राधे... ९. रंगुनि रंगात साऱ्या...

Submitted by अवल on 4 November, 2015 - 23:38

अन तोही दिवस आठवतो राधे,...

रंगपंचमीचा दिवस होता तो. सकाळीच माईने मला ओवाळले, तिलक लावला, नंदबाबांनी गुलाल लावला गालाला आणि रंगीत करून टाकला सारा दिवस. त्यांचे आशीर्वाद घेऊन बाहेर पडलो अन सगळ्या गोपांनी घेरून टाकलं. नुसती धमाल सुरू झाली.

सगळे एकमेकांना रंगवत यमुनेतीरी आलो. तर तू अन तुझ्या सख्याही तिथे आलेलात, नेहमी प्रमाणे पाणी भरायला. पण आज तुम्हाला घाई नव्हती. तू पुढे झालीस, मला हळूच गुलाल लाऊन उलटी वळलीस. पण मी असा सोडणार नव्हतोच तुला. मीही गुलाल उधळला. सगळेच गोपही रंग उडवू लागले. लाल, निळा, गुलाबी, केशरी सारे रंग एकमेकांत रंगू लागले.

किती वेळ गेला, कोणालाच भान राहिले नव्हते. डोक्यावर ऊन मी म्हणू लागले. तसे एक एक गोप यमुनेत उतरले, आता तर यमुनाही रंगली. मीपण यमुनेचे ते रंग अंगावर घ्यायला पाण्यात उतरलो. सारे एकमेकांवर आता पाणी उधळू लागले. अन मग सगळेच रंग एकमेकांत मिसळले. इतका वेळ आपापले वेगळेपण ते कोरडे रंग मिरवत होते, पण यमुनेच्या पाण्याने साऱ्यांना एकत्र केलं. साऱ्यांना सामावून घेता घेता रंगच राहिला नाही, काळा, मातकट बेरंग सगळ्यांवर चढला.

सगळे चोळून चोळून तो रंग काढू लागले. तेव्हढ्यात तू हाक दिलीस.
"कान्हा, कान्हा. तसाच ये बाहेर.... नाही, नको काढूस तो रंग. तोच तुझा खरा रंग रे"
मी तसाच बाहेर आलो अन नजरेनेच विचारले, म्हणजे काय ग?
अन तू म्हणालीस,

" सारे सारे रंग तू लाऊन घेतोस. आम्हालाही लावतोस. अगदी अगदी रंगवून टाकतोस साऱ्या रंगात तू आम्हाला. अन तू, तू मात्र आता दिसतोयस तसाच आहेस. निरंग... सगळे रंग लेऊनही, त्या परे जाणारा, निरंग!
बघितलं तर दिसताहेत अगदी सगळे रंग पण एकच एक नाव द्यावं असा नाहीच एकही वेगळा.
आहेत तुझ्यात अगदी सारे सारे अंश, पण स्वतंत्र करून दाखवावा असा एकच एक नाही.
सारे सामाऊन, सारे दाखवून, सारे लेऊन; सारे एकत्र करून निरंग असा तू.... हाच तू खरा. म्हणून तर तू सावळा, निळा... सारे सामावूनही निरंग...
श्रीरंग ..."

त्या क्षणी, माझ्यातल्या मलाच निरंग करून दाखवलस राधे तू !
मी मी न राहिलो, माझ्यातलेही मीपण संपवलेस राधे...
राधे...

----
राधे...१. http://www.maayboli.com/node/51393
राधे...२. http://www.maayboli.com/node/51440
राधे...३. http://www.maayboli.com/node/51543
राधे...४. http://www.maayboli.com/node/51594
राधे...५. http://www.maayboli.com/node/51968
राधे...६. http://www.maayboli.com/node/52356
राधे... ७. http://www.maayboli.com/node/54215
राधे... ८. http://www.maayboli.com/node/54680

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर, अगदी तरल लिहीलंयस, डोळ्यांसमोर उभी राहिली गोकुळातली रंगपंचमी.

सर्व रंग लेऊनि झाला श्याम हा सावळा
श्याम मेघ जीवन देई, त्यासी हा भुलला Happy

खूप दिवसांनी राधा दिसली....आणि दिसली तीही रंगांच्या सोबतीने म्हटल्यावर रंगाची मन प्रसन्न करणारी उधळण होणे अपेक्षित होतेच....ती इच्छा पूर्ण झाली वाचनानंतर.

"...निरंग... सगळे रंग लेऊनही...." ~ विलक्षण चित्र आहे हे....अप्रतिमच.

मस्त!
इथेच लिहीते - अनंतनाग, कान्हा कविता पण सुरेख आहे.