बाजीराव मस्तानी - पिंगा ग्ग पोरीच्या निमित्ताने ...

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 November, 2015 - 15:19

बाजीराव मस्तानी या संजय लीला भन्सालीच्या बहुचर्चित सिनेमांतील ‘पिंगा ग्ग पोरी’ हे गाणे नुकतेच यू ट्य़ूब वर झळकले.

इथे ते गाणे बघू शकता - https://www.youtube.com/watch?v=xz-Vac75to4

आणि बस्स यावरूनच फेसबूक, व्हॉटसप, आणि मराठी सोशलसाईटसवर वाद सुरू झाला.
(खरे तर बाजीराव पेशव्यांच्या भुमिकेसाठी AIB फेम रणवीर सिंगला घेतले तेव्हाच मला खटकले होते, पण ते एक असो)

मुळातच बाजीराव पेशवे हे त्यांच्या पराक्रमासाठी प्रसिद्ध असण्यापेक्षा बाजीराव मस्तानी या प्रेमप्रकरणासाठीच जास्त प्रसिद्ध. एकाअर्थी हे दुर्दैवीच. पण बरेचदा ईतिहासातील काही जोड्या अश्याच प्रसिद्ध होतात. उदाहरणार्थ, अकबर राजा काय कोण होता हे माहीत असायच्या आधीच आपल्याला तो “अकबर-बिरबल’ म्हणून समजतो. पुढे त्यावर चित्रपटही ‘जोधा-अकबर’ नावाने निघतो.

असो, या निमित्ताने का होईना, भले बाजीराव मस्तानी यांची प्रेमकथा ही केंद्रस्थानी असली तरी बाजीराव पेशव्यांचा ईतिहास चित्रपटाच्या सशक्त माध्यमातून जगभर पोहोचणार आहे. पण इथे एक प्रश्न उभा राहतो ते त्या ईतिहासाची चीरफाड तर होणार नाही ना. कारण ऐतिहासिक चित्रपट म्हणजे काही ‘देवदास’ नाही जे भन्साली सिनेमॅटीक लिबर्टी वापरून मूळ ईतिहासाशी फारकत घेणारी पटकथा लिहितील. आता हे असे झालेय की नाही हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजेल. सेन्सॉरची परवानगी मिळाली म्हणजे त्यांच्यामते काही गैर नसावे. अर्थात सेन्सॉर हा मुद्दा लक्षात घेतात की नाही हा आणखी एक चर्चेचा विषय होईल कारण त्यासाठी त्यांना स्वत:ला ईतिहासाचा अभ्यास करावा लागेल आणि त्यातून खराखोटा ईतिहास शोधावा लागेल. जे हल्ली फार कठीण काम झालेय.

तर आता पिंगा ग्ग गाण्याकडे वळूया,

देवदासमध्ये पारो आणि चंद्रमुखी एकत्र नाचताना दाखवल्या होत्या. डोला रे डोला गाणे हिट झाले होते. या गाण्याचा फायदा चित्रपट चर्चेत आणायला आणि हिट करायला झाला. बस्स पुन्हा एकदा हाच फॉर्म्युला वापरत भन्सालींनी यात ‘मस्तानी आणि काशीबाई’ यांचे एकत्रित नृत्य ठेवले आहे. बहुधा इतिहासात अश्या नाचाचा संदर्भ असावा असे वाटत नाही. त्यामुळे नक्कीच हे सिनेमेटिक लिबर्टीमध्येच येते. सिनेमा डॉक्युमेंटरी सारखा बनवण्यापेक्षा प्रमोशनसाठी असे एखादे गाणे बनवून त्यात कमर्शिअल फॅक्टर जोडल्यास तो सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, पर्यायाने बाजीराव पेशव्यांचा ईतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, असा विचार केल्यास यात फारसे काही चुकीचे वाटत नाही. (आता चित्रपट बनवणार्‍यांचा हेतू ईतिहास सर्वदूर पोहोचवणे आहे की पैसा कमावणे आहे हे तुर्तास बाजूला ठेऊ. कारण चित्रपट बघायला येणारे प्रेक्षकही ईतिहास बघायला येणार आहेत की प्रियांका, दिपिका आणि भव्यदिव्य सेटस बघायला, हा देखील मग संशोधनाचा विषय होईल.)

तर पिंगा ग्ग पोरी या गाण्यात सिनेमॅटीक लिबर्टी घेत पैसा कमवायच्या नादात पेशवेकालीन संस्कृतीची वाट लावली आहे असा ओरडा गेले दोन दिवस सगळीकडे दिसत आहे. उत्सुकतेने आज वेळ मिळताच मी हे गाणे यूट्यूबवर पाहिले. गाणे सुरू झाले आणि थोड्यावेळासाठी मी विसरून गेलो की मी नक्की कश्यासाठी हे गाणे बघायला आलोय. उत्कृष्ट कोरीओग्राफ केलेले गाणे, दोघींचेही लाजवाब दिसणे आणि तितकेच दिलखेचक नृत्य. सोबत संगीतही चांगले असल्याने गाण्याचा मी पुरेपूर आनंद उचलला. जर यातील पेशवेकालीन संदर्भ क्षणासाठी विसरून गेलो तर त्यात काहीही आक्षेपार्ह वाटले नाही, वाटूही नये.

त्यानंतर मग मी उठलेल्या वादाला अनुसरून पुन्हा एकदा ते गाणे पाहिले, पण तरीही काही ठिकाणी जशी टिका वाचून आलेलो की गाणे फार उत्तान झालेय तसे काही आढळले नाही. कदाचित प्रत्येकाचा उत्तानपणाचा बेंचमार्क वेगळा असावा किंवा टिका करणारा पेशवेकालीन संस्कृतीचा बेंचमार्क डोळ्यासमोर ठेवून बोलत असावा. आता त्या गाण्यातील साडी वा दागिने वगैरे त्या काळात मुळी असे घालायचेच नाहीत अश्या वादात मला रस नाही, पण काहीतरी वल्गर, असभ्य, असंस्कृत दाखवल्याच्या आवेशात जी टिका कुठेकुठे पाहिली त्यात तेवढेही तथ्य वाटले नाही.

मी माझे हे प्रामाणिक मत तितक्याच निरागसपणे एके ठिकाणी मांडताच मलाही त्यावर टिका झेलावी लागली. अर्थात कोणाच्या भावना कुठे दुखावतील हे आपण सांगू शकत नसल्याने त्या भावनांचा आदर ठेवत मी मनात कोणाबद्दल राग ठेवला नाही. तसेच कोणाला माझ्या मताचा राग आला असल्यास त्याबद्दल मी देखील क्षमस्व. कदाचित मी पेशवेकालीन संस्कृती आणि तेव्हाची नृत्यसंस्कृती याबद्दल अनभिज्ञ असेल असेही असू शकते. त्याकाळाचा विचार करता खरेच एखाद्याला ते संतापजनक वाटू शकते. मात्र आणखीही चार भिन्न प्रवृत्ती आणि विचारांच्या माणसांची मते जाणून घेऊया म्हणून हा विषय मायबोलीवर आणत आहे.

पिंगा ग्ग पोरी सारख्या गाण्यात किंवा पिंगा ग्ग पोरीच्या निमित्ताने ऐतिहासिक चित्रपटात सिनेमॅटीक लिबर्टी घेणे कितपत योग्य अयोग्य?
आणि एखाद्या दिग्दर्शकाने ती घेतलीच, तर पुढे काय?

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेटेस्ट बॉक्स ऑफिस रिपोर्टप्रमाणे 'दिलवाले' झकास चाललाय...बाजीराव मस्तानी मात्र दिलवालेच्या मागे पडलाय. त्यातल्या त्यात मुंबई पुण्यात बाजीराव मस्तानी दिलवालेला टक्कर देऊ शकलाय पण इतरत्र (India+international) लोक दिलवालेला पसंत करत आहेत.

ही एक नवीन माहिती मिळाली. थेट इथे वाचू शकता http://www.lokprabha.com/20090220/vss01.htm

किंवा इथे खाली:

काही प्रेमकहाण्या अजब असतात हे खरं. बाजीराव आणि मस्तानी यांची प्रेमकहाणी यातलीच. त्यांच्या प्रेमाविषयी कोणी बोलतच नाही. बोललं जातं ते मस्तानीच्या प्रेमाला हिणवणारंच. मस्तानी म्हणजे बाजीरावाची रखेल, हाच गैरसमज पक्का झालाय. पण, याची एक दुसरी बाजूही आहे.
डॉ. यशवंत रायकर

भारतीय इतिहासात बऱ्याच प्रेमकहाण्या प्रसिद्ध आहेत. ढोला-मारू, दलपतराय-दुर्गावती, रझिया सुलताना-याकुत, जोधा-अकबर, सलीम-अनारकली व बाजीराव-मस्तानी. त्यात ऐतिहासिकता किती हा भाग वेगळा. पण या युगलांचे प्रेम सर्वाधिक कौतुकास पात्र होऊन हिंदुस्थानी अंत:करणात चिरंतन स्थान मिळवून आहे हे खरे. वरील सर्व प्रेमकथांमध्ये एक समान सूत्र आढळते. प्रेम करण्याचे निसर्गदत्त स्वातंत्र्य विरुद्ध प्रस्थापित समाज व्यवस्था असा संघर्ष! मात्र बाजीराव-मस्तानीची कहाणी अनेक कारणामुळे त्यात वेगळी व अद्वितीय ठरते.
ब्राह्मण व मुसलमान या दोन मानवनिर्मित ध्रुवांच्या मीलनाची ती कथा आहे, तशीच पराजयाची व्यथा आहे. हृदय पिळवटून काढणारी शोकगाथा आहे. त्यातील दोन्ही बाजू आपापले सांस्कृतिक वेगळेपण, धर्मस्वातंत्र्य व आत्मसन्मान अबाधित राखून वैवाहिक सहजीवन जगण्याचे धाडस दाखवितात. नतिक बळावर खंबीरपणे उभ्या ठाकतात. सन्मामार्गापासून कधी ढळत नाहीत. कर्तव्यनिष्ठा सोडत नाहीत. पण या जगावेगळ्या संबंधाला सामाजिक मान्यता मिळावी म्हणून धडपडतात. सर्वसाधारणपणे अशा प्रेमकथा प्रेमिकांच्या मृत्यूनंतर संपतात. पण बाजीराव-मस्तानीच्या स्मृतीपुढे नियती ओशाळते, त्यांच्या निष्कलंक प्रेमाला मुजरा करते आणि एका न भुतो न भविष्यती अशा नाटय़ाला जन्म देते. कोकणस्थ ब्राह्मण पेशवे परिवाराची एक अधिकृत निष्ठावंत मुसलमान शाखा जन्मास येते. भट घराण्याचा वंश भाऊबंदकी व गद्दारीने संपला, पण पेशवाईशी कधीच बेईमान न झालेली मुस्लिम शाखा अजून टिकून आहे.
तरीपण समज, गैरसमज, अपसमज, गैरमाहिती, अफवा, विपर्यास यांची ती एक न संपणारी कहाणी आहे. उत्तर पेशवाईतील बखरकार, नंतरचे इतिहासकार, आधुनिक कथा-कादंबरीकार यांनी मस्तानीला अनुदात्त स्वरूप बहाल केले व तेच लोकमानसात कायमचे रूजले. वास्तविक बाजीरावाने तिला रखेल मानले असते तर कदाचित बरेच प्रश्न मिटले असते. पण त्या रामाच्या नजरेत ती सीता होती म्हणूनच पुढचे रामायण घडले. विसाव्या शतकाअखेर मस्तानीला न्याय मिळवून देण्यासाठी झटले ते द. ग. गोडसे. रंग, रेषा, शिल्प, सूर, ताल व शब्द यांच्या विश्वात मस्त असलेल्या व्यासंगी चित्रकाराने मस्तानीचा ध्यास घेतला. त्यांच्या मस्तानी (१९८९) या ग्रंथाला न. चिं. केळकर पारितोषिक मिळाले. मात्र अजूनही मस्तानीची ओळख बाजीरावाची रखेल अशीच केली जाते. त्यामागे अज्ञान, हलगर्जीपणा खेरीज आणखी एक कारण संभवते. त्यातील कामुकतेचा वास माणसाच्या सुप्त मनाला गुप्तपणे सुखावत असावा. अशा पाश्र्वभूमीवर ही प्रेमकहाणी ऐतिहासिक तपशिलात न शिरता समजून घेऊ.
मस्तानी ही बुंदेलखंडचा राजा छत्रसाल याची अनौरस कन्या. बुंदेलखंड म्हणजे ढोबळपणे यमुना व नर्मदा यामधील लहान लहान पर्वत टेकडय़ांचा प्रदेश. मराठय़ांना दिल्लीवर वचक ठेवण्यासाठी माळव्यानंतर बुंदेलखंडात पाय रोवणे आवश्यक होते. छत्रसाल हा मध्ययुगीन इतिहासातील एक महापुरुष. शिवाजी महाराजांपासून स्फूर्ती घेतलेला. शिवाय तो प्रणामी पंथाच्या प्राणनाथ प्रभूंचा शिष्य होता. या एकेश्वरी पंथात जातपात, हिंदू-मुसलमान असा भेद नसे. अनुयायांना आपापली उपासना पद्धती चालू ठेवण्याचे स्वातंत्र्य होते. जात व धर्म यांच्यावर उठून जनकल्याण साधण्यासाठी सत्ता राबविणे व मोगलांच्या आक्रमणाला खंबीरपणे तोंड देणे हे त्याचे धोरण होते. राजकीय सोयरिक म्हणून त्याने अनेक लग्ने केली. त्याच्या विजातीय उपपत्न्यांपासून झालेल्या अपत्यांनाही जहागिऱ्या दिल्या जात.
अशाच एक यवनी उपपत्नीची लावण्यवती हुशार कन्या मस्तानी. राजकन्येला साजेसे शिक्षण तिला मिळाले. शिवाय प्रणामी पंथाच्या धार्मिक वातावरणात ती वाढली. मस्तानी हे नावसुद्धा अध्यात्मिक अर्थाचे आहे. मूळ अरबी शब्द मस्तान. त्याचे स्त्रीलिंगी रूप मस्ताना. मस्तानाचे हिंदीकरण मस्तानी. मस्तान म्हणजे ईश्वरभक्तीत धुंद असलेला, तणावमुक्त अवस्थेच्या आनंदात हरवलेला. पण मस्तानी म्हणजे यौवनाने मुसमुसलेली असा काहीसा अर्थ लावला गेला. कंचनी, रखेल अशी प्रतिमा उभी करण्यास तो सोयीचा ठरला असावा.
मस्तानी बाजीरावाकडे येण्यास राजकीय कारण घडले. १७२९ साली छत्रसाल मोठय़ा संकटात सापडला. मोगल सुभेदार महंमद बंगश भल्या मोठय़ा फौजेसह बुंदेलखंडावर चालून आला. तेव्हा कवी असलेल्या या वयोवृद्ध राजाने बाजीरावाला मदतीसाठी दिलेली हाक प्रसिद्ध आहे.
जोगन गाह गजेंद्रकी, सो गत भई है आय।
बाजी जात बुंधेलनकी, राखो बाजीराय।।
दंतकथा सांगते की, फकिराच्या वेशातील छत्रसालाचा हेर वरील दोहा करुण स्वरात गात शनिवारवाडय़ाभोवती फिरत होता. बाजीरावाच्या कानावर ती हाक पोहोचली अन् दुसऱ्या दिवशी तो बुंदेलखंडाकडे रवाना झाला. आपल्या सेनेसह हा सेनानी ‘बावीस दिवसांत’ महंमद बंगशपासून ‘बावीस’ मैलांवर येऊन थडकला. वेगवान हालचाली व लष्करी डावपेच यात बाजीरावाचा हात धरणारा त्या काळात दुसरा कोणी नव्हता. बंगश कोंडीत पकडला गेला. पराभूत अवस्थेत तो दिल्लीला परतला. छत्रसाल कृतज्ञतेने भारावला, धन्य झाला. तरी बुंदेलखंडावरचे संकट कायमचे टळलेले नव्हते. म्हणून वयोवृद्ध राजाने आगामी सुरक्षेसाठी राज्याचे तीन भाग केले. दोन आपल्या औरस पुत्रांना दिले व तिसरा पुत्रवत मानलेल्या बाजीरावाला जहागिरी म्हणून दिला. कधीही संकट आले तरी धावून येणे ही अट होती. यामुळे मराठय़ांना हवी होती ती संधी लाभली, पण त्याखेरीज आणखी बरेच काही घडले. छत्रसालाने आपली लाडकी कुबल सूरत कन्या बाजीरावाला अर्पण केली. त्यांच्या विवाहाची माहिती उपलब्ध नाही म्हणून तिला रखेल ठरविता येत नाही. तेव्हा बाजीराव विवाहित होता तरी दुसरे लग्न करण्यात त्या काळात अडचण नव्हती. बाजीरावाने पत्नी म्हणून मस्तानीचा स्वीकार केला, असे दिसते.
बाजीराव हे असामान्य व्यक्तिमत्त्व होते. देखणा, धाडसी, शूर, रसिक, जीव धोक्यात टाकायला तो कधी कचरला नाही. अश्वारोहणात सर्वश्रेष्ठ. लढाईत त्याला पराभव माहीत नव्हता. राजकारणात अपयश आले नव्हते. सत्यवचनी, प्रामाणिक, ‘पोख्तकारी’, ‘चलनसाहेब फौज’ (केव्हाही मोठी फौज उभी करू शकणारा) असा त्याचा लौकिक होता. निजामासारखे शत्रूसुद्धा त्याचा आदर करीत. निजाम म्हणे, ‘एक बाजी, बाकी सब पाजी’. बाजीरावाची एकच बाजू लंगडी होती ती पैशाची. त्याच्या मागे सावकारांचा तगादा असे. तो ब्राह्मणी आचार पाळीत नसे. मांसाहार, मद्यपान, धूम्रपान यात त्याला पाप दिसले नाही. त्याने निर्माण केलेल्या सरदारांची यादी काढली तर त्यात अनेक जातींची नावे आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांना कुठेही झुकते माप नाही. जात नष्ट होत नसते, पण जातीच्या वर उठता येते व त्यामुळे काय साधता येते हे त्याने दाखवून दिले.
१७३० मध्ये मस्तानी पुण्यास आली तेव्हा १७ वर्षांची होती व बाजीराव तिशीतला. तिचे स्वागत कसे झाले हे कळत नाही. पण बाजीरावाने शनिवारवाडय़ाजवळ तिच्यासाठी स्वतंत्र हवेली बांधली तेव्हापासून तक्रारी सुरू झाल्या असाव्यात. पुढे शनिवारवाडय़ाभोवती कोट उभारला गेला. तेव्हा मस्तानी महल आत आला. आज या वास्तूचे अवशेष शिल्लक नाहीत. १८१२ साली दुसऱ्या बाजीरावाने ती जागा खणून काढली व तेथे झाडे लावली. म्हणून म्युझियममध्ये मस्तानी महाल म्हणून जो सज्जा दाखविला जातो तो मूळ वास्तूचा नाही.
तिच्या चित्रांबद्दलही हीच अवस्था आहे. मस्तानी एक घरंदाज, पडदानशीन स्त्री होती. ती कोणाच्या दृष्टीस पडेल हे शक्य नव्हते. म्हणून तिचे चित्र काढले जाणे अशक्य होते. आज दोन चित्रे मस्तानीची म्हणून मानली जातात ती अस्सल नाही, असे जाणकारांचे मत आहे.
मस्तानीला नृत्यकला अवगत होती, पण ती राजघराण्यातील मुलींच्या शिक्षणाचा एक भाग म्हणून. पेशव्यांकडील गोकुळ अष्टमीच्या उत्सवात कृष्णाला मानणाऱ्या प्रमाणी पंथाच्या या मुलीने नृत्य केले असले म्हणून ती नृत्यांगना ठरत नाही. १७३४ साली मस्तानीला मुलगा झाला. त्याची दोन नावे ठेवली गेली. समशेर बहादूर व कृष्णसिंग, एक मुसलमानी परंपरेतील, दुसरे हिंदू. यात मातापित्यांचा उदार दृष्टिकोन दिसून येतो. कृष्णसिंगाची मुंज व्हावी असा आग्रह बाजीरावाने धरला होता. त्याला घरच्यांनी व पुण्यातील ब्राह्मणांनी विरोध केला यात आश्चर्य नाही. बाजीरावाचा हा पुत्र गादीच्या वारसासाठी समस्या उभी करील, अशीही भीती मस्तानीविरोधामागे असावी. त्याच्या बाजूने विचार करता ही भीती अनाठायी होती, असे म्हणता येणार नाही. असे असले तरी मस्तानीला पाबळ येथे स्वतंत्र जहागिरी देण्यात आली होती. याचा अर्थ तिला मान्यता मिळाली होती.
मस्तानीविरुद्ध गंभीर कारस्थान रचले गेले ते १७३९ च्या सुमारास. त्यात बंधू चिमाजीअप्पा, पुत्र नानासाहेब व आई राधाबाई अशी मंडळी होती. पत्नी काशीबाईने मात्र समंजसपणा दाखविला. मस्तानीला तिने प्रेमादराने वागविले. बाजीरावाचे अभक्ष्य भक्षण व व्यसनीपण याचे खापर मस्तानीवर फोडण्यात आले. तिच्यामुळे तो राजकारणाकडे दुर्लक्ष करीत आहे, असे बोलले जाऊ लागले. वास्तविक सतत मोहिमेवर असलेल्या बाजीरावाने कर्तव्यात कधीच कसूर केलेली नव्हती. मस्तानीसुद्धा कधी त्याच्या आड आली नव्हती. त्यांचे प्रेम परस्परांचा कब्जा घेणारे नव्हते. पझेसिव्ह नव्हते. तरीदेखील ही बया येथून टळेल तर उत्तम म्हणून एक कुभांड रचले गेले.
नानासाहेबाने मस्तानीकडे जाणे-येणे वाढविले व एक दिवस अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. हेतू हा की, त्याचा बोभाटा व्हावा, तो बाजीरावाच्या कानावर जावा आणि मस्तानी त्याच्या मनातून उतरावी, पण हा प्रयत्न फसला. त्या थोर मनाच्या स्वाभिमानी स्त्रीने पुत्राला ओशाळे केले, शिवाय त्याच्यावर राग ठेवला नाही. नंतर चौक्या बसवून बाजीराव- मस्तानीचा पत्रव्यवहार तोडण्याचा विचार होता, पण तो सोडून देण्यात आला. मग शेवटचा अमानुष प्रयत्न. मस्तानीला अटक करून दूरवर अशा किल्ल्यात नेऊन टाकणे की तेथे तिचा लौकरच अंत होईल. पण त्यासाठी छत्रपतींची अनुमती आवश्यक होती. शाहूने ती नाकारली. ‘राऊ यांस खट्टे न करावे’ असा सुज्ञ सल्ला दिला. त्यामुळे मस्तानीचा जीव वाचला. तरी ती नजर कैदेतच होती.
१७३९ साली निजामाचा मुलगा नासिरजंग मराठी मुलुखात चालून येत आहे असे कळताच बाजीराव त्याला तडफेने जाऊन भिडला. नासीरजंगला त्याने पळवून लावले, शिवाय खरगोणची जहागिरी पदरात पाडून घेतली. या मोहिमेत चिमाजीअप्पा त्याच्याबरोबर होता. पण भावाभावांत सख्य उरले नव्हते. मोहिमेनंतर खरगोणची व्यवस्था लावण्यासाठी बाजीराव तिकडे गेला. मस्तानीला तिकडे रवाना करावी असे त्याने चिमाजीस बजावले होते. पण मस्तानीऐवजी काशीबाईची रवानगी करण्यात आली. बाजीरावाचा मुक्काम नर्मदाकाठी रावरखेडी येथे असताना त्याला ताप भरला. आयुष्यभराची दगदग व मस्तानीबद्दलचे दु:ख यामुळे चार दिवसात हा शूर शिपाई तंबूतच मरण पावला. अटकेतून सुटलेली मस्तानी खरगोणकडे निघाली होती, पण वाटेतच तिला बाजीरावाच्या मृत्यूची बातमी कळली. त्यानंतर ती फार दिवस जगली नाही. तिने आत्महत्या केली असे म्हणतात. पाबल येथे तिची कबर म्हणून जो चौथरा दाखविला जातो ती कबर नसून समाधी असावी, असे जाणकार सांगतात. म्हणजे तिच्यावर अग्निसंस्कार झाला असावा. हे सगळेच अंदाज.
बाजीरावाच्या निधनाने सर्वच हळहळले. आपले काहीतरी चुकले अशी जाणीव झाली असावी. मस्तानीद्वेष संपला. तिच्या वंशाला पेशवे घराण्याची एक शाखा म्हणून मान्यता मिळाली. मस्तानीचा पुत्र समशेर बहादर याला पेशवे घराण्यात व राजकारणात मानाचे स्थान लाभले. १७६१ साली पानिपतावर तो प्राण पणाला लावून लढला व धारातीर्थी पडला. पेशवे कुटुंबाला त्याचे अतीव दु:ख झाले. त्याचा पुत्र अलिबहादूरसुद्धा शूर होता. त्याला ‘श्रीमत्’ म्हटले जाई. श्रीमंत म्हणजे पेशवे व श्रीमत् हे परिवारातील सदस्य अशा उपाध्या होत्या. १७८८ साली मध्य प्रदेशातील बांदा येथे मस्तानीच्या शाखेला जहागिरी देण्यात आली. महादजी शिंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी नाना फडणविसाने अलिबहादूरला पाठविले होते. कारण बाजीरावाच्या रक्ताची भीती मराठा सरदारांना होती. ब्राह्मण राघोबाने आपल्याच पुतण्याचा खून केला, पण मस्तानीचे मुसलमान वंशज स्वामिनिष्ठेपासून कधी ढळले नाहीत. १८५७च्या संग्रामात बांद्याचा नवाब झांशीची राणी व नानासाहेब पेशवा यांच्या बाजूने लढला. तो मस्तानीचा वंशज होता. बंडानंतर बांदा संस्थान खालसा झाले. तेथील नब्ोाबास पेन्शन देऊन इंदूरला आणून बसविण्यात आले. प्रसिद्ध उर्दू शायर गालिब हासुद्धा मस्तानी वंशातील दूरच्या नात्याचा होता. आज इंदूरातील अ‍ॅडव्होकेट नबाब बहादूर यांचा परिवार बाजीराव-मस्तानीचा रास्त अभिमान बाळगून आहे.
एका अमर प्रेमाच्या पराजयाची अन् विजयाची ही अजब कहाणी!
lokprabha.magazine@gmail.com

मला या अशा लेखांबद्दल प्रश्न पडतो की पुरावे आहेत का? मस्तानीचे लग्न बाजीरावाशी झाल्याचा काही पुरावा नाही हे तर लेखक स्वतःच म्हणतो. बाकीच्या गोष्टींबद्दलही पुरावे आहेत का? की हे लेखकाचं speculation/imagination आहे? लेखक म्हणतोय- 'दंतकथा' सांगते की एक फकीर शनिवारवाड्यात आला होता. जर लेख अशा दंतकथांवर आधारित आहे तर तसा डिस्क्लेमर टाका की!

आणि काशीबाईंनी 'समंजसपणा' दाखवला म्हणजे काय? पर्याय होता का काही त्या माऊलीकडे? आजच्या काळातली स्त्री अशा वेळी घटस्फोट घेऊ शकते, ताठ मानेने स्वतंत्रपणे जगू शकते, दुसरा विवाह करुन सुखी होऊ शकते. काशीबाई यातलं काहीच करु शकत नव्हत्या. पण त्याचा अर्थ त्यांनी आनंदाने स्वतःची उपेक्षा स्वीकारली असेल, त्यांना दु:ख झाले नसेल, त्यांच्यावर अन्याय झाला नाही असा होतो की काय!

जो समाज बाजीरावाला अनेक संसार थाटण्याची मुभा देण्याइतका मागासलेला होता तोच समाज एका परधर्मिय, 'उपपत्नी' (whatever that means!) पासून झालेल्या मुलीला पेशवीण म्हणून स्वीकारण्याच्या बाबतीतही मागासलेलाच असणार. समाजाने आंतरधर्मिय विवाहाच्या बाबतीत एकदम अल्ट्रा मॉडर्न असावं पण बहुपत्नीत्व स्वीकारण्याच्या बाबतीत, स्त्रियांच्या अधिकारांच्या बाबतीत मात्र जुनाट असावं अशी स्वतःला सोयीस्कर अपेक्षा कशी ठेवता येईल?

मी अलिकडे थोरले बाजीराव, मस्तानी, पेशवे ह्यांच्यावर बरेच लेख वाचलेत. बर्‍याच लेखकांनी बाजीरावांचे पत्र, छत्रसाल ह्यांचे पत्र असा उल्लेख केला आहे त्यावरुन असे वाटते की जुनी पत्रे अजून उपलब्द्ध आहेत. हे खरे आहे का?

कुठल्यातरी एका वर्तमानपत्राच्या बातमित वाचले की मस्तानीची समाधी/कबर उकरून काढली आणि आता ती कबर उद्धवस्त अवस्थेत आहे.

आपल्या सरकारानी युरोपापासून काहीच शिकले नाही. कितीतरी गड, किल्ले, मंदीरे, जुने पाषाणी देव देवता ह्यांच्याकडे कुणीच लक्ष पुरवत नाही.

ऐतिकासिक पत्रे उपलब्ध आहेत. पण कुठल्याही पत्रात बाजीराव मस्तानी यांचा धर्मसंमत विवाह झाल्याचा उल्लेख वरील लेखकाला सापडलेला नाही. तरी तो आपला ते धरुन चालतोय की असंच झालं असावं. मुळात हीच गोष्ट सिध्द होत नाही तर बाकीच्या स्टेटमेन्ट्सचे तरी काय पुरावे आहेत हा प्रश्न पडतोय.

त्यातल्या त्यात मुंबई पुण्यात बाजीराव मस्तानी दिलवालेला टक्कर देऊ शकलाय
>>
कारण इथे अमाराठी लोकं जास्त आहेत Sad
माझ्या संपुर्ण टीम ने २ दिवसात २ वेळा पाहिलाय हा सिनेमा.

जी मराठी भाषा बाजीराव मस्तानीमधे दाखवली आहे ती तेंव्हापण तशीच होती का १७०० वगैरे सालामधे? पत्रामधली मराठी भाषा खूप वेगळी वाटते.

बाजीराव मस्तानी ह्या सिनेमात 'कोथरुड आवाज' असा एक शब्द ऐकला मी. कोथरुड मी आजवर फक्त उपनगराचे नाव समजत होतो. पण हा मराठी शब्द आहे हे माहिती नव्हते. काय अर्थ होतो ह्या शब्दाचा?

कोथरूड आवास असेल ते रे बी. सध्याचं जे अतीविस्तारलेलं कोथरूड आहे तो एकेकाळी नदीपलीकडे असलेलेला एक निबिड अरण्यातला, एकाकी असा भाग होता. तिथे वस्ती नव्हती. तिथे मस्तानीला रहायला जागा दिली होती. सर्वांपासून लांब म्हणून.
कोथरूडचं हे वर्णन लिहायलाही विचित्र वाटतं आता Happy

"नदीपलीकडे असलेलेला एक निबिड अरण्यातला, एकाकी असा भाग "
मस्तानी आता असती तर कुठे राहिली असती? भूगाव? सोमाटणे?सासवड?माण?

धन्यवाद पूनम. मी चुकून आवास ऐवजी आवाज असा शब्द ऐकला सिनेमात. सबटायटल बघेपर्यंत पुढचे वाक्य आले होते Happy

हो ना कोथरुडच काय सगळे पुणे शहरच गजबजले चारी बाजूंनी नको तितके वाढले. १९९५ मधे आलो तेंव्हा वनाज कोथरुडचे टोक होते. मी रस्ता ओलांडून दशभुजा मंदीरात जात असे. आता तर तो रस्ता ओलांडायलाच जमत नाही इतकी भयाणक वाहतून असते. एम. जी. रोडची तर सगळी शानच गेली.

पुण्यात पेशवे राहिले तेंव्हा त्यांच्या उरलेल्या ज्या काही जागा, खाणाखुणा आहेत त्याची एक यादी केली तर ती पर्यटनाला नक्की मदतीची होईल. बाजीराव मस्तानी ह्या सिनेमामुळे इतिहासात डोकायची अनेकांना इच्छा झाली आहे.

परवा एका मित्राच्या हळदीला गेलो होतो. पिऊन नाचगाणा, फुल्ल धिंगाणा. आधी शांताबाई मग बघतोय रिक्षावाला. अचानक मल्हारी मल्हारी सुरू झाले आणि सारे बेवडे स्वताला बाजीराव समजत नाचायला लागले. त्यानंतर पिंगा सुरू झाले. मला वाटले आता बायका नाचतील. पण कसले काय. त्याच बेवड्यांच्या अंगात काशीबाई आणि मस्तानी आली. आणि मला एक साक्षात्कार झाला... ही दोन गाणी बाजीराव-मस्तानी यांना अमरत्व बहाल करणार. वर्षानुवर्षे अश्या समारंभांना वाजणार..

मला वाटलं 'कोथरूड आव्वाज' नावाचं त्याकाळी तिकडून एखादं दैनिक निघत असेल. खूप शोधलं, पण काय सापडलं नाही.
आवास म्हणजे इं.गां.आ.यो. मधलं का? त्याचा की उगम आपल्या पेशवाईतुन की. मान ताठ, लावू नका नाट, देईन एक चाट, सदोदित.

एम. जी. रोडची तर सगळी शानच गेली.>>>> बिग नो नो... कधीच जाणार नाही.अजुन ही एम.जी रोड तरुण आहे.
पुण्यात पेशवे राहिले तेंव्हा त्यांच्या उरलेल्या ज्या काही जागा, खाणाखुणा आहेत त्याची एक यादी केली तर ती पर्यटनाला नक्की मदतीची होईल>>>> एकाच चौकात तर ३ वाडे आहेत.शनिवारवाडा,नानावाडा,(सध्या डागडुजी चालु आहे.) विश्रामबागवाडा,थोडे पुढे पर्वती,अजुन वरच्या बाजुला कात्रज जवळ मस्तानी तलाव.अजुन यादी वाढवता येइल.

मी आनि माझ्या ग्रुप चे कॉलेजातील एक बिझनेस स्वप्न होत.५ जणांनी ५ परकीय भाषा शिकायच्या.आणि परदेशी पर्यटकांना त्याच्या त्यांच्या भाषेत पुण्याचे पर्यटन घडवुन आणायचे.अजुन बरेच डीटेलवार आहे.पण बी तुझ्या पोस्टीमुळे ही एक आठवण झाली.

Pages