अस्वस्थपणे म्यान (Movie Review - Talvar)

Submitted by रसप on 5 October, 2015 - 07:23

नुकतेच चैतन्य ताम्हाणे ह्यांच्या 'कोर्ट' ह्या चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकन देण्यात आले. 'कोर्ट' हा चित्रपट एका सर्वसामान्य माणसाच्या न्यायव्यवस्थेतील ससेहोलपटीविषयी होता. एखाद्या साध्याश्या प्रकरणालाही कोर्टात किती काळ लागू शकतो, ह्याचा आपल्यापैकी प्रत्येकालाच अनुभव नसला, तरी अंदाज नक्कीच आहे. म्हणूनच आपण म्हणतोही की, 'शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये.'
मात्र कोर्टाच्या पायरीपर्यंत पोहोचण्याआधीही काही वेळेस अनेक पायऱ्या असतात. न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचायच्या आधी अनेक प्रकरणांना तपासयंत्रणा चिवडतात. संबंधित व्यक्ती त्यात भरडल्याही जातात. कोर्टाच्या संथगतीला अधोरेखित करणारा चित्रपट 'कोर्ट'सारखा दुसरा नसला, तरी तपासयंत्रणेच्या वरवंट्याखाली भरडल्या जाणाऱ्या सामान्य व्यक्तीला दाखवणारे अनेक चित्रपट आपण पाहिले आहेत. त्यांतले बहुतांश अतिरंजित, तर काही खरोखर अंगावर येणारे होते. 'अंगावर येणे', ह्याचेही दोन प्रकार होऊ शकतात. एक म्हणजे भडकपणामुळे आणि दुसरे म्हणजे उत्कटतेमुळे. 'तलवार'सुद्धा अंगावर येतो. पण त्यातल्या भडकपणामुळे नाही, तर उत्कटपणामुळे. काही चित्रपट एखाद्या धबधब्याप्रमाणे कोसळतात. तो आवाज, ते दृश्य स्तिमित करणारं असतं. 'तलवार' सारखे चित्रपट हे एखाद्या शांत ओहोळासारखे वाहत राहतात. तो संयतपणे वाहणारा प्रवाह करत असलेली संयमित नादनिर्मिती, नीरव शांततेत मनात चलबिचल करते. ही चलबिचल धबधबा पाहताना काही क्षण स्तिमित होण्यासारखी नसते. ती एक बेचैनी असते, जी अंतर्मनाला ढवळून काढते. आपल्याच नकळत आपण पडद्यावर चाललेल्या नाट्याचा एक भाग होऊन जातो. कुठल्या तरी एका पात्रात आपण स्वत:ला पाहायला लागतो. चित्रपट संपतो. ते पात्र नाहीसं होतं. मागे उरते बेचैनी. ढवळून काढणारी. पोखरणारी. पण निरुपाय. आपल्या क्षुल्लकतेचा, हतबलतेचा, असहाय्यतेचा आपल्यालाच एक वांझोटा संतापही येतो. टॅक्सी नं. ९२११ मधला 'जय' ज्या तिरस्काराने 'राघव'ला सांगतो की, 'दारु पी और अपने घर पे जा', त्याच तिरस्काराने आपणच आपल्याला सांगतो, 'गाडी काढ आणि घरी चल.'

नॉएडामध्ये काही वर्षांपूर्वी झालेल्या आरुषी तलवार व हेमराज बंजाडे ह्यांच्या दुहेरी खून प्रकरणावर 'तलवार' आधारित आहे. पण ह्या 'तलवार' शब्दाचा संदर्भ वेगळा आहे. न्यायदेवतेची डोळ्यांवर पट्टी आणि हातात तराजू घेतलेली मूर्तीच आपण आजतागायत पाहत आलो आहोत. पण तिच्याच दुसऱ्या हातात तलवारही आहे. 'ही तलवार म्हणजे आपण. पोलीस', असं चित्रपटात एके ठिकाणी एक पात्र म्हणतं. 'तलवार' हा त्या 'तलवार'बद्दल आहे.

स्वत:ची मुलगी 'श्रुती' आणि घरचा नोकर 'खेमपाल' ह्यांच्या खुनाचा आरोप असलेला डॉ. रमेश टंडन (नीरज कबी) पोलिसांच्या ताब्यात आहे. पण ह्या धक्कादायक प्रकरणाने खळबळ माजवली आहे. एक डॉक्टर बाप आपल्या मुलीचा खून करतो, पोलीस त्याला अटक करतात आणि डॉक्टर व त्याचे इतर नातेवाईक आरोपांना अमान्य करतात. हे सगळं नक्की काय आहे ? तपासयंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उठतात आणि प्रकरण 'सीडीआय'कडे दिलं जातं. ऑफिसर अश्विन कुमार (इरफान खान) ह्या अत्यंत कुशल अधिकाऱ्याकडे तपास सोपवला जातो. चीफ अश्विन कुमार आणि त्याचा एक ज्युनिअर (सोहम शाह) मिळून पाळंमुळं खणून काढतात आणि तपासातून काही वेगळीच कहाणी समोर येते.
पण सिस्टम आपला खेळ खेळते. मोहरे बदलतात. पट बदलतो. सगळ्या खेळाचा रंगच पालटतो. प्रत्येक जण आपापली चाल खेळतो. कुणीच जिंकत नाही, प्रेक्षकसुद्धा बुद्धिबळातल्या अनिर्णीत अवस्थेप्रमाणे 'स्टेलमेट' होतो.

'तलवार' सपासप वार करत नाही. मात्र तळपतो. त्रिफळा उडवणारे संवाद इथे नाहीत. मात्र नि:शब्द करणारा परिणाम साधला जातोच.
'डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी' मध्ये आपल्या नजरेत आलेला 'नीरज कबी' हा अभिनेता पुन्हा एकदा ताकदीचं सादरीकरण करतो. त्याने साकारलेला डॉ. रमेश टंडन एकेक क्षणात सच्चा वाटतो. नैराश्य, अनिश्चितता, असहाय्यता असं सगळं व्याकुळ मिश्रण त्याच्या नजरेतून दिसतं.
त्याच्या पत्नीच्या भूमिकेत कोंकना सेन-शर्माला विशेष वाव नाही आहे. आजच्या काळातल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्र्यांमधली एक कोंकना, तिला जितका वाव मिळतो, तेव्हढ्यातही स्वत:ला सिद्ध करतेच !
चित्रपट इरफान खानच्या अश्विन कुमारचा आहे. अश्विन कुमार जो स्वत: वैयक्तिक आयुष्यात रीमा कुमार (तब्बू) घटस्फोटाला सामोरा जातो आहे, तो व्यावसायिक आयुष्यात ही एक अशी केस स्वीकारतो, जी त्याला सुरुवातीला 'किरकोळ मर्डर-बिर्डर केस' वाटत असल्याने त्याला स्वीकारायची नसते. मात्र वरवर शांत दिसणाऱ्या डोहात खाली भोवरा असावा, त्याप्रमाणे तो ह्या केसमध्ये कसा गुरफटतो, हे पाहणे रंजक आहे. कर्तव्यकुशल अश्विन कुमार त्याने जबरदस्त उर्जेने साकारला आहे. पोलीस अधिकाऱ्याच्या उलट तपासणीचा, स्वत:च्या फसगतीबद्दल कळतं तेव्हाचा आणि शेवटाकडे जातानाचे अनेक असे काही प्रसंग केवळ जबरदस्त झाले आहेत.
तब्बूला पाहुण्या कलाकाराचंच काम आहे. तेव्हढ्या वेळात ती तिचा नेहमीचा विझलेला चेहरा घेऊन वावरते.

चित्रपटाचं लेखन विशाल भारद्वाजनी केलं आहे. पटकथेत बारीक-सारीक तपशील उत्तम प्रकारे सांभाळले आणि पेरलेही आहेत. चित्रात जे चक्र पूर्ण करतो, त्यात ह्या कथा-पटकथेचा वाटा अनन्यसाधारण आहे. गाण्यांना इथे काही वाव नव्हताच. एक गाणं वाजतं, जे गुलजार साहेबांनी लिहिलं आहे. त्याला संगीतही विशाल भारद्वाजांचंच आहे. ते गाणं पूर्णपणे विस्मरणीय आहे.

ए. श्रीकर प्रसाद, हे नाव अनेक उत्तमोत्तम चित्रपटांशी एडिटर म्हणून जोडलेले आहे. कॉकटेल, फाईण्डिंग फॅनी, देढ ईश्कीया, डेव्हिड अश्या अनेक चित्रपटांशिवाय मणीरत्नमच्या रावण, गुरु, युवा वगैरेचंही त्यांनी काम केलं आहे. त्यांच्या कामाच्या ह्या यादीवरून त्यांचं इथलं काम कसं असेल, हे सांगायची आवश्यकताच नाही !

ह्यापूर्वी चांगलं, पण विशेष व्यावसायिक यश न मिळवणारं काम केलेल्या दिग्दर्शिका मेघना गुलजारने पुन्हा एकदा उत्तम काम केलंच आहे. व्यावसायिक यश मिळवणे, हा त्यामागचा उद्देश नक्कीच नसावा. पण 'तलवार' मुळे यशाची चव त्यांना चाखायला मिळेलच, असं वाटतं. कहाणीवर दिग्दर्शिकेचे घट्ट पकड जाणवत राहते. एकच प्रसंग जेव्हा वेगवेगळ्या लोकांच्या अवलोकनातून दाखवला गेला आहे, तेव्हा सांभाळलेला साधर्म्य व तफावत ह्यांतला समतोल साधण्यासाठी पटकथेतल्या बारकाव्यांची मदत झाली असेलच, मात्र 'सफाई' तर दिग्दर्शिकेचीच !

'तलवार' ही एक सत्यकथेवर आधारित असल्याने 'Real life crime thriller' म्हणवला जाऊ शकतो. आधीच म्हटल्याप्रमाणे ही तलवार अंगावर येईल. बेचैन करेल. ही तलवार स्वत:ही अस्वस्थपणे म्यान होईल आणि तुम्हालाही अस्वस्थ करून सोडेल.
हा चित्रपट न पाहण्याचं एकच कारण असू शकतं. ते म्हणजे, 'मला डिस्टर्ब व्हायला आवडत नाही.'

रेटिंग - * * * *

http://www.ranjeetparadkar.com/2015/10/movie-review-talvar.html

हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये ०४ ऑक्टोबर २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे :-

12145096 - Copy.JPG

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंजू, फोनच्या मुद्द्याला ऑलमोस्ट बगल दिली आहे असं म्हटलंय बघ मी...

विकीवर वाचलं की नोकराचा मोबाईल नंतर एका ठिकाणी सापडला. पण आरुषीचा मोबाईल आजतागायत पोलिसांना ट्रॅक करता आलेला नाही.

शेवटी दोन्ही तपास-पार्ट्या एकमेकांना आपले मुद्दे समजावून देण्याचा प्रयत्न करतात त्या सीनमधे तर इरफानने कमाल केली आहे!!
(अवांतर - केवळ इरफानसाठी मला जजबा पहावासा वाटतोय.)

ती गच्चीवर किल्ली घेउन जाते आणि तिला
हेमराज चची बॉडी , रक्त
इकडे तिकडे पसरलेले सामान काहिच असे दिसत नाही???

आणि नन्तर पोलिस माग्तात तेव्हा गच्ची ची चावी लगेच का मिळत नाही??

आज पाहिला. उत्तम चित्रपट !

_आनंदी_, ती गच्चीवरुन किल्ली फेकत नाही, त्यांच्या घराच्या बाल्कनीतून फेकते.
गच्चीच्या किल्लीबद्दल मी असं वाचलं आहे की गच्चीची किल्ली नेहमीच हेमराजकडे असायची. तशीच ती त्या दिवशीही होती. नंतर पोलीसांनी जेव्हा तिच्या वडिलांकडे गच्चीचं दार उघडण्यासाठी किल्लीची विचारणा केली, तेव्हा ते 'देतो' म्हणाले, आत गेले आणि मग बाहेर येऊन सांगितलं की किल्ली मिळत नाही ( किंवा ती हेमराजकडे असायची असं उत्तर दिलं. नक्की तपशील आठवत नाहीये आत्ता )
एखाद्या शोकमग्न बापाने मुलीच्या खुनाच्या किंवा त्याच्या दुसर्‍या दिवशी असं गोंधळलेलं उत्तर देणं सहज शक्य आहे. प्रश्न विचारल्या विचारल्या 'मी कशी किल्ली देऊ कारण ती तर हेमराजकडे असायची' असं प्रॉम्प्ट उत्तर सुचेलच असं नाही.

ही केस एका माहितीतल्यांच्या नातेवाईकांची असल्याने ज्या दिवशी हे घडले त्या दिवसापासुन फॉले करत होतो. दोघेही पालक नावाजलेले डेंटीस्ट आहेत. ज्या नोकरांवर संशय होता त्यांची नार्कोटेस्ट झाली व त्यात त्यांनी कबुल पण केले होते पण कोर्टात ती ग्राह्य धरली नाही. पालकांची पण नार्को झाली त्यात काही मिळाले नाही. मुळात पहिल्या दिवसापासुन रुममधे फिंगरप्रिंट घेतलेच नाहीत, रक्त तपासले नाही. पोलीसांनीच रुम धुतली तरी चालेल वगैरे सांगीतल्यामुळे रुम धुतली गेली नंतरच्या अनेक गोष्टी नोकरांकडे जात होत्या. गुन्हेगार सापडत नाही असा केस क्लोजर रिपोर्ट दिलेला असतानाही पालकांनी तो अमान्य केला व न्याय मिळावा म्हणुन अपिल केल्यावर केस त्यांच्यावरच उलटली.

कांदापोहे,
म्हणजे चित्रपटात जे दाखवले आहे ते पूर्ण सत्य आहे?
असे असेल तर सर्व सामान्य लोकांची दिशाभूल मेल्याबद्दल मिडियाला दोषी धरले पाहिजे.

कारण चित्रपट पाहण्याचा आधी माझी आणी माझ्यासारख्या कित्येक लोकांची अशीच समजूत होती की आरुषीची हत्या तिच्या आई वडीलांनी केली.

आणी असे वाटण्यामागाचे कारण म्हणजे मिडिया.

धन्य आहे...

येस मंदार कारण त्या रीपोर्टमधे पालकांवर पण संशयाची सुई होती. कृष्णा व ३ नोकर यांचे नाव त्यानंतर कधीच आले नाही. मिडीयाने तर कहर केला होता त्यावेळी. त्यांनी सर्व लोकांचे अनैतिक संबंध, ऑनर किलींग, पोलीसांचा गलथानपणा, आधीच्या सिबीआयची चौकशी याचे आपले एक वेगळे गणित मांडले होते. केस परत ओपन झाल्यावर फक्त व फक्त पालकांना जबाबदार धरुन त्यांना शिक्षा करुन मो़कळे पण झाले. एकुणातच केस खराब करुन टाकलेली होती.

हे वाचा. यात बर्‍यापैकी काय काय घडले ते लिहीले आहे. http://www.thestar.com/news/world/2013/01/26/aarushi_talwar_murder_a_loo...

कारण चित्रपट पाहण्याचा आधी माझी आणी माझ्यासारख्या कित्येक लोकांची अशीच समजूत होती की आरुषीची हत्या तिच्या आई वडीलांनी केली. >> हा एक मोठा प्रोब्लेम आहे.:(

आता चित्रपटानंतर सर्व बाजुंचा आढावा घेऊन केसचे काहीतरी होईल अशी आशा आहे.

बघीतला मी पण तलवार. अगदी जे लोकांपुढे यायला हवे होते तशी मांडणी करण्यात यशस्वी झाला आहे चित्रपट. सगळी व्हर्जन बघीतल्यावर आपल्या सारख्या सामान्य माणसालाही आई वडिलांवर खूपच अन्याय झालाय हे लक्षात येते.

केपी, ती लिंक फारच अस्वस्थ करणारी आहे. रोज थोड्या थोड्या बातम्या येत असल्याने काही दिवसांपूर्वी काय झाले हे सर्वसामान्यपणे विसरले जाते. पण इथे एकत्रितपणे सगळी माहिती दिल्याने कळतेय.
सिनेमा अजुन पाहिला नाही, पहायचा आहे.

First of all sorry for writing in english.
Humble request to u all to sign up on Free the Talwars page on facebook and also to spread the campaign to other friends.

We have personally known Talwars and have seen Aarushi grow up and then has been snatched away in such a brutal manner. Lively, happy and briiliant teenager who was making plans to enjoy life as any other teenager would do and all was washed off within no time.

Please help by supporting this campaign.

Also request you to sign up petition at the below link for fast track justice for talwars.

https://www.change.org/p/honorable-the-chief-justice-of-india-fast-track...

Thanks with regards
Madhura

आज बघितला. अस्वस्थ करणारा आहे.
कारण चित्रपट पाहण्याचा आधी माझी आणी माझ्यासारख्या कित्येक लोकांची अशीच समजूत होती की आरुषीची हत्या तिच्या आई वडीलांनी केली << +१

हेमराज्/खेमराज च्या मित्रांना दारु प्यायला रात्री ह्यांच्या घरी कशी परवानगी होती?
इतके पैसेवाले लोक ए सी च्या कर्क्श्य आवाजात कशे झोपतात?
अश्विन आणि त्याचा पार्टनर पोलिसाने बरोबर इनवेस्टीगेशन केला नाही म्हणुन मारतात. अस खरच केला जात??

अस्वस्थ करणारा आहे>>
मला रोज सकाळी उठल्या उठल्या हटकून अस्वस्थ व्हायला होते असे काहीही ऐकले/ पाहिले की.

आरुषीची आई मराठी आहे ना!

केसचे पुढे काय झाले.? ह्या सिनेमा मुळे पुढे केस री ओपन झाली असे ऐकले. खरे आहे का?

केसचे पुढे काय झाले.? ह्या सिनेमा मुळे पुढे केस री ओपन झाली असे ऐकले. खरे आहे का? >> केसचे पुढे काय झाले? अजुन ते दोघे जेल मधेच आहेत का?

मी हा चित्रपट कालच पाहिला आणि मुद्दाम इथली चर्चा वाचायला आलो.

मेघनाची जबरदस्त पकड जाणवतेच आणि पटकथेत देखील उगाच प्रेक्षकांना कोड्यात टाकणारे काही नाही. एका घटनेचे जे वर्णन समोर येतेय, त्यावर लगेच विश्वास बसतो.
नाववाले कलाकार छोट्या भुमिकेत असले तरी बाकीचे सर्वच कलाकार फार उत्तम काम करुन गेलेत.

सहज आठवले, एकाच घटनेचे वेगवेगळ्या कोनातून चित्रण दुसरी सीता नावाच्या चित्रपटातही होते. जया भादुरी, ललिता पवार, सिम्मी गरेवाल वगैरे होत्या त्यात. एरवी न आवडणारी जया भादुरी, मला चक्क आवडली होती त्या चित्रपटात.

हा चित्रपट तपासकथा + चर्चात्मक काथ्याकुट असा आहे. याच विषयावरील रहस्य या नावाचा दुसरा एक चित्रपट मात्र नावाप्रमाणेच कमालीचा रहस्यमय आहे. शेवटपर्यंत खूनी कोण असेल याचा काहीच अंदाज येत नाही.

{{{ एकाच घटनेचे वेगवेगळ्या कोनातून चित्रण }}}

सूरज का सातवा घोडा हा याचे उत्तम उदाहरण ठरावा.

Pages