झहीर खान निवृत्त!

Submitted by फारएण्ड on 15 October, 2015 - 22:29

क्रिकेट मधे फास्ट बोलर्स च्या करीयर चा एक पॅटर्न असतो. सुरूवातीला प्रचंड वेग पण अंदाधुंद बोलिंग, नंतर काही दिग्गजांचे मार्गदर्शन मिळाल्यावर एका र्‍हिदम मधे सेटल होणे, मग प्रचंड फॉर्म चा काळ, बहुतांश प्रतिस्पर्धी टीम्स च्या विरूद्ध मॅचविनिंग परफॉर्मन्सेस, त्यानंतर एखादी दुखापत व नंतर होणारा खेळावरचा परिणाम. त्यामुळे मग कमी वेगाने पण इफेक्टिव्ह बोलिंग करण्याचा एक काळ आणि शेवटी निवृत्ती.

झहीर खान यातून गेला पण एकदम वेगळ्या क्रमाने. फास्ट बोलर करीयरच्या उत्तरार्धात जास्त वेगवान, जास्त आक्रमक व 'लीथल' होत गेला आहे असे क्वचितच पाहिले आहे. २००० साली पदार्पण केलेला झहीर २०११ मधे सर्वात जास्त भारी फॉर्म मधे होता. भारताच्या सुदैवाने वर्ल्ड कप मधे तर प्रचंड प्रभावी! त्यानंतर दुखापत वगैरे अपरिहार्य गोष्टी सुरू झाल्या व शेवटी आज त्याने निवृत्तीची घोषणा केली. भारताला वर्ल्ड कप जिंकून देण्यात व कसोटी क्रिकेट मधे २०१० च्या उत्तरार्धात पहिल्या क्रमांकावर आणण्यात त्याचा प्रचंड वाटा होता.

त्याची सुरूवातीला ओळख झाली ती २००० च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत. कपिल चा अपवाद व झहीर च्या थोडा आधी आलेला आगरकर सोडला तर भारताला आपले बोलर्स यॉर्कर्स टाकून लोकांच्या दांड्या उडवत आहेत हे चित्र फारसे माहीत नव्हते. त्यात लेफ्ट आर्म फास्ट बोलर म्हणजे आपल्या दृष्टीने गल्ली क्रिकेट मधे बोलिंग करणार्‍या व टीव्हीवर अक्रम ला पाहणार्‍या आमच्यासारख्या पब्लिक च्या इमॅजिनेशन मधेच शक्य होता :). त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मॅच मधे अ‍ॅण्ड्र्यू हॉल ची दांडी त्याने उडवलेली पाहिली तेव्हा भारतीय क्रिकेट बदलत असल्याची खात्रीच पटली. २००० म्हणजे 'दादा' च्या काळाची सुरूवात. झहीर, हरभजन, सेहवाग, युवराज हे साधारण याच काळात आले/स्थिरावले.

नंतर झहीर आपला प्रमुख बोलर कधी बनला कळले पण नाही. त्याने पोत्याने विकेट्स काढल्या आहेत असे फारसे झाले नाही पण प्रतिस्पर्धी संघाच्या प्रमुख बॅट्स्मन ना उडवणे, कॅप्टन ने मोक्याच्या वेळी आणल्यावर हमखास विकेट काढून देणे यात तो तरबेज होता. दुसरे म्हणजे भारताच्या बोलिंग ला जरा 'इंटिमेडेटिंग लुक' आला त्याच्या मुळे. फॉलो थ्रू मधे त्याचा आविर्भाव टीपीकल फास्ट बोलर सारखा असे. त्याआधी श्रीनाथ चा वेग जरी जबरी होता, प्रसाद चा स्विंग चांगला होता तरी त्यांची बॉडी लँग्वेज आक्रमक नसे. झहीर मुळे आपले बोलर्स पहिल्यांदा तसे वाटू लागले.

द. आफ्रिकेचा स्मिथ हा त्याचा सर्वात मोठा 'बनी'. अनेकदा त्याने त्याची विकेट काढलेली आहे. या क्लिप मधे त्या विकेट्स बघायला मिळतील.

त्याच्या जबरदस्त रिवर्स स्विंग बोलिंगची काही उदाहरणे: ही एक न्यू झीलंड विरूद्धची मॅच, भारतातली. इथे "भारतातली" ला वेगळा अर्थ आहे. भारतात कुंबळे विकेट्स काढतो यात आश्चर्य नव्हते, झहीर काढतो, ते ही स्विंग वर, यात होते. भारताच्या मोठ्या स्कोअर ला तोंड देताना किवीज ची अवस्था १७/३ करताना झहीर ने बॉल आत येणार आहे की बाहेर जाणार आहे या गोंधळात सतत ठेवले बॅट्स्मेनना. पहिले दोन ही झहीर नेच काढले होते, पण ही तिसरी स्टीफन फ्लेमिंग ची विकेट म्हणजे स्विंग मुळे होणार्‍या गोंधळाचे जबरी उदाहरण आहे. नॉर्मल स्विंग ओळखायची व त्याप्रमाणे खेळायची सवय असलेल्या खेळाडूंना बॉल अचानक "रिवर्स" होउ लागला तर खेळता येत नाही, व लाईन लक्षात न आल्याचे ढोबळ पणे दिसणारी उदाहरणे त्याचीच आहेत. बॅट्समन कधी लाईन च्या आत खेळतात तर कधी बाहेर. कल्पना करा - स्टीफन फ्लेमिंग सारखा अनुभवी खेळाडू १७/२ वर खेळायला येतो, आधीचे दोन झहीरनेच उडवले असले (हीच क्लिप पहिल्यापासून पाहा, त्या दोन्ही विकेट्सही जबरी आहेत) तरी त्याचा बॉल सरळ सोडून द्यायचा प्रयत्न करतो. टोटल पोपट. अक्रम यात मास्टर, पण झहीरही जबरी होता.

पिच च्या एका कडेने येउन बॅट्समनच्या 'ब्लॉकहोल' मधे येणारा बॉल कधी आत येउन, कधी बाहेर जाउन तर कधी लाईन होल्ड करून विकेट घेउन जात असे हे बॅट्स्मन ना अजिबात झेपत नसे. क्रीझच्या उत्तम वापराचे बांगला देश विरूद्धचे हे एक उदाहरण

मग मध्यंतरी दुखापत, फिटनेस चा बोलर्स ना होणारा त्रास त्यालाही झाला. साधारण २००५ च्या आसपास तो ही बराच आत-बाहेर होता असे मला आठवते. मग मात्र पुन्हा फिटनेस सुधारून करीयरच्या दुसर्‍या इनिंग ला आला आणि पहिल्यापेक्षा चांगला बोलिंग करू लागला.

आणि हा २००७ चा इंग्लंड मधला 'जेली बीन्स' चा एपिसोड. पीटरसन वगैरे लोकांनी झहीर ला तो बॅटिंग करत असताना सतावल्यावर मग जेव्हा तो बोलिंग ला आला, तेव्हा पेटलेला होता. ट्रेण्ट ब्रिज ची ही कसोटी त्याने खतरनाक बोलिंग करून जिंकून दिली व आपण इंग्लंड मधे बर्‍याच वर्षांनंतर मालिका जिंकलो.

यानंतर २००८ मधे त्याच्या जोडीला इशांत शर्मा आल्यावर ती २-३ वर्षे झहीर-इशांत ही जोडी जबरी जमली. मग २०११ च्या सुमाराला अनेक मोठ्या संघांविरूद्ध मॅचेस जिंकून टेस्ट मधे पहिले रँकिंग व नंतर २०११ चा वर्ल्ड कप हे त्याचे महत्त्वाचे योगदान. या कप मधे त्याने नवीन बॉल वर फार भेदक बोलिंग केली नसेल, पण काही ओव्हर्स नंतर जवळजवळ प्रत्येक वेळेला जेव्हा धोनीने त्याचा स्पेल आणला तेव्हा त्याने विकेट मिळवून दिली.

सुंदर बॅटिंग प्रमाणेच सुंदर अ‍ॅक्शन असलेल्यांची बोलिंगही बघण्यासारखी असते. त्या दृष्टीने झहीर हा ही इम्रान, होल्डिंग, कपिल, डोनाल्ड च्या रांगेतला. त्याची डिलीव्हरीच्या आधीची उडीसुद्धा आधीच्या अ‍ॅक्शनच्या र्‍हिदम मधेच आलेली असे. तसेच विकेटनंतरचे सेलिब्रेशन सुद्धा एकदम वेगळे होते. दोन्ही हात पसरून पळत बॅट्समनच्या दिशेने येणारा झहीर कायम लक्षात राहील. कारकीर्दीच्या उत्तरार्धात तो इतर बोलर्स ना मार्गदर्शनही खूप करत असे असे वाचलेले आहे. त्याच्यात जर तसे काही कौशल्य असेल तर संघाबरोबर किमान बोलिंग कोच म्हणून त्याचा विचार झाला पाहिजे.

एकूण मागच्या दशकातील टीम्स नी एक पॅशन निर्माण केली होती, त्यात झहीरही होता. २०११ च्या कप मधल्या कायम लक्षात राहिलेल्या २-३ इमेजेस पैकी एक म्हणजे भारताची फिल्डिंग चालू होत आहे. रन अप च्या टोकाला केस रंगवलेला ओल्ड हॉर्स झहीर खाली मान घालून बॉल ग्रिप करून काही सेकंद फोकस करत शांत उभा आहे. सगळे कव्हरेज एक मिनीट पॉज होते, मग रन-अप सुरू, प्रेक्षकांचा आरडाओरडा सुरू, त्यानंतर ती क्लासिक फास्ट बोलर अ‍ॅक्शन. पुढच्या एक दोन ओव्हर मधे पार्टनरशिप तोडण्याची गॅरण्टी!

गुडबाय झहीर, आम्हा फॅन्स तर्फे धन्यवाद व शुभेच्छा!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सुंदर लिहीलेय फारएण्ड! मस्तच! अ‍ॅक्शनबद्दल अगदी अगदी!

https://www.youtube.com/watch?v=YzVnlWS-7GI इथे २०११ वर्ल्ड कप क्वार्टर फायनलमध्ये झहीरने ओल्ड बॉलने हसीचा बोल्ड काढलेला बघा. क्वालिटी खास नाही, पण रीप्लेमध्ये अंदाज येईल. हसी आणि पाँटिंगची जोडी जमू न देणे खूप महत्वाचे होते. & bang he delivers!

मस्त वर्णन केले आहे...
सगळ्याच आठवनी ताज्या झाल्या...

खूप मस्त लिहीलेय फा.:स्मित: दिसायलाही देखणा असा हा खेळाडु रीटायर होतोय हे जरा जड जातेय.:फिदी:
आत्ताच लाईव्ह मुलाखत बघीतली. श्रीरामपूरचा आहे हा त्यामुळे मराठीतच छान बोलला.

गुडबाय झहीर, आम्हा फॅन्स तर्फे धन्यवाद व शुभेच्छा!>>>>+११११११

मस्त लेख. मला असे नेमक्या मॅचेस कधीच आठवत नाहीत. पण आता तू दिलेल्या लिंकमधले व्हीडीओज पाहताना त्या मॅचेस आठवत गेल्या.

झहीर खान बॅट्समनकडे ज्या नजरेने बघायचा, ती पन कमाल होती. खुन्नस वगैरेपेक्षा मला बर्‍याचदा ती नजर मिश्किल वाटायची.

फरएण्ड, छान लिहीलं आहेस. दुखापतींनी करीअरच्या मधे मधे ब्रेक पडले नसते तर आज खूप फायदा झाला असता संघाला. जहीरची सकाळी छोटीशी मुलाखत बघितली. तसाच साधा राहिला आहे पठ्ठा.

मस्त लिहलय्स..
मला पण आवडायचा..
तो आल्या आल्या मग युवराज आणि कैफ सुद्धा आले.. हे त्रिकुट मैदानावर बघायला मस्त वाटायच मला..

सुंदर आढावा

इंजिनियरिंग (गव्हर्न्मेंट मधे मिळालेली सीट) सोडून क्रिकेट सारख्या बेभरवशी क्षेत्रात यायचं म्हणजेच किती भारी !

छान आहे लेख .. आवडला .. Happy

मयेकरांनीं दिलेली ब्रेट ली बरोबरची आठवण ही खास एकदम ..

छान लिहिलंय फारएण्ड.. नंदिनीच्या पूर्ण प्रतिक्रियेला +१
भम ब्रेट ली ला बॅटने दिलेले उत्तर भारीये !

जबरी लेख फारेण्ड, वाद घालायला काही ठेवलेच नाहीस Happy

बॉडी लॅगवेज या एकाच फॅक्टरमुळे तो माझा सर्वाधिक आवडता. फास्ट बॉलरला साजेशी अशी आणखी कोणत्या भारतीय फास्ट बॉलरकडे गेल्या 20 वर्षात मी पाहिली नाही. नवा बॉल, रिव्हर्स स्विंग, यॉर्कर्स, अभावानेच असे होते की एखादा भारतीय फास्ट बॉलर बॉलिंगला आलाय आणि आता हा विकेट काढेल म्हणून आपण आशेने बघतो. स्मिथबाबत तर त्याचा प्रत्येक बॉल मी असा बघायचो जणू काही मी स्लिप फिल्डींगलाच उभा आहे.

उत्तरार्धात जास्त प्रभावी होणे श्रीनाथ बाबतीतही बहुधा झालेय. माझ्या काळातला नसल्याने मी त्याची पुर्ण करीअर फॉलो नाही केलीय.

झहीर युवराजचे पदार्पण ही एक यादगार मालिका होती..

बाकी विडिओ बघून नंतर येतो परत...

सुंदर लिहीले आहेस फारेंडा. मुळात मला लेफ्टी फास्ट बॉलरचे भयंकर अ‍ॅट्रॅक्शन असल्याने घावरी नंतर झहीरच आवडता बॉलर आहे.

सुंदर लेख!!!

जेव्हा पहिल्यांदा झहिरला पाहिले तेव्हा लक्षात राहिली ती त्याची अ‍ॅक्शन. एव्हढी सहजसुंदर अ‍ॅक्शन खुप कमी फास्ट बॉलर्सची पहायला मिळते.

गुडबाय झहीर, आम्हा फॅन्स तर्फे धन्यवाद व शुभेच्छा!>>>> +१००

सुंदर लेख !

२००३ ची जखम झहीरला खुप झोंबली होती. २०११ मध्ये त्याने जबरदस्त पर्फॉर्मन्स देउन त्याची कसर भरून काढली

जेव्हा पहिल्यांदा झहिरला पाहिले तेव्हा लक्षात राहिली ती त्याची अ‍ॅक्शन. एव्हढी सहजसुंदर अ‍ॅक्शन खुप कमी फास्ट बॉलर्सची पहायला मिळते. >> अगदी अगदी .

२००३ ची जखम झहीरला खुप झोंबली होती >> आम्हालाही . Happy

त्याचा एक कॉलेजचा मित्र आमचा कलिग होता त्यावेळी , म्हणजे नुसता तोंडओळख वगैरे नाही , चांगला जिवश्च मित्र. त्या मॅचनंतर , आमच्या टीम लीड ने ह्याला घाल घाल शिव्या घातल्या .

खुन्नस देऊन विकेट घेणारा … भारतीय फास्ट बॉलर! आणि कमालीची सुंदर गोलंदाजी आता फक्त युट्यूबवरच पहायला मिळणार Sad

ऑल द बेस्ट!

लेख आवडला पण शेवटी घाईत गुंडाळलास असे वाटले, विशेषतः त्याचा उत्तरार्ध अधिक interesting होता म्हणून.

कारकीर्दीच्या उत्तरार्धात तो इतर बोलर्स ना मार्गदर्शनही खूप करत असे असे वाचलेले आहे. त्याच्यात जर तसे काही कौशल्य असेल तर संघाबरोबर किमान बोलिंग कोच म्हणून त्याचा विचार झाला पाहिजे. >> +१

जर माझी आठवण मला दगा देत नसेल तर झहीरने त्याची २००४ च्या आसपास (नक्की वर्षे आठवत नाही) त्याची action remodel केली. त्याआधी त्याच्या landing step मधे काहितरी झोल झाला होता ज्यामूळे injury concern वाढला होता. त्यात काहितरी बदल केला गेला. नेहराचा पण तोच problem होता.

Pages