बोधकथा - ५ चिकन आणि १ वेज, मोमोज!

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 October, 2015 - 06:34

मोमोज हे प्रकरण भारतीय बाजारात कधी आले, याची मला नेमकी कल्पना नाही. पण मी पहिल्यांदा खाल्ले ते दोन महिन्यांपूर्वीच. तसे कुठे मॉल वा फूडकोर्टमध्ये जाणे झाले (अर्थातच गर्लफ्रेंडबरोबरच) तर वरचेवर नजरेस पडायचे, मात्र कधी खाणे झाले नव्हते. याचे एक प्रमुख कारण म्हणजे माझ्या गर्लफ्रेंडच्या ते नावडीचे आणि आम्ही दोघे बरोबर असताना मी स्वतासाठी काही स्पेशल घेऊन खाणे अशी पद्धत नाही आमच्यात. तसेच एकटे असतानाही मी वडापाव आणि दाबेली पासून चायनीज भेल ते अमेरिकन चॉप्सी पर्यंत सारे खातो, पण उकडीच्या मोदकासारख्या दिसणा‍र्‍या पदार्थाला मुद्दाम पैसे खर्च करून विकत घ्यावे असे धाडस कधी झाले नाही.

असो, तर दोन महिन्यांपूर्वी पहिल्यांदा मी हे खाल्ले आणि ते चक्क आवडले!

झाले असे, मुंबईच्या ज्या उपनगरात मी कामाला आहे त्या रेल्वेस्थानकाजवळ एक फूडकोर्ट आहे. वरचेवर माझे तिथे अरबट चरबट खाणे होत असते. चायनीज पासून सौथेंडीयन अन वेजपासून नॉनवेजपर्यंत सारे काही तिथे मिळते. चारेक महिन्यांपूर्वी तिथे एक मोमो काऊंटर सुद्धा उघडला. पहिल्या दिवसापासून चांगला रिस्पॉन्सही मिळाला. पण मी मात्र सुरुवातीचा काही काळ मोमोज आपल्यासाठी निषिद्ध आहेत असे समजून त्यापासून दूरच राहिलो. तरीही तरुणवर्गात, आणि त्यातही खास करून मुलींमधली त्याची लोकप्रियता बघून माझा हा संयम फार काळ काही टिकला नाही. साधारण दोन महिन्यांपूर्वी एका बेसावध क्षणी अंडे खावे आणि संकष्टीचा उपवास तुटावा त्याप्रकारे मी मोमोज खायचा निर्णय घेऊन टाकला.

वेज मोमोज - हाफ (ईंग्रजी हाल्फ मधील ‘ल’ सायलंट) ३० रुपये आणि फुल्ल ६० रुपये.
चिकन मोमोज - हाफ ४० रुपये आणि फुल्ल ८० रुपये.

पहिल्यांदाच मी तिथला भाव काढला. नाहीच आवडले तर नासाडी नको म्हणून हाफच घेण्याचे ठरवले. वेज मोमोजमध्ये कुठल्या भाज्या टाकतात याची कल्पना नसल्याने आणि ते विचारणे अप्रशस्त वा अज्ञानाचे प्रदर्शन वाटत असल्याने चिकन मोमोजनेच सुरुवात करायचे ठरवले. कूपन सिस्टीमचा मान ठेवत ४० रुपयाचे कूपन घेतले आणि मोमोज काऊंटर वर दिले. समोरच्या वाफाळलेल्या पात्रातून एकेक करून मोमोज पार्सलच्या डब्यात भरायला सुरुवात झाली. अचानक मला सुचले वेज मोमोची देखील चव चाखून बघूया, म्हणून त्याला एका चिकन मोमोच्या जागी एक वेज मोमो द्यायला सांगितले. अर्थात, वेजची किंमत कमी असल्याने पैश्यांचा विचार करता यात माझे नुकसान आणि त्यांचाच फायदा होता. त्यामुळे माझी मागणी हरकतपात्र नक्कीच नव्हती. तरीही तो पोरगा थोडासा गोंधळलाच. पण ऐकले मुकाट.

५ चिकन मोमोज आणि १ वेज मोमो. म्हणजे एकूण ६ मोमोज!

एका वेज मोमोची किंमत ३०/६ = ५ रुपये, आणि एका चिकन मोमोची किंमत ४०/६ = ६ रुपये ६६ पैसे. ढोबळमानाने दोन अडीज मोमोज म्हणजे एक वडापाव. माझा मध्यमवर्गीय स्वभाव असले हिशोब मांडत मोमोज खायचा आनंद उचलू लागला. एका चिकन मोमोच्या जागी एक वेज मोमो घेतल्याने मी माझे १.६६ पैश्यांचे नुकसान केलेले, मात्र चवीला चेंज म्हणून हे नुकसान ठिक आहे म्हणत नकळत माझा मध्यमवर्गीय ते उच्च मध्यमवर्गीय असा प्रवास सुरू झाला होता.

त्यानंतर पुढच्या महिन्याभरात साधारण ५ ते ६ वेळा माझे मोमोज खाणे झाले. प्रत्येकवेळी असेच, ५ चिकन आणि १ वेज या पद्धतीनेच ऑर्डर करत खाल्ले. अश्यातच एकदा गणपतीच्या दिवसांत मोमोज खायची लहर आली. मात्र आईने, ‘किमान हे पाच दिवस तरी शाकाहार कर रुनम्या’ अशी विनंतीवजा ताकीद दिली होती. त्यामुळे आयुष्यात पैल्यांदाच मी मनाची तयारी करत संपुर्णपणे वेज मोमोज खायचा निर्णय घेतला. वेज मोमोजसाठी कूपन घेताना वा काऊंटरवर ऑर्डर करताना नाही म्हटले तरी जरा शरमेचेच वाटत होते. नेहमीचा शिरस्ता मोडत मोठ्या संकोचानेच त्या पोरग्याकडे मी फक्त वेज मोमोज मागितले. त्यातल्या त्यात एक चांगले होते की वेज असो वा चिकन, बाहेरून सारे मोमोज सारखेच दिसत असल्याने मी आज वेज मोमोज खाणार आहे हे ट्रेनमध्ये कोणाला समजणार नव्हते. माझी नेहमीची जागा पकडत मी पार्सलचा डब्बा उघडला, आणि बघतो तर काय ...................

विश्वासघात !

त्या काऊंटरवरच्या पोरग्याने माझी बावळटांत गिणती करत मला मोमोजच्या गिणतीत फसवले होते. फक्त पाचच मोमोज दिले होते. मोमोजचा आकार आणि भूकेचा विचार करता चारही पुरेसे होते पण अश्यावेळी म्हणतात ना, भूक उगाचच वाढते.

असो, चरफडण्याव्यतिरीक्त माझ्या हातात काहीही नव्हते. आता दुसर्या दिवशीच काय ते याचा सोक्षमोक्ष मी लाऊ शकणार होतो, आणि तो मी लावलाच.

तर मिळालेले उत्तर त्यापेक्षाही अनपेक्षित होते.

एका हाफ प्लेटमध्ये फक्त ५ मोमोजच येतात. मला दरवेळी माझ्या अजब फर्माईशवर तो जो सहावा वेज मोमोज द्यायचा तो त्या ५ चिकन मोमोजच्या व्यतिरीक्त द्यायचा. त्याच्या त्या गोंधळण्याच्या मागचे कारण मला आता समजत होते. मात्र त्याच्या या अव्यावहारीक साधेपणाला चांगुलपणा म्हणावे की बावळटपणा हे समजत नव्हते.

काही का असेना. मी जवळपास पाच ते सहा वेळा अश्या प्रकारे एकेक अतिरीक्त मोमो खात जवळपास एक एक्स्ट्रा प्लेट हादडली होती. उगाचच माझा आत्मसन्मान जागा होऊ लागला. त्या काऊंटरवरच्या पोरग्याच्या नजरेत मी एक फुकट मोमो खाणारा आहे असे मला वाटू लागले. तसेच नकळतपणे मी त्या फूडकोर्टवाल्यांचे एक प्लेट मोमो फुकट खाल्ले होते. अचानक माझ्या प्रामाणिकपणालासुद्धा कधी नव्हे ते जाग आली. आणि मी त्या एक्स्ट्रा प्लेट मोमोजचे पैसे चुकते करण्याचा निर्णय घेतला. जे काही घडले ते सांगून चुकते केलेही..

चारेक दिवसांनी घरचे गणपती गेले आणि मला चिकन मोमोज पुन्हा खुणावू लागले. पुन्हा चिकन मोमोजचे कूपन काढले आणि काऊंटरवरच्या पोरग्याच्या हाती सोपवत पुन्हा एकदा माझी अजब ऑर्डर केली. यावेळी स्वताहूनच त्याला चार चिकन आणि एक वेज मोमोचा हिशोब समजवायच्या आधी तोच म्हणाला,

"साब उस दिन आपने शेट को ये सब क्यू बोला? चिल्लाया वो मेरे उपर. हात भी उठाया. भाई बीच मे नही आता तो वापस गाव जाना पडता था .."

क्षणभर मला काय बोलावे हे सुचेनासे झाले. त्याला सॉरी बोलायलाही जीभ धजावली नाही. कारण मी जे केले त्याला प्रामाणिकपणा की बावळटपणा म्हणावे हे माझे मलाच समजेनासे झालेले.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चेन्नईमध्ये अनेक बर्मीज स्टॉलवर क्लास मोमोज मिळतात. मागे एका फूड वॉकला (ऊफ्फ-- वॉल्कला) खाल्ले होते.अप्रतिम चव होती.

दिल्ली विरुद्ध चेन्नई.. विरुद्द आमची नमु.. प्रत्येकाचे मोमोतील मसाला भिन्न असावा, पण मुळात मोमो हा तिबेटी पदार्थ असून तो मूळचा मांसाहारी पदार्थ आहे ज्यात याकचे मांस भरले असते... असे थोडी शोधाशोध करता माझ्या हाती लागलेले. बाकी धागा मोमोचा नाहीये हे मला ठाऊक आहे Happy

रिया, थोड्यावेळासाठी असे समजा की मी जय आहे आणि तुम्ही अदितीचे वडील आहात, आणि आता मला सांगा तुम्हाला एक्झॅक्टली काय कैच्याकै वाटले. कारण नुसते कैच्याकै बोलून लिखाण रिजेक्ट करणे हे सोल्युशन होऊ शकत नाही, तर तुम्हाला ते समोरच्याला योग्य शब्दांत सांगताही आले पाहिजे. तुम्ही इथे मला सिनिअर आहात, कित्येकांचे लेख वाचले आहेत आणि मला तुमच्या अनुभवातून शिकायचे आहे Proud Light 1

बोअर आणि कै च्या कै तर आहेच पण बालिश आणि असंबंधं सुद्धा!

काहितरी मोठे गर्भित, गहन बोधामृत पाजण्याचा आव आणून निकृष्टं, बेचव खरडलेलं आहे.
बोधकथा म्हणे- काय बोध घ्यायचा/द्यायचा आहे ते एका वाक्यात सांगता का जरा.

हुप्पाहुय्या,
काही अंशी सहमत!
म्हटले तर साधासरळच किस्सा. अगदीच प्रत्येकाच्या आयुष्यात घडतो अश्या कॅटेगरीतील नसला तरी ज्याच्या आयुष्यात घडतो त्याला भारी वगैरे वाटावे असे यात काही नाही. तरीही लिहावासा वाटला. तसे तर आपण आयुष्यातील प्रत्येक अनुभवातून काही ना काही शिकतच पुढे जात असतो, पण काही अनुभव आपण बोध घेतल्यासारखे मनाच्या कप्यात साठवतो. हा मला किमान माझ्यासाठी तरी तसा वाटला. म्हटले तर चार ओळींचाच किस्सा, चार ओळीतच सांगण्यात मजा नाही म्हणून चार पॅराग्राफ पाडले. पण गहन बोधामृत वगैरे पाजण्याचा आव आणायचा नक्कीच नव्हता. स्वत:ला बोध घेण्यासारखे यात काही मिळाले, म्हणून हा किस्सा माझ्या आयुष्यात घडणार्‍या इतर किश्यांपेक्षा वेगळा वाटल्याने बोधकथा असे शीर्षक दिले. ईतकेच!

बाकी संतांनी म्हटलेच आहे,
घेतला तर बोध, नाहीतर आपल्याच अंतरंगाचा शोध Happy

तळटीप - इथेही ध ला ध जोडलाय, गहन गर्भित अर्थ शोधायला जाऊ नका Wink

सर्वच प्रतिसादांचे धन्यवाद !

धन्यवाद बापू
मला तुम्ही ईतके महत्व दिल्याबद्दल जे माझ्यासाठी आपले आजवरचे संस्कार सोडलेत Happy

जोक्स अपार्ट या धाग्यावर ही प्रतिक्रिया का आली? किंबहुना हा प्रतिसाद द्यायला हा धागा का निवडलात याबाबत थोडा गोंधळ आहे. ईतर बरेच धाग्यावर मी बरेच किडे करतो पण ईथे तसे काही आढळत नाहीये. म्हणून विचारतोय. उत्तर नाही दिलेत तरी हरकत नाही.

अरे बाबा, तू करतो हे किडे असतात (तुझेच शब्द माझे नाहीत) असेही काही मला वाटत नाही, माबो माझे वैयक्तिक संस्थानही नाही, इतर धाग्यांवर तू काय 'किडे' करतो त्याच्याशी मला घेणे देणे पण नाही, हा धागा वाचला अन उगाच आत्मसन्मानका कायसे असते त्याच्या नादात तू त्या पोऱ्याचा रोजगार संपवता संपवता राहिला असे समजले (वाटले) क्षणिक असते ते तुझ्यामाझ्यासाठी, पण लोक आयुष्यातून उठू शकतात, वरतून तू हे सगळे लिहूनवगैरे मोकळा, त्यामुळे सहजच 'तू चू' वाटलास अन मी तसे स्पष्ट बोललो. असो, बोललो हीच प्रायमरी चूक झाली त्याकरता मी माफी मागतो, तुझे चालू दे भावा काय वाटेल ते Happy

पण लोक आयुष्यातून उठू शकतात, वरतून तू हे सगळे लिहूनवगैरे मोकळा>>> सोन्याबापू, एवढी समज ऋन्मेषला असती तर तुमच्या अभिषेकला डू आयडी घेण्याची गरज पडली असती का ? गिरे तो भी टांग उपर हाच या आयडीचा फंडा आहे . उगाच कशाला नादी लागताय ? तुम्ही नवीन काहीतरी लिहा झकास Happy

सोन्याबापू ओके
तसेही मला काही वाईट वाटले नव्हतेच. फक्त कारण जाणून घ्यायचे होते. बाकी माझे काल्पनिक लिखाण लोकांना खरे वाटले हेच माझे यश समजतो आणि त्यातच आनंद मानतो Happy

>>>स्वत:ला बोध घेण्यासारखे यात काही मिळाले, म्हणून हा किस्सा माझ्या आयुष्यात घडणार्‍या इतर किश्यांपेक्षा वेगळा वाटल्याने बोधकथा असे शीर्षक दिले. ईतकेच!<<<

>>>
बाकी माझे काल्पनिक लिखाण लोकांना खरे वाटले हेच माझे यश समजतो आणि त्यातच आनंद मानतो
<<

ऋ,
या दोन प्रतिक्रिया, तुझ्याच!!

ओढुनताणुन बोधकथा सदराखाली मोठ्ठा बोध मिळाला सारखे वाटले Proud इतके वर्ष घराबाहेर खावून हाफ प्लेट आणि फूल प्लेट च्या क्वान्टिन्टी बद्दल अनभिज्ञ असल्याचा बहाणा तर अगदीच न पटण्या सारखा Lol
आणि हे सर्व सत्यकथा मानणे अपेक्षित असल्यास एक नंबर कथा (y) 2017 च्या आधुनिक पंचतंत्र मालिके मधील Happy

बाकी लिखाण शैली एकदम झक्कास

हलक्या फुलक्या शब्दामध्ये अंतर्मुख करणारे लिखाण ... आपण नकळत आपल्याच तंद्रीत कधी कधी लोकांना दुखावून जातो ... काल्पनिक लिखाण असेल किंवा प्रत्यक्ष अनुभव ... सुरेख वर्णन केलाय ! छान !

स्वीट टॉकर आणि स्वीटर टॉकर धन्यवाद. एकाच व्यक्तीने कसा दोनदा प्रतिसाद दिला म्हणून गडबडलो आधी. त्यात प्रतिसादही साधारण सारखेच Happy

राहुल हो, दोन्ही प्रतिक्रिया माझ्याच
जसे सस्पेन्स कथेत शेवटपर्यंत वाचकाला शेवट नक्की काय असेल हे खात्रीने सांगता आले नाही पाहिजे तसेच अश्या रोजमर्रा की जिंदगीमधील बोधकथांमध्येही त्या कथा सत्यकथा आहेत की काल्पनिक बाता हे वाचकांना ठामपणे सांगता नाही आले पाहिजे, यातच त्यांचे यश Happy

तुझं माहित नाही पण त्या बिचार्‍या काउंटरवरच्या पोराने नक्कीच बोध घेतला असेल अश्या बावळट माणसांचं बिलिंग नीट करायला पाहिजे असा.

Pages