मना तुझे मनोगत - ३

Submitted by युनिकॉर्न on 13 October, 2015 - 09:54

आधीच्या भागानंतर बरीच गॅप आल्यामुळे आधीच्या भागांची लिंक देतो आहे.

मना तुझे मनोगत - १ - http://www.maayboli.com/node/54052
मना तुझे मनोगत - २ - http://www.maayboli.com/node/54066

*************************************************************************************************************

"हॅलो..."

"तू फोन करणार होतास ना?"

"हो.. म्हणजे, योगेशला विचारतो. त्याला माहिती असेल कदाचित." राहुलनी फोन योगेशला दिला.

"हॅलो...., मी योगेश बोलतोय.."

"सॉरी, फोनवर राहुल आहे कळालच नाही मला!"

"हो..."

"तुझ्या घरी फोन केला होता तेव्हा तू राहुलकडे आहेस असं सांगितल तुझ्या आईनी.."

"हो अगं, आज मी इकडे आलोय जरा."

"एकदम काय असं?"

"असच, म्हणजे प्रोजेक्टच ठरवतोय ना"

"पण तुम्ही वेगवेगळ्या ब्रँचला आहात ना?"

"हो ते तर आहे....."

राहुलचे आई, बाबा आणि ताई त्याच खोलीत बसून टीव्ही बघत असले तरी सगळं ऐकत आहेत हे आता कसं सांगायचं हिला असा योगेशला प्रश्न पडला होता.

"मी उद्या देतो ना तुला पुस्तक" योगेशला अचानक सुचलं!

"कोणतं पुस्तक?"

"अगं राहुलचं झाल्यावर मी पण घेतलं जरा बघायला. झालच आहे माझं वाचून. आज संपवतो आणि उद्या देतो तुला परत."

"तिथे इतर लोक आहेत का?"

"हो हो"

"मग दुसर्‍या खोलीत जाऊन बोल ना"

"नाही ग.. आज नाही जमायचं. उशीर झालाय ना बराच. उद्या नक्कि देतो."

"बरं. नंतर फोन कर मग"

"ओके. बाय."

इतका वेळ टी व्ही मधे डोकं घालून बसलेल्या ताईसाहेबांना अचानक वाचा फुटली.

"कोण रे ही अबोली?"

"आमच्या ग्रुप मधेच आहे" इति राहुल.

"कधी ऐकलं नाही आधी तिचं नाव?"

"तशी फार नसते ना ती"

"म्हणजे?"

"अगं म्हणजे कुहु वगैरे सारखी नेहमी येत नाही, अधुन मधुन येते"

"तुमच्याच कॉलेजमधे आहे का?"

"नाही."

"मग तुमची ओळख कशी?"

"तू काय सी आय डी आहेस का ग? तुला काय करायचय?"

"चिडायला काय झालं एवढं? आधी कधी हिचा फोन आला नव्हता म्हणून विचारलं."

"मग आज आला, काय करणार आहेस तू?"

"मी काय करणार? नुसतं विचारायचं पण नाही का?"

"नाही."

"कोणतं पुस्तक आणलं आहेस तिचं?"

"तुला काय करायचय?"

"एवढा का चिडतोयस? सांग कि सरळ"

"इलेक्ट्रीकल मोटर डीझाईन. झालं?"

"एरवी पी एल लागली तरी तुम्ही पुस्तक विकत घेतलेली नसतात. ह्या वेळी आधीच कशी काय तयारी?"

"ए बाई का डोकं खातियेस? ते बघ ना तुझं सिरियल."

"आई, बघ ना हा माझ्याशी कसा बोलतोय."

"आई चा काय संबंध ह्यात? तुच भोचकपणा करतियेस उगाच"

"आई, बघ ना हा कसा ओरडतो माझ्यावर..."

"राहुल- आदिती गप्प बसाल का जरा? कशाला उगाच भांडताय? राहुल जा रे तू आत. तुझं आणि योगेशचं ताट वाढलय. जेवायला बसा." आईने दटावलं तसे दोन मित्र आत पळाले आणि ताई गप्प झाली.

जेवता जेवता राहुल म्हणाला, "योग्या, ही तर फक्त माझी ताई होती.. नंतर सगळा ग्रुप असा चौकशा करेल हे कळतय का तुला?"

"हो.... मग?"

"मग काय मग? म्हणुनच म्हणतोय कि ग्रुप मधे सांगुन टाका हे तुमचं"

"नाही नको, इतक्यात नको."

राहुल गप्प झाला. मग म्हणाला, "एकदम इकडे फोन कसा केला रे तिनी?"

"मी तिला नंतर फोन करेन म्हणालो होतो ना. इकडे आलो म्हणून नाही केला. तर तिनीच केला."

"आयला! भारीच कि राव!" राहुलच्या स्वरात आश्चर्याबरोबर साशंकपणा होता.

"असं का म्हणतोस"

"चार तास नाही झाले भेटून आणि एवढी 'तळमळ'?" शेवटच्या शब्दावर जोर देत राहुलनी विचारलं.

"आता आजच जमलय ना आमचं. म्हणून असेल..."

"असेल बुवा..." राहुलच्या ह्या चिडवण्यावर योगेश नुसताच गप्प राहिला.

************************************************************************************************************

नंतरच्या एक दोन महिन्यात त्यांच्या गाठीभेटी हळुहळु वाढत गेल्या. आठवड्यातुन एक दोन वेळा भेटणारे ते दोघ सद्ध्या दर दिवसा आड भेटायचे. कॉफी हाऊस, हॉटेल मधे सुरु झालेल्या भेटी युनिव्हर्सीटीच्या आवारात बाकावर, झाडाखाली होऊ लागल्या. कुठेतरी भेटून गप्पा मारायच्या व कॉफी पिऊन घरी सुटायचं हा नित्यक्रम झाला होता. भेटल्यावर आज ग्रुपमधल्या कोणाचा फोन आला होता आणि त्याला मी काय कारण देऊन आले/आलो हा गप्पांचा पहिला विषय असायचा! सुट्ट्या असल्यामुळे सगळी मित्रमंडळी तशी मोकळीच होती आणि रोज काही ना काही प्लॅन ठरायचेच. घरून फार कटकट होऊ नये म्ह्णून मग ते दोघ त्याच वेळात भेटायचे. शिवाय बाकि मित्रमंडळी तेव्हा एकत्र कुठेतरी टाईमपास करत असतील तेव्हा ह्यांना पकडलं जायची भिती नाही, हा दुसरा फायदा!!. मग ग्रुपला कधी दोघ ठरवून अशी कारणं सांगायचे कि कोणाला ते एकत्र असल्याचा संशय येऊ नये. किंवा कधी कधी दोघांपैकी एक जण यायचा नाही म्हणजे ते नेहमी एकाच वेळी येत नाहीत हा पण संशय येऊ नये. राहुलला अजुनही ह्या गुप्ततेचं कारण कळत नव्हतं पण योगेश आणि अबोली त्यावर ठाम होते. सगळं "मॅनेज" करता करता सुट्ट्या कधी संपल्या कळालच नाही.

आज आता दोघांनी शहरा बाहेर भटकायला जायचं ठरवलं होतं. कॉलेज सुरु होऊन महिनाभर झाला होता. त्यामुळे हल्ली प्रत्यक्ष भेटी कमी झाल्या होत्या. योगेशनी वर्ष सुरु झाल्या झाल्या लागलीच प्रोजेक्ट टीम बनवून एक चांगला प्रोजेक्टही मिळवला होता. आणि तो त्याच्या तीन मित्रांबरोबर आठवड्यातुन एकदा प्रोजेक्टच्या कामासाठी जायला सुद्धा लागला होता. पण अजुन सगळं एवढ नवीन होत कि तिथे काम फारसं नसायचच. मग तिथुन बाहेर पडल्यावर मित्रांना घरी जातो सांगुन हे साहेब अबोलीला भेटायला यायचे.

आज योगेशनी "घरी काम आहे" असं सांगुन प्रोजेक्ट्ला दांडी मारली होती. त्याची जुनी एम ५० युनिव्हर्सीटीमधे पार्क करून दोघं अबोलीच्या नवीन अ‍ॅक्टीव्हा वर बाहेर पडले.

जूनचा महिना असल्यामुळे पाऊस नुकताच सुरु झाला होता. हवा मस्त गार होती. ते अजून गावाबाहेर पडले नव्हते पण रस्त्यावर फारशी रहदारी नव्हती. योगेश गाडी चालवत होता. आजपर्यंत हातात हात घेऊन फिरणारी, कधीतरी त्याच्या खांद्यावर डोकं टेकणारी अबोली आज दोन्ही हातांनी त्याच्या कमरेला विळखा घालुन, त्याला बिलगून बसली होती. त्याच्या खांद्यावर हनुवटी टेकून बसल्यामुळे कानाजवळ जाणवणारा तिचा श्वास योगेशला रोमांचित करत होता. एरवी रस्त्यावर येता जाता दिसणार्‍या इतर प्रेमी युगुलांसारखेच आजे ते हिंडत होते आणि एरवी अशा जोडप्यांकडे बघून डोळे फिरवणार्‍या योगेशला आज पहिल्यांदाच त्यांच्यासारखं वागताना फार मस्त वाटत होतं. मैलो न मैल असच जात रहावं असं वाटायला लागलं होतं. अचानक अबोली म्हणाली, "जरा बाजुला थांबतोस का?"

"का ग? काय झालं?"

"थांब ना पटकन."

त्यानी अ‍ॅक्टीव्हा रस्त्याच्या बाजुला थांबवली.

अबोलीनी चेहर्‍यावर स्कार्फ गुंडाळला.

"इथे जवळच बाबांचे एक मित्र रहातात. त्यांनी बघितलं तर उगाच कटकट होईल."

योगेशला ते पटलं आणि अ‍ॅक्टीव्हा परत निघाली.

काहीतरी विचारायचं म्हणून योगेशनी विचारलं, "तुमचं प्रोजक्टच ठरलं का ग?"

"छे.. इतक्यात कुठे?"

"पण तू, कुहु आणि अजुन एक दोन जणी मिळून करणार म्हणाली होतीस त्याचं काय झालं?"

"अरे आमचं प्रोजेक्ट टीम करायचं ठरलय फक्त."

"मग प्रोजेक्ट शोधताय का?"

"नाही अजून"

"अजून सुरु पण नाही केलत? अगं आतापासून नाही केलत तर नंतर राडे होतील. आमचा गाईड तर आम्हाला सरळ म्हणाला कि तुम्हाला झेपलं नाही तर अक्खा प्रोजेक्ट बदलायला लागेल. तसं काहीतरी झालं तर वेळ नको का?

"हम्म, बघू."

"आणि कँपस ला कंपन्या येतात तेव्हा सांगायला चांगलं असतं प्रोजेक्टचं."

"आमच्याकडे तुमच्या सारख्या भरमसाठ कंपन्या येत नाहीत. आल्या तर दोन चार येतात फक्त."

"ओह .... मग तर तुम्हाला प्रोजे़क्ट भारी केला पहिजे कारण बर्‍याचदा तर प्रोजेक्ट करतो त्याच कंपनीत चान्स मिळतो त्यांना काम आवडलं तर."

"हम्म, बघू.."

"कधी ठरवणार आहात मग पुढचं"

"बघू... अजुन कॉलेज सुरु होतय"

"अगं एक महिना झाला कि आता."

"कुहु पहिले दोन वीक्स नव्हती. आता बोलू एकदा एकत्र भेटलो कि"

एवढ्या महत्वाच्या बाबतीत ही एवढी निवांत कशी असा प्रश्न योगेशला पडला पण तो पुढे काही बोलला नाही. त्याचं कॉलेज तसं नावाजलेलं, हुशार मुलांचं समजलं जाई. सहाजिकच वर्गातल्या वर्गात मुलांमधे स्पर्धा असे. कँपसला चांगल्या चांगल्या कंपन्या येत असल्यामुळे शेवटच्या वर्षाला चुरस अजुनच असणार होती. त्या मानानी अबोलीचं कॉलेज तेवढ नावाजलेलं नव्हत आणि त्यांच्याकडे कंपन्या पण फारशा यायच्या नाहीत त्यामुळे एकुणच कारभार तसा निवांत असावा योगेशला वाटून गेलं. मग बराच वेळ दोघही काहीच बोलले नाहीत.

गावाबाहेर आल्यावर एक छान तळं बघून योगेश थांबला. अ‍ॅक्टीव्हा रस्त्याच्या कडेला पार्क करून दोघं एका झाडाखाली बसले. आजुबाजुला मस्त गर्द झाडी होती. त्यामुळे रस्त्याच्या जवळ असूनही त्यांना छान आडोसा मिळाला होता. बसल्या बसल्या, नेहमीच्या सवयीचं असल्याप्रमाणे अबोलीनी त्याच्या खांद्यावर डो़कं टेकवलं. तिच्या अशा जवळिक दाखवण्यानी योगेश परत एकदा सुखावला. आज प्रथमच तिच्या केसांचा सुगंध तो अनुभवत होता. तिचे मऊ रेशमी केस त्याच्या गालांवर जाणवत होते. एकदा त्याला वाटलं कि स्वतःच्या हातानी तिच्या पोनीटेल चा चाप काढावा आणि ते लांब केस मोकळे करावे कारण त्याला तिचे मोकळे सोडलेले केस फार आवडायचे. पण तसं केल्यानी आपण मर्यादा ओलांडू का, तिला काय वाटेल अशी भितीही त्याला वाटत होती. आणि तिलाच केस मोकळे सोड असं सांगायला जाम अवघडल्या सारखं वाटत होतं. त्याने एक हात तिच्या खांद्या भोवती टाकल्यामुळे अबोली त्याला बिलगून बसली होती. तो स्पर्ष असाच रहावा असही त्याला वाटत होतं. काही न बोलता त्या जवळिकेचा आनंद तो तसाच साठवत राहिला.

"काही म्हणालास?" मधेच तिनी विचारलं

"नाही गं.. काही नाही.."

"हम्म..."

"तुझ्या...."

"माझ्या काय?"

"तुझ्या केसांचा वास फार मस्त येतो" योगेश चाचरत म्हणाला.

अबोलीने पटकन त्याच्याकडे पाहिलं. तिच्या चेहर्‍यावर आनंद, हसू आणि लज्जेच एक अनोखं मिश्रण होतं.

"तुला एवढा आवडला?"

"हो...."

"तुला भेटायला यायच्या दिवशी मी नेहमी हाच शॅम्पू लावते." ती हळूच म्हणाली आणि दोघही एकमेकांकडे बघून हसले.

"ए... काय चाललय रे तिकडे !" मागून आवाज आला तसे दोघही एकदम दचकले.

त्यांच्या अ‍ॅक्टीव्हा शेजारीच बाईक लावून एक माणूस उभा होता.

"पब्लीक प्लेस मधे काय धंदे करताय? आं ???" तो दरडावणीच्या स्वरात म्हणाला.

"काही नाही करत आहोत हो.. नुसते बसलोय".. गर्भगाळित झालेल्या योगेशचे प्रामाणिक उत्तर!

"मला काय दिसत नाही का? चला पोलीस स्टेशनवर. तिकडे साहेबांना काय ते सांगा.. चला चला उठा."

************************************************************************************************************

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बर्‍याच दिवसांनी आला हा भाग. मला वाटलं इतर काही कथांप्रमाणे ही पण कथा अपूर्ण रहाणार कि काय...

हा भाग चांगला जमलाय. आता पुढचे भाग पटापट येऊद्यात.