हरकत नाही.
बाकी मुद्द्यांशी बऱ्याच अंशी सहमत!
भारताला हुकूमशहाची गरज आहे हे
भारताला हुकूमशहाची गरज आहे हे अतिरेकी संघटनांचं मत काही प्रमाणात मान्य केलं तर हुकूमशहाकडून माझ्या खालील अपेक्षा आहेत.
१. आपल्या मुलावर जबरदस्ती आपली जात व धर्म लादणा-या पालकांना कठोर शिक्षा करण्यात येईल. मुलाला जात व धर्म निवडण्याचे वा नाकारण्याचे स्वातंत्र्य असायला हवे.
२. मुलाला स्वतंत्रपणे निर्णय घेता यावा यासाठी वेगळ्या तटस्थ समुपदेशन केंद्रांना मान्यता देण्यात येईल. त्यात जात व धर्म आवश्यक आहेत का इथपासून ते अस्तित्वात असलेले धर्म , त्यांचे तत्त्वज्ञान यांचे शिक्षण देण्यात येईल. कदाचित हे शिक्षण शाळेमधूनच देण्यात येईल.
३. धर्म नाकारणा-यांना वेगळ्या सोयी सवलती देण्यात येतील. त्यासाठी विशेष प्रोत्साहन योजना राबविण्यात येतील. धर्मांचा अभ्यास करण्यासाठी कुठल्याही धर्माचा अनुयायी असणे गरजेचे असणार नाही.
४. जीवनपद्धती, कर्तव्ये व धार्मिक संघटना यातला फरक सरकारी प्रचारात सांगितला जाईल.
५. वाद घालणा-या नागरिकांचे नागरिकत्व रद्द करण्यात येईल.
६. एकदा का जात धर्म नष्ट झाले की त्यावरून सुरू असणा-या योजना आपोआपच रद्द होतील.
७. सार्वजनिक जागेतील धार्मिक मिरवणुका व सार्वजनिक सोहळे यांच्यावर निर्बंध आणण्यात येतील.
८. तत्त्वज्ञान व चर्चा यासाठी विशेष विद्यापीठे निर्माण करण्यात येतील. विद्वान लोकांनी अशाच ठिकाणी चर्चा केल्या पाहीजेत हे पाहीले जाईल. चर्चेत सहभाग घेणा-यांच्या पात्रतेबाबत कडक दंडक घालण्यात येतील. अशा चर्चा नागरिकांना ऐकता येतील.
काही दिवस असे घोडेछाप धोरण अवलंबल्यानंतर निर्बंध सैल करण्यात येतील. नागरिकांमधे पुरेशी प्रगल्भता निर्माण झाल्यानंतर हुकूमशाही मागे घेण्यात येईल.
यातले काही मुद्दे तर असे
यातले काही मुद्दे तर असे अाहेत की त्यंकडे दुर्लक्ष केले तर ते येत्या काळात आपल्या दारासमोर आव्हान उभे करतील. >> कोणते मुद्दे???
नियमावली, सुसुत्रता ह्यामुळे फायदा न होता निष्कारण धर्मांध लोकांच्या संख्येत वाढ होईल हे माझे मत आहे. हिंदु लोक धर्मांध नसतातच असे माझे म्हणणे नाही पण उगीच त्यांची संख्या का वाढवा???
पण चुकीच्या किंवा कालबाह्य झालेल्या रुढी आणि परंपरा झुगारण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकालाच आहे>> हिंदू धर्मात हे तुलनेत सोपे आहे म्हणता येईल. पण तुलनेतच. असे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे असाही नियम नाही >>> स्वातंत्र्य सगळ्यांनाच आहे हिम्मत आहे की नाही हे वैयक्तिक पातळीवर ठरते
पगारे साहेब, कश्याच्या
पगारे साहेब, कश्याच्या आधारावर म्हणताहात केवळ हिंदूमधेच जाति आहेत ? भारतातील मुसलमान आणि ख्रिचनांचीही सोयरीक कशी जुळते ते बघा नक्की.
जगाचा इतिहास जातींमुळेच
जगाचा इतिहास जातींमुळेच घडला.
ताजं उदा.इसिसचंच आहे.
हिंदू धर्म जातीमुळे तरला आहे असं म्हणा.बाकी तसंही उरलं सुरलं टाकाऊ झालेलं आहे.जात सोडली तर हिंदू धर्मातल्या कित्येक बाबी त्याज्य केल्यात.
इतर धर्मातही जाती आहेतच मात्र
इतर धर्मातही जाती आहेतच मात्र ६००० जाती असलेला हा धर्म अद्वितियच आहे. कुराण मानणारा मुसलमान, बायबल मानणारा ख्रिश्चन पण हिंदुंचे काय दहा जण दहा वेगळे ग्रंथ सांगतील.यावर कोणी असे उत्तर देइल की हेच तर वैशिष्टय आहे मात्र तो भ्रम आहे.वर्णवर्चस्व राखण्याच्या नादात इतके लिखाण झाले कि नस्ता गोंधळ झालाय एक वेगळीच खिचडी तयार झालिय.
जातींमुळे इथे डोंबारीही आहेत,
जातींमुळे इथे डोंबारीही आहेत, वाघ्या,मुरळी, पोतराज, हागणदरीत राहणारे भटकेही आहेत.खरच जातिंमुळेच हिंदुधर्म तरलाय रोहन....
Pages