अर्धा-दशक लहान बायको - भाग २

Submitted by आशयगुणे on 2 October, 2015 - 04:02

आम्ही आता घरी आलो होतो. एकमेकांची सवय होऊ लागली होती आणि हळू हळू स्वभाव देखील समजू-जाणवू लागले होते. अर्थात निश्चित स्वरूपात नाही. पण एक अंदाज येऊ लागला होता एवढं मात्र खरं! काही वेळेस त्यामुळे खटके देखील उडायचे.जेवण झाल्यावर गाणी ऐकायची मला लहानपणापासून सवय. त्यात 'जो जीता वोही सिकंदर' किंवा 'दिलवाले दुल्हनिया जायेंगे' मधली गाणी अगदी विशेष आवडीने. कधी कधी 'अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का' होऊन जायचं. अधून मधून ८० च्या दशकातील आर.डी बर्मन ची गाणी किंवा त्याचीच '१९४२ - अ लव्ह स्टोरी' मधली गाणी असायची. कधी कधी 'तेझाब', 'बेटा' वगेरे सिनेमे हजेरी लावायचे. आमच्या घरी टी.वी सर्वप्रथम आला तेव्हा ऐकलेली … किंवा आपण म्हणू पाहिलेली ही गाणी आहेत.

" आमच्याकडे टी.वी आला तेव्हा सुपरहिट मुकाबला वर हे गाणं सर्वप्रथम पाहिलं ", मी एका गाण्याबद्दल हिला सांगत होतो. हिला त्याचे फार काही वाटले नाही. जी गोष्ट गाण्यांची ती गोष्ट इतर बऱ्याच गोष्टींची! तिला 'मिले सूर मेरा तुम्हारा' किंवा 'बजे सरगम' असे जुने विडीयो लावले की कंटाळा येतो . मला कधी कधी जुन्या दूरदर्शनच्या जाहिराती बघायला आवडतात. त्याने मी मधूनच सायकल आणि स्कूटर रस्त्यावर फिरत असलेल्या माझ्या लहानपणात जातो. धारा, लिरिल, बोर्नविटा, डेअरी मिल्क, रस्ना, फेविकॉल, निरमा, अमूल हे आयुष्याचा भाग नव्हते झाले अशा माझ्या बालपणी डोकावतो. हिला त्याचे विशेष काही वाटत नाही. मी आणि माझी बहिण आमचा landline फोन वाजला की तो कोण पहिले उचलतोय ह्यासाठी शर्यत लावायचो हे तिला सांगितल्यावर आपला नवरा नक्कीच लहानपणी वेडा होता अशा नजरेने ती पाहते. Landline फोन नंतरचा कॉर्डलेस फोन किंवा पेजर वगेरे चा प्रवास तिने अनुभवलेला नसावा. कारण त्याबद्दल घरी कधी विषय निघाला तर ती त्यात सहभागी होत नाही. घरी कधी दूरदर्शनच्या सिरियलच्या आठवणी निघाल्या की ही काही मिनिटांमध्ये आतल्या खोलीत निघून जाते. हिच्या आठवणी ह्या ह्रितिक रोशन पासून सुरु होतात आणि बऱ्याचशा नंतरच्या हिरो-हिरोइन्स पर्यंत येउन पोहोचतात. हिला श्रीमान-श्रीमती मध्ये रस नाही पण फ्रेंड्स मध्ये आहे. ज्या गोष्टी मला कॉलेज संपताना मिळाल्या त्या तिच्याकडे दहावीतच आल्याचे माझ्या लक्षात येत होते. ह्या साऱ्या यादीत इंटरनेट, फेसबुक आणि मोबाईल फोन ह्याचा देखील समावेश होता. तिने सायबर कॅफेचा उपयोग केवळ प्रिंट काढायला केला होत. तिला कळायला लागणाऱ्या वेळेत तिच्याकडे कॉम्पुटर आणि इंटरनेट हे दोन्हीही आले होते. त्यामुळे जुन्या टी.वी विडीयो गेम्स बद्दल बोललं तर तिला काही कळायचं नाही. पण तिला कॉम्पुटर गेम्स बद्दल सगळी माहिती होती. एकूणच असं की हे सगळं तिच्याकडे एकदम आलं होतंं. माझ्यासारखी ती कोणत्याही प्रक्रियेला सामोरी गेली नव्हती.

तिला खेळाची देखील आवड होती. पण तिचे फेडरर-प्रेम हे साम्प्रासला न बघता निर्माण झाले होते आणि सचिन तेंडुलकरची शेवटची दहा वर्ष तिने पाहिल्यामुळे तो निवृत्त झाला तरी तिचे आयुष्य सुरळीत सुरु होते.

पण एवढं असून सुद्धा ही दरी मी भरून काढायचा प्रयत्न करू शकत होतो. परंतु ती दहावीतच असताना फेसबुक तिच्यापर्यंत पोहोचले होते आणि त्याच्या जवळ जवळ चार एक वर्ष तरी आधी इंटरनेट! त्यामुळे ही दरी भरून काढणं मला नक्कीच जड जात होतं. आणि ते वापरण्यात मी नक्कीच कमी पडत होतो. म्हणजे फेसबुक आणि एकूण सोशल मिडिया हे तुमच्या आवडी जोपासणाऱ्या, सम-विचारी लोकांना शोधणारे आणि त्या नंतर त्यांना प्रत्यक्ष भेटून मैत्री करायसाठी उत्तम माध्यम आहे एवढेच मला माहिती होते! परंतु त्याच्या पलीकडे देखील त्याचे भरपूर उपयोग आहेत हे मला काही दिवसात समजले. निमित्त होते एका रविवारी - लग्नाला दोन महिने झाले म्हणून (!) - दिवसभर फिरायला जाण्याचे. तिला एव्हाना नोकरी देखील लागली होती. परंतु ती जिथे जायची तिथे मेट्रो ने जावे लागत नव्हते. आणि ही पुण्याची असल्यामुळे तिला मेट्रो मध्ये बसायचे आकर्षण होते. पण आमचा अख्खा दिवस साऱ्या जगाने पाहवा अशी तिची योजना होती! त्यामुळे मेट्रो मध्ये बसायच्या आधी घाटकोपर स्टेशनवर 'excited to ride mumbai metro for first time' असा स्टेटस फेसबुक वर लिहिला गेला आणि 'with' मध्ये माझे नाव! त्या नंतर दोन मिनिटे नाही झाली की 'and the ride begins' म्हणून पुन्हा फेसबुक स्टेटस…. सोबत मी होतोच! पाच मिनिटांनी मी तिला खाली दिसणारी रहदारी दाखवणार तेवढ्यात एका सेल्फीची फर्माईश! मग पुढे 'mumbai metro selfie' अशा नावाने पुन्हा आम्ही फेसबुकवर! एव्हाना अंधेरी स्टेशन आले आणि उतरायची वेळ झाली. मुंबई मेट्रोच्या ब्रिज वरून दिसणारी मुंबई बघायचीच राहिली.… पण हे सगळं संपलं नव्हतं! त्यानंतर जेवताना प्रत्येक डिशचा काढलेला फोटो आणि प्रत्येक वेळेस त्याचा फेसबुकवर मांडलेला पंचनामा हे काही संपत नव्हतं. दिवसाचा शेवटचा टप्पा हा पिक्चर बघण्याचा होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पिक्चर बघताना देखील साधारण दर १५ ते २० मिनिटांनी मोबाईल बाहेर काढला जात होता. थेटरात बसलेले बहुतांश तिच्या वयाचे लोक मला हेच करताना आढळत होते. आणि मला अपेक्षित होते तेच झाले. घरी परत येताना पिक्चर बद्दल काही बोलताच आले नाही. कारण बहुतांश गोष्टी तिच्या नीट लक्षातच नव्हत्या!

बाकी इंटरनेट आणि मोबाईल हे आता अविभाज्य घटक वगेरे राहिले नव्हते. तर ते एक शारिरिक विस्तार झाले होते! त्यामुळे काही मजेशीर गोष्टी देखील होयच्या. माझा एक चुलत भाऊ अमेरिकेत असतो. तिथे कुठे फिरायला गेला तर तिथले फोटो आमच्याशी शेअर करतो. त्यातलाच एक फोटो पाहताना हिने प्रतिक्रिया दिली होती
" अरे… ही झाडं बघ ना … Farmville सारखी आहेत!"
तशीच एक प्रतिक्रिया तिने चर्चगेटच्या रस्त्यांवरून जाताना एका sweet-shop कडे पाहून दिली होती. तिथल्या डब्यांमध्ये विविध प्रकारच्या गोळ्या ठेवलेल्या पाहून तिची प्रतिक्रिया होती की त्या candy crush saga ह्या खेळासारख्या होत्या. दोन्ही वेळेस मला हेच सांगावे लागले की ह्या दोन खेळांची संकल्पना प्रत्यक्ष अस्तित्वात असलेल्या गोष्टींपासून निर्माण झाली आहे. असाच एक प्रसंग फेसबुक नवीन आले तेव्हा मी अनुभवला होता. तेव्हा मी कॉलेजला होतो. फेसबुकची संकल्पना मूळ अमेरिकन. तिथल्या जीवनपद्धती मुळे निर्माण झालेल्या सर्व गोष्टी ह्या माध्यमातून आपल्याला दिसतात. त्यात एक 'poke' असा पर्याय आहे. ह्याचा अर्थ बोटाने हलकेच टोचणे. म्हणजे तिथे कामानिमित्त एकमेकांपासून लांब गेलेली माणसं फेसबुक वर प्रतिसाद द्यायची थांबली तर आपण त्यांच्या प्रोफाईल वर जाउन हे poke चे बटण क्लिक करायचे. पण हीच गोष्ट आमच्या बिल्डींग मधल्या दहावीतल्या दोन पोरांनी ( एक पहिल्या आणि दुसरा दुसऱ्या मजल्यावर राहणारा) सुरु केली तेव्हा मला हसावं का रडावं हेच कळेना! शिवाय ते एकमेकांना बाहेर सागायचे देखील,
" अरे … मी तुला poke केलंय हं … घरी गेल्यावर मला परत कर"

आता जाणवतं की ही देखील त्या वेळेस नववी-दहावीतच तर होती! मग वाटलं की फेसबुकची मूळ संकल्पना ह्या मुलांना समजली आहे का? फेसबुक किंवा एकंदर सगळ्याच प्रकारचा सोशल मिडिया हा संपर्क तुटलेल्या मित्र-मैत्रिणींशी पुन्हा संपर्कात येण्याचं साधन आहे हे त्याचे भारतातले विश्लेषण झाले. पण ह्याचा मूळ हेतू 'नेटवर्किंग' हा आहे. आपल्यात ज्या विशेष आवडी-निवडी आहेत आणि ज्या कालांतराने आपल्या स्वभावात प्रवेश करतात त्या आवडी-निवडी आपल्या पारंपारिक मित्र-वर्तुळात असतीलच असं नाही. सोशल मिडिया मात्र तसे वर्तुळ जमवतो आणि आपल्या व्यक्तिमत्वाला अधिक खुलवतो. फेसबुक हे आपण नेहमीच भेटतो त्या मित्र-मैत्रिणींबरोबर फोटो काढायची जागा नाही. फेसबुक काय WhatsApp आणि गेला बाजार 'एसएमएस' ह्या माध्यमांची सुद्धा आपण अशीच भेसळ केली! ह्या दोन्हींचा वापर रोजचे महत्वाचे संदेश पाठवणे हा आहे. त्यात आपण मोठ्ठाले निबंध पाठवून त्याचा वेगळाच उपयोग केला. मी वय वर्ष ४० आणि पुढे असलेल्या लोकांबद्दल एकवेळ समजू शकतो. कारण हे सारं त्यांच्या आयुष्यात एकदम आलं. काहींच्या तर उतारवयात! परंतु तंत्रज्ञाना बरोबर वाढणाऱ्या वयोगटाकडून असे निश्चित अपेक्षित नाही. त्यामुळे ही ऑफिस मध्ये गेल्यावर तिच्या तिथल्या मैत्रिणी बरोबर कॉफी पिताना फोटो काढून फेसबुकवर का टाकते माहिती नाही! रक्षाबंधन किंवा भाऊबीज साजरी झाल्यावर स्वतःच्या भावाला फेसबुक वर tag करायची विशेष गरज आहे का? ' मला हा दागिना खूप आवडला … त्यामुळे तू मला तो घेऊन दे' अशा एका वाक्यात हिने मला tag केलेलं! गम्मत म्हणजे तसा विषय त्या दिवसानंतर एकदाही आमच्या घरी चर्चेत आलेला नाही. मग एकदा लग्न होऊन दोन महिने झाले म्हणून एका स्टेटस मध्ये मी होतो. तोच मी बाहेर जेवायला गेलो की पण असायचो. म्हणजे तिच्या बरोबर तर असायचो पण ती फेसबुक वर एकटी पडू नये न …म्हणून तिकडे पण बरोबर असायचो! हल्ली मॉल मध्ये गेलो की मध्येच एके ठिकाणी सेल्फी साठी उभं रहावं लागतं. कधी मध्येच 'माझा फोटो काढ ना' ची फर्माइश होते आणि मग एका बाजूला मी आणि दुसऱ्या बाजूला ती आणि मधून जाणारी माणसं असं चित्र होतं! काही लोकं सौजन्य दाखवतात आणि फोटो होऊ देतात आणि आपल्याला आणखी खजील करतात. आणि मी विचार करू लागतो की ह्या फोटोंचे पुढे होते काय? म्हणजे एकदा असंच मॉल मध्ये काढलेल्या फोटोबद्दल मी हिला विचारलं. तर तेव्हा समजलं की तो फोटो जुन्या फोन मध्ये होता आणि आता तो फोन एकदम खराब झाल्यामुळे सापडणं कठीण आहे. मग हे फोटो काढले कशाला होते? त्याचा काही विशिष्ट अल्बम बनवला गेला का? फोटो ही एक आठवण की एक क्षणिक सोय? ह्या आणि अशा बऱ्याच प्रश्नांना मी सामोरे जात असतो. उत्तर सापडणं अवघड आहे.

परंतु एका घटनेने माझे थोडेसे मत-परिवर्तन झाले. एका पारिवारिक कार्यक्रमाला आम्ही सगळे एकत्र जमलो होतो. माझ्या लहान बहिण-भावंडांचं हिच्याशी फार छान जमतं. सर्व बऱ्यापैकी सारख्या वयाचे असल्यामुळे असेल. त्या दिवशी प्राथमिक गप्पा झाल्यावर ठरलेलं फोटो सेशन सुरु झालं. ह्यांचे बरेच फोटो काढून झाल्यावर आम्हा मोठ्या बहिण-भावांना त्यात ओढले गेले. आम्ही अगदी पहिले नाही वगेरे म्हटले तरीही शेवटी त्यात सामील झालो. मोबाईलच्या चांगल्या दर्जामुळे फोटो देखील छान येत होते. आणि तेव्हा मनात विचार आला की आपले असे फोटो किती आहेत? काही लहानपणीचे वाढदिवसाचे वगेरे, थोडेफार शाळेतले ( शाळेनेच काढून दिलेले) काही कॉलेज मधले आणि थोडेफार नवीन फोन ने काढलेले. आपण अशा बऱ्याच कार्यक्रमांना मित्र-मैत्रिणींबरोबर, बहिण-भावांबरोबर उपस्थित राहिलो आहे? पण ते क्षण आपण टिपू शकलो नाही. आपल्याकडे जुना कॅमेरा होता, रोल फिरवायला लागायचा आणि त्यावेळेस ह्या सर्व कारणांमुळे फोटोची सवय नव्हती. अगदी फार जुनी गोष्ट नाही ही. पण आता तंत्रज्ञान आहे तर असा उपयोग का करू नये? तीच गोष्ट आपल्या लहानपणीच्या फोटोंची! काही मोजके फोटो सोडले तर आपल्याकडे आपलं लहानपण उलगडणारे फोटो नाहीत. पण आज आई-वडील आपल्या मुलांची वाढ फोटोच नव्हे तर विडीयो वर देखील टिपू शकतात. आणि हे साठवलेले क्षण अगदी पंधरा वर्षानंतर पुन्हा अनुभवू शकतात. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींना नावं ठेवणे किंवा त्यांच्या संबंधित प्रश्न उपस्थित करण्यात काही अर्थ नाही.

हेच विचार डोक्यात ठेवून मी दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेलो. वर सांगितल्याप्रमाणे मी ई-कॉमर्स क्षेत्रात कामाला आहे. ह्या क्षेत्राची प्राथमिक ओळख म्हणजे आपण जे व्यवहार दैनंदिन आयुष्यात करतो तेच व्यवहार इंटरनेट वरून करणाऱ्या कंपन्यांचे क्षेत्र. तसं मी हॉटेल बुकिंग इंटरनेट वरून करून देणाऱ्या कंपनीत कामाला आहे. त्याच दिवशी आमच्या कंपनीत दोन मोठ्या पदांवर नियुक्ती झाली. ही दोघं म्हणजे नुकतीच कॉलेज मधून बाहेर पडलेली २३ वर्षांची मुलं! गुगल ह्या वेबसाईट वर कंपनी अगदी पहिल्या पानावर झळकावी ( आणि लोकांच्या नजरेस पडावी) ह्याची एक सोपी पद्धत त्यांनी interview मध्ये सुचवलेली होती. कंपनी मध्ये कुणालाही आजपर्यंत ह्याचा अंदाज आला नव्हता. त्यामुळे आता माझ्या बरोबरीच्या पदावर माझ्याहून ५ वर्षांनी लहान असलेली दोन मुलं दाखल झाली होती. आणि ह्याचा आम्हाला फायदाच होत गेला. ह्या मुलांकडे नवीन कल्पना भरपूर होत्या. इंटरनेट क्षेत्रात वावर आमच्यापेक्षा अधिक होता. फक्त सकाळच्या मिटिंगला मोबाईल बाजूला ठेवणं त्यांना जमत नव्हतं. कुणी दोन -तीन मिनिटं बोलायचं थांबलं की लगेच मोबाईलवर फेसबुक वगेरे बघितलं जायचं. मिटिंग मध्ये स्वस्थ बसणं जरा अवघड जायचं. इंटरनेट सर्व्हिस थोडीशी मंदावली की लगेच नापसंती व्यक्त केली जायची. पण आमच्या क्षेत्रात एकूण ह्या वयाच्या मुलांनी कंपनी सुरु केल्याची देखील उदाहरणं येत होती. भारतातले बरेच नवीन CEO हे पंचवीस वर्षांच्या जवळचे होते हे मध्ये एका अहवालात प्रसिद्ध झाले होते. म्हणजे ह्यांची कल्पनाशक्ती विसाव्या वर्षी जागृत होत गेली होती. अशी ही उदाहरणं आम्हाला देखील एक सकारात्मक आव्हान देत होती.

अशाच मन:स्थितीत मी घरी आलो. बायको किचन मध्ये चहा करत होती. तिच्या हातातून चहा चा कप घेतला आणि खिशातून मोबाईल बाहेर काढून म्हणालो,
"सेल्फी!"

जुळवून घ्यायला सुरुवात झाली होती.

- आशय गुणे Happy

भाग १ इथे आहे - http://www.maayboli.com/node/55905

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजकालच्या सेल्फीच्या आणि ऊठसूट फेसबुकवर स्टेटस अपडेट करण्याच्या वृत्तीवर बरोबर बोट ठेवलय! त्यामुळे आवडला लेख. वास्तविक खरंच बायको आणि तुमच्यात अशी तफावत असेल तर कठीण आहे!

सेल्फी चं वेड कमी होईलच हळूहळू. सेल्फीमधलं ते विशीष्ठ बघणं आणि लांब होत असलेला हात(हो स्टिक वापरुन पण) तसा विचीत्र दिसतो.
चांगले दिसणारे फोटो काढायचे असतील आणि कोणाला विनंती करायची नसेल तर हल्ली टायमर असतातच मोबाईलच्या कॅमेराला.

जनरेशन गॅप इज डायरेक्टली प्रपोर्शनल टु ॲडाॅप्शन रेट आॅफ टेक्नाॅलाॅजी, या इंफरंसला बळकटी मिळाली, या लेखामुळे... Happy

जोरदार निरीक्षण आणि खुसखुशीत लेखन! छान लिहिलेय!

अवांतर : सेल्फी स्टिकने धुमाकूळ घातलाय!! एखाद्या ठिकाणी फिरायला गेले की सगळे ग्रुप सेल्फी काढायच्या मागे Lol

अरे तो स्पॉट बघा जरा, तर नको, आधी सेल्फी Proud आणि ग्रुप सेल्फी काढल्यावर तो सगळ्या ग्रुप्सवर पाठवायची घाई ...

पहिल्या भागापेक्षा हा भाग जास्त आवडला. पहिल्या भागात काही लोकानी प्रतिक्रिया देण्याची घाई केल्यासारखे वाटते.

>>पण २२ आणि २८ वर्षाच्या लोकांमधे एवढा फरक असतो>> मलाही हाच प्रश्न पडला वाचताना. नक्की २८ ना? की ३८?>>> अगदी असच वाटलं

अवांतर - लेक १४ वर्षांची आहे त्यामुळे आमच्याकडेही सेल्फीने सध्या धुमाकुळ घातला आहे आणि मुख्य म्हणजे सेल्फी काढताना पाऊट करणे कम्पालसरी आहे Uhoh की काय असेही वाटते Proud

हा भाग जास्त आवडला. यात लेख पुर्णत्वाला गेलाय.

22 विरुद्ध 28 च्या फरकात असे अनुभव येऊ शकतात याच्याशी मी तरी सहमत.
खास करून या झपाट्याने फोफावणार्या स्मार्टफोन टेक्नोलॉजीबाबत नक्कीच.
कारण एक वयोगट जेव्हा कॉलेज लाईफ मुक्तपणे बागडत असतो तेव्हा दुसरा नुकताच नोकरीला लागलेला असल्याने त्याच्या मुक्त बागडण्यावर बंधने आली असतात.
आणि मग अश्या काळात टेक्नॉलॉजित जे बदल होतात त्यांचा वापर दोघे वेगवेगळ्या पद्धतीने करतात. उदाहरणार्थ या स्मार्टफोन युगात आलेल्या सेल्फी फॅडला कॉलेजगोईंगने आपलेसे केले आणि नोकरदार वर्ग मात्र फेसबूकवर सुद्धा आपली पत सांभाळत राहिला.

दोन्ही जनरेशन आपापल्या जागी बरोबर असतात. आणि अश्यावेळी जो जितका समजूतदार असेल त्याने तितका समजूतदारपणा दाखवावा Happy

प्रतिक्रिया देणाऱ्या सर्वांचे आभार आणि धन्यवाद! मला ह्या विषयावर लिहिताना बरीच 'लेबलं' लागायची धास्ती होतीच. धास्ती म्हणण्यापेक्षा खात्री होती. कुणी मला म्हातारा म्हणून माझ्या वयाचा विचार करेल किंवा कुणी माझ्याबद्दल 'स्त्रियांच्या विरोधात लिहिलंय बहुतेक' असं देखील मत बनवेल ह्याची कल्पना होती. काहींना हे 'चीप' वाटलं असेल किंवा काहींना 'उगीचच' अशा स्वरूपाचे देखील वाटेल. आणि काही लोकांना लेख पटला देखील आहे. ह्या सर्वांना त्यांच्या परीने जे काही वाटायचं आहे त्याला माझी अजिबात हरकत नाही.

हा विषय केवळ आणि केवळ 'generation gap' ह्याच हेतूने लिहिला आहे. आणि ही gap उद्भवण्याचे कारण म्हणजे technology आणि झपाट्याने बदलणारी जीवनपद्धती. ह्याचा खुलासा पुढच्या प्रतिक्रियेत दिलेलाच आहे.

माझा बायकोला डंब म्हणून प्रस्तुत करण्याचा हेतू नाही. परंतु जर ते तसं वाटलं असेल तर ह्या वर्णन केलेल्या गोष्टी आपण 'डंब' समजतो ( आणि त्या लिहिल्या की डंब वाटतात) असाच त्याचा अर्थ होतो. ह्याच न्यायाने २१-२३ वर्षांच्या मुलांना देखील माझ्या वयोगटातील मुलांना 'डंब' समजण्याचा अधिकार आहे. कारण त्यांना जे 'कूल' वाटतं ते आपण करत नाही. पण सांगताना एवढेच सांगीन की ही निरीक्षणं आहेत. कुणीतरी प्रतिक्रिया दिली आहे की हाच लेख मित्स ने लिहिला असता तर तिला 'बुढ्ढा मिल गया' चे फिलिंग येईल. पण दुसऱ्या बाजूने पाहिल्यास लेखाचा हेतू सार्थकच होईल.
काहींना माझ्या वयाबद्दल विचारावेसे/लिहावेसे वाटले. त्यांना एवढेच सांगीन की मी २८ वर्षांचाच आहे आणि माझे लग्न झालेले नाही. हा लेख निरीक्षणांवर आणि आजू-बाजूला घडणाऱ्या घटनांवर लिहिला आहे.

सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानून इतकेच सांगीन की माझ्या विचारांशी 'अमितव' आणि 'ऋन्मेऽऽष' ह्यांची प्रतक्रिया जुळली! आणि अर्थात त्यांच्या प्रतिक्रियेला दुजोरा देणाऱ्यांची सुद्धा.

भारतात १९९१ ह्या वर्षी आर्थिक उदारीकरण आले. परिणामी तेव्हा पासून ते आतापर्यंत देशात प्रचंड प्रमाणात पैसा आणि गुंतवणूक आली. हे उदारीकरण १९९१ च्या वर्षी जरी लागू केले तरी त्याची फळं ही १९९४ पासून देशात दिसू लागली. त्यामुळे ज्या मुलांचा जन्म १९८५-१९९१ ह्या वर्षांमध्ये झाला ती साधारण ६ वर्षांची झाली तेव्हा हा बदल घडू लागला होता. आणि ह्याच वेळेस त्यांच्यापेक्षा ६ वर्षांनी लहान असलेल्या मुलांचा जन्म झाला. २००० हे वर्ष उजाडलं तेव्हा बराच बदल हा झालेला होता. तेव्हा मात्र १९८७ वाली पिढी १३ वर्षांची होती पण त्यांच्यापेक्षा ६ वर्ष लहान पिढी ७ वर्षांची! त्यामुळे ज्या गोष्टी १९८७ च्या पिढीने एका क्रमाने अनुभवल्या त्याच गोष्टी ६ वर्ष लहान पिढीने बऱ्याचशा एकदम. ह्या साऱ्या प्रकारामुळे आधी जो पिढी-बदल १० वर्षांनी होयच तो आता ५-६ वर्षांनी होतो आहे. आणि पुढे कदाचित हा आणखी देखील कमी होईल. ही सारी लेखा मागची प्रेरणा! धन्यवाद! Happy

आशय, बँग ऑन.
निरिक्षणंही आणि कारणमिमांसाही. मी काल हेच वाहत्या धाग्यावर लिहिले होते की हा जो बदल आहे तो प्री-९१ आणि पोस्ट ९१ अपब्रिंगिंग चा आहेच शिवाय प्री-इंटरनेट आणि पोस्ट इंटरनेट मुळेही आहे. नीट निरिक्षण केल्यास अगदी व्यवस्थित दिसून येतो.
१९८२ ते २००० मध्ये जन्मलेल्या मुलांना मिलेनिअल्स म्हटले जाते. पण या मिलेनिअल्स मध्ये ही आपल्याकडे प्री-९१ आणि पोस्ट ९१ हे ठळक डिफरन्सेस आहेत. मोदी काय किंवा केजरीवाल काय, हे मिलेनिअल्स चेच लीडर्स आहेत (म्हणजे त्यांच्या पसंतीचे). बिकॉज दे टॉक अबाउट अ‍ॅक्शन. ( हे चांगलं-वाईट याविषयी इथे मला लिहायचं नाही कारण तो विषय नाही).

हे ललित जनरेशन gap आणि टेक्नोलॉजीचं एव्होल्युशन न बघता एकदम (सध्याच) फायनल product दिसणारी पिढी आणि किंचित मोठी पण एव्होल्युशन बघितलेली पिढी यावर आहे (असं मला वाटलं). यात स्त्री किंवा पुरुष यांना टोमणे मारलेत, विनोद केलेत असं अजिबात (मला) वाटलं नाही. >>> अमितव + १

हा भाग जरा पसरट झालाय हे खरंय मात्र.

आशयगुणे तुमच्या हा लेटेस्ट दोन पोस्टसही आवडल्या आणि पटल्या.

दोन्ही भाग वाचून काढले . मला अमितची पोस्ट पटली . पहिला भाग थोडा विस्कळीत झालाय. त्यामुळे ते नेहमीचे स्त्रियांवरचे विनोद या कॅटेगिरीतला लेख अस वाटू शकतो . मात्र दुसरा भाग वाचल्यास लेखकाला नक्की काय म्हणायच आहे ते लक्षात येत. आशय , तुम्ही पसरट झालेला पहिला भाग एडिट केलाततर तो भाग नेमका होईल हेमावैम .

तुमच्या लेटेस्ट पोस्ट्सही आवडल्या

नताशा + १००००००
म्हणूनच मी 'दूरदर्शन' आणि 'सचिन तेंडूलकर' ही उदाहरणं दिली. असो, तुम्ही 'वाहत्या धाग्या' बद्दल बोलताय तो कोणता? तिथे वेगळ्या प्रतिक्रिया सुरु असतात का? मला ही तिथे येउन बघायला आवडेल!

पण एका गोष्टीचे वाईट वाटले. मी माझी प्रतिक्रिया दिल्यानंतर बहुतेक जणांनी आपल्या प्रतिक्रिया 'डिलीट' केलेल्या आहेत. मी लोकशाहीवादी असल्यामुळे प्रत्येक प्रतिक्रियेकडे आदर ठेवून पाहतो. आणि वर देखील म्हटलं आहे की माझी काहीच हरकत नाही. त्यामुळे राग अजिबात नाही कुणाचाही! Happy

जाई, पहिल्या भागात शक्य तेवढा मोठा कॅनवास दाखवायचा असल्यामुळे तो पसरट झाला असेल. इतरांना देखील धन्यवाद! Happy

हा वाहता धागा झालाय का?

मी माझी प्रतिक्रिया दिल्यानंतर बहुतेक जणांनी आपल्या प्रतिक्रिया 'डिलीट' केलेल्या आहेत<< नाही. बहुतेक प्रतिक्रिया वाहून जात आहेत. अ‍ॅडमिनना धाग्याला बांध घालायला सांगा.