अस्वस्थपणे म्यान (Movie Review - Talvar)

Submitted by रसप on 5 October, 2015 - 07:23

नुकतेच चैतन्य ताम्हाणे ह्यांच्या 'कोर्ट' ह्या चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकन देण्यात आले. 'कोर्ट' हा चित्रपट एका सर्वसामान्य माणसाच्या न्यायव्यवस्थेतील ससेहोलपटीविषयी होता. एखाद्या साध्याश्या प्रकरणालाही कोर्टात किती काळ लागू शकतो, ह्याचा आपल्यापैकी प्रत्येकालाच अनुभव नसला, तरी अंदाज नक्कीच आहे. म्हणूनच आपण म्हणतोही की, 'शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये.'
मात्र कोर्टाच्या पायरीपर्यंत पोहोचण्याआधीही काही वेळेस अनेक पायऱ्या असतात. न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचायच्या आधी अनेक प्रकरणांना तपासयंत्रणा चिवडतात. संबंधित व्यक्ती त्यात भरडल्याही जातात. कोर्टाच्या संथगतीला अधोरेखित करणारा चित्रपट 'कोर्ट'सारखा दुसरा नसला, तरी तपासयंत्रणेच्या वरवंट्याखाली भरडल्या जाणाऱ्या सामान्य व्यक्तीला दाखवणारे अनेक चित्रपट आपण पाहिले आहेत. त्यांतले बहुतांश अतिरंजित, तर काही खरोखर अंगावर येणारे होते. 'अंगावर येणे', ह्याचेही दोन प्रकार होऊ शकतात. एक म्हणजे भडकपणामुळे आणि दुसरे म्हणजे उत्कटतेमुळे. 'तलवार'सुद्धा अंगावर येतो. पण त्यातल्या भडकपणामुळे नाही, तर उत्कटपणामुळे. काही चित्रपट एखाद्या धबधब्याप्रमाणे कोसळतात. तो आवाज, ते दृश्य स्तिमित करणारं असतं. 'तलवार' सारखे चित्रपट हे एखाद्या शांत ओहोळासारखे वाहत राहतात. तो संयतपणे वाहणारा प्रवाह करत असलेली संयमित नादनिर्मिती, नीरव शांततेत मनात चलबिचल करते. ही चलबिचल धबधबा पाहताना काही क्षण स्तिमित होण्यासारखी नसते. ती एक बेचैनी असते, जी अंतर्मनाला ढवळून काढते. आपल्याच नकळत आपण पडद्यावर चाललेल्या नाट्याचा एक भाग होऊन जातो. कुठल्या तरी एका पात्रात आपण स्वत:ला पाहायला लागतो. चित्रपट संपतो. ते पात्र नाहीसं होतं. मागे उरते बेचैनी. ढवळून काढणारी. पोखरणारी. पण निरुपाय. आपल्या क्षुल्लकतेचा, हतबलतेचा, असहाय्यतेचा आपल्यालाच एक वांझोटा संतापही येतो. टॅक्सी नं. ९२११ मधला 'जय' ज्या तिरस्काराने 'राघव'ला सांगतो की, 'दारु पी और अपने घर पे जा', त्याच तिरस्काराने आपणच आपल्याला सांगतो, 'गाडी काढ आणि घरी चल.'

नॉएडामध्ये काही वर्षांपूर्वी झालेल्या आरुषी तलवार व हेमराज बंजाडे ह्यांच्या दुहेरी खून प्रकरणावर 'तलवार' आधारित आहे. पण ह्या 'तलवार' शब्दाचा संदर्भ वेगळा आहे. न्यायदेवतेची डोळ्यांवर पट्टी आणि हातात तराजू घेतलेली मूर्तीच आपण आजतागायत पाहत आलो आहोत. पण तिच्याच दुसऱ्या हातात तलवारही आहे. 'ही तलवार म्हणजे आपण. पोलीस', असं चित्रपटात एके ठिकाणी एक पात्र म्हणतं. 'तलवार' हा त्या 'तलवार'बद्दल आहे.

स्वत:ची मुलगी 'श्रुती' आणि घरचा नोकर 'खेमपाल' ह्यांच्या खुनाचा आरोप असलेला डॉ. रमेश टंडन (नीरज कबी) पोलिसांच्या ताब्यात आहे. पण ह्या धक्कादायक प्रकरणाने खळबळ माजवली आहे. एक डॉक्टर बाप आपल्या मुलीचा खून करतो, पोलीस त्याला अटक करतात आणि डॉक्टर व त्याचे इतर नातेवाईक आरोपांना अमान्य करतात. हे सगळं नक्की काय आहे ? तपासयंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उठतात आणि प्रकरण 'सीडीआय'कडे दिलं जातं. ऑफिसर अश्विन कुमार (इरफान खान) ह्या अत्यंत कुशल अधिकाऱ्याकडे तपास सोपवला जातो. चीफ अश्विन कुमार आणि त्याचा एक ज्युनिअर (सोहम शाह) मिळून पाळंमुळं खणून काढतात आणि तपासातून काही वेगळीच कहाणी समोर येते.
पण सिस्टम आपला खेळ खेळते. मोहरे बदलतात. पट बदलतो. सगळ्या खेळाचा रंगच पालटतो. प्रत्येक जण आपापली चाल खेळतो. कुणीच जिंकत नाही, प्रेक्षकसुद्धा बुद्धिबळातल्या अनिर्णीत अवस्थेप्रमाणे 'स्टेलमेट' होतो.

'तलवार' सपासप वार करत नाही. मात्र तळपतो. त्रिफळा उडवणारे संवाद इथे नाहीत. मात्र नि:शब्द करणारा परिणाम साधला जातोच.
'डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी' मध्ये आपल्या नजरेत आलेला 'नीरज कबी' हा अभिनेता पुन्हा एकदा ताकदीचं सादरीकरण करतो. त्याने साकारलेला डॉ. रमेश टंडन एकेक क्षणात सच्चा वाटतो. नैराश्य, अनिश्चितता, असहाय्यता असं सगळं व्याकुळ मिश्रण त्याच्या नजरेतून दिसतं.
त्याच्या पत्नीच्या भूमिकेत कोंकना सेन-शर्माला विशेष वाव नाही आहे. आजच्या काळातल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्र्यांमधली एक कोंकना, तिला जितका वाव मिळतो, तेव्हढ्यातही स्वत:ला सिद्ध करतेच !
चित्रपट इरफान खानच्या अश्विन कुमारचा आहे. अश्विन कुमार जो स्वत: वैयक्तिक आयुष्यात रीमा कुमार (तब्बू) घटस्फोटाला सामोरा जातो आहे, तो व्यावसायिक आयुष्यात ही एक अशी केस स्वीकारतो, जी त्याला सुरुवातीला 'किरकोळ मर्डर-बिर्डर केस' वाटत असल्याने त्याला स्वीकारायची नसते. मात्र वरवर शांत दिसणाऱ्या डोहात खाली भोवरा असावा, त्याप्रमाणे तो ह्या केसमध्ये कसा गुरफटतो, हे पाहणे रंजक आहे. कर्तव्यकुशल अश्विन कुमार त्याने जबरदस्त उर्जेने साकारला आहे. पोलीस अधिकाऱ्याच्या उलट तपासणीचा, स्वत:च्या फसगतीबद्दल कळतं तेव्हाचा आणि शेवटाकडे जातानाचे अनेक असे काही प्रसंग केवळ जबरदस्त झाले आहेत.
तब्बूला पाहुण्या कलाकाराचंच काम आहे. तेव्हढ्या वेळात ती तिचा नेहमीचा विझलेला चेहरा घेऊन वावरते.

चित्रपटाचं लेखन विशाल भारद्वाजनी केलं आहे. पटकथेत बारीक-सारीक तपशील उत्तम प्रकारे सांभाळले आणि पेरलेही आहेत. चित्रात जे चक्र पूर्ण करतो, त्यात ह्या कथा-पटकथेचा वाटा अनन्यसाधारण आहे. गाण्यांना इथे काही वाव नव्हताच. एक गाणं वाजतं, जे गुलजार साहेबांनी लिहिलं आहे. त्याला संगीतही विशाल भारद्वाजांचंच आहे. ते गाणं पूर्णपणे विस्मरणीय आहे.

ए. श्रीकर प्रसाद, हे नाव अनेक उत्तमोत्तम चित्रपटांशी एडिटर म्हणून जोडलेले आहे. कॉकटेल, फाईण्डिंग फॅनी, देढ ईश्कीया, डेव्हिड अश्या अनेक चित्रपटांशिवाय मणीरत्नमच्या रावण, गुरु, युवा वगैरेचंही त्यांनी काम केलं आहे. त्यांच्या कामाच्या ह्या यादीवरून त्यांचं इथलं काम कसं असेल, हे सांगायची आवश्यकताच नाही !

ह्यापूर्वी चांगलं, पण विशेष व्यावसायिक यश न मिळवणारं काम केलेल्या दिग्दर्शिका मेघना गुलजारने पुन्हा एकदा उत्तम काम केलंच आहे. व्यावसायिक यश मिळवणे, हा त्यामागचा उद्देश नक्कीच नसावा. पण 'तलवार' मुळे यशाची चव त्यांना चाखायला मिळेलच, असं वाटतं. कहाणीवर दिग्दर्शिकेचे घट्ट पकड जाणवत राहते. एकच प्रसंग जेव्हा वेगवेगळ्या लोकांच्या अवलोकनातून दाखवला गेला आहे, तेव्हा सांभाळलेला साधर्म्य व तफावत ह्यांतला समतोल साधण्यासाठी पटकथेतल्या बारकाव्यांची मदत झाली असेलच, मात्र 'सफाई' तर दिग्दर्शिकेचीच !

'तलवार' ही एक सत्यकथेवर आधारित असल्याने 'Real life crime thriller' म्हणवला जाऊ शकतो. आधीच म्हटल्याप्रमाणे ही तलवार अंगावर येईल. बेचैन करेल. ही तलवार स्वत:ही अस्वस्थपणे म्यान होईल आणि तुम्हालाही अस्वस्थ करून सोडेल.
हा चित्रपट न पाहण्याचं एकच कारण असू शकतं. ते म्हणजे, 'मला डिस्टर्ब व्हायला आवडत नाही.'

रेटिंग - * * * *

http://www.ranjeetparadkar.com/2015/10/movie-review-talvar.html

हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये ०४ ऑक्टोबर २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे :-

12145096 - Copy.JPG

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चित्रपट आवडला. परीक्षण तर खासच…

मीडियामध्ये ही दुसरी बाजू (नोकराच्या मित्राने खून केला असण्याची) कधी वाचनात नाही आली…
त्यामुळे ही नवीन बाजू होती हे कळाले.

पण खरेच अशी दुसरी बाजू होती का??आणी खरेच जर असे असेल तर तलवार कुटुंबीयाची दया वाटू लागते.

एकीकडे मुलीचा मृत्यू आणी त्याच बरोबर तिच्या खूनाचा आरोप…

कुणी सांगेल का की या केसमध्ये खरेच अशी दुसरी बाजू होती का? कारण मी आतापर्यंत तरी तलवार दाम्पत्याला या हत्येचा जबाबदार धरीत आलो आहे.

पण खरेच अशी दुसरी बाजू होती का??आणी खरेच जर असे असेल तर तलवार कुटुंबीयाची दया वाटू लागते.>> Yes it is true. This side was also there. But both sides didn't have clear evidence to prove in court. But lower court goes with the version of parents as killers. It is unfortunate. Hope the upper court will give justice to them.

पण खरेच अशी दुसरी बाजू होती का??>> हो तीच तर होती. नोकरांची नार्को पण झाली त्यात त्यांनी कबुल पण केले होते. पण नार्को टेस्टला अजुनही आपल्याकडे मान्यता नाही.

मला चित्रपट पाहून असे वाटले की तलवार दाम्पत्य हे निर्दोष होते. कारण नार्को टेस्ट ही तलवार दाम्पत्याची व त्या नोकरांची ही झाली.
नोकरांनी गुन्हा केल्याचे समोर आले व तलवार दाम्पत्याच्या नार्को टेस्ट मध्ये काही आक्षेपार्ह आढळले नाही.

तरीही तलवार कुटुंब तुरुंगात का??कशाच्या आधारे??कारण चित्रपटात दाखवल्याप्रमाणे नोकरांविरोधात आढळलेले पुरावे अधिक प्रमाणात त्यांनाच गुन्हेगार ठरवत होते आणे तलवार कुटुंबियांच्या विरोधात सबळ पुरावे तर सापडलेच नाहीत।

परीक्षण छान आहे....

चित्रपट बघितला, खुप आवडला आणि खरंच तुम्ही लिहिल्याप्रमाणे हा चित्रपट अस्वस्थ करुन सोडतो....

परिक्षण छान लिहिलेय, चित्रपटही छान(?) आहे
फक्त शेवटच्या सीनमध्ये जे काय 'धर्मप्रसारक आसन' वगैरे चर्चा दाखविलेय दोन तपास टिम मध्ये, ते काही पटण्यासारखे वाटत नाही,

सिनेमा बघितलेल्यांनी प्लीज सांगा ना - लेकीला (वय वर्षे १४) घेऊन जावे का???
<<
नताशाजी,
लेकीला घेऊन जायला हरकत नाही, कारण सिनेमात अश्लिल दृष्ये, शिव्या, रक्तरंजित सीन, वगैरे काही एक दाखविले नाही. हत्या झाल्यानंतरच्या तपासाची कहाणी दाखविलेय संपुर्ण चित्रपटात.

सिनेमा बघितलेल्यांनी प्लीज सांगा ना - लेकीला (वय वर्षे १४) घेऊन जावे का???>> माझ्यामते नाही.

चित्रपटात बीभत्स असं काही नाही पण जन्मदाताने मुलीची हत्या केली हे चित्रण आणि परिसंवाद कोवळ्या वयावर
अजाणपणे आघात करु शकतो.

मलाही चित्रपट पाहायचा आहे अजुन. नक्कीच पाहिन. रहस्य पाहिलाय, पण त्याचा शेवट अजिबात आवडला नाही, गुंडाळाल्यासारखा वाटला.

विकीवर मी एकदा ही केस पुर्ण वाचली. त्यात पोलिसांनी सुरवातीला किती हलगर्जीपणा केला ते वाचुन संताप संताप झालेला. खुन झालेल्या जागी पोलिस यायच्या आधीच मिडियासकट इतर लोक फिरले, काही पुरावा तिथे असला असता तो या बागडण्याने पुर्ण नष्ट झाला आणि पोलिसांनाही याचे महत्व कळले नाही. पोलिस आनि मिडीया या दोघांनीही पहिल्या दिवशी "मुलीचा खुन करुन नोकर पळाला, आता त्याला पकडले की केस सुटली" एवढ्याच एका वाक्यात केस गुंडाळली आणि पुरावा बिरावा काही गोळा करायला हवा, खुनाची जागा कर्डोन ऑफ्फ करायला हवी इत्यादी बाबीकडे दुर्लक्ष केले. दुस-या दिवशी नोकराची बॉडी मिळाल्यावर गुन्ह्याची गंभिरता थोडी फार लक्षात याय्ला हवी होती पण ती तशी आली नाही. नंतर सगळॅच कठीण होऊन बसले.

या प्रकरणातले सत्य कधीच बाहेर येणार नाही याची आता खात्री पटलीय. जर पालक खरेच निर्दोष असतील तर त्यांचे आजही जेलमध्ये असणे अतिशय वाईट आहे. पण पुर्ण केस वाचल्यावर ते निर्दोष असावेत याची १०० टक्के खात्री पटत नाही.

कालच 'तलवार' पाहीला. चित्रपट खरेच विचार करायला लावतो. दोन्हि टीमच्या तपासामध्ये इतकी तफवत कशी असु शकते? पन एक तर कळाले कि आरुशि चरित्रहिन नव्ह्ती आणी पालकनी खुन केला नाही.आपल्या 'system' मधिल त्रुटी नेमाकेपनाने दाखवतो. प्रेकश्कना विचार करायला लावतो.

छानच सिनेमा आहे. किशोरी वयाचया मुली असणार्‍या पाल कांना खास भावेल. राशोमान सारखे
एकच सत्य अनेक कोनांतून दाखवले आहे. इर्फान व तबूचा भाग छान आहे खरेतर. मला तरी आव्डला. शेवटचा मीटिंगचा सीन मस्त आहे. मला तर एंडिंगला रडायला आले. मुलांसमोर आपण किती गूफी पणा बावळट पणा करतो काय माहीत उद्या काय होईल? आरुषी हा घरी फार सेन्सिटिव टॉपिक आहे. मेघनाने शेवट केला ते वाक्य आम्ही सहा महिन्यात एकदा तरी म्हणतो. ती असती तर आता किती वर्शाची असती वगैरे. माझ्या मुलीला तर तिच्या हत्ये चा उल्लेख देखील अवघड वा टतो. तिला सोडूनच बघायला गेले
इरफान व त्याचा बॉस, असिस्टंट ह्यांची कामे सुरेख झाली आहेत. ह्या दिग्दर्शिके कडून अजून
छान छान सिनेमांची अपेक्षा आहे. तिची शैली प्रामाणिक व रिअलिस्टिक आहे.

विरुद्ध उदाहरण म्हणजे प्रभुदेवा : सिंग इज ब्लिंग!!!

रसप, परीक्षण आवडलं.

मला हा चित्रपट पाहायचा आहे कारण इतका संवेदनशील विषय त्यांनी कसा हाताळला आहे हे बघण्याची मला उत्सुकता आहे. जेव्हा ही घटना घडली त्यावेळी मी ती वरवरच फॉलो केली होती आणि हा गुन्हा पालकांनीच केला आहे अशी माझी पक्की धारणा झाली होती. मात्र वर्षंभरापूर्वी मी नेटवर ह्या केसबद्दल बरंच वाचलं, बरेच व्हिडियोज पाहिले आणि माझी ती धारणा बदलत गेली. मिडियामध्ये खर्‍यांचं खोटं करण्याची किती जबदरस्त ताकद आहे हे जाणवून भिती वाटली.

पालकांच्या हातून हा गुन्हा घडलाय की नाही आणि त्यांच्या हातून नसेल तर कुणाच्या हातून घडलाय ह्याची ठोस उत्तरं मिळायची शक्यता धूसर आहे. पण त्यांनी हा गुन्हा केला नसेल अशीही खूप मोठी शक्यता आहे आणि ती जर खरी असेल तर त्यांच्यावर किती मोठा अन्याय होत आहे ह्या कल्पनेने भयंकर अस्वस्थता येते.

त्यानंतर जेव्हा जेव्हा कुठल्या चर्चांत हा विषय निघाला आणि मी अशीही बाजू आहे हे सांगायचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा मला समोरच्याने वेड्यात काढलं. पालकच खुनी ही संकल्पना अगदी खिळा ठोकून बसली आहे लोकांच्या मनात. हा चित्रपट पाहून लोकं आता दुसरी बाजू समजून घेत आहेत ( खरं तर त्याच बाजूने मत बनवू लागले आहेत म्हणे ! ) हे वाचून समाधान वाटतेय.

हा चित्रपट पाहून लोकं आता दुसरी बाजू समजून घेत आहेत ( खरं तर त्याच बाजूने मत बनवू लागले आहेत म्हणे ! ) हे वाचून समाधान वाटतेय.

मिडीया खोट्याचे खरे करु शकते असे तुम्हाला वाटते तर सिनेमा हाही मिडियाचा एक भाग आहे हे लक्षात ठेवा. Happy

आरुषीछ्या बाबतीत तिच्या पालकांच्या बाजुने उभे असलेले पण खुप जण होते/आहेत. काहीजणांई ब्लॉग्सवर त्यांच्यावर कसा अन्याय झालाय तेही लिहिलेय. या प्रकरणातले सत्य कधीतरी बाहेर यावे ही आत्यंतिक इच्छा आहे.

या प्रकरणातले सत्य कधीतरी बाहेर यावे ही आत्यंतिक इच्छा आहे >> हो..

पण खरचच जर क दोष नोकरांचा असेल तर पालकांचा नाहक बळी गेलाय

परवा हा सिनेमा पाहिला. आणि रात्री घरी आल्यावर विकीवरची त्या केसची सगळी माहिती वाचून काढली. (प्रत्यक्षात ती केस मी फारशी फॉलो केली नव्हती.)
२ दिवस खूप अस्वस्थ वाटलं. आपल्या तपासयंत्रणांचा हलगर्जीपणा पाहून हताश व्हायला झालं.
केसमधे संगती न लागणारे अनेक मुद्दे आहेत.
बंद खोलीत आई-वडिलांना बाहेरचे कुठलेही आवाज ऐकू येत नाहीत हे इरफान प्रयोगाअंती सिद्ध करतो. पण प्रत्यक्ष घटनेच्या दिवशी सकाळी मोलकरणीने वाजवलेली बेल त्यांना कशी काय ऐकू येते? - असा मला प्रश्न पडला.

विकीवर दिलेल्या आरुषी आणि नोकराच्या मोबाईल फोन्सबद्दलच्या तपशीलांना सिनेमात ऑलमोस्ट बगल दिलेली आहे. तसंच गच्चीच्या किल्लीच्या गूढालाही फारसं वेटेज दिलेलं नाही.

एक तपासाधिकारी (इरफान) - प्रत्यक्षात त्याचं घर-संसार मोडण्याच्या वाटेवरचं; पण त्याने केलेल्या तपासात अंतिमत: कुटुंबव्यवस्थेच्या, आई-वडिलांच्या मुलांवरच्या मायेच्या बाजूने निष्कर्ष निघतात.
दुसरा तपासाधिकारी - बायको गावाला गेलेली असताना लहान मुलाची पूर्ण जबाबदारी घेणारा; पण त्याच्या तपासात अखेर दुभंगलेली कुटुंबव्यवस्था आणि भीषण टोक गाठलेली नाती समोर येतात.
कथानकातला हा अप्रत्यक्ष विरोधाभास मला आवडला. खूप परिणामकारक वाटला.

मिडीया खोट्याचे खरे करु शकते असे तुम्हाला वाटते तर सिनेमा हाही मिडियाचा एक भाग आहे हे लक्षात ठेवा. >>> मिडियाने ( चित्रपट ) दुसरी बाजू समोर आणल्यावरच लोकं त्या बाजूकडे बघायला तयार झाले आहेत असे म्हणते आहे Happy

ललिता, पॉईंट आहे. जर खून पालकांनी केला नसेल तर अर्थातच इतके काहीतरी भयंकर घडणार आहे ह्याची त्यांना कल्पना नसणार त्यामुळे दमून गाढ झोपल्यानंतरच्या एक वाजताच्या विचित्र वेळेला त्यांना आवाज ऐकू न जाणं शक्य आहे. सकाळी सहाला झोप पूर्ण झालेली असते आणि त्याच वेळेला रोज बेल वाजते हेही सुप्त मनाला माहीत असल्यामुळे बेलच्या आवाजाने जाग आली असणं शक्य आहे.
तू म्हणतेस तसे अजूनही काही पॉईंट्स आहेत ज्यामुळे पालकांवर संशय घ्यायला वाव आहे असं वाटतं पण तेच पॉईंट्स दुसर्‍या बाजूने पाहिले की एखाद्यावर वाईट वेळ येणार असेल तर नशीब कसं कोंडीत पकडू शकतं अशा पद्धतीचं काहीतरी स्पष्टीकरण दिसतं. अजब आहे सगळंच !

<< पण प्रत्यक्ष घटनेच्या दिवशी सकाळी मोलकरणीने वाजवलेली बेल त्यांना कशी काय ऐकू येते? - असा मला प्रश्न पडला.>> माझ्या मते गुन्हा घडला ती वेळ रात्रीची १२ ते ३ का १ ते ३ सांगितलेय . ती वेळ झोप लागली तर गाढ झोपेची वेळ असते म्हणूनच त्यांना ऐकू आलेल नाही . पण मोलकरीण येते ती सकाळी येते आणि सकाळची झोप ही सावध असते. आत्ता उठायचंच .बाई कधीही येईल बेल वाजवेल हे डोक्यात असत आणि झोप पूर्ण झालेली असल्याने जाग येते आणि अर्थातच बेल ऐकू येते Happy

प्रतिसाद दिल्यानंतर आत्ता अगो चा प्रतिसाद वाचला . तिने पण माझ्यासारखाच लिहिलंय. किव्वा तिने आधी प्रतिसाद दिल्यामुळे मी बरचस तिच्या सारख लिहिलंय अस म्हणाव लागेल Happy

<< पण प्रत्यक्ष घटनेच्या दिवशी सकाळी मोलकरणीने वाजवलेली बेल त्यांना कशी काय ऐकू येते? - असा मला प्रश्न पडला.>>

सिनेमात नेमकं काय दाखवलं आहे आणि प्रत्यक्षातही काय झालं होतं माहित नाही, पण सहसा मध्यरात्री किंवा पहाटेनंतर (हवेत गारवा आल्यानंतर) एसी बंद करतात बरेच लोक. तसंच असावं.

हो, हे पहाटेच्या सावध झोपेचं बरोबर आहे.

सिनेमात नेमकं काय दाखवलं आहे आणि प्रत्यक्षातही काय झालं होतं माहित नाही >>> Uhoh

मी पण पाहिला सिनेमा.. प्रत्यक्षात खुनाच्या केसपेक्षा इथली सो कॉल्ड सिस्टीम आणि तिथलं राजकारण, सत्तेची हाव, श्रेय मिळण्यासाठी केलेले वाट्टेल ते प्रयत्न यावर अप्रत्यक्षपणे भाष्य केलं आहे.

लले, तो बेलचा मुद्दा माझ्याही डोक्यात आला होता, पण अगो म्हणतेय त्याप्रमाणे रोजच अनुभवत असलेली सुप्तावस्थेतली जागरूकता पटली.
मोबाईल फोनचा मुद्दाही आला आहे ना सिनेम्यात.. इरफान खान त्या पो.इ.ला नाही का विचारत की सकाळी सहा वाजता वाजत असलेला फोन प्रेत डिसकनेक्ट करेल का Happy

सिनेमात नेमकं काय दाखवलं आहे आणि प्रत्यक्षातही काय झालं होतं माहित नाही, >> आँ?? रसप, काय चाललंय काय कालपासून?

Lol

'माहित नाही' म्हणजे, नीटसं आठवत नाही की, जेव्हा मोलकरणीने वाजवलेली बेल ऐकू येते, तेव्हा एसी बंद असलेला दाखवलं आहे की नाही ते !

Happy

Pages