प्राईम-टाईम स्टार - श्री. सचिन कुंडलकर

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

श्री. चेतन दातार यांच्या मृत्यूनंतर २००९ साली लिहिलेला हा लेख -

***

एकटा राहणारा माणूस जेव्हा अचानक मरतो तेव्हा काही नाट्यपूर्ण गोष्टी घडण्याची शक्यता तयार होते. रोजच घडणाऱ्या साध्या गोष्टी अभूतपूर्व होऊन जातात. त्या एकट्या माणसाने घरामध्ये ओट्यावर काही शिजवून ठेवलं होतं, ते सावकाश नासायला लागतं. कपडे? ते वॉशिंग मशिनमध्ये धुऊन पडलेले असतात, ते वाळत घालायचे राहून जातात. कुजायला लागतात. टेबलावर दोनतीन पत्रं येउन पडलेली असतात. उघडायची राहिलेली, उघडायचा कंटाळा केलेली . त्यांतल्या एखाद्यातरी पत्रात चांगली बातमी असू शकते. नव्या प्रवासाविषयी. आपल्या नाटकाला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादाविषयी. फोन दिवसभर वाजत राहील. पण एकटा राहणारा माणूस नेहमीच फोन उचलायचा कंटाळा करतो, त्यामुळे फोन करणारे सवयीने दर तासाला प्रयत्न करत राहतील. जवळच एका हॉटेलमध्ये एकट्या राहणाऱ्या माणसाने कुणालातरी भेटायला बोलावलं होतं. एकटा राहणारा माणूस आलाच नाही म्हणून ती व्यक्ती चरफडत वाट पाहून निघून जाईल. दाराला आतून कडी लावलेली असेल. पेपरवाला पेपरही टाकून जाईल. मग साडेदहा-अकरानंतर सगळं संपूर्ण शांत. रात्री उघड्या राहिलेल्या नळाला दुपारी अचानक पाणी आलं की फिस्कारत दोधाण धबधबा वाहू लागेल. मोठ्ठा आवाज. जेव्हा दोनतीन तासांनी सोसायटीच्या टाकीतलं सगळं पाणी संपून जाईल, तेव्हा कुणीतरी दारावर पहिली थाप मारेल. मग धडका. तुमच्या मरणामुळे जगाचं प्रत्यक्ष रोखठोख नुकसान होणार असेल तरच जग एकट्या राहणाऱ्या माणसाच्या जगण्याची किंवा मृत्यूची फिकीर करण्याची शक्यता आहे.

हा एकटा राहणारा माणूस जर एकाकी माणूस असेल तर अजूनही काही गोष्टी घडतात. एकाकी माणूस मरतो तेव्हा त्याच्या स्वतः च्या वेदना शमतात, पण आजूबाजूच्या लोकांच्या जखमा उघड्या पडायला लागतात. चिघळतात. एकाकी माणूस मरताना मागे अनेक तऱ्हेचे गंड आणि एक न संपणारी भीती मागे ठेवून जातो. तो त्याच्या मरणाची जबाबदारी आपल्यावर टाकून जातो. पण आता वेळ गेलेली असल्याने आपण काहीच करू शकत नाही. तुझ्यासाठी मी काय करू शकतो? आपण पुन्हा एकदा बोलूया का?आपलं काही चुकलं असेल तर नाटकाच्या तालमीसारखं परत एकदा करून पाहूया का? तू माझ्याबरोबर दोनचार दिवस राहायला येतोस का? तुला कुठे शांत जागी जावसं वाटतंय का? काहीही शक्य नसतं . एकाकी माणूस मेलेला असतो आणि तो जाताना सर्व शक्यतांचे दोर तोडून जातो. मागे उरलेली माणसं मग आपापली नखं खाऊन संपवतात. पुढचे काही दिवस एकमेकांच्या डोळ्यांत बघायचंही टाळतात. मध्येमध्ये खाली बघून रडल्यासारखं करतात आणि मग पहिल्या स्मृतिदिनाचं कारण काढून साळसूदपणे एकत्र जमतात.

चेतन दातारने असं अवेळी जायला नको होतं, असं आपल्यापैकी प्रत्येकालाच वाटतं. आपल्या प्रत्येकाशी स्वतंत्रपणे वागत, काहींना उजेडात तर काहींना अंधारात ठेवत तो आपल्याशी खेळ खेळला. त्याने सर्व सत्ता शेवटपर्यंत आपल्या हातात ठेवली आणि दार उघडून तो ताडकन निघून गेला. माझ्याप्रमाणेच अनेकांना त्याने त्याच्या गंभीर आजाराबद्दल कोणताही सुगावा लागू दिला नव्हता. कसलीही कल्पना नसताना गेल्या वर्षी एका सकाळी ‘चेतन गेला’ असं सांगणारा फोन मला आला त्या क्षणापासून मी धुमसत राहिलो. त्या रागामुळेच की काय , त्याला शेवटचं एकदा पाहून घेण्याचीही मला इच्छा झाली नाही.

चेतन दातारला आपण कधीही भेटलेलो नसू तरी आपल्याला तो माहितीच असायचा, कारण नाटकाशी कशाही प्रकारे संबंध असलेले महाराष्ट्रातले सगळेचजण त्याच्याविषयी सतत बोलायचे. तो फार बोलायचा नाही किंवा पेपरमध्ये त्याचे फोटोही यायचे नाहीत. तो जर आपल्या शहरात आला तर त्याने आपलं नाटक पाहून बोलावं, असं वाटायचं. आपण जर कधी मुंबईला गेलो तर चेतनची नक्की भेट घेऊ, असं वाटायचं कारण तो फार आश्वासक हसायचा. रंगीबेरंगी कपडे घालायचा. तसले कपडे तो कुठून आणायचा हे त्याचं त्यालाच माहीत. शिवाय सतत वेगवेगळ्या हेयरस्टाइल्स. आज असा बघावा तर चार महिन्यांनी तसा. नाटकाचा प्रयोग बघताना नीट रोखून बघणार आणि प्रयोग संपल्यावर काहीतरी मोघम बोलून सटकणार. मग सगळ्या जगाचं आटपल्यावर ह्याचा तीन दिवसांनी फोन येणार. ‘येडझवा’ हा त्याचा आवडता शब्द असायचा. माणसं येडझवी पाहिजेत, नाटकं येडझवी पाहिजेत. येडझवं नसेल तर त्याला आवडायच नाही. त्याच्या असण्याचं जिथे तिथे एक स्टेटमेंट तयार व्हायचं. जिथे ते होणार नाही तिथे तो जायचा नाही. तो कशावरही बोलत बसला की सुरुवातीला ते साफ खोटं वाटायचं आणि थोड्या वेळाने खरं वाटायला लागायचं. त्याचं बांद्रयाच अंधारं गूढ घर. त्या घरातली भिंतभर पुस्तकं आणि त्याची जगभरातल्या गोष्टींविषयीची कडक मतं. त्याचे गावोगावचे मित्रमैत्रिणी. त्याचं मोठ्यांदा हसणं आणि त्याची भलतीसलती मस्त नाटकं. माहीमच्या शाळेत स्टेजमागच्या छोट्या खोलीत तो हळदीच्या घाऊक व्यापाऱ्याच्या टेचात एक पाय खुर्चीवर ठेवून बसणार, समोरचा फोन ओढून घेणार आणि म्हणणार, ”ए चायवाला, मी नाटकवाला बोलतोय. दो चाय भेज दे.” जगातले निम्मे लोक चेतनचं वागणं चालवून घ्यायचे आणि उरलेले त्याच्यावर रागावलेले. अधेमधे काही लोक त्याच्या वागण्यामुळे दगड लागलेल्या कुत्र्यासारखे विव्हळत फिरत असायचे, ते मुंबईत इथेतिथे सापडायचे. बराच वेळ फोन वाजू देऊन मग शांतपणे तो उचलण्यात त्याला परमानंद वाटायचा. आजच्या काळातला तो शेवटचाच माणूस जो नागपूरला एलकुंचवारांशी, मुंबईत तेंडुलकरांशी आणि पुण्यात आळेकरांशी एकाच वेळी उत्तम संवाद ठेवून असायचा. गिरीश कर्नाडांविषयी मला जे वाटतं तेच त्यालाही वाटतं, हे कळल्यामुळे मला तो जवळचा वाटायचा. चेतन दातार हे रसायन पचवायला लोकांना जर वेळ लागायचा. आपण सगळ्यांनी तर त्याच्यापुढे हात टेकलेलेच होते. पण तो आपल्यालाला सतत आजूबाजूला हवा होता. वर्ष दोन वर्षं भेटलाच नसता, कुठेतरी गायब झाला असता तरी हरकत नव्हती, पण त्याने असं मरून जायला नको होतं.

एकट्या राहणाऱ्या आणि मरून गेलेल्या माणसांच्या घरचे लोक त्यांच्या अफाट पुस्तकसंग्रहाचं नंतर काय करतात, हा मला एक नेहमी पडलेला प्रश्न आहे. कारण प्रतिभावंत माणसाच्या घरच्या लोकांना आपणही तसेच प्रतिभावंत आहोत, अस लहानपणीपासून वाटत जरी असलं तरी ते खर नसतं. अशी माणसं गेली की मी नेहमी त्या पुस्तकांचा विचार करत राहतो.

चेतनच्या नसण्यामुळे नक्की काय बिनसलं आहे, हे आत्ता लगेचच उमजेलच असं नाही. पण आपल्या इमारतीच्या पायाजवळच्या काही विटा काढल्यासारखं झालं आहे. आता आपल्याला फार जपून राहायला हवं आहे. याचं कारण म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकाला चेतनविषयी जी उमज होती, त्यापेक्षा तो जास्त विस्तृत आणि महत्त्वाचा होता. आजच्या मराठी रंगभूमीला भारतातील इतर प्रांतातील रंगभूमीशी जोडणारा तो एक भक्कम आणि महत्त्वाचा दुवा होता. आणि तसा असणारा तो एकमेव होता. कारण आपलं नाटक घेऊन अनेक मराठी नाट्यकर्मी भारतात फिरतात, पण चेतनने त्याच्या व्यक्तिमत्त्वातून नाटक करणाऱ्या माणसांची एक आपसूक जोडणी केली होती. तो त्या माणसांची एकमेकांशी गाठ घालून देत असे. गेल्या वर्षी संपून जाईपर्यंत तो नाटक बसवत होता, नाटक लिहीत होता. नाटकांची भाषांतरं करत होता. तो कोणत्याही संस्थेचा पदाधिकारी होऊन बसला नव्हता, सरकारी कमिट्यांवर नव्हता, सिनेमात तर अजिबातच लुडबुडत नव्हता. आपली सर्व ताकद आणि आपला सर्व वेळ त्याने नाटक करण्यासाठी नीट वापरला होता. चेतनला कधीही यशस्वी नाटक करायचं नव्हतं. त्याला फक्त नाटकच करत राहायचं होतं. चेतनने त्याच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आणि विचारांमध्ये जो एक विलक्षण ताजेपणा ठेवला होताम त्याचा मला फार हेवा वाटतो. आजूबाजूचा एकही नाट्यदिग्दर्शक जे करताना मला दिसत नव्हता, ते चेतन सातत्याने करत होता. तो स्वतः ला एकटं पाडून, नव्या विषयाला, नव्या माणसांना सामोरा जाऊन, चौफेर वाचन आणि भरपूर प्रवास करून, स्वतः ची मतं आणि विश्लेषक बुद्धी तल्लख ठेवून तो नाटकांची निर्मिती करत होता. तो अपयशाला घाबरला नाही, लोकांच्या मतांना घाबरला नाही, एकटं पडलं जाण्याला घाबरला नाही. कारण तो जाणीवपूर्वक एकटाच होता. मराठी रंगभूमीवरील आपणच निर्माण करून ठेवलेल्या संस्थांच्या दलदलीत पाय रुतून बसलेल्या नाट्यदिग्दर्शकांच्या नामावालीपासून एकदमच वेगळा असा चेतन दातार हा एक प्राईम-टाईम स्टार होता.

अनेक वर्षं रात्री तो सुरमा लावत असे आणि ’का’ असं विचारलं की, ’डोळ्याला थंड वाटतं’ असं काहीही उत्तर देत असे. त्याला पाचसहा मुखवटे होते. त्यांतले एकदोन त्याने मला दाखवले होते.

नाटक बसवण्याची प्रक्रियाच अशी की नाटक बसवणाऱ्या प्रत्येकाला ते कमकुवत करत जातं कारण त्यात एक सामूहिक देवाणघेवाण अपेक्षित असते. नाटक बसवायला आलेल्या सगळ्यांमधील थोडी थोडी ऊर्जा काढून घेऊन ते नाटक उभं राहतं. कारण तो सगळा जिवंत खेळ असतो. आभास नसतो. केल्यासारखा वाटतो पण नसतो. हे होत असताना एकत्र जमून नाटकाचा शोध घेण्याच्या नादात त्या माणसाना एकमेकांची चटक लागते आणि त्यातून संस्था नावाचं प्रकरण उभं राहतं. ते कामासाठी आवश्यक वाटलं तरी भारतीय प्रवृत्तीनुसार जिथेतिथे कुटुंबे उभी करायच्या आपल्या गलथान सवयीमुळे एकदा संस्था स्थापन झाली की मग नाटक सोडून सगळं काही त्या माणसांच्या हातून होतं. त्यांचे दौरे होतात, त्यांची बस होते, त्यांना ग्रांट मिळतात, पुरस्कार मिळतात. बऱ्याच जणांची या काळात एकमेकांशी लग्नं होतात. पण एक गोष्ट करायची राहून जाते, ती म्हणजे भारंभार नाटकं करत राहूनही चिकित्सकपणे नाटकाचा आणि स्वतःचा शोध. त्यामुळे पूर्वी कम्युनिस्टांचे देश चालत तशा महाराष्ट्रात अजूनही नाटकाच्या संस्था चालतात. ह्या सगळ्या सामूहिक कोलाहलात आणि दलदलीत दिग्दर्शक नावाच्या माणसाची पूर्ण वाट लागते. चेतनने हे ओळखलं होतं आणि स्वतः ला संस्थांच्या आणि माणसांच्या किचाटापासून मोकळं ठेवलं होतं . नाटक बसवायची वेळ आली की सौम्य हसरा चेहरा करून नाटकासाठी आवश्यक ती मंडळी तो हुशारीने जमवायचा, पण त्याचा फोकस अतिशय तीव्रपणे त्याच्या नाटकावर असायचा. आपण समूहाचा भाग नसून एकटे आहोत आणि ह्या एकटेपणातूनच त्याला त्याच्या नाटकाचा शोध घ्यावा लागणार आहे, ह्याची जाणीव त्याला होती. या बाबतीत त्याला त्याच्या गुरूंचं, सत्यदेव दुब्यांचं, बरंवाईट सगळंच नशीब लाभलं होतं. चेतनच्या बाबतीत पिढ्यांचे उल्लेख करण्याची गरज भासू नये, पण त्याने ज्या माणसांबरोबर कामाला सुरुवात केली, ती सर्व माणसं सुजली, कंटाळली, डोकं चालेनाशी झाली, प्राध्यापक झाली, नोकऱ्यांना लागली, समीक्षक झाली, पण चेतन मात्र फार काळ सर्वांना पुरून उरला.

चेतनने दिग्दर्शन करण्यासाठी जी नाटकं निवडली, त्या नाटकांमुळे त्याच्या मनाच्या ताजेपणाची आणि व्याप्तीची आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे चुका करायला न घाबरण्याच्या त्याच्या वृत्तीची कल्पना येऊ शकते. कारण अनेक माणसं चुका करायला घाबरून सामान्य काम दळत राहतात, जे चेतनने कधी केलं नाही. भारतीय कथा, कविता, कादंबरी, पत्रव्यवहार आणि प्रवासवर्णनं यांचा बेमालूम मेळ तो त्याच्या हातातील नाट्यसंहितेशी घालत होता. मराठी नाटककार आणि मराठी साहित्यिक यांच्या कुंपणापलीकडे जाऊन त्याने नाटकासाठी नवं मॅटर शोधण्याचा सातत्याने प्रयत्न केला. नृत्यभाषेबद्दल त्याला अतीव आकर्षण होतं. पारंपरिक भारतीय नृत्यांचा ताल आणि मेळ तो त्याच्या कामात सातत्याने आणू पाहत असे. तो राहत असलेल्या मुंबई शहरात चालणारा अनेकभाषीय जगण्याचा आणि नाटकाचा व्यवहार त्याला उत्तेजित करत असे. त्यातून चेतनने खर्‍या अर्थाची कॉस्मोपोलिटन जाणीव आणि पोत स्वतःच्या कामाला आणला होता. नटाचं शरीर आणि नटाचा आवाज ह्या दोन ताकदींचा अधाशासारखा वापर तो आपल्या नाटकांमध्ये करत असे आणि रंगमंचावरचा नट हे फक्त साधन आहे, ह्याची ओरडून ओरडून आपल्याला खात्री करून देत असे. त्याच्या कामामध्ये सत्यदेव दुब्यांच्या दृष्टीचं ठोस प्रतिबिंब होतं. त्याच्या नाटकाचा सूर चढा आणि त्यातील दृश्यात्मकता फार ढोबळ असे. त्याचे मतभेद आणि आवडीनिवडी ठाम होत्या, पण गेल्या पाचसात वर्षांत नव्याने निर्माण होत असलेल्या नाटकांकडे तो फार खोलवर पाहू शकत होता. त्याच्या स्वत:च्या कामाचं एक निश्चित स्वरूप तयार व्हायला लागल्यापासून ते शेवटपर्यंत तो भारतीय कलाकार असण्याच्या शक्यता पुरेपूरपणे अजमावत रहिला. त्याने कधीही भारावून जाऊन किंवा इतिहासाला बळी पडून पाश्चात्य रंगभूमीची अनावश्यक भलावण केली नाही . मॉडर्न होत बसण्याचं त्याच्या पिढीवर असलेलं खुळं प्रेशर त्याने स्वतःवर घेतलं नाही. कारण त्याच्या अवतीभवती असलेल्या त्याच्या पिढीत दोन टोकाची माणसबं होती. जबाबदार आदर्शवाद आणि डाव्या विचारांनी भारावलेली किंवा मनानं लंडनच्या रंगभूमीवर राहणारी. चेतनने ह्या दोन्ही प्रकांपासून स्वतःला साळसूदपणे वाचवलं. रात्री प्रयोग झाले की दिग्दर्शकाचे कपडे फेकून देऊन तो मुंबईच्या अंधारात लुप्त होऊन जायचा. आपलं काम तपासून बघणं आणि नव्या शक्यता अजमावणं यांसाठी तो आजूबाजूचे चित्रकार, लेखक, संगीतज्ञ, गायक, नर्तक यांच्याशी चांगली मैत्री जोपासून होता. त्याच्या ह्या ओढीमुळे त्याचं काम सतत नव्या आणि आश्वासक अनुभवांनी बहरलेलं राहिलं. चेतन आता पुढे काय करतो आहे, ही उत्सुकता त्याने प्रत्येकाच्या मनात कायम ठेवली. चित्रपटमाध्यमाविषयी त्याने आपली जाणीव एवढी पारंपरिक आणि बंद का ठेवली होती, ह्याचा उलगडा मला होत नसे. एकतर जुन्या नाटकातील लोकांप्रमाणे तो चित्रपटांकडे एक दुय्यम आणि फक्त व्यावसायिक माध्यम म्हणून पाहायचा. चित्रपटांचं योग्य रसग्रहण करण्याची त्याने कधी फिकीरही केली नाही आणि कष्टही घेतले नाहीत. त्यामुळे ह्या एका मोठ्या विषयावर आम्ही बोलणं टाळायचो किंवा बोललो तर खूप वेळ भांडत बसायचो! नळावर पाण्याला जमलेल्या बायका मुकाट माना खाली घालून घरी परत जातील एवढी गॉसिप्स्‌ तो करायचा आणि त्यातून अपार ताकद मिळवायचा. ’निंदेला बसलो होतो दुपारी’ असं तो फोन करून सांगायचा. माणूस जगताना बाहेर जे जगतो त्याच्या खाली, त्वचेच्या आत वेगळेच अद्भूत व्यवहार चाललेले असतात. चेतनला माणसं अशी सोलून बघायला आवडायची. मानवता, अहिंसा, बंधुभाव, समता असे लोचट मुखवटे घालून माणसांचे कळप एकमेकांना भिडून जो उत्पात करतात, ते बघायला तो फार आसुसलेला असायचा. जोतिषविद्या, मंत्रविद्या, गूढविद्या, आध्यात्मिक अनुभूती, स्वप्नं ह्यांखाली एक हात ठेवून जगायची त्याला सवय होती. त्याला मध्येच फुटलेले हे फाटे मला गोंधळवून टाकत. त्याच्या जगण्याची आणि कामाची अफाट ताकद तो अश्या वेड्यावाकड्या गोष्टींमधून मिळवत असे. ’सावल्या’ हे त्याचं नाटक वाचलं तर त्याच्या मनाचे हे असे अनेक पापुद्रे हाती लागू शकतील. चारपाच वर्षांपूर्वी नव्यानं नाटक लिहू लागलेल्या माझ्यासारख्या नाटककाराला त्याने खूप मोठं जग उघडून दाखवलं होतं. आमच्या नाटकांची भाषांतरं व्हावीत आणि त्या नाटकांच्या शक्यता वेगवेगळ्या प्रकारे हाताळल्या जाव्यात, ह्याबद्दल तो आग्रही असायचा. इतकं सगळं चालू असताना चेतनने जाण्याची काहीच गरज नव्हती. बाकी इतर अनेकजण जाऊ शकले असते. महाराष्ट्रातील रटाळ दिग्गजांचा गोंगाट तरी कमी झाला असता. रम्य जुन्या आठवणींची गावठी दारू पिऊन स्मृतींच्या चिखलात लोळणारे, कामाची ताकद संपून परीक्षक वगैरे बनलेले, बुद्धी गंजलेले कलाकार मागे राहतात. घरी कंटाळा आला म्हणून किंवा घरी उकडत आहे आणि नाटकाच्या तालमीच्या हॉलमध्ये पंखा आहे इतक्या सध्या कारणाने नाटक करणाऱ्या आणि नाटक करताकरता लग्न उरकून घेतलेल्या नट्या आनंदात जगतात. पूर – पाऊस – रोगांच्या साथी – अतिरेक्यांचे हल्ले होऊनही एकही समीक्षक मरत नाही. बाळबोध आणि हिडीस मराठी नाटकांचा धंदा करणारे नाट्यनिर्माते मरत नाहीत. सगळे मस्त जगतात आणि आपला चेतन बिचारा मरून जातो, ह्यासारखं मोठं दुर्दैव नाही.

आपली सामाजिक व्यवहारांची संस्कृती अतिशय संकोचलेली आहे. जवळच्या माणसाने आपल्यासाठी काही केलं तर त्याचे आभार मानणं आपल्याला औपचारिक वाटतं. कोणत्याही व्यासपीठावरून एखाद्या माणसाविषयी कृतज्ञतापूर्वक बोललं की ते कृत्रिमच असणार, असं आपल्याला वाटतं. प्रेमाचे, कृतज्ञतेचे, ऋण मानंण्याचे व्यवहार करायला आपण संकोच करतो आणि मग अचानक असा कुणाला मृत्यू आला की त्याला साधं थॅंक यू म्हणायचं राहून जातं. नाटक लिहिणाऱ्या, नाटक करणाऱ्या आम्ही सर्वांनी चेतनला एकदा मनापासून थॅंक यू म्हणायला हवं आहे. त्याला आत्ता हे सांगायला हवं आहे की, तू आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहेस. जसं पाणी घडवता येत नाही, तशी तुझ्यासारखी माणसं घडवता येत नाही. शिबिरं घेऊन नाही, पुरस्कार देऊन नाही. ज्याला ओळखण्यात आपण सतत कमीच पडलो असं वाटतं, असा तुझ्यासारखा अद्भुत मित्रही परत तयार होणार नाही.

माझ्या कादंबरीचं पहिलं हस्तलिखित तयार झाल्यावर चेतन दातारला मी त्याचं मत विचारण्यासाठी वाचायला दिलं होतं. ती आमची पहिली भेट. त्याला आता दहा वर्षं झाली. त्यानंतर काही वर्षांनी नाटकाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना, माझा मित्र मोहित टाकळकर ह्याच्या आग्रहामुळे मी ’छोट्याश्या सुट्टीत’ हे नाटक लिहिलं. त्याचे प्रयोग सुरू झाले तेव्हा चेतनने माझ्याकडे नीट नजर वळवली होती. मधल्या काळात त्याने माझी विजय तेंडुलकरांशी गाठ घालून दिली आणि मी सतत तेंडुलकरांशी बोलेन, न संकोचता त्यांच्या आजूबाजूला राहीन ह्याची काळजी त्याने घेतली. अतिशय मोकळेपणाने आणि आग्रहाने मुंबईतील अनेक क्षेत्रांतील लोकांना त्याने माझी नाटकं आणि माझ्या फिल्म्स दाखवल्या. नाटकाविषयी कोण कसं बोलतं, कुणाला गंभीरपणे घ्यायचं आणि कुणाला समोर हसून नंतर सोडून द्यायचं, ह्याचे आडाखे त्याने मला शिकवले. मराठी समीक्षकांविषयीचा माझा एकसुरी विरोध त्याने पुसला आणि काही जाणत्या, ताज्या मनाच्या समीक्षकांशी गाठ घालून दिली. मुंबई शहराच्या पोटातल्या काही जादूमय गुहांमध्ये चेतनने मला फिरवलं. चित्रविचित्र जागा, भलीबुरी माणसं आणि भन्नाट गल्ल्यांची आम्ही उन्हापावसात केलेली सफर कशी विसरता येईल? अनेक महिने, वर्षं चालूच होती ती. माझ्या मागे लागून त्याने माझी नाटकं पुस्तकरूपात प्रकाशित करायला लावली आणि ’छोट्याश्या सुट्टीत’चं प्रॉडक्शन बूक प्रकाशित होताना त्याने त्याला प्रस्तावना लिहिली. मी त्याच्यासाठी एकही नाटक लिहिलं नाही, ह्यावरून तो मला फार टोचून बोलायचा. मी त्याला म्हणायचो की, मला तुझ्यासारखे दुब्यांच्या तालमीतले दिग्दर्शक नकोतच. तुम्ही लेखकाचा चोळामोळा करून त्याला कोपर्‍यात फेकून देता. नाटकाच्या तालमी करताना स्वतःच एवढा आरडओरडा करता की नट तुमच्या वर आवाज काढून नाटकात उगीचच बेंबीच्या देठापासून ओरडत सुटतात. वर वाट्टेल ते सीन, तमाशे आणि नाचगाणी तुम्ही नाटकात घुसडणार . बुवांच्या बाया आणि बायांचे बुवे करणार. कोण शहाणा नाटककार तुमच्यासाठी नाटक लिहील?

आपापल्या कामाचं चोख डॉक्यूमेंटेशन आणि रेकॉर्डिंग करण्याबाबत चेतनची पिढी आळशी आणि संकोचलेली होती. शिवाय आपल्या देशात कलाकाराचा दस्तऐवज तयार होण्यासाठी जितकं म्हातारं व्हावं लागतं, तितका चेतन झाला नव्हता. त्यामुळे चेतनचं सगळं काम, त्याच्या चुका, त्याची नाटकं, त्याचं म्हणणं हे सगळं त्याच्याबरोबर वाहून गेलं. तो मागे सोडून गेला काही उदास झालेल्या स्त्रियांना आणि पुरुषांना, एकदोन पुस्तकांना, काही फोटोंना आणि त्रोटक लिखाणाला. तो गेल्यावर काही दिवसांनी मला समजलं की, त्याच्या मृत्यूनंतरही अनेक महिने त्याच्या ऑर्कूटच्या पेजवर त्याच्यासाठी निरोप येत राहिले. लोक त्याच्याशी तो जिवंत असल्यासारखं गप्पा मारत राहिले, त्याला आपल्या मनातलं सगळं सांगत राहिले. त्याच्या ईमेलवर अजूनही पत्रं जातात . मेलिंग लिस्टीतून त्याला कोणीच काढलेलं नाही. त्यामुळे सर्व कार्यक्रमांची आमंत्रणं त्याला मिळत राहतात. आज अनेक कपाटांमधून चेतनचे फोटो असतील, काही कागदांवर चेतनचं हस्ताक्षर सापडेल. काही व्हिडिओटेप्स्‌ असतील, ज्या लावल्या की चेतन बोलताना दिसेल. त्याचा आवाज ऐकू येईल. त्याला नीट समजून घेण्यासाठी जरा जवळ जाऊन बघू, तर सगळं एकदम मुंग्यामुंग्यांचं दिसायला लागेल. चेतनला स्पर्श करू पाहावा तर बोटाला टीव्हीची जाडजूड थंडगार काच लागेल. आता फक्त इंटरनेटच्या अंतराळात चेतनची आठवण अधांतरी तरंगत राहील आणि आत्ता आली तशी अलगद जवळ येईल.

***

हा लेख मायबोली.कॉमवर पुनर्मुद्रित करण्यास परवानगी दिल्याबद्दल श्री. सचिन कुंडलकर यांचे मनःपूर्वक आभार.

***
प्रकार: 

चेतन दातारांचा अकाली मृत्यू त्यांच्या आप्तांना, मित्रपरिवाराला आणि चाहत्यांना चटका लावून गेला असणार ह्यात शंका नाही. परंतू हा लेख मात्र तद्दन नाटकी वाटला. वियोगाचं कुणाला आणि किती दु:ख झालं असेल ह्याची दुसर्‍यानं मोजमाप करता कामा नये ह्याची जाणीव आहे. पण झालेलं दु:ख शब्दांत मांडताना जो काय भाव उतरला तो जेन्युइन वाटला नाही. (मी 'वाटला' नाही म्हणतेय.)

>>कसलीही कल्पना नसताना गेल्या वर्षी एका सकाळी ‘चेतन गेला’ असं सांगणारा फोन मला आला त्या क्षणापासून मी धुमसत राहिलो. त्या रागामुळेच की काय , त्याला शेवटचं एकदा पाहून घेण्याचीही मला इच्छा झाली नाही
हे वाचून 'सिरियसली?!' एवढाच एक शब्द डोक्यात आला.

आपलं जिवाभावाचं कुणी जाणं हे अनेकदा पचवणं कठीण जातं, पण गेलेल्या व्यक्तीच्या जागी 'अमका जायला हवा होता'ची यादीतर निव्वळ बालीशपणाचा कळस आहे.

कुंडलकरांच्या, त्यांच्या लेखनाच्या चाहत्यांनी मला माफ करावं!

मस्त, आवडलं! कुंडलकरांची लेखनशैली एकदम ओघवती आणि प्रामाणिक वाटते. बाकी ह्या लेखाच्या निमित्ताने चेतन दातारांची पण ओळख झाली. आता त्यांचं एखादं तरी नाटक बघणं क्रमप्राप्तच.
काही ठिकाणी भाषा टोकाची वापरलीये खरी पण एकंदरितच ते माणूस म्हणून इमोशनल वाटतात (त्यांच्या लेखनातून मला तसं वाटतं) आणि मनात येइल ते सरळ लिहितात and it's much better like that than pussyfooting around. कोणाला दुखवायचं नाही म्हणून तोच विचार बळच शब्दांच्या फाफट्पसार्यात घालून उगाच तिखट शेवेचा, मुरमुर्यांचा चिवडा करण्याची कामं ते करत बसले नाही ते बरय.

त्यांचे अजून लेख वाचायला आवडतील चिनूक्स. Happy

चांगल लिहिलं आहे. नाटकी वगैरे मुळीच नाही वाटल.

कसलीही कल्पना नसताना गेल्या वर्षी एका सकाळी ‘चेतन गेला’ असं सांगणारा फोन मला आला त्या क्षणापासून मी धुमसत राहिलो. त्या रागामुळेच की काय , त्याला शेवटचं एकदा पाहून घेण्याचीही मला इच्छा झाली नाही>> हे जे वाक्य आहे ह्याचा वरवर अर्थ आणि आतल्या भावना खूप वेगळ्या आहेत.

कुंडलकारांचे आधीचे दोन लेख आवडलेले. हा नाही आवडला, अनेक तुलना, प्रिमायसेस खूपच सरळ किंवा बालिश वाटली. एकटा माणूस मरतो तेव्हा काय होतं, किंवा पुस्तकांचे काय करतात हे इतकं तपशीलवार लिहून काहीतरी भव्य परिणाम येणार असं वाटत असताना अगदीच निराशा झाली. वर मृण्मयीने लिहिल्याप्रमाणे कोणी मेलेलं चांगलं कोणी नाही हे त्यावेळेच्या भावना म्हणून ठीक, पण दीर्घकाळ तेच वाटत राहू शकतं का कोणाला?
इतकं नावडूनही चेतन दातार वरचा लेख वाचायला आवडलच. Happy धन्यवाद.

हा लेख तेव्हाही वाचला होता. मी हा लेख म्हणून कसा काय वगैरे उहापोह करण्याइतकी तटस्थ राहू शकत नाही या लेखाच्याबाबतीत. त्यामुळे ते जाऊदेत.
चेतनबद्दल जे जे काय वाटायचं/ वाटतं त्यातल्या अनेक गोष्टींना अगदी अगदी म्हणावसं वाटलं होतं.
ऑर्कुटवर त्याला सगळं काही सांगणार्‍या येड्यांपैकी मी पण एक होते.

कुंडलकरांचे आधीचेही लेख वाचले. लेख लिहिताना त्यांना जे वाटतं तेच कसं प्रामाणिक, इंटेन्स आहे, ज्याबद्दल लिहिलंय त्यातलं त्यांनाच कसं जास्त समजतं आणि ते तसं न समजणारे कसे मूर्ख (नीट सांगता येत नाहिये.. मूर्ख ऐवजी तुच्छ वगैरेही चालेल!) आहेत, त्यांच्या संवेदना कशा बोथट आहेत वगैरे पद्धतीने मांडलेलं वाटलं. वर लिहिलंय त्यात

संस्था नावाचं प्रकरण उभं राहतं. ते कामासाठी आवश्यक वाटलं तरी भारतीय प्रवृत्तीनुसार जिथेतिथे कुटुंबे उभी करायच्या आपल्या गलथान सवयीमुळे एकदा संस्था स्थापन झाली की मग नाटक सोडून सगळं काही त्या माणसांच्या हातून होतं. त्यांचे दौरे होतात, त्यांची बस होते, त्यांना ग्रांट मिळतात, पुरस्कार मिळतात. बऱ्याच जणांची या काळात एकमेकांशी लग्नं होतात. पण एक गोष्ट करायची राहून जाते, ती म्हणजे भारंभार नाटकं करत राहूनही चिकित्सकपणे नाटकाचा आणि स्वतःचा शोध. त्यामुळे पूर्वी कम्युनिस्टांचे देश चालत तशा महाराष्ट्रात अजूनही नाटकाच्या संस्था चालतात.
हे तर अजिबातच पटलेलं नाही. विशेषतः गलथान सवय वगैरे.. कारण प्रत्येक गोष्ट आपल्या मोजमापावर तोलूच नये. संस्था आणि त्या अनुषंगाने येणार्‍या बर्‍या-वाईट गोष्टी हाही नाटकाचाच एक भाग आहे. निव्वळ प्रायोगिक, वैचारीक केलं की उच्च असं मानून व्यावसायिक गोष्टी करणारे गलथानबिलथान मानू नयेत. म्हणजे ते सगळेच १०० % बरोबर आहेत असां नाही, पण तुच्छ(!!) मानावेत इतकेही वाईट नाहीत. त्यांच्या वाटेल जाऊ नये. कारण जसं प्रायोगिक आवश्यक, तसंच व्यावसायिकही. आणि हे एक उदाहरण म्हणून मी सांगतेय. एकूणच लेखनात असं खूप सापडेल.

काय होतं ना, की अशा प्रकारे लिहिताना स्वतःच्या चुकाही अकारण ग्लोरिफाय करून लिहिल्या जातात नि त्याच गोष्टी (म्हणजे चुकीच्या!) बरोबर आहेत असं मानणार्‍यांची संख्या वाढायल लागते. तुम्हाला खरं काय वाटतंय, आणि तुम्ही ते कसं व्यक्त करताय यात खूप फरक आहे. कुंडलकर कदाचित ते फरक न करता लिहित असतीलही. पण ती त्यांची स्टाईल झाली असावी, त्यामुळे खरं काहीही वाटत असलं तरी ते काहीतरी "स्टाईल" आणून लिहिलं की भारी असंही वाटू शकतं.

अवांतरः

मी टीपापावर येत-जात असूनही बुवांच्या "मस्त, आवडलं! कुंडलकरांची लेखनशैली एकदम ओघवती आणि प्रामाणिक वाटते." या मताशी अजिबात सहमत नाही! Proud

चेतन दातार मला आवडायचे. त्यामुळे केवळ त्यांच्याबद्दल आहे म्हणून्च हे वाचलं. कुंडलकरांचं म्ह्णून नाही. पण मग जे नाही पटलं ते कुंडलकरांचं होतं.

सॉरी ९ पण तू किती समांतर नाट्यसंस्था नक्की पाह्यल्या आहेस, संस्थेत शिरून?
आज घडीला भरपूर वर्ष टिकलेली आणि तरीही काहीतरी नवीन करू पाहणारी समांतर नाट्यसंस्था कुठली आहे महाराष्ट्रात आविष्कार सोडली तर?
ग्रांट, बस वगैरेला फार स्पेसिफिक संदर्भ आहेत. त्याबद्दल मी इथे चर्चा करणार नाही. पण ते व्यावसायिक नाट्यसंस्थेचे संदर्भ नाहीत. व्यावसायिक म्हणजे वाईट वगैरे असा काही मुद्दा नाहीये तिथे. कारण मुळात या संस्थांनी व्यावसायिक होऊ नये किंवा तत्सम असं काही म्हणलेलंच नाहीये.
तुला पटणे न पटणे हा तुझा प्रश्न आहे. पण खरोखर माहिती घेऊन मग पटले वा न पटले तर जास्त योग्य ठरेल इतकेच.

प्रज्ञा९, तू नाटकात काम करतेस का? चेतन दातारांशी तुझी मैत्री होती का? तुझा आणि साहित्याचा काही संबंध आहे का? तू खूपच काठावर उभे राहून बोलते आहेस.

मी टीपापावर नाही .... मी नाटकही केले नाही
मी तोंडाला एवढासा रंगही लावला नाही

तरीही एक लेख म्हणूनी वाचताना
साहित्याची पार्श्वभूमी नसताना
लेख आवडला सांगताना
मला बी अजिबात खंतही नाही

मला लेख आवडला. आधी वाचला तेव्हाही आवडला होता. असे लेख, जे इन्टेन्सिटीच्या बाबतीत तीव्र, आवेगी असतात ते, जे अतिशय जवळच्या, एका क्षेत्रातल्या माणसाबद्दल लिहिले जातात ते बाहेरच्या लोकांना अनेकदा नाटकी वगैरे वाटू शकतात, त्यातली अभिव्यक्ती, भावना टोकाची वाटू शकते. तेंडूलकर गेल्यावर काहींनी लिहिलेले लेखही असेच होते. भूपेन खक्कर गेले तेव्हा अतुल दोडियाने त्यांच्यावर लिहिलेला लेखही आर्टफिल्डच्या बाहेरच्या लोकांना नाटकी, बालिश वाटला होता. पण त्यात खूप प्रामाणिकपणा होता हे त्या दोघांना ओळखणार्‍यांना कळलं होतं. जवळच्या मित्राने लिहिल्यावर त्यात त्यांच्या रोजच्या जगण्यातले संदर्भ अनौपचारिकतेनं येतात ते आपल्या सवयीचे नसल्यानेही खटकू शकतात. पण भावना खर्‍या असतात आणि गेलेल्या व्यक्तीच्या खर्‍या माणूसपणाकडे, त्याच्या वलयाच्या, कर्तुत्वाच्या पलीकडे जाऊन पहाता येणं शक्य होतं. सचिन कुंडलकरच्या या लेखातून मला जो चेतन दातार कळला तो एरवी कधीही कळू शकला नसता.

मला लेख आवडला. एखाद्याबद्दल इतक्या उत्कटतेनं वाटत असतं की त्या व्यक्तीच्या जाण्यानं अंतरीक मनस्वी त्रास होऊ शकतो एखाद्याला. अश्या वेळी ' मनात जे आणि जसं आलं' त्या raw कदाचित जगाला मान्य न होणार्‍या शब्दात्/फॉर्म मधे कमी वेळा लिहिलं जात. एखाद्याच्या मनात एखाद्याविषयी 'असाच' विचार का आला? ह्याला कोणतंही परिमाण नाही. इथे मनातले विचार कोणतेही 'जगमान्यतेचे झगे' किंवा 'शब्दांची रूढ रूपं' घेऊन लेखात उतरले नाहीये इतकंच.
आणि या लेखातलं नेमकं हेच raw, intense, जसं वाटतंय तसं असणं मला आवडलंय.
चेतन दातार भेटणं, अनुभवणं, ऐकणं आता शक्य नाही. पण त्याला जरूर वाचा.

अकाली गेलेल्या आपल्या जवळच्या मित्राबद्दलच्या भावना दुस-याने व्यक्त केल्यात आणि त्याही मित्र गेल्याच्या दुस-या वर्षी. कदाचित तेव्हाच त्या लिहिल्या असत्या तर याही पेक्षा जास्त तीव्र असत्या त्या भावना. त्यामुळे मला यात काही नाटकी वगैरे वाटले नाही. कोणी जायला पाहिजे ही लिस्ट आता आपल्याला अस्थानी वाटली तरी आपण त्या परिस्थितीत असताना हेही विचार आपल्या डोक्यात येतात.

मनात जे आले ते जसेच्या तसे ल्लिहिणे ब-याच जणांना जमत नाही. काहींना ते जमतही असेल प काय जमते त्यापेक्षा काय पोलिटिकली करेक्ट आहे हे लिहिण्याकडे ब-याचजणांचा कल असतो. मी कुंडलकरांचे लेख मायबोलीवर वाचलेत फक्त. ते पोलिटिकली करेक्ट लिहायला हवे हा विचार कच-याच्या टोपलीत टाकुन फक्त त्यांना जे वाटले ते प्रामाणिकपणे लिहितात. त्यांचे भाषेवरील ब-यापैकी प्रभुत्व त्यांच्या लिखाणातुन दिसते. ही मला झालेली त्यांची ओळख. वरिल लेखातही त्यांना जे वाटले ते खुप प्रभावी पणे व्यक्त झालेय.

सचिन कुंडलकरच्या या लेखातून मला जो चेतन दातार कळला तो एरवी कधीही कळू शकला नसता.

सेम हिअर. मी चेतन दातारला पहिल्यांदा आणि शेवटचे पाहिले ते जंगल मे मंगल मध्ये. केवळ त्यामुळे "वर वाट्टेल ते सीन, तमाशे आणि नाचगाणी तुम्ही नाटकात घुसडणार . बुवांच्या बाया आणि बायांचे बुवे करणार" हे वाक्य वाचले तेव्हा चटकन संदर्भ लक्षात आला. नाहीतर हेही कळले नसते. पण यापलिकडे चेतन दातार हे प्रकरण आविष्कारमधल्या एका मैत्रिणीमुळॅ नुसते कानावरुन गेलेले, बाकी माहिती शुन्य. या लेखामुळे चेतन काय काय करत होता त्याची एक झलक वाचायला मिळाली.

सुंदर लेख ! फार आवडला.

मला जे वाटत होतं ते शर्मिला आणि रार ह्यांनी इतक्या अचूक शब्दांत मांडलं आहे की दोन्ही पोस्ट्सना अनुमोदन देण्याव्यतिरिक्त काही लिहावंसं वाटत नाही.

नी, तुझा मुद्दा समजतोय.
पण माझी दुसरी पोस्ट कुणीच वाचली नाही का?

"चेतन दातार मला आवडायचे. त्यामुळे केवळ त्यांच्याबद्दल आहे म्हणून्च हे वाचलं. कुंडलकरांचं म्ह्णून नाही. पण मग जे नाही पटलं ते कुंडलकरांचं होत." यात मी चेतन दातार किंवा समांतर नाटक यांच्याबद्दल कुठे विरोध केलाय? किंबहुना मला या दोन्हीबद्दल केवळ आदरच आहे. मुद्दा आहे तो लेखात मला जाणवलेला सूर पटला नाही हा. पुन्हा एकदा, व्यावसायिक म्हणजे वाईट वगैरे कदाचित कुंडलकरांना म्हणायचं नसेलही, पण मला ते तसंच वाटलं. बाकी ग्रांट, बस स्पेसिफिक असेल तर माहिती नाही.
मला इन जनरलच पृथ्वी थिएटर्स(हे इथे संबंधित नाव नसूही शकेल), आविष्कार, समांतर नाट्यचळवळ, सतीश आळेकर, नाट्यसंस्था यांबद्दल पेपर, पुस्तकं, संबंधितांच्या मुलाखती यातून जी माहिती मिळते ती पुरेशी नसली तरी मी कधीच त्याबद्दल वाईट म्हटलेलं नाही. मला खूप कुतुहल आहे त्या सगळ्याबद्दल. आणि माहिती नसताना मी कुठलंच मत बनवलेलं नाही. मत व्यक्त केलं कुंडलकरांबद्दल, त्यांचं जेवढं लिखाण इथे मायबोलीवर वाचलं त्यावरून ते तयार झालंय. ते कुणाला पटो न पटो.

बी, मी स्वतः नाट्यवाचन, अभिवाचन आणि नाटक या गोष्टी केल्यायत. अगदी ऑल इंडिया रेडिओवर दर्जेदार कलाकृतींचं अभिवाचनही केलंय. शाब्दिक अभिनय, संवाद आणि शब्दफेक शिकून घेतलंय. शाळेत, नोकरीत असताना तालमीसाठी वेळ दिलाय. आणि वाचता येतंय तेव्हापासून साहित्य म्हणजे काय हे जाणून घेतेय. मला काय समजतं आणि काय समजत नाही हेही मला माहितेय. आणि चेतन दातारांशी मैत्री असण्याचा/ नसण्याचा काय संबंध? ते गेले तेव्हा मैत्री सोडा, ओळख नसूनही मला खूप वाईट वाटलं होतं. नाटकातलं काहीतरी कायमचं हरवलं असं वाटलं होतं. काय ते सांगता नाही आलं. त्यामुळे काथावर नाही, मी खूप विचार करून कुंडलकरां च्या लेखाबद्दल प्रतिक्रिया दिली. ती पटली नाही तरी माझी काहीच हरकत नाही.

ओके प्रज्ञा. तू खूप गुणी व्यक्ती दिसतेस. तुझे वाचन ऐकायला आवडेल. लिंक असेल तर शेअर कर. जरुर जरुर ऐकेन.

तू नाटकात काम करतेस का? चेतन दातारांशी तुझी मैत्री होती का? तुझा आणि साहित्याचा काही संबंध आहे का? << या अतिशय उर्मट प्रश्नांचा निषेध!!

लेखाबद्दल : लेख आवडला. नाटकी वगैरे अजिबात वाटला नाही. उलट लेखामधली इंटेन्सिटी कित्येक वाक्यातून जाणवली. पण एकंदरीत इतर कुणी का मरत नाहीत हा र्पश्न जरा इन्सेन्सिटीव वाटलाच.

यात मी चेतन दातार किंवा समांतर नाटक यांच्याबद्दल कुठे विरोध केलाय? <<
असे काही मी लिहिलेले नाहीये.
कुठलीही पोस्ट एडिट केलेली नाहीये.
पण बहुतेक मी लिहिले असेनच तू म्हणतेस तर..

मला लेख आवडला. खूप वैयक्तिक आहे त्यामुळे अर्थातच त्याला कुठल्याच प्रकारे लेबल करायला अवडणार नाही. कुंडलकरांसाठी दातार किती मह्त्वाची व्यक्ती होती हे नीट समोर येतं आहे.

रार आणि शर्मिला +१

>> असे लेख, जे इन्टेन्सिटीच्या बाबतीत तीव्र, आवेगी असतात ते, जे अतिशय जवळच्या, एका क्षेत्रातल्या माणसाबद्दल लिहिले जातात ते बाहेरच्या लोकांना अनेकदा नाटकी वगैरे वाटू शकतात, त्यातली अभिव्यक्ती, भावना टोकाची वाटू शकते.
हो, या लेखाच्या बाबतीत तसं झालं. वर काहींनी उल्लेख केलेला 'त्याऐवजी अन्य कोण मेलेलं चाललं असतं' हा भाग मलाही अत्यंत इन्सेन्सेटिव्ह वाटला. तुमच्या भावना त्या भावना आणि बाकीच्यांच्या? असं लिहू शकणार्‍याने भावनाप्रधान असल्याचे दावे करू नयेत हे बरं.

अशा लेखांमध्ये बाकी कोणाला न कळलेले/दिसलेले दातार/तेंडुलकर/ग्रेस इ. मलाच कसे कळले/दिसले आणि त्यांच्या जाण्याबद्दल बाकी कुणालाही न जाणवलेलं काहीतरी मलाच कसं जाणवलं (ओट्यावरचं अन्न आणि वॉशिंग मशीनमधले कपडे? सीरियसली??!) हा सूर सहसा येतोच येतो आणि एकंदरीत दिवंगत व्यक्तीबाबतच्या जिव्हाळ्यापेक्षा स्वतःला गोंजारण्याची आणखी एक संधी साधल्यासारखं वाटतं ते लिखाण.

इतकं तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल वाटत होतं तर तुम्ही त्यांच्यासाठी ते जिवंत असताना काय केलंत? मेल्यावर हा लेख लिहिण्यापलीकडे काय केलंत ? किती दिवस जेवला नाहीत? अंत्यदर्शनाला गेलो नाही म्हणे! करणारे करतात आणि बोलणारे फक्त बोलतात.

अजिबात आवडला नाही लेख.

कुंड्लकरांचे लेख एका वेगळ्याच शैलीत असतात आणि वाचल्यावर एक अनामिक अस्वस्थता आणि त्याचबरोबर एक आगळेवेगळे वाचल्याचे समाधान देतात.

एखाद्या मोठ्या आणि वयोवृद्ध कलाकाराच्या मृत्युसमयी जे लेख येतात ते आधीच लिहून ठेवलेले आणि कार्याचा उदोउदो असलेले मृत्युलेख वाटतात.

हा लेख वेगळा आहे. एका माणसाचं अचानक जाणं मनाला लागलंय आणि त्याच भावनेतून कुंडलकरांनी हा लेख लिहीलेला वाटतोय. यात सांप्रत नाट्यसंस्था आणि चित्रपट सृष्टीबद्दल असलेली उद्विग्नता जाणवते. (कुंडलकरांनी नंतर स्वतः हिंदी चित्रपट काढलेत पण तो या चर्चेचा विषय नाही) त्याचबरोबर चेतन दातारांना अजुन मोठे होता आले असते पण त्यांनी एक अवलीया कलाकार म्हणून जगणे पसंत केले ही खंत दिसते आणि त्यामुळेच ती उद्विग्नता आलेली आहे असे वाटते.

हा लेख म्हणजे इतर कलाकारांवर किंवा नाट्यसंस्थांवर टीका आहे असे न वाचता तो एक मनापासून वाटलेली नाराजी आहे एका कलाकाराच्या अकाली मृत्युबद्दल असे मनात ठेवून वाचला तर नक्कीच पटेल.

ह्म्म्म. चेतन दातारला बर्‍यापैकि न ओळखणारे, चेतन दातारआणि सचिन कुंडलकर यांच्या मैत्रीविषयी थांगपत्ता नसणारे - या सगळ्या बाबींचा काँटेक्स्ट विचारात न घेता या लेखाला दांभिक ठरवतायत, हे बघुन गम्मत वाटली...

चेतन दातारला बर्‍यापैकि न ओळखणारे, चेतन दातारआणि सचिन कुंडलकर यांच्या मैत्रीविषयी थांगपत्ता नसणारे >> गम्मत कसली त्यात ! त्यांना आणि त्यांच्या मैत्रीला ओळखत असणार्‍यांसाठीच हा लेख आहे असं कुठे लिहिलेलं दिसलं नाही! पब्लिक केलेला लेख असेल तर न ओळखणारेच वाचण्याची शक्यता जास्त नाही का ?!

Pages