ऐलमा पैलमा गणेश देवा.. माझा खेळ मांडून दे, करीन तुझी सेवा..

Submitted by लाडू on 16 October, 2015 - 07:15

ऐलमा पैलमा गणेश देवा.. माझा खेळ मांडून दे, करीन तुझी सेवा..

नवरात्रीला सुरवात झाली आणि आज अचानक आठवण आली ती भोंडल्याची. तसं माझा आणि भोंडल्याचा काही संबंध नाही. आणि नसतोच तो मुंबईत कोणाचा. मुंबईत सगळच कस चकचकीत आणि Posh. नवरात्रात गरबा आणि दांडिया एवढच काय ते माहित. आणि त्यातहि गाणी म्हणजे चक्क चार बोतल vodka पासून कभी मेरा नशा भी चख ले आया जो मेरी गली.. पर्यंत काहीही.
या सगळ्या सणांना काही परंपरा असतील. काही वैशिष्ट्य असतील हे तर आम्ही विसरूनच गेलोय. तर त्यात भोंडला हा अगदीच हद्दपार. नवरात्रात गुजराती माणसांचा गरबा असेल तर मराठी माणसं काय करतात हा मला लहानपणापासून पडलेला प्रश्न. आणि त्याच उत्तर मिळालं एकदा गावी जाण्याचा योग आला तेव्हा. तेव्हाही काही अगदी मोठी नव्हते. असेन चौथी पाचवीत. एका समोरच्याच घरी भोंडला होता त्या दिवशी. सकाळपासून सगळ्या मुली उत्साहात. आज मळ्यातल्या काकींकडे भोंडला आहे म्हणून. मला कळेचना हे काय प्रकरण. एका दोघींना विचारलं तर म्हणाल्या तू ये रात्री. मज्जा येते खूप. आईला विचारलं तर म्हणाली हो जा तू. मज्जा येते खूप. आम्ही खेळायचो लहानपणी. हादगा पण म्हणतात त्याला. मला तरी सुद्धा काहीही उकल झाली नाही.
थोड्या वेळाने मी पुन्हा त्या मुलींमध्ये जॉईन झाले. त्या घोळक्या घोल्क्यानेच फिरत होत्या. आणि काहीतरी serious discussion चालू होत त्याचं. पुन्हा कान देऊन ऐकायचा प्रयत्न केला. आता त्या खिरापतीबद्दल बोलत होत्या. "काकुनी कालच खूप नारळ आणलेत... म्हणजे नारळाचच काहीतरी असेल.... नारळाच्या वड्या का?.. गुळ आणायचं पण म्हणत होत्या त्या..." अस काहीतरी न कळणार. म्हणजे काकू काय बनवणार याची का उत्सुकता यांना? खायला मिळेलच कि घरी गेल्यावर. आणि खिरापत म्हणजे काय? त्याचा काय संबंध नारळाशी? नारळाची रेसीपी आहे का कुठली? आपल्या आई ला नसेल का येत बनवता? एक ना दोन हजार प्रश्नांनी मेंदूला मुंग्या आल्या. शिवाय त्यांना काहीही विचारलं कि कच्चा लिंबू म्हणून गप्प करायच्या मला. आता हे सगळ कळायला काकींकडे जावच लागणार होत. तोपर्यंत सगळ्याचं ठरलं कि आताच त्यांच्या घरी जाऊन बसायचं. म्हणजे मग कळेलच वासावरून तरी. मला अस्सा राग आला त्या आगाऊ मुलींचा. अस कोणाच्या घरात ठाण मांडून बसायचं रात्रीपर्यंत. ते हि का तर त्या खायला काय देणार ते कळण्यासाठी. किती हा अगोचरपणा. मी गेलेच नाही मग त्यांच्यासोबत. सरळ घरी आले. तरी रात्रीच्या भोंडल्याची उत्सुकता स्वस्थ बसू देत नव्हती.
मनातला राग आईला बोलून दाखवला तर हसून हसून गार ती. मलाच म्हणते अग असच असत हे मजेशीर सगळ. काकी आपल्याच नाही का? बसायच त्यांच्या घरी, त्याही लपून लपूनच बनवणार सगळ. त्यातच त्यांची कसोटी. आता पर्यंत मला हि आवडू लागल सगळ थोडं थोडं. तरी आताच काकूंच्या घरी जायचा धीर काही झाला नाही. तसाच वेळ काढला संध्याकाळपर्यंत. आणि मग कोणी बोलावत का त्याची वाट पाहत बसून राहिले. शेवटी आईच घेऊन गेली जबरदस्ती तिथे. तिथे त्यांचा भोंडला चालू हि झाला होता. आणि बघूनच क्लिक झालं मला. अरेच्या हे लोक गरब्याला भोंडला म्हणतात फक्त हे घरात खेळतायत. पण हा आत्मविश्वास टिकेपर्यंत आई मला काहीतरी दाखवत होती. घराच्या मध्यभागी एक पाट ठेवला होता. त्यावर हत्तीच चित्र चिकटवलं होत. त्याची बहुतेक फुलांनी पूजा केली होती. आणि त्याभोवतीच सगळ्या फिरत होत्या. आणि मस्ती गम्मत सगळचं. हस्त नक्षत्रात हा सण होतो म्हणून हातगा. हत्तीची पूजा करायची असते या वेळी. हे सगळ आई बराच वेळ सांगत राहिली. पण मी मात्र त्यांच्या गाण्यांमध्ये गप्पांमध्ये हरवून गेले होते. कसली भन्नाट गाणी होती त्यांची. अगदी म्हटलं तर बडबडगीत. आणि म्हटलं तर daily life च उत्कृष्ट रेखाटन. अर्थात तेव्हा इतक नव्हत कळल. आणि काय कळल होत नेमकं ते आता नाही माहित. पण एकंदरीत छान वाटत होत.
करीन तुझी सेवा मला हवा भरतार.. अस काहीतरी ऐकल असाव. आईला विचारलं भरतार म्हणजे? तर म्हणाली नवरा. मला सोलिड च वाटल. इतकं direct कस मागू शकतात देवाकडे. आणि हसतायत एकमेकींकडे बघून. डोळ्यांनी खाणाखुणा. मुलींची काय काय स्वप्न असू शकतात हे मी पहिल्यांदाच ऐकत होते. कविता खूप पाठ केल्या आजपर्यंत. गाणी हि खूप ऐकली. स्पर्धांना म्हटली पण. पण गाण्यांना अर्थ असतात, भाव असतात, आणि ते आपल्याला कोणीही न शिकवता कळू शकतात हे आज नव्याने कळत होत. आणि ते कळल तर गाणी ऐकून त्यात रमुन जावसं वाटत हे पण. हीच गाणी ऐकता ऐकता गाण्यांचे अर्थ आणि संदर्भ कधी बदलले मला कळलच नाही. आता गाणी चालू होती ती सासूच्या चहाड्या सांगणारी वाटत होती. आधी तर माझा विश्वासच नाही बसला कि गाण्यांचे असे अर्थही असू शकतात. पण आताच खजिना हाती लागला होता गाण्यातल्या शब्दांचा. तर आता याचे अर्थ आपोआपच लागणार होते मेंदूत. आता दोन मुली अक्टिंग करत होत्या सासू सुनेची..
"सासुरवाशीण सून घरासी येईना कैसी
सासूबाई गेल्या समजावायला
चला चला सुनबाई आपुल्या घराला
अर्धा संसार देते तुम्हाला
अर्धा संसार नक्को मला मी नाही यायची तुमच्या घराला.."

अस काहीतरी गाण. मनातून रागच आला सुनेचा. सासू इतकं समजावतेय तरी घरी जायला काय होतंय या बयेला. विचार करून हसूच आलं एकदम. मी का इतकी गुंतून जातेय. समोर एक खेळ तर चालूय. खऱ्या सासू सुना enjoy करतायत. अगदी माझी आई आणि आज्जी पण. आणि मी..
पुढंच गाण तर माझ्या आज्जीनेच सुरु केलं आणि मी तोंडाचा आ वासला. आज्जी पण? आणि ते पण असं गाण ?
कारल्याचा वेल लाव ग सुने, मग जा तू आपुल्या माहेरा.
दुसऱ्या एका आजीच्या मैत्रिणीनेच पुढच वाक्य म्हटलं
कारल्याचा वेल लावला हो सासूबाई, आता जाऊ का माझ्या माहेरा?
मग अजून पुढचा प्रश्न, मग अजून काहीतरी. वेलीला कारलं आलं. त्याची भाजी केली, सासू जेवली,तीच उष्ट काढाल. तरी सासूचे नखरे चालूच. मग सासूचा खाष्टपणा हळूहळू माझ्या लक्षात यायला लागला. सुनेला गोड गोड बोलून घरी जाऊ न देण्यासाठी लबाड सासू plan करत होती काय? मग मला आधीची गाणीहि थोडी सुसह्य व्हायला लागली. पण तरी आई आणि आज्जी ला imagin करून अजूनच कसस होत होत. माझ्या आज्जी ने अस कधी काही केलं असेल? शक्यच नाही. आणि आई तरी कुठे रोज रोज हट्ट करते माहेरी जाण्यासाठी? अरेच्चा म्हणजे ती हट्ट नाही करत म्हणून आज्जी खाष्टपणा नसेल करत कशावरून? आणि असही जेव्हा जेव्हा आई आणि मी मामा कडे जात असतो तेव्हा आज्जी म्हणतेच कि आज नको. आज जरा हे अमक करून घेऊ, पुढच्या रविवारी जा. त्यात पण खाष्टपणा असेल का आज्जीचा? अचानक मला आठवली ती मी आईशेजारी झोपलेली असताना मला खाऊ आणि खेळणी दाखवून कायमच स्वतःच्या बाजूला नेऊन झोपवणारी आज्जी. मी आईबरोबर जाण्यासाठी तयार व्हावं आणि नेमक्या वेळी आज्जीच्या कुठल्याशा मैत्रिणीच्या नातवाचा वाढदिवस असण या सगळ्यामध्येच काहीतरी खटकू लागल मला. आजच. आणि स्वतःचाच खूप राग आला. बऱ्याच गोष्टींचा मेळ घालण्याचा प्रयत्न चालू झाला माझा. आणि त्यांचा भोंडला हि रंगात आला होता आतापर्यंत. गाणी कुठून कुठे पोचली होती. मध्ये मलाही कोणीतरी ओढून नेण्याचा प्रयत्न केला. पण माझ तितकस जमल नाही. मग मी पुन्हा एका कोपऱ्यात बसले. आणि पुढचा गाण काय असेल आता याचा विचार. आतापर्यंत मला भूक जाणवायला लागली होती. पण भोंडला कधीच संपू नये अशी वाटत होती. तितक्यात पुढच्या गाण्याने हद्द पार केली भावनांची. सासर माहेर अस comparison चालू झाली. आणि तिथळी प्रत्येक बाई त्या गाण्यात साथ देतेय म्हणजे सगळ्यांचीच संमती आहे या वाक्यांना? माझी आई? आज्जी? सगळ्यांनाच फक्त त्याचं माहेर आवडत? आणि सासरी छळ होतो त्यांचा?
अस्स माहेर सुरेख बाई खायाला मिळत.. अस्स सासर द्वाड बाई कोंडूनी मारीत. या अशा ओळी ? आणि सगळेच मजा घेतायत जणू. या सगळ्या लग्न झालेल्या बायका? याचं हे गावच सासर कि. अगदी माझ्या आईच सुद्धा. आणि तिथेच सासरच्या माणसांसमोर सासर चा अपमान? भले गमतीत का होईना पण कसा करू शकतात या? कि हेच कुठेना कुठे काही प्रमाणात खर आहे आणि पटतय या सगळ्यांना? कि याच सगळ्याची सवय आहे सगळ्यांना? माझा या सगळ्या गोष्टींशी संबंधच आला नाही कधी. म्हणून मला नवल वाटतय का? कि तोपर्यंत happy ending परी कथा वाचल्यामुळे मला reality जाणवलीच नव्हती? हे सगळे विचार आजचे. त्यावेळी काय वाटल होत आठवत नाही. पण पटल नव्हत हे नक्की. अस नसतच मुळी आणि असलं तर मी नाहीच जाणार कधी सासरी. गोष्टीत राजकन्येला सगळ्या संकटातून बाहेर काढणार राजकुमार तर असतो पण तिला त्रास देणारे राजा राणी पण असतात हे आजच नव्याने उमगत होत मला. अजून काही ऐकावसच वाटल नाही पुढे. आणि तसाही संपलाच भोंडला मग. सगळ्या दमल्या होत्या. आणि आता खिरापत ओळखायालाही सुरवात झाली होती. सगळ्या जणी एकेका पदार्थच नाव घेत होत्या. आणि त्याचं चुकल्यावर काकु खुश होत होत्या. आता आलं ध्यानात. हाही भोंडल्याचाच भाग होय? अशी ओळखायची असते खिरापत? काय बर बनवलं असेल काकुनी नारळाच? माझ्याही नकळत मी विचार करू लागले. कोणीतरी मोदकाच नाव काढल आणि संपलीच ती हि गम्मत तेव्हढ्यात. मग घरातल्या देवाला आणि पाटावरच्या हत्तीला खिरापतीचा नैवैद्य दाखून झाल्यावर सगळ्यांनीच यथेच्छ ताव मारला मोदकांवर.
हळूहळू बैठक मोडली. गप्पागोष्टी संपत आल्या आणि सगळ्या निघाल्या घरी.
आई आणि आजी सोबत चालताना आईला न राहवून विचारलच मी तरी. "आई ग, खरच का तुला आमच्यापेक्षा तुझ्या माहेरची माणस जास्त आवडतात?" मला अगदी घट्ट हाताला धरत म्हणाली मला "नाही ग लाडोबा. तू नाही येत माझ्या सासरच्यांमध्ये. तू माझीच नाही क?" मी खुश होऊन चालु लागले. पण आता वाटतय आईने माझ्या प्रश्नाच उत्तर दिलच नाही. कदाचित आज्जी असल्यामुळे? कि माझ्या लग्नानंतर माझ मला कळावं म्हणून? परीकथेतल्या राजकन्येच लग्नानंतर काय होत असेल बर? माहेरी जाण्यासाठी तिलाही कारल्याची वेल लावावी लागत असेल का? आज विचारावा का आईला पुन्हा तोच प्रश्न? आज नाही टाळू शकणार ती कदाचित. किवा आज तीची सासू किवा आई दोघीही नसल्याने माझ्या आईने उत्तरच बदलली असतील तर? हे असच असत सगळ कायम?
त्यानंतर कधी भोंडला तर नाही अनुभवला मी. पण आज त्या गाण्यांच्या उरलेल्या आणि न आठवणाऱ्या ओळी शोधाव्याशा वाटताहेत. कदाचित त्यात माझ्या प्रश्नांची उत्तर सापडतील मला माझा खेळ मांडण्याआधी..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलय.
भोंडला कधी पाहिला नाही. मंगळागौरीतील खेळ पाहिलेत पण.
माहेरवाशिणीच जास्त चांगल्या प्रतिक्रिया देऊ शकतील.

छान लिहीलंय.
मला पण आमच्या सोसायटीत जास्त करुन कॉस्मो वातावरण असल्याने बरीच वर्षं ऐकूनच माहित होता. पण अजूनही "भोंडला म्हणजे मराठी कस्टमाइझ्ड गरबा" हे डोक्यातून जात नाहीच Happy
खरं तर फेर धरुन नाचणे हे एक सोडल्यास बाकी डिटेलिंग मध्ये बराचसा फरक असावा.
तुमचा खेळ मांडायचाय होय अजून? मग घाबरु नका, हल्ली(म्हणजे गेली १०-१५ वर्षं तरी) सास्वांनाच सुना सांगतात "आई मी नाहिये हां वीकेन्ड ला, आईकडे आहे, माझं पार्सल आलं तर घेऊन ठेवा" Happy

भोंडला म्हणजे मराठी कस्टमाइझ्ड गरबा >>>> ऑ? Uhoh

भोंडल्याची गाणी फार गोड आणि मजेशीर आहेत. सासरच्या मंडळींचा अपमान वगैरे सिरियस वळण देण्यासारखी नाहीत.

गरबा म्हणजे गोलाकार फेर धरुन नाचणे या एका साम्यापुरता, बाकी सगळं वेगळं.(खिरापत लपवणं ओळखणं सोडून आता सोसायटीतले ४-५ भोंडले अटंड केलेयत त्यावर मोजकं ज्ञान.)

चांगलं लिहिलंय. लहानपण कॉस्मो वातावरणात गेल्यामुळे भोंडला म्हणजे काय हे माहितही नव्हतं. मग टिपीकल मराठी शहरात रहायला गेल्यावर बघायला मिळाला पण त्याच्याशी कधीच कनेक्ट होता आलं नाही.

छान लिहिले आहे. आमच्या लहानपणी आमच्या घरी हादगा असायचा. पण त्याचं स्वरूप वेगळं होतं. प्रत्येकाच्या घरी हत्तीचं रंगीत चित्र भिंतीवर चिटकवलं जायचं आणि त्याला रोज सायंकाळी एक झेंडूच्या किंवा मखमलीच्या फुलांची माळ घातली जायची. आदल्या दिवशीची माळ न काढता त्यावर तशीत दुसर्‍या दिवशीची माळ अडकवली जायची. (असे बहुतेक सोळा दिवस चालू असायचे.) शेवटच्या दिवसापर्यंत त्या माळांमध्ये चित्र जवळ जवळ दिसेनासे झालेले असे. या प्रत्येक दिवशी आळीतल्या मुली प्रत्येक घरी जाऊन हादग्याची गाणी म्हणायच्या. आणि म्हणून झाल्यावर त्या त्या घरी खिरापत ओळखा हा कार्यक्रम असे. ओळखायला अवघड खिरापत बनवणे हा त्या प्रत्येक यजमान मुलीसाठी भलताच अस्मितेचा विषय असायचा. आपली खिरापत शेवटपर्यंत कोणाला ओळखता येऊ नये यासाठी रोज धडपड चालू असायची. कधी कधी फितुरीच्या भयाने घरातल्या इतरांनाही खिरापत काय आहे याचा सुगावा लागू देत नसत. आम्हा मुलांना कधी याचा सुगावा लागलाच तर त्याचा फायदा व्हायचा. कारण ताई लोकांना 'अमूक ढमूक लाड करतेस की फोडू तुझी खिरापत' असे ब्लॅकमेल करून हवे तसे वाकवायची ही एक संधी असे.

शेवटच्या दिवशी कोणा एकीच्या घरी या मुली बोळवणाचा स्वयंपाक करत. त्यात आम्हालाही जेवायला बोलवीत. स्वयंपाकात धपाटी, चवळीची उसळ आणि दही हा मुख्य बेत असे (भात बाय डिफॉल्ट). त्या जेवणानंतर मग त्या हादग्याचे म्हणजे मुख्यतः त्या फुलांच्या माळांचे विसर्जन करण्यात येई. हादग्याचे चित्र घडी करून पुढच्या वर्षासाठी पेटीत ठेवून दिले जाई.

हादग्याच्या त्या छापिल रंगीत चित्रातली कलाकुसर फार सुरेख असे.

(यात मुख्यतः मुलींचाच सहभाग असे, मोठ्या स्त्रियांचा सहभाग क्वचितच असे. मोठ्या स्त्रियांचा गौरीगणपतीतल्या गौरी हा मुख्य सहभागाचा सण असे. त्याची चाहूल नागपंचमीपासूनच लागे. गौरी हा सण म्हणजे आमच्याकडच्या स्त्रियांसाठी अत्युच्च्य भावनिक जवळीकतेचा असे.)

अरे! इतक्या जणींना भोंडला माहितच नाही हे वाचून खूप आश्चर्य वाटलं ! माझं बालपण पुण्यात एरंडवण्यात गेलं, तिथे हे सगळे पारंपारिक प्रकार पुरेपूर अनुभवलेत. धमाल यायची भोंडल्याला. आणि गरबाशी त्याचा काही संबंध नाही!! कारण यात नाचणे अपेक्षितच नसते! नुस्ते फेर धरून गोल फिरायचं आणि ती गाणी हीच मुख्य मज्जा!

नुस्ते फेर धरून गोल फिरायचं आणि ती गाणी हीच मुख्य मज्जा >>> एक्झॅटली Happy

काही गाणी सापडली मायबोलीवर http://www.maayboli.com/node/36648

http://www.maayboli.com/node/38746

http://www.maayboli.com/node/3794 (इथे पुस्तकाची माहिती आहे)

http://www.maayboli.com/node/14495

रंगासेठ, भोंडला म्हणजे हादगा. तुम्ही मिरजेत राहून हादगा पाहिला नाही कधी? अगदी प्राथमिक शाळेतसुद्धा व्हायचा की हादगा.

हो, प्राथमिक शाळेतही शाळा सुटल्यावर शाळेतल्या बाई मुलींना घेऊन हादगा खेळायच्या. कधी त्यानिमित्ताने शाळा लवकरही सुटायची.

सीमा Happy

बायदीवे त्यातल्या एका गाण्यात शेवट असा होता -

घे काठी लाग पाठी
घराची लक्ष्मी खोटी

इथे ताई लोकांनी "घे काठी लाग पाठी" म्हटल्याबरोबर आम्ही दबा धरून जोरात हसायला सुरुवात करायचो!

छान लिहिलंय. आमच्या शाळेतदेखील असायचा भोंडला. शिक्षिका सर्वांना भाग घ्यायला लावत. खिरापत घरून नेत असू.. आणि एवढ्या सगळ्या खिरापति ओळखण्यात खूप मजा येत असे.

( सई परांजपे चे एक नाटकही होते, "माझा खेळ मांडू दे" नावाचे )

आम्हीही खुप खेळलोय भोन्डला! मुलिना मजा यावि म्हणून इथेही एक-दोनदा केला, खिरापत ओळखणे याची मजा वेगळिच असायची.

अजून एक मुख्य घटक आता आठवला. या हादग्याला पहिल्या दिवशी सोळा जिन्नसांची एक माळ घालतात.
त्या जिन्नसांमध्ये शेतातली यादिवसांत दाणे फुटलेली भाताची लोंबी हा महत्त्वाचा जिन्नस असायचा.

>> तसं माझा आणि भोंडल्याचा काही संबंध नाही. आणि नसतोच तो मुंबईत कोणाचा. मुंबईत सगळच कस चकचकीत आणि Posh.

मी मुंबईत वाढले. दर नवरात्रात भोंडला खेळला. चाळीत अजून खेळला जातो.

पुढे कदाचित छान लिहिलंही असाल, पण असले सरसकटीकरण करणारे उल्लेख आले की वाचण्यातला इन्टरेस्ट संपतो.

छान लिहिलंय. बालपण आठवलं.

गेली २० वर्षे डोंबिवलीमध्ये भोंडला क्वचित दिसतो पण मी लहान असताना अगदी लग्नाआधीपर्यंत डोंबिवलीत भोंडल्याचे प्रमाण खूप होते, गरबा क्वचित कुठेतरी असायचा.

भोंडला खूप एन्जॉय केला, आमच्याकडे नव्हता पण चाळीचा सार्वजनिक होता. बऱ्याच मैत्रिणींकडे असायचा आणि सगळीकडे आमंत्रण असायचं. ती गाणी मनात अजूनही रुंजी घालतात. खिरापत ओळखणं ह्याची खूप गंमत वाटायची. शाळेतही भोंडला व्हायचा. डोंबिवलीत अजूनही काही मराठी शाळेत होतात भोंडले तसंच श्रावणात शुक्रवारी चणेही. माझ्या मुलाच्या शाळेत आम्ही करायचो भोंडला पालक आणि शिक्षक मिळून.

मी नालासोपाऱ्याला असताना एक वर्ष सोसायटीत भोंडला केला होता आम्ही सार्वजनिक. नंतर नाही कोणी उत्साह दाखवला. इथेही मी म्हणाले सोसायटीत करूया आपण एक दिवस भोंडला पण नाही कोणी iterested. गरबा असतो. असो.

मला अजूनही नवरात्र म्हटलं की भोंडलाच आठवतो. Happy

आमच्या कडे असायचा भोंडला. पावसाळा संपला की अंगण चोपून सारवून भोंडल्यासाठी तयार असायचे. रोज २-३ घरी भोंडला असायचा. आई दरवर्षी एक खिरापत एकदम वेगळी करायची. भोंडल्याचा जो दिवस असेल तितक्या खिरापती असेही असायचे. शाळेतही एक दिवस भोंडला असायचा. मजा यायची.
गावातल्या गुजराती स्त्रीयांचा गरबा असे. पण मुली आमच्याबरोबर भोंडला खेळायला येत.

मला पण आजीकडे , नवीन लग्न झालेल्या आत्यांकरता होणार्‍या मंगळागौरीची पूजा आणी जागरणं आठवतायेत..
त्यात ही याच प्रकारची गाणी ,खेळ होते.. धमाल नुस्ती रात्रभर!!!

छान लिहिलंयस लाडू, तू मेंशन केलेली काही गाणी आठवली..
तू चौथी पाचवी त असताना चा प्रसंग लिहिलायेस??इतक्या लहान वयात ही गाणी ऐकून तुझ्या मनात भलतेच
मॅचुअर विचार मंथन चालू झाले?? वॉव!!!

गजानन.. मस्त लिहिल्यास तुझ्या आठवणी.. बहिणींना किती छळलंस रे.. Lol

मी लहान असताना डोंबिवलीत भोंडल्याचे प्रमाण खूप होते, गरबा क्वचित कुठेतरी असायचा.

भोंडला खूप एन्जॉय केला, आमच्याकडे आणि बऱ्याच मैत्रिणींकडे असायचा आणि सगळीकडे आमंत्रण असायचं. ती गाणी मनात अजूनही रुंजी घालतात. खिरापत ओळखणं ह्याची खूप गंमत वाटायची. शाळेतही भोंडला व्हायचा. >>> ++१११

अरे! इतक्या जणींना भोंडला माहितच नाही हे वाचून खूप आश्चर्य वाटलं ! ++१

सगळ्यांनाच धन्यवाद.

भोंडला म्हणजे मराठी गरबा हे माझ त्यावेळीच मत आहे. तसं तो निश्चितच नाही याची मला खात्री आहे. भोंडल्याचे बाकी details मला खरच माहित नाहीत. त्यावेळी जे निरीक्षण केलं तेवढंच. शिवाय मुंबईत भोंडला माहित नाही हे जे सरसकट मत मांडलं आहे ते माझ्या वयाच्या मुलींचं प्रातिनिधिक मत आहे. त्यातून कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता.

शिवाय सासर चा अपमान किवा छळ वैगरे पण त्यावेळीस मला जे वाटल तेच. बाकी भोंडल्याची गाणी मस्तच आहेत.

आज लग्न ठरल्यावर हे सगळ आठवून माझ्या मनात विचारांचा जो कल्लोळ उठला ते मांडायचा मी केलेला प्रयत्न फक्त.

मयुरी चवाथे-शिंदे >> तुमच्या कथा मायबोलीवर वाचल्या आहेत. आणि मी तुमची जबरदस्त fan आहे. तुमची प्रतिक्रिया फारच आवडली. धन्यवाद

मस्त मज्जा असती भॉडल्यात. आम्ही मराठवाड्यात खूपच एंजॉय केलाय. Happy अन तसही सासर - माहेर हे कधी न संपणारे विषय . Happy मला तर त्यावेळी गाताना त्यातला गुढ / गंभीर अर्थ कधी कळलाच नाही, त्या काळच्या मुलींना आपले मन मोकळे करण्यासाठी, तेवढीच बाहेर जाण्याची संधी भोंडला, मंगळागौरी इ. मुळे मिळत असणार.

Pages