रंगीबेरंगी पुलाव

Submitted by योकु on 10 October, 2015 - 13:08
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

IMG_0020.jpg

- एक ते दीड वाटी तांदूळ; कुठलाही असेल तरी चालेल पण बासमती असेल तर चांगले
- प्रत्येकी एक लाल, पिवळी, हिरवी आणि असेल तर केशरी भोपळी मिरची
- बोगातु चे ज्युलिअन्स (पौष्टीकपणा :p)
- वाटीभर फ्लॉवरचे तुरे
- ८/१० काळीमिरी
- २ तमालपत्रं (तेजपान)
- २ लहान दालचिनीचे तुकडे
- चमचाभर जिरं
- २ लसूण पाकळ्या
- २ लहान कांदे
- चवीप्रमाणे मीठ

क्रमवार पाककृती: 

चिराचिरी -
- बोगातु चे ज्युलिअन्स करावेत
- सिमला मिर्चीचेही ज्युलिअन्स करावेत
- कांदा उभा, पातळ चिरावा
- लसूण सुरीच्या कडेनी दाबून चिरडावा मग त्याचे बारीक तुकडे कापावेत. अश्यानी बरोबर हवं ते टेक्शर मिळतं
- फ्लॉवरचे मध्यम आकाराचे तुरे करावेत

तांदूळ स्वच्छ धूवून निथळत ठेवावे.
आता कमीतकमी दोन ते अडीच लिटर पाणी उकळायला ठेवावं. त्यात चिमूट्भर जिरं, थोडी काळीमिरी अन चमचाभर मीठ घालावं. झाकण घालून पाणी उकळू द्यावं. मग तांदूळ वैरावा अन आता झाकण न ठेवता उकळत्या पाण्यात तांदूळ ७ ते १० मिनिटं उकळावा. बोटचेपा शिजला की पाणी काढून टाकावं अन तयार भात एखाद्या रोवळीत निथळत ठेवावा. जरा चिकट वाटत असेल तर गार पाणी घालून काट्यानी मोकळा करावा.

एका मोठ्या भांड्यात, तेल/ बटर गरम करावं. त्यात मिरीदाणे, तमालपत्रं, दालचिनी घालून जरा परतावं.
कांदा घालावा, जरा बदामी होऊ द्यावा. मग फ्लॉवर अन बोगातु ज्युलिअन्स घालावे. परतून झाकण घालून फक्त वाफेवर शिजवावेत.
नंतर मिरच्या घालून परतावं. मिरच्या करकरीत राहायला हव्यात जरा. तरच रंग टिकतो.
तयार निथळत ठेवलेला भात घालावा. मीठ घालावं. हलक्या हातानी परतावा.
एक वाफ आली की गरमगरमच वाढावा.

IMG_0018.jpg

वाढणी/प्रमाण: 
वर दिलेल्या तांदूळाच्या प्रमाणात केला तर दोन लोकांना जेवण म्हणून पुरावा
अधिक टिपा: 

- अजून सिझनिंग हवं असल्यास इटालिअन पास्ता सिझनिंग घालता येईल. तिखटपणा हवा असल्यास चिलिफ्लेक्सही वापरता येतील; पण मिरीचा तिखटपणा जास्त चांगला लागतो
- खरंतर हव्या त्या भाज्या घालता येतील यात
- वर दिलेल्या कृतीनी भात केल्यास कुठल्याही तांदूळाचा मस्त शीत अन शीत मोकळा असा भात जमतो. मी सुद्धा साधा नेहेमीचा कालीमूछ तांदूळ वापरलाय

माहितीचा स्रोत: 
प्रयोग
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे. बोगातु काय प्रकार आहे? नेटवर शोधायचा प्रयत्न केला पण मला स्पेल्लिन्ग माहित नसल्याने हाती काही लागले नाही

नो बाकी काहीच मसाला नाही. जे घेतलेले आहेत त्यामुळे फ्लॉवरचा जो एक गंध असतो तो लपतो, मिरीचा सुवास मस्त लागतो. मी इटालिअन पास्ता/ पिझा सिझनिंगही घातलं होतं थोडं; नंतर मात्र वाटलं की नसतं तरी चाललं असतं.

मस्त

ह्म्म.. मध्ये गा बघुन गाजर वाटलेले पण मागचेपुढचे संदर्भ लागले नाहीत Happy

करुन पाहिन नक्कीच. आमच्याकडे तसेही मसाले घातलेले फारसे आवडत नाहीत.