अस्वस्थपणे म्यान (Movie Review - Talvar)

Submitted by रसप on 5 October, 2015 - 07:23

नुकतेच चैतन्य ताम्हाणे ह्यांच्या 'कोर्ट' ह्या चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकन देण्यात आले. 'कोर्ट' हा चित्रपट एका सर्वसामान्य माणसाच्या न्यायव्यवस्थेतील ससेहोलपटीविषयी होता. एखाद्या साध्याश्या प्रकरणालाही कोर्टात किती काळ लागू शकतो, ह्याचा आपल्यापैकी प्रत्येकालाच अनुभव नसला, तरी अंदाज नक्कीच आहे. म्हणूनच आपण म्हणतोही की, 'शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये.'
मात्र कोर्टाच्या पायरीपर्यंत पोहोचण्याआधीही काही वेळेस अनेक पायऱ्या असतात. न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचायच्या आधी अनेक प्रकरणांना तपासयंत्रणा चिवडतात. संबंधित व्यक्ती त्यात भरडल्याही जातात. कोर्टाच्या संथगतीला अधोरेखित करणारा चित्रपट 'कोर्ट'सारखा दुसरा नसला, तरी तपासयंत्रणेच्या वरवंट्याखाली भरडल्या जाणाऱ्या सामान्य व्यक्तीला दाखवणारे अनेक चित्रपट आपण पाहिले आहेत. त्यांतले बहुतांश अतिरंजित, तर काही खरोखर अंगावर येणारे होते. 'अंगावर येणे', ह्याचेही दोन प्रकार होऊ शकतात. एक म्हणजे भडकपणामुळे आणि दुसरे म्हणजे उत्कटतेमुळे. 'तलवार'सुद्धा अंगावर येतो. पण त्यातल्या भडकपणामुळे नाही, तर उत्कटपणामुळे. काही चित्रपट एखाद्या धबधब्याप्रमाणे कोसळतात. तो आवाज, ते दृश्य स्तिमित करणारं असतं. 'तलवार' सारखे चित्रपट हे एखाद्या शांत ओहोळासारखे वाहत राहतात. तो संयतपणे वाहणारा प्रवाह करत असलेली संयमित नादनिर्मिती, नीरव शांततेत मनात चलबिचल करते. ही चलबिचल धबधबा पाहताना काही क्षण स्तिमित होण्यासारखी नसते. ती एक बेचैनी असते, जी अंतर्मनाला ढवळून काढते. आपल्याच नकळत आपण पडद्यावर चाललेल्या नाट्याचा एक भाग होऊन जातो. कुठल्या तरी एका पात्रात आपण स्वत:ला पाहायला लागतो. चित्रपट संपतो. ते पात्र नाहीसं होतं. मागे उरते बेचैनी. ढवळून काढणारी. पोखरणारी. पण निरुपाय. आपल्या क्षुल्लकतेचा, हतबलतेचा, असहाय्यतेचा आपल्यालाच एक वांझोटा संतापही येतो. टॅक्सी नं. ९२११ मधला 'जय' ज्या तिरस्काराने 'राघव'ला सांगतो की, 'दारु पी और अपने घर पे जा', त्याच तिरस्काराने आपणच आपल्याला सांगतो, 'गाडी काढ आणि घरी चल.'

नॉएडामध्ये काही वर्षांपूर्वी झालेल्या आरुषी तलवार व हेमराज बंजाडे ह्यांच्या दुहेरी खून प्रकरणावर 'तलवार' आधारित आहे. पण ह्या 'तलवार' शब्दाचा संदर्भ वेगळा आहे. न्यायदेवतेची डोळ्यांवर पट्टी आणि हातात तराजू घेतलेली मूर्तीच आपण आजतागायत पाहत आलो आहोत. पण तिच्याच दुसऱ्या हातात तलवारही आहे. 'ही तलवार म्हणजे आपण. पोलीस', असं चित्रपटात एके ठिकाणी एक पात्र म्हणतं. 'तलवार' हा त्या 'तलवार'बद्दल आहे.

स्वत:ची मुलगी 'श्रुती' आणि घरचा नोकर 'खेमपाल' ह्यांच्या खुनाचा आरोप असलेला डॉ. रमेश टंडन (नीरज कबी) पोलिसांच्या ताब्यात आहे. पण ह्या धक्कादायक प्रकरणाने खळबळ माजवली आहे. एक डॉक्टर बाप आपल्या मुलीचा खून करतो, पोलीस त्याला अटक करतात आणि डॉक्टर व त्याचे इतर नातेवाईक आरोपांना अमान्य करतात. हे सगळं नक्की काय आहे ? तपासयंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उठतात आणि प्रकरण 'सीडीआय'कडे दिलं जातं. ऑफिसर अश्विन कुमार (इरफान खान) ह्या अत्यंत कुशल अधिकाऱ्याकडे तपास सोपवला जातो. चीफ अश्विन कुमार आणि त्याचा एक ज्युनिअर (सोहम शाह) मिळून पाळंमुळं खणून काढतात आणि तपासातून काही वेगळीच कहाणी समोर येते.
पण सिस्टम आपला खेळ खेळते. मोहरे बदलतात. पट बदलतो. सगळ्या खेळाचा रंगच पालटतो. प्रत्येक जण आपापली चाल खेळतो. कुणीच जिंकत नाही, प्रेक्षकसुद्धा बुद्धिबळातल्या अनिर्णीत अवस्थेप्रमाणे 'स्टेलमेट' होतो.

'तलवार' सपासप वार करत नाही. मात्र तळपतो. त्रिफळा उडवणारे संवाद इथे नाहीत. मात्र नि:शब्द करणारा परिणाम साधला जातोच.
'डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी' मध्ये आपल्या नजरेत आलेला 'नीरज कबी' हा अभिनेता पुन्हा एकदा ताकदीचं सादरीकरण करतो. त्याने साकारलेला डॉ. रमेश टंडन एकेक क्षणात सच्चा वाटतो. नैराश्य, अनिश्चितता, असहाय्यता असं सगळं व्याकुळ मिश्रण त्याच्या नजरेतून दिसतं.
त्याच्या पत्नीच्या भूमिकेत कोंकना सेन-शर्माला विशेष वाव नाही आहे. आजच्या काळातल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्र्यांमधली एक कोंकना, तिला जितका वाव मिळतो, तेव्हढ्यातही स्वत:ला सिद्ध करतेच !
चित्रपट इरफान खानच्या अश्विन कुमारचा आहे. अश्विन कुमार जो स्वत: वैयक्तिक आयुष्यात रीमा कुमार (तब्बू) घटस्फोटाला सामोरा जातो आहे, तो व्यावसायिक आयुष्यात ही एक अशी केस स्वीकारतो, जी त्याला सुरुवातीला 'किरकोळ मर्डर-बिर्डर केस' वाटत असल्याने त्याला स्वीकारायची नसते. मात्र वरवर शांत दिसणाऱ्या डोहात खाली भोवरा असावा, त्याप्रमाणे तो ह्या केसमध्ये कसा गुरफटतो, हे पाहणे रंजक आहे. कर्तव्यकुशल अश्विन कुमार त्याने जबरदस्त उर्जेने साकारला आहे. पोलीस अधिकाऱ्याच्या उलट तपासणीचा, स्वत:च्या फसगतीबद्दल कळतं तेव्हाचा आणि शेवटाकडे जातानाचे अनेक असे काही प्रसंग केवळ जबरदस्त झाले आहेत.
तब्बूला पाहुण्या कलाकाराचंच काम आहे. तेव्हढ्या वेळात ती तिचा नेहमीचा विझलेला चेहरा घेऊन वावरते.

चित्रपटाचं लेखन विशाल भारद्वाजनी केलं आहे. पटकथेत बारीक-सारीक तपशील उत्तम प्रकारे सांभाळले आणि पेरलेही आहेत. चित्रात जे चक्र पूर्ण करतो, त्यात ह्या कथा-पटकथेचा वाटा अनन्यसाधारण आहे. गाण्यांना इथे काही वाव नव्हताच. एक गाणं वाजतं, जे गुलजार साहेबांनी लिहिलं आहे. त्याला संगीतही विशाल भारद्वाजांचंच आहे. ते गाणं पूर्णपणे विस्मरणीय आहे.

ए. श्रीकर प्रसाद, हे नाव अनेक उत्तमोत्तम चित्रपटांशी एडिटर म्हणून जोडलेले आहे. कॉकटेल, फाईण्डिंग फॅनी, देढ ईश्कीया, डेव्हिड अश्या अनेक चित्रपटांशिवाय मणीरत्नमच्या रावण, गुरु, युवा वगैरेचंही त्यांनी काम केलं आहे. त्यांच्या कामाच्या ह्या यादीवरून त्यांचं इथलं काम कसं असेल, हे सांगायची आवश्यकताच नाही !

ह्यापूर्वी चांगलं, पण विशेष व्यावसायिक यश न मिळवणारं काम केलेल्या दिग्दर्शिका मेघना गुलजारने पुन्हा एकदा उत्तम काम केलंच आहे. व्यावसायिक यश मिळवणे, हा त्यामागचा उद्देश नक्कीच नसावा. पण 'तलवार' मुळे यशाची चव त्यांना चाखायला मिळेलच, असं वाटतं. कहाणीवर दिग्दर्शिकेचे घट्ट पकड जाणवत राहते. एकच प्रसंग जेव्हा वेगवेगळ्या लोकांच्या अवलोकनातून दाखवला गेला आहे, तेव्हा सांभाळलेला साधर्म्य व तफावत ह्यांतला समतोल साधण्यासाठी पटकथेतल्या बारकाव्यांची मदत झाली असेलच, मात्र 'सफाई' तर दिग्दर्शिकेचीच !

'तलवार' ही एक सत्यकथेवर आधारित असल्याने 'Real life crime thriller' म्हणवला जाऊ शकतो. आधीच म्हटल्याप्रमाणे ही तलवार अंगावर येईल. बेचैन करेल. ही तलवार स्वत:ही अस्वस्थपणे म्यान होईल आणि तुम्हालाही अस्वस्थ करून सोडेल.
हा चित्रपट न पाहण्याचं एकच कारण असू शकतं. ते म्हणजे, 'मला डिस्टर्ब व्हायला आवडत नाही.'

रेटिंग - * * * *

http://www.ranjeetparadkar.com/2015/10/movie-review-talvar.html

हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये ०४ ऑक्टोबर २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे :-

12145096 - Copy.JPG

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तलवार : मला आवडला सिनेमा balalnced आहे. कुठेही तलवार पुर्णपणे निर्दोष आहेत असे दाखवले नाही. इरफान मस्त. मी नोएडात त्या एरियाच्या जवळच रहात होतो जेव्हा ही घटना घडली. त्यामुळे खुप रिलेट झाला. पोलिसांचा गाढवपणा तेव्हाही जाणवला होता. कमित कमी आरुषीच्या आई वडीलांचा द्रुष्टीकोण तरी लोकांसमोर आला तसेच मिडीयाने दाखवल्याप्रमाणे आरुषी चारित्र्यहीन नव्हती एवढेतरी लोकांना कळाले. काय बोध घ्यायचा ह्यातुन तर घरात गरज नसल्यास पुर्ण वेळ नोकर ठेवायचा नाही.

जितका जबरदस्त सिनेमा आहे , तुझा रिव्यू ही तितकाच जबरदस्त आहे..

हा चित्रपट न पाहण्याचं एकच कारण असू शकतं. ते म्हणजे, 'मला डिस्टर्ब व्हायला आवडत नाही.'

यस्स.. घरातील इतरांचं हेच कारण असल्याने एकटीनेच जाऊन पाहिला..

खरच डीस्टर्बींग सिनेमा आहे....
तुमचा रीव्यु पण खुप आवडला....सगळे मुद्दे मस्त कव्हर केले आहेत...
तब्बु आणि ईरफान च्या सीन्स मद्धे ईजाजत चा आलेला संदर्भ खुप आवडला.... Happy
पण तब्बु नसती आणि तिच्याऐवजी अजुन दुसरं कोणीही असतं तरी काहीही फरक पडला नसता

हा चित्रपट न पाहण्याचं एकच कारण असू शकतं. ते म्हणजे, 'मला डिस्टर्ब व्हायला आवडत नाही.' > एकदम अचूक.

मी ही म्हणूनच हा सिनेमा अजून पाहू शकले नाही. एक निष्पाप व्यक्ती जीवानीशी गेली आणि त्यावर एवढा ऊहापोह झाला की त्या बातम्या ही बघणे तेव्हा बंद केले. आणि आता त्यावर एक सिनेमा बघायला जाणे पटतच नाही . नवरा म्हणतोय की एक वेगळी कथा म्हणून बघ, पण तरीही नाही बघावासा वाटत.

परिक्षण आवडले

रसप, परिक्षण आवडलं !

स्पॉयलर अ‍ॅलर्ट
.
.
.
.
.
.
केस फिरवण्यामागे कोण व का असेल हेच समजले नाही.... नॉर्मली पोलिटीकल प्रेशर्स किंवा गुन्हेगार बडी असामी असेल तर ते होते परंतु इथे ते का घडवले गेल आहे हे समजले नाहीये..

तेव्हढ्या वेळात ती तिचा नेहमीचा विझलेला चेहरा घेऊन वावरते. >> हे कौतुक आहे की टोमणा माहीत नाही. पण वा !
या परीक्षणाची वाटच बघत होतो. प्रतिसादांमध्येही कोणाला कसा वाटला हे वाचून घेण्यास उत्सुक.

सामान्य माणसाने पैसे टाकले तरी केस फिरते.

याच विषयावर रहस्य सिनेमा आला होता. त्यात आई पोलिसाना पैसे देऊन गप्प करते असे दाखवले आहे.

सिनेमात दाखवले आहे ते किती रिअल आहे माहीत नाही. पण टेरेसवरचा हाताचा शिक्का प्रिझर्व न करणे , कठड्याला व कुलुपाला लागलेले रक्त गंज म्हणून सोडून देणे , क्राइम सीनवरती सर्व लोकाना सोडून ठसे डिस्टर्ब होऊ देणे , इ इ निग्लिजन्स हे मुद्दाम केल्यासारखे वाटते.

रणजित,
तुमच्या रिव्ह्यु ची वाट च पहात होतो...''मला डिस्टर्ब व्हायला आवडत नाही" ह्याच कॅटेगरीतील घरचे सगळे लोक असल्याने मला एकट्यालाच जाउन बघावा लागणार आहे. तुम्ही लिहिले आहे..कहाणीवर दिग्दर्शिकेचे घट्ट पकड जाणवत राहते..हो, मेघना ची ती खासियत आहे, गुलझार साहेबांकडुन आलेला गुण असेल कदाचित, अगदी तीच्या पहिल्या वाहिल्या "फिलहाल" मधे ही हे जाणवले होते.

limbutimbu | 5 October, 2015 - 17:37
शीर्षकातील अस्वस्थपणे हा शब्द सुधारायला हवाय. अवस्थपणे असा झालाय.

>> धन्यवाद !
सुधारणा केली आहे. Happy

केस फिरवण्यामागे कोण व का असेल हेच समजले नाही.... नॉर्मली पोलिटीकल प्रेशर्स किंवा गुन्हेगार बडी असामी असेल तर ते होते परंतु इथे ते का घडवले गेल आहे हे समजले नाहीये..

>>
पोलिसांनी हलगर्जीपणाचा कळस केलेला असतो. जर निकाल पोलिसांच्या तपासाच्या विरुद्ध लागला, तर प्रचंड मानहानी आणि कदाचित कठोर कारवाई होण्याची शक्यता असते. पोलीस कमिशनर आणि नवा सीबीआय संचालक ह्यांच्यात खूप जुने आणि घट्ट सौहार्दाचे संबंध असल्याचं दाखवलं आहे. 'एक दोस्त की इज्जत दुसरे दोस्त के हाथ में' असा सगळा प्रकार असतो.
प्रेशर असतं, ते पोलिटीकल किंवा गुन्हेगार बडी असामी वगैरेंचं नसतं, तर सिस्टमचं असतं.

ऋन्मेऽऽष | 5 October, 2015 - 18:39
तेव्हढ्या वेळात ती तिचा नेहमीचा विझलेला चेहरा घेऊन वावरते. >> हे कौतुक आहे की टोमणा माहीत नाही.

>>
केवळ निरीक्षण. प्रत्येक वेळी कौतुक किंवा टीका (टोमणा) च केली पाहिजे, असं थोडीच आहे !

छान परिक्षण
हा चित्रपट न पाहण्याचं एकच कारण असू शकतं. ते म्हणजे, 'मला डिस्टर्ब व्हायला आवडत नाही.'

यस्स.. घरातील इतरांचं हेच कारण असल्याने एकटीनेच जाऊन पाहिला..>>>>>>>> +१००
मलाही याच कारणासाठी एकटीने/मैत्रिणीबरोबर पहायला लागणार!

तेव्हढ्या वेळात ती तिचा नेहमीचा विझलेला चेहरा घेऊन वावरते. >> ऋन्मेऽऽष to me this is appreciation. What you expect from a lady who's only daughter (who was born after 5 years of IVF treatment) was killed and her husband is the prime suspect of that murder.

mandard | 6 October, 2015 - 10:06 नवीन
तेव्हढ्या वेळात ती तिचा नेहमीचा विझलेला चेहरा घेऊन वावरते. >> ऋन्मेऽऽष to me this is appreciation. What you expect from a lady who's only daughter (who was born after 5 years of IVF treatment) was killed and her husband is the prime suspect of that murder.

>> अहो मालक !
ती डॉक्टरची पत्नी नाही. तो रोल कोंकणाने समर्थपणे केलाय. ती इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरची (इरफान खानची) पत्नी दाखवलीय.

mandard | 5 October, 2015 - 16:57
तलवार : मला आवडला सिनेमा balalnced आहे. कुठेही तलवार पुर्णपणे निर्दोष आहेत असे दाखवले नाही. इरफान मस्त. मी नोएडात त्या एरियाच्या जवळच रहात होतो जेव्हा ही घटना घडली. त्यामुळे खुप रिलेट झाला. पोलिसांचा गाढवपणा तेव्हाही जाणवला होता. कमित कमी आरुषीच्या आई वडीलांचा द्रुष्टीकोण तरी लोकांसमोर आला तसेच मिडीयाने दाखवल्याप्रमाणे आरुषी चारित्र्यहीन नव्हती एवढेतरी लोकांना कळाले. काय बोध घ्यायचा ह्यातुन तर घरात गरज नसल्यास पुर्ण वेळ नोकर ठेवायचा नाही.

>>
ही वरची तुमची प्रतिक्रिया ह्या बाफवर पहिली आहे. आणि आत्ता काही वेळापूर्वी आलेली प्रतिक्रिया वाचली, तर तुम्ही नक्की पाहिला आहे का चित्रपट, असा प्रश्न पडतो आहे !

mandard | 6 October, 2015 - 10:11 नवीन
oh I think it is about Kokana because it applied to her acting also.

>> ओके. Happy

I have seen the movie. But why you think I haven't seen it that I don't know :-). We both can have different perception about the movie.

केवळ निरीक्षण. प्रत्येक वेळी कौतुक किंवा टीका (टोमणा) च केली पाहिजे, असं थोडीच आहे !
>>>
ओके रसप. बेस्ट पॉलिसी. निरीक्षन सुद्धा पटले, शब्द उपमा समर्पक. विझलेला चेहरा.

Pages